भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग ९ : शुभ्र काही देखणे...

Submitted by मनिम्याऊ on 10 August, 2023 - 05:13

भाग ८: चौक - चौराहों का शहर - जगदलपूर

जगदलपूर शहरातून पश्चिमेकडच्या रस्त्याला गाडी लागली.एकही खड्डा नसलेली काळीभोर डांबरी सडक. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडुलिंब, साल, काटेसावरीचे उंच उंच वृक्ष होते. हि सगळी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. रस्त्याचे नाव 'राम वन गमन पथ' असे आहे.
ram van.jpg
आजचा निसर्ग कालच्या पेक्षा वेगळा. काल घनदाट अरण्य बघितले तर आज पठारी माळरान. दूरवर नजर जाईल तिथवर लालसर तपकिरी माती. मातीखाली दबलेले पण अर्धवट डोकं वर काढणारे कठीण खडक. आज अधून मधून जरा ढगाळ हवामान होते पण त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत नव्हता.
road_0.jpg
जागोजागी शिंदीची झाडे दिसत होती. शिंदीच्या झाडाला इकडे छिंद म्हणतात. गाव लागले कि दूरवर पसरलेली हिरवीगार भात-खाचरे दिसत. त्या हिरवाईत लाल लाल कौलारू घरे. वाटेत एक 'छिंदगाव' नावाचे गाव लागले. इथले मुख्य उत्पन्नाचं साधन म्हणजे म्हणजे शिंदीच्या झाडाचा रस ज्याला 'सल्फी' म्हणतात. हे छत्तीसगढचे खास पेय. नीरेसारखाच झाडाला चिरा देऊन त्यात पाझरणारा रस गोळा करतात. सकाळी घेतलं तर फार पौष्टिक. सूर्य डोक्यावर आला कि मग त्याची ताडी बनते. जागोजागी झाडांना रस काढण्यासाठी मडकी लावून ठेवलेली दिसत होती. काही ठिकाणी सल्फी काढण्याचे काम चालू होते.
sindi.jpg
गाडीने मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळण घेतलं. आता लालसर कच्च्या मातीची सडक सुरु झाली. या रस्त्याचे नाव 'विनता घाटी'. बरेच ठिकाणी रस्त्याने लोक खांद्यांवर मोठमोठी भांडीकुंडी घेऊन जाताना दिसत होते. मग कळले आज इथला 'जरू तिहार' नावाचा स्थानिक सण आहे. आपल्या नागपंचमीसारखं आज माती खोदत नाहीत किंवा शेतीची कोणतीही कामे करत नाही. पूर्ण दिवस आपल्या कुटुंबियांसह घालवतात.jaru.JPG

मटनार टेकड्यांमधेच शहरापासून साधारण ५० किमीच्या अंतरावर तामडा घुमर नावाचा बारमाही धबधबा आहे. तामडा नावाच्या नाल्यावर आहे म्हणून तामडा घुमर. या धबधब्याची विशेषता म्हणजे हा silent fall आहे. अगदी जवळ जाईपर्यंत याची उपस्थिती लक्षात येत नाही. अतिशय कमी आवाज करत कोसळणारा धबधबा आम्ही पहिल्यांदाच पहिला. १०० फुटांवरून खाली झेप घेत तामडा नाला चार किमी अंतर कापून पुढे इंद्रावतीला मिळतो.
Tamada ghumar front.jpeg.jpg
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
गाडी पार्किंगला लावून १०० मीटर चालत गेलं कि आपण थेट धबधब्याच्या माथ्यालाच जाऊन पोचतो. इथे सुरक्षाकुंपण वगैरे काही नाही. त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते. "घसरला तो पसरला आणि थेट शंभर फूट खाली कोसळला".
tam.jpg
नाल्याचं पाणी अतिशय नितळ स्वच्छ त्यामुळे त्याला "नाला का म्हणावं" हा प्रश्न आमच्या शहरी मनाला पडला. लहानशी नदीचं कि हि. इथे बाराही महिने मोरांचे वास्तव्य असते म्हणून याचे दुसरे नाव 'मयूर घुमर'

tamda long.JPG
नदीच्या काठाकाठाने जरा झाडी आहे. छोटासा trail म्हणा. तिथे पलीकडे काही स्थानिक गावकरी कुटुंबे दिसत होती. बायका चुल मांडून स्वयंपाक करत होत्या. पुरुष नदीतून पाणी आणून देत होते तर लहान मुले पाण्यात खेळत होती. त्यांच्या गायी तिथे बाजूलाच चरत होत्या.
tamlon.jpg
म्हटलं “चला, आपण हि तिकडे जाऊया”. झुडपांतून वाट काढत निघालो. मी पुढे, माझ्या मागे विजी, तिच्यामागे आई आणि दोघी मावश्या येत होत्या. अवघड जागा असेल तर मी झुडूप हाताने बाजूला सारून धरायचे आणि मग या साऱ्याजणी तेवढी जागा पार करायच्या असं चाललं होतं. वाट संपता संपता एका अवघड जागी मी झुडूप हलवले आणि दगडावर पाय ठेवणार इतक्यात अगदी जवळून झपकन काहीतरी विजेच्या वेगाने आडवे गेले. बघते तर तपकिरी काळा साप. क्षणार्धात बाजूच्या झाडीत दिसेनासा झाला.
या अनपेक्षित प्रकाराने अंगावर सरसरून काटा आला. रस्ता संपलाच होता. तसेच समोर जाऊन झाडीतून बाहेर पडले. बाकीच्यांना हात देऊन मोकळ्यावर घेतले आणि नंतर नागदेवतेनी दिलेल्या या अकल्पित दर्शनाबद्दल सांगितले.

समोर नदी वाहत होती. पात्र अगदीच उथळ आहे. पाण्यात लहान मोठे दगड आहेत तिथे बराच वेळ खेळलो. पाणी छान उबदार होते. पाय सोडून निवांत बसलो.
fun.JPG
आमच्या सारखेच अजून काही पर्यटक तिथे आले होते. त्यातील काही लोकांचा धबधब्याच्या अगदी कड्यावर जाऊन पाण्यात उभे राहून सेल्फी घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला. स्थानिक स्वयंपाकवाल्यांनी त्यांना तसे न करण्याबद्दल हटकले असता जरा तू तू मैं मैं करून त्या लोकांनी काढता पाय घेतला.
waterfall high.jpg

पुढचा थांबा मेन्द्री घुमर नावाचा मोसमी धबधबा. खरंतर हा एक 'व्यू पॉईंट' आहे. पठाराच्या अगदी कड्यावर जाऊन खाली दरीचे सुंदर दृश्य पाहता येते. इथूनच लांबवर मटनार नाल्यावर स्थित मेन्द्री धबधब्याचे दर्शन होते. पावसाळा नसल्याने अगदी दिसेल न दिसेलशी बारीक धार कड्यावरून कोसळत होती.
mendri.jpeg.jpg
मात्र मान्सून मध्ये जेव्हा हा प्रपात आपल्या पूर्ण दिमाखात असतो त्यावेळी त्याला ‘घाटी की धुंध’ असा किताब बहाल केल्या जातो. अलीकडे मोकळे पठार आहे. कड्याजवळचा खडक अगदी कच्चा आहे. सतत खाली दरीत ढासळत असतो म्हणून कड्याच्या थोडे अलीकडे तारेचे कुंपण घातलेले आहे. मघाचेच महाभाग आता कुंपणापलीकडे जाऊन सेल्फी घेताना दिसत होते. Sad
mendri view.jpg
अनवट अस्पर्श निसर्ग. पायाखाली तपकिरी माती आणि लहान मोठे दगड विखुरलेले होते. सहज चाळा म्हणून एक दगड उचलला तर तो आकाराच्या मानाने जरा जड वाटला. इथले सगळेच दगड अंमळ वजनदार लागत होते. मग लक्षात आले कि हे साधे दगड नसून नक्कीच कोणतीतरी खनिजे आहेत. कदाचित लोह किंवा मँगनीज. भूविज्ञानाच्या अभ्यास करत असतानाचे दिवस आठवले. भारताच्या नकाशातील खाणींचे विभाग आणि खनिज संपत्तीचे वितरण. Ph.D करत असताना केलेली सर्वेक्षणे डोळ्यासमोरून तरळून गेली. छान वाटले. nostalgia. अशा शांत जागी बसून एकटीनेच स्मरणरंजन करण्यातही मजा आली. इथून पाय निघत न्हवता. जरा वेळाने निघालो. गाडीत येऊन बसलो पण मन त्या पठारावरच अडकले होते.
mendari rock.jpg
रस्त्यात एका ठिकाणी थांबून जेवणे उरकलीत. मेनू तोच. भात, भाजी व लोणचे. नॉनव्हेजचे मात्र बरेच प्रकार होते. देसी भूना मुर्ग आणि चापड़ा चटनी (लाल मुंग्यांची चटणी) हि इथली वैशिष्ट्ये. झाडांवर घरटे करून राहणाऱ्या या मुंग्यांना मीठमिरीबरोबर वाटले कि झाली बेसिक चटणी तयार.

आता दुपार टळायला सुरवात झाली होती. अजून आजचे खास आकर्षण बाकी होते. किंबहुना मुद्दामच चित्रकोट भेट सर्वात शेवटी ठेवली होती. भारतातील प्रमुख धबधब्यांपैकी एक आणि सर्वात रुंद व मध्य भारतातील सर्वात मोठा जलप्रपात असलेल्या चित्रकोटच्या रस्त्याला लागलो. हा धबधबा जगदलपूरपासून ४० कि.मी आणि रायपूर पासून 273 कि.मी. अंतरावर आहे. ३० मीटर उंचीचा हा फॉल सुमारे ३०० मीटर रुंद आहे. इंद्रावती नदीवर असलेल्या या प्रपाताला घोड्याच्या नालेसमान आकारामुळे भारताचा नायगारा देखील म्हटले जाते.
drone.jpg
(image credit : गजानन ट्रॅव्हल्स)
इंद्रावती नदी ओडिशातील कालाहांडी येथे उगम पावून महाराष्ट्र - छत्तीसगढ - तेलंगणा सीमेवर गोदावरीला मिळते. इंद्रावती नदीच्या निर्मितीमागे एक पौराणिक कथा आहे. एकेकाळी ही जागा चंपा आणि चंदनाच्या झाडांनी भरलेली होती, ज्यामुळे संपूर्ण जंगल सुगंधित होत असे. या सुंदर ठिकाणीं एकदा इंद्र आणि इंद्राणी काही काळासाठी राहायला आले. निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत जंगलात फिरत असताना इंद्र एका उदंती नावाच्या वनकन्येवर भाळला. दोघे सोबत राहू लागले. इकडे इंद्राणीला या बाबत आदिवासींकडून कळले असता तिने चिडून दोघांना वेगळे होण्याचा शाप दिला आणि स्वतः स्वर्गलोकी परत न जाता तिथेच जन कल्याणासाठी राहण्याचा निश्यय केला आणि स्वतःला नदीच्या रूपात प्रवाहित केले. हीच इंद्रावती नदी. एकाच पहाडावर उगम पावलेल्या इंद्रावती, इंद्रा आणि उदंती या तीन नद्या कुठेही एकमेकांना न भेटता वाहतात.

चित्रकोट आल्याची खबर लांबवरून येणाऱ्या खळाळत्या पाण्याच्या आवाजाने मिळाली. पार्किंगला गाडी लावून चालत निघालो. रस्त्याच्या दुतर्फा सोव्हिनर्स, स्थानिक चीजवस्तू विकणारी दुकाने होती पण येताना बघू म्हणत पाय भराभरा उचलत धबधब्यापाशी पोचलो. आणि … निशब्द...
निसर्गाचा विराट आविष्कार..
प्रथम तुज पाहता ... समर्थांचे सुप्रसिद्ध काव्य आठवले.

।। गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे।।
CK.JPG
पांढऱ्या शुभ्र जलधारा प्रचंड वेगाने कड्यावरून खाली कोसळत होत्या. पर्यटकांची बरीच गर्दी होती. पण जागोजागी कुंपणे आणि रक्षक गस्त घालत असल्याने व्यवस्थित सुरक्षा होती.
CK_Long.jpg
किती बघू आणि काय बघू असे होत होते. बरेच फोटो काढले तरी समाधान होईना. खाली जायला पायऱ्यांची वाट बांधली आहे. त्यावरून खाली जायला निघालो. अर्ध्या वाटेवर एक फाटा 'चित्रकोट नेचर ट्रेल' कडे जातो.
trail1.jpg
१० मिनिटात खाली नदीकाठी पोचलो. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जायला नावा उपलब्ध आहेत. एका वेळेला दहा जणांना वल्हीच्या नावेत बसून जात येतं. तसेच सिंगल मोटारबोटीची सोयदेखील आहे. लाइफ जॅकेट चढवून नावेत स्वार झालो.
CKboat.jpg
दोन नावाडी चप्पू चालवत होते. त्यांनी अर्धवर्तुळाकार मार्गाने नेत धबधब्याच्या अगदी जवळ नेले. कोसळणाऱ्या प्रपाताचा भयंकर आवाज येत होता.

।। गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला,
कड्याशी आदळे धारा, वात आवर्त होत असे ।।
near.jpg
पाण्याशी तुषार उडून पांढरे धुके तयार झाले होते. अंगावर थंडगार तुषारांचा वर्षाव झाला. कपडे, चष्मा, केस, कॅमेरा, मोबाईल सगळ्यांवर पाण्याचे बारीक बारीक थेंब चमकायला लागले.
।। तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात,
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ।।

कड्याच्या पायथ्याशी, धारांच्या मागे, घळ तयार झाली आहे. घळीमध्ये दुर्गादेवीच्या प्राचीन मूर्ती आणि अनेक शिवलिंग आहेत. कोसळत्या जलधारांनी त्यांच्या अखंड अभिषेक चालू असतो. खूपच अद्भुत दृश्य होते.
।। कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ।।
behind1.jpeg.jpgbehind2.jpg
नावेने वळण घेतले, धबधब्यापासून थोडं दूर निघालो आणि सूर्यनारायणाने कृपा केली. ढग बाजूला होऊन उन्हाची एक तिरीप थेट धारांवर आणि ... कमानदार इंद्रधनुष्य अनपेक्षितरित्या साकार झाले. एक विलक्षण सुंदर अनुभव घेतला.
rainbow (2).JPG
परत काठावर आलो. आज्जीमंडळी परतीच्या वाटेला लागल्या. आम्ही दोघी मायलेकी मात्र बराच वेळ नदीकाठावरच रेंगाळलो. दगडावर बसून खूप गप्पा केल्या,
selfie.JPG
एक छोटी मैत्रीण भेटली. इंद्रावतीतले छोटे छोटे खडे गोळा केले.
friend.jpg
इथेच तो "इंद्रधनुष्यात पिंक रंग का नाही?" हा प्रश्न आम्हाला पडला. एक सुंदर संध्याकाळ.. आम्हा दोघींचीच.. मनात आलं कि “विजी लवकरच मोठी होईल, तिच्या विश्वात रमेल, पण हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. आम्हा दोघींच्याच.”
wide.jpg

संध्याकाळ झाली होती. परतीच्या वाटेवर एक शिव मंदिर आहे. तिथे सगळ्या आमची वाट बघत बसल्या होत्या. जाताना बस्तर आर्टची बरीच दुकाने आहेत. कास्ट आयर्न चे हत्ती घोडे, लाकडी खेळणी, विंड चाइम्स असे बरेच काही विकायला होते. थोडीफार खरेदी केली. रिसॉर्टवर आलो. गाडीचा हिशोब चुकता केला.

आज रायपूरसाठी निघायचे होते. रात्री उशिराची बस होती. दहा वाजता चेकआऊट करून जगदलपूर मेन बस स्टॅन्ड गाठला. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. इंद्रावतीचा पूल पार करून गाडीने वळण घेतले. शहराचे दिवे दूर जाताना दिसत होते आणि आम्हाला एका वेगळ्याच अनुभवाने समृद्ध करणाऱ्या जगदलपूरचा निरोप घेतला.
night.jpeg.jpghttps://youtube.com/shorts/TR8A2TSoIwM?feature=share
क्रमशः
भाग १० : बस्तर आर्ट व रायपूर (अंतिम)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेखमालिका!
फोटो पण छान आलेत.
"विजी लवकरच मोठी होईल, तिच्या विश्वात रमेल, पण हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. आम्हा दोघींच्याच.”>>>> आवडलं. सुंदर आठवणी कायम बरोबर राहतात.

आहाहा! किती सुरेख. सगळ्याच जागा एकसे एक. चित्रकोट तर अतिशय सुंदर.

मनात आलं कि “विजी लवकरच मोठी होईल, तिच्या विश्वात रमेल, पण हे सुंदर क्षण कायम आठवणीत राहतील. आम्हा दोघींच्याच.” >>> अगदी अगदी. Create lots of beautiful, happy memories.

मायबोलीवरील हि लेखमाला वाचून २०२३च्या नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर येथील आशिष माराणे व त्याच्या दोन मित्रांनी बस्तरची बाईक वरून ७ दिवसांची सफर केली. निसर्गप्रेमी असल्याने आणि स्वतःच्या दुचाकी वरून फिरत असल्याने पर्यटक सहसा जात नसलेल्या अनवट जागा जंगलात आतमध्ये जाऊन त्यांनी बघितल्या. विशेषतः धबधबे.
त्यातील निवडक फोटो येथे देते.

बस्तर सर्किट येथील काही unexplored धबधबे.
चित्रधारा
Chitradhara.jpeg

हांडवाडा
handawada.jpeg

भीमसेन
binchun.jpeg

बिजाकासा
Bijkasha.jpeg

झारालावा
jharralwa.jpeg

कोएमारी
Koemari.jpeg

कुडुमखोदरा
kudum khodra.jpeg

पांडकीचारा
Pandki chara.jpeg

तोपर
topar.jpeg

मंडवा
mandwa_0.jpeg