आणि एका व्हायरसने मुंबई थांबवली....

Submitted by मुक्ता.... on 3 April, 2020 - 15:16

आणि एका व्हायरसने मुंबई थांबवली....

पायांना सवय नव्हती...थांबण्याची..
हातांना सवय होती...स्वतःला सावरण्याची...
आरश्यात स्वतःला फॉर्मलिटी म्हणून पहायचं...
बायकोने नवऱ्याशी आणि नवऱ्याने बायकोशी...
सकाळच्या प्रहरी....फॉर्मलिटी म्हणून हसायचं...
बूट चपला अडकवत तिडकवत...
रोजच स्वतःला झोकून द्यायचं...
जिवंत हाडा मांसाच्या महापुरात....
कसायाच्या दुकानात लटकवलेल्या निष्प्राण सोललेल्या प्राण्यासारखी...
माणसं लटकलेली ट्रेन च्या दरवाज्याला...म्हणे जगण्यासाठी....!

कळा या जीवाला अनेक लागल्या...
काळ्या धुक्यात रोज न्हालेली...गर्भवती मुंबई...
रोजच प्रसूत होत होती...
रस्त्यांची कंबर रोजच तिंबली जात होती....
लाल पिचकाऱ्या आणि रोगट चिकट थुंक्या...
रास्ता तर रोजच बरबटत होता....
तेच पायाला चिकटवून तिची बाळं...
रोजच तिच्या अंगा खांद्यावरून धावत होती....
कधीतरी भरधाव ट्रेन मध्ये नाहीतर एखाद्या वळणावर...आपल्याच जगण्याच्या टेन्शनमध्ये ...
मरत होती....

रस्त्यावर भिकाऱ्यांचा सुकाळ...
हडकुळी, पोट पाठीला चिकटलेली नागडी पोरं...
पोरासवदा आईच्या कमरेवर बसून तिच्या पदराला शेम्बुड पुसताना...
सिग्नलला थांबलेल्या गाडीतल्या गॉगल वाल्या ममाचं गुटगुटीत पिलू आणि त्याच्या हातातला टेडी...निरागस डोळ्यांनी बघत होतं...
हातावर रुपयाचं नाणं आणि त्याबरोबरचा बोचरा स्पर्श...आता तिच्या परिचयाचा...
तीही कधीकधी निर्ढावलेली....
सिग्नल सुटताना सिग्नल लागताना...
तीच कहाणी रोज रोज.....

नवीन गरजांना नवीन फ्लायोवर...
नवीन श्रीमंतांना नवीन तरुणांना नवीन गाडी....
नवीन रस्त्यांसाठी नवीन खड्डे....
नवीन खड्यांकडून नवीन दुखणी....
नवीन हॉस्पिटल्स ना नवीन पेशंट....
अव्याहत तेच जीवन...रोजची सकाळ नवी...
नवीन टार्गेट...नवीन वडापाव...
सगळं कसं पोटासाठी...
फोर्थ सीट वर समाधान आम्हाला...
धावत धावत ट्रेन मिळाली म्हणून दरवाज्यात लटकत होती मुंबई....

देशासाठी घाम गाळणारी...मुंबई...
एका व्हायरसने पाहिली...
छातीठोक पणे सांगतो...आम्ही मुंबईकर....
असं काय...व्हायरसने त्याच्या कोटींगवरली हजार शिंगे खाजवली....
काय बी झालं तरी ही थांबत नाही....
बॉम्ब फुटले, दंगल करून रक्ताने रस्ते भिजले...
तरीही थांबत कशी नाही?
बघतोच आता....नाहीतरी मी दिसत नाहीच...
यांना कसली पर्वा नाही....

अखेरीस जे झालं नाही ते झालं
जे नकोना तेच करोना झालं....

मुंबई थांबली.....तिची धमनी थांबली.....
रस्ते ओस पडले....
कधी नव्हे ते स्वच्छ दिसले....

मुंबई थांबली....जगण्यासाठी धावणारा मुंबईकर...
आज जगण्यासाठीच थांबला...!

करोना ने मरण्यापेक्षा...
कुटुंबाबरोबर जगतोय...कुटुंबाला जगवायला...

एका व्हायरसने आमच्या मनातले इगोचे व्हायरस उतरवले....
सगळा माज उतरवला....
आम्हाला आज जाणवतोय....त्रास....
किती करून घेतला.....
फार काही लिहिवत नाही आता...

बस्स जगण्यासाठी थांबलोय....
जगण्याची कला पुन्हा शिकतोय....
अरे बाहेर पडूच परत....पण नुकते चालायला शिकलेल्या एक वर्षाच्या मुलासारखे....

कारण एका व्हायरस ने श्वासाचे महत्व समजावले आहे....
एका व्हायरसने मुंबई थांबली आहे.

मुक्ता
03. 04. 2020

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम आवडली.
खूपच समर्पक.
मुंबई कधी थांबली नाही एका अदृश्य विषाणू ने थांबवली.

छान

छान लिहिलीये.. मुंबईकरांच नेहमीच आणि ह्या २१ दिवसांत डेली रुटीन कस असेल याची तुरळक कल्पना आली..

वाहवा मुंबई कधी अशी शांत दिसेल असं वाटलं च नव्हतं....परवा ड्रोन ने काढलेला व्हिडिओ पाहिला..इतकी छान सुबक दिसली मुंबई...मस्त कविता...