शाळा

Submitted by पॅडी on 6 March, 2024 - 02:38

विकल मनाच्या पडवीमध्ये
घण घण घंटा; भरते शाळा
वर्ग तासिका हस्त पुस्तिका
थकवी मास्तर खडू फळा

उंचाविती हात षडरिपू
त्यांना पडती प्रश्न गहन
मागील बाकावर पेंगुळते
रोज भाबडे द्रष्टे मन

रसाळ मोठे विषय विभ्रमी
गृहपाठाची कसरत पुरती
आखीव-रेखीव अक्षर ओळी
डाग शाईचे आत्म्यावरती

घोकून पाढे; प्रश्न उत्तरे
का टक्क्यांचा चुकतो होरा
वाचाळांना वेळ पुरेना
अन् मौनाचा पेपर कोरा..!

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कविता आवडली फक्त
डाग शाईचे आत्म्यावरती माझ्या बाळबुध्दिला कळत नाही....आत्मा वगैरे त्या वयात काय कळत असेल...जरा समजावून सांगा कृपया.

>>>>त्या वयात काय कळत असेल
त्या वयात नाही तर लेखकाच्या, विकल मनाच्या पडवीवरती आत्ता या क्षणी भरलेली ही शाळा आहे. इथले विद्यार्थी कसे अहेत तर दांडगट आणि उत्साही षडरिपु आहेत तर कुठे पेंगुळलेले आणि द्रष्टे मन मागे अंग चोरुन बसलेले आहेत.
वाचाळतेला पेपर लिहीताना वेळ पुरत नाही याउलट मौनाचा पेपर तसाच कोरा करकरीत.
अस आयुष्य जाता जाता जाणता-अजाणता काही डाग हे आत्म्यावर लागलेले आहेत कलंक आहेत. या शाळेतील शाई च जणू ते डाग.

फार वेगळीच कविता आहे. मला तरी रामदास सेन यांची आठवण आलेली. रोजच्या जीवनातील क्षणांची सांगड भव्यतेशी घालण्यात त्यांची हातोटी आहे / होती.

कविता आवडली.
सामो, तुमच्या स्पष्टीकरणानंतर परत वाचली, मग नीट समजली.

सामो, आपण नि:शब्द केलत.... साष्टांग दंडवत!!

दत्तात्रयजी, सामोंच्या सर्वागसुंदर रसग्रहणानंतर मी काहीही लिहले तरी ते तोकडेच ठरेल. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

किल्ली, आपले आभार.

सामो मनापासून धन्यवाद सुंदर रसग्रहणा साठी..,
पॅडी धन्यवाद
मी कविता वर वर वाचली सामोंनी ती अनुभवली‌.
खरच नितांत सुंदर कविता आहे.

रामदास सेन रामप्रसाद सेन यांच्या जातकुळीतील कविता वाटली.
पॅडी, दसां, रामप्रसाद सेन यांच्या कविता - chrome-extension://efaidnbmnnnibpcajpcglclefindmkaj/https://estudantedavedanta.net/Singing-to-the-Goddess.pdf
येथे वाचावयास मिळतील.

सामो, रामप्रसाद सेन यांच्याबद्दल अनभिज्ञ होतो. Link शेयर केल्याबद्दल आपले आभार…