समाधान

Submitted by केजो on 15 August, 2021 - 16:37

अण्णांनी कानोसा घेऊन बघितलं, नुकतंच झुंजूमुंजू व्हायला लागलेलं. त्यांनी डोळे मिटूनच दोन्ही हातांची ओंजळ डोळ्यांसमोर धरली आणि "कराग्रे वसते..." म्हणू लागले. आज हवेत जरा गारठा जाणवत होता. अंथरुणात बसूनच त्यांनी "... पदस्पर्शम क्षमस्वहे!" म्हणून पावलं जमिनीवर ठेवली. निगुतीनं अंथरूण- पांघरुणाची घडी जागेवर ठेवली. सकाळची आन्हिकं आटपून ते गिरणेवर स्नानास निघाले. गंगाबाईंनी परीटघडीची धोतरजोडी आणि त्यांचा पांढरा सदरा रात्रीच काढून ठेवलेला. सवयीप्रमाणे त्यांनी नेहमीच्या जागेवरून कपडे घेतले आणि ते नदीवर निघाले. नामजप करता करता सूर्याला अर्ध्य देत अण्णांनी कडाक्याच्या थंडीत स्नान उरकत घेतलं. सूर्याच्या पहिल्या किरणाला अण्णा काकड आरतीसाठी रामाच्या देवळात हजर होते. गेल्या चाळीस वर्षांचा हा नेम चुकला नाही. गंगाबाई त्यांच्या आधी उठून- आन्हिकं आटोपून अण्णांच्या आधी देवळाच्या दारात धारोष्ण दुधाचा गडवा घेऊन अण्णांसाठी उभ्या राहत. अण्णांना गडवा दिला की त्या देवदर्शनही न घेताच घरचा धबडगा आवरण्यासाठी निघून जात. अण्णा मग शांतपणे मन लावून देवपूजा, काकड आरती करून मग ध्यान लावून बसत. एव्हाना गावातही जाग आली असे. एक एक करत सगळेजण देवाचं दर्शन घेऊन- कोणी आत येऊन साष्टांग दंडवत घालून तर कोणी जाता-जाता चप्पल बाजूला काढून रस्त्यावरूनच भावपूर्ण नमस्कार करून आणि दुसरा नमस्कार देवळासमोरच्या पारावर ध्यान लावून बसलेल्या अण्णांना करून, मगच दिवस सुरु करत.

घरी गंगाबाई पुढचं-मागचं अंगण झाडून, सडा घालून दाराभोवती सुरेख रांगोळी रेखीत. गोठ्यातल्या गुरांशी गप्पा मारत त्यांना चारा घालून, दूध काढून ठेवीत. ते झालं की परसदारी बंब सुरु करीत, एकेकाच्या आंघोळीसाठी तो बंब दोन-तीन तास धुमसत राही. घरालाही जाग आली असे. मग मुलं, सासू-सासरे, दीर-जाऊ, त्यांची मुलं असा सगळा गोतावळा गंगाबाईंच्या नावानी धोशा लावत. "आई, मला उठवलं का नाहीस, माझा गृहपाठ राहिला होता न थोडा..." "वहिनी, आज डाळ-मेथी, खर्डा आणि ज्वारीच्या भाकऱ्या करू जेवायला, चालेल नं? दोन जुड्या पुरतील नं? अगं बाई,तुमचे पोहे करूनही झाले, मला मेलीला जागच येत नाही हो सकाळी.." "सूनबाई, उद्या एकादशी आहे, लक्षात आहे नं? घरात फराळाचं सामान आहे का, जर बघा बरं..." गंगाबाई हसतमुखाने सगळ्यांच्या प्रश्नांना तोंड देत, प्रत्येकाच्या हातात नाश्ता-चहा देत, तोवर अण्णाही घरी आले असायचे. मग त्यांचं खाणं होईस्तोवर त्या ओसरीवरच थांबत. खाता-खाता अण्णा दिवसाचा कार्यक्रम सांगत. तेवढाच काय तो पती-पत्नीचा दिवसभराचा संवाद!

पंचक्रोशीत प.पू. अण्णा कुलकर्णी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. दिवसा शाळेत मुलांना संस्कृत शिकवणे आणि शाळा सुटली अन चार घास पोटात सरकवून कीर्तनासाठी जाणे, हाच अण्णांचा दिनक्रम होता. कधीकधीतर संध्याकाळी पायी निघालेले अण्णा मध्यरात्री शेजारच्या गावात पोहचत आणि ताटकळून राहिलेले गावकरी त्यांच्या पायावर लोळण घेत. कुठलाही शिणवटा न जाणवू देता अण्णा रात्र-रात्रभर उभे राहून कीर्तन करीत आणि सूर्योदयाच्या वेळेस गिरणेवर पोहचत.

अण्णा कीर्तन करू लागले की गावकरी अगदी मंत्रमुग्ध होत. अण्णा भावकर्यांना कधी यमुनेतीरीं फिरवून आणीत नाहीतर रामायणाची सफर घडवत. "रामायण झालं ते सीतेमुळे, आदिमायेमुळं. माया कोणाला चुकली आहे? जी दृश्य नाही आणि तुम्हाला नकळत बांधून ठेवते, ती माया... प्रभूवर श्रीराम सुद्धा मायेच्या चक्रात अडकले. श्रीकृष्णाने तर मायेनी सगळ्यांना जखडून ठेवलं आणि स्वतः मात्र अलिप्त राहिला... " अण्णा तासन्तास बोलत राहत आणि गावकरी त्यांच्या शब्दांच्या मायेत हरवून जात. कधीतरी त्यांच्या मनात येत असे, खरंच रामायण फक्त सीतेमुळेच झालं का? मग दशरथ, त्याच्या तीन राण्या, रावण ह्या सगळ्यांचा काय भाग होता? उर्मिलेच पुढे काय झालं, ती का नाही गेली लक्ष्मणाबरोबर, का तिला तीन-तीन सासवा, सासरे, अयोध्येची जबाबदारी जाणवून ती माघारीच थांबली? असो उगाच काहीतरी मनाचे खेळ.

इथे गंगाबाई दिवसभरचा पै- पाहुणा बघत, घरच्या शेतीची-गुराढोरांची काळजी घेत. मुलांचा अभ्यास, सासू-सासऱ्यांची दुखणी-खुपणी, कुळाचार मन लावून करीत. वर्षानुवर्षं मेहुणबारे सोडून त्यांनी जग बघितलं नव्हतं. माहेरी अठरा विश्व दारिद्रय, त्यामुळे गंगीला चांगलं दूध-दुभत्याचं घर पाहून दिलं होतं. लग्नानंतर जणू काही माहेरचा संबंधच संपला. आणि बारा मुलांच्या रगाड्यात त्यांच्या आई-तात्यांनाही कधी लेकीची खुशाली विचारायची फुरसत मिळाली नाही. तर अण्णांच्या अशा विरक्त वागण्यामुळे गंगीला माहेरी पाठवलं तर मुलगा सगळं सोडून मठकरी बनेल ह्या भीतीनं, सासू-सासर्यांनीही गंगीला कधी नजरेआड होऊ दिलं नाही. वर्षं सरता सरता यथावकाश दोन मुलं पदरी पडली, आणि त्यांच्या मागे गंगीची गंगाबाई झाली. आधीच घरात रमणारी गंगा आता आणखीनच गुरफटली. एव्हाना तात्यांचं ध्यान लावून बसणं, काही आठवडे घराबाहेर असणं, नव-नविन गुरु करणं आणि त्यांच्याकडून दीक्षा घेणं सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं होतं.

अण्णांचं कीर्तन सुरु असे आणि इथे सगळं आवरून, झाकपाक करून दोघी जावा ओसरीवर येऊन बसत. दुरूनच घंटेचा, चिपळ्यांचा आवाज येई. संध्याकाळी घातलेल्या सड्यामुळं हवेत गारवा जाणवे. मग जावा-जावांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी रंगत. कधी नव्हे ते आज धाकटीनी विचारलं, "वहिनी, तुम्ही का नाही कधी जात कीर्तनाला, सकाळी तासन्तास ध्यान लावायला? तुम्हाला नाही का वाटत हो की, भाऊजी असे दिवस-दिवस बाहेर असतात आणि तुम्ही घरातच अडकून पडता?" गंगाबाईंची तंद्री लागली, त्यांच्या डोळ्यांसमोर इतक्या वर्षांचा संसार उभा राहिला. वर्षानुवर्षं ना अण्णांचा दिनक्रम बदलला ना गंगाबाईंचा. मेहुणबार्यात बाराव्या वर्षी लग्न होऊन आलेली गंगी जी घरच्या गोतावळ्यात हरवली ती आजतागायत. अण्णांची भक्ती, उपासना, त्यांचा कीर्तनातील हातखंडा ह्याचं कौतुक ऐकत आणि अभिमान बाळगत कोणत्या इच्छा राहिल्या आणि कोणत्या नाही ह्याचाही आताशी विसर पडला होता. धाकटीनी पुन्हा एकदा हलवून विचारलं, "सांगा नं, वहिनी..." गंगाबाई गूढपणे हसून म्हणाल्या, "अगं हो, सुरुवातीला मलाही इच्छा व्हायची हे काय करतायेत ते जाणून घ्यायची, ध्यान लावून बसण्याची. पण ते जमायलाही हवं नं... अनुभूती यावी लागते. त्यांचं ध्यान लावणं, कीर्तन करणं, त्यातून आनंद मिळवणं वेगळं... आतापर्यंत काही कमी नाही राहिली माझ्या संसारात. सोन्यासारखी दोन मुलं आहेत, भरलेलं घर आहे.काय कमी आहे मला... त्यांना देवाला आयुष्य वाहून घेता आलं, ते घर सांभाळायला मी होते म्हणूनच नं? आणि त्यांच्या उपासनेत कुठेतरी मलाही पुण्य मिळेलच की गं, काय?", असं म्हणत गंगाबाई स्वतःशीच हसत राहिल्या. आणि तिकडे अण्णा सांगत होते,"ऐका मंडळी, संसारात असूनही संसारातली अलिप्तता जाणवायला लागते. आपल्याकडे काय नाही ह्यापेक्षा काय आहे हे मनःचक्षू उघडून बघावं लागतं, तेव्हा कुठे परमात्म्याची ओळख होते. म्हणा, जय जय रामकृष्ण हरी..." अण्णांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती आणि गंगाबाई याची देही याची डोळा स्वर्गानुभीतीनी तृप्त मनाने निद्राधीन झाल्या होत्या.

Group content visibility: 
Use group defaults