नास्तिक (१)

Submitted by कॉमी on 29 April, 2023 - 02:29

नास्तिक म्हणजे काय ?
-नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नसणारा माणूस.

विश्वास नसणे म्हणजे काय ?
- देव आहे असे मानण्यास कसलेही कारण नाही, त्यामुळे देव आहे असा विश्वास नाही.

देवावर विश्वास नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे सत्य मानणे आहे का ?
- नाही.

पण असे कसे ? देव अस्तित्वात आहे हे मान्य नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे मान्य झाले की !
- तीन वेगवेगळी वाक्य -
१. देव अस्तित्वात आहे.
२. देव अस्तित्वात नाही.
३. देव अस्तित्वात असल्याचा अथवा नसल्याचा कोणताही पुरावा नाही.
पहिली दोन वाक्ये सोपी आहेत. तिसऱ्या वाक्यासंबंधित-
-जोपर्यंत एखादी गोष्ट अस्तित्वात आहे ह्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट अस्तित्वात आहे ह्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही ह्याचा पुरावा नाही म्हणून आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. युनिकॉर्न, दंतपरी, ब्रम्हराक्षस, रक्तपिपासू, ड्रॅगन ह्यांच्या अस्तित्वात असण्याचा व नसण्याचा कसलाही पुरावा नाही. आपण जनरली त्यांचे अस्तित्व मानत नाही. तिसरे वाक्य हे विश्वास नाकारणे आहे. अस्तित्वावर विश्वास नाकारणे म्हणजे अस्तित्व नाहीच ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (Rejection of a belief is not acceptance of the opposite.)
ह्याचे एक प्रात्यक्षिक उदाहरण -
राजू आणि संजू कॉलेजातले एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. त्यांची दुष्मनी जगजाहीर आहे. एका दिवशी संजूच्या पालकांना सकाळी संजूच्या खोलीत त्याचा खून झालेला आढळतो. साहजिकच पोलीस राजुकडे संशयित म्हणून वळतात. पोलिसांना काय पुरावे सापडले ह्याच्या तीन केसेस पाहू.

१. राजुच्या हाताचे ठसे असणारा आणि संजुच्या रक्ताचे डाग असलेला चाकू सापडला. ह्यावरून पोलीस निष्कर्ष काढतात की राजूनेच संजूचा खून केला.

२.चाकू वैगरे काही सापडले नाही, उलट संजू ज्या रात्री मारला गेला त्या दिवशी राजू परगावी होता ह्याचा पुरावा सापडला. त्यामुळे, पोलीस निष्कर्ष काढतात की खून राजुने केले असणे अशक्य आहे, कारण तो तर ह्या गावातच नव्हता. त्यामुळे, पोलीस राजू निर्दोष आहे असा निर्वाळा देऊ शकतात.

३. पोलिसांना चाकू तर सापडत नाहीच, आणि राजूला तो कुठे होता विचारल्यावर तो सांगतो मी तर माझ्या घरीच होतो. म्हणजे पोलिसांना राजुच्या दोषी किंवा निर्दोष असण्याबद्दल कसलाही पुरावा सापडत नाही. पोलीस राजुबद्दल काहीही निष्कर्ष काढू शकत नाहीत. राजू दोषी असल्याबद्दल पुरावे नसल्याने अर्थातच त्याला काही शिक्षा झाली नाही. पण पोलिसांनी राजू निर्दोष असण्याचा निर्वाळा दिला असेही नाही.

पहिली केस म्हणजे देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे त्यामुळे देव आहे हे मानणे.

दुसरी केस म्हणजे देव नसण्याचा पुरावा असल्याने देव अस्तित्वात नाही हे मानणे.

तिसरी
म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा नसण्याने देव अस्तित्वात आहे हे मान्य न करणे. इथे हे महत्वाचे आहे - देवाच्या अस्तित्वावर विश्वासाचा अभाव म्हणजे देव नाही ह्यावर विश्वास ठेवणे नव्हे. दोन भिन्न गोष्टी आहेत. इथे राजू खुनी आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणे म्हणजे राजू निर्दोष आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (ह्याचे उलटे सुद्धा खरेच आहे. राजू निर्दोष आहे हे न स्वीकारणे म्हणजे राजू दोषी आहे हे स्वीकारणे होत नाही.) तसेच, देव अस्तित्वात आहे हा विश्वास नाकारणे म्हणजे देव अस्तित्वात नाही असा विश्वास ठेवणे नाही. तसेच, देव अस्तित्वात नाही ह्यावर विश्वास ठेवणे नाकारणे म्हणजे देव आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही.

तू देवाचे अस्तित्व अशक्य आहे असे मानतोस का ?
- नाही. कारण तसा पुरावा नाही.

म्हणजे तू देवाचे अस्तित्व शक्य आहे हे मान्य करतोस का ?
- नाही. देवाचे अस्तित्व अशक्य नाही ह्याचा पुरावा नाही, तसाच देवाचे अस्तित्व शक्य आहे ह्याचाही पुरावा नाही.

असे कसे ?
- देवाचे अस्तित्व शक्य आहे असे मानायला सुध्दा कसलाही पुरावा नाही. देवाच्या अस्तित्वाची शक्यता, अशक्यता ठामपणे सांगता येईल असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पुराव्याच्या अभावे शक्य अशक्य बाबींवर कसलेही भाष्य करणे शक्य नसते. आपण एखादी बाब शक्य आहे असे तेव्हा म्हणतो (उदा.) जेव्हा आपण ती घटना प्रत्यक्ष तपासली आहे किंवा तपासू शकतो. उदा, बॅटने चेंडू सीमापार टोलवणे शक्य आहे कारण आपण तसे होताना खूपदा पाहिले आहे. पण, जर तुम्ही चेंडूचे वजन किंवा सीमेची त्रिज्या हळूहळू वाढवत गेला तर एक असा बिंदू येईल जिथे तुम्हाला म्हणावे लागेल की मला हे शक्य आहे की नाही हे माहिती नाही.


अज्ञेयवादी आणि नास्तिक ह्यामध्ये फरक काय ?

- "देवाच्या अस्तित्वाबद्दल ह्याबद्दल कोणतेही ठाम दावे करता येत नाहीत" हे वाक्य दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितले की माणूस नास्तिक किंवा अज्ञेयवादी होतो -
देव आहे असे दाखवणारे पुरावे नसल्याने देव आहे ह्यावर मी विश्वास ठेवत नाही - नास्तिक.
देव आहे की नाही मला माहीत नाही - अज्ञेयवादी.
पण, अज्ञेयवाद असा पण आहे , की माणसाला देव असला काय आणि नसला काय, देवाच्या अस्तित्वाबद्दल खात्रीशीर माहिती मिळणे अशक्य आहे. त्या व्याख्येनुसार माणूस अज्ञेयवादी नास्तिक सुद्धा असू शकतो - असा माणूस ज्याच्या देवावर विश्वास नाही आणि ज्याला वाटते देवाच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहिती मिळवणे अशक्य आहे.

थोड्या वेळ देव खरेच आहे की नाही बाजूला ठेव. पण देवावर विश्वास ठेवण्यात वाईट काय आहे ? लोकांना मानसिक शांती मिळत असेल तर देवावर विश्वास का ठेऊ नये ?
- स्वतःची फसवणूक करणे चांगले नाही. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने मानसिक शांती मिळते, म्हणून तो विश्वास खरा होत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
तुमच्या उदाहरणात थोडा गोंधळ वाटत आहे.
१. राजुने नक्की खून केला = Theist आस्तिक
२. राजुने खून केला नाही, राजुने खून करण्याची काहीच शक्यता नाही. = Atheist नास्तिक
३. राजुने खून केला की नाही माहीत नाही. कदाचित केला असेल, कदाचित नाही, मला १००% खात्री नाही. अथवा, राजुने खून केला की नाही, हे ठरवायला आपल्याकडे पुरेशी खात्रीदायक माहिती नाही. = Agnostic अज्ञेयवादी
४. राजुने खून केला असू दे किंवा नसू दे, माझ्या आयुष्यात मला काहीही फरक पडत नाही. = Apatheist (It is more of an attitude rather than a belief, claim, or belief system.)

माझ्या माहितीनुसार Apatheist ला मराठीत शब्द नाही. फार तर 'या विषयात उदासीन' असे म्हणता येईल.

राजुने खून केला नाही - antitheist
antitheist
opposed to belief in the existence of a god or gods.

राजुने खून केला असा विश्वास ठेवायचे काही कारण नाही, त्यामुळे राजुने खून केला असा विश्वास नाही. -atheist
a person who disbelieves or lacks belief in the existence of God or gods.

चौथी कॅटेगरी सुध्दा उपयोगी आहे ! किमान दैवत्व (minimal theist) वर पुढील भागात लिहिणार आहे.

देव म्हणजे.
नवसाला पावणारा,आजारातून बरं करणारा,पापाची शिक्षा देणार,पुण्याचं चे बक्षीस देणारा .
ही देव विषयी माझी पण कल्पना नाही.
त्या पेक्षा काही तर वेगळी शक्ती.
लहान मूल लहानाचे मोठे होते,बर्भ वितळून त्याचे पाणी होते .
पण ते आपोआप होत नाही त्याला काहीतरी कारण असते.
मुलाची वाढ होते ह्याला जबाबदार पोषण आहे.
बर्फाचे पाणी होते ह्याला जबाबदार उष्णता आहे.
विश्व अस्तित्वात येण्यास काही तरी कारण आहे .
ते कारण म्हणजे देव.
देव म्हणजे एक शक्ती जस गुरुत्व आकर्षण ही शक्ती आहे.
वीज,चुंबकीय शक्ती ह्या जशा शक्ती आहेत तशी.
पण सर्वात बलवान असणारी.
म्हणजे देव.
अशी माझी तरी देव विषयी कल्पना आहे.

विज्ञान कधीच देव आहे किंवा नाही हे सिद्ध करू शकणार नाही .
पण विज्ञान देवाविषयी कल्पनेच्या विस्तार जरूर करेल.

असे आज तरी आपण म्हणू शकतो

नास्तिक म्हणजे.
आता जे देव आहेत .
जे आजारापासून बरे करतात,नवसाला पावत असतात इत्यादी .
ते देव नास्तिक नाकारतात .
पण विश्व चालण्यासाठी शक्ती( बल हा शब्द योग्य असावा) ची आवश्यकता आहे हे मात्र ते नाकारू शकत नाहीत.
ती बल मान्य करणे म्हणजे देव मान्य करणेच आहे.

तार्किक अतितार्किक विज्ञानवाद दर्शवत कितीही नाकारले देवाचे अस्तित्व तरी नास्तिक मनुष्य आणि अश्या माणसांच्या समाजाने उर्वरित जगास शष्प फरक कधीच पड़त नाही. जे शास्त्रज्ञ नास्तिक / अश्रद्धावान / श्रद्धाहीन होते त्यांच्या थिअरीज कालांतराने विज्ञान जगतात खोट्याच ठरल्या/ठरवल्या गेल्या. हयाउलट द्रष्टया ऋषींनी मांडलेल्या प्राचीन संकल्पनासुद्धा आजच्या आधुनिक विज्ञानाच्या चौकटीमध्ये तावून सुलाखुन फिट बसलेल्या पाहायला मिळतात.
विज्ञानाच्या चौकटीमध्ये राहून दैववाद आणि श्रद्धा दर्शवणे नेहमीच श्रेयस्कर असेल आणि ह्याच उलट निव्वळ कर्मकाण्ड आणि धार्मिक असमतोल राखणाऱ्या मूल्यांनी समाजाचे कधीच भले होऊ शकले नाही. उलट सामजिक नितिमूल्यांचा ऱ्हास झालेला इतिहासात दिसून येतो

चांगलं लिहिलंय कॉमी.
माणसाची किंवा समाजाची नीतिमत्ता आणि आस्तिक/नास्तिकता यांचा काहीही परस्परसंबंध नाही.
माणूस आस्तिक/धार्मिक असला म्हणून तो नीतिमत्ता जपणारा असतो असं नाही आणि नास्तिक असला म्हणून तो नैतिकतेने वागत नसतो असं नाही. हे दुसऱ्या बाजूनेही खरं आहे.

खरया खोट्याचा प्रश्न विज्ञानातच येतो. कारण तिथे गोष्टी तपासल्या जातात. धार्मिक परीकथांचे तसे नाही. सगळे श्रद्धेवर घ्यायचे असते, पुरावा मागायचा नसतो. विषय संपला. त्यामुळे हजारातला एक तुक्का लागला की "आम्ही कसे हुश्शार" म्हणायला मोकळे.

होय पटते. उत्तम विवेचन. नव्या धाग्यात आपले विचार मांडले हे उत्तम केलेत. आता इथे चर्चा होउ शकते व अन्य धागे हायजॅक होत नाहीत. तिथेही आपल्याला काय म्हणायचे ते लक्षात आले होते परंतु ज्योतिषाचा धागा असल्याने मी आगीस हवा दिली नाही अर्थात विषय वाढवला नाही.

>>>>>>स्वतःची फसवणूक करणे चांगले नाही.
तसे नाही. श्रद्धा हे एक साधन म्हणुन तिच्याकडे पाहीले तर? साधन हे २ प्रकारे वापरता येते - विधायक (कन्स्ट्रक्टिव्ह) रीतीने, किंवा मारक (डिस्ट्रक्टिव्ह) रीतीने. पेन्सिलीने आपण लिहू शकतो function at() { [native code] }हवा कान खाजवुन कानाच्या पडद्याला इजा पोहचवु शकतो. तेव्हा श्रद्धेचा उपयोग तामसिक करायचा की सात्विक किंवा राजसिक ते आपल्यावरती नाही का?
आपल्याला म्हणजे कॉमन मॅन .... आय क्यु कितीसा असतो? मर्यादित. ज्ञानेश्वर, आदि शंकराचार्य, पुरंदरदास यांचा आय क्यु नक्कीच विलक्षण होता, मॅसिव्ह होता. मग त्यांनी सांगीतलेले डोळे मिटून ऐकले तर हरकत कुठे स्पेशली तेव्हा - की प्रत्येक संत एकच गोष्ट वारंवार वारंवार सांगतो आहे.
तेव्हा देवाचे अस्तित्व ही एक मोठ्ठी सामाईक, आणि प्रचंड कालखंडाला व्यापून उरणारी संतांची कॉन्स्पिरसी तर असू शकत नाही ना. तेव्हा काय हरकत आहे त्यांनी म्हणजे पुर्वसूरींननीदर्शविलेल्या पथावरुन जाण्यात?
व्हील रि-इन्व्हेन्ट करण्यात काय पॉइन्ट आहे?
मला वाटते आस्तिक-नास्तिक हे वाटते तितके साधे सोपे नसावे. ते हाडामासात भिनलेले कॉन्फिग्युरेशन अर्थात कल असावा. पण हा माझा अंदाज आहे. याला सपोर्टिंग पुरावा/ अभ्यास नाही.

कॉमी छान लिहिलत. (1) म्हणजे अजूनही लेख येतील; हो न? मग त्यात चार्वाक, लोकायत यावरही लिहालच.
तोवर, चर्चा पूर्ण वैचारिक पातळीवर राहिल हे गृहित धरून माझे दोन शब्द -

चार्वाक किंवा लोकायत किंवा नास्तिकवाद या बद्दल फार कमी लिखित माहिती सापडते. अनेकदा यातच बौद्ध अन जैन तत्वांचाही समावेश केला जातो.
वर वर पहाता देव आणि वेदांचे महात्म्य नाकारणारे असे स्वरुप मानले जाते.
पण या सर्वांमधे बरेच फरक आहेत.
यातील फक्त चार्वाक अन लोकायत यांचा विचार आता करते.
वेदकाळात जे तत्वज्ञान मांडले गेले, ते तत्वज्ञान न पटणाऱ्या व्यक्ती वा समूहाला चार्वाक म्हटले जाते. ही एकच व्यक्ती होती की समूह होता की काळाच्या ओघात अनेक व्यक्ती होऊन गेल्या याची निश्चित माहिती नाही.
तसेच हे तत्वज्ञान म्हणजे नेमके काय याची, एकग्रंथ मांडणी सापडत नाही. काहींच्या मते चार्वाकाची ग्रंथसंपदा जाळली गेली. काहींच्या मते चार्वाकांमधे शिष्य परंपरा नसल्याने  आणि त्याकाळी प्रामुख्याने मौखिक वाड्:मय असल्याने; चार्वाक तत्वज्ञान पुढील पिढ्यांकडे संक्रमित झाले नाही, नष्ट झाले.
मग आज आपल्याला हे तत्वज्ञान कसे कळते? तर वेद, पुराण आणि नंतरच्याही  वाड्:मयामधे चार्वाकांना खोडून काढण्यासाठी आधी त्यांची तत्वे मांडली गेली अन मग त्यावर टिका करून ती खोडून काढली गेली. अर्थातच वेदांना, शिष्यपरंपरा असल्याने हे सगळे मुखोद्गत होऊन पुढे ते लेखी स्वरुपात आले.
तर काहींच्या मते, प्रत्येक काळात असे विचार करणारे असतातच. जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. अशा लोकांची शिष्य परंपरा लौकिकार्थाने अन भौतिक स्वरुपात नसली, तरी असे विचार उमटत रहातात. अन त्यांची एक, खंडित अशी परंपरा असते.
देव, श्रद्धा, मान्यता या आणि अशा प्रत्यक्ष सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टी मान्य नसणे. जे प्रत्यक्षात दिसते, ज्याचा कार्यकारणभाव सिद्ध होतो ती आणि तीच गोष्ट मानणे म्हणजे नास्तिकता.  
कोणतीही गोष्ट मान्य करण्यासाठी पुरावे मागणं म्हणजे नास्तिकता, वा लोकायत. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारणे, उत्तरे मिळवून नि:शंक होणे म्हणजे नास्तिकता, वा चार्वाक. 
खरे तर, न हा नकारात्मक शब्दही आम्हाला खटकतो. कारण जे आस्तिक नाही ते; एव्हढेच आमचे व्यवच्छेदक लक्षण नाही. उलट प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून बघणं ही अतिशय सकारात्मक आणि कृतिशील (वैचारिक पातळीवर) गोष्ट आहे. पण सर्वच नास्तिक या, "न" लाही सामावून घेतात कारण जे सिद्ध होत नाही, ते ते नाकारणं याला आमच्याकडे पर्याय नसतो  Wink
जे समोर सिद्ध करता येते ते मान्य करणे. जे समोर सिद्ध होत नाही ते अमान्य करणे. अन भावी काळात ते सिद्ध झाले तर तितक्याच सहजपणे, निर्ममपणे मान्य करणे. ही नास्तिकाची काही व्यवच्छेदक लक्षणे. 
मुळात ज्ञानप्रक्रियेत कोणाचाही ( देव, रुढी, श्रद्धा, गुरु,.....) हस्तक्षेप मान्य न करता पूर्णत: बुद्धिनिष्ठ मार्ग अंगिकारणे म्हणजे नास्तिक, चार्वाक वा लोकायत!
माझ्या स्वल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यात अजून खूप बारीक सारीक तपशील आहेत, अगदी मला माहित नसणारेही असतील. 
(एका गृपवर चर्चेत लिहिलेलेच इथे कॉ पे केलय. वेळ कमी आहे सध्या, पण विचारांना जवळचा विषय म्हणून रहावलं नाही )

लेख आवडला कॉमी. प्रतिसाद सावकाश वाचेन.
ह्या प्रकारांत अद्वैतवादाचा अंतर्भाव होईल असं प्रकर्षाने वाटतं. तुम्हाला तसं नसेल वाटत तरी ठीकच आहे. Happy

सर्वात आधी देव आणि धर्म ह्यांची फारकत करा. लेखाचा विषय आहे देव आहे कि नाही.
त्याला धरून प्रतिसाद द्या. तसेच श्रद्धा वगैरे आली कि वादातली हवा काढून घेतली जाते.
लेखात तर्कशास्त्राचा उहापोह केला आहे. त्यामुळे लेखाचे स्वरूप सार्वत्रिक झाले आहे. म्हणजे abcने
kyz कडून पैसे खाल्ले कि नाही अशा वादाला देखील हा लेख लागू पडेल.
देव आहे किंवा नाही ह्या वादात कुठल्याही बाजूचा ठोस पुरावा पुढे आलेला नाही. लेखक कदाचित पुढच्या भागातून तो आणणार असावेत. तोपर्यंत घोडी आवरून धरूया.

सहमत देव आणि धर्म ह्यांची सरमिसळ नको.

मी देव मानतो कारण प्रतेक गोष्ट घडण्यासाठी शक्ती ची गरज असते.
गाडी तेव्हाच चालते जेव्हा इंजिन कार्य करते .
अतिशय गुंतागुंत असणारी आणि सहज न घडणारी प्रक्रिया म्हणजे जीवसृष्टी ..
प्रतेक प्रक्रिया योग्य वेळी योग्य प्रमाणात घडल्या शिवाय एक पेशी प्रण्या पासून बहु पेशिय अतिशय नियमबद्ध रचना असणारे प्राणी निर्माण च होवू शकत नाहीत..
वनस्पती तर खूप च वेगळ्या आहे .
त्यांची रचना तर खूप किचकट आहे.
ते असेच निर्माण होवू शकत नाही.
आज पण माणसाला जीव सृष्टी कशी निर्माण झाली आणि ती जगण्यास बाकी आवशक्य गोष्टींची साखळी कशी निर्माण झाली ह्याची उत्तरं माहीत नाहीत..
आहे त ते फक्त गृहितक ते नाकारणे च योग्य त्याला काहीच पुरावे नसतात फक्त अंदाज असतात
काहीच पुरावे नसणारे फक्त अंदाज असणारे गृहितक मात्र नास्तिक स्वीकारतात हा विरोधाभास आहे .
मला मात्र वेगळा च प्रश्न पडतो तो नास्तिक विचाराचा आहे .विश्व खूप विशाल आहे त्याची कल्पना करणे पण शक्य नाही
त्या विश्वात एक अतिशय नगण्य ग्रह पृथ्वी आणि त्या वरील प्राणी माणूस त्याला तर ब्रह्मांड समोर काहीच किंमत नाही ..अती नगण्य प्राणी.
आणि हा अती नगण्य प्राणी च विश्व निर्मात्याची कल्पना करतो हे कसे शक्य आहे.
माणूस नष्ट झाला तसे ईश्वर पण नष्ट होईल.
म्हणजे आतापर्यंत असलेल्या उपलब्ध ज्ञान नुसार .
ईश्वर चे अस्तित्व च माणसावर अवलंबून आहे का?

"प्रतेक प्रक्रिया योग्य वेळी योग्य प्रमाणात घडल्या शिवाय एक पेशी प्रण्या पासून बहु पेशिय अतिशय नियमबद्ध रचना असणारे प्राणी निर्माण च होवू शकत नाहीत.."
आता डार्विन हा शब्द विज्ञानाच्या पुस्तकातून हद्दपार केला गेला आहे ....
उत्क्रांती, जीवनसंघर्ष, पर्यावरणाशी जुळवून घेणे, तगून राहण्यासाठी बदल स्वीकारणे वगैरे तत्त्वे अर्थहीन आहेत.
म्हणून तर आम्ही बदलांना जोरदार विरोध करतो...

आज पण माणसाला जीव सृष्टी कशी निर्माण झाली आणि ती जगण्यास बाकी आवशक्य गोष्टींची साखळी कशी निर्माण झाली ह्याची उत्तरं माहीत नाहीत..>>> माणसाला माहित नाही असे म्हणू नका.
तुम्हाला माहित नाही अस म्हणा. मलाही माहित नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही कि "माणसाला" माहित नाही. शास्त्रज्ञ अथक परिश्रम करत आहेत. त्यांना बऱ्याच गोष्टी माहित होत आहेत. आणि पुढेही माहित होतील.
तर ह्या गुंतागुंतीच्या गोष्टी निर्माण करण्यासाठी आणि त्या अखंड चालू ठेवण्यासाठी देवाची संकल्पना पुढे आणणे. तो देव कित्येक पटींनी गुंतागुंतीचा असेल नाही का? मग त्या देवाला निर्माण करण्यासाठी अजून एक सुपर देव. अशी देवांची साखळी तयार करावी लागेल. त्या पेक्षा विज्ञानाची कास का धरत नाही?

आता डार्विन हा शब्द विज्ञानाच्या पुस्तकातून हद्दपार केला गेला आहे ....
माझ्या अल्प ज्ञाना नुसार डार्विन एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले हे सांगत नाही.
ना एक पेशी य पासून बहुपेशीय जटिल रचना असणारे सजीव कसे निर्माण झाले हे सांगत.
डार्विन फक्त सजीवांच्या सवयी,संघर्ष,हवामान नुसार
त्यांच्या शरीर रचनेत कसा बदल होत गेला इतकेच सांगतो.

Genetic material.
हा शब्द अती महत्वाचा आहे.
RNA ची निर्मिती हा तर कठीण प्रश्न आहे.
डार्विन ते सांगत नाही

Hemant 333
मानल तुम्हाला. माझा असा ग्रह झाला कि वरच्या ref मध्ये ते एक्स्प्लेन केलय.

@अज्ञानी, वावे, सामो, अवल, अस्मिता, मानव, केशवकूल, हीरा, हेमंत सर सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

@वावे, माणसाची किंवा समाजाची नीतिमत्ता आणि आस्तिक/नास्तिकता यांचा काहीही परस्परसंबंध नाही- हो खरे आहे. नास्तिक ह्या शब्दातून देवावर विश्वास नाही ह्या महितीखेरीज इतर कोणतीही माहिती मिळत नाही.

@अवल मस्त प्रतिसाद. वेळ मिळाला तर नक्की आणखी लिहा लोकायत, चार्वाक बद्दल. म्हणजे माझा स्पेसिफिकली अभ्यास नाहीये ह्या परंपरांचा, पण विंदांचे अष्टदर्शन खूप दिवसांपासून वाचण्याच्या यादीत आहे. त्यातला चार्वाक वरचा छोटासा भाग रेडिओ वर ऐकलेला आणि पटलेला, आवडलेला.

@केशवकूल: द्या टाळी. मी सुद्धा अशीच उत्तरे दिली असती. पुराव्याबद्दल- देव नसल्याचा माझ्याकडे काही पुरावा नाही. पण, देव असण्यासंदर्भात काही वाद केले जातात त्यांवर पुढील भागांमध्ये टीका करणार आहे. आणि, आस्तिक वाचकांनी त्यांच्या बाजूचे मुद्दे/पुरावे टाकल्यास अर्थातच स्वागत आहे. शेवट एक धागा वाचक फीडबॅक/वाचकांनी उपस्थित केलेले मुद्दे यावर काढण्याचा विचार आहे.

@सामो, श्रद्धा एक साधन मानले तर त्या साधनाचा परीघ लक्षात ठेवणे गरजेचे आहे. श्रद्धा हे मानसिक स्थैर्य, आनंद देण्यासाठी साधन असेल कदाचित पण ते कधीही सत्य काय आहे हे समजण्यासाठी वापरण्याचे साधन नाही, होऊच शकत नाही. श्रद्धेची ही मर्यादा लक्षात घेतली जात नाही म्हणून तर नास्तिक ही वेगळी कॅटेगरी तयार झाली आहे. (अजून बरेच लिहिण्यासारखे आहे, पुढील लेखात कव्हर करतो.)

@हेमंत सर तुमचे प्रश्न पुढील लेखांमध्ये येणारच आहेत. केशव ह्यांनी तुमच्या प्रश्नाला वैज्ञानिक आधारांवर उत्तरे दिलीच आहेत. मी वेगळ्या अँगल ने विज्ञानाचा आधार न देता उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

तुम्ही तुमच्यासाठी चौकट आखून घेतली आहे. त्या चौकटीत असणाऱ्यांना हे लागू आहे. पण चौकटीबाहेरच्यांना नाही.
ग्रीक तत्त्वज्ञानात सिद्धता यावर इतके सुंदर विवेचन आहे की वाचताना समजून घेताना पटवण्याची किती काळजी घेतली आहे त्याचे आश्चर्य वाटते.
तर तुमच्या चौकटीचे नियम हे काही गृहितके सत्यता न पडताळता मान्य करून पुढे जायचे आहे.

<<जे शास्त्रज्ञ नास्तिक / अश्रद्धावान / श्रद्धाहीन होते त्यांच्या थिअरीज कालांतराने विज्ञान जगतात खोट्याच ठरल्या/ठरवल्या गेल्या. हयाउलट द्रष्टया ऋषींनी मांडलेल्या प्राचीन संकल्पनासुद्धा आजच्या आधुनिक विज्ञानाच्या चौकटीमध्ये तावून सुलाखुन फिट बसलेल्या पाहायला मिळतात.>>
अजून येऊ द्या.

Pages