अद्दल...!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 24 March, 2024 - 00:45

अद्दल...!

'" नेमेची येतो मग पावसाळा... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..!!"

शिशिर गुरुजींच्या मधुर सुरात सगळ्या वर्गाच्या सोबतीने मी सुद्धा सूर मिळवला खरा पण कविता म्हणताना माझ्या पोटात भला मोठा खड्डा पडला. त्याचं कारण म्हणजे, पाऊस लागला रे लागला की, आमची बायो आयेच्या पाठी भूणभूण लावते.

" ए आये, यावर्षी तरी मला रंगी-बिरंगी फुलांची नक्षी असलेली छत्री घे ना गं..! माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे नवे रेनकोट , नव्या छत्र्या आहेत.. माझ्यापाशीच नाय गं..!!

बोलता- बोलता मग बायोच्या डोळ्यांना धारा लागतात अन् मग तिच्या चिमण्या जीवाचं दुःख निळं आभाळ व्यापून टाकते.

" पुढच्या वर्षी घेईन गो माझे बाये तुला नवी छत्री.. या पावसाळ्यात एवढी वापर गं पोरी ही छत्री..! " मोडक्या दांड्याची , गळकी छत्री आये तिच्या हातात देत तिची समजूत घालत दरवेळी तेचं म्हणते.

मोडक्या दांड्याची, फाटक्या छपराची छत्री घेऊन बायो शाळेत निघाली की, भ्राता मायेने माझ्या पोटातील आतडी पिळवटतात. वाटते, काही तरी जादू व्हावी आणि रंग-बिरंगी, फुलाफुलांची नक्षीदार छत्री माझ्या हाती पडावी .. मग मी ती लगेच बायोच्या हाती द्यावी.. नंतर मुंगीने साखरेचा दाणा टिपावा तसा तिच्या फुललेल्या चेहऱ्यावरील आनंद मी टिपून घ्यावा..

खरंतर मला माहित आहे अशी जादू कधीच होत नाही. आमचे शिशिर गुरुजी शाळेत नेहमी शिकवतात, मुलांनो, मेहनत आणि कष्ट केल्याशिवाय गोड फळ कधीच मिळत नाही.. तेव्हा तुम्ही खूप शिका , कष्ट करा आणि पुढचं आयुष्य आनंदाने जगा..!

शिशिर गुरुजींनी शाळेत शिकवलेलं मी सगळं घरी येऊन आयेला सांगतो. काम करता - करता निमूटपणे सगळं ऐकून घेत दीर्घ श्वास घेत मग ती म्हणते, खोटं का बोलतोयं तुझा मास्तर .. त्याचं बोलणं खरंच आहे रे लेका..!

मी हे सगळं आमच्या अण्णाला पण कधी-कधी सांगायला जातो.. अण्णा म्हणजे माझे आणि बायोचे वडील. वडीलांना आम्ही अण्णा म्हणतो.. आमचा अण्णा म्हणजे एकदम चक्रम माणूस.. एक नंबरचा लहरी अन् कामचुकार..! कामधंदा काही करायचा नाही.. घरात नुसतं बसून राहायचं नाहीतर मग खाटेवर गोधडीत दिवसभर दारू पिऊन लोळत पडायचं. अण्णाचं आवडतं काम म्हणजे बारीक - सारीक चोऱ्या करायच्या आणि चोरीच्या पैशातून नशा करायची. ह्या कामात अण्णाचा हात धरणारा एकही माणूस आमच्या वस्तीत नव्हता.

मला त्याची खूप लाज वाटते.. आईला आणि बायोला पण त्याचं चोऱ्या करणं आवडत नाही. शाळेत सगळी पोरं मला अन् बायोला अण्णावरून चिडवतात.. मला खूप वाईट वाटते. पण आमचा काहीच इलाज चालत नाही.. जिथे एवढ्या मोठ्या आमच्या आयेचं काही चालत नसे , तिचं पण अण्णा ऐकत नसे.. तिथे आमच्या पोरांचं काय..? त्याला रोखण्याचे सामर्थ्य आमच्या तिघांकडे पण नाही.

एकदा मी घाबरत- घाबरत डोक्यापर्यंत गोधडी घेऊन झोपलेल्या अण्णाला उठवून, शिशिर गुरुजीने जे शिकवलं ते त्याला हळू आवाजात सांगायला गेलो होतो. मी सांगू लागलो होतोच , तेवढ्यात तो माझ्यावर डाफरला. त्याचं नशेतलं डोकं भडकलं. मग माझ्यावर खेकसून म्हणाला,

" चल निघ बावळ्या इथून.. का घालू एक लाथ कंबरड्यात.. कालचं पोर आलंय मोठं मला अक्कल शिकवायला .. जा सांग तुझ्या मास्तुरड्याला ... त्याची अक्कल त्याच्या जवळच ठेव.. लोकांना नको शिकवू..!"

अण्णाचे गुंजासारखे गोल गोल फिरणारे , आग ओकणारे लाल डोळे पाहून मी खूप घाबरून गेलो.

मला खूप रडायला आलं. पण मी रडलो नाही. मी चिमणीएवढं तोंड घेऊन आयेजवळ गेलो. अण्णाच्या वागण्याला ती पण बिचारी वैतागलेली होती. भाकरी बडवता- बडवता तिने तोंडाने अण्णाला बडवलं. ' ये तोंडा जा तोंडा' सारखा तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. तिने अण्णाला शिव्यांची लाखोली वाहिली.

" आग लागो या दळीद्री संसाराला, मी मरमर मरतेय म्हणून पोरांच्या तोंडात चार घास पडतात.. तुझ्यासारख्या पराक्रमी माणसाच्या जीवावर राहिले असते तर विष खायची वेळ आली असती.. बाप्याच्या जन्माला आला तरी कशाला..?? लेकरं नको, बायको नको.. चार टायमाला ताटभर खायला तेवढं पाहिजे.. काम- धाम नको... इथे-तिथे चोऱ्या- माऱ्या करायच्या .. न् मग धाव मारायची त्या लुटारु बाबीच्या हातभट्टीवर ... दारू पोटात टाकायला.. हा असला ऐतखाऊ भर्तार काय कामाचा..?"

आये शिव्या द्यायला लागली तेव्हा अण्णा चूप राहिला. गोधडी डोक्यावर ओढून घेऊन तोंडातल्या तोंडात पुटपुटत राहिला. मग मध्येच लहर आली अन् उठून आयेला शिव्या देऊ लागला. अचानक तिच्याशी भांडायची खुमखुमी त्याला आली.

" चूप बस भवाने, तुझ्या बापाच्या पैशाने पितो का मी दारू... ??" असं काहीबाही बरळत राहिला..

अण्णाने आयेच्या बापाचं नाव घेतलं न् घेतलं तेवढ्यात तिचं माथं ३६० च्या कोनात फिरलं. चुलीतलं जळतं लाकूड उचलून तिने अण्णावर भिरकावलं .. पण आमचा अण्णा पक्का बेरकी.. ! त्याने तिचा नेम चुकवला आणि घराबाहेर झटक्यात पसार झाला.

असं भांडण झालं की नंतर तो दोन - दोन दिवस घरातून परागंदा होतो. आये बिचारी आपल्या नशिबाला कोसत बसते. तिच्याकडे पाहून मला खूपच वाईट वाटते. मला अण्णाचा खूप तिरस्कार वाटतो.

मागचीच गोष्ट. आमच्या बाजूच्या झोपडीत राहणाऱ्या येसू नानीची साडी तिने अंगणात दोरीवर वाळत घातलेली. ती साडी अण्णाने पळवली असं तिचं म्हणणं. ते खरंच होतं.. मी सुद्धा तिची साडी पळवताना अण्णाला पाहिलेलं. येसू नानीने आमच्या दारात येऊन तमाशा केला. ती आयेला म्हणाली, तुझ्या बेवड्या नवऱ्यानेच माझी साडी चोरली. मी त्याला साडी चोरताना पाहिलं. आये तिच्यावर चिडली.

' कानफट्या' झालायं माझा भर्तार.. चोर दुसरा कुणी असला तरी त्याचंच नाव सोपं पडलंय सगळ्यांना घ्यायला.. .. मी आयेला घरात बोलावून खरं सांगितलं.. तिचा माझ्यावर विश्वास होता.. आयेच्या मॅडमने दिवाळीला आयेला नवीन साडी घेतलेली. तिने ती साडी पत्र्याच्या ट्रंकेतून उचकली .. न् गेली तरातरा अंगणात. नवीन साडी येसूनानीच्या तोंडावर फेकून म्हणाली, तुझी पोतेऱ्यासारखी साडी चोरली ना माझ्या नवऱ्याने .. घे ही नवी साडी .. घाल तुझ्या मढ्यावर सटवे..!"

मला आयेची दया आली. आमचा अण्णा एवढा बिनडोक कसा ते मला समजत नाही. त्याच्यामुळे आयेला, मला, बायोला किती मनस्ताप होतो तेच त्याला कळत नाही.

खरंतर मला आयेचं पण एक समजत नाही. ती सुद्धा अण्णाच्या बाबतीत एकदम चमत्कारीक वागते कधी- कधी..!

आमचा अण्णा तसा चोऱ्या करण्यात एकदम पटाईत आहे. त्याला वाटते, चोरी करताना त्याला कुणीच बघत नाही.. त्याला एक कळतच नाही, मांजरीने डोळे मिटून दूध प्यायलं म्हणजे तिला कोणी बघत नाही असं थोडं आहे .. मांजरीचे डोळे बंद असले तरी जगाचे डोळे उघडे असतात. कधीतरी चोरी करताना अण्णा लोकांच्या हाती सापडतोच.

चोरी करताना अण्णा सापडला का मग शिंदे हवालदार त्याची वरात पोलिस स्टेशनला नेतो. त्यानंतर आये जाते रडत - रडत तिच्या मॅडमकडे.... अण्णाला सोडवा म्हणून मदत मागायला..!

मॅडम म्हणजे , आये जिच्या घरी कामाला आहे ती घरमालकीण ..! तिचं घर खूप मोठं आहे. ते घर बघून मी मनात ठरवलंय , शिकून मोठा साहेब होणार.. मग आये आणि बायोसाठी असंच मोठं घर बांधणार.

आयेची मॅडम मोठ्या ऑफीसात काम करते. मी आणि बायो आयेसारखं तिला मॅडमच म्हणतो.

आयेची मॅडम खूप चांगली आहे. बायोला आणि मला ती नेहमी नवे कपडे आणि खाऊ देत असते. शिशिर गुरुजी जसे आम्हांला शिकवतात तसेच ती देखील आयेला चांगलं शिकवते.

ती आयेला नेहमी बजावून सांगते, "बाई गं.. तूच बसवून ठेवलंय बरं तुझ्या नवऱ्याला डोक्यावर .. ह्या असल्या बेक्कार नवऱ्यासोबत राहतेस तरी कशी..?? हा एवढा छळवाद सोसतेस तरी कसा ..?? कमाल आहे तुझी...त्याने बिनबोभाट चोऱ्या करायच्या नी तू त्याच्यासाठी दुसऱ्यांच्या मिनतवाऱ्या करत दारोदार भटकायचं...?? सोडून दे अशा भुरट्या चोराला त्याच्या नशिबावर...! तुझ्याकडे आणि पोरांकडे पाहून मदत करते मी घडी घडीला.. मात्र प्रत्येक वेळेस मी वाचवणार नाही तुझ्या कर्मदळीद्री नवऱ्याला.. ऊस गोड लागला म्हणजे मुळापासून खायचा नसतो बरं बाई.. !"

मॅडमच बोलणं ऐकून आये गोरीमोरी होऊन जाते.
आमच्या पराक्रमी अण्णासाठी बिचारी गपगुमान खालमानेने मॅडमच्या शब्दांचे ओरखडे मनावर झेलत असते.

मला मॅडमचं सांगणं पटते. ती सांगते त्यात खोटं काहीच नाही. खरं तेच सांगते ती..!

शाळेत आमचे शिशिर गुरुजी शिकवतात , ' मुलांनो, करावे तसे भरावे..!'

मला ते सुद्धा अण्णाच्या बाबतीत पटते. जर माझ्या अण्णाने चोरी केली असेल तर त्याला शिक्षा नको व्हायला..??

यावेळेस खरंतर मला अण्णाचा खूप राग आलेला कारण मी आणि बायोने लावलेल्या अंगणातल्या पपईच्या झाडावरच्या चार - पाच पपया त्याने पळवलेल्या होत्या. जेव्हापासून झाडाला फळं लागली होती तेव्हापासून मी त्याची काळजी घेतलेली. जीवापाड जपलं होतं पपईच झाडं. त्यातल्या दोन - दोन पपया मी शिशिर गुरुजींना आणि आयेच्या मॅडमला देऊन राहिलेल्या पपया बाजारात नेऊन विकून आलेले पैसे माझ्या आणि बायोच्या शाळेच्या खर्चासाठी ठेवणार होतो. मात्र अण्णाने माझ्या सगळ्या इराद्यांवर पाणी फिरवलेलं. मी अण्णावर आतुन खूप पिसाळलेलो होतो.

मी आयेला दरवेळी सांगतो, अण्णाला एकदा तरी जेलात जाऊ दे.. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला भोगू दे... त्याच्यासाठी तू कशाला दुसऱ्यांच्या घराच्या पायऱ्या झिजवतेस..?? कशाला एवढी वणवण फिरतेस...? नको सोडवू त्याला.. एकदा तरी अद्दल घडू दे त्याला..!

आयेचं दरवेळी ठरलेलं उत्तर म्हणजे , " काय करणार बाबा, आपलेच दात न् आपलेच ओठ.. .!"

मला तिचं बोलणं जराही पटत नाही. मी नुसता हुंकार भरत राहतो.

आयेच्या मॅडमची पोलिस स्टेशनात ओळख आहे. अण्णाला पोलिसांनी धरून नेला की, ती हर घडीला पोलिस स्टेशनात फोन करून अण्णाला सोडवण्याची विनंती करते. .. शिंदे हवालदाराच्या हातात मॅडमने दिलेली पाचशेची नोट आयेने ठेवली का मग अण्णाची सुटका होते.. जेव्हा पण पोलिस स्टेशनातून अण्णा घरी येतो तेव्हा त्याचे दोन्ही गाल सुजलेले , काळपट पडलेले असतात. त्याचे गाल शिंदे हवालदाराने रंगवलेले असतात ते अण्णाने न सांगता देखील आम्हाला समजते. हनुमानासारखे सुजलेले गाल घेऊन आयेच्या मागे तोंड लपवत अण्णा घरात आला की मग दोन दिवस तो डोक्यावर गोधडी घेऊन खाटेवर लोळत पडतो. ह्या दोन दिवसांत आयेने तिच्या शब्दांच्या बोचकाऱ्यांनी अण्णाचं तोंड फोडलेलं असतं. मला न् बायोला वाटते, आमचा अण्णा आता सुधारेल.. मग सुधारेल. पण म्हणतात ना , ' निर्लज्जम सदा सुखी ' तसं तिसऱ्या दिवशी अण्णा परत आपल्या कामगिरीवर निघतो. त्याला कसलाच फरक पडत नाही.

आत्ताचीच गोष्ट. जून महिना लागलेला. पावसाळा आणि शाळा सुरु व्हायला थोडाच कालावधी राहिलेला. ह्या पावसाळ्यात बायोला मी नवीन छत्री घेऊन देणार होतो.. त्यासाठी वस्तीतल्या दवाखान्यात मे महिन्याच्या सुट्टीत मी झाडू मारायला जायचो. महिनाभर काम केल्यावर डॉक्टरीणबाई मला पाचशे रुपये देणार होती. मी आयेला आणि बायोला हे सांगितलं नव्हतं. त्या पैशातून मी बायोसाठी रंग-बिरंगी, नक्षीदार छत्री विकत घेणार होतो. नाक्यावरच्या दुकानात टांगलेली निळ्या- पिवळ्या रंगाची छत्री मी पाहून ठेवली होती.

कालच डॉक्टरीणबाईने माझ्या हाती पाचशेची नोट ठेवली. ती नोट पाहून मला इतका आनंद झाला की बस रे बस्स..!

' कष्टाचे फळ नेहमीच गोड असते..! ' मला शिशिर गुरुजींचे शब्द आठवले. माझ्या डोळ्यात ढग जमले.

ती पाचशेची नोट घेऊन मी नाक्यावरच्या दुकानात छत्री घ्यायला निघालो. तेवढ्यात रस्त्यात धावत येणारा नानू भेटला. तो घामाघूम झालेला.

मला पाहून म्हणाला, " कुठे हिंडतोयं रे पम्या, तुझ्या बापाला धरून नेलायं शिंदे हवालदाराने.. पाकीट मारताना सापडलायं .. जा पळ लवकर घरी, आयेला सांग तुझ्या..!"

माझ्या अंगात कापरं भरलं. माझे पाय लटपटले. मी घरी पळालो. आयेला सांगितलं. धपापत्या ऊराने आये मॅडमकडे गेली. मी आयेची वाट पहात रस्त्यात उभा राहिलो.

थोडया वेळाने आये आली. तिचं पडलेलं तोंड पाहून मी चरकलो.

" मॅडम म्हणते, बाई, खूप झालं आता .. तुझ्या नवऱ्याला सोडवायला मी इथे रिकामी नाही.. जाऊ दे त्याला जेलात .. तुला पण यायचं तर ये कामाला.. नाहीतर दुसरी बाई बघते मी उद्यापासून..!"

आये बिचारी गळपटून खाली जमिनीवर बसली. तिने डोकं धरलं. थोडावेळ कुणीच कोणाशी काही बोललं नाही.

मी थोडा विचार केला. डोकं धरून बसलेल्या आयेसमोर गेलो. तिच्यासमोर मुठीतली पाचशेची नोट धरली. तिचे डोळे विस्फारले. अचानक तिच्या डोळ्यांत अग्नी पेटला.

" काय रे कुठून आणले हे पैसे.. कोणाचे चोरले रे..?? बाप तसा बेटा.. सांग मेल्या, खरं सांग... माझ्या राशीला लागलेले शनी आहेत रे तुम्ही दोघं बाप-लेक..!" ती माथा बडवू लागली.

मी रडकुंडीला आलो. रडत-रडत आयेला खरं ते सांगितलं. तिचे डोळे परत एकदा विस्फारले. मात्र आता तिच्या डोळ्यांत अग्नी पेटला नव्हता तर पश्चात्तापाची भावना होती. तिने मला पोटाशी धरलं. तिच्या डोळ्यांतून ओघळणारी गरम आसवं माझा माथा भिजवू लागली. मी पण स्फुंदू लागलो.

" देवा रे, कधी मोठं न् शहाणं झालं माझं लेकरू ते मला पापिणीला कळलंच नाही ..!" बोटं मोडून ती माझी दृष्ट काढू लागली.

आये आणि मी पाचशेची नोट घेऊन पोलिस स्टेशनची वारी करायला निघालो. बायोसाठी छत्री घ्यायला ठेवलेले पैसे आमच्या पराक्रमी अण्णावर खर्च होताना पाहून मला अन् आयेला खूप वाईट वाटत होतं. पण आता काहीच इलाज नव्हता.

मी पोलीस स्टेशनच्या आवारात थांबलो. आये पाचशेची नोट घेऊन पुढे निघाली. मी तिला पाठमोरी पाहत होतो .. आमचा अण्णा कधीच सुधारणार नाही हे माहित असून देखील देवाजवळ प्रार्थना करत होतो. माझे डोळे पाण्याने भरले. समोरचं धुरकट दिसू लागलं. अचानक आये मागे वळली. मी तिच्याकडेच पाहत होतो..

ती माझ्याजवळ आली.

मी डोळे पुसले. तिला नजरेनेच काय झालं म्हणून विचारलं. ती काहीच म्हणाली नाही मात्र मनात काहीतरी ती ठरवत होती हे नक्की..!

" पम्या, घे हे पैसे... बायोला नवी छत्री घे... बहिणीवरची माया जन्मभर अशीच राहू दे पोरा..! तू, तुझा मास्तर, मॅडम सगळ्यांचं खरं आहे.. मीच डोळ्यावर झापड बांधून राहिलीयं एवढे दिवस.. तुझा मास्तर सत्य तेच सांगतोयं, करावे तसे भरावे.. जाऊ दे तुझ्या अण्णाला एकदा तरी जेलात.. घडू दे जन्माची अद्दल.. भोगू दे त्याला त्याच्या कर्माची फळं..!"

मला आयेचं म्हणणं पटलं. मी नुसता हुंकार भरला.
कधी-कधी ती अण्णाच्या बाबतीत एवढी चमत्कारीक वागते की, मला तिच्या मनात काय खळबळ सुरु आहे तेच समजत नाही.

मी पाचशेची नोट मुठीत घट्ट धरली. धावत नाक्यावरच्या दुकानात जायला निघालो. रंगी-बिरंगी फुलांची, नक्षीदार छत्री बायोसाठी विकत घ्यायची होती. ती छत्री बायोला दिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता. जशी मुंगी साखरेचा दाणा टिपते तसा तो आनंद मी टिपणार होतो. मी मनात स्वप्न रंगवू लागलो.

__आणि अचानक आभाळात ढगांची गर्दी जमू लागली.

पावसाळा सुरू होण्याची ती नांदी होती.

'" नेमेची येतो मग पावसाळा... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..!!"

या पावसाळ्यात सगळ्या वर्गाच्या सुरात सूर मिळवून मी कविता म्हणणार होतो. कविता म्हणताना माझ्या पोटात बिल्कुल खड्डा पडणार नाही याची मला खात्री होती.. !

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. )

_________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं छान लिहिलय की डोळ्यासमोर घडतय सगळं अस वाटत होत.
लहान मुलाच्या भावभावनांचे वर्णन खुप छान मांडले आहे.

खुप आवडली कथा!

इतकं छान लिहिलय की डोळ्यासमोर घडतय सगळं अस वाटत होत.
लहान मुलाच्या भावभावनांचे वर्णन खुप छान मांडले आहे.>>>> +१
खरच खुप छान!
आवडली.......

सुंदर कथा!
+786

तुमच्या कथालेखनाचा आलेख उंचावताच आहे

रुपाली तुझ्या कथा नेहमी सकारात्मक आणि धीट व्यक्तीच्या असतात, अन्यायाविरुद्ध असतात. हीसुद्धा फार आवडली.

आबा, Punekarp, संजय, जाई, अनु, स्वातीताई, किल्ली, धनवंती, दत्तात्रेयजी, ऋन्मेष, सामो..!

खूप आभार आपल्या सगळ्यांचे..!

ऋन्मेष, सामो..> सुचलेले विचार कथारूपी मांडण्यासाठी मायबोलीचा खूप आधार वाटतो. मायबोलीच्या गुणी वाचकांच्या प्रोत्साहनानेच कथा सुचतात.

सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा..!

अप्रतिम
प्रत्येक पात्र, प्रसंग डोळ्या समोर उभे राहतात.
तुमच्या कथा कधीतरी छोट्या पडद्यावर साकार व्हाव्या अस वाटत.
पू ले शु

मस्त लिहिली आहे कथा..

ती छत्री बायोला दिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता. जशी मुंगी साखरेचा दाणा टिपते तसा तो आनंद मी टिपणार होतो.>>> वाह!!

कथा खूप खूप आवडली!
जशी मुंगी साखरेचा दाणा टिपते तसा तो आनंद मी टिपणार होतो. >>> किती गोड लिहिलंय!

छान कथा आहे. आवडली. प्रथम पुरूषी स्टाइलही वाचायला छान वाटली.

कथेच्या सुरूवातीला असलेला संदर्भ कथा पूर्ण होताना येणे आणि तो ओढूनताणून आल्यासारखा न वाटता चपखल जमून येणे हे अगदी दुर्मिळ नसले तरी फार कमी लोकांना जमते. इथे ते मस्त जमले आहे.

Manya , हौशी लेखक, छंदीफंदी, शर्मिलाजी, अश्विनी, धनुडी, साधा माणूस, मानवजी, संजना, फारएण्ड, लावण्या..!

आभार आपणां सर्वांचे..!

manya @ >> तुमच्या कथा कधीतरी छोट्या पडद्यावर साकार व्हाव्या अस वाटत.>> असं प्रत्यक्षात घडेल की नाही माहित नाही मात्र तुम्हांला माझी कथा वाचून असं वाटावं ह्यातच माझा आनंद सामावलेला आहे.

फारएण्ड >> कथा तर एखाद्याकडून लिहिली जाते मात्र ती कथा चिकित्सकपणे वाचून त्यावर सुंदर आणि चिकित्सक प्रतिसाद देणं तुमच्यासारख्या लेखकालाच जमू शकते. अशा अभिप्रायातूनही खूप काही शिकता येते.

Pages