आई v/s मम्मी आणि बाबा v/s पप्पा

Submitted by ओबामा on 27 February, 2024 - 08:51

काल संध्याकाळी मांडीवरच्या संगणकावर (शुध्द मराठीत laptop) नजर लाऊन काम करत असतानाच, माझ्या मुलीने हळूच जवळ येऊन, मेरे बापू (दंगल चित्रपट पाहिल्यापासून हे माझे नवीन नामकरण) अशी लाडाने साद घातली. अगदी प्रेमाने माझा गालगुच्चा घेत, ”My dady is so cute” अशी स्तुतीपर वाक्य टाकायला सुरूवात केली, तेव्हा मी एकदम सावध झालो. बायकोने, प्रेमाने अ$$हो आणि मुलगी लाडात येऊन माझ्याबद्दल जास्त आदर दाखवायला लागल्या की लगेच माझा एसीपी प्रद्दयुम्न होतो, “दया, कुछ तो गडबड है”. त्या दोघींना, त्यांना न आवडणारी कामे (याची ही भली मोठा यादी आहे माझ्याकडे) माझ्याकडून करून घ्यायची असतील, माझ्याकडून काही उकळायचे असेल, किंवा मला पेचात पकडून काहीतरी मान्य करून घ्यायचे असेल तेव्हा हमखास मला असे शब्दांच्या साखरेत/पाकात घोळवून त्या ते बरोबर काढून घेतात हे मला आता (एवढ्या वर्षाने का होईना) कळायला लागले आहे. कळते पण वळत नाही अशी दरवेळी माझी स्थिती होते, कारण दरवेळी मी त्यांच्या या जाळ्यात बरोबर फसतो. यावेळी मात्र असे काहीही होऊ द्यायचे नाही असे निग्रहाने ठरवूनच मी सावध पवित्रा घेतला. पुढचा सगळा संवाद अशाप्रमाणे,
मुलगी:- बाबा किती काम करता हो तुम्ही. थकला असाल ना तुम्ही. माझ्या क्लास मधली मैत्रीणीने तिच्या पप्पांना सरळ वॉर्न केलय की विंकेडला हाऊसमध्ये अजिबात वर्क आणायचे नाही. पप्पा..
मी:- पप्पा? हे काय आता नवीन.
माझ्या कपाळावर भिंतीवरच्या कोळ्याने विणलेल्या जाळ्यापेक्षाही जास्त दाट असे चिंतेचे जाळे विणले गेले.
मुलगी:- हो. मला हेच विचारायचे होते. मी आजपासून आईला मम्मी आणि तुम्हांला पप्पा म्हटले तर, hope you don’t mind. माझ्या स्कूलमध्ये सगळे हेच म्हणतात.
मी:- अजिबात नाही. आपल्या घरात हे अजिबात चालणार नाही. (मोहब्बते चित्रपटतील अमिताभ एकदम माझ्या अंगात संचारला. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन.) सेहवागने शोएबचा पहिलाच चेंडू सीमापार धाडावा तसाच मी हा तिचा प्रयत्न धुडकावून लावला.
जरा कठोरपणे तिला उत्तर दिले असे वाटल्याने मग प्रेमाने जवळ घेऊन तिला समजावून सांगू लागलो, आपण मराठी आहोत. आपण असे परके ईग्लिश शब्द घरात न वापरता आपले मराठीच शब्दच वापरावे. तेथेच मी चुकलो आणि अलगद तिच्या जाळ्यात अडकलो.
मुलगी:- बाबा, आत्ता तुम्ही कशावर काम करताय हो आणि मगाशी कोणाशी बोलत होतात?
तिच्या प्रश्नाचा रोख न लक्षात येऊन, मी बोलून गेलो – लॅपटॉपवर आणि मगाशी काकाशी मोबाईलवर बोलत होतो. नंतर काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर हळूच जीभ चावली, पण तोपर्यंत तिच्या चेहर्यावर विजयी हास्य चमकत होते.
मुलगी:- बाबा, मग तुम्ही बोलताना मराठीच शब्दच का नाही हो मग वापरत?
सेहवाग त्रिफळाचीत झाला होता. इतक्या लवकर पराभव मान्य करेल तो ओंकार कुठला.
मी :- मान्य पण ज्या शब्दाने आपुलकी व प्रेम जाणवते, ते वापरले तर छान वाटेल ना आम्हांला. तुला कसे आम्ही प्रेमाने पिलू म्हणतो.
माझीच मुलगी ती. एवढ्या साध्या उत्तराने तीचेदेखील समाधान होणारे नव्हते आणि माझा पूर्ण विजय.
मुलगी:- पण, तुम्हांला पप्पा आणि आईला मम्मी म्हटल्याने मला तुमच्याबद्दल वाटणारी माया किंवा प्रेम जरादेखील कमी होईल असे मला वाटत नाही. मग तुमचा एवढा विरोध का?
बायको खोलीच्या बाहेर उभी राहून सगळा सुसंवाद आणि माझी होणारी फजिती पहात गालातल्या गालात हसत होती. तिच्यावर घोघांवत असलेली हे प्रश्नांची वावटळ तीने हळूच माझ्यावर सोडली होती. मग क्षणभर विचार करून या प्रश्नाचे उत्तर तुला लवकरच देईन असे सांगून मी तिची बोळवण केली. ती देखील, मग मी तोपर्यंत तुम्हांला पप्पाच म्हणेन असे सांगून विजयी मुद्रेने खोलीच्या बाहेर गेली. पण अगदी लवकरच, त्याच दिवशी ही योग्य वेळ आली. संध्याकाळी घराजवळच्या बागेतून परत येताना मुलीच्या पायाला ठेच लागली. पहिला शब्द तिच्या तोंडातून आला “आई..गं” आणि टचकन डोळ्यातून पाणी. पटकन तिने माझ्या कमरेला मिठी मारली आणि म्हणाली “बाबा, खूप दुखतय हो!” थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर, मी पुन्हा हा विषय काढला. तीला हे आपल्या भाषेबद्दलचे प्रेम, आपुलकीची भावना इ. समजावून सांगायचा आणि पर्यायाने तिला पप्पा/मम्मी म्हणण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. मी किती सफल झालो हे ती जेव्हा मला प्रेमाने हाक मारेल तेव्हांच कळेल, पण तिच्या या प्रश्नाने मला चांगलेच अंतर्मुख केले. खरेच, आपण बोलताना आपण किती शुध्द मराठीत बोलतो? आपल्या दररोजच्या वापरात आपण किती ईंग्रजी शब्दांचा नकळत वापर करतो?
कित्येक ईंग्रजी शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. साहेब देश सोडून गेले पण हे भाषेचे परकीयत्व/ जोखड अजूनही आपल्या मानेवर सोडून गेला. सण, मोरी, रंग, इ. कित्येक मूळचे शब्द आता इतिहासजमा झालेत. चिली, गार्लिक, ब्रेड, पॅन, ब्रेकफास्ट इ. शब्दांनी कधीच आपल्या स्वयंपाकघरात चंचूप्रवेश करून आपली भाषा भ्रष्ट केली आहे. आहाराने शुध्द शाकाहारी असलेल्या मला माझी भाषाशैली कधी मांसाहारी (मिश्र) झाली ते कळलेच नाही. मार्गशीर्ष महिन्यात (डिंसेबर) ठाण्यात स्वयंचलित तिचाकी चालकाला उजव्या हाताला वळवा असे सांगितल्यावर, म्हणजे नक्की कुठे, लेफ्ट की राइट असे त्याने निरागसपणे विचारले तेव्हा मला फारच आश्चर्य वाटले. मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं/मनसेने मध्यंतरी आंदोलन झेडले होते. त्यात राजकारण किती आणि समाजकारण किती हा भाग सोडला तरी कुरकुरत का होईना, दुकानदारांनी त्याची दखल घेतली व काही काळापुरते का होईना पण दुकांनावरचे नामफलक मराठीतून झळकू लागले. पुढे हे आंदोलन थंडावले आणि पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या. इंग्रजीतूनच फाडफाड बोलले तरच आपण सुशिक्षीत आणि अधिक टेचदार होतो का? मराठीत बोलल्यावर आपली मान शरमेने का झुकते?
परवा एका चुलत मित्राच्या (माझ्या सख्ख्या मित्राचा मित्र, म्हणून तो चुलत मित्र) घरी गेलो होतो, तेव्हा त्याचा चार वर्षाचा चुणचुणीत मुलगा जेव्हा आम्हांला म्हणाला, बाहेर रेन पडतोय, तुम्हांला अम्रेला कॅरी करावी लागेल. मला त्याच्या या समयसुकतेचे व बोबड्या बोलाचे कौतुक करावे की मित्राला त्याच्या या ईंग्लराठी बद्दल सांगावे, या व्दंव्दात मी अडकलो. त्याची आई मात्र, किती गोड ग माझ ते पिलू म्हणून त्याला कुरवाळत होती. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात.गोऱ्यांच अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? त्यांच्या शिस्तशीर वागण्याचे, वाहतुकीचे नियम पाळायचे इ. चांगल्या गोष्टींचे आपण अनुकरण करतो का? खरच आपण आपल्या भाषेची होणारी अधोगती थांबवण्यासाठी नुसती कंबरच नाही तर आपली जीभ पण कसली पाहिजे. आपल्या या अम्रृतातेही पैजा जिंकण्याची कुवत असलेल्या आपल्या सुंदर भाषेच्या वाढीसाठी एकदिलाने प्रयत्न करू.
आत्ताच माझ्या मुलीने मला प्रेमाने बाबा व आमच्या सौभाग्यवतीला आई म्हणून हाक मारली. माझा आनंद गगनात मावेना. मनाने ठरवले आहे, आठवड्यातील एक दिवस, मग तो संडे असो वा ‘मंडे’, आपला ‘मन’ डे साजरा करायचा. जितके शुध्द मराठीत बोलता येईल तेवढे बोलायचे.
“How exciting!!” आता मराठीत बोलायचे आणि लगेच फेसबुकवर स्टेटस टाकायची.......
“Feeling Excited…speaking only in May Marathi with Family!”
आजच्या मराठी राज्यभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy
माझ्या अमराठी मित्रांना आणि मैत्रिणींना किमान ५ वाक्य मराठीत बोलायला लावते मी आजच्या दिवशी. मजा म्हणून. त्यांना सांगितलं आहे it मध्ये राहायचं असेल तर आधी मराठी आणि कन्नड भाषा शिका. जावा आणि python नंतर!
सगळ्यात जास्त ही वाक्ये येतात :
निरीक्षणे +:
१. चला मधले पुढे
२. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
३. जेवण झालं का?
४. माझे नाव.. आहे
५. धन्यवाद