भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग १० : बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)

Submitted by मनिम्याऊ on 12 August, 2023 - 08:03

भाग १ : पूर्वतयारी
भाग २ : ‘सफर’नामा
भाग ३ : नमन बस्तर
भाग ४ : कांगेर राष्ट्रीय उद्यान
भाग ५ : तीरथगढ जलप्रपात
भाग ६ : सा रम्या नगरी...
भाग ७ : ढोलकल, दंतेवाडा
भाग ८: चौक - चौराहों का शहर - जगदलपूर
भाग ९ : शुभ्र काही देखणे...

शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते. आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
पुढे…
भल्या पहाटे रायपूरच्या बस स्टॅन्डवर गाडी पोचली. कोणताही प्रवास असो, मला शक्यतो वाहनात झोप लागत नाही त्यामुळे घरी जाऊन छोटीशी झोप काढली. उठून ताजेतवाने होते तो मावशीच्या हातचा गरमागरम नाश्ता समोर हजर. त्यावर ताव मारत आजच्या दिवसाचे प्लॅनिंग सुरु होते. सिरपूरला जैन मंदिरांच्या पुरातात्विक स्थळाला भेट द्यायची होती पण ते ठिकाण काही कारणामुळे तात्पुरते बंद आहे असे समजले. मग मावशी म्हणाली कि चला आपण 'पुरखौती मुक्तांगणा'ला भेट देऊया.
gate.jpg
रायपूर पासून २० किमी अंतरावर मोकळ्या प्रांगणात वसलेले हे ‘बस्तर आर्ट’ चे मोठे केंद्र आहे. ज्यामध्ये छत्त्तीसगडमधील समृद्ध आदिवासी संस्कृती, लोककला, ग्रामजीवन, प्रमुख पर्यटन स्थळे इत्यादी प्रदर्शित करण्यात आले आहे.
BA3.jpg
२०० एकर जागेवर पसरलेल्या या मुक्तांगणात प्रामुख्याने बस्तर आर्ट या कलाप्रकाराला विशेष महत्व असून यात भांडी, हस्तकला, शिल्पकला इत्यादी बघावयास मिळतात.
बस्तरच्या आदिवासी समुदायात पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंतु प्रसिद्धीच्या अभावी ती स्थानिक हाट आणि बाजारांपुरती मर्यादित असलेली हि कला आता जगभरात ‘बस्तर आर्ट’ या नावाने ओळखली जाते. आधुनिक यंत्रांचा वापर न करता पारंपरिक साधनांनी केलेल्या लाकूडकाम, बांबूकाम, मातीकाम (टेराकोटा) आणि धातूकला यांचा समावेश होतो. यातही बस्तर संस्कृती, सण, देवी-देवतांच्या मूर्ती व प्राणी बनवण्यासाठी लाकडी कलाकृती; घराच्या सजावटीसाठी बांबूच्या चादरी, खुर्च्या, दिवाणखाना, टेबल, टोपल्या, चटई, इ वस्तू; टेराकोटाच्या देवांच्या मूर्ती, सजावटीची भांडी, फुलदाणी, भांडी आणि घरगुती सामान बनवले जाते. मेटल आर्ट्समध्ये तांबे आणि कथील मिश्रित धातूच्या कलाकृती बनविल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीच्या शोभेच्या मूर्ती आणि गृहसजावटीचे सामान तयार केली जाते.
BASTAR ART.jpg
मुक्तांगणात या सगळ्यांचे प्रदर्शन मांडले आहे. स्थानिक आदिवासी घरांच्या प्रतिकृती, व्यवसायानुरूप घरांच्या वेगवेगळ्या रचना, प्रसिद्ध स्थानांच्या मूळ आकारातील प्रतिकृती बघायला मिळतात.
muktangan.jpg
इथले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घोटुल. घोटुल इथल्या आदिवासींच्या परंपरेचा भाग आहे. घोटुल म्हणजे एकप्रकारचे यूथ होस्टेल. अविवाहित मुले मुली गावाबाहेरच्या एका मोठ्या घरात काही दिवस एकत्र राहून आपापल्या जीवनासाथीची निवड करतात. हे घोटुलची पूर्ण व्यवस्था मुले मुली मिळूनच बघतात. स्वयंपाकापासून तर रंगरंगोटी, डागडुजी व इतर सर्व कामे. सायंकाळी त्या समाजाशी संबंधित नृत्य-संगीत, कला आणि कथाही घोटुलमध्ये सांगितल्या जातात. इथे विवाहितांना प्रवेश नाही.
muktangan2.jpg
मुक्तांगणात बराच वेळ घालवून परत आलो. दुपारी ज्योती मावशीकडे चहाचे आमंत्रण होते.

सायंकाळी रायपूर पासून १७ किमी अंतरावर असलेल्या 'चंदखुरी' येथील कौसल्या मंदिराला भेट द्यायचे ठरले. रामायणातील दक्षिण कोसल म्हणजे आजचे बस्तर. राणी कौसल्येचे माहेर.
temple.jpg
मूळचे 'चंद्रपुरी' असे नाव असलेले हे गाव कोसला जनपदाची राजधानी होती. कौशलचा राजा भानुमंताची कन्या कौशल्या हिचा विवाह अयोध्येचा राजा दशरथ याच्याशी झाला होता.राजा भानुमंतने कौसल्येला लग्नात दहा हजार गावे भेट म्हणून दिली होती. त्यात तिचे जन्मस्थान चंद्रपुरीचाही समावेश होता. मंदिरात माता कौशल्याची व बालरूपातील श्रीरामाची मूर्ती स्थापन केलेली आहे.
ram.jpg
प्रभू राम वनवासातून आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तिघी चांदखुरी येथे येऊन राहिल्याची कथा या भागात प्रचलित आहे. इथल्या प्राचीन चंद्रसेन तलावाच्या मधोमध ७व्या शतकात हे श्रीराम आणि कौसल्येचे मंदिर निर्माण केले. गमतीची गोष्ट म्हणजे विस्मरणात गेलेल्या या मंदिराचा शोध एका म्हशीमुळे लागला. चंद्रसेन तलावाच्या मधोमध असलेल्या एका बेटावर हि म्हैस पोचली आणि परत येता येईना म्हणून तिची सुटका करण्यासाठी गावकरी तेथे गेले आणि त्यांना हे मंदिर भग्नावस्थेत सापडले. २०२१ साली मंदिरा मूळ आराखडा कायम ठेऊन परिसराचे नूतनीकरण व तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले.
1_1.jpg
जुन्या मूर्तीच्या बरोबरीने एक आधुनिक पद्धतीची अतिशय देखणी प्रतिमा पण येथे स्थापन केली आहे. देवासमोर हात जोडून उभे असता विजयलक्ष्मीने उत्स्फूर्तपणे गाण्याच्या क्लास मध्ये शिकलेले 'कौशल्या दशरथ के नंदन" हे भजन म्हणायला सुरवात केली. खड्या आवाजात तालासुरात भजन म्हणता असताना आजूबाजूला बराच श्रोतृवर्ग गोळा झाला. शेवटच्या 'राम सिया राम' या ओळींना तर सर्वानी एकसुरात साथ दिली. गाणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विजी अचानक सेलेब्रिटी बनली.
kousalya.jpg
या गावाचे आणखी एक प्रचलित नाव म्हणजे ‘वैध चांदखुरी’. एका कथेनुसार राम रावण युद्धात लक्ष्मणावर उपचार करणाऱ्या सुषेण वैद्यांचा इथे आश्रम होता. वाली पत्नी ताराचे वडील असलेल्या वानरश्रेष्ठ सुषेण वैद्यांचे दंडकारण्य हे मूळ निवासस्थान होते. राज्याभिषेकानंतर श्रीरामाने वैद्यराजांना आपल्या आजोळी चंद्रपूरीला येऊन राहण्याची विनंती केली व इथे आयुर्वेदिक प्रयोगशाळा व उपचारकेंद्र स्थापन करून दिले. वैद्यकशात्रावरील काही प्राचीन भूर्जपत्रे आजूबाजूंच्या गावात सापडली आहेत. इथेच सुषेण वैद्यांची समाधी आहे.
sushen.jpg

अतिशय रमणीय परिसरात वसलेल्या या मंदिराची भेट घेऊन रायपूर शहरात रात्रीचा फेरफटका मारला.
clock.jpg
मोतीबाग परिसरातील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये जाऊन चवदार भोजनाचा आस्वाद घेतला. ज्योती मावशीचा निरोप घेऊन घरी आलो. रात्री उशीर झाला तरी गप्पा काही संपेना. रंजू मावशी आणि माझी आई या दोघी मावस बहिणी. कितीतरी वर्षांनी निवांत भेट झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी निघताना मावशी म्हणाली "४० वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पण इतक्या वर्षांत माहेरचे कोणी पहिल्यांदाच असे निवांत येऊन राहिले आहे. खूप छान वाटलं".

पुन्हा एकदा 'वंदे भारत एक्सप्रेस' नी नागपूरला परतलो. घरी आलो तर विजयालक्ष्मीचा बाबा सरप्राईज भेट द्यायला हजर होता. दिवसभर विजयालक्ष्मीची बाबाच्या गळ्यात पडून ट्रिपच्या गमती सांगत उजळणी सुरु होती. आपण सर्वांनी जायचं परत एकदा रंजू आज्जीकडे जायचं असा निश्चय करून एक सुंदर ट्रिप ची सांगता झाली.

उपसंहार :
भारत का दिल देखो मालिकेतील बस्तर प्रदेशाची सफर आज संपली. खरंतर सुरवात करताना वाटले नव्हते कि मी १० भागांची मालिका लिहू शकेन. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व कौतुकाच्या शब्दांनी हे काम मी करू शकले. भारताच्या हृदयात डोकावून बघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

इथली भटकंती ठरवताना नाही म्हणलं तरी मनात थोडी भीती होतीच. अतिशय बदनाम असा हा प्रदेश.
कधी वाटायचं कि एखादे वहिवाटीचे, सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ निवडावे आणि करावी मस्त ट्रिप. आपण तिथे गेलो आणि काही झालं तर? त्यात तीन जेष्ठ महिला आणि एक लहान मूल बरोबर आहे. काही अघटित घडलं किंवा कोणती मेडिकल emergancy आली तर कसं? मग विचार केला कि “अघटित घडायचेच असेल तर ते कुठेही घडू शकेल मग आता का विचार बदला? जो होगा सो देखा जायेगा”.
"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको". अनंतफंदीं पहिल्याच फटक्यात सांगून गेले आहे. पण बिकट वाटच आवडली असेल तर? सतत जाऊन जाऊनच ती वहिवाटीची होईल ना...! आणि खरं सांगते या आडवाटा विलक्षण सुंदर ठरल्या. वाटेवर भेटलेल्या जागा सुंदर, इथली माणसे त्याहून सुंदर.
भटकंती करताना कुठेही धोका जाणवला नाही. सामान्य जनतेसाठी, पर्यटकांसाठी एकदम सुरक्षित जागा आहे ही. आपण काळजी मात्र घ्यायची. सरकारी वाहनाने शक्यतो प्रवास करू नये. आपण सरकारी नोकर असल्यास, मोठ्या हुद्द्यावर असल्यास ती ओळख सर्वांना सांगत बसू नये. आणि सरकारी धोरणाबद्दल कुठलीही चांगली वाईट चर्चा करू नये. संभाषणात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, भाजप, काँग्रेस असे विषय न येऊ देण्याची खबरदारी घ्यायची.

आधी ठरवल्याप्रमाणे बरीचशी ठिकाणे बघता आली. काही हुकली तर काही अनपेक्षितरित्या गवसली. खर्चाच्या दृष्टीने बघितलं तरी एकदम परवडणारी सहल झाली. रायपूर - जगदलपूर - रायपूर या एकंदरीत प्रवासखर्च (यात बसचं तिकीट, एका रात्रीचा हॉटेल स्टे, फिरण्याची गाडी, जेवण, छोटेमोठे पार्किंग फी वगैरे सगळं धरून) देखील दरडोई रुपये ७५५२ फक्त.
आमच्या भटकंतीचा नकाशा खाली देते आहे. कोणाला जायचं असल्यास कामी येईल. ट्रिपबद्दल काही विचारायच असल्यास तुमचे स्वागत आहे.
Bastar Map.jpg
जगदलपूर शहर
Jagadalpur Map.jpg
जगदलपूरला कसे जाल

जवळचे मोठे शहर :
रस्ता मार्गे
रायपूर अंतर ३०२ किमी. via NH ३०
विशाखापट्टणम : ३०० किमी via NH ३०/ NH ६३

रेल्वे मार्गे
रायपूर - विशाखापट्टणम रेल्वे मार्गाने जोडलेले आहे

हवाई मार्गे
विमानतळ : जगदलपूर विमानतळ
रायपूर - जगदलपूर विमानसेवा आहे.

हि लेखमाला प्रकाशित करू दिल्याबद्दल मायबोलीचे आभार. तसाच वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे हुरूप वाढला. या सुंदर प्रदेशाबद्दल सामान्यांच्या मनात असलेली भीती या लिखाणाने जरा फिकट झाली तर लेखनाचे सार्थक झाले असे समजेन.

'भारत का दिल' बहुत बडा है जी...

सफरीचे छोटेसे रील
https://youtube.com/shorts/bnKe3w2XZjg?feature=share

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाली लेखमाला.
उपसंहार आवडला. बस्तरला जायचं ठरवलं तर नक्कीच विचारेन तुम्हाला!

खूप छान लेखमाला मानिम्याऊ !

मध्य भारतातल्या या अनवट वाटा खूप भावल्या. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि भावनिक कंगोरे असणारी ही लेखमाला वाचताना प्रफुल्लित वाटले.

मस्त झाली लेखमाला . तुमच्यामुळे नवीन जागा कळल्या . उपसंहाराची कल्पना आवडली . जायचे ठरले तर जरूर संपर्क करीन.

संपूर्ण लेखमाला मनिम्याऊ ने अतिशय सुंदर रितीने सादर केली। कुठेही रेंगाळली नाही। इतिहासाचा बारकाईने केलेला अभ्यास, ओघवती भाषा, सुंदर फोटोग्राफी, योग्य दाखले आणि प्रवास कसा असावा याचे मार्गदर्शन। खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील वर्षांच्या सहलीं साठी। आता इथेच विराम देऊन पुन्हा एकदा सगळे भाग पुन्हा वाचण्यास सुरूवात करणार आहे। पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुझ्या माऊचे कौतुक।

बस्तरला जायचं ठरवलं तर नक्कीच विचारेन तुम्हाला!>>>
शक्य असल्यास नक्की जा.. खूप सुंदर area आहे.

थॅन्क्स वावे , कुमार सर, स्वांतसुखाय, अश्विनी११, झकास राव, मीना१८३

लेखमालेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे आभार.

लेखमाला छान.

रायपुरच्या मेन रोडच्या “झिटकू मिटकी” मधून बस्तर metal art आणि अन्य tribal art मी स्वत:साठी आणि मित्रांसाठी भेट म्हणून घेतलेय- art lover’s pleasure !

मस्त झाली आहे लेखमाला. २००४ मध्ये कोलकात्याला जाताना गाडीतून दिसलं तेवढंच रायपूर, बिलासपूर आणि एकूणच छत्तीसगड मी पाहिलं होतं. पण या लेखमालेमुळं सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद!

फार फार म्हणजे फारच उत्तम लेखमाला झालीये ही. अगदी तपशीलांत जाऊन लिहिली आहेस आणि अनवट जागा असल्याने वाचायची उत्सुकता कायम राहिली. तुझी शैलीही छान आहे. हा भाग लिस्टीत गेला आहे. गरज वाटली तर संपर्क करेनच.

तुझ्या हातून अशाच अनेक लेखमाला घडोत.

Thanks जयु, पराग आणि मामी. ..

गरज वाटली तर संपर्क करेनच.>>>> नक्कीच
तुझ्या हातून अशाच अनेक लेखमाला घडोत. >> प्रयत्न करेन . मध्य भारतातील बऱ्याच untouched jaga आहेत अजून डोक्यात. पचमढी जवळील नागद्वार, पाताळकोट, अनाहोनी बद्दल लिहिण्याचा विचार आहे.

खूप छान झाली लेखमाला
तपशीलवार लिहिल्याने माहितीत आणि ज्ञानात खूप भर पडली

फार फार म्हणजे फारच उत्तम लेखमाला झालीये ही. अगदी तपशीलांत जाऊन लिहिली आहेस आणि अनवट जागा असल्याने वाचायची उत्सुकता कायम राहिली. तुझी शैलीही छान आहे. हा भाग लिस्टीत गेला आहे. गरज वाटली तर संपर्क करेनच.

तुझ्या हातून अशाच अनेक लेखमाला घडोत. >>>> +१०८