काटेसावर

Submitted by स्वान्तसुखाय on 29 March, 2022 - 06:47

काटेसावर

सरत्या फाल्गुन महिन्याबरोबर उन्हाची लाहीलाही वाढू लागते . थंडीतली आपली कोवळी सोनेरी कात टाकून माघातले ऊन भट्टीतल्या आगीसारखे तापू लागते. दुपारी उन्हाच्या झळा सहन होत नाहीत आणि मातीच्या मडक्यात निवांत जाऊन झोपावेसे वाटावे अशा उष्ण वाफा वाहू लागतात.रूक्ष, कोरड्या, मातकट, तपकीरी आणि करड्या धुळकट रंगानी निसर्ग भरून जातो. निष्पर्ण, सांगाडे झालेल्या, पानंपान झरलेल्या उदास झाडांकडे पाहवत नाही. विस्तिर्ण माळरानावर नजर पोचेल तिथपर्यंत ऊनच ऊन दिसू लागते. या उन्हापासून वाचायला कुठे तरी दूर दूर जावेसे वाटू लागते. मग तुम्ही कुठेतरी एकांत निवांत ठिकाणी जाण्याचं ठरवता. गावच्या मूळ घरी, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी ,एखाद्या मित्राकडे….! तुम्ही कुठेही जा...जंगलात, डोंगरकपारीत, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर, गावच्या वेशीवर, रस्त्यावर, रेल्वेच्या ट्रॅकवर, पायवाटेववर, कुंपणाच्या टोकाशी तुम्हाला काटेसावर भेटतेच भेटते. भेटते म्हणजे ती वर्षानुवर्षे तिथेच असते पण तिचं असणं तुम्हाला जाणवलेलं नसतं. यावर्षी ऊन जरा जास्तच आहे असं पिवळ्या चकचकीत उन्हाकडे पाहत म्हणत असताना अचानक डोकावणारे हे गर्द गुलाबी गेंद पाहून तुम्ही जागीच थबकता आणि एक क्षण विचार करता ...हया असल्या निष्पर्ण, कोरडया रखरखीत उन्हात ही गुलाबी छटा आली कुठून !
images (20).jpeg

उन्हाळा आला की काटेसावर फुलू लागते. खरं तर कुठल्याही झाडाचं जीवनचक्र हे आधी पानं, मग कळ्या फुलं नि मग फळ असंच. पण काटेसावरीला हा नियम नामंजूर! या झाडाला पानगळी नंतर नवीन पाने येण्याआधीच फुले येतात. साधारण डिसेंबर मध्ये वसंताच्या स्वागतासाठी ती आपलं पानंपान झाडून सज्ज होते. तिचं असणं जाणवतं ते तिच्या बहराच्या वेळी. झाडावर एकही पान नाही, हिरव्या रंगाचा लवलेशही नाही; अशी काटेसावर अगदी एकाकी, पोरकी पोरकी वाटते. तिच्या त्या करड्या काटेरी खोडातून कळ्यांचे हिरवे फुटवे डोकावू लागतात. दिसामाजी ही हिरवी गोंडस गुटगुटीत बाळे बाळसे धरू लागतात. आणि मग एका सकाळी गुलाबी झगे घालून सूर्याच्या किरणात चमकणारी फुले झाडावर दिसू लागतात. काटेसावर वयात येते ! आजूबाजूची झाडे ह्या पोरक्या काटेसावरी ला आधार देऊ पाहतात, तिच्याकडे झुकून प्रौढ अनुभवाचा सल्ला देऊ पाहतात...पण काटेसावर मुलखाची हट्टी! कमालीची बंडखोर!! ती कुणाचंच ऐकत नाही. प्रखर तापणारं ऊन, तळपणारा सूर्य, उन्हाच्या झळा घेऊन येणारा वारा...कुणा कुणाची कदर ती करत नाही.. मान वर उंचावून काटेसावरीची ही निर्भिड फुले संकोच, भीती, काहीही न बाळगता थेट सूर्याशी दोस्ती करू पाहतात.

उन्हाळा वाढू लागतो. ऊन चढू लागते. आजूबाजूच्या झाडांच्या नुकत्याच फुटू लागलेल्या चुकार पालवीची लाही लाही होते. अगदी जून पानं देखील म्लान होऊन जातात. मान झुकवून उन्हाला टाळू पाहतात. पण काटेसावर कुणालाच घाबरत नाही आणि कशाचीही फिकीर करत नाही. वाढत्या ऊनाबरोबर ती अधिक गुलाबी, अधिक गडद, अधिक धीट, अधिक आक्रमक बनत जाते. ही गर्द गुलाबी फुले पाकळ्यांचे हात आसमंतात झेपावत ताठ मानेने सरळ, अविरत, अविश्रांतपणे सूर्याकडे पाहू लागतात. काटेसावर चक्क सूर्याच्या प्रेमात पडते. हा उघडउघड, दाहक, प्रखर प्रणय तिला अधिक तडफदार, अधिक बंडखोर बनवतो.
IMG_20220329_130233.jpg

उन्हामध्ये ह्या फुलांचा गुलाबी रंग अधिक चमकदार होतो. जणू काही आत्ताच दिलेला ओला ओला गुलाबी ऑइल पेंट. हात लावला तर चिकटेल की काय इतका ताजा ओला, गर्द गुलाबी रंग. काटेसावरीच्या फुलांचा गुलाबी रंग ही निसर्गाची एक अनोखी किमया आहे. फुल म्हटलं की सहसा त्यात थोड्या गडद, थोड्या फिक्या छटा, विरुद्धरंगी ठिपके, रेषा, हलके शिडकावे, पुसटसा दुसऱ्या रंगाचा स्पर्श असतो. पण इथे ते लाड नाहीत. काटेसावरीच्या फुलाचा रंग हा एका फटकाऱ्यात दिला जावा तसा हा एकसंध गुलाबी रंग आहे. भडक, गडद, फिकी अशा मिश्र छटा त्यात नाहीत. फक्त तलम गुलाबी रंग ...ज्याला तो ओला आहे का हे हात लावून पाहण्याचा मोह व्हावा इतका राजस, लोभस, रसरशीत, गुलाबी रंग ! आपल्या हाताच्या ओंजळीएवढे हे फुल पाच पाकळ्यांचे असते. त्याच्या मध्यबिंदूतून कारंजे बाहेर उसळावेत तसे टप्याटप्याने सफेद रंगाचे पुंकेसर बाहेर पडतात. या पुंकेसरच्या टोकाला चहापावडरच्या रंगाचे व पोताचे हलके, खुसखुशीत असे परागकण असतात. कोमेजून, उन्हांने होरपळून धरणीवर पडलेल्या फुलातले हे परागकण हाताने चुरले की उन्हाचा दाह नक्कीच जाणवतो. निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर वाकड्यातीकड्या करड्या फांद्यावर अधूनमधून गुलाबी गेंद चिकटलेले असे हे एकाकी झाड कधी कधी चिनी बनावटीच्या चित्रासारखे दिसते.

फोटोग्राफर आणि चित्रकार या दोघांनाही काटेसावरीच्या फुलांच्या चित्रीकरणाचे प्रकरण कठीण वाटते. कारण फोटो काढायचा म्हटलं तर फुलांनी रुसलेल्या नवरी सारखे तोंड फिरवलेले. त्यामुळे जमिनीवरून फोटो काढायला गेलं तर या फुलांचा मोहक गुलाबी अंतर्भाग टिपता येत नाही. शिवाय कॅमेरा चकचकीत प्रकाशासमोर येतो तो त्रास वेगळाच. आणि चित्रकाराने त्याचा कुंचला सरसावून, रंगपेटी उघडून कामाला लागायचे म्हटले तर गुलाबी सोडून इतर रंगांचे विशेष कामच नाही!बरे त्या रंगांचे दोन तीन फटकारे मारून काम उरकून टाकावे म्हटले तर असा गुलाबी रंग रंगपेटीत आयता उपलब्ध नसतोच मुळी. तो अस्सल, रसरशीत गुलाबी रंग तयार करण्यासाठी चित्रकारालाही काटेसावरीकडेच शिकवणीच लावावी लागेल! पण काटेसावरीला कुठे आलाय इतका वेळ..तिच्या डेड लाईन्स फारच टाईट असतात!

लॅकमी रोझी प्लम डार्क शेड ची लिपस्टिक लावलेले हे शेकडो गुलाबी ओठ कैक पक्षांना भुरळ पाडतात. साहजिकच आहे..अशा ओल्या ओठांमधला मध कुणाला नको वाटेल ? कडक उन्हामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. पानाफुलांवर आढळणारे तुडतुडे, लहान कीटक, किडे या पक्षांच्या नैसर्गिक खाद्याची कमतरता भासू लागते. अशावेळेस काटेसावरीचे फुल एखाद्या रसवंतीगृहाप्रमाणे काम करते. पक्षांना आवश्यक पाणी, जीवनसत्वे आणि क्षार याची उणीव या फुलातील रसामुळे भरून निघते. उष्माघातापासून त्यांचे संरक्षण होते. फुलाची रचना घंटाकृती असल्यामुळे त्यातील खोलगट भागातील रस प्राशन करणे पक्षांना सुलभ होते. त्यामुळेच की काय "इक सिर्फ़ हम ही मय को होंठों से पिलाते हैं...कहने को तो दुनिया में मयखाने हज़ारों हैं.." अशी ऑफर देणाऱ्या या झाडावर सकाळी सात वाजल्यापासूनच चष्मेवाला, शिंजिर, राखी वटवट्या, शिंपी, चिमण्या, कोतवाल, बुलबुल, मैना, धनेश, गरुड, हळद्या या पक्षांची गर्दी दिसून येते. फुलाच्या कोवळ्या पाकळ्या हे खारूताईचे आवडते खाद्य आहे. सकाळच्या वेळेचा हा किलबिलाट, पक्षांनी घेतलेल्या ताना, स्वकीयांना घातलेली मधुर साद मन मोहहून टाकते. काटेसावरीवर फुले आहेत तोवर ही बेथोवन सिंफनी नित्यनेमाने ऐकू येते.

ग्लिरिसिडिया, पांगीरा आणि पळस हे काटेसावरी चे ह्या सेमिस्टर मधले वर्गमित्र. पण प्रत्येकाची अदा निराळी. ग्लिरिसिडियाच्या पांढरट गुलाबी,फिक्या जांभळ्या पाकळ्यांमध्ये नववधूचा सलज्ज संकोच आढळतो तर पळसाच्या पेटत्या केशरी तनामनामध्ये रणधुमाळी माजलेली...भगवा फेटा बांधून लढाईवर निघालेल्या मर्द मावळ्यासारखी..पांगीरा आरक्त....भांगात कुंकू भरून कुंपणाशी स्वागताला उभा राहिलेला.. हे सगळेच पानगळी वृक्ष असले तरी क्वचित एखाददुसरे पान, शेंग त्यांच्या देहावर असते. काटेसावरीची बंडखोर फुले मात्र सगळा गोतावळा दूर सारून सूर्याला फितूर झालेली.

दिवसभर सूर्याकडे संमोहित होऊन पाहणारी ही फुले थकली तरी मान वळवत नाहीत. सूर्याची किरणे त्यांना स्पर्शून आरपार निघून जातात. मग मात्र त्यांचा संयम संपतो. उन्हाने होरपळून गेलेले, कोमेजलेले फुल मग एखादया संध्याकाळी टपकन खाली पडते. हळूहळू झाडाखाली अशा करपलेल्या फुलांचा खच पडतो आणि झाड पुन्हा एकदा निष्पर्ण बोडके होऊन जाते. काटेसावरीच्या आयुष्यातला एक अध्याय संपतो!

एव्हाना एप्रिल सुरू झालेला असतो. आजूबाजूच्या झाडांवर चैत्रपालवीची झालर सजू लागते. आता काटे सावर घोसाळ्यासारखी लहान हिरवी बोंडे धारण करते. लवकरच ही बोंडे पक्व होऊन गडद चॉकलेटी काळपट रंगाची होतात. एकंदरीतच ह्या झाडाने एशियन पेंटशी घाऊक रंगाचा करार केलेला असावा. कारण फुलांचा गर्द गुलाबी, पानांचा हिरवागार आणि बोंडांचा वॉलनट चॉकलेटी हे सर्वच रंग एकसंध.. रंगाच्या बादलीत बुडवून काढल्यासारखे. पूर्ण झाडावर ही वॉलनट फिनिशची काळपट चॉकलेटी बोंडे टांगलेली दिसतात. आणि काय आश्चर्य! पूर्वाश्रमात रंगेल आणि बंडखोर वाटणारे हे झाड आता चक्क रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या पंढपुरच्या वारकऱ्यासारखे दिसू लागते. हे पोक्तपण, प्रौढत्व, वैराग्य ते विनातक्रार स्वीकारते. जपमाळेचे मणी ओढावेत तसे आयुष्याच्या संध्याकाळी काटेसावर एक एक बोंड अलगद उलगडू लागते. त्यातून बाहेर पडणारे मऊ, रेशमी, स्वच्छ पांढऱ्या कापसाचे गोळे झाडावर लटकू लागतात. वाऱ्याने हेलकावू लागतात. काळी, गोल दाण्याच्या आकाराची बी बाहेर दिसू लागते. शेकडो कोंबडीची पिल्ले टांगून ठेवावीत तसे हे कापूस लटकलेले झाड मजेदार दिसते. मे महिन्याच्या ऊनाबरोबर ही बोंडे तापून फटाफट तडकू लागतात. त्यातला कापूस वाऱ्याबरोबर उडत रानोमाळ पसरतो. इथेतिथे काटेरी झुडपात अडकतो. परसात, अंगणात लोळू लागतो. केर काढताना एखादी मायम्हातारी वैतागून त्याला ढकलू पाहते तर तो उलटा झाडुला चिकटतो. मुले ह्या कापसाच्या म्हाताऱ्या उडवत त्यांच्या मागे धावू लागतात. त्याच्या दाढीमिशा गालावर लावून एकमेकांना चिडवू लागतात. काटेसावर कृतकृत्य होऊन, आजोबांनी नातवंडांचे खेळ पाहावेत तसे त्यांच्याकडे पाहत राहते. प्रसंगी स्वतःशीच मिश्किल हसते सुदधा! कापसाबरोबर दूरवर उडून गेलेल्या बिया सृजनाची वाट पाहत आता तेथल्या मातीत पडून राहतात.
images (24).jpeg

काटेसावर ही भारत, इंडोनेशिया, दक्षिण चीन, हाँगकाँग व तैवान ह्या देशांत आढळणारी वनस्पती आहे. Bombax Ceiba (बॉम्बक्स सिबा) हे तिचं शास्त्रीय नाव असलं तरी इंडियन सिल्क कॉटन ट्री या सामान्य नावानेही ती ओळखली जाते. वीस ते चाळीस मीटर पर्यंत वाढणाऱ्या या झाडाला पांढऱ्या करड्या खोडावर अंगभर लहानमोठे शंकूच्या आकाराचे काटे असतात. म्हणूनच तिचं नाव काटेसावर. काटेसावरीला संस्कृत मध्ये तिच्या एकंदरीत देहबोलीला थोडेसे विजोडच असे 'शाल्मली' हे नाजूक आणि सोज्वळ नाव आहे. हे झाड कमी पाणी व कमी कस असलेल्या जमिनीतही तग धरते. मुख्य खोडाला दोन तीन मीटर पासून सर्व दिशात फाटे फुटलेले असतात. लाकूड नरम असते. काडेपेट्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. काटेसावरीचा कापूस सामान्य कापसास पर्याय म्हणून वापरला जातो. महाराष्ट्रातील डोंगराळ आदिवासी भागामध्ये ह्या झाडाच्या फुलांची, कोवळ्या पानांची व बोंडांची भाजी आवडीने खाल्ली जाते. बिया सुद्धा भाजून खाल्ल्या जातात. फुले वाळवून त्यांच्यापासून रंग तयार करतात. काटेसावरीची पाने संयुक्त प्रकारची असतात. एका संयुक्त पानात पाच ते सात पर्णीका असतात. पंख्याप्रमाणे पसरलेली ही पाने झाडाचे देखणेपण वाढवतात. या झाडाला आयुर्वेदिक महत्वही आहे. औषधी गुणधर्म असल्यामुळे फुलांचा, खोडाचा, सालीचा व पानांचा वापर अनेक आयुर्वेदिक काढयांमध्ये व चूर्णामध्ये केला जातो. ह्या झाडात उष्णतारोधक गुण असल्यामुळे वणव्यानंतर त्याला लवकर पालवी फुटते. अतीव उष्णता सहन करणारे झाड म्हणून काटेसावरीला भक्त प्रल्हादाचे रूप मानतात. तर काही ठिकाणी तिला दुष्ट होलिकेचे रूप समजून होळीत जाळलेही जाते. याच गुणामुळे भारतात दहीहंडी, होळीसारख्या सणांमध्ये काटेसावरीला सांस्कृतिक महत्व आहे. समाजात ह्या झाडविषयी असणाऱ्या विविध श्रद्धा-अंधश्रद्धांमुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढून संवर्धनाची गरजही निर्माण झाली आहे.

काटेसावरीचा उल्लेख अनेक आख्यायिका, लोककथा व लोकगीतांमध्येही आढळतो. एका आख्ययिकेनुसार विश्वाची निर्मिती केल्यानंतर ब्रम्हदेवाने विसाव्यासाठी काटेसावरीच्या झाडाचा आश्रय घेतला त्यामुळे काटेसावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागली. एकदा नारदासोबत बोलताना तिने आपण वायूदेवापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे सांगितले त्यामुळे चिडून वायूदेवाने तिच्यावर आक्रमण केले. सुरवातीला श्रेष्ठत्वाचा तोरा मिरवणाऱ्या काटेसावरीला वाऱ्याचा तो झंझावात पाहून स्वतःच्या हतबलतेची जाणीव झाली व आक्रमणात उध्वस्त होण्यापेक्षा तिने स्वतः च आपली सर्व पाने झाडून टाकली व शरणागती पत्करली. या लोककथेप्रमाणे तेव्हापासून काटेसावरीची पाने दर हिवाळ्यात झडून जातात.
images (22).jpeg

जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणत आपले पूर्ण आयुष्य हे झाड त्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुक्तपणे आणि भरभरून जगते. डिसेंबरतल्या पानगळीनंतर बहर , फलन ह्या घडामोडी त्याच्या आयुष्यात फार जलद वेगाने घडतात. मग पावसासोबत त्याला नवीन पालवी फुटते. बघता बघता काटेसावर हिरव्यागार पर्णसंभाराने भरून जाते. आता पुढील काही महिने तिला विशेष घाई नसते. हिरवाकंच पदर डोईवर घेऊन काटेसावर आता मोठ्या कुटुंबातल्या जबाबदार सुनेसारखी खंबीर उभी राहते. पावसाळी कुंद हवेत जर कधी तुम्ही तिच्या खालून चालत गेलात, तर वाऱ्याने होणाऱ्या पानांच्या सळसळीबरोबर तिने स्वतःशीच केलेल्या आठवणींच्या गुजगोष्टी पण तुम्हाला ऐकू येतील. कारण बहराच्या काळातील काही आठवणी या धाडशीच असतात..तिच्याही!...तुमच्याही!!

K1600_IMG_0810.jpg

-------

-- गौरी

मुख्य चित्र व प्रकाशचित्र क्र. 2 स्वतः
इतर प्रकाशचित्रे जालावरून साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कधी कधी वाटतं माणसाची डिग्री घेऊन डॉकटर होण्यापेक्षा बॉटनी घ्यायला हवे होते

फारच सुंदर लिहिलंय!
काटेसावरीला प्रल्हादाचं रूप मानतात हे रोचक आहे. याचा काही संदर्भ देऊ शकाल का?

सुंदर लेख!

>>खरं तर कुठल्याही झाडाचं जीवनचक्र हे आधी पानं, मग कळ्या फुलं नि मग फळ असंच. पण काटेसावरीला हा नियम नामंजूर! >> इथे जरा दुरुस्ती करत आहे. फुले येणार्‍या झाडात दोन प्रकार असतात old wood bloomers and new wood bloomers.
old wood bloomers या प्रकारात पुढील वर्षीच्या फुलांसाठीच्या बड्स (फुटवे?) हे या वर्षी येतात. सगळा पानगळीचा ऋतू आणि हिवाळा या बड्स तशाच रहातात आणि वसंत ऋतूत फुलतात. फुलांचा बहर आणि त्याच्या आसपास किंवा नंतर पाने येतात आणि बहर ओसरला की लगेच थोड्या दिवसांत पुढील वर्षासाठी नव्या बड्स तयार होतात आणि पुढील वर्षी वसंतात त्या फुलतात.
new wood bloomers प्रकारात आधी पानं, मग कळ्या आणि मग फुलं हे एकाच वर्षात होते.
झाडांची छाटणी (प्रुनिंग) कधी करायची ते ठरवताना हे ओल्ड वुड, न्यू वुड लक्षात घेवून काम करावे लागते. नाहीतर चुकून आधीच्या वर्षी तयार झालेल्या फुलणार्‍या बड्स छाटल्या गेल्या आणि पुढील वर्षी झाडाला फुले नाहीत असे होते.

सुंदर लिहिले आहे
फोटोही तितकेच सुंदर Happy

तो शेवटून दुसरा झाडाच्या खोडाचा फोटो पाहून वाटले की मधोमध एक दगडी विखुरलेला रस्ता गेलाय ज्याच्या दोन्ही बाजूंना जलाशय आहे ज्यात आजूबाजूच्या झाडांचे आणि आकाशाचे प्रतिबिंब पडले आहे Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

@ वावे
((याचा काही संदर्भ देऊ शकाल का?))

अनेक आदिवासी संस्कृतीमध्ये (राजस्थान, छत्तीसगढ, बंगाल) या झाडाचा होळीच्या संदर्भाने आलेला उल्लेख ऐकिवात होता. तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने संदर्भ शोधताना खालील रीसर्च आर्टिकल सापडले. यात Myths, Traditions and Ethnoconservation या मुद्द्याखाली सेमुल (काटेसावरीला) भक्त प्रल्हादाचे रूप म्हणून होळीत महत्व आहे असा उल्लेख आहे.

त्याचबरोबर काही ठिकाणी तिला दुष्ट होलिका म्हणूनही होळीत जाळले जाते असे उल्लेख मिळाले. हे वर लेखात ऍड करत आहे.

या संदर्भात काही लोककथा अथवा लोकगीते सापडली तर देण्याचा प्रयत्न करते .

https://www.researchgate.net/publication/234741487_Myths_traditions_and_...

@ स्वाती २
((फुले येणार्‍या झाडात दोन प्रकार असतात old wood bloomers and new wood bloomers.
old wood bloomers ))

या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.

ही झाडे प्रवासात रस्त्याच्या आणि रेल्वे ट्रॅक च्या बाजूला रानात अशीच वाढलेली दिसल्याने हा मुद्दा लक्षात आला नव्हता. त्यांचे जाणीवपूर्वक संवर्धन होणे आवश्यक आहे.

खूप सुंदर लिहीलय. शेवटचे वाक्य खासच.
>>>>>>हिरवाकंच पदर डोईवर घेऊन काटेसावर आता मोठ्या कुटुंबातल्या जबाबदार सुनेसारखी खंबीर उभी राहते. पावसाळी कुंद हवेत जर कधी तुम्ही तिच्या खालून चालत गेलात, तर वाऱ्याने होणाऱ्या पानांच्या सळसळीबरोबर तिने स्वतःशीच केलेल्या आठवणींच्या गुजगोष्टी पण तुम्हाला ऐकू येतील. कारण बहराच्या काळातील काही आठवणी या धाडशीच असतात..तिच्याही!...तुमच्याही!!

फारच सुंदर लेख
काही दिवसांपूर्वीच भरभरून फुललेले काटेसावरीचे वृक्ष पाहण्यात आले
काटे सावरीच जुनं शास्त्रीय नाव Salmalia malabarica असं आहे त्यातलं Salmalia हे संस्कृत शाल्मली वरून आलंय, साहेबाला सुद्धा काटेसावर या रुक्ष नावापेक्षा शाल्मली हे नाव सार्थ वाटलं.

याच्या खोडातून रस/डिंक निघतो त्यास मोचरस म्हणतात, आयुर्वेदात वापरतात. लग्नाचा रथ याच्या लाकडापासून बनवतात. बहरलेला शाल्मली वृक्ष ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीचे रूप मानतात. नरकात वापरल्या जाणाऱ्या काट्यात याचा उपयोग करतात असे मानतात (यमद्रुम)

(( काटे सावरीच जुनं शास्त्रीय नाव Salmalia malabarica असं आहे त्यातलं Salmalia हे संस्कृत शाल्मली वरून आलंय.... बहरलेला शाल्मली वृक्ष ऐश्वर्यसंपन्न लक्ष्मीचे रूप मानतात. ))

ऋतुराज ह्या माहितीसाठी धन्यवाद. छान वाटले हे वाचून..

भिल्ल आणि इतर काही आदिवासी जमाती मध्ये काटेसावरीच्या झाडाविषयी अनेक श्रद्धा व अंधश्रद्धा आहेत. तिचा कापूस हे लोक गादी उशांसाठी वापरत नाही कारण त्यामुळे पॅरालिसिस होतो असा त्यांचा समज आहे. यमदूता जवळ असणारे झाड म्हणून मृत्यूचे प्रतिक अशीही एक विचारधारा आहे. त्यामुळे काटेसावर स्वप्नात येणे, जळण म्हणून तिचे लाकूड घरात आणणे ह्या जमातीमध्ये अशुभ मानले जाते. म्हणून हे झाड जवळपास असणे, त्याची लागवड करणे टाळले जाते.

या विरुद्ध काही ठिकाणी काटेसावर देवाचे झाड, नक्षत्र झाड म्हणूनही प्रसिध्द आहे. ह्या झाडावर यक्षणींचाही वास असतो असे मानतात. त्यामुळे सौभाग्य आणि अपत्यप्राप्ती साठी स्त्रिया काटेसावरीची पूजा करतात. म्हणून हे झाड तोडले जात नाही.

ह्या कथा या झाडांएवढ्याच जुन्या आहेत. त्याच्या संगतीत राहणाऱ्या माणसाने आपल्या भल्याबुऱ्या अनुभवांमध्ये झाडांना, प्राण्यांना अविभाज्यपणे गुंफले आहे. या श्रद्धा अंधश्रध्दांमुळे निसर्गाची हानी आणि संवर्धन दोघांनाही हातभार लागतो.

सुंदर लेख.
.... काटेसावर या रुक्ष नावापेक्षा शाल्मली हे नाव सार्थ ...
+१

सुंदरच लेख आहे. आणि प्रचि तर अप्रतिम.
शाल्मली किती सार्थ नाव आहे!

खुप सुरेख लिहिलय !!!
फुललेली काटेसावर,पांगिरा,पळस , जर्द पिवळे वाळलेले गवत, उन्हातले निळे आकाश आणि चकाकणारा डांबरी रस्ता आणि लाल एस्टी हे दृश्य इतके लक्षात राहिले आहे. पन्हाळ्याच्या बाजूला वारणानगरला जाताना अजुनही तसेच दिसत असावे अस वाटत.

ललित आणि माहिती एकत्र! चित्रंही छान.
पहिलं चित्र रेशमाने भरल्यास भिंतिवर लावता येईल.

ललित आणि माहिती एकत्र! चित्रंही छान.
पहिलं चित्र रेशमाने भरल्यास भिंतिवर लावता येईल.