धुळवड की रंगपंचमी?

Submitted by WallE on 25 March, 2024 - 04:14

मित्र आणि मैत्रिणींनो,
सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा :). काल होलिका दहन झाले आणि आज धुळवड. रस्त्यावर, सोसायटी, इत्यादी ठिकाणी रंगबिरंगी आणि प्रसन्न चेहरे दिसले. आमच्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणे बालगोपाल मंडळीने पाणी, रंग, पिचकारी घेऊन धुळवडीच्या मनसोक्त आनंद घेतला तर मोठ्यांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. बऱ्याच घरात आज पुरणपोळीचा बेत असतो पण आमच्याकडे मात्र आज श्रीखंड पुरीचा बेत असतो. श्रीखंडपुरी वर ताव मारून डोळे जड झाले आहेत आणि रणरणत्या उन्हात कूलर सुरू करून मस्त वामकुक्षी घेण्याचा बेत आहे.

बरं पुणे, नाशिक येथे रंगपंचमीच्या दिवशीही रंग खेळेले जातात, किंबहुना काहींचा आग्रह असतो की फक्त रंगपंचमीलाच रंग खेळायचे, पण तेव्हा सुट्टी नसल्याने आणि इतर दैनंदिन कार्यक्रमामुळे वेळ मिळत नाही व रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा कालबाह्य होतेय असे वाटायला लागले आहे.

तुम्ही केव्हा रंग खेळता, तुमच्याकडे आज काय बेत असतो, विदेशात असणारी मंडळी तुमचे काय बेत. सोबतीला तुमच्या आठवणीतील होळी/धुळवड/रंगपंचमी कशी होती हे नक्की शेयर करा.

सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या रंग बरसे शुभेच्छा.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगपंचमी बोला किंवा धुलीवंदन,
हे नेहेमी होळीच्या दुसऱ्या दिवशीच खेळले गेले पाहिजे.
जेणेकरून आदल्या रात्रीची होळीची राख ही रंग म्हणून वापरता येते.

आणि तसेही होळी पेटवायच्या रात्री रंग खेळून झाल्यावर त्याच फ्लो मध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी खेळण्यात मजा आहे. पाच दिवसांचा ब्रेक कशाला...

ऋन्मेऽऽष जी, अगदी अगदी 5 दिवसांचा ब्रेक कशाला, पण अहो सण दोनदा साजरा करायला मिळतो, हे ही नसे थोडके

तुम्ही किंवा अजून इतर मंडळींनी होळी विशेष काही खादाडी असेल तर ती ही इथे सांगा

रंगपंचमीला सुट्टी नसते. धुलीवंदनाच्या दिवशी असते. त्यामुळे आता सगळे सुट्टीच्या दिवशी रंग खेळत असावेत.

आम्ही वालचंद सांगलीला होतो तेव्हा दोन्ही दिवस खेळलो होतो.. मुंबई परंपरेनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी तर लोकल मुलांसोबत पंचमीला..

नाशिकला रन्गपन्चमीलाच रन्ग खेळला जातो...धुळवडला विराची मिरवणुक निघते..दाजिबाचा विर प्रसिद्ध आहे...विराच्या मिरवुणूकित देव नाचवायची परपरा आहे...
रहाड परपरा https://www.youtube.com/watch?v=cxln8T1BUwM&ab_channel=BhushanJadhavVlogs
दाजिबा वीर https://www.youtube.com/watch?v=W91REgLIKDM&ab_channel=MumbaiTak

मुंबईजवळ डोंबिवलीत वाढल्याने धुळवड साजरी केली जाते, तेव्हाच रंग खेळले जातात इथे, अगदी लहानपणापासून हेच माहिती. रंगपंचमीला सुट्टी नसायची शाळेला. रंगपंचमी काही ठिकाणी साजरी करतात ऐकून माहिती होतं पण प्रत्यक्ष श्रीरामपूरला बघितलं. तिथे काही वर्षे नवऱ्याचा बदलीमुळे होतो.

होळी, धुळवड व रंगपंचमीच्या शुभेच्छा!

रंगपंचमीचा आग्रह हा आजकालचा आहे. गेली अनेक वर्षे "होळी खेळण्याबद्दल" गाजावाजा जास्त होत होता सोमिवर. पब्लिक रंगपंचमी जवळजवळ विसरले होते. त्यामुळे हा आग्रह नव्याने चालू झालेला दिसतो. मला असा कोणी सोमिवर तरी आग्रह केलेला लक्षात नाही. गेल्या एक दोन वर्षातले असावे हे.

पुण्यात आम्ही लहानपणी होळी झाल्यावर दुसर्‍या दिवशी धुळवड खेळायचो थोडा वेळ. पण खरे रंग खेळायचो ते रंगपंचमीलाच. एकेकाळी पुण्यात रंगपंचमीला जर तुम्हाला रंग खेळायचे नसतील तर घराबाहेर न पडणे हाच एक उपाय होता.

होळीला होळी पेटवण्याव्यतिरिक्त बोंबा मारणे, होळीभोवती मित्रमंडळींच्या "बैलाला" वगैरे ओरडणे, हलग्या ई वाजवून शब्दशः शिमगा करणे हे ही आजकाल किती चालू आहे माहीत नाही (तसेच साहेबाचे विशिष्ठ अवयव सध्या निर्धोक असतील. नाहीतर "होळी रे होळी, पुरणाची पोळी" नंतर तेथे बंदुकीची गोळी मारली जाई). चेहर्‍यावर लावले जाणारे मास्कही आजकाल दिसत नाहीत. लहानपणी थंडी सुद्धा पुण्यात होळीनंतरही रेंगाळलेली आठवत आहे.

महाराष्ट्रातील प्रथांवर उत्तरेचे सांस्कृतिक आक्रमण होत आहे त्याची प्रतिक्रिया असेल ही. बाकी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी होळी/धुळवडीलाच खेळतात हे ही माहीत आहे.

वरती सांगितलय तस होळीच्या दिवशी होलिका दहन, बॉम्ब वगैरे सगळं साग्रसंगीत.. दुसऱ्या दिवशी धुळवड.. रंग, फुगे, पिचकाऱ्या, जुने कपडे घालून, तेल लावून होळी झेलली जाई. तरी थोडा फार रंग काही केल्या जात नसे .. त्याला आम्ही ऑईलपेंट चा रंग म्हणायचो.

अमेरिकेत इकडेही होळी/धुळवड साजरी होते पण सोयी प्रमाणे एखाद्या विकेंड ला. इकडे बरेच इंडियन्स असल्याने अगदी सार्वजनिक रित्या ( पार्क मध्ये ) रंग खेळतात.. इकडचे स्थानिक लोकही ( सगळेच नाही) सहभग होतात..

सुट्टी असल्याने धुळवडीच्या दिवशी रंग खेळणं ओके वाटतं.
खरं तर रंग खेळणंच वैतागवाडी आहे.रस्ते, पार्किंग, कोणीतरी केसात रंग टाकल्याने नंतर झाडू झालेले केस, बाद झालेले कपडे.आपण अगदी महागातले ऑरगॅनिक रंग आणले तरी कोणीतरी येऊन तो भयंकर जांभळा आणि हिरवा रंग लावतंच. त्याच्यावर 'हर्बल गुलाल' लिहिलेलं असलं तरी त्याच्या रंग वासावरून तो अजिबात हर्बल वाटत नाही.'फक्त कोरडे रंग लावा, पुसून टाका' वगैरे सूचना कागदावरच राहतात.कोणीतरी पाणी, पिचकारी, वॉटर बलून किंवा पाण्याने भरलेल्या रिकाम्या रंग पिशव्या अंगावर ओतलेल्या असतात.
(हे आपलं दर वर्षीचं रिग्रेट्स स्वगत)
अगदी कमी पाण्यात पटकन स्वच्छ होणारे, केस स्किन कपडे खराब न करणारे रंग सर्वांनी वापरले तर कोणत्याही दिवशी खेळायला चालेल.

सुट्ट्यांमुळे सगळेच धुलावडीला खेळतात हल्ली..
पूर्वी धुळवडीला रंग खेळणाऱ्या माणसांचा राग यायचा. हे काय रंगपंचमी सोडून नोर्थच घेतलय अस वाटायचं Lol

परवा आम च्या सोसायटीत लॉबी लेव्हलला होलिका दहन होते. व काल अगदी म्युझिक सिसिट्म लावुन पार्टी होती. संध्याकाळी मी कुत्रा फिरवायला लॉबीला गेले तेव्हा एकदम पोस्ट अपोकॅलिक्टिक माहुल होता. एक पन माणूस पोर नाही. प्लास्टिकचे फुगे हवेत उडत आहेत. एखादी चुकार पाणी बाटली, पिचकारी, खाली जमिनीवर रंगाचे डाग व सुका रंग. खूपच एंजॉय करुन थकुन बसलेली असणार मंडळी. आज सफाई
कामगारांना काम आहे. अगदी लिफ्ट पण रिकामी पडलेली. नाहीतर वाट बघायला लागते. म्युझिक वाला पोरगा मला लिफ्टित भेटला त्यालाच हॅपी होली केले.

सोसायटी गृपवर आर एस एस तर्फे राबविल्या जा णार्‍या पुरण पोळी मोहिमेची नोटिस/ पत्रक आलेले. ठाण्यात एका शाळेत एक पु पो नेउन द्यायची होती. ते गोळा करुन अर्धपोटी/ उपाशी लोकांना डोनेट करणार. पोळी ऐवजी पैसे घेतले जाणार नाहीत हे ही होते. चांगला उपक्रम.

घरी आमरस खाल्ला.

विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकांची होळी केली.
यातील होळी करणे या वाकप्रचाराचा अर्थ ओळखा:

१. रंगवणे
२. पूजा करणे
३. जाळणे
४. चिखलात टाकणे.

Submitted by MazeMan on 26 March, 2024 - 17:28 >>> रंगपंचमीला हा प्रयोग करतो.

प्रयोग करा आणि इथेही सांगा.. छान उपाय दिसतोय

बाकी आम्ही खेळायला जायच्या आधी हाताला तोंडाला तेल चोळून जातो. हाच आमचा उपाय..

बाकी आम्ही खेळायला जायच्या आधी हाताला तोंडाला तेल चोळून जातो >>> हा युनिव्हर्सल उपाय आहे, पण हे वरील नवे काही तरी दिसते, त्यामुळे ट्राय करायला पाहिजे