भारत का दिल देखो (प्रवास वर्णन) : बस्तर : भाग १ (पूर्वतयारी)

Submitted by मनिम्याऊ on 11 July, 2023 - 06:54

"यावर्षी इयरएन्डला कुठे जायचं फिरायला?"
ऑक्टोबरच्या एका दुपारी आमच्या पुण्यातल्या घरात सुरु असलेला संवाद.
"हं .. !"
माझा एकाक्षरी प्रतिसाद.
तुझ्या लेकीच्या शाळेला ख्रिसमसची ८ दिवस सुट्टी आहे त्यातच अड्जस्ट झालं तर उत्तम.. !" आई म्हणाली. "रंजू मावशी कधीची बोलावते आहे रायपूरला. जायचं का?" गणपतींनंतर आई माझ्याकडे मुक्कामाला आली असता चाललेली प्लॅनिंग .
"बघू ....!"
"अगं बघू काय बघू, तुझ्याशी बोलते आहे." मला लॅपटॉप मध्ये डोकं घातलेलं बघून माँसाहेब जरा जोरातच म्हणाल्या. "जायचं का रायपूरला?" मग मात्र 'वर्क फ्रॉम होम' जरा बाजूला सारून या 'होम वर्क' मध्ये भाग घेणे गरजेचे झाले.

"रायपूर... ? मी जरा विचार करत म्हटले. "हो अगं, रंजू मावशीकडे राहूया दोन दिवस आणि काही जवळपास असेल तर करूया थोडी भटकंती." इति उत्साही आईसाहेब. वय वर्षे ६६. "ठीक आहे. बघू जमतंय का" एवढे बोलून मी पुन्हा लॅपटॉप मध्ये डोळे घातले.

हो नाही करता करता रायपूरला जाण्याचे नक्की झाले आणि मग प्रवासाची आखणी करायला घेतली. माझ्यापेक्षा जास्त उत्साही घरातले दोन मेम्बर्स होते. आई आणि माझी लेक विजयालक्ष्मी, वय वर्षे ६.
रंजूमावशीला तात्काळ फोन लावला गेला आणि "डिसेंबर मध्ये येत आहोत, प्रोग्रॅम कन्फर्म" असे शिक्कामोर्तब झाले आणि आईसाहेबांनी २ दिवसांनी नागपूरसाठी प्रस्थान ठेवले.

रायपूरपासून जवळपासची / आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे कोणती, तेथे पोचण्याची साधने काय, प्रवासाचे अंतर किती आणि कसे कापायचे यावर गूगलबाबाच्या मदतीने शोधमोहीम सुरु केली. तसेच आणखी एक नियम यावेळी आम्ही आम्हालाच घालून घेतला कि शक्य तितक्या कमी खर्चात हि ट्रिप आखली गेली पाहिजे. तरीदेखील कोणत्या प्रवासी कंपन्या अश्या टूरचे आयोजन करतात का याचा पण आढावा घेतला. म्हणजे प्रवासी कंपन्या आपल्या पॅकेजमध्ये काय काय सुविधा देतात. कोणत्या ठिकाणांचा समावेश करतात हे एकदा कळले कि आपण त्यानुसार स्वतः व्यवस्थित आखणी करू शकतो.

जगदलपूर मध्ये २ दिवस २ रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले आणि मेक माय ट्रिप (MMT), अगोडा, GOIBIO या वेबसाइट्स वापरून मुक्कामासाठी योग्य ठिकाणे बघायला सुरवात केली.
तसेच नागपूरची एक टुरिस्ट कंपनी 'श्री गजानन ट्रॅव्हल्स' बस्तरची ६ दिवसीय ट्रिप आयोजित करते असे समजले. लगेच त्यांना संपर्क साधून माहिती पत्रके मागवलीत. त्यांने तत्परतेने माहिती तर पुरवलीच पण श्री राहुल चांदुरकर स्वतः नागपूरच्या घरी आईची भेट घ्यायला आलेत. त्यांना आम्ही केवळ माहितीसाठी संपर्क साधतो आहोत असे स्पष्टपणे सांगितले तरी देखील अत्यंत अगत्याने सर्व प्रवास आखणीसाठी मदत तर केलीच शिवाय ते स्वतः आमच्या ट्रीपच्या दिवसांतच त्यांच्या कंपनीच्या 'बस्तर-टूर' सोबत आहेत तर काही अडचण आल्यास "विनासंकोच संपर्क करा" असे सांगून लागेल ती मदत देण्याची तयारी दर्शवली.

मिळवलेल्या सगळ्या माहितीनुसार सिरपूर, जगदलपूर, कांकेर आणि तिरथगड या ठिकाणांना भेट देण्याचे निश्चित केले. रायपूरला पोचल्यावर थेट जगदलपूर, तिथून दुसऱ्या दिवशी कांकेर येथे कूटूमसर गुहा आणि तिरथगड धबधबा करून रात्री परत जगदलपूर आणि तिसऱ्या दिवशी जगदलपूर शहर आणि चित्रकोट धबधबा पाहून रायपूरसाठी प्रस्थान. चौथ्या दिवशी सिरपूर या रायपूर जवळील प्राचीन जैन मंदिर समूह आणि पुरातात्विक उत्खननाच्या स्थळाला एकदिवसीय भेट आणि सायंकाळी रायपूर शहर दर्शन व थोडीफार स्पेशल खरेदी/खादाडी करून पाचव्या दिवशी नागपूरला परत असा ढोबळ कार्यक्रम आखला गेला. आणि मित्रमंडळींसमोर ट्रिपचा डंका वाजवला ...

काही प्रतिक्रिया अपेक्षित तर काही अनपेक्षित.
"बस्तरला जातायत? त्यातही जगदलपूर? लाईफ इन्शुरन्स केलाय ना?" एक काळजी.

"अरे कशाला त्या नक्षलग्रस्त भागात जाताय? दुसरी ठिकाणे नाहीत का?" एक विचारणा

तर काहींचे म्हणणे कि "बिनधास्त जा, काही धोका नाही. अविस्मरणीय सहल होईल".

वेगवेगळी मते आणि मतांतरे.. पण 'अतिशय सुंदर प्रदेश आहे' यावर मात्र एकमताने शिक्कामोर्तब.

रायपूर मध्ये मुक्काम कुठे करावा हा प्रश्नच न्हवता. मला स्वतःला खरंतर कोणाच्या घरी जाऊन राहायला अवघड वाटतं पण इथे मावशीचं घर असल्याने व ती तेथे एकटीच रहात असल्याने तसा संकोच न्हवता. शिवाय रायपूरला पोहचल्या दिवशीच रात्री पुढे जगदलपूरला निघायचे होते.

जगदलपूर मधील २-३ हॉटेल्स निवडून प्रत्यक्ष बुकिंग करण्याआधी त्यांना फोनवर संपर्क केला. कारण तेच... वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे 'जगदलपूरमध्ये फिरणे किती सुरक्षित?' असा किडा डोक्यात वळवळायला सुरवात जी झाली होती. त्यात बरोबर दोन जेष्ठ नागरिक स्त्रिया आणि एक लहान मुलगी. नाही म्हणलं तरी जरा काळजी वाटत होतीच. पण फोनवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. बऱ्याच शंकांचे निरसन झाले. शिवाय प्रत्येक हॉटेल ज्या वेगवेगळ्या सुविधा देतात त्याबद्दल पण माहिती मिळाली. सरतेशेवटी राहण्यासाठी 'हॉटेल नमन बस्तर' ची निवड केली. आणि दि. २७-१२-२०२२ रोजीचे ३ adults १ child साठी बुकिंग केले.

आता तिकीट बुकिंग चा दुसरा टप्पा... माझा आणि लेकीचा प्रवास सुरु होणार पुण्यातून. नागपूरला घरी ख्रिसमस एन्जॉय करून व दोन दिवस थांबून आईसोबत पुढच्या प्रवासासाठी नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसचे आरक्षण केले. २६ डिसेम्बरची सकाळी ६:१५ ची रेल्वे. रायपूरला पोचणार दुपारी ११:०० वाजता. तो दिवस मग रंजू मावशी कडे घालवायचा असे ठरले. पुढे रायपूर-जगदलपूर हया ३०० कमी अंतराच्या प्रवासासाठी बस, रेल्वे आणि विमान हे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. रायपूरहून रोज दुपारपासून दर १५ मिनिटांच्या अंतराने बसेस आहेत ज्या सर्वसाधारणपणे साडेसहा ते सात तासांत हे अंतर कापतात. तसेच दुर्ग-जगदलपूर एक्सप्रेस हि रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावते पण हि गाडी एवढे अंतर कापायला १४ तास घेते आणि पार ओडिशामधून फिरवून आणते. राहता राहिले विमान. तर दररोज एक alliance एअरलाईन्सची ५५ मिनिटांची फ्लाईट असल्याचे कळले पण त्यांचे नेटवर रिव्युज काही खास न्हवते व अनेकदा त्यांच्या फ्लाईट्स वेळेवर रद्ददेखील होतात असे हॉटेलवाल्यानी पण सांगितले. सर्वदृष्टीने वेळ आणि आर्थिक गणित यांचा विचार केल्यास बसप्रवासाचा पर्याय सर्वात सोयीचा वाटला. रात्री उशिरा आरामात बुकिंग करायला घेतलं आणि तेवढ्यात फोन वाजला ...
Ranju mavshi calling ....

बापरे...! आता यावेळी कसा काय फोन मावशीचा? काय झाले असेल? जरा साशंकतेनेच फोन उचलला तर मावशीचा पहिला प्रश्न, "आपलं बुकिंग झालं का गं?"

"हो, हॉटेलचं झालंय, अजून बसचं बाकी आहे. का गं ? काय झालं?"
"अगं, माझी एक मैत्रीण ‘ज्योती‘ पण यायचं म्हणते आहे आपल्या बरोबर. तर अजून एक मेम्बर वाढवता येईल का?" इति रंजू मावशी
ओह, आता आली की पंचाईत! हॉटेल मध्ये ३ ऍडल्टस १ चाईल्ड अशी एकच रूम बुक केली आहे. आता आणि एकजण वाढणार म्हणजे २ रूम्स कराव्या लागतील. शिवाय सुट्टीचा सीजन असल्याने त्याच हॉटेलमध्ये दुसरी रूम मिळायला हवी. किंवा मग दुसरे हॉटेल बघायला लागणार आता. आणि हे 'नमन बस्तर' वाले रिफंड किती आणि कधी करतील काय माहित? एक ना दोन,अनेक प्रश्न मनात चमकून गेलेत. तिकडून मावशी विचारतेच आहे कि "काय सांगू मैत्रिणीला?"
"म्हटलं थांब जरा. उद्या सकाळी हॉटेलशी बोलते आणि मग सांगते".
दुसऱ्या दिवशी सकाळी परत हॉटेलला फोन. एक मेम्बर वाढतोय म्हटल्यावर समोरून उत्तर आलं कि

"अजी मेडमजी, कोई बात नही जी।
अपने रूम बहुत बडे बडे हैं।
चार क्या, छह लोग भी रेह लेंगे आराम से।
आप बस पंधरासौ रुपैय्या एक्सट्रा भर दिजीए....| "

हो ना करत, घासाघिस करत जास्तीचे हजार रुपये ठरले आणि एक्सट्रा बेडसह बुकिंग स्टेटस अपडेटेड... आणि हा एक 'एक्सट्रा मेम्बर' सामील करून घेण्याचा या ट्रिप मधला सर्वोत्तम निर्णय ठरला.. उत्साहाचा झरा... न्हवे न्हवे.. 'उत्साहाचा धबधबा' म्हणूया अशा व्यक्तिमत्वाची ग्रुपमध्ये एन्ट्री झाली.. मिसेस ज्योती डोळस उर्फ ‘ज्योती मावशी’... उर्फ 'ज्योती आज्जी'. तिच्याच भाषेत सांगायचे तर सगळं चालतं मला, काहीही हाक मारा, कुणी ताई ,कुणी काकू,मावशी,कुणी आजी .सगळी नाती प्रेमाची

आता ३ सिनिअर सिटीझन, एक जुनियर सिटीझन आणि मी, अशी पाच जणांची यात्रा ठरली. त्याच सुमारास रेल्वे मंत्र्यांनी मध्य भारतासाठीच्या पहिल्या 'वंदेभारत एक्सप्रेसची' घोषणा केली.. अरे वा.. चला हा पण अनुभव घेऊन टाकूया ..! लगोलग परतीचे तिकीट (रायपूर- नागपूर) वंदेभारत एक्सप्रेसचे बुक केले. बसचे जाण्यायेण्याचे तिकीट काढून झाले, व्हॉटसॅप ग्रुप तयार झाला, त्यावर सगळे अपडेट्स, सूचना, तिकिटांच्या प्रती, सगळ्यांचे आधार कार्ड्स, इमरजंसी फोन नंबर्स, घरचे संपर्क क्रमांक अशा असंख्य गोष्टींची देवाण घेवाण सुरु झाली. आणि सर्व तयारीनिशी दिनांक २३-१२-२०२२ रोजी मी आणि लेक नागपूरसाठी रवाना झालोत.

क्रमशः

तळटीप
मी मागे एकदा इथेच मायबोलीवर म्हणाले होते कि

'भारत का दिल' म्हणजे मध्यभारत हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश. ब्रिटिश अमदानीत CP & Berar प्रांत. घनदाट जंगले, पशू संपदा, खनिजे, वनस्पती विविधता असलेल्या या प्रदेशाच्या सीमा उत्तरेस सागर-जबलपूर पासून दक्षिणेस हैदराबाद संस्थानापर्यंत तर पश्चिमेस बुलढाण्यापासून पुर्वेस बस्तरपर्यंत होत्या. यात आजच्या भूगोलाच्या दृष्टीने बघितल्यास पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, बालाघाट, सातपुडा पर्वतरांगा, दंडकारण्य आणि छत्तीसगढ असे विभाग पडतात. हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून सुधा ओळखल्या जातो.
खरतरं मध्य भारताच्या एकंदरीतच समाज जीवन आणि संस्कृतीबद्दल खूप लिहिण्यासारखं आहे. इथली घनदाट जंगले, भेडाघाट- चित्रकोट सारखे प्रचंड धबधबे, पचमढी- चिखलदरा ही पर्यटन स्थळे, चंद्रपूर-ब्रह्मपुरीतील प्राचीन मंदिरे, इटियाडोह- नवेगावबांधसारखे जलाशय यांबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच.

पुढे कधीतरी या सगळ्यांवर लिहिण्याची इच्छा आहे.

तर सादर आहे मध्य भारतातल्या 'बस्तर' या नितांतसुंदर प्रदेशाची सफर. हा सध्याच्या छत्तीसगढ राज्याचा दक्षिण भाग. रामायणातील 'दक्षिण कोसल जनपद'. 'द ओरिजनल दंडकारण्य' .. नक्षलवादाचा डाग लागलेला हा प्रदेश. पण त्यामुळेच काहीसा अस्पर्श. नुसते भटकंतीचे वर्णन करण्यापेक्षा तेथे भेटलेली माणसे, बस्तरचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून द्यायची इच्छा आहे. त्यामुळे लिहिण्याच्या ओघात काही ऐकीव दंतकथा पण येतील ज्यांच्या source बद्दल मला खरंच काही माहिती नाही. त्यामुळे मी सगळ्याच प्रश्नाची उत्तरे नाही देऊ शकणार.

मी काही लेखिका नाही. ना vlogger. त्यामुळे माझ्या मर्यादित अनुभव विश्वाला गोड मानून घ्या. काही सूचना असतील जरूर सांगा. त्याप्रमाणे बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. कुठे जास्तीचं पाल्हाळ लावलं असं वाटत असेल तर तसंदेखील सांगा. मात्र कडू-गोड का असेना प्रतिक्रिया येऊ द्यात. म्हणजे मला स्वपरीक्षण करता येईल.
आणि एक, हे मी आधी लिहून ठेवलेलं नाहीय. त्यामुळे ३-४ दिवसांच्या अंतराने भाग प्रकाशित करेन. (घाबरू नका ३-४ भागांमध्येच लेखमालिका आटोपती घेईन).

--मृण्मयी
भाग 2

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्सुकता वाढली. माहितीपत्रकं आहेत पण कधी गेलो नव्हतो. जाण्याचं ठरवलं नव्हतं. ठिकाणांची अंतरं आणि कसे गेलात ते लिहावे. तसेच ठिकाण पाहायला किती वेळ पुरेसा आहे. स्थानिक बसेस खाजगी/परिवहनच्या आहेत का?

सुरेख सुरुवात!
भरपुर फोटोंसहीत पुढचे भाग येउद्यात...

.. पुढील भाग लवकरच.
>>>>
ठिकाणांची अंतरं आणि कसे गेलात ते लिहावे. तसेच ठिकाण पाहायला किती वेळ पुरेसा आहे. स्थानिक बसेस खाजगी/परिवहनच्या आहेत का?>>>
नक्कीच लिहीन.

बसेस खाजगी जास्त आहे. हा नक्षलबहुल भाग असल्याने कोणत्याही सरकारी वाहनातून प्रवास करणे शकतो टाळावे. आणि स्थानिक लोकांबरोबर संवाद साधताना राजकारणावर आपले मत न मांडलेले बरे हा एक धडा आम्ही (दुसऱ्याच्या) अनुभवातून शिकलो.

छान सुरुवात..
पुढील भागांची वाट बघतेय. फोटो नक्कीच टाका. मला हा मध्यभाग एकदम अनोळखी आहे.

मस्तच. मी पण तुमच्या बरोबर ट्रिप करणार. मला बस्तर आर्ट मध्ये खूप इंट्रे स्ट आहे. सीपी बेरार आमच्या हैद्राबाद निझामाचे क्षेत्र. पु ले शु.

बालाघाट बिलासपुर रस्ते प्रवास केला आहे. डोंगरगढ गेल्यावर दुर्ग परेंत जे काही घनदाट जंगल आहे त्याची कल्पना करताच येत नाही. नंदनकानन झू, मगरीचे प्रजनन केंद्र पण बघितले का ?

खूप छान आखणी केली संपूर्ण प्रवासाची. येऊ शकणार्‍या अडचणी, अडथळे यांना विचारात घेतले याला म्हणतात योग्य प्लानिंग. मनिम्याऊ च्या हिमतीची दाद द्यायला हवी,