मोनालिसा

Submitted by अवल on 12 December, 2023 - 06:34

(कोणत्याच कलेचे मी व्यावसायिक परिपूर्ण शिक्षण घेतलेले नाही. अगदी क्रोशा विणकामाचेही नाही. बघून बघून प्रयोग करत शिकणे ही माझी पद्धत. चित्रकलेबद्दलही हेच. त्यामुळे जे लिहितेय ते चित्रकलेची एक सामान्य प्रेक्षक म्हणूनच असेल; तज्ज्ञ म्हणून नाही. त्यातून अनेक लेख, पुस्तके वाचत बघत आले; त्यांचा जरूर मोठा प्रभाव आहे. प्रामुख्याने या विषयावर लिहिताना काहींचा आधीच उल्लेख करणे योग्य वाटते.
James Payne या कलाकार- संग्राहक व इतर समिक्षकांचे लेख, ब्रिटानिका एन्साय्क्लोपीडियातील लेख, स्मार्टहिस्ट्री या साईटवरील काही लेख, तसेच इतर काही पुस्तके, लेख या सगळ्यांचा चित्रकला, लिओनार्डो व्हिन्सी आणि मोनालिसा समजून घ्यायला या सर्वांचा खूप उपयोग झाला.
तसेच या विषयावर अजून कितीतरी लिहिता येऊ शकेल पण माझी तितकी क्षमता नाही. तज्ञांनी जरूर लिहावे.)
---
लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार ! काही चित्रे लेखाच्या गरजेनुरूप एडिट केली आहेत.
---

लिओनार्डो द व्हिन्सी या प्रसिद्ध चित्रकाराची एक अजरामर कलाकृती, " मोनालिसा" ! इ. स. 1503 ते 1519 म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत हे चित्र लिओनार्डो काढत होता. 16 वर्ष. आणि तरीही त्याला ते पूर्ण झालेय असे वाटत नव्हते. आज या चित्राभोवती अनेक गोष्टींचे गूढ वलय आहे. अनेकांना ते अनमोल आणि एकमेवाद्वितीय वाटते. तर अनेकांना ते चित्र नुसतेच आवडत. तर काहींना हे चित्र म्हणजे उगाचच महत्व दिलेले वाटते. प्रथम दर्शनी तसा समज होणे अगदी स्वाभाविकच आहे.
कारण हे चित्र तत्कालीन इतर चित्रांच्या तुलनेत अगदीच छोटे आहे. जेमतेम 21*30 इंच. त्यातून त्यात वापरलेले रंग अनाकर्षक, तपकिरी, काळपट रंगात रंगवलेले आहे. त्यातून मोनालिसाचा पोशाख, केशरचना वा दागदागिने यांत काहीच प्रभाव पाडणारे असे नाही. पार्श्वभूमी देखील स्पष्ट नसलेली, नीट डोळ्यात भरेल अशी नाही.
अन मग प्रश्न मनात उमटतो का बरं या चित्राला इतके मानले जाते? मी जेव्हा हे चित्र प्रथम पाहिलं तेही शाळेच्या पुस्तकात. मलाही हाच प्रश्न पडला. पण त्याबरोबरच त्या चित्रावरून नजर बाजूला सरकत नव्हती. काही तरी गूढ त्यात होतं. कळत नव्हतं काही; पण काही तरी छान आपण बघायला कमी पडतोय, काहीतरी हातातून सुटतंय अशी भावना मनात उमटली. अनेक वर्ष ही हुरहूर मनात तशीच होती.पुढे विद्यापीठात एक, उत्तम प्रतीचा कागद अन छपाई असलेले एक पुस्तक पहाण्यात आले. त्यातल्या मोनालिसाने पुन्हा भुरळ घातली. मग अजून थोडी माहिती मिळवण्यातचा प्रयत्न केला. पण मग चित्रकला थोडी मागेच पडली अन मोनालिसाचे गूढही तसेच राहिले. मग कालांतराने इंटरनेटने अनेक विश्वाची कवाडं उघडली गेली. एका क्लिकवर सगळी माहिती आली. अन मग अनेक शोधांबरोबर मोनालिसाचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. पूर्वी वाचलेली काही पुस्तकं, आता नेट वर मिळणारी माहिती यातून मोनालिसा, लिओनार्डो द व्हिन्सी बद्दल खूप काही वाचता आलं, बघता आलं. मग असं वाटलं कि हे सगळं इतरांनाही सांगावं. भले त्यांना माहिती असेलही. पण त्यांच्या बरोबर आपलं मत पडताळून पाहावं. म्हणून मग लिहित गेले. आधी म्हटलं तसं, मी काही या क्षेत्रातली नाही, त्यामुळे कुठे चुकलं तर जरूर सांगा, नवीन माहिती असेल तर ती सांगा.

तर मोनालिसा !

 

एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या बायकोचे - लिसा डेल जिओकोंडा हिचे हे पोर्ट्रेट. हे चित्र खरं तर पोर्ट्रेट काढलं गेलं ते एका लाकडावर. सर्वसाधारणात: कॅनव्हासवर चित्र काढली जातात हे आपल्याला माहीत असते. पण हे चित्र लाकडावर काढले आहे. सर्व प्रथम या लाकडावर पांढरा रंग दिला गेला. हा पांढरा रंग वरच्या सर्व रंगांमधून प्रकाशाचे किरण परावर्तित करत असतो. सर्वसाधारणत: यावर चित्राची संपूर्ण रूपरेखा आखली जाते. अन त्यानुरूप चित्र रंगवले जाते. लिओनार्डोचे वेगळेपण इथून सुरु होते. त्याने आपल्या चित्रांच्या रूपरेखा स्टेन्सिल सारख्या पद्धतीने केवळ काही टिंबांनी आखून घेतली. अन जसजसा तो चित्र काढत गेला तस तसा तो चित्राचे तपशील ठरवत, रेखत गेला. तसेच कोणत्याही रंगाचा एकच एक थर देण्याऐवजी त्याने अनेक पातळ अन हलके, फिके थर देणे पसंत केले. याच मुळे मोनालिसा चित्रात एकावर एक असे किमान 30 थर आहेत. अन प्रत्येक थर इतका पातळ आहे की या सर्व 30 थरांची एकत्रित जाडी मानवी केसाच्या अर्ध्याहूनही कमी आहे. अतिशय पातळ (डायल्युट) रंग, अन अनेक थर यातून लिओनार्डो अशी काही जादू करतो कि आपल्या समोरचे चित्र चित्र न राहाता प्रत्यक्ष वास्तवासारखे उभे राहाते. यामुळे मोनालिसा आपल्याला वास्तव वाटू लागते.
रंगाचा अजून एक खेळ लिओनार्डो खेळतो. तो म्हणजे एकाच रंगाच्या विविध छटांचा वापर अतिशय कल्पकतेने तो करतो. एकाच रंगाच्या फिक्या, मध्यम, गडद अशा विविध छटांच्या वापरातून चित्राला तो बेमालूमपणे खोली (डेफ्त) देतो. एकाच वेळी एक, दोन, चार, सहा पातळ्यांवर चित्र उमटते. समोर असणारी मोनालिसा मागचा रस्ता, नदी, पूल, डोंगर, ढग सगळे आपापल्या प्रतलावर एका मागे एक उभे असल्याचा आभास लिओनार्डो उभा करतो. इतकेच नव्हे तर मोनालीसाचे वर आलेले गाल, तळहाताच्या वरच्या बाजूचा उंचवटा, हनुवटी आणि त्या मागची मान, माने मागचे केस, कपाळावरची अतिशय झिरझिरीत ओढणी या सर्वांना तो केवळ एकाच रंगाच्या विविध छटांचा वापर करून रंगवतो. मोनालिसाची त्वचाही तो अशीच जीवंत करतो. फिकी छटा वापरून गाल वर आणतो. तर गडद छटा वापरून मानेचा भाग मागे सारतो. त्वचेबाबत आणखीन एक तपशील. एक अतिशय पातळ, हिरव्या रंगाचा थर त्याने वापरला आहे. खरे पहाता हिरावा रंग निसर्गात सगळी कडे दिसतो; पण माणसात नाही असे म्हटले जाते. पण जर नीट बघतलेत तर आपल्या त्वचेखाली असलेल्या निळ्या धमन्या मुळे एक हिरवट छटा आपल्या त्वचेला असते. पण हे आजही अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पण लिओनार्डोने मानवी शरीराचा इतका खोलात जाऊन अभ्यास केला होता की त्वचेचे हे तपशील त्यांच्या नजरेतून अजिबात सुटले नाहीत. अन म्हणून त्याची चित्र जास्त जास्त वास्तव वाटत आली आहेत. मोनालिसाही त्याला अपवाद नाही.
विषय निघालाच आहे; तर त्याच्या या मानवी शरीर रचनेच्या अभ्यासाबद्दल अजूनही काही. मोनालिसाचे हास्य ही एक अशीच गूढ गोष्ट !
पहिल्यांदा पूर्ण चित्र बघताना, मोनालिसा हसते आहे असे वाटत नाही. जस जसे आपण तिच्याकडे निरखून बघू लागतो; तिच्या डोळ्यांकडे बघू लागतो तसतसा आभास होतो की ती हसते आहे. अन मग चमकून तिच्या ओठांकडे बघतो तेव्हा लक्षात येते की अरे ओठ तर सरळ आहेत. हसताना ओठ जसे विलग होतात वा अर्धगोलाकार वळतात तसे नाहीत. मग पुन्हा डोळ्यांकडे पाहिले की वाटतं ती हसतेय. पुन्हा ओठ, पुन्हा डोळे असं पटपट नजर वळवली तर ती अगदी छान हसतेय असा भास होतो.हे काय गौडबंगाल आहे हे कळून घ्यायचं तर मानवी शरीर रचनेचा पुन्हा विचार करावा लागतो.
एक तर हसताना गाल आणि जबड्याचे स्नायू कसे जागा बदलतात ते लक्षात घ्यावे लागते. लिओनार्डोने याचा अगदी खोलात जाऊन अभ्यास केलेला दिसतो. त्याच्या विविध डायरयांमध्ये यांच्या नोंदी सापडतात. ओठाची हालचाल आणि त्यानुरूप होणारी जबड्याची आतील स्नायूंची हालचाल यावर सचित्र टिपणं त्याने काढली आहेत. त्यातच एक चित्र मोनालिसाच्या ओठांबरहुकूम दिसते.

 

या हालचालींना चित्रात उतरवताना लिओनार्डोने रंगीच्या विविध छटांचा बेमालूम उपयोग करून घेतला आहे. ओठाच्या बाजूने गालावर कानाजवळ चढत जाणार्या काळपट छटेचा नीट अभ्यास केला तर हे समजू शकेल.
इतकेच नव्हे तर मानवाची पाहण्याची जी क्षमता आहे, डोळ्यांच्या आतली रचनाआहे; तिचाही लिओनार्डोचा अभ्यास दिसतो. आपल्या डोळ्या आतल्या पडद्यावर प्रकाश पोहचतो, तो दोन पद्धतीने. एक मध्यात अतिशय केंद्रित स्वरूपात आणि स्पष्ट, स्वच्छ. तर परिघाला - बाजूला अंधुक आणि अस्पष्ट स्वरूपात असतो. केंद्रात जास्तीत जास्त तपशील, रंग आणि सुस्पष्टता परावर्तित होत असते तर परिघाला pपांढरा काळा रंग, हालचाल आणि सावली परावर्तित होत असते. या शास्त्रीय माहितीचा उपायोग लिओने करून घेतला आहे.

पाहणाऱ्याच्या नजरेच्या केंद्रस्थानी डोळे असतील तेव्हा, ओठांच्या आसपासच्या सावल्या आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या छटाच दिसतील अन त्यामुळे ओठ वक्राकार वाटतील. अन हसण्याचा आभास निर्माण होईल.

परंतु जेव्हा पाहणाऱ्याच्या नजरेचा केंद्रस्थानी ओठ असतील तेव्हा ओठांचा रंग आकार हे तपशील दिसतील अन ओठां च्या आसपासच्या सावल्या आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या छटा गायब होतील अन हसणे गायब होईल

आज एकविसाव्या शतकात हे वाचताना सोपे वाटेलही. पण लिओनार्डोने हे चित्र काढलं आहे ते 1503-1519 या काळात. शास्त्र आणि कला यांचा इतका मनोहर मिलाप अभावानेच आढळतो. लिओच्या बहुतेक सर्व कलाकृतींमध्ये हा दिसतो.
डोळ्यांबाबत अजून एक गंमत. त्याकाळी स्त्रियांच्या चित्रांमधे कधीच स्त्री समोर बघत नसे. त्या समाजाची ती प्रथा, समज होता. पण मोनालिसा मात्र आपल्या डोळ्याला डोळा लावून पहाते. अन गंमत ही की चित्रात असं वाटतं की ती डावीकडे बघते आहे. तिची बुबुळं डोळ्यांच्या डाव्या कोपऱ्यात आहेत. पण ती बघते मात्र थेट समोर. इतकच नाही तर तुम्ही जसजसे डावीकडे, उजवीकडे सरकाल तिचे तुमच्याकडे टक लावून पहाणे बदलत नाही.
त्या काळात अजून एक प्रथा होती ती म्हणजे संपूर्ण उंचीचे चित्र काढले जाई. लिओनार्डोने यातही बदल केला. तसेच चित्रासाठी जी बसण्याची पद्धत होती तीही बदलली. ताठ, काहीशी कृत्रिम पद्धत टाळून मोनालिसाला आरामात, सैलावून, सहज पद्धतीत बसवून चित्र काढले आहे.
लिओनार्डोने अजून एक बदल केला तो म्हणजे त्रिकोणी रचनेच चित्राची रचना. यापूर्वी सरळसोट किंवा आडवी चित्र काढली जात. पण त्या रचनेत पाहणाऱ्याची नजर कोणत्या एका ठिकाणी केंद्रित होत नसे. त्रिकोणी रचनेत मात्र त्रिकोणाच्या वरच्या बिंदूवर नजर केंद्रित होते. मोनालिसाचे चित्रही अशाच त्रिकोणी रचनेत काढले आहे.

मोनालिसाचा पोषाख, दागिन्यांचा अभाव आणि पार्श्वभूमी ठळक नसणे हेही लिओनार्डोने पारंपरिक चित्ररचनेत केलेले बदल आहेत. या सर्वामागे चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित व्हावे, कोणत्याही इतर ठळक, आकर्षक गोष्टींनी ते ढळू नये हा हेतू होता. अन तो साध्य झाला. अजिबात उठावदार नसणारे कपडे, त्यांचे रंग, अगदी डोक्यावरची झिरझिरीत ओढणीही काळ्या रंगाची, मागे प्रचंड आवाका असलेला निसर्ग पण तो काहीसा अंधूक, अस्पष्ट. या सर्वांमुळे केवळ आणि केवळ मोनालिसाचा चेहरा हाच आपल्या नजरेच्या केंद्रस्थानी रहाते.
त्या काळात किंबहुना आजही चित्र, फोटो काढून घेताना व्यक्ती जास्तीत जास्त आकर्षक दिसेल अशी सजलेली असते. मोजके पण उठावदार दागिने, आकर्षक केशरचना, रंगीत, नव्या पद्धतीचे आकर्षक कपडे, शक्यतो रेशमी, चमकदार निवडले जातात पार्श्वभूमीवर बाग, डोंगर, आकर्षक इमारत, कोरीव खांब, रंगीत पडदे असे काही योजले जाते. पण मोनालिसामधे हे सगळे जाणीवपूर्वक टाळले आहे. का? तर केवळ मोनालिसावर लक्ष केंद्रीत रहावे, तिच्या चेहऱ्यावर रहावे म्हणून!
येथे पार्श्वभूमीचाही थोडा विचार करू. डावीकडे मागे एक नागमोडी रस्ता आहे, दरी, नदी, खडकांचे सुळके, पर्वत तर उजवीकडे एक नदी, त्यावरचा पूल, मागे दूरवर चकाकते पांढरे ढग. बारकाईनं बघितलं तर हे सगळं दिसेल. पण यातलं काहीही पहिल्या नजरेत लक्षात येत नाही. खरं तर इतकं तपशील चितारताना कितीतरी कष्ट लागले असतील पण त्याकडे पाहण्याची नजर जाऊ नये असं प्रयत्न लिओनार्डोने केलेत. आपल्या चित्राचा मूळ विषय समोरच्याने अगदी नीट पहावा, बाकीचे तपशील त्याच्या मनात उमटू नयेत म्हणून कष्ट करणारा कलाकार विरळाच.
मग असं वाटतं की इतके कष्ट घेतलेच कशाला पार्श्वभूमीवर? सरळ एक कोणातातरी फिका रंग देऊन टाकायचा न. पण मग तो लिओनार्डोकसा राहिल? Happy
मोनालिसा आणि मागचा निसर्ग हे दोन्ही एकमेकांत मिसळून जावेत, निसर्ग आणि मानव यांचे अतुट नाते तर लिओनार्डोला ठळक करायचे नाही? नदी, दऱ्याची वळणे आणि मोनालिसाच्या पोषाखाची, केसांची वळणे अशी एकमेकांत हरवून गेली आहेत. कोणती स्पष्ट रेषा त्यांना विलग करत नाही. यावरून अजून एक वैशिष्ट्य. मोनालिसाच्या चित्रात कुठेही अशी ठळक रेषा तुम्हाला सापडत नाही. मागच्या निसर्गात नाहीच पण मोनालिसाच्या चेहऱ्यातही नाही. डोळे, ओठ, मान, बोटं कुठेही स्पष्ट विभागणी दिसणार नाही. सगळीकडे एक अंधूक, पसरट, धुरकट (ब्लर आणि स्मोकी) मिसळण दिसेल. पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे एकाच रंगाच्या विविध छटा, त्यातही फिका ते गडद असा प्रवास करत (ग्रेडियंट). सगळ्या सीमा लिओनार्डोने धुसर केल्या आहेत. पण असं असूनही डोळे, नाक, ओठ, बोटं वेगळी, स्पष्ट दिसतात. म्हणजे चेहरा अगदी स्पष्ट आहे, सगळे अवयवही स्पष्ट आहेत पण त्यांना दाखवण्यासाठी ठळक रेषांचा वापर मात्र लिओनार्डोने टाळलाय. आणि याच त्याच्या तंत्रामुळे मोनालिसा, चित्र न वाटता समोर बसलेली एक जिवंत व्यक्ती वाटते. निसर्गाने मानव घडवताना रचलेला हा रंगाचा खेळ लिओनार्डो आपल्या हातात पकडू पहातोय.
पार्श्वभूमीबद्दल अजून तीन गोष्टी.
एकतर मागचा निसर्ग जणूकाही आपण उंचावरून पहातोय असा दिसतो. जणू मोनालिसा कुठेतरी उंचावर बसलीय अन तिथून गवाक्षातून खाली सगळा निसर्ग पसरला आहे. म्हणजे मोनालिसा एका प्रतलावर तर बाकी निसर्ग खाली वेगळ्या प्रतलावर . असं काहीसं. स्वाभाविकच वर मोनालिसा काहीशी अधांतरी, उंचावर बसलेली पण आपल्या डोळ्यासमोर अशी दिसते. यामुळे ती अन आपण जरा उंचावर अन बाकी जग खाली पसरलेय असा आभास निर्माण होतो. ताजमहालबाबतही हाच दृष्टिभ्रम साधला जातो, थोडा वेगळा. ताजमहाल एका मोठ्या चवथऱ्यावर बांधलाय पण ते चवथरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे ताजमहाल काहीसा असाच उंचावर, अधांतरीत दिसतो. अन त्याच्या प्रचंड मोठ्या आकारामुळे ते स्थिरही दिसतो. अर्थात तिथे आपण खालच्या प्रतलावर असतो. मोनालिसाच्या चित्रात मात्र पहाणारा समतलावर असतो (मूलत:असावा) (मी काही यावर बोलणं धाडसाचे ठरेल; पण तरीही वाटतं की म्युझियममधे मोनालिसाच्या चेहऱ्यासमोर पहाणाऱ्याचा चेहरा येईल असे चित्र लावले, तर ते जास्त चांगले वाटेल. कारण लिओनार्डोने अपेक्षिलेले प्रतले समान वाटतात अन्यथा इतर काही चित्रात जसा वेगळा कोन त्याने योजला आहे; तसा इथेही योजला असता.)
दुसरं, वर एके ठिकाणी लिहिलं तसं, अंधूक, पसरट, धुरकट पद्धतीने पार्श्वभूमी रंगवत असतानाही गरज लागेल तिथे अगदी प्रखर रंगही लिओने वापरले. अन तसे वापरूनही ते नजरेत भरणार नाहीत याची काळजीही घेतली, अतिशय अवघड गोष्ट!
उदा. डावीकडचा नागमोडी रस्ता किंवा उजवीकडे दूऽरवरचा पांढराशुभ्र ढग. इथे लिओने केलेल्या अजून एका अभ्यासाचा उल्लेख आवश्यक ठरतो. त्याने वातावरणाचा सखोल अभ्यास केलेला. वातावरणातील हवेची घनता, तिचे वजन, तिची दिशा या साऱ्याचा (हायड्रोडायनॅमिक्स) त्याने अभ्यास केला होता, तशा नोंदी त्याच्या वह्यांमधे आहेत. या अभ्यासाचा वापर या ढगाच्या रेखनामागे जाणवतो.

तिसरी, अन मला फार महत्वाची वाटली ती गोष्ट म्हणजे क्षितिजाची रचना. फोटोग्राफीबद्दल नेहमी म्हणते की फोटोत एक हालचाल असली पाहिजे, पाहणाऱ्याची नजर फोटोभर फिरत, पुन्हा फोटोच्या मूळ विषयाकडे झेपावली पाहिजे. अर्थात हा नियम चित्रकलेतलाच. चित्रामधे जर अशी हालचाल नसेल तर चित्र सपाट (फ्लॅट) होतं. अन अशा हालचालीसाठी पार्श्वभूमीचा सुयोग्य वापर चित्रकार (वा कोणताही कलाकार) करत असतो. मोनालिसामधे हे नेणिवेच्या पातळीवर होत राहिल, यासाठी लिओनार्डोने एक फार मोठा धाडसी प्रयोग केला आहे. तो म्हणजे त्याच्या चित्रात चक्क दोन क्षितीज रेषा आहेत. मोनालिसाच्या मागे डाव्या अन उजव्या बाजूला चक्क दोन वेगवेगळ्या क्षितीज रेषा दिसतात एक थोडी वर दुसरी खाली. इतकेच नव्हे तर त्याचा कोनही वेगवेगळा आहे. त्यामुळे आपली नजर चक्रावते. एकदा डावीकडची क्षितीज रेषा पकडून मोनालिसाला स्थिर केलं जातं तर दुसऱ्या क्षणी उजवीकडची क्षितिजरेषा दिसते अन तिला साधून मोनालिसाला हलवलं जातं. नजरेचा हा खेळ चालू झाल्यामुळे मोनालिसाचा केंद्रबिंदू बदलता रहातो. अन ती चल झाल्यासारखी वाटते. अन अजूनच जिवंत वाटू लागते. नजरेला पडलेल्या या भूली मुळे जणुकाही तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे असा आभास आपल्याला होऊ लागतो.

 

मोनालिसामधे, खरेतर फार चटकन खटकू शकेल अशी एक न्युनता आहे. तिच्या भुवया. किंबहुना नसलेल्या भुवया आणि पापण्या. गंमत म्हणून एक प्रयोग करून बघा. कोणाच्याही चित्रातल्या भुवया खोडुन चेहरा बघा, अतिशय विचित्र, विद्रुप दिसू लागतो. पण मोनालिसाचं असे होत नाही. किंबहुना पहिल्या पाहण्यात जाणवतही नाही की भुवया, पापण्या नाहीत.
इतक्या बारीक सारिक विचार केलेल्या चित्रकार इतका मोठा तपशील कसा बरं विसरला? काहींच्या मते काळाच्या ओघात आणि हवेच्या प्रभावामुळे; बारीक कोरलेल्या भुवया आणि पापण्या धूसर होत नाहिशा झाल्या. असूही शकेल. पण मला मात्र वाटतं की चित्रातला हा तपशील जवळ जवळ शेवटी काढला जातो. अन लिओनार्डोला तर हे चित्र पूर्ण झालय असं वाटतच नव्हतं. तो अजूनही यावर काम करतच होता. शक्य आहे की नंतर तो त्या रेखणार असेल. या मागचं रहस्य लिओनार्डोलाच माहिती.
आता काही इतर तपशील.
असे म्हणतात की मोनालिसाची दोन चित्र काढली गेली. 2012 मधे हे दुसरे चित्र पुढे आले. यात बरेच तपशिल सारखे आहेत शिवाय जास्तीचे काही तपशीलही आहेत, तर काही तपशील वेगळे आहेत. मुख्य या चित्रात मोनालिसाचे गूढ कमी आहे.

त्या काळात एक मास्टर कलाकार अन त्याच्या हाताखाली अनेक नवीन चित्रकार, विद्यार्थी  काम करत असत. अन एकाच चित्राच्या काही प्रती निघत. असाच प्रकार याही बाबतीत झाला असावा. असेच अजून एक पण खूप तपशिल वेगळे असणारे एक चित्रही पुढे आले आहे. शिवाय रेखाचित्र स्वरुपातले एकही सापडते.

पण या सर्वात मूळ मोनालिसातले गूढ हरवलेले दिसते. एका अर्थाने तत्कालिन इतर चित्रांसारखी ती दिसतात.
मोनालिसाचे चित्र काढण्याची विनंती ज्या व्यापाऱ्याने(तिच्या नवऱ्याने) त्याला हे चित्र दिले गेले नाही, कारण तं पूर्णच झाले नाही. काहींच्या मते वर उल्लेखलेले दुसरे चित्र दिले गेले. त्यामुळे त्यात दिसणारी मोनालिसा ही खरी. पण त्या चित्रा दरम्यान लिओला अजून काही सूचत गेले ते त्याने आपल्या चित्रात रेखिले. अन हे सूचणे चालूच राहिल्यामुळे तो ते चित्र रेखित राहिला, मृत्यूपर्यंत!
1911 मधे मोनालिसाचे चित्र चोरीला गेले. आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झाले असे काहीजण मानतात. पण तसे नाही. 1911 पूर्वीच्या पुढील काही गोष्टींमुळे लक्षात येईल की तत्पूर्वीही मोनालिसा तितकीच प्रसिद्ध होती.
प्रसिद्ध सेनानी नेपोलियन याने हे चित्र आपल्याकडे ठेवले होते.
1825 मधे मोनालिसाचे पहिले एनग्रेव्हिंग केले गेले होते.
1854 मधे मोनालिचाचा पहिला फोटो काढला गेला होता.
1860 ते 1867 या काळात अनेक लेख मोनालिसावर लिहिले गेले होते.
या शिवाय अनेक कलासमीक्षक मोनालिसाचे चित्र फार महत्वाचे मानत नाहीत. त्यांच्या मते एकतर हे चित्र पूर्ण नाही. आणि अंधुक रेषांचे तंत्र त्यांना खास वाटत नाही. शिवाय 16 वर्ष हे चित्र काढले गेले यावरही काहींचा आक्षेप आहे. काहींच्या मते एका विशिष्ट कालावधीत हे चित्र काढले गेले असावे.
अशा रितीने अनेक कारणांमुळे एक छोटे चित्र अनेक गूढ घेऊन आज लूव्र म्युझियममधे झळकते आहे. आजही नवनव्या गोष्टी पुढे येतात, नवनवे अंदाज बांधले जातात. मध्यंतरी डिजिटल स्वरुपात मूळ मोनालिसा आणण्याचेही प्रयत्न झाले. काळानुरुप आणि वर दिलेल्यि वॉर्निशमुळे मूळ चित्र गडद झाले, काही रंग बदलले, अस्पष्ट झाले. ते सगळे प्रचंड अभ्यास करून (अगदी रंगाच्या मॉलिक्युलरमधला फरक कसा, किती झाला असेल याचा अभ्यास करून) डिजिटल स्वरुपात दूर करून लिओने काढले मूळ चित्र डिजिटल स्वरुपात आणलं गेले.

.

अशी ही मोनालिसा! अनेको लोकं आजही  झुंडीने, रांगा लावून तिला बघायला जातात. काही निराश होतात काही खिळून बघत रहातात. पण तिला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा प्रत्येक कला रसिक मनात जपतच रहातो, मीही त्यातलीच एक.

 
---

( ब्लॉगवरून कॉपी पेस्ट केल्यामुळे काहीना चित्र दिसणार नाहीत त्याबद्दल क्षमस्व! तसेच इतरर्ही चू भू द्या घ्या. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम रसग्रहण आवडले !
या विषयाचा एक वेगळा पैलू दाखवणारा माझा हा पूर्वीचा प्रतिसाद इथून (https://www.maayboli.com/node/65228?page=2)
इकडे डकवतो :

“मोना लिसा’ या ऐतिहासिक चित्राने अनेकांना भुरळ घातली आहे. त्या चेहऱ्याची विविध विश्लेषणेही प्रसिद्ध आहेत. या संदर्भात काही डॉक्टरांनी देखील त्याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते चित्रातील व्यक्तीला थायरॉइड-कमतरतेसारखा आजार असावा !

चित्रातील खालील गोष्टी या मताला पुष्टी देतात:

१. भुवया नसणे आणि डोक्याचे पातळ केस
२. त्वचेचा पिवळेपणा
३. चेहऱ्याचे दुबळे स्नायू
४. मानेच्या भागातील फुगीरपणा हा वाढलेल्या थायरोइडमुळे असावा.

संदर्भ: (https://www.mayoclinicproceedings.org/article/S0025-6196(18)30579-2/fulltext)

(Submitted by कुमार१ on 9 March, 2019 - 15:52)

धन्यवाद डॉक्टर कुमार सर.
हो वाचला होता हा लेख __/\__
बरं झालं इथेही दिलत. हाही पॉईंट ऑफ व्हु छान आहे. लिओनार्डोचा शरीरशास्त्राचा अभ्यास खरच चकित करतो

आवडला लेख! काही गोष्टी वाचलेल्या होत्या पण बरेच डीटेल्स आता वाचल्यावर जाणवतायत.
मोनालिसाला थायरॉइड>>> Happy Happy

किती अभ्यासपूर्ण लेख आहे अवल. 'कलेचा इतिहास' नंतर आज इथे मोनालिसाबद्दल वाचतेय..चित्रकलेविषयी इतकं सखोल मी आजच वाचलं. तुमच्या भाषेच्या सहजतेमुळे ते शक्य झालंय. एरव्ही नुसतं छान चित्र इतकंच समजतंय त्यातलं. :स्मित :

थँक्यु प्राचीन. खरं तर इतका मोठा लेख वाचताय तुम्ही सगळे याचच कौतुक वाटतय मला Happy
संध्या केतकरांचं पुस्तक म्हऩतेयस की 11,12 वीची पुस्तकं? कळलं नाही

खूप छान लेख..!

लेखावर तुम्ही खूप मेहनत घेतलीयं हे वाचताना सहज लक्षात येते..
लेख वाचताना कितीतरी वेळा मोनालिसाच्या चित्राचे निरिक्षण केले..
खूप छान माहिती दिलीयं तुम्ही लेखात.. वाचताना, नव्याने समजून घेताना छान वाटलं.

काय जबरदस्त विश्लेषण आहे!! इतक्या अँगल ने विचारच केला नव्हता.व्हीनची च्या मेहनत आणि व्यासंगाला दाद दिली पाहिजे.
एकंदर जरा तेलकट दिसणारा चेहरा, त्याकाळी फेशियल नव्हतं त्यामुळे असेल Happy नाहीतर बाईंनी नक्की चित्र काढून घेण्यापूर्वी ओ3 किंवा डायमंड फेशियल केलं असतं आदल्या दिवशी.

अवलताई,लेख खूप आवडला. यापूर्वी चित्र बघताना हे सगळं माहीत नव्हते. आत्ता लेख वाचतानाच किती वेळा चित्र पुन्हा बघितले गेले.

Happy जबरदस्त लिहिले आहे.
मला तर हे लाकडावर काढलेलं आहे हेही माहिती नव्हतं. मोनालिसा हे एक ऑप्टिकल ईल्यूजन आहे आणि ते कसं आहे हे गूढ तू क्षितिज, रंगांचे थर, ढग आणि हायड्रोडायनॅमिक्स, शरीरशास्त्रातील भूमिती वगैरेंच्या तपशिलवार नोंदींतून छान समजावले आहे. खूपच आवडला लेख.

रुपाली, ऑर्किड, अस्मिता थँक्यु, चित्र पुन्हा पुन्हा पाहताना अधिक आवडत जातं हा अनुभव अगदी सेम. अन काही तरी नवीन देता आलं याचा आनंद आहे.

मी अनु, मुळात लिओनार्डोचा या चित्राप्रती असलेला दृष्टिकोण मी तुझ्यापर्यंत बहुदा पोहोचवू शकले नाही; माझी कमतरता! जिथे पोषाख, दागदागिने यातही शक्य तितकं साधेपण जाणीवपूर्वक ठेवलय; तिथे त्वचेचं चकचकीतपण नक्कीच जाणीवपूर्वकच टाळलंच असणार. तत्कालिन इतर चित्रकारांपेक्षा लिओनार्डो वेगळा ठरतो तो याच मुळे. वर डॉ. कुमारांनी म्हटल्या प्रमाणे शरीररचनेचे इतके तपशील चितारणाऱ्याला एक तजेलदार, गुळगुळीत त्वचा रंगवणं अजिबातच अवघड नव्हतं. पण ते जाणीवपूर्वक टाळलय लिओने. सो तू जोक म्हणून लिहिलं असलंस, तरीही तुकतुकीत त्वचेची मोनालिसा लिओला अपेक्षितही नव्हती अन त्याने मोनालिसाची म्हणून रंगविलीही नसतीच.

इतका मोठा लेख वाचताय, आवर्जून सांगताय सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

प्राचीन, यस Happy

लेख आवडला.

ग्रेट आर्ट एक्स्प्लेन्ड नावाचे एक चॅनल आहे
https://www.youtube.com/watch?v=T9JvUDrrXmY
ते बघताना वाटले होते की असेच सगळे कोणीतरी मराठीतून पण समजावले पाहिजे. ते काम उत्तमप्रकारे केलेयस.
अशा बाकीच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी देखील पुढचे लेख येऊ देत

हर्पेन, धन्यवाद
आणि मी काही यातली तज्ज्ञ नाही रे, मेरे बस की बात नहीं ये. मोनालिसाबद्दल फार वर्ष ऐकते, बघतेय, वाचतेय म्हणून प्रयत्न केला इतकच.
तू सूचवलेला चॅनल बघते.

मस्त लेख मुलीने हे लुव्र मध्ये पाहिले आहे. द ग्लास अनियन चित्रपटात ह्या ओरिजिनल चित्राचा एक महत्वाचा प्रॉप म्हणून उपयोग केला आहे.

इतर चित्रकारांबद्दल व कलाकृतींबद्दल पण लिहा.

लेख आवडला, अवल.
बरीच नवीन माहिती मिळाली, पण मुख्य म्हणजे पेंटिंग्जकडे बघायचे, समजून घ्यायचे नवीन आणि निराळे दृष्टीकोन मिळाले.
अनेक आभार! Happy

हे पेंटिंग अखेरपर्यंत ‘पूर्ण’ झालं नव्हतं ही माहिती हृद्य आहे. ‘गोडी अपूर्णतेची’!
पॉल वॅलरी म्हणाला होता, ‘a poem is never finished, it’s abandoned’ - त्याची आठवण झाली. Happy

अवांतर : इथे अमेरिकेत ‘विंची’ आणि ‘लूव’ असे उच्चार ऐकले आहेत - ते जगाच्या इतर भागांत कदाचित निराळे असू शकतील.

मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र पहाण्याची इच्छा आहे. नवरा व मुलगी ठोंबे आहेत. तिथपर्यंत जाउनही त्यांनी हे म्युझिअम पाहीले नाही. अर्थात त्या वेळात अन्य आनंददायक पर्यटनच केले.
मी जर युरोपात गेले, तर हे चित्र व अन्य अनेक चित्रे पाहू इच्छिते. मला मेनली पिकासोची चित्रे पहावयाची आहेत. असो.
------------------------
लेख मेहनत घेउन लिहीलेला आहे. बरेच बारकावे आहेत की. हे आपल्याला माहीत नसते.

>>>इथे अमेरिकेत ‘विंची’ आणि ‘लूव’ असे उच्चार ऐकले आहेत<<< माझं मराठमोळं व्हर्जन Wink जसं वाचलं तसं लिहिलय. खरे उच्चार शोधायला हवे खरं तर

कित्ती माठपणा झाला माझा Sad>> अर्रर्र, मला तर वाटलेलं की मूळ नाव असंच असणारे.. म्हणजे उच्चार वगैरे अधिकृतपणे.. म्हणून मी लक्षात आणून देण्याचं लक्षात घेतलं नाही. Uhoh

प्राचीन Wink Lol
बादवे म्युझियम किमान लूव्र लिहायला हवं, र सायलेंट मानला तर लूव. ती मात्रा नकोच. थँक्स स्वाती.
व्हिन्सी की विंची शोधतेय

Pages