डंकी: मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर

Submitted by अतुल. on 2 January, 2024 - 14:14

राजकुमार हिरानीचे नाव वाचून डंकी बघितला. शाहरूखचे चित्रपट आवडत नाहीत असे नाही पण आवडतात असेही नाही. त्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी "शाहरुखचा चित्रपट आहे" यापेक्षा "राजकुमार हिरानीचा आहे" हे कारण होते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या चित्रपटाचे वाचलेले परीक्षण (वजा जाहिरात), हे मुख्य कारण होते. युरोप अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणारे कोणत्या प्रसंगातून जातात याची आधीच साधारण कल्पना होती. आणि याचे वर्णन या परीक्षणात आले होते.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडणाऱ्या कोलंबिया-पनामा सीमेवरील डॅरिअन गॅप (Darién Gap) विषयी आधीही वाचले होते. अतिशय घनदाट जंगल आणि सततचा मुसळधार पाऊस यांनी भारलेला हा महादुर्गम असा प्रदेश आहे. इतका दुर्गम कि तीस हजार किमी लांबीचा पॅन-अमेरिकन महामार्ग सुद्धा केवळ इतक्याशा प्रदेशात मात्र खंडित झालेला आहे. या प्रदेशात कोणत्याच सरकारचे/पोलिसांचे नियंत्रण नाही. अर्थातच, इथे बरेच अवैध धंदे सुरु असतात. खून, बलात्कार, लुटालूट, ड्रग्स तस्करी, गोळीबार हे इथे नेहमीचेच. थोडक्यात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही बाबतीत अत्यंत खडतर अशी परिस्थिती इथे आहे. अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणारे सुद्धा मरणाचा धोका पत्करून इथूनच जायचा प्रयत्न करत असतात. अनेकजण मृत्युमुखी पडतात. कोणत्या एका वृत्तपत्रात वाचलेल्या या चित्रपटाच्या परीक्षणात याबाबत लिहिले होते.

परीक्षण वाचून डंकी चित्रपटात हे सगळे हिराणी स्टाईल मध्ये पहायला मिळेल असे वाटले होते. किंबहुना, चित्रपटभर हा खडतर प्रवास आणि त्यातले प्रसंग कथानकातून दाखवले असतील असे वाटले होते. कदाचित मी जास्तच अपेक्षा केली असावी. पण प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यावर लक्षात आले कि ते परीक्षण नव्हे तर जाहिरात होती Lol आणि ते वाचून तो चित्रपट पहायचा निर्णय माझ्यासारख्यानी घेणे हे त्या जाहिरातीचे यश होते. कारण यातले काहीही या चित्रपटात दाखवलेले नाही. नाही म्हणायला, अशाच प्रकारच्या पण इराक अफगाण वगैरे सरहद्दीवरचा त्यांचा खडतर प्रवास दाखवला आहे. पण तोही फार नाही. व ते सुद्धा मध्यांतरानंतर. बेकायदा प्रवेश करतानाचा प्रवास आणि थरार मध्यांतरानंतर सुरु होतो.

पूर्वी दीड तासाचे इंग्लिश चित्रपट थियेटरला लागायचे तेंव्हा त्याच्या वृत्तपत्रातील जाहिरातीत "मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर" असे लिहिलेले असे. म्हणजे इंटर्वल पर्यंत जाहीतरी आणि चित्रपटांचे इतर टीजर ट्रेलर वगैरे दाखवत. आणि मुख्य चित्रपट त्यानंतर सुरु होत असे. इथे सुद्धा चित्रपटाचे मुख्य कथानक मध्यंतरानंतरच सुरु होते असे म्हटले तरी हरकत नाही. तोवर बहुतांश चित्रपट पंजाबातल्या एका इंग्लिश क्लासरूममध्ये निरर्थक लांबवला आहे. त्यातल्या त्यात विकी कौशलच्या पात्राचा मृत्यू हा एकच ड्रामा आहे. बाकी सगळे फुळूकपाणी.

काय आवडले:
१. राजकुमार हिरानी टच: चित्रपटभर नसला तरी अनेक प्रसंगात राजकुमार हिरानीच्या दिग्दर्शनाचा स्पर्श जाणवतो. तो निदान मला तरी भावतो. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या मिम्स मधून उचललेले पंच (सगळे नसले तरी बरेचसे) त्याच्या चित्रपटात दिसून येतात. मुन्नाभाई, थ्री इडियट्स मध्ये ते दिसले. हा चित्रपट सुद्धा अपवाद नाही. तरीही पटकथेत चपखलपणे बसवण्याच्या त्याच्या लकबीमुळे मला ते आवडतात. त्याच्या दिग्दर्शनातली इतरही वैशिष्ट्ये पदोपदी जाणवतात. (त्यातली काही डोक्यात जातात ज्याचा उल्लेख पुढे येईलच. पण काही आवडतातही)

२. उर्जादायी/प्रेरणादायी: हा चित्रपट उर्जादायी किंवा प्रेरणादायी आहे असे म्हटले तर ते मोठे वादग्रस्त विधान होईल. नाही नाही illegal immigrants म्हणून जाण्याची प्रेरणा नव्हे Lol पण कोणत्यातरी अगम्य कारणासाठी मला तो प्रेरणादायी वाटला. का ते मला ते शब्दात मांडता येत नाही. एखाद्या कंपनीमधून वर्कपरमिट/व्हिसा करून युरोपात पुन्हा एकदा जाण्याची इच्छा प्रबळ झाली हे एक कारण कदाचित असावे.

३. काही प्रसंग खूपच परिणामकारक चित्रित केले आहेत. इराक सरहद्दीवरचे तसेच तत्सम इतर प्रसंग आवडले. हा थरारक प्रवास हाच चित्रपटाचा फोकस असायला हवा होता असे वाटत राहिले.

४. ज्या काळात चित्रपट दाखवला आहे तो आपल्या उमेदीचा काळ होता. त्यावेळचे वातावरण, त्या एजंटचे ऑफिस, परदेशात जाण्यासाठी आसुसलेली तरुणाई, त्यांची त्याकाळातली भाषा वगैरे वगैरे हे सारे पाहताना खूप मौज वाटली. कनेक्ट व्हायला झाले. चित्रपट पाहताना ते वातावरण किंवा मध्यवर्ती भूमिकेशी प्रेक्षकाने कनेक्ट होते गरजेचे असते.

काय नाही आवडले:
१. लांबलेले क्लासरूम सेशन्स: जसे मी आधी लिहिले आहे कि मध्यांतरापर्यंतचा चित्रपट खूप रेंगाळलेला आहे. विशेषतः इंग्लिश क्लासरूममधले प्रसंग विनाकारण वाढवलेले आहेत.

२. कॅन्सरचा शेवटच्या स्टेजचा पेशंट हिंडत फिरत असलेला दाखवणे: काही वर्षापूर्वी एक फॉरवर्ड व्हायरल झले होते. "घ्या की जगून" असा काहीसा संदेश देण्याच्या नावाखाली त्या लेखकाने ब्रेन ट्युमरच्या लास्ट स्टेजला असलेले जोडपे कसे शीळ घालत रमतगमत फिरत असते ते लिहून अकलेचे तारे तोडले होते. अखेरच्या स्टेज मधला कॅन्सर पेशंट काय असतो हे माहित नसल्याच्या अज्ञानातून असे लिखाण केले जाते. मजेत रमतगमत फिरण्याची त्यांची अवस्था असते का? हिरानीने तर हद्द केली आहे. त्याच फॉरवर्ड वरून प्रेरणा घेतली कि काय कोण जाणे पण कॅन्सरच्या अखेरच्या स्टेज मध्ये असलेली रुग्ण हॉस्पिटल मधून पळून जाते, ठणठणीत असल्यासारखी दुनियाभर उंडारत फिरते आणि अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने जावी तशी मरते. देवा रे देवा! अरे थोडे तरी वाचत जा रे बा दिग्दर्शका रोग नक्की काय आहे त्याबाबत.

३. कंटेनर मधली बीभत्स दृशे दाखवायची गरज नव्हती. याविषयी तपशिलात लिहायलासुद्धा किळस येते आहे. पण हा बीभत्सपणा टाळायला हवा.

४. लाच घेणारे आणि किस्स वगैरे घेण्यासाठी हपापलेले ब्रिटीश: ब्रिटनच्या हॉस्पिटलमध्ये ब्रिटीश झाडूवाल्याला चिरीमिरी देऊन तापसी पन्नू पळून जाते तो प्रसंग अतिशय बावळट वाटतो. प्रगत देशात "चिरीमिरी घेऊन काम करणारा सफाईकामगार" हि कल्पनाच मोठी विचित्र आहे (त्या बिचाऱ्या गोऱ्या अभिनेत्याने सुद्धा कसले कृत्रिम हावभाव केले आहेत तो प्रसंग करताना Lol ). तसेच तिच्यासोबत खोटे लग्न केलेला ब्रिटीश बेघर मनुष्य तिला किस्स करण्यासाठी हपापलेला वगैरे दाखवला आहे. ते सुद्धा अवास्तव आहे. किस्स करणे वगैरे गोष्टींचे फार अप्रूप नसते त्या लोकांत. त्याऐवजी ते ब्रिटीश पात्र नकारात्मक दाखवताना त्यांच्या पद्धतीने दाखवता आले असते.

काय मिळाले:
चित्रपट बघून झाल्यावर काही अंतर्मुख करणारे मुद्दे मिळतात जसे कि...

१. शेवटचे "व्हिसा विरोधात प्रचार" केलेले स्क्रोल्स वाचताना "दोनशे वर्षापूर्वी व्हिसा प्रकार नव्हता. कोणत्याही देशांत कुणीही कायदेशीर मार्गाने जाऊ शकत होते" असे लिहिलेले दिसते. हा मुद्दा खरंच योग्य आहे का? प्रत्येक देशाच्या सरकारचा तिथल्या जागेवर मालकीहक्क असतो ना? कि तो नसायला हवा? त्या देशात आत कुणाला घ्यायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या सरकारांना असणे यात चुकीचे काय आहे? वगैरे वगैरे प्रश्न मनात येतात.

२. शेवटच्या स्क्रोल्स मध्ये अवैध मार्गाने प्रवेश मिळवताना मृत्यू झालेल्या प्रमुख घटनांची नोंद घेतली आहे. त्यामध्ये अगदी दोन कि तीनच वर्षापूर्वी अमेरिका कॅनडा बोर्डरवर एक आख्खे भारतीय कुटुंब बेकायदा अमेरिकेत प्रवेश करण्याच्या नादात थंडीत काकडून दगावल्याची भयंकर घटना घडली होती याची नोंद घ्यायला हवी होती.

३. सर्वात शेवटी एक प्रश्न मनात येतो. युरोप/अमेरिकेत बेकायदा प्रवेश मिळवून देणाऱ्या एजंटांना देण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. इतके पैसे जवळ असताना हे लोक मरणाची रिस्क घेऊन तिकडे का जात असतील. इतका पैसा आहेच तुमच्याकडे, तर त्याचा उपयोग आपल्याच देशात नोकरी वा उद्योग व्यवसाय यासाठी का नाही करत असे वाटून गेले.

सारांश:
चित्रपट एकदा बघण्यासारखा नक्की आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिक्षण
बरेच मुद्दे पटले
या चित्रपटावर किंबहुना या विषयावर तीन स्वतंत्र धाग्यात तीन जणांनी परीक्षण लिहिले हे आवडले.
.

इतके पैसे जवळ असताना हे लोक मरणाची रिस्क घेऊन तिकडे का जात असतील.
>>>>>
भूलथापा आणि चुकीच्या समजुतीना बळी पडून असे मला वाटते.. तसेच ते घरावर विमानाची टाकी म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा सुद्धा आला यात. लोकं या खोट्या प्रतिष्ठेचे सुद्धा शिकार असतात.

एकदमच पटलं परीक्षण अतुल.सुरुवातीला इंटर्व्हल आधीची लांबड दाखवण्यापेक्षा त्यांचा सीमा प्रवास,त्यातल्या अडचणी थोड्या अजून डिटेल मध्ये दाखवायला हरकत नव्हती.कँसर पेशंट वाला भाग अचाट अतर्क्य.पळून जाण्याचा भाग उगीच माधवन च्या 3 इडियट मधल्या भागासारखा बनल्या सारखा वाटतो.
यात बेस्ट भाग म्हणजे विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर चा अभिनय.
(आणि 'किस' वर इतका तमाशा करायचीही गरज नव्हती.)

बघितला डंकी..
नेमके परिक्षण लिहिलंय अतुल..
एंगेजिंग नाही सिनेमा..

चांगलं परीक्षण अतुल. आम्ही थिएटरमध्ये बघायचं ठरवत होतो, पण मागच्या शनिवार-रविवारी जमलं नाही. आता जावं की नाही असं वाटतंय Happy
रविवारच्या 'हिंदू'मध्ये बेकायदेशीरपणे अमेरिकेत आणि एकंदरीत परदेशात जाणाऱ्या भारतीयांवर एक लेख वाचला. निकाराग्वा विमान प्रकरणाच्या निमित्ताने. त्यात डंकीचा उल्लेख होताच. तू जे थंडीने काकडून जीव गेलेल्या कुटुंबाबद्दल लिहिलं आहेस, ते आणि अजूनही काही उदाहरणं त्यात होती. गेल्या चारेक वर्षांत अशा बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचं प्रमाण प्रचंड वाढत गेलं आहे. कित्येकांची फसवणूक होते. काही लोक तर बेपत्ता आहेत. जिवंत आहेत की नाही हेही माहिती नाही.
तो लेख ऑनलाइन उपलब्ध असेल तर लिंक देते.

अ तुल, छान लिहीले आहे.
थेटरमधून बाहेर पडल्यावर वगैरे काही वाटलं नाही. यातला एक मुद्दा माझ्याकडून निसटला होता. आधीचे काही अन ऑफिशियल ट्रेलर्स पाहून हा अमेरिकेत जाण्याचा खडतर मार्ग आहे असेच वाटले होते. काही वर्षांपूर्वी नदीत बापलेकाचे मृतदेह सापडले त्याची आटवण झाली. पण रिलीजच्या आधी शाहरूखने घेतलेली राजू हिरानीची मुलाखत पाहिल्यावर इंग्लंडला जाण्याचा हा मार्ग आहे हे कळले. पंजाबातून कॅनडा आणि अमेरिकेत जाणारे सर्वाधिक लोक आहेत. इंग्लंडला जाण्याचे प्रमाण त्या काळात असेल कदाचित.

काही वर्षांपूर्वी व्हिसा लागत नव्हता. आता व्हिसा सुशिक्षित आणि पैसेवाल्यांना मिळतो, राजकीय शरणार्थींना मिळतो पण गरीबांना मिळत नाही हामुद्दा अगदी शेवटी आलेला आहे. सिनेमात त्यावर काहीच भाष्य नाही. हा वैश्विक / माणुसकीच्या दृष्टीने जास्त रॅशनल थॉट आहे. जग हे वैश्विक खेडे होत चालल्याच्या काळात ज्याच्याकडे शिक्षण नाही किंवा पैसे नाहीत त्याला नशीब काढण्यासाठी अडथळे येतात. दहशातवादी पैसेवाले किंवा सुशिक्षित नसतात ही अंधश्रद्धा आहे. इंग्लंड, कॅनडा मधले खलिस्तानी पैसेवाले आहेत. सुशिक्षित आहेत. मुस्लीम दहशतवादी सुद्धा पैसा,शिक्षण यात कुठेच कमी नाहीत.

ब्रिटीश जगभरात राज्य करायला गेले ते स्थानिक भाषा माहिती नसताना. डंकी मधे हा मुद्दा हास्यास्पद झाला आहे. प्रगत देशांचे कायदे एकतर्फी आहेत हे व्यवस्थित ठसवलेले नाही.जे आहे त्यापेक्षा वेगळा विचार करायला लावण्यात चित्रपट कमी पडला आहे. थ्री इडीयट मधे यश आले होते.

चांगले समीक्षण अतुल
चित्रपट OTT वर आल्यावर बघेनच.
ह्या दिगदर्शकाने कधी निराश केले नाही अजून म्हणून.
ह्याचे तिकीट मिळाले होते ( इतरांकडून न मागता जबरदस्तीने ) पण तेव्हा इतर कामात बिजी होतो म्हणून गेलो नाही.

गरिबांना व्हिसा मिळत नाही म्हणून इलिगल मार्गाने जावेच का?
रादर गरिबांना एखाद्या देशाने व्हिसा का द्यावा?
देश त्यांचा फायदा बघूनच तुम्हाला एन्ट्री देणार की.
भारतानेही असेच केले पाहिजे असे मला वाटणे साहजिक आहे. भारतात जर अनधिकृत पद्धतीने बांग्ला देशी किंवा इतर गरीब देशांतून लोकं घुसायला लागले आणि इथली law and ऑर्डर खराब करत असतील, इथल्या लोकांच्या संधी हिसकावून घेत असतील तर त्याला अटकाव करणे हे देशाचे कामच आहे की. त्यासाठीच काही कायदे कानून नियम वै.
रघु हे तुम्हाला वैयक्तिक नव्हे हां, इन जनरल लिहिलं.

रघु हे तुम्हाला वैयक्तिक नव्हे हां, इन जनरल लिहिलं. >> मुद्दामून मेन्शन का केलं असावं हे लक्षात आलं नाही. तुम्ही तुमचा मुद्दा मांडल्यावर त्यावर वादविवाद करण्याइतकी एनर्जी नाही. ( रजेवर वगैरे जाणार असाल म्हणून असेल कदाचित तर ओके).

ऋन्मेऽऽष,
सहमत आहे. वाहवत जात असावेत हे लोक. peer pressure हा सुद्धा भाग असेल. "अरे तो फलाना गेला. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे" वगैरे. बाय द वे मी तुमचे आणि आचार्य यांचे परीक्षण वाचलेले नाही कारण मी लिहिताना बायस्ड व्हायला नको म्हणून. पण ते दोन्ही लेख आता वाचतो.

केशवकूल,
"गाव बघून गेलं आणि आता परीक्षण केलं" असं वाटलं ना? Lol मुद्दे लिहून ठेवले होते हो, पण लेख बनवून पोस्ट करायला उशीर झाला.

mi_anu,
>> त्यांचा सीमा प्रवास,त्यातल्या अडचणी थोड्या अजून डिटेल मध्ये दाखवायला हरकत नव्हती
अगदी अगदी! मला हेच अपेक्षित होते. तो प्रवास. मला वाटते रामूचा "रोड" थ्रिलर असा काहीसा होता का? पळून जात असतात आणि रस्त्यावर प्रवासात त्यांना आलेले भयंकर अनुभव. असे विषय चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने फार रोचक असतात वास्तविक.

मृणाली,
हो. म्हणजे आहे एंगेजिंग पण फार कमी. विषयच इतका रोचक आहे कि अजून खूप एन्गेजिंग करता आला असता. सिनेमा बनवताना मध्येच राहि चा इंटरेस्ट निघून गेला असेल कि काय असे वाटते.

वावे,
एकदा बघण्यासारखा आहे. असेल शक्य सहज तर जरूर पहा. ज्या लेखाचा उल्लेख केला आहेस कदाचित मी त्याचीच मराठी आवृत्ती वाचली असावी. लिंक दे मिळेल तेंव्हा.

र.आ.
>> हा वैश्विक / माणुसकीच्या दृष्टीने जास्त रॅशनल थॉट आहे
होय हा मुद्दा आहेच. पण त्यातही बरेचसे कंगोरे आहेत. "व्हिसा पद्धती योग्य कि अयोग्य" हा मुद्दा स्वतंत्र्य चर्चेचा विषय आहे. म्हणूनच कोणत्याही ठोस निष्कर्षाला न येता अंतर्मुख करायला लावणारा मुद्दा असे लिहून गेलो. वरती लिहिल्यानुसार तुमचे व ऋन्मेऽऽष यांचे परीक्षण वाचले नव्हते,पण ते आता वाचेन.

झकास,
होय, ते सगळे मुद्दे मनात येतात. व्हिसा पद्धतीविषयी दोन्ही बाजूंचे मुद्दे आहेत.
१. त्या त्या देशांचे कायदे पालन करणे बंधनकारक असेल हि अट मान्य करून सर्वाना सरसकट कोणत्याही देशात प्रवेश मिळायला हवा हा एका बाजूचा मुद्दा (सिनेमाच्या मांडणीचा सूरही तोच आहे)
२. त्या त्या देशांच्या इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या करदात्यांच्या पैशातून बनलेले असतात. त्यांची क्षमता तिथली लोकसंख्या विचारात घेऊन ठरवली जाते. बाहेरून लोंढे आले तर त्यावर ताण येतो. मग तो त्या करदात्यांवर अन्याय नाही का? हा दुसऱ्या बाजूचा मुद्दा.
या दोन्हीवर बरीच चर्चा होऊ शकते. म्हणूनच म्हटले कि हा स्वतंत्र्य चर्चेचा विषय आहे

अश्विनीमामी,
धन्यवाद हो Happy

सर्वाना मन:पूर्वक धन्यवाद प्रतिसादासाठी Happy

रघुसर / आचार्य ( संबोधन एडिट केलेय घाईत रघु लिहिलेलं )
गरिबांना व्हिसा मिळत नाही किंवा जग हे वैश्विक खेडे हे तुमच्या।प्रतिसादात उल्लेख आहे.
त्याला प्रतिवाद म्हणून लिहिले असे वाटू नये म्हणून मेंशन केलं तसं.
बाकी वादविवाद करायला हुशार माणूस पाहिजे हो. मी तसा नाहीये.
अजून कोणी चांगला मुद्दा मांडला आणि आवडला की मी सहमत होतोच. कधी कधी इतर2 ज्यांच्यात वाद चाललेत दोघांनाचेही थोडे थोडे पटतंय तेव्हा गोची होते ते वेगळंच

रघु म्हणून हाक मारणार्‍यात तुमची भर पडली.आनंद वाटला. Lol
अरेच्चा ! राहू द्यायचे कि. त्यात काय एव्हढे ? छान वाटले असं म्हटलं.

१. त्या त्या देशांचे कायदे पालन करणे बंधनकारक असेल हि अट मान्य करून सर्वाना सरसकट कोणत्याही देशात प्रवेश मिळायला हवा हा एका बाजूचा मुद्दा (सिनेमाच्या मांडणीचा सूरही तोच आहे)>> काहीही असे झाले तर अमेरिकेत उभ रहायला पण जागा मिळणार नाही Happy
राजु हिराणीच सटकलेल दिसतय ह्या असल्या गोष्टीला सपोर्ट करतोय. पिके, संजु, डंकी दर्जा खालावत चाललाय. तो राजकुमार संतोषीच्या वाटेवर आहे.

सपोर्ट करण्या मागे गणितं असावीत.ओव्हरसीज पंजाबी प्रेक्षक वाढवणे वगैरे.शिवाय हेच गणित वापरून बांगलादेशी प्रेक्षकवर्ग पण वाढेल.

>>>>>कधी कधी इतर2 ज्यांच्यात वाद चाललेत दोघांनाचेही थोडे थोडे पटतंय तेव्हा गोची होते ते वेगळंच

सेम हियर Happy एकाची बाजू पटते तोच दुसरा काहीतरी सशक्त लिहीतो. त्यामुळे आपण अचंबित होतो तोच पहीला, डोळे दीपवुन टाकणारा प्रतिवाद करतो. आपण बिचारे फक्त नेत्र दीपवुन घेत, टाळ्ञा पीटत बसतो - ते ही दोन्ही बाजूंनी. हाहाहा माझे तरी असे होते. अर्धवट माहीती व ज्ञान आणि वकुबानुसार , अगदीच रहावलं नाही तर आपणही एक पिंक टाकतो आणि मग बाजूला जाउन प्रार्थना करतो "देवा, याला प्रतिवाद नसावा." पण नशीब बलवत्तर नसेल तर तसे काही होत नाही. Wink कोणीतरी आपल्याला धारेवर धरतं. पण पिंका टाकू नये हे काही आपण शिकत नाही. मग याला उतारा म्हणुन 'पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह' म्हणजे तळ्यात की मळ्यात असा संभ्रम निर्माण करत पण आपला मुद्दा बर्‍यापैकी मांडावा लागतो. असो Wink

<झकासराव हे वरील पिंका वगैरे तुम्हाला उद्देश्युन नाही तर इन जनरल आहे. Happy >

या वैचारीक कुस्त्या वायु (कुंभ, तूळ व मिथुन) राशींच्या रथी-महारथींनीच लढाव्यात. अग्नी राशींनी (धनु, सिंह व मेष) सोशल सेट अप मध्ये चमकोगिरी करावी. पृथ्वी व जल राशींनी गप्प बसून मजा एन्जॉय करावी. लागल्यास आपण तसे नसल्याचा न्यूनगंड बाळगावा. मात्र कर्क राशींनी त्यांचे रडगाणे थांबवावे Wink पण अर्थात कर्केची जमेची बाजूही आहे म्हणा.

- अजुन आठवेन तसे लिहीन

>>>>इतके पैसे जवळ असताना हे लोक मरणाची रिस्क घेऊन तिकडे का जात असतील. इतका पैसा आहेच तुमच्याकडे, तर त्याचा उपयोग आपल्याच देशात नोकरी वा उद्योग व्यवसाय यासाठी का नाही करत असे वाटून गेले.
फारीनची क्रेझ, भ्रामक कल्पना. काहीतरी मिळवण्याकरता, खूप काही द्यावं लागू शकतं या मुद्द्याविषयक अज्ञान, आपल्या देशाची 'अतिपरिचयात अवज्ञा.' शिवाय जोडीदारापैकी एक समाधानी वृत्तीचा असेल तर दुसरा असमाधानीच हवा असे शास्त्र सांगते. त्यामुळे एक जण सतत फारीन बघायला, तिथे स्थायिक व्हायला उत्सुक आणि दुसर्‍याची फरफट.

>>...आणि मग बाजूला जाउन प्रार्थना करतो "देवा, याला प्रतिवाद नसावा." पण नशीब बलवत्तर नसेल तर तसे काही होत नाही.

हे भारी आहे Lol पण होतं असं कधी कधी सोमि वर. विशेषतः संवेदनशील विषय असेल तर. आपले मत, मार्केट मध्ये एखादा प्रोडक्ट लौंच करावा तसे, अगदी तावूनसुलाखून त्यावर नीट QA वगैरे करून मांडावे लागते Proud

सामो खूप खूप धन्यवाद Happy

परीक्षण वाचले. मी त्याबद्दल फार लिहीत नाही. चित्रपटात वा कादंबर्‍यांत पात्र उभी करणे, त्यांची पार्श्वभूमी दाखवणे, त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे मांडणे यासाठी वेळ घेणं कॉमन आणि अपेक्षित नाही का ? तुम्हांला मध्यंतरापूर्वीचा भाग अनावश्यक वाटला , त्या अनुषंगाने.

मला व्हिसाच्या मुद्द्यावर लिहायचे आहे.

प्रगत देशांचा आग्रह आहे की वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीवर आर्थिक कारणाने कोणतेही निर्बंध नसावेत. तिथे ते फ्री ट्रेड चा पुरस्कार करतात. मात्र अविकसित / विकसनशील देशांना त्यांच्या उद्योगांचे आणि ग्राहकांचे हित संबंध जपण्यासाठी असे निर्बंध घालायची सवलत आहे.
* वस्तू सेवांमध्ये भांडवलाची म्हणजेच कंपन्यांची भर पडली. एफ डी आय. यावर निर्बंध नकोत म्हणूनही विकसित देश आग्रही असतात. लॉबिंग करतात.

आता हेच विकसित देश व्हिसाच्या बाबत मात्र निर्बंध घालतात. म्हणजे आता कदाचित प्रत्येकच देश घालतो. पण लोकांचा ओघ विकसित देशांकडे असतो, म्हणून त्यावर झोत.

तर हा दुटप्पीपणा नाही का?

ऑस्ट्रेलिया , न्युझिलड या देशांत अठराव्या शतकाच्या शेवटी गोरे लोक शिरले आणि त्यांनी ते काबीज केले.. ऑस्ट्रेलियाने १९०१ मध्ये त्यांनी १९०१ मध्ये अश्वेत लोकांनी (विशेषतः आशियाई) त्या देशात स्थलांतरित होण्यावर निर्बंध घातले.

युरोपियन वसाहतवाद्यांनी गुलाम आणि स्वस्त मजूर हवे म्हणून आशिया आफ्रिकेतून स्थलांतर घडवलं. भारतीय लोक मॉरिशस, कॅरेबियन बेटांवर नेले.

हा त्यांचा इतिहास विसरायचा का?

अमेरिकेबद्दल तर बोलायलाच नको.

भरत, आहेच दुटप्पीपणा. सरळसरळ आहे. इथं 'ब्ल्यू कॉलर' जॉब हिस्पॅनिक करतात. ज्यात illegal immigrants सुद्धा असतात. ते अचानक पकडले जातात व मग फोन लागत नाही. ते एक वेगळंच विश्व आहे. पिढ्यानपिढ्या गरिबीच्या दुष्टचक्रातून कधीही निघू नये असं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. ज्यांना परवडतं ते बॉर्डरवर येऊन अमेरिकन हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म घालतात आणि बाळाला शापातून (?) मुक्त करतात हे मी स्वतः बघितलेलं आहे. आपल्यासारखीच हाडामाणसाची माणसं असूनही त्यांना तशी वागणूक कधीही मिळत नाही. (मी कित्येक वर्षे एक 'पूर्णपणे' हिस्पॅनिक डॉक्टर शोधतेय, मिळाला की कळवेन. ) आम्ही
मेक्सिको बॉर्डर पासून दोन तासांवर मेक्सिकोकडूनच जिंकून-फसवून घेतलेल्या एकेकाळी त्यांचाच हक्क असलेल्या प्रदेशात रहातोय, नंतर इथे जर्मन वसाहत झाली. ते स्थलांतरित जर्मन मात्र कुठल्याकुठे गेलेत. याला इतिहास वाचायचीसुद्धा गरज नाही इतकं ढळढळीत सत्य आहे.

---------------

परीक्षण एकदम 'मॅटर ऑफ फॅक्ट' लिहिले आहे, आवडले. Happy

सामो, भन्नाट पोस्ट. Lol

आपले मत, मार्केट मध्ये एखादा प्रोडक्ट लौंच करावा तसे, अगदी तावूनसुलाखून त्यावर नीट QA वगैरे करून मांडावे लागते >>>> Lol

>> मध्यंतरापूर्वीचा भाग अनावश्यक वाटला , त्या अनुषंगाने.

ज्यावर चित्रपट बेतला आहे तो काँफ्लिक्ट पटकथेत सुरवातीच्या अर्ध्या तासात एस्टॅब्लिश व्हायला हवा असा एक सर्वसाधारण निकष आहे. प्रेक्षकाला एंगेज करण्यासाठी तो योग्य सुद्धा आहे. काही चित्रपटांत तर पहिल्या पंधरा मिनिटातच तडका टाकतात. धाड्कन एखादा अपघात, बंदुकीची एखादी गोळी, एखादी आपत्ती इत्यादी. कि प्रेक्षक झट्कन गपगार झालाच पाहिजे खुर्चीत, पुढे काय होतंय विचार करत Lol इथे मात्र तसे घडत नाही. मध्यंतराआधीचे सगळे (कौशलच्या आत्महत्येपर्यंत) अर्ध्या तासात दाखवायला हवे होते. तिथून पुढे खडतर प्रवास सुरु.

>> तर हा दुटप्पीपणा नाही का?

सहमत आहे. पण देश काय किंवा व्यक्ती काय. "कोण बलवान?" आणि "गरज कुणाला?" हे दोन प्रश्न येतात तेंव्हा सगळी तत्वे बाजूला पडतात हे कटुसत्य आहे Sad अमेरिकेच्या नागरिकाला मात्र बहुतांश देशांत व्हिसा घ्यावा लागत नाही किंवा त्या देशाच्या विमानतळावर आगमन झाल्यावर लगेच देतात.

अस्मिता धन्यवाद Happy मेक्सिकोचे उदाहरण या पार्श्वभूमीवर खूप बोलके आहे.

झटकन गुगल करून चटकन अधले मधले वाचून घेऊन पटकन दुभंग मत मांडणे आणि शाबासक्या मिळवणे हाच सोसेल मिडीयातल्या आयुष्याचा जीवनगौरव पुरस्कार !

>>>>>>>झटकन गुगल करून चटकन अधले मधले वाचून घेऊन पटकन दुभंग मत मांडणे आणि शाबासक्या मिळवणे
हाहाहा Lol Lol

भरतजी, तुमचा वस्तू/सेवा आणि व्यक्ती ह्यातलं साधर्म्य शोधायचा मुद्दा नाही पटला. वस्तू/सेवा आणि जिवंत व्यक्ती - ज्यांना जगायला सामाजिक, आर्थिक, सरकारी, सांस्कृतिक आधार लागतो - ह्यांची तुलना नाही करता येत.

"हा दुटप्पीपणा नाही का?" - Colonization आणि immigration ह्या दोन गोष्टीत बराच मोठा फरक आहे.

"अमेरिकेबद्दल तर बोलायलाच नको." - अमेरिकेहा पासपोर्ट ७ व्या क्रमांकावर आहे ग्लोबल अ‍ॅक्सेस च्या लिस्टवर.

"झटकन गुगल करून चटकन अधले मधले वाचून घेऊन पटकन दुभंग मत मांडणे आणि शाबासक्या मिळवणे हाच सोसेल मिडीयातल्या आयुष्याचा जीवनगौरव पुरस्कार" - Lol

Pages