संगीत - वैयक्तिक अनुभव

Submitted by राधानिशा on 7 December, 2023 - 01:14

इथे जुन्या हिंदी गीत संगीतावर अनेक सुरेख लेख , चर्चा झाल्या आहेत .. त्यातलं थोडंफार वाचलं आहे ..

दुर्दैवाने असं म्हणण्याचं फारसं कारण नाही पण आमच्या घरात हिंदी संगीताची आवड कुणाला नव्हती त्यामुळे ते लहान वयात किंवा टीनेज मध्ये कानावर पडलं नाही .. टीव्हीवर जुने हिंदी सिनेमे लागत नव्हते असं नाही पण प्रमाण कमी असावं आणि फास्ट रंगीत सिनेमांच्या ऐवजी ते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे बघावेत , गाणी ऐकावीत अशी काही आवड नाही उपजली त्यावेळी ...

लहानपण राणी , शाहरुख , सलमान , अमीर , हृतिक , प्रीती , ऐश्वर्या , अनिल कपूर यांचे सिनेमे बघण्यात गेलं .. त्यातली गाणी आवर्जून लक्षात ठेवावीत अशीही गोडी लागली नाही ..

हिंदी संगीताच्या बाबतीत " फिअर ऑफ मिसिंग आउट / फोमो " म्हणतात तो मला बरीच वर्षं आहे . हे काहीतरी अतिशय दर्जेदार किंवा खूप छान काहीतरी आहे पण आपल्याला याचा आस्वाद घेता येणार नाही अशी एक पुसटशी भीती होती .

तसं पाहिलं तर युट्यूब 24 तास उपलब्ध आहे . गाणी ऐकायला कोणाचीही आडकाठी नाही . कुठल्याही क्षणी हवं ते गाणं ऐकायची सोय आहे .

पण वाचनाची भरपूर आवड आहे , समोर लायब्ररी सताड उघडी आहे पण पुस्तकं सगळी न समजणाऱ्या भाषेतली तशी अवस्था होती . ब्लॅक अँड व्हाइट च्या जमान्यातलं गाणं 2 मिनिटं ऐकायचाही पेशन्स नव्हता , कंटाळून बंद केलं जाई ... खजिन्याने भरलेली गुहा आहे पण आपल्याला आत जाता येत नाही असं वाटतं .

ह्याला करंटेपणा किंवा दैव देतं नि कर्म नेतं हेच शब्द लागू पडतील .

आता तिशी आली जवळजवळ तरी मला एखादं गाणं लागल्यावर गायक मुकेश आहे की रफी की किशोर कि आणखी कुणी काहीही सांगता येणार नाही इतके त्यांचे आवाज अनोळखी आहेत .

सुदैवाने मराठी गाण्यांची मात्र थोडीफार का होईना गोडी लागली ..

कदाचित नुसतं गाणं ऐकून संदर्भ लागत नसेल , कधीतरी वेळ काढून आपण जुने हिंदी पिक्चर बघू मग ती गाणी आवडू लागतील असं मनाशी म्हणत असे .. तो कधीतरी बहुतेक कधीच उजाडणार नव्हता . जिथे 2 मिनिटं गाणं ऐकायचा पेशन्स नाही तिथे ते स्लो स्टोरी असलेले चित्रपट बघणार ह्याची शक्यता कमीच आहे ... ह्यातही काही सुरेख चित्रपट मिस होत असतील यात शंका नाही .

तशी जुनी गाणी अजिबात ऐकली नव्हती असं नाही , त्यातली काही आवडली सुद्धा होती .. एक हजारों में मेरी बहना है , आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे , मै शायर तो नहीं , दर्द ए दिल ( कर्झ मधलं ) .. एकूण संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढीच होती .

पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आपल्याला ह्या खजिन्याच्या गुहेत शिरकाव करायचा आहे ही इच्छा होतीच .. तो प्रवेश होत नाहीये याचीही चुटपूट चुटपूट होती .

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर कुणाच्यातरी एका पोस्टमध्ये कवी शैलेंद्र यांचा फोटो पाहिला .. तो आवडला म्हणून गुगल सर्च करून पाहिलं तर एकूणच चेहरा आवडला .. 2 - 3 दिवसात स्तुतीचे अनेक लेख , कमेंट्स वाचल्या .. त्यांच्या मुलांचे वडलांच्या आठवणी सांगणारे व्हिडीओ पाहिले .... 1 - 2 गाण्यात त्यांनी अभिनय केला आहे ती गाणी पाहिली .. थोडक्यात साहेब क्रश झाले आहेत ... याचा उपयोग करून घेऊन आपल्याला हव्या त्या संगीत रत्नांच्या गुहेत प्रवेश करून घ्यायचा असं ठरवलं ... शैलेंद्र यांनी 800 गाणी लिहिली आहेत ... कदाचित त्यातली सगळी ऐकायला जमणार नाहीत पण सुरुवात तर केली आहे ... 20 - 25 त्यांची ऐकली आणि बाकी वेगळ्या गीतकारांचीही काही ऐकली ..

जुनं संगीत ऐकायचा पेशन्स डेव्हलप होतो आहे ... पण मुंगीच्या पावलाने . गाणं अर्ध्यावर आल्यावर बंद करून टाकावंसं वाटतं . पण शैलेंद्रचं आहे, पूर्ण ऐकायचंच असा नेट लावल्यावर पूर्ण ऐकते .. एकदा ऐकून पूर्ण झाल्यावर पुन्हा ऐकावसं वाटतं .. मग कितीही वेळा ऐकायलाही कंटाळा येत नाही ...

सगळ्याच ब्लॅक अँड व्हाइट गाण्यांच्या बाबतीत असंच होतं आहे .. पहिल्यांदा ऐकताना बोअर होतं . नंतर ती ट्यून मनात येऊ लागते थोड्या वेळाने आणि पुन्हा ऐकावसं वाटतं ... तरी नवीन गाणी ट्राय करण्याबाबत एक इनर्शिया आहेच .. तेव्हा शैलेंद्रांचं बोट घट्ट धरून ठेवलं आहे , एक एक गाणं चिकाटीने ऐकत आहे आणि आवडतही आहेत .. एकूण हिंदी संगीताची गोडी लागेल की नाही माहीत नाही पण ठीक आहे , निदान प्रवेश तरी झाला आहे , सगळा खजिना घेण्याएवढी झोळी मजबूत नसेल , मूठभर रत्नं मिळाली तरी काही हरकत नाही ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की ऐका तुम्हाला स्पॉटिफाय वर लता, मुकेश किशोर रफी आर्टिस्ट सर्च मारला तरी अनेक रत्ने सापडतील. आम्ही त्या समुद्रातच विहरत जगतो.
व जु न्या गाण्यांशी अनेक असोशिएशन्स आहेत. आठवणी आहेत. अ रिच लाइफ वी लिव्ह बिकॉज ऑफ द डिव्हाइन फिल्मी म्युझिक ऑफ योर.

छान लेख! हिंदी गाण्यांच्या बाबतीत नाही पण मी असाच प्रयत्न वेस्टर्न क्लासिकल म्युझिकची गोडी लागण्यासाठी करतो आहे.

गाणी बॅकग्राऊंड ला लाऊन कामं करत रहा मग राहिल पेशन्स..
मला हल्ली डान्स व्हिडीओ बघताना पेशन्स नसतो..पहिल्या ५ सेकंदात बोर झाले तर बदलते.

मला जुनी गाणी आवडतात ती नोस्टल्जीयामुळे असे वाटत होते पण नवी पिढी ज्यांना नोस्टल्जीया नाही ते सुद्धा ही गाणी ऐकण्यासाठी धडपडतात हे वाचुन बरे वाटले.

या जुन्या गाण्यांमध्ये काय जादु आहे माहित नाही पण गेली ५० वर्षे मी तीच ती गाणी ऐकतेय आणि अजुन कंटाळा आला नाहीय. २००० च्या दशकानंतर आलेल्या गाण्यांत ही जादु नाही कारण मी प्रयत्न करुनही माझा रस टिकवु शकले नाहीय.

हल्लीच मला एक ऑनलाईन रेडिओ स्टेशन सापडले - shreepad radio stream. याच्यावर खुप जुनी मराठी व हिंदी गाणी वाजवतात, कसल्याही बडबडीशिवाय. तिथे दर दिवशी काहीतरी जुने नव्याने सापडते जे मी आजवर कधीच ऐकलेले नसते. मग ते यु ट्युबवर शोधायचे हा एक मस्त उद्योग मला लागलाय. कित्येक गाणी इतकी जुनी असतात की यु ट्युबवर फक्त ऑडिओच सापडतो.

नवी गाणी मला तितकीशी अपिल होत नाहीत पण तरीही काव्यात नवी गाणी जास्त उजवी आहेत हैमावैम. जुनी गाणी खुपच पर्सनल होती, कित्येक गाण्यांत हिरोईनच्या अंगा प्रत्यंगांचे रसभरीत वर्णन केलेले आढळते आणि अप्रत्यक्षरित्या शारिरीक जवळीकीची मागणी केलेली आढळते. हल्लीच्या गाण्यांत हा भाग खुपच कमी झालेला आहे. आजचे काव्य जास्त वैश्वीक झालेले आहे. पण त्याचवेळी संगिताचा व गायकीचा दर्जा ढासळलेला आहे. गाण्यांच्या बाबतीतली एकाच प्रकारची गाणी जास्त ऐकायला मिळतात. जुन्या काळातल्या चित्रपटात नायक/नायिकेचे एक स्वतंत्र आनंदी/उडते गाणे, एक आनंदी/नटखट युगलगीत, एक भक्तीगीत, एखादे दर्दभरे गीत असे वैविध्य असायचे. सहसा एक किंवा दोन गायक/गायिका एका चित्रपटातील सगळी गाणी गायचे त्यामुळे ही वेगवेगळ्या रेंजमधली गाणी एकाच आवाजात ऐकायला मिळायची. आता एकतर बहुतेक गाणी बॅकग्राऊंडला वाजतात, त्यामुळे अमुक नायकाचा अमुक आवाज ही संकल्पनाच मोडीत गेलीय. आणि चित्रपटही बदललेत, कथावस्तु बदलल्यात. त्यामुळे अमुक एक प्रकारचे गाणे हवे असे आता राहिले नाही. कोण गायक काय प्रकारची गाणी गाणार हेही लोकांना माहित असते. अमुक एक गाणे असेल तर कैलाश खेर, अमुक प्रकारचे श्रेया घोषाल वगैरे होते. एकाच आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकायला मिळत नाही. असो. माझी कसलीही तक्रार नाही, कालाय तस्मै नम: |

कदाचित नुसतं गाणं ऐकून संदर्भ लागत नसेल , कधीतरी वेळ काढून आपण जुने हिंदी पिक्चर बघू मग ती गाणी आवडू लागतील असं मनाशी म्हणत असे >>>>

जुने सगळेच चित्रपट आवडणार नाहीत कारण तेव्हाचे सामाजिक संदर्भ आज बदललेत. तेव्हा आवडलेले कित्येक चित्रपट मला आज कालबाह्य वाटतात. नायिकेच्या मागे गाणे गात लागलेले हिरो बघणे आज चुकीचे वाटते, शारिरिक जवळीकीची मागणी करणारी गाणी ऐकली की यांना दुसरे कामच नाही का असा विचार मनात येतो Happy अर्थात त्या काळात त्या ते काहीच खटकत नव्हते. हे सगळ्याच चित्रपटांबद्दल नाही पण तरीही.....

मी असाच प्रयत्न वेस्टर्न क्लासिकल म्युझिकची गोडी लागण्यासाठी करतो आहे.

मीही करतेय पण गाण्या/ वाजवण्यातील चमत्कारांचा आनंद घेण्यात मन काही काळ रमते आणि मग कंटाळा येतो. आपले क्लासिकल ऐकतानाही हीच गत.... Sad

मला सर्व जान्रा आव्डतात किंबहुना संगीत नाहीतर माझ्यात काहीतरी कमी आहे असे जाण व त राहते. एक सुखाचा क्षण म्हणजे सर्व कामे आटोपून.
रात्री युट्युब वर क्लासिकल हिंदुस्तानी किंवा नाट्य संगीत ऐकणे. जुनी फिल्मी गाणी नैतर झाकीर शिवकुमार रवि शंकर हरिप्रसा द ऐकणे.
राहुल शर्माचा श्री राग पण अफलातुन आहे. व शिवकुमार, झाकीरचा मिश्र शिवरंजनी. कधी नट क्रॅकर बॅले, कधी चायकोव्सकी , कधी कॉफी हाउस जाझ ऐकते.

धन्यवाद सर्वांना . गेल्या 10 - 15 वर्षातलीही काही हिंदी गाणी ऐकलेली नाहीत .. शे दोनशे मराठी गाणीच आलटून पालटून रिपीट वर ऐकते आहे .. सरडा कुंपण ही उपमा देत नाही कारण माझी मराठी अमृतातेही पैजा जिंके वगैरे .. तिचा अपमान होईल . पण एका मर्यादित आखून घेतलेल्या वर्तुळाबाहेरचं संगीत फारसं ऐकलं गेलं नाही हे खरं आहे . नवीन हिंदी मोजकी आहेत प्ले लिस्टमध्ये , अगदीच नाही असं नाही .. वेस्टर्न सध्यातरी तर फार लांबची गोष्ट आहे ... बघू योग असला तर हिंदीला मिळालं तसं काहीतरी निमित्त निर्माण होऊन ऐकायला चालना मिळेल .. इच्छा आहे ऐकण्याची .

मध्यंतरी BTS ची चार पाच गाणी एकामागून एक ऐकली .. वाटलं हा अट्टाहास कशासाठी , हे काही आपल्या जीवाला फुलवणारं संगीत नाही , सगळं आवडल समजल पाहिजे हा आग्रह कशाला ..

पण क्लासिक वेस्टर्न बद्दल कुठे कुठे वाचनात , मालिकांमधून ऐकण्यात आलं आहे तेव्हा कधीतरी ऐकायची इच्छा आहे ..

इंग्रजी वाचनाचं घोडं अजून पेंड खातं आहे ... कष्टाने 15 - 20 वाचली 3 - 4 वर्षात ... पण हे जोरजबरदस्तीचं वाचन काही खरं नव्हे .... सहज विनासायास वाचन घडायला हवं ते घडत नाहीये .. मराठी मी 200 पानांचं पुस्तक आवडलं तर तासाभरात संपवते आणि इंग्रजीला 15 दिवस महिना हे काही खरं वाचन नाही ..

बहुधा मेंटल ब्लॉक जास्त आहे , ही भाषा आपल्याला जड आहे असा समज सबकॉन्शन्स माइंडने स्वीकारला असल्यामुळे जड जातं आहे ... लेख आर्टिकल सहज वाचून होतात , पुस्तकांच्या ( मी वाचण्यासाठी निवडलेल्या ) बाबतीतच पुढे जाता येत नाहीये . पण रुटूखुटू का होईना प्रयत्न चालू आहेत , पूर्ण गिव अप केलेलं नाहीये .. कधीतरी हा मेंटल ब्लॉक विरघळेल आणि वाचन सोपं होईलही ....