आकाशी झेप घे रे पाखरा - पॅराग्लायडिंग पायलट बनण्याचा अनुभव - भाग ३

Submitted by मध्यलोक on 16 December, 2023 - 12:03

भाग १ : https://www.maayboli.com/node/84447
भाग २: https://www.maayboli.com/node/84450
भाग ३: https://www.maayboli.com/node/84454
भाग ४: https://www.maayboli.com/node/84459 (अंतिम)
================================================================

इंट्रोडक्शन कोर्स नंतर लगेच पुढील कोर्सला नाव नोंदणी केली होती. आम्हा सगळ्या रुकिजला फ्लाईंग स्कूलच्या वेबसाईटचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. क्लास सुरू होण्यासाठी हवामान चांगले होण्याची वाट बघणे ऐवढेच काय ते आता आमच्या हातात होते.

मे चा पहिला आठवडा तसा थंडच गेला आणि दुसऱ्या आठवड्यात जरा तापमान 12 ते 15°c च्या जवळपास आले. तेव्हा स्कूल तर्फे वेबसाईटवर सकाळी एक सेशन आणि संध्याकाळी एक असे रोज दोन सेशन पब्लिश केले जाऊ लागले. आपल्याला शक्य होईल त्या सेशनला आपण जॉईन करायचे असा फ्लेक्सीबल कोर्स असल्याने ऑफिसच्या वेळा सांभाळण्याची काळजी मिटली. पण ऑफिसमुळे सकाळचे सेशन शक्य होत नसल्याने मी संध्याकाळचे सेशन जॉईन करण्याचे ठरवले.

पण त्यात खरी गंमत अशी होती की रोज फक्त दहा विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायला मिळणार होते. कोविड नंतर आमच्या ह्या बॅचला उदंड प्रतिसाद लाभला होता. 4 वाजता स्लॉट ओपन होऊन 4 वाजून 5 सेकंदात सगळे स्लॉट बुक व्हायचे. पहिल्या दिवशी कामामुळे 4 वाजता वेबसाईट ओपन सुद्धा करता आली नाही, 4 वाजून 5 मिनिटांनी वेबसाईट ओपन केली तेव्हा सगळे स्लॉट फुल झाले होते.. दुसऱ्या दिवशीही तीच अवस्था.. नेमकी दुपारी 3:30 ते 4:00 ची मीटिंग 5 मिनिटे एक्स्टेंड व्हायची. पण आता मी ठरवले होते काही झाले तरी उद्या नंबर लावायचा.. मग भारतातील IRCTC वेबसाईटचा अनुभव पणाशी लावला.. 3:58 चा गजर लावला आणि रेडी झालो, घड्याळात दुपारचे 4 वाजताच नाव सबमिट केले आणि तिसऱ्या दिवशी माझा नंबर लागला....भले शाब्बास

बॅच मेट कडून ह्या सेशन्स बद्दल माहिती मिळत होती त्यांना ह्यात फार मजा येत होती. ह्या रोजच्या सेशन्स मध्ये आम्हाला ग्लायडर जमिनीवर कसे हॅण्डल करायचे हे शिकवण्यात येत होते. ह्याला "ग्राउंड हॅण्डलिंग" म्हणतात आणि हा ग्राउंड हॅण्डलिंगचा सराव ह्या खेळात खूप महत्वाचा असतो. फॉरवर्ड लाँच, रिव्हर्स लाँच ह्यांचा स्किल्स मास्टर करणे हे ह्या सेशनचे उद्देश. असे सेशन जास्तीत जास्त करता यावे अशी माझी इच्छा होती पण व्यस्ततेमुळे मला पूर्ण आठवड्यात फक्त दोन सेशन करायला मिळाले. आता माझी भिस्त शनी-रवीला असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्यावर होता.

09_14122023.JPG“ग्राऊंड हॅन्डलिंग” चा सराव करतांना

10_14122023.JPG“ग्राऊंड हॅन्डलिंग” चा सराव करतांना

12_14122023.jpgस्कूल समोरून वाहणारी “Bow” नदी आणि तिचा नेकलेस पॉईंट

13_14122023.jpgस्कूल समोर दिसणारी रॉकी पर्वतशृंखला

तारीख: 13 मे.. वार: शनिवार..
पहाटे उठलो तेव्हा आजचा हवामानाचा अंदाज अगदी चांगला दिसत होता. शनिवार सकाळचे सेशन सुरू झाले. वातावरणाने साथ दिली आणि ग्राउंड हॅण्डलिंग करण्यात मजा येऊ लागली. ग्लायडर आता बऱ्यापैकी स्थिर ठेवता येऊ लागले. तेवढ्यात आम्हा सगळ्या रुकीजना डोंगराच्या काठाजवळ बोलावले. खाली दिसणाऱ्या लँडिंग झोनची पाहणी करायला लावली आणि सांगितले, "तुम्ही तुमच्या पहिल्या फ्लाईट साठी रेडी आहात".

कड्यावरून खाली बघितले तेव्हा पोटात भीतीचा गोळा आला, हाताला घाम फुटला आणि हृदयाची धडधड कैक पटीत वाढली. मी या आधी किती तरी वेळा उंच कड्यावरून खाली बघितले आहे, उंच डोंगरावर चढलो आहे आणि उंच इमारतीत राहिलो आहे, तिथून खालीही बघितले आहे.. पण आता ह्या 300 फूट कड्यावरून खाली उडी मारायची होती..मनाची काही तयारी होत नव्हती. अशी उडी मारायची काही सवय नसल्याने फारच भीती वाटत होती.

मग साधारण दहा मिनिटे स्तब्ध उभा राहिलो.. मन शांत केले.. परिस्थितीचा आढावा घेतला आणि माझ्या पहिल्यावहिल्या सोलो फ्लाईट साठी तयार झालो. पोझिशन घेतली आणि इशारा होताच कड्याकडे धावत सुटलो.

14_14122023.jpgकड्याकडे धावतांना

आणि.....
क्षणात मी हवेत होतो.. वारा भर्र गतीने काना शेजारून जात होता..पायाखाली असलेली जमीन नाहीशी झाली होती आणि मी उडत होतो.... अगदी एखाद्या पक्षा सारखा...वाह काय अद्भुत अनुभव होता तो.. मी आकाशात उडत होतो.. एकटा.. मुक्त

15_14122023.jpgआज मैं उपर

माझी ही पहिली फ्लाईट सुमारे एक ते सव्वा मिनिट चालली असेल, लँडिंग पण अगदी योग्य झाले. आयुष्यात एक वेगळा अनुभव मी आज घेतला होता. नेमका माझ्या ह्या पहिल्यावहिल्या अनुभवाचा बायकोने एक छानसा व्हिडिओ शूट करून मला सरप्राइज दिले. आयुष्यातील एक सुंदर क्षण माझ्या नकळत तिने कॅमेरा मध्ये टिपला होता.

16_14122023.jpgमुक्तछंद

18_14122023.jpgउडाण

मग काय ह्या पहिल्या फ्लाईट नंतर त्याच सेशन मध्ये अजून 3 फ्लाईट झाल्या, आता मनातील भीती नाहीशी झाली आणि अजून जास्त फ्लाईट घेण्याची ओढ लागली. पायलट होण्याचा कोर्स तर आता कुठे सुरू झाला होता आणि अजून तर बराच मार्ग पूर्ण करायचा बाकी होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोही उत्तम >> फोटोंचे श्रेय बायकोला
मी हे केलं नाही तरी मला बघायला खूप आवडतं >> जमल्यास नक्की अनुभवा, खूप छान आणि वेगळा अनुभव असतो. कामशेत ला tandem फ्लॅईंग करता येईल

कसला भारी >> भाई पुण्यात आलो कि सोबत जाऊया, प्लॅन फॉर अ इंट्रो कोर्स

झकास !

हे एकदातरी जमवायचेच आहे