माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती -भाग 1

Submitted by नादिशा on 5 September, 2020 - 00:42

आज 5सप्टेंबर. शिक्षक दिन. सगळ्याच लोकांच्या मनात आपापल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञतेची भावना असतेच. या दिवशी आपण आवर्जून ती व्यक्त करतो एवढेच.
सध्याच्या या व्यवहारी युगात शिक्षणक्षेत्र पण पूर्वी एवढे पवित्र राहिलेले नाही, अशी ओरड आपल्याला ऐकू येते. पण माझ्या सुदैवाने मला मात्र असे शिक्षक लाभले, ज्यांनी फक्त वर्गात शिकवणे, एवढे स्वतःचे नेमून दिलेले काम न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले. माझ्या एकूणच जडणघडणीवर ज्या त्रिमूर्तींचा खूप प्रभाव आहे, त्यांचे आजच्या दिवशी स्मरण करणे हा या प्रस्तुत लेखाचा हेतू आहे.

माझे पप्पा प्राध्यापक होते. त्यांच्या वरचेवर बदल्या व्हायच्या. त्यामुळे आम्हा बहिणींच्या शाळाही बदलल्या जायचे. तिसरीपर्यंत आम्ही उस्मानाबादला होतो. त्यानंतर तिसरी ते सहावी पाटणला होतो. सातवीच्या वर्षी पप्पांची बदली सातारला झाली आणि आम्ही सातारला आलो.
पप्पानी मला "सुशीलादेवी साळुंखे गर्ल्स हायस्कुल "ला ऍडमिशन घेतली.मला चौथीला शिष्यवृत्ती मिळाली होती. कायम पाहिला नंबर असायचा, त्यामुळे मार्क्स पाहून लगेच ऍडमिशन मिळाली.अध्येमध्येच ऍडमिशन घेतल्याने नाराज असलेले शिक्षक माझे मार्क्स पाहून शांत बसले.
शाळेमध्ये तर जायला लागले ; पण पाटण आणि सातारा या दोन्ही ठिकाणांत खूप फरक होता. पाटण अगदी ग्रामीण भाग, सातारा जिल्ह्याचे ठिकाण. आजूबाजूचे वातावरण एकदम शहरी, सुधारलेले . शाळेतील सगळ्या मुली एकदम शुद्ध बोलणाऱ्या, टिपटॉप राहणाऱ्या. मी अगदी भांबावून गेले हे सारे पाहून. जरी अभ्यासात हुशार होते, तरी एक प्रकारचा न्यूनगंड होता मनामध्ये.भाषेचा ऍक्सेंट ग्रामीण होता. त्यामुळे मुळचीच शांत असलेली मी अजूनच गप्प -गप्प राहू लागले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापलीकडे मी कुणाशी बोलतच नसे. सतत आपल्याला इतर मुली हसत आहेत, असे वाटत राही.एक प्रकारच्या कोषात चालले होते मी. माझ्या इतर शिक्षकांना या सगळ्याशी काहीही देणेघेणे नव्हते. शिकवण्याचे काम चोख करून ते निघून जात. पण माझी ही अवस्था एका शिक्षकांनी मात्र अचूक ओळखली, ते म्हणजे गणित शिकवणारे एम. एस. कुलकर्णी सर. काहीसे बुटके, गोरे, गोल चेहरा, शांत, प्रेमळ स्वभाव ! ते सुपरवायझर होते शाळेत. ही हुशार मुलगी फक्त न्यूनगंडामुळे कोमेजते आहे, हे सरांच्या लक्षात आले आणि मग जाणीवपूर्वक त्यांनी मला माझ्या कोषातून बाहेर पडायला मदत केली.
मग स्वतः होऊन रोज माझी चौकशी करणे, मला बोलते करण्याचा प्रयत्न करणे, माझ्यातील कलागुणांना प्रोत्साहन देणे, या गोष्टींना त्यांनी सुरुवात केली. शाळेतील माझे पालकच झाले म्हणा ना ते ! मग कोणी मला त्रास देत असेल, चिडवत असेल, तर त्याकडे लक्ष देणे,मुली मला घ्यायच्या नाहीत जेवायला त्यांच्यात, तर मी रोज डबा खातेय ना, हे पाहणे, "हळूहळू फरक पडेल सगळ्यांत ", असा मला धीर देणे, शहरी मॅनर्स अंगी बाणवायला मला मदत करणे, मला बसने घरी जाताना काही अडचण नाही ना, हे पाहणे.. या गोष्टी त्यांनी जातीने केल्या.
"आधीच्या शाळेत पण वक्तृत्व -निबंध स्पर्धेत नंबर मिळवायचीस ना तू, मग इथेही भाग घे ना !हे बघ, तुझ्या विचारांना महत्त्व आहे, भाषेला नाही. काही फरक पडत नाही तिचा tone ग्रामीण असला म्हणून, "असे मला नुसते समजावून न थांबता माझे नाव देऊन टाकत स्पर्धांना. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी बक्षिसेही मिळवत असे. अशा पद्धतीने त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला.
एक प्रसंग तर खूप गमतीशीर आहे. आमच्याकडे तोवर टी. व्ही. नव्हता. रेडिओ, टेपरेकॉर्ड होता, पण फक्त चांगले, दर्जेदार कार्यक्रम च त्याच्यावर आईपप्पा लावत.हिंदी भाषा, बॉलिवूड यांचे काहीच ज्ञान नव्हते.
त्या वर्षी "राजू बन गया जंटलमन "हा सिनेमा प्रदर्शित झालेला होता. त्यातली गाणी बाहेर सतत वाजत राहायची, ओघानेच आमच्याही कानावर पडायची.एक दिवस घरी निवांत वेळी आम्ही सगळे गप्पा मारत असताना मी "मुझको लवेरिया हुआ "असे मी गुणगुणले आणि दुसऱ्याच क्षणी सपकन आईचा एक रपाटा पाठीत बसला. "काहीही काय बडबडतेस? "ती चिडून म्हणाली. मी खाली मान घालून चुपचाप बसले. का मारलेस, याचा अर्थ काय, असे उलटून विचारायची माझी प्राज्ञा नव्हती. पण ज्या अर्थी एवढा सणसणीत फटका मिळालाय, त्या अर्थी ही तितकीच वाईट काहीतरी गोष्ट असणार, कदाचित शिवी च असेल, असा माझा समज झाला.
शाळेत आता मला 2-3 महिने झालेले. काही मुली चिडवायच्या, काही मला बोलते करायचा प्रयत्न करायच्या. मी गप्प च राहायचे. त्या दिवशी मुलींनी नेहमीसारखे मला करायचा प्रयत्न केला आणि मी बोलत नाही म्हटल्यावर एक जण म्हणाली, "ए, अशी काय आहे ही? काय झाले हिला? "तोवर दुसऱ्या कुणीतरी चालू केले, "क्या हुआ, अरे इसे क्या हुआ.. "पाठोपाठ साऱ्यांनी सूर ओढला. "इसको लव्हेरीया हुआ, "असे त्या म्हणाल्या मात्र, मी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. आधल्या दिवशीचा आईचा फटका याद होता. त्यामुळे असले काहीतरी घाण या मुली मला म्हणत आहेत, या विचाराने मी जोरजोरात रडू लागले. माझे असे रडणे पाहून बिचाऱ्या मुली भांबावल्या, मला कसे शांत करावे, त्यांना कळेना.
नेमका त्यानंतर कुलकर्णी सरांचा तास होता. माझे असे रडणे पाहून त्यांनी कारण विचारले. मी स्फुंदतच सांगितले. सरांना खरेतर या साऱ्या गैरसमजाचे हसू आले असावे. पण त्यांनी माझी समजूत काढली. सर्व मुलींनाही तंबी दिली, की यापुढे कुणी हिला त्रास द्याल, तर दाखला हातात मिळेल. आज मला त्या प्रसंगाची आठवण झाली, तरी हसू आवरत नाही.
दुसरा प्रसंग आठवीतला असावा. माझा आवाज चांगला होता. परंतु स्वागतगीत, प्रार्थना वगैरेमध्ये मला संधी मिळत नसे. या ठिकाणी आवाजाला नाही, तर दिसण्याला जास्त महत्त्व आहे, ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी हिरमुसले. कारण मी नाकीडोळी नीटस असले तरी रंगाने सावळी होते, सततच्या वाचनामुळे चष्मा लागलेला होता. रूढ अर्थाने सुंदर नव्हतेच.
त्याही वेळी सर धावून आले. म्हणाले, "असल्या गोष्टींनी दुःखी व्हायची तुला गरज नाही. सौन्दर्य ही क्षणभंगुर गोष्ट आहे. मला माहिती आहे, तुझा आवाज चांगला आहे, drawing चांगले आहे, पण याहून मोठी तुझ्याकडे आहे, ती तुझी बुद्धिमत्ता, तुझ्या विचारांचे सौन्दर्य. जे फार दुर्मिळ असते आणि शेवटपर्यंत साथ देते माणसाला. तुझे आयुष्य असल्या गोष्टींनी दुःखी होण्यासाठी नाही. खूप पुढे जाणार आहेस तू. खूप यश मिळवणार आहेस. तुझीच तुला आत्ता जाणीव नाही.अनभिज्ञ आहेस तू. तुला आत्ता कळणार पण नाही कदाचित मी काय म्हणतोय. पण आत्ता माझ्या शब्दांवर विश्वास ठेव आणि असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस. "
खरेच मला त्याक्षणी पूर्ण कळाले नाही सर काय म्हणताहेत, पण त्यांच्या बोलण्यातली कळकळ, शुद्ध हेतू जाणवला आणि मग मीही अभ्यासात झोकून दिले स्वतःला.त्यानंतर ते मला शिकवायला नव्हते, पण माझ्यावर सतत लक्ष होते त्यांचे. वर्गात तर मी कायम पहिला नंबर मिळवत होतेच, पण वादविवाद, वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर अशा स्पर्धांत बक्षिसे मिळवत राहिले, सर कौतुक करत गेले आणि स्वतः च स्वतःला सापडत गेले. यथावकाश कोणताही क्लास न लावता, गाईड्स वगैरे काहीही न वापरता दहावीला मेरिट लिस्ट मध्ये पण आले.तेव्हा सर खुश झाले.मला शाबासकी देत म्हणाले, "आता कळाले तुला, मी काय सांगत होतो तुला.. !"
स्वतःचा विषय तर ते उत्तम शिकवतच, पण स्वतः च्या नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त त्यांनी माझ्यासाठी जे काही केले, त्यातून उतराई होणे मला या जन्मी तरी शक्य नाही.
नंतरच्या काळात खरेच मी खूप प्रगती केली. सरांचे सगळे बोलणे मला समजले. पण आजही जेव्हा कधी नाउमेद व्हायची वेळ येते, तेव्हा सरांचे शब्द मला प्रोत्साहन देतात. नवा आत्मविश्वास देतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले लिखाण
कृतज्ञता आवडतेच नेहेमी

असे कुलकर्णी सर सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना

खूप छान लेख Happy

कुलकर्णी सरांना नमन __/\__

सुंदर लेख...

''ज्ञान दिले मज तू
तू आहेस महान दाता
माझ्या यशाचा भागिदार तू
किती गुण गाऊ तुझे आता'' ...

अशी काहीशी कविता मी दहावीला असताना आमच्या सरांच्या निवृत्ती समारंभातील भाषणात केली होती. तुमच्या सरांच्या तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेने ती आता अंधुकशी आठवली.

या लेखाचा second part पण वाचून पहा :

माझ्या आयुष्यातील त्रिमूर्ती -भाग 2
https://www.maayboli.com/node/76542
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी लिहिलेला अजून एक लेख :
अंकुर बालवाडी
https://www.maayboli.com/node/76567