बुलेटप्रूफ कॉफी

Submitted by sunilt on 15 February, 2023 - 00:27

२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. मा‍झ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्‍या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

तसे पाहीले तर इंटरनेटवर अक्षरश: हजारो उपाय उपलब्ध आहेत. परंतु मला सोपा, खात्रीशीर, स्वस्त आणि सर्वात मुख्य म्हणजे लॉजिकली पटणारा असा उपाय हवा होता. दोन प्रकार सापडले -

१) डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा. जे म्हणतात दिवसातून फक्त दोन वेळाच खा.

२) काही विदेशी तज्ञांचा (डॉ. जेसन फुंग, डॉ. स्टर्न एकबर्ग, डॉ. अनवीन इत्यादी). जे म्हणतात दिवसाचे दोन भाग करा. एक १६ तासांचा ज्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे. आणि दुसरा ८ तासांचा, ज्यात दिवसभराचे खाऊन घेणे.

वरील दोन्ही उपायांत एक गोष्ट समान होती ती म्हणजे साखर पूर्णपणे वर्ज्य करणे आणि पिष्टमय पदार्थांचे (कार्बोहायड्रेट) चे प्रमाण कमी करणे. म्हणजेच सोप्या भाषेत धान्ये (गहू, तांदूळ), बटाटे इत्यादी कमी खाणे.

दोन्ही पद्धती लॉजिकली पटल्या असल्यामुळे मी त्यांचे मिश्रण करायचे ठरवले. आणि ८ तासांत दोन जेवणे करणे आणि उर्वरित काळात काहीही न खाणे, असे सुरू केले. अर्थात दोन जेवणांच्या मध्ये विना साखरेचा आणि कमी दुधाचा चहा किंवा कॉफी घेता येत होतीच. परंतु मला त्यात काहीतरी नाविन्य असावे वाटल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू केली. आणि मला गवसली - बुलेटप्रूफ कॉफी.

मूळ पाश्चिमात्य पाककृतीत, फिल्टर कॉफीत क्रीम घालून पिणे असे आहे. मी त्यातील सारांश घेऊन स्वत:ची पाकृ बनवली. फिल्टर कॉफीऐवजी इन्स्टंट कॉफी वापरणे. आणि क्रीमऐवजी खोबरेल तेल वापरणे (शेवटी दोन्हीत १००% फॅट्च).

तर ही आहे सोपी, चटकन होणारी आणि पौष्टिक भारतीय पद्धतीची बुलेटप्रूफ कॉफी.

साहित्य -

इन्स्टंट कॉफी - १ चमचा
खोबरेल तेल - आवडीनुसार १-२ चमचे
गरम पाणी - १ कपभर

(वर सांगितलेल्या उपायांनी माझे वजन अवघ्या दोन महिन्यात ६० किलोंवर आले. मधल्या काळात ४-५ लग्न इत्यादी कौटुंबिक समारंभात भाग घ्यावा लागल्याने तेवढे दिवस ढील द्यावी लागली. ते जमेस धरूनही दोन महिन्यात ८ किलो कमी ही चांगलीच उपलब्धी म्हणायला हवी!)

https://drive.google.com/file/d/1cz5cNbB78f05I-eoaNnFFNLVkYn3p83Q/view?u...

Group content visibility: 
Use group defaults

हा हा हा!!!

१) एका कपात एक चमचा कॉफी पावडर घ्या.
२) त्याच कपात १-२ चमचे खोबरेल तेल टाका.
३) त्याच कपात गरम पाणी ओतून ढवळा.
४) बुलेटप्रूफ कॉफीचा आस्वाद घ्या!

फेब्रुवारीत होणार्‍या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने
>>>>

याचा अर्थ तुम्ही धावायचा सरावही करत असाल. त्याचाही फायदा झाला असेल ना वजन घटण्यास.

धावण्याचा फायदा झालाच पण तो थोडा. फार नाही. कारण धावत तर मी गेली अनेक वर्षे आहे (लॉकडाऊनचा काळ वगळता). पण त्यामुळे वजनात फार फरक नव्हता.

खरे म्हणजे वजन घटवण्यात आहाराचे योगदान ८०-८५% तर व्यायामाचे जेमतेम १५-२०% असते.

माझे वजन ७६ किलो आहे मला ६० किलो करायचे आहे तर वरील रेसिपी आणि तुम्ही आचरणात आणलेली कृती हे साधारण किती महिने केल्यावर नक्की खात्रीशीर फरक पडेल ? ACV पिऊन इंचभर फरक नाही पडला, माझे पाय दुखू लागले म्हणून थोडे दिवस ACV पिणे बंद केले तर पाय दुखणे हि बंद झाले। बुलेटप्रूफ कॉफी प्यायल्यावर असे काही दुष्परिणाम होतात का ? ते खोबरेल खाद्य तेल साधारण इकॉनॉमिकल आहे का ? का खर्चिक कारभार ? मला बॉर्डरलाईन डायबिटीस आहे तर मी दोन वेळा नॉर्मल दुधाची कॉफी अर्धीच चवीपुरती पिते , या कॉफीने बॉर्डरलाईन च्या अल्याड पल्याड जाण्याचे चान्सेस आहेत का ? अजून प्रश्न आहेत नंतर लिहिते। यांची उत्तरे नक्की द्या।

वा भारीच
एकच सुचवेन: पॅराशूट आणि अन्य तेलात थोडे केमिकल्स असतील
जमल्यास नेचरझेस्ट किंवा इतर कोणत्याही तुम्हाला विश्वासू माहीत असलेल्या ब्रँड चे व्हर्जिन कोकोनट ऑईल वापरा.

@Ajnabi
सर्वप्रथम वजन वाढण्याचा / कमी करण्याचा फंडा लक्षात घ्या. बुलेटप्रूफ कॉफी हे वजन कमी करण्याची रेसेपी नाही. तो एक विरंगूळा आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत वा त्याने डायबेटीसला काही धोका नाही.

एखादी हायब्रीड गाडी ज्याप्रमाणे दोन इंधनांवर चालते (समजा सीएनजी आणि पेट्रोल) त्याचप्रमाणे आपले शरीरदेखिल दोन इंधनांवर चालते - ग्लुकोज आणि चरबी (फॅट्स).

परंतु होते काय की आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे (दर ३-४ तासांनी काहीतरी खाणे वा चहा-कॉफी घेणे) रक्तातील ग्लुकोजची पातळी दिवसभर कायम चढीच राहते. इंधन म्हणून शरीरातील फॅट्स वापरले जातच नाहीत. रात्रीच्या ८ तासांच्या झोपेमुळेच काय तेव्हा ग्लुकोजची पातळी कमी होते. पण लगेचच आपण १-२ चमचे साखर घातलेला चहा पितो आणि ग्लुकोजची पातळी पुन्हा वाढवतो!

तर, जर शरीरातील चरबी जाळायची असेल तर सर्वप्रथम रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी राखणे जरुरीचे आहे. आणि हे साध्य होते दोन प्रकारे -
१) कमी वेळा खाणे.
२) जेव्हा कधी खाणे होईल तेव्हा असे पदार्थ खाणे जेणेकरून ग्लुकोज फारसे वाढणार नाही.

ग्लुकोज वाढवणारे पदार्थ म्हणजे - साखर-गूळ वा अन्य गोड पदार्थ, गहू-तांदूळ वा अन्य धान्यांपासून बनवलेले पदार्थ, बटाटे-रताळी आदि स्टार्च असलेले कंद.

याच्या जोडीने जर थोडाफार व्यायम केला तर फॅट्स जाळायला अधिकच मदत होते.

दोन जेवणांच्या दरम्यान ब्लॅक वा ग्रीन टी वा ब्लॅक कॉफी घेतलीत तरी चालते कारण या पेयांमुळे ग्लुकोजची पातळी वाढत नाही. वर उल्लेखलेली बुलेटप्रूफ कॉफी हादेखिल एक ग्लुकोज न वाढवणारा विरंगुळा! कारण शुद्ध फॅट्समुळे ग्लुकोज वाढत तर नाहीच शिवाय एक प्रकारची संपृक्तता (satiety) येते. त्यामुळे भुकेची भावना चटकन लागत नाही.

@mi_anu
पॅरशूटमध्ये काही केमिकल्स असणे अगदी शक्य आहे. पण ती नगण्य स्वरूपात असावीत. रिफाईंड वनस्पती तेलाएवढी तरी नक्कीच नसावीत. तरीही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वर्जिन ऑईल केव्हाही चांगलेच. तसे साजूक तूप वा लोणीदेखिल चालू शकते.

शुद्ध फॅट रक्तातील ग्लुकोज वाढवीत नाही. तेव्हा शुद्ध फॅट असा कुठलाही पदार्थ चालू शकेल.