Tour du Mont Blanc भाग ८ - पाचवा दिवस

Submitted by वाट्टेल ते on 8 August, 2023 - 18:12

आज प्रथमच खोलीच्या खिडकीतून सूर्योदय पाहिला. सकाळी निघता निघता सईद आणि माझा जरासा प्रेमळ संवाद झाला. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या दोन्हीला जेवण असाच शब्द आहे, या एका गोष्टीवरून त्याने हिंदी, संस्कृत, मराठी वगैरे भाषा किती अपुऱ्या वगैरे आहेत अशी टिप्पणी चालू केली. त्याच्या अरेबिकमध्ये किंवा रशियनमध्ये म्हणे यालसाठी २ वेगळे शब्द आहेत. या एका गोष्टीवरून भाषा समृद्ध आहे अथवा नाही वगैरे ठरवणे अगदीच बालिश आहे वगैरे माझे युक्तिवाद सुरु झाले. शेवटी संपूर्ण दिवसासाठी energy लागणार ती इथे दवडू नये म्हणून त्याला तुझेच अगदी बरोबर आहे आहे वगैरे सांगितले. खुश होऊन त्याने मला स्वतःची अरेबिकमध्ये उजवीकडून डावीकडे लिहीत असलेली डायरी दाखवली, त्यातले काहीही कळात नसले तरी गंमत वाटली. मी त्याच्या मताला कबुली दिल्याने बहुतेक परतफेड म्हणून त्याने इतर जग रानटी अवस्थेत असतेवेळी असलेली महान भारतीय संस्कृती, silk route, मसाले आणि अन्य गोष्टींचा हजारो, किमान शेकडो वर्षांचा व्यापार , भारताचे strategic स्थान आणि बळ, तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला माहित नाही वगैरे आपली लाल केली. या सगळ्याला हो हो म्हणायला माझे काही गेले नाही. तर ट्रेक म्हणजे नुसता ट्रेक नसतो, नुसतंच चालणं, फोटो, खाणं वगैरे नसतं. त्यापलीकडेही असं बरंच काही काही असतं.
आज स्वित्झर्लंडला टाटा करून आम्ही इटलीमध्ये शिरणार होतो. अनिता आणि DS सिंगल असल्याने इथेच तुम्हाला BF मिळणार आहे वगैरे चेष्टा चालायची, त्या चांगल्या मैत्रिणी आणि चेष्टा अगदी healthy. पैकी मी फ्रेंच ( नवऱ्याला या सगळ्यांत फारसे मत नव्हते ) आणि DS ने स्विस पुरुषांसाठी आधीच जागा अडवली होती. त्यामुळे अनिताने ‘मुझे कोई इटालियन माफिया मिलनेवाला है’ वगैरे डायलॉग मारले. त्या इटलीमध्ये कोणीतरी हमरे गाव कोई आयेगा वगैरे गाणी गात असणार.
सुरुवातीची वाट सरळ गावातूनच होती. जिकडे तिकडे कुरणे, गाई, त्यांच्या घंटा, डोंगराची background, थोडी शेती, लहानमोठी घरे, आणि कधी नव्हे गवत कापणारे लोक वगैरे दिसत होते. सगळं अगदी picture perfect.
8_1.jpg
जरा चढ होता पण gradual. जसे वर जाऊ तसे खालचा विस्तीर्ण canvas अधिकाधिक अहाहा म्हणायला लावत होता.
8_2.jpg
हवासुद्धा जरा गार झाली. एके ठिकाणी एक उंच शिखर मार्कने दाखवले. फ्रांस, स्वित्झर्लंड आणि इटली या तिघांची बॉर्डर. स्वित्झर्लंडकडे तोंड करून उभे राहिल्यास डावा पाय फ्रांसमध्ये, उजवा इटलीत ठेऊन स्स्वित्झर्लंडच्या भूमीवर मूतता येते असा भूभाग, हे त्याने केलेले वर्णन. यावर व्यक्त कसे व्हावे हे कळेना. ते ठिकाण काही आमच्या वाटेत नव्हते याची चुटपुट लागली, ज्यांना जमेल त्यांनी जाऊन जरूर प्रयत्न करावा.

तासाभरात एके ठिकाणी लांबच्या लांब आडवी बिल्डिंग , बाजूला गोठा, कॉफी house होते. तिथे जरा वेळ रेंगाळलो. काही गायींच्या पार्श्वभागात काहीतरी लांबच्या लांब injection सारखे घालण्याचे काम चालू होते. हा प्रकार artificial insemination साठी असल्याचे समजले. तिथून GMO, organic वगैरे चर्चा. एक खरे आहे की दूध, दही, चीज , भाज्या, फळे, ब्रेड सगळ्यांनाच अंगभूत छान चव होती, उगीच साखरेचा मारा नाही. ब्रेड चीजपासून बहुतेक सगळेच जवळच्या खेड्यातूनच घेतले जायचे. अमेरिकेत आपण खातो ते अन्नघटक तसेही निकृष्ट हे माहीत असले तरी इथल्या पदार्थांच्या चवीच्या मानाने ते दारिद्र्य खूपच खुपले. अर्थात भारतातही फळे , भाज्या अशाच चांगल्या चवीच्या असतात, मिळू शकतात.

कॉफी हाऊस च्या पुढे वर जाताना, वरून येणाऱ्या बर्फाच्या पाण्यामुळे तयार झालेली असेल पण लांबच्या लांब भेग होती. आता पाणी नसले तरी बर्फ वितळल्यावर तिथूनच पाण्याचा मार्ग जात असेल. जरासे वर पोहोचल्यावर पुन्हा ब्रेक घेतला, इथे मी चक्क pushup वगैरे केले. ५ दिवस रोज १५-१६ किमी चालून रोज सकाळी पाय तयार असायचे, आणि त्यासाठी खास मेहनत केलेली नव्हतं तरीही याबद्दल ईश्वर किंवा जे कोणी आहे त्याचे आभार मानले.
डोंगर चढत, ओलांडत पुढे जात राहिलो, पुष्कळ चढच होता पण मी त्यावर अगदी comfortable असायचे. मध्ये थोडा बर्फही होता पण इतका अवघड नव्हता ओलांडायला. अखेर १२ च्या सुमारास स्वित्झर्लंड इटली बॉर्डरला डोंगरमाथ्यावर एखादे summit सर केल्याच्या आनंदात जरा उभे होतो.
8_3.jpg8_4.jpg
नवऱ्याने काहीतरी सांगायला सुरुवात केली तर ‘ओ मराठी मराठी’ असे उत्साहात जवळजवळ ओरडत धावत येत एक माणूस पुढ्यात उभा राहिला. आतापर्यंतच्या ट्रेकमध्ये मराठी सोडाच एकही भारतीयही दिसला नव्हता आणि अचानक स्विस इटली बॉर्डरला चक्क मराठी माणूस भेटला. तो एकटा ,अगदी एकटाच ट्रेक करत होता, फक्त आमच्या उलट दिशेने. त्यालाही एकही भारतीय भेटला नव्हता, त्यामुळे तो खूष आणि आम्हीही एकूण त्याची एकटे करण्याची जिद्द बघून भारावलो. त्यातून अहो आश्चर्य म्हणजे तो पुण्यात नवऱ्याचे घर जिथे आहे तिथे ४ बिल्डिंग पलीकडे राहणारा निघाला. तो जरा आमच्यापेक्षा वयाने लहान असावा तरी लगेच त्याचे कॉलेज, मित्र, झालंच तर बायको वगैरे सगळी connection जुळवून त्यांच्या सासर्यांना आमच्या घरची मंडळी ओळखतात असा निष्कर्ष निघाला. आम्ही जोरजोरात शुद्ध मराठीत तिथे तुळशीबागेत भेटल्याच्या थाटात गप्पा सुरु केल्या. ( तुळशीबाग चालणार नसेल तर पुणेकरांनो, तुमच्या आवडीचे ठिकाण निवडा. मी पुण्याची नाही त्यामुळे चू भू दे घे) . आमच्या group मधल्या सगळ्या मंडळींसाठी तो एक गमतीचा विषय झाला. अनिता आणि DS ( अमराठी असल्याने), तुम्हे कही भी मराठी लोग मिल जाते है वगैरे नवऱ्याला चिडवू लागल्या. त्याची लोणावळा चिक्की आणि आमची श्रीखंड गोळी अशी देवाणघेवाण करून तोंड गोड करून त्याला टाटा केलं आणि पुढे निघालो.

थोडे खाली येऊनच लंच घेतला. सलाड ब्रेड नेक्टरीन वगैरे नेहमीचं होतंच पण dessert म्हणून त्याने एक पदार्थ दिला - macaroon सारखे स्वरूप पण फारच हलकं. जिभेवर ठेवताक्षणी असे काही विरघळले - की क्या बात है ! पुन्हा पुन्हा मागून खाल्ले.
8_7.jpg
आता descent होता, त्यामुळे मी पुढे , पण एकूण बऱ्या वेगात चालले होते. अरुंद असला तरी सुंदर route, जागोजागी फुलं पसरलेला आणि उतरताना खालची इटालियन बाजूचे उभे कडे, खालचे सुरीने कापल्यासारखे लांब लांब लांब रस्ते , कुठे ओढे !
8_5.jpg
१,२ ठिकाणी लोक शॉर्टकट घेताना दिसले तिथे, त्याचे असे म्हणजे होते की इथे काही ठिकाणी बर्फाखाली खडक नाहीये, पोकळ आहे. असाच रस्ता ओलांडताना भसकन पाय खाली जाऊन १-२ माणसे गेल्याच आठवड्यात दरीत कोसळल्याचे त्याने सांगितले. यावर तोंड बंद, कोण कशाला मरायला इथे येतात असे वैतागून म्हटले असते, पण जाऊ द्या झालं.

आज चालणे २:३० ला वगैरेच संपणार होते कारण डोंगरपायथ्याला बस पसडून आम्ही आजच्या मुक्कामी courmayeur ला जाणार होतो. दुसऱ्या group चा चुकवत आम्ही भरभर निघालो कारण बसला भरपूर गर्दी असते, दुसरा ग्रुप आधी पोहोचल्यास आम्हाला बसमध्ये शिरायला जागा मिळणार नाही असे फ्रेडने सांगितले. भरभर उतरून बरोबर वेळेत पोहोचलो आणि बसमध्ये शिरलो. आधीच तशी भरलेली होती, आणि मग eventually ती इतकी भरली की ‘म्हैस’ मधे आहे तशी ती माणसे आणि सामानाचे सारण गच्च भरलेली एक प्रचंड गतिमान करंजी झाली. कुणी कुणाच्या पायाशी, कुणी मांडीवर, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा प्रकार झाला. दुसऱ्या group लाही त्यातच कोंबण्यात आले. मी व DS पाठीला पाठ लावून उभे होतो तिथे २ तगडे hikers, भरपूर वाट तुडवून आलेले, दोनाच्या सीटवर बसले होते, तेच चक्क उभे राहिले. एक क्षण आम्हाला वाटले - स्त्रीदाक्षिण्य…. पण कसले काय, बसमधली सीट fold होण्याची सोय असल्याने ती fold करून बसमध्ये इतरांना जरा जागा करावी म्हणून बसलेले होते ते उभे राहिले. मी त्यांना मनोमन नमस्कार केला.

पाऊण एक तास तशा अवस्थेत प्रकाश करून courmayeur ला पोहोचलो. आतापर्यंतच्या मानाने चांगलं मोठं गाव किंवा शहर होतं. मुन्सिपाल्टी होती कारण तिची बिल्डिंग आम्हाला नंतर दिसली. आधी ती मुन्सिपाल्टीची बिल्डिंग होती हेच कळत/ ठरत नव्हते.
8_6.jpg
नशिबाने हॉटेल स्टॉपला थांबलो तिथे शेजारीच होतं. एका म्हातारीच स्वतःच घर व त्यालगत २ मजली बिल्डिंग बांधून तिथे राहण्याची सोय असं स्वरूप.
8_8.jpg
इथल्या bathroom मध्ये toilet आणि शेजारी चक्क वेगळे bidet असा प्रकार होता. खाली बसण्याची जागा किमान १०० वर्षे आहे तशीच असावी, व्हिक्टोरियन कोच, खुर्च्या, खोलीच्या मधोमध fireplace, तिथून एक लोखंडी पाईप भिंतीपर्यंत नेऊन धूर बाहेर सोडण्याची व्यवस्था होती. भिंतीवर टिपिकल चित्रे, taxidermy केलेली मुंडकी असा थाट होता. अशी खोली बघायला मिळाली याबद्दल भारीच वाटले.
WhatsApp Image 2023-08-08 at 6.01.27 PM.jpg
तिथे एक कॅनेडियन भेटला. त्याने २००० मैलांची संपूर्ण appalachian trail केलीच होती आणि अजून बऱ्याच. इथेही TMB करून तो फ्रांसच्या coast पर्यंत एक trail जाते तिथपर्यंत जाणार होता. अशी random माणसे भेटतात, वेगवेगळे अनुभव कळतात, एकूण संपन्न करणारा प्रकार आहे.

चिरंजीवांचे शूजचे sole पुढच्या बाजूला जरा उचकटलेले दिसत होते ते फिक्स करण्याच्या कामावर निघालो. नवे शूज घेण्याइतकी वाईट स्थिती नव्हती, एका लहान दुकानात शूजसाठी glue बरोबर सापडला. तो लावून शूजवर वजन ठेऊन ते फिक्स केले. मग गावात भटकत राहिलो. फुलांच्या डायल असलेली घड्याळे, टुमदार बिल्डींग्स, जुने चर्च होते. मध्ये ८-१० वर्षांच्या दिसणाऱ्या मुलांचे जथ्थे रस्त्यात गाणी वगैरे म्हणत बागडत जाताना दिसले. सगळं स्वप्नवत. बहुतेक summer camp ची गावातून फेरी मारण्याची activity होती. काही भारी, इटालियन leather च्या वस्तूंची दुकानेही होती. ३०० युरो किमतीची पर्स दिसल्यावर मी पुढे गेले नाही. दगडांनी बांधलेले छोटे छोटे रस्ते, पेरूमधील Cusco या शहराची आठवण झाली. Bus stop च्या शेजारी कसलेतरी मोठे vending machine दिसले, जाऊन बघते तर condom चे vending machine. Courmayeur बद्दल आमच्या ज्ञानात भर. अजून काही नाही. .

मग मोर्चा तिथल्या प्रसिद्ध Gelato च्या दुकानाकडे वळवला. मगाचच्या मुलांचा जथ्था आता इथे आलेला. अप्रतिम gelato होते. रात्री जेवायला चांगले इटालियन रेस्टॉरंट आहे असे कळल्याने उत्सुक होतो. सुरुवातीला वाईन मागवल्या त्या छान होत्या. मग ब्रेड आले चीज आले. नंतर एक अतिशयच al dente ( थोडक्यात अर्धवट शिजलेला) असा पास्ता. तो काही घशाखाली गेला नाही. अजून मेन कोर्स आहे म्हणून सांगण्यात आले म्हणून थांबलो तर शाकाहारींना सुमारे ४ वेगवेगळ्या चीजचे लगदे व त्यावर कोथिंबीर फक्त अशी काहीशी डिश अवतरली. मांसाहारी मंडळींना आपापले meat आणि बाजूला उकडलेले बटाटे, फ्रेंच बीन वगैरे प्रकार होता. आमची तोंडे बघण्यासारखी झाली. ते एकूण जेवण म्हणजे भरपूर चेष्टेचा विषय झाला. मालकाला बोलावले. फ्रेड त्याला समजावू लागला ( इटालियन मध्ये) . त्याने त्याचे तोंड अखंड चालू ठेवत, त्याबरोबर हात, पाय हलवणे, पोट पुढे काढत कमरेवर हात ठेवणे, चष्मा वर खाली करणे, आमची डिश उचलून वास घेणे वगैरे अनंत लीला करून अन्नाने नाही पण हसवून आमचे उदरभरण केले. आमच्याकडे अडचणीला असावीत म्हणून काही madras lentil ( readymade उसळ) पाकिटे होती. ती आम्हाला गरम करून देशील का वगैरे पारू त्याला पटवू लागली. त्यावर कुलकर्णी दाम्पत्याचे एक भांडण होऊन अजून छान मसाला मिळाला. (किरण कुलकर्णी मांसाहारी असल्याने त्यांचे काम झाले होते). शेवटी मांसाहारींच्या ताटातील ४ बटाटे आणि शेंगा खाऊन तो दिवस संपवला. courmayeur ची आठवण म्हणून नवऱ्याने ते चीजचे लगदे नीट पॅक करून घेतले आणि स्वतःच्या पाठीवर वाहून ऑर्लॅंडोत आणून फ्रीजमध्ये विराजमान केले आहेत. Aged Cheese म्हणून पुढेमागे ते विकण्याचा त्याचा मानस असावा अशी माझी समजूत आहे.
क्रमश: https://www.maayboli.com/node/83850

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त खुसखुशीत Lol