लकी ड्रॉ

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 26 March, 2024 - 13:55

कथालेखकाची पार्श्वभूमी
मी काही हौशी लेखक वगैरे नाही. शेवटचे लेखन हे कैक वर्षांपूर्वी बारावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरमध्ये जो निबंध लिहिला तेव्हा झाले होते. सध्या फक्त एखाद्या सरकारी खात्यास माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) अर्ज करणे, एखाद्या कंपनीस तक्रार अर्ज पाठविणे इतपतच लेखन मर्यादित झाले आहे! (या कथेतील संवाद मालवणी भाषेत आहेत, माझे स्वतःचे गाव मालवण तालुक्यात असले तरीही मी कधी मालवणीत संवाद साधलेला नाही. मालवणी बोललेली मला समजते परंतु मी बोलत नाही. त्यामुळे यात मालवणी भाषेत काही चुका आढळल्यास क्षमस्व!!!)

कथालेखनाची पार्श्वभूमी
संबंधित कथा ही काही वर्षांपूर्वी (साधारण २०१८) झी मराठीवर ‘गाव गाता गजाली’ या मालिकेसाठी लिहिली होती. वर म्हटल्याप्रमाणे मी काही लेखक वगैरे नाही. परंतु ही मालिका सुरु असण्याच्याच काळात ‘weight loss treatement’ किंवा (unwanted) stock market tips च्या मेसेजेस नी अक्षरशः वात आणला होता. त्यामुळे लोकांमध्ये DND (Do Not Distrub) या TRAI (Telecom Regulatory Authority of India) ने दिलेल्या सुविधेबाबत जनजागृती करून अधिकाधिक लोकांना त्यांचा मोबाईल क्र. DND मध्ये नोंदविण्यास प्रवृत्त करून या नीच telemarketers ना अद्दल घडवणे, या उद्देशाने त्यावेळेस ही कथा लिहिली होती. (या मालिकेसाठी या मालिकेतच काम करणारा एक अभिनेता प्रल्हाद कुडतरकर कथालेखन करीत असे, परंतु एक – दोन एपिसोडमध्ये मी अन्य व्यक्तींचे कथालेखक म्हणून नाव पाहिले होते.) अर्थात माझी कथा लिहून पूर्ण व्हायच्या आत ती मालिकाच बंद झाली, त्यामुळे मला ही कथा पाठवता आली नाही. त्यामुळे लिहिलेली कथा (पुन्हा कधीतरी मालिका सुरु होईल, या आशेवर) गेली अनेक वर्षे संगणकात पडून होती. अर्थात आता तशी काहीही चिन्हे दिसत नसल्याने ही कथा मायबोलीवर प्रसिद्ध करायचे ठरवले. अर्थात कथेत कोकणातील ‘आंगणेवाडी जत्रा’ आणि ‘शिमगा’ (होळी) यांचा संदर्भ असल्याने योग्य वेळेची वाट पाहून आता होळी झाल्यावर कथा प्रसिद्ध करीत आहे. मूळ कथालेखन हे मालिकेसाठी केलेले असल्याने संपूर्ण कथा नाट्य स्वरूपातच आहे, तसेच २०१७-१८ साली लिहिलेली कथा असल्याने काही संदर्भ थोडे जुने वाटतील.

पात्र-परिचय
(जर आपण त्यावेळी ‘गाव गाता गजाली’ ही मालिका पाहिली असल्यास हा भाग वगळून पुढे जाऊ शकता!)
या कथेतील सर्व पात्रे कोकणातील एका खेडेगावातील आहेत.
वामन – गावातील एक ३५-४० वर्षांचा युवक, जो गावातील लोकांनी सांगितलेली छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करतो. चहाचा प्रचंड चाहता! एक कप चहाच्या बदल्यात सर्व गावातील बातम्या इकडच्या तिकडे करण्यात पटाईत !
आबा – गावातील मंदिराचे पुजारी, त्यामुळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, स्थूल शरीरयष्टी
गोदा काकू – आबांची पत्नी, स्वभावाने अत्यंत कंजूष. ही जादूटोणा करते असा गाववाल्यांचा समज आहे.
सुहास – गावातील घरे, मंदिर यांचे तसेच लहान-मोठ्या सरकारी बांधकामाचे कंत्राट घेणारा कंत्राटदार, मात्र कंत्राट घेऊन सर्व कामे अर्धवट करण्याची याची ख्याती!
शोभा – सुहासची पत्नी, गृहिणी, काहीही झाले तरी तोंडाला पदर लावून डोळ्यातून आसवे काढायची सवय!
क्रिश – सुहास व शोभा यांचा १०-११ वर्षांचा अत्यंत मस्तीखोर, चुणचुणीत मुलगा
मास्तर – गावच्या शाळेत शिकविणारे शिक्षक, नोकरीसोबतच जोडधंदा म्हणून घराच्या पडवीत घातलेले एक छोटेसे किराणा मालाचे दुकान, जे त्यांची पत्नी सांभाळते.
सविता – मास्तरांची पत्नी, जी घरासोबतच दुकानही सांभाळते.
संदीप – गावातील साधारण तिशीचा तरुण, जो रिक्षाचालक आहे. रिक्षा चालविण्यासोबतच त्याला राजकारणातही उतरायचे आहे. त्यामुळे गावाला ‘गाव’ न संबोधता ‘माझा मतदारसंघ’ असे संबोधतो!
नामदेव न्हावी (नाम्या) – गावात केशकर्तनालय असणारा न्हावी. याला २ तरुण मुली आहेत.
पद्मा – नाम्या नाव्ह्याची थोरली (मोठी) मुलगी, जिचे गावातील प्रसाद नावाच्या मुलावर प्रेम आहे.
प्रसाद – गावातील साधारण पंचविशीचा तरुण, पद्माचा प्रियकर. कामधंदा – काहीही नाही. शाहरुख खानचा फॅन
बैल (उज्ज्वल) – प्रसादचा मित्र, सतत भूक लागणारा, खा-खा करणारा. सतत खाण्यामुळे अंगापिंडाने मजबूत (तारक मेहता मधला ‘गोली’ आठवा!) त्यामुळे त्याच्या ‘उज्ज्वल’ या खऱ्या नावाने त्याचे आई-वडील वगळता गावातले कोणीच ओळखत नाही. इतरांसाठी तो ‘बैल’!
करण आणि अर्जुन : प्रसाद आणि उज्ज्वल उर्फ बैल यांचे मित्र, अगदी एकाच साच्यातून काढलेले दोन पुतळे भासावेत असे जुळे भाऊ! एक जण एक वाक्य बोलला की दुसऱ्याने त्याची ‘री ओढायची’ ही सवय! हे चौघेही काहीही काम-धंदा न करणारे.
मनोहर – गावातील एक युवक, ज्याचे टोपणनाव ‘बळी’! कारण त्याची पत्नी (गायत्री) प्रचंड भांडकुदळ तर आईला वयोमानाप्रमाणे नीटसे ऐकू येत नाही. त्यामुळे दोघींची रोजच लहान-सहान गोष्टींवरून भांडणे ठरलेली. आणि या दोघींच्या भांडणात याचा बळी जातो म्हणून हा ‘बळी’!
बहिरी (मनोहरची आई) – हिचे खरे नाव माहित नाही, पण तिला ऐकू येत नाही म्हणून गावकरी तिला ‘बहिरी’ म्हणतात.
सरकती – गावातील अजून एक आजी. हिला वयोमानानुसार नीटसे चालता येत नाही, त्यामुळे केवळ घराबाहेर जातांना काठी घेऊन वाकून चालते व घरात असतांना बुड सरकवतच इकडून तिकडे जाते, म्हणून गावकरी हिला ‘सरकती’ म्हणतात.
बबन / बबन्या – गावातील एक युवक. खरेतर मूळ कवी पण एकदा त्याने लिहिलेला काव्यसंग्रह दुसऱ्या कोणीतरी आपल्या नावावर खपवल्याने त्या दुःखात दारूत पूर्ण बुडालेला. सध्या काहीही कमाई नसल्याने समोर दिसेल त्याच्याकडे १० रुपये मागून दारूची सोय करणारा एक दारुडा.
(जर आपल्याला या पात्रांच्या लकबी पाहायच्या असतील तर YouTube वर ‘गाव गाता गजाली’चा एखादा एपिसोड पाहावा!)

लकी ड्रॉ

(गावातील आठवडी बाजार भरला आहे. वामन बाजारात हातात २-३ पिशव्या घेऊन खरेदी करत फिरतो आहे. इतक्यात त्याला ‘गोदा काकू’चा फोन येतो.)
वामन : हॅलो
गोदा काकू : हॅलो, वामन भाऊजीनु, खय आसास?
वामन : आता या टायमाक मी खय असतलय? बाजारात आसय.
गोदा काकू : येताना माझ्यासाठी अर्धा डझन लिंबा हाडशाल???
वामन : नाय आता माका जमूचा नाय, आधीच सामान मॉप हा.
गोदा काकू : असा काय करतास भाऊजी? लिंबाचा कितीसा ओझा जातला? तुमी लिंबा घेऊन येवा, मी तवसर चाय बनवतंय.
वामन : (चहाचे नाव ऐकताच चेहरा खुलतो) बरा, हाडतय.
(वामन फोन बंद करून खिशात ठेवतो. तो बाजारात फिरताना त्याला लकी ड्रॉ चा एक स्टॉल दिसतो. स्टॉलवर मेगाफोन वरून अनाउन्समेंट सुरु आहे.)
अनाऊन्समेंट : ऐका, ऐका, ऐका! लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. आपल्या गावात प्रथमच आकर्षक बक्षिसे घेऊन आला आहे लकी ड्रॉ. प्रथम भाग्यवान विजेत्यास कणकवलीत आकर्षक flat, द्वितीय विजेत्यास चार चाकी गाडी, तृतीय विजेत्यास स्पोर्टस बाईक आणि इतरही आकर्षक बक्षिसे. त्वरा करा, ही संधी दवडू नका. फक्त एक फॉर्म भरा आणि लाखाची बक्षिसे जिंका.
(वामन त्या counter जवळ जाऊन उत्सुकतेने बघतो.)
Counter वरील व्यक्ती : या भाऊ या, हा फॉर्म भरा आणि बक्षिसे जिंका.
वामन : पण माका लिऊक – वाचूक येना नाय.
Counter वरील व्यक्ती : काही हरकत नाही दादा, मी भरतो तुमचा फॉर्म. सांगा तुमचं नाव, मोबाईल नंबर.
(Counter वरील व्यक्ती वामनचा फॉर्म भरतो.)
वामन : तुमी किती वाजासर आसास हय? आमच्या गावातल्या लोकांका पाठवलं असतंय. तेंचा पण काहीतरी भला होईत.
Counter वरील व्यक्ती : अहो मग हे फॉर्म घेऊन जा ना, त्यांना इथे यायची गरज नाही. फॉर्म भरून झाले की सगळे फॉर्म्स एकाच पाकिटात घालून या पत्त्यावर पाठवा पोस्टाने. पत्ता इथे खाली दिला आहे.
वामन : असा म्हणतास? बरा, देवा ते फॉर्म.
(वामन गावात येतो आणि सायकलवरून ओरडत सगळ्यांना फॉर्म्स वाटत फिरतो. सगळे जण फॉर्म्स घेऊन जातात.)
----------------------------------------------------------------------------------------
[ इथे एपिसोडच्या नावाची पाटी दिसते – ‘लकी ड्रॉ’]

(गावातील पारावर मास्तर, आबा, सुहास, मनोहर, संदीप, बबन असे सगळे बसलेले आहेत, (नाम्या न्हावी सोडून) आणि झालेल्या शिमगोत्सवाबद्द्ल चर्चा करत आहेत.)
सुहास : काय मास्तर, आज एकदम निवांत दिसतास? शाळा लवकर सोडलास?
मास्तर : आज सुट्टी हा पोरांका. दहावीची परीक्षा सुरु हा ना. परीक्षेचे पेपर पोचवलंय, म्हटला जरा तुमच्या वांगडा गजाली करू.
सुहास : ह्या बरा केलास.
आबा : बाकी शिमाग्यक लय मजा इली. मुंबैसून चाकरमानीपण इले. तो सरकतीचो झील आणि सून पण इली.
संदीप : आबानु कसा हा, गणपती – शिमगो हेका चाकरमानी येतलोच. इतक्याच कित्या, आंगणेवाडीच्या जत्रेक पण यंदा मोप लोका इली.
मनोहर : पण नाम्याकाका खय हा? सुहासा, बघ रे फोन करून.
सुहास : बघतंय.
(सुहास फोन करायला फोन बाहेर काढणार इतक्यात त्याचा फोन वाजतो.)
सुहास : नाम्याचोच फोन असतलो. (सुहास फोन उचलतो, पण तो नाम्याचा नसून रेकॉर्डेड मार्केटिंग कॉल असतो.)
फोनवरील आवाज : नमस्कार! आकर्षक flat फक्त १५ लाखात, कणकवली रेल्वे स्थानकापासून चालत ५ मिनिटांच्या अंतरावर.........
(सुहास शिव्या घालून फोन ठेवतो. सगळ्यांच्या चर्चेचा विषय बदलतो.)
सुहास : आजकाल दिवसात्सून एक तरी कॉल येता नायतर मेसेज तरी येता. कणकवलीत घर घेवा म्हणान. आता १५ लाख काय ह्येन्चो बापूस देतलो???
आबा : अरे पण आता तर तुका सरकारी कंत्राट गावला हा ना १७ लाखाचा.
सुहास : आबानु, कसा हा. त्या १७ लाखातले निम्मे तर मटेरीअल आणि कामगारांच्या मजुरिक जातले. आणि सगळे पैसे या flat ला घालून मी खाऊ काय? क्रिशच्या शिक्षणाक पैसो नको?
मास्तर : ह्या बरोबर हा तुझा. आधी पोराचा शिक्षण महत्वाचा.
सुहास : आणि विषय कसो हा? हय गावात राहून तुमच्या वांगडा गजाली करूची जी मजा हा ती थय flat मध्ये कशी येतली? बघा या फोनमुळे नाम्याक फोन लावूक इसारलंय. ह्या असा होता.
संदीप : अरे माका पण कधीकधी फोन येतत, लोन होया काय विचारुक. आता आधीच माझे रिक्षाचे हप्ते चालू आसत, नवीन लोनचे हप्ते ह्येचो बापूस भरतलो?
-------------------------------------------
(नाम्या न्हावी दुकान (सलून) बंद करून पाराकडेच यायला निघाला आहे, इतक्यात त्याला करण-अर्जुन, प्रसाद आणि बैल ही चांडाळचौकडी गाठते.)
प्रसाद : काय मामानु!
नाम्या : मामा म्हणा नको रे, वस्तारो मारीन.
प्रसाद : ok, मग पप्पानु. चललास खय?
नाम्या : मी खयव जाईन, तुका काय करुचा हा? मसणात चललंय.
प्रसाद : अवो, आता सगळा माकाच करुचा हा. पण तुमी आत्ताच मसणात गेलास तर पद्माचा कन्यादान कोण करीत?
नाम्या : मी त्येचो हात तुझ्या हातात देवचय नाय. तुका एक दमडी कमवूची अक्कल नाय, नी चललो हा लगीन करुक. अरे पद्माचा तुझ्या वांगडा लगीन करूच्या बदल्यात मी त्येका बावडेत ढकलून देईन. (प्रसादचा असा पाणउतारा करून नाम्या तरातरा निघून जातो.)
करण : आता कसा होतला रे तुझा? आपणाक कायतरी कामधंदो करुक होयो.
अर्जुन : हा, कायतरी कामधंदो करूकच होयो.
बैल : पण आपण करतलव काय?
प्रसाद : माझ्या डोक्यात एक आयडीया हा. गेल्या काही दिवसांपासून माका ना कसलेतरी मेसेज येतत, ता शेअर मार्केट काय असताना त्येचे. त्येच्यात पैसे गुंतवले की काही दिवसात पैसे वाढतत. आपण आपल्या जवळ आता जितके पैसे आसत ना, ते सगळे शेअर मार्केटात लावूक होये.
करण : पण तो शेअर बाजार मुंबईत हा ना? त्येच्यासाठी मुंबईक जाऊचा लागतला.
अर्जुन : हा, मुंबईक जाऊचा लागतला.
प्रसाद : तसा नसता रे, हयसून पण आपण पैसे भरू शकतो, फक्त तेका कॉम्पुटर होयो. कोणाकडे हा कॉम्पुटर?
बैल : आपले मास्तर, त्येंच्याकडे असतलोच. आणि त्येंच्याकडे नसलो तरी शाळेत आसातच ना!
प्रसाद : हा आणि तेंका ह्या सगळा माहिती असतला. ते आपणाक सगळी माहिती देतील. आता मास्तरांकाच गाठूक होया.
(असे बोलून चांडाळचौकडी मास्तरांना शोधण्यासाठी आधी शाळेकडे जाते, तिथे त्यांना समजते की शाळा आज लवकर सुटली. मग ते गावाच्या पारावर येतात.)
-------------------------------------------
(पुन्हा गावच्या पाराचेच दृश्य, सगळ्यांमध्ये नाम्या न्हावी सुद्धा आला आहे. गप्पांचा विषय तोच आहे – मोबाईलवर येणारे मेसेजेस)
मास्तर : अरे माका पण सारखे सारखे मेसेज येतत. पोरांका शिकवताना किती त्रास होता माहिती हा? सारखो सारखो फोन वाजत रवता.
सुहास : मगे फोन बंद करायचो ना.
मास्तर : रे एरशी केलो असतंय फोन बंद, पण मालाचो टेम्पो येवचो असलो की फोन चालू ठेवचोच लागता. कधी त्या टेम्पो ड्रायवराचो फोन येईत, कधी सविताचो येईत, सांगाक येना नाय.
सुहास : नाम्या, आसस खय? आता तुकाच फोन करी होतंय.
नाम्या : अरे हयच येई होतंय, त्या प्रसादान डोक्या खालल्यान.
वामन : आता काय केल्यान तुझ्या जावयान?
नाम्या : त्येका जावई म्हणा नको रे, वस्तारो मारीन.
वामन : नाय मी त्येचा नाव पण नाय घेनय, पण ती चांडाळचौकडी हयच येता हा.
(चांडाळचौकडी येते.)
बैल : नाम्या काका, तुमी मसणात जाई होतास ना? कोनाच्या मैताक???
करण-अर्जुन : (बैलाच्या डोक्यावर टपली मारून) ए बैला!
प्रसाद : ए गप रे बैला! मास्तरांनु, माका सांगा, तुमका शेअर मार्केटाबद्दल माहिती हा?
मास्तर : कित्या रे?
प्रसाद : माका ना रोज मेसेज येतत, शेअर मार्केटचे, म्हणान मी ठरवलंय, शेअर मार्केटात्सून मोप पैसे कमवायचे आणि (नाम्याकडे बघून) पद्मावांगडा लगीन करायचा.
मास्तर : ह्या बघ, शेअर मार्केटात्सून पैसे कमवूक येतत, पण तेच्यासाठी शेअर मार्केटची माहिती होयी. आणि ह्ये असे मेसेज वाचून तर कधीच पैसो गुंतवू नकोस. सगळे खोटे मेसेज असतत ते.
प्रसाद : म्हणजे?
मास्तर : अरे माका पण येतत असले मेसेज, म्हणान मी एक दिवस सगळी माहिती काढलंय. या मेसेजमध्ये ज्या कंपनीचे शेअर घेऊक सांगतत ना, त्येंच्या किंमती बघलंय. ५-५ वर्षा होऊनसुद्धा त्येंची किंमत वाढना नाय. एक शेअर तर असो गावलो, ज्याची किंमत ६००-६५० वरसून पार ५० पर्यंत खाली इली, आणि आता वर जावचा नाव घेउक नाय.
बैल : माका तर कायव कळला नाय.
संदीप : बरोबर हा, ह्यो खायचो विषय नाय ना! तुका नायच कळतला.
मास्तर : अरे म्हणजे ज्यांनी ह्यो शेअर घेतल्यानी तेव्हा त्याची किंमत ६५० होती, आणि आता त्येचीच किंमत ५० रु. झाली हा. म्हणजे आता जर कोण तो शेअर विकूक गेलो तर तेका फक्त ५० रु. गावतले, म्हणजे एका शेअरमागे ६०० रुपयांचा नुकसान. म्हणान तुमका सांगतंय, शेअर मार्केट वाईट नाय असा, पण त्येच्यात पैसो कमवूचो आसात तर त्येचा शिक्षण घेउक होया. आणि या अशा मेसेज वर विश्वास ठेवायचो नाय.
प्रसाद : म्हणजे हे मेजेस खोटे आसतत?
आबा : तर काय! आता माका नाय येनत ‘वजन कमी’ करूच्या औषधांचे मेसेज (आबा गालातल्या गालात तर इतर सगळे जण मोठ्याने हसतात.)
संदीप : काय मग आबा, कधीपासून सुरु करताहास औषधा? बघूया तुमचा वजन कमी होता काय?
आबा : कायतरीच काय? माका याक सांग, ह्येंची औषधा खरोखर इतकी पॉवरफूल असती तर ह्येन्का अशे जाहिरातीचे मेसेज पाठवूची काय गरज होती?
सुहास : म्हणजे? काय म्हणूचा हा तुमका?
आबा : अरे मागे त्या एका बाईक दुसऱ्या देशात्सून हाडला होता, वजन कमी करुच्यासाठी, माहिती हा?
मास्तर : हा, ५०० किलो वजन होता तिचा. तिका खाटेवर बसूक पण गावा नाय. शेवटी सामानाचा विमान असता ज्येका कार्गो का काय म्हणतत, त्येच्यात्सून आणल्यान तिका!
मनोहर : बाबा माझ्या, ५०० किलो म्हणजे लयच झाला नाय? आबानु तुमचा किती हा?
आबा : कोणी मोजला हा? कधी डाक्टराकडे गेलय तर बघून सांगतंय तुका. पण या बघ, जर ह्येंची औषधा खरोखर पावरफुल असतील तर तिका हय आणूच्या बदल्यात ह्येंनी थय औषधा पाठवायची नाय. जर तेचा वजन कमी झाला असता तर अख्ख्या जगात ह्येंची आपोआप जाहिरात झाली असती? ह्येन्का असे मेसेज पाठवूची गरजच नाय पडली असती. पण त्येंनी तसा नाय करुक, कारण कदाचित ती औषधा खरी नसतीत. म्हणून जर माका वजन कमी करुचा आसात तर मी आपल्या डाक्टराचो सल्लो घेईन, या जाहिरातीचे मेसेज पाठवणाऱ्यांचो नाय. आणि तुमी पण लक्षात ठेवा, तुमच्या कोनाव नातेवाईकाक वजन कमी करुचा आसात तर तेंका सांगा त्येंच्या family doctor चो सल्लो घेऊक पण कायव झाला तरी मेसेजमधली औषधा घ्येवू नको.
मनोहर : अरे पण तुमका येणारे हे मेसेज परवडले, माझो तर संसार तुटायची येळ इली हा या मेसेजमुळे.
संदीप : काय रे बळी (जीभ चावतो), मनोहरा असा झाला तरी काय?
मनोहर : अरे काय नाय, सकाळी असोच बसलो होतंय, तर गायत्री इला आणि त्येनी फोन मागल्यान.
(पुढील पूर्ण प्रसंग flashback मध्ये)
-----------------------------------------------------------
गायत्री : आवो जरा फोन देवा.
मनोहर : कित्याक गो?
गायत्री : अवो देवा ना, आवशीक फोन लावूचो हा.
मनोहर : तो थयच असतलो, खुटीवरल्या शर्टाच्या खिशात
(गायत्री शर्टच्या खिशातील फोन काढते आणि आपल्या आईला फोन लावणार इतक्यात एक sms वाजतो. गायत्री sms ओपन करून वाचते.)
गायत्री : मुझसे दोस्ती करोगे? मुझसे बात करनेके लिये डायल करे ९८७*** सिर्फ ३ रुपया प्रति मिनिट. तुम्हारी सनी.
गायत्री : (मनोहरशी भांडत) काय ओ, ही सनी कोण?
मनोहरची आई (बहिरी) : फणी? कोणाची फणी?
गायत्री : फणी नाय वो, सनी सनी. जाऊ दे तुमका सांगान काय फायदो? वो तुमी गप रवा नको, बोला कोण ही सनी? कोणाक आणून बसवतास माझ्या छाताडावर?
मनोहर : (काहीच न कळल्याने) अगो, कोण सनी? माका काय माहित?
गायत्री : खराच तुमका कायव माहित नाय, मगे ही बया तुमका मेसेज कित्या पाठवता हा?
मनोहर : गो माझे आवशी, माका खराच कळना नाय तू काय बोलतहस ता.
गायत्री : मी बोललेला कळना नाय, आणि तेच्यावांगडा गप्पागोष्टी करुचा बराबर कळता. मी खय कमी पडलंय म्हणान ही अवदसा आणताहास???
मनोहरची आई : औषधा? कसली औषधा आणली हत मनोहरान?
गायत्री : वो तुमी जरा गप रवा ओ, हय काय चलला हा आणि तुमचा काय चलला हा?
मनोहर : (वैतागून) आता तुमी दोघाव जरा गप रवा, नाहीतर मीच जातंय
गायत्री : जावा जावा, त्या सनीकडेच चललास ना? माझा मेलीचा नशीबच फुटक्या! (आणि धाय मोकलून रडायला लागते.)
--------------------------------------------------
(flashback संपतो, पुन्हा गावच्या पाराचेच दृश्य)
सुहास : आबानु, ह्या प्रकरण वाटता तितक्या सोप्या नाय, मनोहराचो बिचाऱ्याचो संसार मोडान पडाची पाळी इली हा.
संदीप : आज या ठिकाणी....
आबा : तू गप रे
संदीप : आज या ठिकाणी, माझ्या मतदाराचो संसार मोडूची येळ इली हा. कायव करान हे फोन / मेसेज बंद करूकच होये.
सुहास : विषय कसो हा? मेसेज बंद होऊक होये असा सगळ्यांका वाटता, पण ते करायचे कसे? मास्तरांनु, गावातले शिकले सवरलेले तुमीच आसास. काय तरी उपाय शोधून काढा ह्येच्यावर.
मास्तर : उपाय सांगतंय रे, पण असो ऐन टायमाक कसो सांगू, माका थोडो वेळ देवा. संध्याकाळी सगळे देवळात येवा, मगे सांगतंय. आणि हा गावातली जी जी लोका मोबाईल वापरतत तेंका सगळ्यांका येउक सांगा. वामन्या, ह्या काम तुझा.
वामन : मी कधी कुनाक काय सांगतंय काय?
संदीप : मग ह्या मुद्दाम सांग, कळला?
(सगळेजण पांगतात)
-----------------------------------------------------------
(मनोहरच्या घरातील दृश्य)
(मनोहर घरात प्रवेश करतो आहे. त्याला बघून गायत्री पुन्हा भांडायला सुरुवात करते.)
गायत्री : इलास? झाले त्या सटवीबरोबर गप्पा मारून झाले?
मनोहर : गायत्री, ह्याबघ आता उगाच माझा डोक्या उठवू नको हा.
गायत्री : मी बोललय की तुमचा डोक्या उठता. आणि त्या सनीबरोबर बरे गप्पागोष्टी करतास.
मनोहर : ह्या बघ, संध्याकाळी कळात तुका सगळा काय ता. आमी सगळे देवळात जमतलाव. थय ये तुझ्या त्या सनीक भेटूक.
-----------------------------------------------------------
(संध्याकाळची वेळ, गावातील सगळेजण देवळात जमले आहेत. सगळेजण गडबड गोंगाट करत आहेत.)
आबा : ए गप रवा रे सगळे. काय गडबड करताहास?
सुहास : आबानु, विषय कसो हा? सगळीच लोका या मेसेजाक कंटाळली आसत. तेंका हे मेसेज बंद करुचे आसत
बबन : मी सांगू मेसेज कसे बंद करुचे ता?
सुहास : सांग.
बबन : आधी १० रुपये दी.
सुहास : तुका १० रुपये देवच्या बदल्यात मी त्याच १० रुपयांचा रिचार्ज करीन, गप रव.
संदीप : आज या ठिकाणी....
आबा : गप रव रे
संदीप : आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघातली सगळी लोका जमली आसत, तेंका ह्ये मेसेज कसे बंद करुचे ह्येची माहिती होयी हा.
सुहास : होतले होतले, सगळ्यांचे मेसेज बंद होतले. तेच्यासाठी तुमका मी सांगान ता करुचा लागात.
क्रिश : पप्पानु, काय ता पुरा सांगा. नायतर ह्या पण अर्धवट सांगशाल.
सुहास : (चिडून) मी तुझो बापूस आसय की तू माझो बापूस आसस? आता मधीमधी बोललस ना तर मुस्काटात मारतलय.
शोभा : (तोंडाला पदर लावून) ओ, आपले नाना इले हत ना ते
सुहास : लावलंस पदर? तुमी मायलेका काय घालुचो तो गोंधळ घाला, मी आता काय बोलुचय नाय. मास्तरांनु, तुमीच सांगा सगळ्यांका मेसेज कसे बंद करुचे ता.
मास्तर : तर गावकऱ्यानु, गेल्या काही दिवसांपासून आपल्या गावातल्या बऱ्याच जणांका कसले नाय कसले जाहिरातींचे मेसेज नायतर फोन येतहत. आपणाक काम करताना मध्ये मध्ये हे मेसेज येतत आणि त्येचो त्रास होता. तर आता मी तुमका ह्ये मेसेज कसे बंद करुचे ता सांगतंय. त्येच्यासाठी आपणाक आपलो number DND मध्ये नोंदवूचो लागतलो. DND म्हणजे काय तर Do Not Disturb, म्हणजे माका त्रास देउ नको. ह्या DND चालू केलास की तुमका येणारे मेसेज बंद जातले.आधी माका सांगा, सगळ्यांनी आपले मोबाईल हाडलास???
सगळेजण : व्हय, व्हय
मास्तर : ज्येंनी मोबाईल आता आणूक नाय, त्येंनी लिवान घेवा काय करुचा ता, आणि मगे घराकडे जाऊन करा. तर सगळ्यांनी आपले फोन चालू केलास? आता त्येच्यात मेसेज type करतत थय जावा. आणि थय लिवा ‘START’ एस टी ए आर टी – स्टार्ट. मगे एक स्पेस देवा आणि अंकात शून्य (०) लिवा. लिवलास? आता ह्यो मेसेज आपणाक पाठवूचो हा १९०९ या नंबरवर. ए प्रसादा, बघ, सगळ्यांनी नीट लिवला काय. ह्येच्यात एका अक्षराची पण चूक चलाची नाय. आता तुमका एक मेसेज येतलो तुमच्या मोबाईल कंपनीकडसून, ज्येच्यात तुमचो registration number असतलो. ह्यो मेसेज १०-१२ दिवस तरी ठेवा, कधी कशाची गरज पडात सांगाक येना नाय.
मनोहर : पण मास्तर, या सगळ्या केल्यावर मेसेज बंद होऊक किती दिवस लागतले?
मास्तर : मनोहरा, चांगलो प्रश्न इचारलस. ‘START 0’ असो मेसेज पाठवल्यापासुन ७ दिवस लागतले. पण त्येच्यानंतर सुद्धा मेसेज नायतर फोन इलो तर आपण त्येची तक्रार करू शकतव. त्येच्यासाठी १९०९ या नंबरावरच फोन करायचो आणि त्येंका आपल्या कोणत्या नंबरावरावरसून मेसेज नायतर कॉल इलो, तो मेसेज / कॉल कश्याच्या बाबतीत होतो म्हणजे कसली जाहिरात करी होते ता सगळा सांगायचा. पण याक लक्षात ठेवा, ही तक्रार असो कॉल किंवा मेसेज आल्यापासून ३ दिवसातच करुक होयी.
वामन : पन मास्तरांनु, मी काय म्हणतंय. ह्या सगळा करूची गरज काय आसा? नाय म्हंजी, इलो एखादो मेसेज तर काय फरक पडता? आपण दुर्लक्ष करायचा ना !
प्रसाद : हा, नायतर मेसेजचो आवाज बंद करान ठेवायचो.
मनोहर : ए वामन्या, तुझा लगीन झालेला नाय म्हणान तुका काय फरक नाय पडना. (गायत्रीकडे कटाक्ष टाकून) ह्या मेसेजचो काय त्रास होता ना तो माका माहिती हा.
मास्तर : वामन्या, तुका चाय पिउच्या टायमाक असो फोन इलो तर चलात काय रे? (वामन जीभ काढून मानेने नाही म्हणतो!) तुका लिवूक-वाचूक येना नाय म्हणान काय त्रास होना नाय. आणि जाहिरातींचे मेसेज येतत म्हणान मेसेजचो आवाजच बंद करान ठेवायचो नायतर त्येच्याकडे दुर्लक्ष करायचा ह्यो त्येच्यावरचो उपाय नाय. उलट आलेलो प्रत्येक मेसेज लगेच वाचूक होयो.
आबा : कित्या ओ? नाय म्हणजे आजकाल मेसेज कोन पाठवता? सगळी जणा तर त्या WhatsApp वर बोलतत ना!
मास्तर : आबानु कसा हा, आपण आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी WhatsApp वर बोलतव ह्या खरा हा. पण खयचीव बँक आपल्या खात्यात पैसे जमा झाल्यावर नायतर खात्यात्सून पैसे काढल्यावर मेसेज पाठवता, बँक कधी WhatsApp नाय करना. म्हणान म्हणतंय, आलेलो प्रत्येक मेसेज वेळीच वाचाक होयो आणि जाहिरातींचे मेसेज वाचन्यात येळ जाऊ नये म्हणान ते मेसेज बंद करुक होये.
करण : पण मास्तरांनु, अशी तक्रार करून काय फरक पडता काय?
अर्जुन : हा काय फरक पडता काय??
मास्तर : व्हय तर. ह्या बघा, तुमी जर ३ दिवसाच्या आत तक्रार केलास तर असे कॉल नायतर मेसेज करणाऱ्यांका कमीतकमी २५ हजारांचो दंड होता.
गोदा काकू : पंचवीस हजार? गे बाय माझे!
मास्तर : व्हय तर, आणि एकाच नंबराच्या विरोधात मॉप तक्रारी गेले तर तो नंबर पण बंद करून टाकतत. ह्येच्यासाठी प्रत्येकान जागरूक रवान अशा नको असलेल्या जाहिरातींच्या कॉल नायतर मेसेजची तक्रार नोंदवूकच होयी, आणि त्येच्यासाठी आधी आपलो नंबर DND मध्ये नोंदवूक होयो.
सुहास : ए करण-अर्जुन तुमी येक काम करा. तुम्ही हय जसो एको साउंड देतास ना तशे तक्रारी पण दोन-दोनदा करा म्हणजे ते जाहीरात पाठवणाऱ्यांचे नंबर लवकर बंद जातले! (सगळेजण हसतात.)
मास्तर : आणखीन एक महत्वाचा सांगुचा रवला ! जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम कार्डां असली तर ह्यो ‘START 0’ वालो मेसेज तुमका दोन्ही सिम कार्डावरसून पाठवूचो लागतलो, न्हायतर एका सिम कार्डावरचे मेसेज बंद जातले पण दुसऱ्या कार्डावरचे मेसेज चालूच रवतले, समाजला?
सगळे : व्हय, मास्तरानु
गायत्री : मास्तर, ह्येंच्या मोबाईलवर दुपारी एक मेसेज वाचलंय, तो कसलो आसा?
मास्तर : कसलो मेसेज वहिनीनु?
गायत्री : (मनोहरला उद्देशून) द्येवा ओ तुमचो फोन. (मनोहर फोन देतो, गायत्री मेसेज वाचून दाखवते) माका सांगा, कोन आसा ही बया? ह्येन्का कित्या मेसेज पाठवता?
मास्तर : कसा हा वहिनीनु, काय काय असे कंपनी आसत जे तुमका फोनवर बातम्यो, हवामानाचो अंदाज, आजचा भविष्य नायतर जोक्स वगैरे ऐकुची सुविधा देतत, अर्थात पैसे पण मॉप घेतत. आता ऐकलास ना, मिनिटाक ३ रुपये. म्हणजे तुमी फक्त ५ मिनिटा जरी त्येंची सेवा वापरलास तरी तुमचे एकदम १५ रुपये जातले.
बैल : १५ रुपये? रे बाबा माज्या! मगतर हे मेसेज बंद करूकच होये, नायतर कधीतरी चुकान फोन लागलो तर माझे पण १५-२० रुपये जातले. त्या पैशात एखादो वडापाव येईत! (सगळेजण हसतात.)
मास्तर : वहिनीनु तुमी कायव काळजी करू नको, ह्यो पण जाहिरातीचोच मेसेज आसा. बाकी बळीचा.. (जीभ चावून) मनोहराचा तुमच्यावरच प्रेम आसा! तर गाववाल्यांनु आता मी तुमका जा काय सांगितलंय, मोबाईल नंबर DND मध्ये कसो नोंदवायचो, DND करून पण जाहिरातींचे मेसेज नायतर कॉल इले तर तक्रार कशी करायची, ह्या सगळ्यांका कळला काय?
सगळे : (एका सुरात) व्हय!
मास्तर : येक गोष्ट लक्षात ठेवा, आपलो मोबाईल ह्यो आपलो आसा. आपण आपल्या मेहनातीचो पैसो घालून आपल्या वापरासाठी त्यो घेतलो आसा. त्येका चालू ठेउक दर महिन्यात आपण आपले मेहनतीचे पैसे खर्च करतव. त्येच्यामुळे ह्यो फोन आपलो आसा, त्या जाहिरातवाल्यांच्या बापाशीचो नाय. तेव्हा कसलीच जाहिरात त्येंका आपण आपल्या फोन वर करुक द्येवची नाय. समाजला ??
सगळे : व्हय!
आबा : पण मास्तरांनु , माका येक कळना नाय. आपले सगळ्यांचे मोबाईलचे नंबर ह्येन्का गावले कसे?
मास्तर : ता माका नक्की काय सांगूक येउचा नाय, पण माका वाटता, महिन्या-दोन महिन्यापूर्वी वामन्यान तो ‘लकी ड्रॉ’ चो फॉर्म भरून घेतल्यान होतो, त्येच्यामुळेच ह्येन्का आपल्या सगळ्यांचे नंबर गावले असतले.
सुहास : शिरा पडली वामन्याच्या तोंडार... रे धरा रे त्येका सगळ्यांनी (सगळी तरुण मंडळी वामनला पकडायला धावतात... इथे बबन्या स्वरचित एक गाणे म्हणतो आणि एपिसोड संपतो)

Group content visibility: 
Public - accessible to all site users