'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) ए सर्टिफिकेटचा बी ग्रेड चित्रपट

Submitted by अतुल. on 5 January, 2024 - 13:11

मजा तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलात. तिथले अलिशान आणि भरगच्च वैभव पाहता पाहता तुम्ही जेवणाची ऑर्डर दिली. आणि वेटरने अगदी अदबीने तुम्हाला ताटातून आणून दिला गरमागरम वरणभात. कुबट वास येणारा भात आणि खारट वरण! घ्या. खा पोटभरून. कसे वाटेल? 'ॲनिमल' चित्रपट मल्टिप्लेक्सला पाहत असताना अगदी तसेच वाटते. हल्लीचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूप खूप पुढे गेलेलं आहेत. सिनेमॅटोग्राफी, ऑडीओ व्हिज्युअल तंत्रज्ञान इत्यादीचा झगमगाट असतो. अरे पण जे आम्ही बघायला जातो त्याचे काय? मनात रुंजी घालणारे संगीत, दीर्घकाळ स्मरणात राहणारे संवाद, दिग्दर्शनातले टॅलेन्ट. गेलाबाजार किमान एखादे गाणे तरी? 'ॲनिमल' मध्ये कशातलेच काहीच मिळत नाही. दृश्ये, संवाद आणि एकूण सगळाच चित्रपट असा अंगावर आल्यासारखा येतो. हाताशी मात्र काहीच लागत नाही. अक्षरशः मध्यांतरानंतर थियेटरमधून पळून जावे असे वाटत होते. संपला तेंव्हा सुस्कारा टाकत बाहेर आलो. मोक्कार पैसे देऊन तिकीट काढावं आणि अक्षरशः अंगावर पडलेली घाण झटकत बाहेर पडावं अशी अवस्था झाली होती. लेने के देने पड गये Lol

कथा काय आहे?
एक इंडस्ट्रियालिस्ट कुटुंब असते. त्यांची स्टील उत्पादनाची इंडस्ट्री असते. अनिल कपूर आणि त्याचा बाबा हे दोघे कुटुंबप्रमुख. रणबीर कपूर हा अनिलचा मुलगा. कधी पूर्वी त्या बाबा ने कुणालातरी कामावरून कि भागीदारीतून हाकललेले असते म्हणे. त्या व्यक्तीचे वंशज तिकडे कुठल्या तरी फलाण्या देशात राहत असतात. त्या त्यांच्या वंशजाला (बॉबी देओल) बदला घ्यायचा असतो म्हणून तो सतत अनिलचा खून करायच्या प्रयत्नात असतो. त्यात अनिल सोबतच राहणारा त्याचा घरजावई सुद्धा त्याला (बॉबी देओलला) सामील झालेला असतो. अनिल मात्र आपल्या मुलीला व जावयाला गोंजारत असतो. आपल्या पोराला मात्र फार किंमत देत नसतो. पण पोराचे मात्र बापावर खूप प्रेम असते. अखेर पोरगंच कामाला येतं. 'अस्तनीत निखारा' बनून राहिलेल्या मेहुण्याला ठार मारतं. आणि ह्या खानदानी दुश्मनाचा सुद्धा नायनाट करतं.

झालं! इतकीच स्टोरी आहे.लक्षात आले का, ह्यात स्टील उत्पादनाचा पहिल्या उल्लेखानंतर कुठेच संबंध येत नाही. आहे कि नाही पटकथाकराची कमाल?

हुकलेले दिग्दर्शन आणि संपादन:
संपूर्ण चित्रपटात दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचे आहे याचा बोध होत नाही. तुझ्या सिनेमाचा फोकस नक्की काय आहे बाबा? कौटुंबिक कलह, की बदले कि आग, की पुरुषांचे भावविश्व, की वडील मुलातले नातेसंबंध, की अजून काही? नक्की काय समस्या सोडवणे सुरु आहे तेच कळत नाही. एडिटिंग तर थूत्त्तड आहे. पार बोंब करून ठेवली आहे. रणवीर कपूर आपल्या मेहुण्याला मारताना दाखल्याच्या दृश्यानंतर मेहुणा जिवंत दिसतो आणि चर्चा अनिल कपूरवरच्या हल्ल्याची दाखवली आहे! कळतंच नाही नक्की कुणाला मारले आणि काय सुरु आहे. वाटते कि रणवीरने आपल्या बापालाच मारले कि काय? कि मारणारा रणवीरचा बॉडी डबल होता? कि तो बॉबी देओल होता? (कारण ते दोघेही दाढीवाले दाखवलेत). अरे काय चाललंय काय? बराच वेळ पडद्यावर काय चाललंय कसलाच बोध होत नव्हता.

ऍडल्ट संवादांची विकृती आणि बीभत्स दृश्ये:
एकंदर चित्रपट पाहता हे कुटुंब इंडस्ट्रियालिस्ट पेक्षा अंडरवर्ल्डवाले असावेत असे वाटते, तर "जॉब वरून काढले" म्हणून दुसरे कामधंदे न पाहता तब्बल दोन पिढ्या वैरभाव धरून रात्रंदिवस ह्यांना मारण्याच्याच कामी लागलेले ते दुसरे कुटुंब म्हणजे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. या सर्वांचीच 'उच्च राहणी आणि टुकार विचारसरणी' दाखवली आहे. एकंदर या सर्वांचे वागणे आणि वृत्ती पाहता यांची इंडस्ट्री कधीचीच बंद पडून हे सगळे कुटुंबीय वास्तविक भिकेला लागायला हवे होते. पण चित्रपटात मात्र ते गडगंज दाखवलेत. इतके गडगंज कि एका प्रसंगात एक नवी कोरी रोल्स रॉयस ते अशीच स्फोट करून जाळून टाकतात!

बरं कौटुंबिक हाणामाऱ्या तरी कसे म्हणावे? त्याचे प्रमाण इतके मोठे आहे कि विचारू नका. पूर्वी आर्नोल्डच्या एका चित्रपटात एलियन्सला मारण्यासाठी त्याची टीम तुफान तुफान तुफान गोळीबार करताना दाखवली होती. कित्येक मिनिटे थियेटर मध्ये फक्त धाड धाड धाड धाड धाड धाड धाड धाड गोळीबाराचे आवाज घुमत होते. ते असह्य होऊन त्या काळात एका प्रेक्षकाने अक्षरशः थियेटरमध्येच बोंब ठोकली होती. ते सुद्धा मला चांगले आठवतेय. इतका भयंकर गोळीबार! या चित्रपटात यांच्या कौटुंबिक कलहात अगदी तसाच व तेवढ्या प्रमाणात गोळीबार दाखवला आहे. बॉबी देओल तब्बल तीनशे माणसे पाठवतो यांना ठार मारायला, तेंव्हा हा बेसुमार गोळीबार आहे. तो इतका वेळ आणि इतक्या प्रमाणात आहे, कि यावेळी बोंब ठोकायची वेळ माझी आहे का काय असे वाटू लागले. आणि जेम्स बॉंडला सामुग्री पुरवणारा जसा कोणी एक असतो तसे इथे आपल्या रणवीरबाबाला मशीनगन्सपासून बनवलेली आख्खी गाडीच बनवून देणारा एक मराठी माणूस दाखवला आहे तो म्हणजे उपेंद्र लिमये. अरे इतक्या मोठ्या प्रमाणात weapons of mass destruction दाखवायचे होते तर कारखानदार कशाला दाखवले त्यांना?

भाषेच्या बाबत तर काय बोलण्यासारखे सुद्धा नाही. आजकाल नेहमीच्या चित्रपटांत सुद्धा आधुनिकतेच्या नावाखाली ऍडल्ट शब्दप्रयोग करायचे तसेही एक विकृत फॅड आलेले आहे. आणि हा तर A सर्टिफिकेटचा चित्रपट. यांनी संवादातून विकृतीचा कळस गाठण्यात मात्र जागोजागी भरपूर यश मिळवले आहे. ऍडल्ट शब्दांच्या वापराबद्दल आक्षेप नाही. पण कथेत आणि दिग्दर्शनात जे कसब आणि गुणवत्ता दिसायला हवी ती जर नसेल आणि नुसतेच ऍडल्ट संवाद असतील तर ती कलाकृती न राहता फक्त विकृती बनून राहते.

तात्पर्य:
'ॲनिमल' हा असाच एक ए सर्टिफिकेटचा विकृत सिनेमा आहे.

संगीत:
ते लहान मुलांनी गायलेले एक गाणे (ते सुद्धा सोशल मिडीयावर ऐकून ऐकून कान किटले आहेत) ते एक सोडलं तर बाकी बेंबीच्या देठापासून ओरडलेली टिपिकल गाणी. जी आजकाल सगळ्याच चित्रपटात आढळतात. आत्ताची हि हाय पीच गाणी म्हणजे मला तर ते अखंड एकच रेकॉर्डिंग वाटते. तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या चित्रपटात टाकत असतील.

अभिनय:
इथे फारसे लिहिण्यासारखे नाही. सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका छान केल्यात. तरी विशेष उल्लेख करावा वगैरे असे फारसे या विभागात काही नाही. रश्मिका मंदन्ना भलतीच गोड दिसते. तिला उगीचच मध्यंतरी वेड लागल्यासारखे हसल्याचे रडल्याचे झटके आलेला एक प्रसंग करायला लावलाय. दिग्दर्शक फारच टुकार वाटला ब्वा (असेलही कदाचित व्यायसायिक दृष्ट्या यशवी पण तो भाग वेगळा)

जाता जाता:
चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याबाबत माझ्याकडून नो कॉमेंट्स. ‎IMDb वर 6.8 रेटिंग आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा ही रिव्ह्यू छान.
पाहिलेला नाही चित्रपट. शक्यताही नाही.
चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्ही कसे ठरवता हा एक नियम अलिकडच्या काळात रूजवला आहे.
हे म्हणजे विषाची चव न घेता तुम्ही कसे ठरवताय कि हे विष आहे टाईप वाटते.
थोड्या लोकांना कशानेच फरक पडत नसतो. ते ऐहिक जगातच सोफ्यात बसून दारूचे घोट घेत घेत निर्वाणावस्थेला पोहोचलेले असतात. त्यांच्या सारख्या तटस्थ दृष्टीकोणाने "अल्फा मेल कॅरेक्टर" काय पिक्चराईज केलंय म्हणून आपण पाहू शकत नाही.
चित्रपटाचा सिनेमावर बरा वाईट परिणाम होतो. मुळशी पॅटर्न आला. त्यातल्या चांगल्या गोष्टी सोडून कोयता गँगचा प्रभाव वाढला.
अ‍ॅनिमल, कबीर सिंग सारख्या चित्रपटात काय बघायचं कळत नाही.

शीर्षक : 'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) >>> म्हणजे जे बघणार नाहीत ते ? Wink

आमच्या इथल्या तेलुगू फ्रेशर ला खूप आवडला.'बाप मुलाचं नातं काय तरल मस्त दाखवलं आहे' वगैरे वगैरे.
एकंदरीत वर्णनं ऐकून ओटीटी वर आल्यावर पण पाहू नये असं वाटतं.त्यांच्या यशात मझ्या व्ह्यू चा अजून एक तारा नको.

सॉरी अतुल
पण मला तर animal चा रीव्यू सुद्धा वाचायचा नाहीये..

ट्रेलर पाहिल्यावर च बघायचं नाही अस ठरवलं होत. इतकं महालिटर मध्ये रक्त, tons मध्ये गोळीबार, आणि किलो किलो ने शिव्या मी ऐकू आणि पाहू शकत च नाही.इतकी मी ऍनिमल काळजाची नाहीच झालीये अजून.

छान लिहिले आहे. बघणार नव्हतेच, आता नेमकं कळलं का नाही बघायचा. पंचेसही आवडले. Happy

माहिती नाही का पण मला आधी तृप्ती दिमरी आणि रणबीर बहीण-भाऊ वाटले होते. कारण रश्मिका हिरोईन आहे एवढीच माहिती होती. मग तृप्ती बहीणच असेल असं गृहीत धरलं होतं. Lol एक गाणं चुकून/आपोआपच लागलं तर काही तरी वेगळंच व्हायला लागलं. त्यात लव्ह बाईट्स मदतनीसांना दाखवून त्याच रंगाची कार आणून देतो तृप्ती दिमरीला आणि हाताची बोटं पिरगळल्यासारखं करतो. हे फार Obsessive - Possessive - aggressive वाटलं आणि अंगावर आलं ते सगळं गाणंच. फारच uncomfortable केलं..! या सिनेमात काहीच तरल असू शकत नाही.

Youtube वरती खुप आधीच पाहुन झाला पण तब्बल २०० मिनिटे आणि काही शे mb फुकट गेल्याची जाणीव मनात ठेवूनच गेला सर्व चित्रपट. बाकी लेखात एक उल्लेख राहिलाय कदाचित की ह्याचा सिकवेल बनवण्यासाठी सर्वात शेवटी एक टुकड़ा चित्रपटात जोडलेला आहे. म्हणजे हे सरळ सरळ जिवन्तपणी गरुड़ पुराणातल्या शिक्षा प्रेक्षकाना देण्याची सोय दिग्दर्शकाने आधीच करुन ठेवलेली आहे.

ट्रेलरच झेपला नव्हता. एकंदरीत कायच्या काय सिनेमा आहे. चित्रपटातील पात्रांच्या पाशवी वागण्यावरून ॲनिमल नाव दिलंय वाटतं.

सिनेमा पाहण्याचा प्रश्न येतच नाही माझ्यासाठी. पण बऱ्याच gen z लोकांना आवडला आहे. का ते समजलं नाही.

मी हा थेटरात बघितला. Interval पर्यंत ठीक आहे. अचाट आहे. Interval नंतर खुप स्लो होतो. ती रश्मिका बोअर करते.
२६ ला Netflix वर येतो आहे. तेव्हा बघु शकता. 18 खालच्यांना दूर ठेवा. Gen z पब्लिक ला आवडला कारण या वयात larger than life macho man type characters आवडतात. Toxic romance पण आवडत असावा.

इथे फक्त प्रतिसाद वाचायला आले.. परिक्षण सुद्धा वाचायची इच्छा नाही. असले सिनेमा समाजात डोक्यावर घेतले जातात याची धास्तीच वाटते.

म्हणजे हे सरळ सरळ जिवन्तपणी गरुड़ पुराणातल्या शिक्षा प्रेक्षकाना देण्याची सोय दिग्दर्शकाने आधीच करुन ठेवलेली आहे. >>>सौथचे गल्लाभरू चित्रपट असेच जिवंतपणी नरकयातना भोगण्यासारखे असतात काल सालार /सलार थोडासा बघितला त्यात आवडता हिरो म्हणून हाच का तो ??? असे वाटण्यापासून काय म्हणून हे असं सर्व दाखवणं याला हे लोक क्रिएटिव्हिटी म्हणतात असे वाटले .

>> चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्ही कसे ठरवता हा एक नियम अलिकडच्या काळात रूजवला आहे.

बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला च्या बातम्या वाचून कधीच चित्रपट पाहू नयेत हि एक बाब. मी तर माउथ पब्लिसिटीवर विश्वास ठेवतो. ते माऊथ सुद्धा आपल्या जवळच्या मित्रांचे/नातेविकांचे हवे. पण इथे त्याबाबत सुद्धा फसगत झाली हो Lol

>> 'ॲनिमल' (सुद्धा पाहणार नाहीत असा) >>> म्हणजे जे बघणार नाहीत ते ?

Lol जनावरे सुद्धा बघणार नाहीत असा

>> मला तर animal चा रीव्यू सुद्धा वाचायचा नाहीये..

Lol बरोबर आहे त्याच लायकीचा चित्रपट आहे.

>> चित्रपटातील पात्रांच्या पाशवी वागण्यावरून ॲनिमल नाव

प्राचीन काळात मनुष्य आदिम अवस्थेत असतानाच्या तत्त्वज्ञानाची जोड देऊन रणवीरच्या पात्राद्वारे "खरा पुरुष हा अखेर ॲनिमलच असतो" असे काहीसे सांगायचा प्रयत्न आहे बहुतेक त्यांचा

>> लव्ह बाईट्स मदतनीसांना दाखवून त्याच रंगाची कार आणून देतो

खरंच अक्षरश काहीही दाखवले आहे. हे रोल्स रॉयस बाबत फॉरवर्ड पूर्वी व्हायरल झाले होते. कि ते म्हणे तुम्ही जी कलरशेड सांगाल अगदी त्याच कलर ची गाडी बनवून देतात. त्याचा इथे संदर्भ आहे. त्यामुळे इथून पुढे आपण जेंव्हा असे एखादे फॉरवर्ड वाचू, तेंव्हा ते कोणत्यातरी बॉलीवूडपटात पार चोथा करून वापरलेले दिसणार आहे याची मानसिक तयारी ठेवावी Lol

>> ह्याचा सिकवेल बनवण्यासाठी सर्वात शेवटी एक टुकड़ा चित्रपटात जोडलेला आहे

हे भगवान! सिक्वेल येणार असेल तर आताच पळा पळा पळा Lol

>> बऱ्याच gen z लोकांना आवडला आहे. का ते समजलं नाही.

होय हे मी सुद्धा पाहिले आहे. त्याचे कारण वरती mi_anu यांनी लिहिले आहे तसे त्यात 'वडील आणि मुलाचे नाते दाखवले आहे' हे कारण सांगतात हि मुले. दाखवले आहे थोडेफार पण ते इतकेही अपील होण्यासारखे नाही. सर्वच उथळपण आहे.

१२वी fail आणि ऍनिमल यांच्या व्यवसायिक यशात तुलना केली , आणि त्यात ऍनिमल आवडणाऱ्या लोकात gen z पोर आहेंत हे कळल्यावर जरा वाईट वाटलं.ज्याचा त्याचा चॉईस शेवटी पण पोरांनी कुठल्या प्रकारे इन्स्पिरेशन घ्यायची ह्याचा विचार करायला पाहिजे. कुठं नेऊन ठेवलाय gen z माझा Sad

Happy ऋ, आपण मिलेनियल्स आपली मुलं जेन झी/अल्फा.
The Greatest Generation – born 1901-1927.
The Silent Generation – born 1928-1945.
The Baby Boomer Generation – born 1946-1964.
Generation X – born 1965-1980.
Millennials – born 1981-1996.
Generation Z – born 1996-2012.
Gen Alpha – born 2013 – 2025.

Gen Z: वडील मुलगा नात्यातले लव्हहेट नाते आणि त्यापलीकडे असलेले बॉंडिंग अशा चित्रपटांतून शोधतात.

Gen X साठी मांडरे बंधू होते. आदर्शवादी बाप आणि तमाशाच्या नादी लागलेला पोरगा जो मोठा होऊन नंतर जबाबदारी पेलतो आणि सिनेमा संपतो. Lol

>>>>>>X generation ला बूमर असेही म्हणतात
नाही मला वाटतं बेबी बुमर्स वेगळे.
Boomers II (a/k/a Generation Jones)* || 1955 – 1964 || 60 – 69

Pages