हिंदी चित्रपटसंगीताबद्दल गप्पा -२ पार्श्वगायक ही पद्धत रुळल्यापासून १९६० पर्यंतचा काळ.

Submitted by भरत. on 29 June, 2023 - 01:21

अनिल बिस्वास, नौशाद, सी रामचंद्र, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, मदन मोहन, सलिल चौधरी, रोशन , इ. संगीतकार

मन्ना डे, शमशाद बेगम , मुकेश ,रफी , तलत , किशोर, लता , गीता , आशा , सुमन कल्याणपूर इ. गायक

साहिर, शैलेंद्र, हसरत , शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण , कैफी आझमी इ. गीतकार.

गायकांची नावे जन्मवर्षाप्रमाणे घेतली आहेत. इथे ज्यांनी अधिक संख्येने चित्रपट केले त्या संगीतकारांची नावे घेतली आहेत. क्रम जशी नावे आठवली तशी .यादी परिपूर्ण असू शकत नाही. इतरांबद्दल प्रतिसादांत येईलच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा प्रतिसाद योग्य आहे की नाही ते ठाउक नाही

गायकांमधे एखाद - दुसरे हिट गाणे देणारे बरेच होते.

उदा. उमादेवी, जिला आपण टुणटुण नावाची विनोदी नटी म्हणुन ओळखतो. तिचं ' अफसाना लिख रही हू' सारखं अफाट गाजलेलं गाणं किंवा द्विजेन मुखर्जी, ज्याचा आवाज अगदी हेमंत कुमार सारखा होता (ऐ दिल कहा तेरी मंझिल - माया) . अशा गायकांचा आवर्जुन उल्लेख व्हायला हवा. गुणवत्ता असुनही बरेच कारणांनी हे मागे पडले असतील का? किंवा स्पर्धेचे बळी किंवा त्यांच्या स्वतःमधिल मर्यादा ?

>> हुस्नला ल भगतराम एक संगीत दिग्दर्श क होते
होय.शंकर जयकिशन त्यांच्याकडेच शिकले व तयार झाले. SJ आधी तेच होते.

निर्मला देवी गोविंदा ची आई ह्यांनी पण गाणी गायलेली आहेत. माझे सर्वात फेवरिट म्हणजे बावर्ची सिनेमात. भोर आई गया आंधियारा मधल्या दोन लायनी. पण जबरद्सत. दशक चुकले आहे.

१९३५ साली पंकज मलिक + आर सी भोरल यांच्या संगीत दिग्दर्शनात धूप छांव या नितीन बोरसे दिग्दर्शित सिनेमासाठी सुप्रव सरकार, पारुल घोष आणि उमा देवी यांनी पार्श्वगायन केले. हा पहिला सिनेमा. यातले पहिले गाणे कोणते रेकॉर्ड झाले हे निश्चित माहिती नाही. त्या काळातले उच्चार, गाण्याची शैली थिएट्रिकल असायची. कुंदनलाल सैगल हा पहिला गायक सुपरस्टार. सी आत्मा , केसीडे हे अन्य. हे लोक गात असतानाचा काळ हा आताच्या आपल्या पिढीला जास्त आवडणारा नाही. एक तर खर्जात लावलेला आवाज , विचित्र ढब हे आता हास्यास्पद वाटते.

मुकेशने सुद्धा सुरूवातीची गाणी सैगलच्याच शैलीत म्हटली आहेत. दोघांच्यातला फरक ओळखू येत नाही इतकं विलक्षण साम्य आहे. नंतर हेमंतकुमार , तलत यांनी वेगळी शैली आणली. तलत त्याच्या मुलायम आवाजामुळे संगीतकारांच्या गळ्यातला ताईत बनला. थेट दिलीपकुमार, देव आनंद साठी तलतच्या आवाजात गाणी रेकॉर्ड झाली.

त्या वेळी मोहम्मद रफी लाहोर वरून मुंबईत आले होते. सुरूवातीला चाचपडत होते. त्यांचा आवाज ऐकून अनिल विश्वास म्हणाले हा तर भिकार्‍यासारखा गाणं गातो. दोन तीन सिनेमात रफीने कामही केलं. एकात त्यांना अन्य गायकाचा आवाज दिला होता. नंतर मात्र त्यांचाच आवाज त्यांना दिला गेला.

रफीला संधीची गरज होती. ती दिली तलत ने.
नौशाद निर्व्यसनी मनुष्य होता. पण इतरांनीही व्यसन केलेलं त्याला चालत नसे. तशा सूचना लिहीलेल्या असत. एक दिवस तलतला सिगरेटची तल्लफ आली म्हणून त्याने बहाणा करून रेकॉर्डिंग स्टुडीओच्या बाहेर जिन्यावर सिगरेट ओढायला सुरूवात केली. नेमका त्याच वेळी नौशाद बाहेर आला. त्याने तलतला सिगरेट ओढताना पाहिले मात्र, त्याचा रागाचा पारा एव्हढा चढला कि त्याने सहाय्यकांना आताच्या आता याला बाहेर काढा आणि जो कुणी गायक मिळेल त्याला धरून आणा असा हुकूम सोडला. तिथे जवळच रफीचं रेकॉर्डिंग चालू होतं. रफीसोबत एक दोन गाणी नौशाद ने केलीही होती. पण त्यात एका गाण्यात कोरस होता आणि अन्य एकात युगलगीत असल्याने एव्हढी ओळख नव्हती. तलतचं ते गाणं गाऊन घेण्यापूर्वी नौशाद ने तालीम घेतली आणि तो थक्क झाला.

इथूनच रफी युग सुरू झालं.
पार्श्वगायन हे वेगळं शास्त्र आहे हे सर्वात पहिल्यांदा रफीने ओळखलं. आज ज्याला आपण व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस कल्चर म्हणतो त्याची सुरूवात रफीने केली.

त्याचं नाव झालं ते ओ दुनिया के रखवाले या गाण्यामुळे. त्या वेळी रफीच्या गळ्यातून रक्त येत होतं अशा अफवा सर्रास होत्या. खर्जातल्या लो नोडस पासून अगदी वरच्या पट्टीतल्या वरच्या नोडस पर्यंत काहीच्या काही अफाट रेंज, पडद्यावर नायकाला शोभेल अशा हरकती, आवाजाचं टेक्श्चर बदलत ठेवणं यामुळे पार्श्वसंगीताचं शास्त्र लिहीलं जात होतं.

पुढच्या गायकांसाठी रफीने शास्त्र विकसित केलंं. जगात पार्श्वगायन हा प्रकार बॉलीवूडमध्येच असल्याने रेडीमेड काही नव्हतं. पुढे आशा भोसले आणि किशोरकुमार यांनी रफीचा कित्ता गिरवला. किशोरकुमार तर नंतर नंतर त्याच्याही पुढे गेला.

तलतचा आवाज कितीही रेशमी असला तरी पडद्यावरचा नायक गाणे गातोय असे कधीही वाटत नाही. एक वेगळीच भरजरी मैफिल चालू आहे आणि नायक गुणगुणतोय असेच वाटायचे.

मोहम्मद रफी यामुळेच मैलाचा दगड ठरले. रफीच्या, लताच्या गाण्यात प्रत्येक दशकानुसार बदल होत गेले. त्याबद्दल पुढे ..

रफी आणि नूरजहाँ यांचं 'यहा बदला वफा का, बेवफाई के सीवा क्या है' हे बैजू बावरा च्या आधी गाजलं होतं ना ? रफी स्वतः जी एम दुरानी च्या शैलीत गात असे म्हणे. ह्याच दुरानी वर पुढे एकदा रफीच्या मागे उभं राहून कोरस मध्ये गाण्याची वेळ आली

तलत मेहमूद अभिनेता बनण्यासाठी आले आणि झालेही. त्यांच्या आवाजातल्या कंपनामुळे त्यांना न्युनगंड होता. बहुधा अनिल विश्वास यांनी त्याला हीच तुझी स्ट्रेंग्थ आहे , असं समजावून आत्मविश्वास दिला
पडद्यावर तलत आणि आवाजही तलतचा अशी दोन गाणी
प्यार पर बस तो नहीं तेरा लेकिन फिर भी .
राही मतवाले तू छेड इक बार मन का सितार - सोबत सुरैया

रफीने दुराणी यांच्यासोबत गाणं गायलं ते संगीतकार शाम सुंदर यांच्यामुळे. शाम सुंदर यांना त्या वेळच्या एका निर्मात्याने रफीला संधी देण्यासाठी गळ घातली होती. नाव आठवल्यावर पुढे मागे देईन. त्याला कारण असे होते कि सैगलचा कार्यक्रम लाहोर मधे होता. नेमकी वीज गेली होती. गर्दी वाढत चालली होती. ती कधीही हिंसक होईल अशी लक्षणे होती. अशात रफीच्या मोठ्या भावाने माझा भाऊ गाणं गातो, सैगल येईपर्यंत आणि वीजेचा बंदोबस्त होईपर्यंत त्याला स्टेजवर गाऊ द्या म्हणजे पब्लीक शांत होईल असे सांगून पाहिले. आयोजकांपुढे दुसरा पर्यायच नव्हता. त्या काळात जनरेटर होते कि नाही कल्पना नाही.

रफीने एक तासभर गाणी सादर केली. आवाज एव्हढा खडा कि मागच्या माणसापर्यंत ते पोहोचत होते. तिथेच मुंबईचे हे निर्माते होते. त्यांनी रफी यांच्या भावाला रफीला त्यांच्या लाहोरच्या ऑफीसवर घेऊन यायची सूचना केली. त्या वेळी लाहोरला सिनेमे बनत असत. पण रफीची गाणी ऐकून त्यांनी चिठ्ठी देऊन मुंबईला शामसुंदर यांच्याकडे पाठवले. त्यांनी मग दुराणी यांच्याबरोबर कोरस मधे रफीला संधी दिली. काही गाणी गाजली पण रफीला ओळख मिळत नव्हती. त्यासाठी नौशाद, अनिल विश्वास सारख्या दिग्गजांकडे संधी मिळणे गरजेचे होते.

रफी आणि लता हे सिनेसंगीतात आले हे आपलं भाग्य। दोघांनी जर शास्त्रीय संगीताचा पर्याय निवडला असता तर ...

रफीचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण चालू होतं. लाहोरचा प्रसंग घडला आणि रफी अपघाताने मुंबईला आला.

एकदा मुलांना दिलीपकुमार कोण हे दाखवण्यासाठी टीव्हीवर युट्यूबवरचा "कौन कहता है कंबख्त" हा देवदास मधला शाहरूख खान आणि दिलीप कुमार यांच्या आवाजातला संवाद ऐकवला. तर दोघेही शाहरूखच्याच डायलॉगला खो खो हसत सुटले. असलं काही मेलोड्रामाटिक या पिढीला बघायचीच सवय नाही. तरी मी म्हणालो " ए गपा रे, आता थांबा दिलीपकुमार बघा"

मग कृष्णधवल रंगातला दिलीप कुमार चा तो प्रसिद्ध मोनोलॉग सुरू झाला. तर मुलगा लोळायलाच लागला. आधी खूप वेळ त्याने कंट्रोल केलेलं. मुलीलाही हसू आवरेना.

माझ्यासाठी हा परफॉरमन्स म्हणजे जसं रामायण,महाभारत परंपरेने चालत येतं तसं वाडवडलांपासून ऐकत आलेलो. भक्तीभावाने बघायला सुरूवात केलेली. मुलांनी दाणकन आदळून जमिनीवर आणलं.

मग त्यांना हे गाणं दाखवलं.
https://www.youtube.com/watch?v=1QwnFzxnMj0

या वेळी सगळेच हसून हसून लोटपोट झालेलो. खरे तर एकदा अचानक हे गाणं चित्रहार मधे लागलेलं. तेव्हां मी ही असाच लोळत होतो. तेव्हां वडलांना वाईट वाटलेलं. त्याचा बदला मुलांनी घेतला.

अजून एक...

एकदा आईला बिल्डींगमधल्या एका वयस्कर काकू अलंकार थिएटरला घेऊन गेल्या. चित्रपटाचे नाव होते अनमोल घडी. खूप वर्षांनी तो पुन्हा आलेला. आईला सुद्धा काहीच कल्पना नव्हती. राज, दिलीप, देव या त्रयीचं राज्य असताना ती शाळेत होती. तेव्हांपासून माझं अवांतर वाचन असल्याने आई मला जुन्या चित्रपटांबद्दल विचारते. बरेचदा मी तुझ्या वेळचा आहे ना, मग मला का विचारतेस असं म्हणायचो, तर आई म्हणायची अरे माझा जन्म पण नव्हता. मग मी चिडून विचारायचो मग मी तेव्हांपासून आहे का ? Lol

आईने अनमोल घडी कसा आहे रे विचारल्यावर मी ठोकून दिलं " सस्पेन्स आहे".
आई पिक्चरला जाऊन आली ते डोकं धरूनच. आधी मलाच झापलं, मग त्या काकूंचा उद्धार केला.
दर पाच मिनिटांनी गाणं असायचं. कधी पूर्ण गाणं खुर्चीत बसून, कधी एकाच जागी उभे राहून. नाही म्हणायला एक हिरॉईन गाणं म्हणताना स्वतःभोवती अर्धवर्तुळाकार गिरकी सदृश्य काहीतरी हालचाल करत होती. तेव्हढीच हालचाल.

कसे बघत असतील लोक असे सिनेमे आणि कसे काय सैगल ला बघायला इतकी गर्दी जमत असेल ?
एव्हढ्यासाठीच रफी देव आहे.

दत्ता डावजेकर (डी डी), दत्ता कोरगांवकर (के दत्ता) , आणि दत्ता नाईक (एन दत्ता) ह्या तीन मराठी दत्तांनी हिंदी चित्रपट संगीतात भरपूर काम केलं आहे

यांच्याशिवाय एक मास्टर दत्ताराम - दत्ताराम वाडकर होते. शंकर जयकिशनकडे सहाययक होते. त्यांच्या नावाने दत्तू ठेका प्रसिद्ध आहे .
त्यांनी मोजक्या चित्रपटांना संगीतही दिलं . आँसू भरी हैं ये जीवन की राहें (परवरिश - राज कपूर - मेहमूद) हे एक लक्षात आहे.

मस्त चर्चा चालू आहे.

तलतचं ते गाणं गाऊन घेण्यापूर्वी नौशाद ने तालीम घेतली आणि तो थक्क झाला. <<< हे गाणं कोणतं होतं?

ओके. Happy

वर पंकज मलिक यांचा उल्लेख आला आहे. लता मंगेशकरांच्या 'Shraddhanjali - My Tribute To The Immortals' या संचात पंकज मलिक यांचं 'ये रातें ये मौसम ये हँसना हँसाना' हे सुंदर गाणं त्यांनी गायलं आहे. ते गाणं ऐकलं तेंव्हा गाणं आणि पंकज मलिक हे नावही प्रथमच ऐकलं होतं. नंतर मूळ गाणंही ऐकलं, दोन्ही व्हर्जन्स अवीट आहेत.

छान प्रतिसाद सगळेच.
मागे कोणीतरी 'लारा लप्पा' या गाण्याचा उल्लेख केला आहे. 'एक थी लडकी' या चित्रपटातील सगळीच गाणी मस्त होती. मला लता आणि रफी यांचं 'अब हाले दिल और हाले जिगर कुछ ना पूछिये' ये गाणं खूप आवडतं. लताचा आवाज नूरजहासारखा वाटतो आणि रफीचाही अगदी वेगळा आहे पण गाणं ऐकायला आणि बघायलाही खूप मस्त आहे. मीना शोरी - मोतीलाल ही जोडी सिनेमात मस्त शोभते. त्या काळात नाटकी अभिनय जास्त करून बघयला मिळायचा, पण मोतीलाल यांनी अप्रतीम सहजसुंदर नैसर्गिक अभिनय केला आहे.

मधुबालाने बालकलाकार म्हणून बसंतमधे काम केलं. त्या चित्रपटातील 'मेरे छोटेसे मनमे छोटीसी दुनिया रे', ;गोरी मोसे गंगाके पार मिलना', 'हमे चाहिये हमारी दुनिया', ही सगळीच गाणी मस्त होती. संगीतकार बहुतेक विनोदच होते.

अमितव , धन्यवाद.

तीन दत्ता आणि मास्टर दत्ताराम यांचे उल्लेख आवडले.

तिकडचे काही प्रतिसाद इथे दिसत नाहीत. शोधणेही अवघड आहे.
मला गौहर जान विषयी दोन ओळी लिहायच्या होत्या. पण रघू आचार्य ह्यांचा तो प्रतिसादच सापडत नाही.

Pages