ती जोडते... बंध प्रेमाचे

Submitted by प्रथमेश काटे on 19 October, 2023 - 14:23

ती जोडते..
#बंध प्रेमाचे

ट्रेन फलटावर आली प्राची दिनेशला म्हणाली -

" चल, येते. काळजी घे."

" हो. तूही काळजी घे स्वतःची." तिला मिठीत घेत दिनेश म्हणाला. त्याचा चेहरा उतरला होता.

प्राचीने बॅग उचलली, आणि वळून ती निघाली. ट्रेनमध्ये चढल्यावर तिने दिनेशकडे बघून हात केला. दिनेशनेही चोरट्या नजरेने आजूबाजूला बघून तिला Flying kiss दिला. तशी प्राचीनं लाजून नाजूकसं स्मित करीत मान डोलावली. ट्रेन निघाली. एक दीर्घ नि:श्वास सोडून संथ पावलं टाकत दिनेश परत निघाला.

•••••

दारावरची बेल वाजली. तसा हॉलमधल्या सोफ्यावर सुस्तावून पसरलेला दिनेश जरासा नाराजीनेच उठला. प्राचीला सोडून थोड्याच वेळापूर्वी तो घरी आला होता. त्याने दरवाजा उघडला. बाहेर समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या जोशी काकू हसऱ्या चेहऱ्याने उभ्या होत्या. हातात एक डबा.

" अरे काकू. या ना आत." दिनेश स्मित हास्य करून म्हणाला.

" नाही आता नको. घरात कामं पडलीयेत खूप. मी हा डबा द्यायला आले होते."

" डबा ? कसला ? "

" अरे कसला काय ? प्राची आज माहेरी गेली आहे ना‌. म्हणून तुझ्यासाठी जेवणं आणलं आहे. आणि रात्री जेवायला घरीच ये. हे, आणि सुरेश‌ ( काकूंचा मुलगा ) ही असतील तेव्हा. मग छान गप्पांची मैफिल जमवू."

" ही प्राची पण नं. मी केलं असतं की काहीतरी मॅनेज. तुम्हाला कशाला त्रास द्यायचा ? "

" अरे नाही रे. तिने नव्हतं सांगीतलं तसं. फक्त ती माहेरी जाणार असल्याचं म्हणाली होती ती. तेव्हाच मी ठरवलं, की तू घरी एकटा राहशील. तेव्हा तुझ्या जेवण्या खाण्याची व्यवस्था आमच्याकडे. " आणि मग खोट्या खोट्या रागाने " आणि त्रास कसला रे त्यात ? प्राची आम्हाला मुलीसारखीच आहे. तीही किती करते आमच्यासाठी. तिने कधी काही गोडाधोडाचं केलं की आम्हाला अगदी दरवेळी न चुकता आणून देतेच की. सुरेश घरी नसताना मला किंवा यांना काही दुखलं खुपलं की आमची मनापासून सुश्रूषा करते. आमची काळजी घेते. ती मुलीची सगळी कर्तव्य बजावते, मग मी आईचं कर्तव्य नको का पार पाडायला ? तुम्ही जेव्हा असे घरी एकटे असाल, तेव्हा आम्ही तुमची काळजी नको का घ्यायला जावईबापू ? "

" जावईबापू ? " दिनेश हसत आश्चर्याने उद्गारला.

" हो मग. प्राची आमची मुलगी, म्हणजे तू आमचा जावईच झालास ना ? "

यावर दोघेही खळाळून हसले. त्याच्या गालावर मायेने थोपटून त्या परत गेल्या. दरवाजा लोटून परत फिरताना दिनेश स्वतःशीच विचार करीत होता -

' ही जोशी फॅमिली नऊ - दहा महिन्यांपूर्वीच इथे राहायला आली ; पण इतक्या थोड्या काळात त्यांच्याशी किती निकटचे संबंध निर्माण झाले. प्राचीने ते निर्माण केले. फारच थोड्या काळात तिने त्या घरातील सगळ्यांना आपल्या प्रेमळ, लाघवी स्वभावाने आपलंसं करून घेतलं. खरंच या स्त्रिया ग्रेट असतात. सासरचे म्हणा, शेजारीपाजारी म्हणा. हे तसे सुरूवातीला परकेच असतात ना ; पण स्त्री प्रेमाने, आपुलकीने हा परकेपणा संपुष्टात आणते. सगळ्यांशी त्यांच्या गुणदोषांसहित जुळवून घेते. सगळ्यांना बांधून टाकते प्रेमाच्या पाशात. प्रेमाच्या बंधनात. असेच प्रेमाचे बंध प्राचीने जोडले जोशी कुटुंबाशी. आपला मात्र जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र सोडता इतरांमध्ये जास्त मिसळण्याचा स्वभाव नाही. या जोशी कुटुंबियांशीही फारसा संबंध येत नाही. फार काही बोलणं चालणं होत नाही ; पण प्राची त्यांना जे प्रेम, जी आपुलकी देत आलीये, तेच प्रेम व आपुलकी परतून तिच्यासोबत आपल्यालाही मिळते आहे.

सहज दिनेशची नजर देव्हाऱ्यातील देवीच्या तेजःपुंज, प्रसन्न मूर्तीकडे गेली. अन् पुन्हा तो मनाशी उद्गारला -

" खरंच स्त्रिया ग्रेट असतात."

समाप्त
@ प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे.
प्रतिसाद कमी आहेत कारण कदाचित हा एखाद्या कथेतील कादंबरीतील उतारा वाटत असावा. वाचकांना ठोस कथाबीजं लागत असावे.
माझे जरा वेगळे आहे. मी कथेची लांबी बघून ठरवतो वाचायचे की नाही ते. क्रमशः असेल तर शक्यतो वाचतच नाही. छोटे सुटसुटीत असले तर वाचतो. भले मग कथा म्हणून काही अधुरे वाटले तरी पुढची मागची कथा माझ्या विचारात फुलते... आताही वाचताना काही जोशी काकू आणि प्राची डोळ्यासमोर आल्या...

शेजारच्या काकूंच्या “ लटक्या रागाने”, “ त्याच्या गालावर मायेने थोपटून” वगैरे गोष्टी बॉर्डरलाईन (?) क्रिपी आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर बायकोला मिठीत घेणार्या नवर्याला तिला फ्लाईंग किस देताना ‘चोरट्या नजरेने आजुबाजूला बघण्याची‘ का गरज पडली असावी?

@फेरफटका - मिठीत घेणं आणि फ्लाईंग किस यात किंचितसा फरक आहे. मिठी मारणं Casual असू शकतं. ' बॉर्डरलाईन क्रिपी ' म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, हे समजलं नाही. ' लटका राग ' हा शब्दप्रयोग सामान्यतः प्रेयसी किंवा बायकोच्या बाबतीत गृहीत वापरला जातो. मी चुकीच्या जागी उपयोग केला. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. Bw

खरंतर उत्तम कच्चा माल आहे हा. पण नको. ह्या लेखकांना सहन होत नाही.

मला वाटतं लेखक महोदय तारक मेहताचे फॅन, आणि मधुरा, मेनका, गृहशोभिका चे सभासद असावेत

कच्चा माल उचला आणि फॅक्टरी मध्ये पाठवा म्हणजे जरा नवीन काहीतरी मिळेल वाचकांना. फक्त विडंबन असे असू दे की सर्वाना उत्स्फूर्त दाद द्यायला भाग पाडेल.

खरंतर उत्तम कच्चा माल आहे हा. पण नको. ह्या
लेखकांना सहन होत नाही. >> वा, काय पण हुशारी !! जर लेखकाला सहन होत नाही हे ठाऊकच आहे, तर या कथेचंही विडंबन करायला आवडलं असतं बुवा असा खडा टाकून मोकळे झालात.

मला वाटतं लेखक महोदय तारक मेहताचे फॅन, आणि
मधुरा, मेनका, गृहशोभिका चे सभासद असावेत >> मी तारक मेहता... या मालिकेचा फॅन असावा हा तुमचा पहिला तर्क अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच मला ठिकठाक लेखन करता येतं. निदान ज्याला लेखन म्हणता येईल असं काहीतरी लिहायला जमतं. मी तर म्हणेन तुम्हीही या मालिकेचे जुने भाग पाहत जा, म्हणजे तुम्हालाही काहीतरी लोकोपयोगी, प्रेरणादायी असं काहीतरी चांगलं सुचेल. नाही. तुमच्या विडंबनपर लेखनाविषयी काही म्हणणं नाही. तोदेखील लेखनाचा एक प्रकार आहे ; पण असं जाणूनबुजून एखाद्या विशिष्ट लेखकाचं साहित्य वाचून मग लेखकाला डिवचण्यासाठी ( तेही विनाकारण. अक्षरशः काहीही संबंध नसताना ) त्यावर वायफळ कमेंट्स करणं हे काही योग्य लेखन नव्हे.
दुसरा तर्क मात्र चुकीचा. मी अशी स्त्रीयांसाठीची मासिकं मुळीच वाचत नाही. खरंतर गृहशोभिका व्यतिरिक्त इतर नावेही मला ठाऊक नव्हती. ती आपल्याकडून समजली. आपण वाचता वाटतं. तरीच... असो. Lol

•••••••

कच्चा माल उचला आणि फॅक्टरी मध्ये पाठवा म्हणजे
जरा नवीन काहीतरी मिळेल वाचकांना. >> हो ना. नाहीतर, एक माझ्यासारखे लेखक आहेत जे तेच ते प्रेरणादायी वैगेरे आऊट डेटेड कथा/लेख लिहितात. आणि दुसरे तुमच्यासारखे. ज्यांना एवढं ही लिहायला सुचत नाही, म्हणून लेखकही बनू शकत नाहीत. आणि जे माझ्यासारखे थोडंफार काहीतरी लिहायला पाहतात त्यांच्याशीही काहीतरी खुसपट काढून वाद सुरू करतात, आणि आपल्या खवचटपणाने त्यांना मनसोक्त छळतात. त्यामुळे एक सुजाण वाचकही बनू शकत नाहीत.

च्या तेजःपुंज, प्रसन्न मूर्तीकडे गेली. अन् पुन्हा तो मनाशी उद्गारला -

" खरंच स्त्रिया ग्रेट असतात."

समाप्त
@ प्रथमेश काटे>>>

स्वताला लेखक समजतो आणि @ की © वापरायचं एवढी पण अक्कल नाही Lol

हे बघ आता तू मर्यादा ओलांडत आहेस. माझी अक्कल काढायचा तुला काही एक अधिकार नाही. उगाच नडायला जाऊ नको.

कथा ठीक आहे पण खरंच उतारा वाटतोय.. सुरूवाती ला मोघम प्राची चे काही संवाद शेजार्‍यांचा उल्लेख, त्याच्या विषयी वाटणारी काळजी वगैरे काहीच व्यक्त झालेले नाहिये.
संवादांतून गोष्ट खुलवायचं कसब शिकण्याची गरज आहे, तर लघु कथा पण मन वेधून घेते.
पुढील लेखनास शुभेच्छा!

@aashu29 - होय अजून खरंच लेखनात खूपशा सुधारणा करण्याची गरज आहे. शिकत आहे हळूहळू. धन्यवाद Bw

इंटरटेन मेंट आहे हा तर >>> एंटरटेनमेंट ला इंटर टेन्मेंट बोलतो एवढीही अक्कल नाही आणि अनोळखी लोकांचा ' हा ' वैगेरे शब्द वापरून एकेरी उल्लेख करतो म्हणजे मॅनर्स ही नाहीत. Proud Proud