देखणं चेन्नई सेंट्रल

Submitted by पराग१२२६३ on 13 October, 2023 - 05:07

पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते. अशातीलच एक, वसाहतकाळात चेन्नईमध्ये उभारण्यात आलेली अतिशय देखणी वास्तू म्हणजे चेन्नईतील मुख्य रेल्वेस्थानकाची म्हणजे चेन्नई सेंट्रलची इमारत. आज या स्थानकाचं अधिकृत नाव पुरट्चि तलैवर डॉ. एम. जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल असं आहे. आज हे स्थानक चेन्नई शहराला देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडते. या स्थानकात आता 17 फलाट असून त्यातील 5 उपनगरीय गाड्यांसाठीचे आहेत. या स्थानकातून आज 100 पेक्षा जास्त मेल/एक्सप्रेस तसंच उपनगरीय गाड्यांची इथे ये-जा असते. त्यामध्ये काही ऐतिहासिक, तर काही अत्याधुनिक रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे. त्यातून सुमारे 6,50,000 प्रवासी दररोज प्रवास करत आहेत.

दक्षिण भारतातील पहिला लोहमार्ग 1 जुलै 1856 ला मद्रास आणि वालाजाह रोड (अर्कोट) या दरम्यान सुरू झाला. 63 मैल लांबीचा तो लोहमार्ग मद्रास रेल्वे कंपनीनं वाहतुकीसाठी खुला केला होता. ती पहिली रेल्वेगाडी रोयापुरम रेल्वेस्थानकावरून सुटली होती. त्यावेळी चेन्नई सेंट्रल स्थानक अस्तित्वात नव्हते. रोयापुरम स्थानकावरचा वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन चेन्नई सेंट्रल उभारलं गेलं 1873 मध्ये. त्याचवेळी उभारली गेलेली इमारत आता 150 वर्षांची होऊन गेलेली असली तरी आजही आपलं लक्ष वेधून घेते. या आकर्षक इमारतीचं आरेखन जॉर्ज हार्डिंग या ब्रिटीश वास्तुतज्ज्ञानं केलेलं आहे. ही इमारत आज चेन्नई शहराची सर्वात महत्वाची ओळख बनली आहे.

मद्रास सेंट्रल स्थानकाला दक्षिण भारतातील महत्त्वाच्या स्थानकाचा दर्जा मिळाल्यामुळे पुढील काळात या स्थानकातून नवनव्या रेल्वेगाड्या सुरू होऊ लागल्या आणि प्रवाशांची संख्याही वाढत निघाली. परिणामी या स्थानकात आवश्यक सुधारणा आणि स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय मद्रास रेल्वे कंपनीनं घेतला. त्यानुसार 1900 मध्ये या स्थानकाचं नुतनीकरण पूर्ण झालं आणि रोयापुरम स्थानकावरच्या लांब पल्ल्याच्या गाड्याही चेन्नई सेंट्रलकडे स्थानांतरित करण्यात आल्या.

लाल-पांढऱ्या रंगातील चेन्नई सेंट्रलच्या दुमजली टुमदार इमारतीला मध्यभागी मुख्य मनोरा, तर इमारतीच्या चारही कोपऱ्यावर छोटे मनोरे आहेत. मुख्य मनोऱ्यावर चारही दिशांना लावलेल्या घड्याळ्यांच्या टोल्यांचा ठराविक वेळानंतर परिसरात घुमणारा आवाज येणाऱ्या-जाणाऱ्यांचं लक्ष त्या घड्याळांकडे वेधतो. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर विविध कक्ष आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात या कक्षांचा वापर प्रामुख्याने रेल्वेने चेन्नईला आलेल्या आणि इथून पुढच्या प्रवासाला जाणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह म्हणून होत असे. म्हणूनच या इमारतीतील जिन्यांची रचनाही प्रशस्त केलेली आहे.

चेन्नई सेंट्रल स्थानकात सुरुवातीला 6 फलाट उभारले गेले होते. त्यांच्यावर उन-पावसापासून प्रवाशांचं संरक्षण करण्यासाठी शेड उभारण्यात आलेल्या आहेत. या जुन्या पद्धतीच्या शेड्स आजही तिथं पाहायला मिळतात. पूर्वी रेल्वेगाड्या 7 डब्यांच्या असल्यामुळं सगळे डबे या शेड्सखाली मावत होते. पण आता या स्थानकातील अनेक फलाट 26 डब्यांच्या गाड्या उभ्याराहू शकतील इतके मोठे बनवण्यात आले आहेत. त्यामुळं जुन्या शेड्सच्या पुढे नव्या शेड्स घालावे लागले.

चेन्नई सेंट्रलहून आज भारतातील सर्व प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. इथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये राजधानी, शताब्दी, दुरोंतो, जनशताब्दी, उदय, हमसफर आणि वंदे भारत अशा प्रतिष्ठीत अतायधुनिक गाड्यांचा समावेश आहे. त्याचवेळी ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, चेन्नई-हावडा मेल, बेंगलोर मेल, मुंबई मेल यासारख्या ऐतिहासिक रेल्वेगाड्याही या स्थानकातून सुटतात. ग्रँड ट्रंक एक्सप्रेस तर भारतातील पहिली एक्सप्रेस आणि सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी ठरली होती. ती सुरुवातीला मेंगळुरू ते पेशावरदरम्यान धावत होती. ऐतिहासिक चेन्नई सेंट्रलच्या इमारतीत आज प्रवाशांसाठी फास्टफूड आणि इंटरनेट सेंटर्स, शॉपिंग मॉल, संगणकीकृत तिकीट यंत्रणा यासारख्या अनेक सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2023/10/blog-post_13.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लांबलचक नाव देऊन अस्मिता जपणे सुरू आहे. मुंबई चैन्नई गाडीचे नाव ऐकताना दमायला होते. स्टेशन्स चांगली करा पण नाव सुटसुटीत ठेवा. नेत्यांच्या घरचे लोक त्यांना कसे बोलवत असतील? छोट्याशा नावानेच ना? अप्पा,अण्णा,दादाजी वगैरे?

ब्लॉगवरचा फोटो पाहिला. छान आहे स्टेशन. लेख माहितीवजा झाला आहे. तुमच्या इतर लेखांत थोडातरी पर्सनल टच येतो, तो यात दिसला नाही.

मुंबईतल्या स्टेशन्सकडे असं लांबून त्यांच स्थापत्यसौंदर्य टिपण्यासाठी कधी पाहिलं नाही. तरीही वांद्रे स्टेशनची आठवण झाली.

शीर्षक वाचून मुंबई सेंट्रल आठवलं. दादर आणि वांद्रे टर्मिनसमुळे त्याचं महत्त्व कमी झालं आहे. शिवाय लोकल गाड्यांसाठीही ते शेवटचं स्टेशन नाही. त्यामुळे छशिमट सारखं ग्लॅमर त्याला नाही.

छान लेख.
मला भायखळा आठवलं. ते पण असंच छान आहे.

शीर्षक वाचून मुंबई सेंट्रल आठवलं ,,>>>> मलाही

छान आहे फोटो.. भायखळा आठवावे असे आहे खरे.. चौथी ते दहावी भायखळा ते दादर प्रवास केला आहे. वेगळेपण जाणवत नेहमी अश्या ब्रिटीशकालीन वास्तूमध्ये..

छान लेख !

हे स्थानक आणि चैन्नैतील ब्रिटिशकालीन इमारती खरेच फार सुंदर आहेत आणि राखल्यापण चांगल्या आहेत. मद्रास हायकोर्ट, PWD, फ़ोर्ट सेंट जॉर्ज, रिपॉन, राजाजी हॉल, पचाइअप्पा हॉल, सेंट मारीज् चर्च… एकापेक्षा एक सरस.

फोटो मात्र नाही दिसले.

मी चेन्नईला गेलेलो असताना हे स्थानक प्रत्यक्ष पाहायला मिळालं. जाताना-येतानाच्या गाड्या इथूनच सुटल्या होत्या. परतीला पकडलेली चेन्नई-मुंबई मेल ही ऐतिहासिक गाडी त्यावेळी चेन्नई सेंट्रलहून सुटत होती.

हा लेख वाचून आठवण झाली की २००९ साली भारतीय पोस्ट विभागाने Heritage Railway Stations of India अशा नावाने ४ पोस्टाची तिकिटे विक्रीस आणली होती.
माझ्या संग्रहातील 'मिनिएचर शीट'चा फोटो:

miniature-sheet.png

डावीकडून अनुक्रमे: कोलकाता, चेन्नई, मुंबई, दिल्ली

एवढी मोठी स्टेशने एकीकडे अन् गावकुस स्टेशने एकीकडे. मला तर स्टेशन म्हणले का आमचे वाठार स्टेशनच आठवते.

वाठार अजय देवगण ह्याच्या लेजंड ऑफ भगतसिंग सिनेमात लाहोर स्टेशन म्हणून वापरले होते म्हणतात.

Saunders वधानंतर भगसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद लाहोर मधून पलायन करतात तो सीन.

रेल्वे ह्या विषयावर मिड डे चे transport beat वाले पत्रकार राजेंद्र अकलेकर ह्यांचा व्यांसग अन् लिखाण जबऱ्या आहे एकदम.

ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे असे एक पुस्तक आहे त्यात काही काही सुरस घटना आहेत नमूद.

उदाहरणार्थ :-

१८xx मध्ये बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या हमालांच्या पैकी एका वर भांडुप जवळ एका पट्टेरी वाघाने हल्ला केला होता, जबर जखमी होऊन तो हमाल जिवंत वाचला आणि त्यानंतर तो वाघ मारण्यासाठी बक्षीस जाहीर करणेत आले.

एका Anglo Indian का मुसलमान शिकाऱ्याने माहीम स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्म जवळ त्या वाघाला गोळी घालून ठार केले होते (म्हणे).