एक होता कॅन्सर (माझी विजयगाथा)

Submitted by nimita on 29 March, 2019 - 21:23

*एक होता कॅन्सर* ही एक काल्पनिक कथा नसून माझ्या अनुभवांवर आधारित कथन आहे. मायबोलीवरील 'गुलमोहर या सदरात मी याआधी याचे पाच भाग share केले आहेत.पण माझ्या वाचक मित्र मैत्रिणीपैकी काही जणांना सगळे भाग एकत्र हवे होते, म्हणून हा खटाटोप. समस्त वाचक मित्र परिवाराला मनापासून धन्यवाद

*एक होता कॅन्सर (माझी विजयगाथा)*

८मे २०१६.माझी ट्रीटमेंट संपून आज दहा वर्षे पूर्ण झाली.असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी ! आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

गेल्या दहा वर्षांतला प्रत्येक दिवस मी आज पर्यंत कित्येक वेळा अनुभवला आहे. एखाद्या flashback सारखे ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.

'३ नोव्हेंबर २००५' ही तारीख आणि भाऊबीजेचा तो दिवस माझ्या आयुष्यात बरंच काही बदलून गेला- खरं तर माझं सगळं आयुष्यच बदलून गेला.

त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मी जोधपूर (राजस्थान) च्या military hospital मधे radiologist च्या समोर बसले होते. त्यांचा चिंतातूर चेहरा आणि एकंदर body language बघून मला कल्पना आली होती की माझे सोनोग्राफी चे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीएत. त्यांच्या पुढच्या प्रश्नानी माझी शंका खरी असल्याची खात्री झाली. त्यांनी विचारलं," Mam, is your husband there with you?" मी म्हणाले," काय असेल ते मलाच सांगा. कारण ते आत्ता बाहेर गावी गेले आहेत. मी एकटीच आले आहे." त्यांची द्विधा मनस्धिती माझ्या लक्षात आली. मी त्यांना म्हणाले,"माझे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीत याची मला कल्पना आली आहे. जे काही असेल ते तुम्ही मलाच सांगा. After all this is my body and I must know what is wrong with it."

देवदयेनी माझ्या दिवंगत आई चा 'मनाच्या खंबीरपणाचा' वारसा माझ्या कडे आहे त्यामुळे मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली. डॉक्टर म्हणाले,"मँम, तुमचे हे रिपोर्ट्स ठीक नाहीत. This could be serious." मी पुन्हा विचारलं,"How serious? आणि नक्की काय झालंय मला?"

त्यांनी सांगितलं," तुमच्या दोन्ही ovaries मधे ट्यूमर्स आहेत आणि मला वाटतं की ते malignant आहेत. मला आणखी भीती आहे की या malignant cells आता फक्त ovaries पर्यंत सीमित नसाव्यात. पण त्या कुठपर्यंत पोचल्या आहेत हे आत्ता सांगणं कठीण आहे. त्यासाठी तुम्हांला PET CT Scan करून घ्यावा लागेल."

हे सगळं ऐकून मी माझं मन आणखी घट्ट करून विचारलं," कुठली स्टेज आहे? माझे husband दोन दिवसांनंतर येणार आहेत. जर खूप सिरियस असेल तर मी त्यांना आजच परत यायला सांगते."

पण त्याची गरज नव्हती. २-३ दिवसांनी फारसा फरक पडणार नव्हता. म्हणून मी या बाबतीत दोन दिवस गप्प राहायचं ठरवलं.

कारण मी जर फोन करून हे सगळं नितिन ला( माझ्या नवऱ्याला) सांगितलं असतं तर तो नक्कीच पुढची फ्लाईट घेऊन जोधपूरला परत आला असता.पण त्या दिवशी भाऊबीज होती आणि बऱ्याच वर्षांनंतर तो ही भाऊबीज त्याच्या बहिणी बरोबर साजरी करत होता. माझ्या डोळ्यांसमोर माझे सासू-सासरे, माझी नणंद,नितिन यांचे उत्साही, आनंदी चेहरे झळकले. माझ्या आजाराची बातमी आजच त्यांना सांगून त्यांचा हा आनंद हिरावून घेणं योग्य नाही, असा विचार करून मी गप्प बसायचं ठरवलं.पण सगळ्यात आधी ही बातमी मला नितिन बरोबर share करायची होती म्हणून मग मी कुणालाच काही सांगितलं नाही.

पण आधी ठरल्या प्रमाणे जर मी नितिन ला फोन करून रिपोर्ट्स बद्दल कळवलं नसतं तर त्याला कदाचित शंका आली असती म्हणून मग मी ठरल्याप्रमाणे दुपारी घरी गेल्यावर त्याला फोन केला आणि सांगितलं,"डॉक्टर आज सुट्टी वर आहेत, म्हणून त्यांनी चार दिवसांनंतरची appointment दिली आहे. पण प्राथमिक परीक्षेत तरी काळजीचं काही कारण नाहीये." खोटं बोलल्या बदल मनोमन देवाची क्षमा मागितली.

त्या संध्याकाळी मी माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घेऊन एका civilian डॉक्टर कडे गेले.. second opinion साठी. त्यांनीही bilateral ovarian cancer असल्याचं सांगितलं.पण त्याची severity काय आहे हे फक्त CT Scan च्या रिपोर्ट्स नंतरच स्पष्ट होणार होतं.

But at the end of the day, I knew that I had advanced cancer of ovaries. And it was 'serious'. पण किती सिरियस हे त्या क्षणी कुणीच सांगू शकत नव्हतं.

रात्री मुलींना झोपवल्यानंतर मी डोळे मिटून थोडा वेळ शांतपणे बसले. मन सैरभैर होत होतं त्याला आवरायचा प्रयत्न केला. सगळयात आधी ठरवलं,"Why me? मी कुणाचं काय वाकडं केलं होतं? मग माझ्या बरोबर च असं का झालं?" असा विचारही अजिबात मनात आणायचा नाही. कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना घडल्या तेव्हा तर मी कधीही नव्हतं विचारलं देवाला,"Why me? माझ्याच आयुष्यात इतक्या चांगल्या घटना का?" ते सगळं मी आनंदानी स्वीकारलं, मग आत्ता या प्रसंगी मी असा प्रश्न का विचारू?

आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी परिस्थिती किंवा वस्तुस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्या बद्दल मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही. उलट त्या परिस्थिती ला स्वीकारून त्यातून पुढे कसा मार्ग काढायचा हा विचार केला पाहिजे. मी ही माझ्या मनाची तयारी केली. कागद आणि पेन घेऊन बसले. एका त्रयस्थाप्रमाणे मी स्वतःच माझी situation assess केली.

माझ्या समोरचा प्रॉब्लेम होता 'माझा आजार' आणि माझं ध्येय होतं -या आजारावर मात करून त्याला कायमचं नेस्तनाबूत करणं ! पण सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे माझ्या आजाराचं गांभीर्य मला अजुन पर्यंत कळलं नव्हतं. रोग शरीरात पसरला असण्याची दाट शक्यता होती... नव्हे जवळ जवळ खात्रीच होती. पण तो किती आणि कुठे कुठे पसरला आहे हे अजून कळलं नव्हतं.

एकदम मनात विचार आला,' अजून किती महिने असतील माझ्या कडे? महिने तरी असतील ना...का आता फक्त दिवसच मोजायचे?'

दोन तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते तेव्हा तिच्या ओळखीत एका बाईला लास्ट स्टेजचा ब्लड कँसर असल्याचं कळलं होतं. तिला डॉक्टर नी जेमतेम महिन्याभराचा अवधी दिला होता. "माझ्या बाबतीत पण असंच काही असलं तर?" असा प्रश्न हळूच मनात डोकावला. पण मी लगेचच तो विचार झटकून टाकला. जर तितकंच सीरियस असतं तर डॉक्टर नी सांगितलं असतं .. नक्कीच. तशा परिस्थितीत ही आशेचा एक किरण दिसला.

पण मी या शक्यतेवर ही विचार सुरू केला. कारण मला माहीत होतं की जर मी याचा सोक्षमोक्ष नाही लावला तर हा विचार सारखा डोकं वर काढत राहील आणि ते मला मान्य नव्हतं.

मी नेहमी प्रमाणे या situation बद्दल चे positive आणि negative पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. आणि त्या विचार मंथनातून एक नवीनच thought process सुरू झाली.

अचानक वाटलं की 'देवाची आपल्यावर जरा जास्त च मेहेरनजर आहे! त्यामुळेच कदाचित त्यानी मला हा पुढच्या काही दिवसांचा ग्रेस पीरिएड दिलाय. तो मला सांगतोय की ,'तुला जे काही करावंसं वाटतंय ते करून घे. तुझ्या मुलींच्या भविष्याबद्दल काही प्लॅन करायचं असेल तर ते कर." त्या क्षणी मनोमन देवाचे आभार मानले.. त्यानी दिलेल्या या ग्रेस पीरिएड साठी. हो ना! जर त्यानी मनात आणलं असतं तर मलाही इतर अनेक जणांसारखं all of a sudden घेऊन गेला असता ... without prior notice.... But now, even in this situation, I had the advantage. आता त्या बाबतीतली uncertainty नाहीशी झाली आणि मी इतर issues वर लक्ष् केंद्रित केलं.

मनात एकदम आमच्या मुलींचा विचार आला. दोघींच्या खोलीत जाऊन बघितलं. माझ्या दोन्ही मुली-ऐश्वर्या ( वय वर्षे ११) आणि स्रुष्टी (वय वर्षे ६) शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या आईच्या आणि पर्यायाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वादळाची त्यांना तीळमात्र ही कल्पना मी होऊ दिली नव्हती. मी दोघींच्या डोक्यावरुन हात फिरवला. मनोमन देवाची प्रार्थना केली. म्हटलं,"देवा, माझ्या मुलींना त्यांच्या आयुष्यात नीट सेटल झालेलं बघायचं आहे मला. आणि त्यासाठी मला या आगंतुक संकटावर मात करणं आवश्यक आहे.इतक्या गुणी आणि समजुतदार मुली आहेत माझ्या, मी खूपच नशिबवान आहे म्हणून मी 'त्यांची' आई झाले.They have made my life complete and so they also deserve the best in their life. आणि कुठल्याही मुलांकरता त्यांच्या आई वडीलांपेक्षा बेस्ट दुसरं काहीच नसतं. त्या क्षणी मी ठरवलं- हा कँसर माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्याला माझ्या आयुष्यात स्थान नाही. मी या रोगावर मात करीन. माझ्या मुलींना त्यांची आई मिळेल... नक्की!

अचानक मनातलं वादळ शांत झालं आणि विचारांना एक नवी दिशा मिळाली. परत आमच्या खोलीत येऊन बसले. मनातले विचार कागदावर उतरवायला सुरुवात केली. कागदावर मधोमध एक उभी रेघ आखली...एका बाजूला होता माझा आजार-कदाचित 'जीवघेणा'. आणि दुसऱ्या बाजूला लिहित गेले- माझे आई बाबा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद, नितिन ची साथ, आप्त स्वकीयांच्या सदिच्छा आणि प्रार्थना, मुलींचं निर्व्याज प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजारावर मात करायची माझी जिद्द आणि देवावर असलेली माझी असीम श्रद्धा..... लिस्ट वाढतच होती. तेव्हा लक्षात आलं - शत्रू कडे एकच हत्यार आहे पण माझ्याकडे ..... !

अचानक माझ्या या शत्रुवर मला खूप दया आली. वाटलं-'बिच्चारा! याला माहिती नाहीये यानी कुणाशी पंगा घेतलाय!' त्या परिस्थितीतही चेहऱ्यावर एक मंद हसू आलं 'विजयाचं हसू'.डोळ्यांसमोर एक द्रुश्य दिसलं-

माझा आजार (एक vague आकार) घाबरून माझ्या पासून लांब पळत सुटलाय आणि मी मात्र एके ठिकाणी ठामपणे उभी आहे-माझ्या पाठीशी (वर लिहीलेली) माझी सगळी सेना घेऊन...

त्या दिवसापासून आजपर्यंत मी हे चित्र माझ्या मनात कोरून ठेवलंय.

परत एकदा हातातल्या कागदाकडे पाहिलं आणि सिनेमात दाखवतात तसं माझं दुसरं मन म्हणालं,"पण जर असं नाही झालं तर?" म्हणतात ना-Hope for the best but be prepared for the worst. मी ही तेच करायचं ठरवलं. दुसरा कागद घेतला, लिहायला सुरुवात केली... माझ्या नंतर काय आणि कसं होऊ शकतं? नितिन ची नोकरी अशी आहे की घरात मुलींना सांभाळायला कायम कुणीतरी असणं आवश्यक आहे. त्या दोघी अजून लहान आहेत. नितिन कामानिमित्त तीन तीन महिने बाहेरगावी असतो. आणि जेव्हा त्याची फील्ड पोस्टींग येईल तेव्हा तर तो मुलींना बरोबर घेऊन नाही जाऊ शकणार. मग त्यावेळी मुली कुठे राहतील?

पहिला पर्याय होता- मुलींना होस्टेल मधे ठेवायचं. खरं तर सगळयात practical मार्ग तोच होता पण माझ्या मनाला तो पटत नव्हता. दोघींच्या मनावर याचा काय आणि कसा परिणाम होईल? आई अचानक गेली आणि आता बाबा ही जवळ नाहीत! छेः ....... कल्पनाच खूप भयावह होती.

दुसरा मार्ग म्हणजे- नितिन नी आर्मी सोडून सिव्हिल मधे नोकरी करायची किंवा त्यानी योग्य अशी जोडीदार शोधून दुसरं लग्न करायचं. पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. यावर सर्व द्रुष्टीनी विचार करायची गरज होती. त्यमुळे हे सगळं नितिन बरोबर सविस्तर बोलायचं ठरवलं आणि मी होस्टेल च्या पर्यायावर विचार सुरू केला. राहून राहून मुलींचे निरागस चेहरे डोळ्यांसमोर येत होते. त्याच रात्री त्यांनी दोघींनी माझ्या साठी एक grand dinner प्लॅन केला होता.

संथ्याकाळी दोघींनी मला सांगितलं,"आई, आज बाबा आत्याकडे खूप छान पार्टी करत असतील ना म्हणून आम्ही पण तुला पार्टी देणार आहोत. सगळं आम्ही दोघीच करणार. तू अजिबात किचन मधे नाही यायचं."

माझ्यासाठी त्यांनी एक मेन्यु कार्ड तयार केलं. Candlelight dinner साठी टेबल सेटिंग केलं. डिनर चा मेन्यु होता- soft drink, potato chips आणि दोन प्रकार ची सँडविघेस्.. जँम आणि सॉस सँडविच. इतका स्पेशल डिनर मी आजपर्यंत नाही खाल्ला. दोघींना खूप आनंद झाला कारण मी ताटातलं सगळं संपवलं. त्यांच्या मते 'सगळं संपलं' म्हणजे आईला खरंच खूप आवडलं. पण ते जेवण मी कसं खाल्लं ते माझं मलाच माहिती आहे. एकीकडे खात होते आणि दुसरीकडे डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.

हे सगळं आठवत, मुलींचा विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. दुसरा दिवस म्हणजे ४ नोव्हेंबर असाच विचारात आणि पुढची प्लॅनिंग करण्यात गेला. बोलता बोलता मुलींसमोर होस्टेल चा विषय काढला. त्या बद्दल खूप उत्साहानी बोलायला सुरुवात केली. तिकडे गेल्यावर त्यांना दोघींना किती मजा येईल, वगैरे वगैरे.. पण मुलींना तो विचार काही फारसा पटला नाही. मीही जास्त फोर्स नाही केलं. जी कल्पना मुळात मलाच पटत नव्हती ती मी मुलींना कशी पटवणार ? मी ते सगळं देवावर सोपवलं.

५ नोव्हेंबर चा दिवस उजाडला. नितिन परत आला घरी. बाबा येणार म्हणून दोघी मुली खूप खुश होत्या. मला म्हणाल्या,"आज बाबांच्या आवडीचा स्वैपाक कर हं आई." पण स्वैपाक करताना अचानक मनात विचार आला-' या पुढे कधी ह्या तिघांसाठी असा स्वैपाक करणं असेल का माझ्या नशीबात !' पण मी लगेच तो विचार झटकला आणि माझ्या दोलायमान मनाला दटावलं.

दुपारचं जेवण होईपर्यंत मी नितिन ला काहीच सांगितलं नाही..पण योग्य वेळ बघून मग मी त्याला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट साठी दिल्ली ला किंवा पुण्याला जायला लागणार होतं. कारण तिथल्या मिलिटरी हॉस्पिटल मधेच oncology departments आणि कँसर स्पेशालिस्ट्स होते. माझं माहेर पुण्यात असल्यामुळे आम्ही साहजिकच पुण्याला जायचा निर्णय घेतला.

७ नोव्हेंबर ला सकाळी CT Scan साठी हॉस्पिटलमध्ये गेले. नितिन होताच बरोबर. आजपर्यंत ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आणि एक्स रे या शिवाय मी कुठलीच इनव्हेस्टिगेशन नव्हती केली. कधी गरजच नाही भासली. पण त्या दिवशी CT Scan च्या त्या अवाढव्य मशीन समोर उभी होते तेव्हा मनात विचार आला- या स्कँन मधे काही शारीरिक वेदना किंवा त्रास होत असेल का? पण मग एकदम लक्षात आलं की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मला या रोगावर मात करायची होती आणि त्यासाठी आधी मला त्याची पूर्ण माहिती असणं आवश्यक होतं.

'अगर दुश्मन को हराना है, तो पहले उसे पूरी तरह से जान लो, समझ लो। फिर उसकी हार और तुम्हारी जीत - पक्की।

CT Scan ची पूर्ण प्रक्रिया साधारण एक तास भर चालू असावी. पण मला मात्र प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. पण मनात एकच विचार चालू होता-'या रोगावर मात करायला जे जे करावं लागेल ते सगळं मी करीन. जितका त्रास, वेदना होतील, ते सहन करीन. कारण मला खात्री होती की या वेदना काही वेळापुरत्याच आहेत. मी लवकरच या सगळ्यांतून बाहेर पडेन आणि माझं आयुष्य पुन्हा नव्या जोमानी जगेन.

रेडिऑलॉजिस्ट म्हणाले," Mam, stay still. तुम्ही जितक्या स्थिर राहाल तितका स्कँन स्पष्ट येईल." इतक्या वेदनांमधे हात पाय न हलवता स्थिर राहाणं आणि तेही तासभर..... अवघड होतं.. पण तितकंच आवश्यक ही होतं. म्हणून मग मी शारीरिक शक्तीला माझ्या मनाच्या शक्तीची साथ दिली आणि scan पूर्ण होईपर्यंत निभावून नेलं.

रेडिऑलॉजिस्ट नी थोड्याच वेळात आम्हांला बोलावलं. म्हणाले,"पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मधले oncologist surgeon सध्या टेम्पररी ड्यूटी वर इथे आले आहेत. आत्ता ऑपरेशन थिएटर मधे आहेत. तुम्ही स्कँन ची फिल्म घेऊन जा आणि त्यांना दाखवा. सविस्तर रिपोर्ट्स मी संध्याकाळ पर्यंत देतो.

आम्ही लगेच जाऊन त्या सर्जन ला भेटलो. त्यांनी स्कँन पाहिला आणि म्हणाले,"Mam, I will not say you have come early..... but you are not late also."

त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि मला जग जिंकल्याचा आनंद झाला. मी त्या क्षणी ठरवलं- मी या रोगावर मात करणारच. ते पुढे म्हणाले,"तुम्ही कन्सल्टिंग रूम मधे बसा. मी एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर संपवून येतो." थोड्या वेळानी ते आले आणि त्यांनी पुन्हा एकदा स्कँन नीट अभ्यासला. माझी प्राथमिक शारीरिक तपासणी केली आणि म्हणाले," मँम, तुमच्या दोन्ही ओव्हरीज् मधे malignant tumors आहेत. पण आता ते फक्त ओव्हरीज् पर्यंत सीमित नाही राहिले. डाव्या ओव्हरी मधला ट्यूमर खालच्या दिशेने वाढत जाऊन रेक्टम ला चिकटला आहे आणि आता तिथे आतपर्यंत पसरला आहे. In fact, now it is difficult to differentiate between the organ and the tumor.. उजव्या ओव्हरी मधला ट्यूमर वरच्या बाजूला वाढून diaphragm ला चिकटला आहे आणि हळूहळू तिकडे पसरतो आहे. दोन्ही ट्यूमर्स प्रत्येकी साधारणपणे ९.५ सें मी ते १० सें मी इतके लांब आहेत. तुमचा कँसर तिसऱ्या स्टेज मधे आहे- स्टेज '3-C' to be precise. कँसर cells शरीरात इतर ठिकाणी पोचल्या असण्याची देखील शक्यता आहे.म्हणूनच मी मगाशी म्हणालो की you have not come early. पण काळजी करू नका. We will manage this." मग नितिन कडे बघून ते म्हणाले," Patient is very positive. त्यांच्या body language वरूनच कळतंय. आणि त्यांची ही सकारात्मक भूमिका त्यांना नक्कीच मदत करेल."

मग त्यांनी आम्हांला ट्रीटमेंट चा आराखडा समजावून सांगितला - आथी तीन केमोथेरपी सेशन्स मग सर्जरी आणि मग उर्वरित तीन केमोथेरपी. सर्जरी मधे ओव्हरीज् बरोबरच गर्भाशय आणि fallopian tubes पण काढून टाकण्यात येणार होत्या.

हे सगळं ऐकत असताना एक प्रश्न वारंवार माझ्या मनात येत होता. मी डॉक्टर ना म्हणाले,"मगाशी मी वेटिंग रूम मधे बसले होते तेव्हा तिथल्या एका पोस्टरवर 'how to detect cancer या हेडिंग खाली signs and symptoms of cancer अशी एक लांबलचक लिस्ट होती. पण माझ्या बाबतीत त्यातली कुठलीच लक्षणं नाही आढळली. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रोग माझ्या शरीरात शिरून पसरतो आहे पण मला कसलाही त्रास किंवा वेदना नाही जाणवल्या. अगदी कॉमन असणारे weight gain किंवा weight loss वगैरे पण नाहीत. असं कसं? "

यावर ते म्हणाले," मँम, ओव्हेरियन कँसर च्या पेशंट्स मधे बऱ्याच वेळा असं होतं. सुरुवातीच्या काळात पेशंटला कसलाच त्रास जाणवत नाही. म्हणूनच या कँसरला बरेच लोक silent killer असंही म्हणतात."

घरी गेल्यावर देवा समोर उभी राहिले. हात जोडून त्याचे आभार मानले... दोन गोष्टीं साठी- पहिली म्हणजे 'मला वेळेतच माझा आजार लक्षात आला, अगदी just in time. (कारण आणखी काही दिवस उशीर झाला असता तर कँसर चौथ्या स्टेज मधे पोचला असता आणि मग त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्य झालं असतं.)

आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'माझ्या शरीरातलं कुठलंही vital organ रोगग्रस्त झालं नव्हतं.

अचानक विचारांना नवीन दिशा मिळाली -"God wants me to live" ! देवाची अशी इच्छा आहे की मी या आजारातून सुखरुप पणे बाहेर पडावं आणि म्हणूनच त्यानी मला वेळेत सावध केलं.

संध्याकाळ पर्यंत माझ्या आजाराची बातमी आमच्या कॉलनीत पसरली. माझ्या मैत्रिणी, नितिन चे सहकारी, मित्र सगळ्यांनी मदतीची तयारी दाखवली.पण सगळ्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं- Of all the people, प्रिया ला कँसर कसा झाला?

कारण ते सगळे जण मला रोज संध्याकाळी एक-एक तास brisk walk करताना बघायचे.आमच्या जोथपूरच्या मिलिटरी स्टेशन मधल्या सगळ्या official आणि cultural कार्यक्रमात मी नेहमी सक्रियपणे सहभागी होत असे. त्यामुळे माझ्या कँसरची बातमी माझ्या इतकीच इतरांसाठी ही धक्कादायक होती.

आता आम्हाला पुढची तयारी करायची होती. ट्रीटमेंट कमीत कमी ६-७ महिने तरी चालणार होती. आणि तेवढा काळ मला पुण्यात राहणं भाग होतं.दोघी मुली अर्थातच माझ्या बरोबर पुण्याला जाणार होत्या. पण त्यात भर म्हणून नितिनची पोस्टिंग ऑर्डर आली होती- त्याला ११ नोव्हेंबर ला पंजाब मधे 'मोगा' ला हजर राहायचे होते.

आम्ही माझ्या CT Scan नंतर सरळ मुलीच्या शाळेत गेलो. त्यांच्या मुख्याध्यापिका ना भेटून सगळं सविस्तर सांगितलं. ऐकून त्यांनाही धक्का बसला. पण त्यांनी आम्हांला पूर्ण सहकार्य दिलं. सहा-सात महिने मुलींची गैरहजेरी लागणार होती. कदाचित त्यांना वार्षिक परीक्षेकरता यायला ही जमणार नाही याची आम्ही पूर्ण कल्पना दिली. पण त्या म्हणाल्या," तुम्ही त्या बाबतीत निर्धास्त रहा. ते सगळं कसं मँनेज करायचं ते मी बघून घेईन. तुमच्या दोन्ही मुलींचा आत्तापर्यंतचा academic performance खूप चांगला आहे त्यामुळे त्यांनी मंथली टेस्ट्स दिल्या नाहीत तरी चालेल. वार्षिक परीक्षेच्या प्रश्णपत्रिका मी तुम्हाला पोस्टानी पाठवीन. तुम्ही मुलींकडून उत्तरपत्रिका लिहून घ्या आणि मला पाठवा. त्या दोघी चीटिंग करणार नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही आता फक्त तुमच्या ट्रीटमेंट कडे लक्ष द्या." त्यांच्या या बोलण्यामुळे आमची ती काळजी दूर झाली.

आता अजून एक महत्त्वाचं काम होतं-आणि ते म्हणजे घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर आणि पँकिंग.सगळ्यात आधी माझी आणि मुलींची पुण्याला घेऊन जायच्या सामानाची जमवाजमव आणि पँकिंग. त्यात इतर सामानाबरोबर मुलींची अभ्यासाची पुस्तकं पण ठेवली. मग होती स्वयंपाक घर आणि फ्रीजची स्वच्छता, दूधवाला, पेपरवाला, मोलकरीण यांचे हिशोब.

या सगळ्या बरोबर नितिन ची मोगाला जायची तयारी- त्याच्या सामानाचं वेगळं पँकिंग. त्याशिवाय घरातल्या इतर सामानाची पँकिंग पण आवश्यक होती. कारण नितिन ची पोस्टिंग दुसऱ्या गावाला झाल्यामुळे आम्हांला शैक्षणिक वर्ष संपल्यावर (मार्च- एप्रिल च्या सुमारास) हे घर रिकामं करावं लागणार होतं. पण त्यावेळी मी पुण्याहून येऊ शकेन की नाही याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून शक्य होईल तेवढं सामान बॉक्सेस् मथे पँक केलं.

नितिन नी इमर्जन्सी कोटा मधून आमची तिघींची पुण्याची तिकिटं रिझर्व्ह केली, आठ नोव्हेंबर ची.

तिकिटं हातात आल्यावर मी पुण्यातल्या माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला. तिला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट च्या काळात मी तिच्या घरी राहायचा विचार करत होते. माझा आजार आणि त्याची severity कळल्यावर साहजिकच ती मूळापासून हादरली होती. तिच्या आवाजावरून माझ्या लक्षात आलं. पण स्वतःला सावरून घेत ती म्हणाली," पियु, तू मुलींना घेऊन सरळ माझ्याकडे ये. बाकी कुठलाही विचार करू नको." मी तिला ट्रीटमेंट च्या कालावधीचीही कल्पना दिली. त्यावर ती म्हणाली,"तुला जितके दिवस पाहिजे तितके दिवस तू माझ्याकडे राहू शकतेस." मी तिला ९ नोव्हेंबर करता पुण्यातल्या एखाद्या ऑन्कॉलॉजिस्ट ची अपॉईंटमेंट घेऊन ठेवायला सांगितली - थर्ड ओपिनियन साठी.

दुसऱ्या दिवशी (आठ तारखेला) सकाळी मी माझ्या शाळेत- जिथे मी शिकवत होते - तिकडे गेले. प्रिन्सिपॉल ना सगळं सांगितलं. नोकरीचा राजीनामा लिहून दिला. सगळ्या सहकर्मचार्यांचा निरोप घेतला. त्यांचा कुणाचा या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण सगळयात अवघड होतं माझ्या वर्गातल्या मुलांना सांगणं. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या बरोबर एक वेगळाच ऋणानुबंध जुळला होता माझा. मी दुसऱ्या गावाला कामासाठी जाते आहे हे कळल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता -" तुम्ही परत कधी येणार?" मी म्हणाले,"लवकरात लवकर." त्यांच्या भाबड्या डोळ्यांमधे अजूनही बरेच प्रश्न होते पण त्यांची उत्तरं कदाचित माझ्याकडे नव्हती. त्या मुलांचं ते निरागस प्रेम बघून मला अजूनच स्फूर्ति मिळाली- या रोगावर मात करायची.

त्याच दिवशी संध्याकाळच्या ट्रेन नी मी आणि दोघी मुली पुण्याला जायला निघालो.
ट्रेन मधे आमच्या कंपार्टमेंट मधल्या माझ्या सहप्रवाश्यांमधे एक कुटुंब होतं. नवरा बायको आणि आठ-दहा वर्षांची त्यांची मुलगी. मोनिका नाव होतं तिचं. त्या मुलीची अवस्था बघवत नव्हती. She was physically and mentally challenged. तिचं स्वतःचंच असं एक विश्व होतं. तिचे आई वडील अधूनमधून तिच्याशी बोलत होते, तिला खिडकी बाहेरची पळणारी झाडं दाखवत होते... अगदी नॉर्मल आई वडीलांसारखे. पण ते सगळं मोनिका पर्यंत पोचतच नव्हतं.

नंतर तिच्या आईशी बोलत होते तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितलं की मोनिका जन्माला आल्या आल्या रडलीच नाही. आणि त्यामुळे तिच्या मेंदू ला पुरेसा रक्तपुरवठा आणि पर्यायानी ऑक्सीजन नाही मिळाला. As a result, some brain cells were permanently dead.आणि यावर काही औषध किंवा उपचार नाहीत, त्यामुळे मोनिका आयुष्यभर अशीच राहणार - like a vegetable - परधार्जिणं आयुष्य जगत!

हे सगळं ऐकलं आणि माझ्या मनात वेगवेगळ्या विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली. त्या छोट्याशा जीवाबद्दल एकाच वेळी प्रेम, करुणा, दया, कीव अशा अनेक भावना एकत्र झाल्या. वाटलं, 'या एवढ्याशा जीवाच्या नशीबात असं जगणं का?'तिच्या आई-वडिलांच्या मनःस्थिती ची कल्पना करूनच जीवाचा थरकाप उडत होता. आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघणं म्हणजे त्यांच्यासाठी नरकयातनाच असणार. पण त्यापेक्षाही जास्त त्रासदायक असेल त्यांना वाटणारी 'असहायता'..... आपली इच्छा असूनही स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी आपण काहीच करू शकत नाही .... या सत्य परिस्थितीतून जाणवणारा helplessness. सगळंच कल्पने पलीकडचं होतं. त्या क्षणी एका हिंदी गाण्याच्या ओळी आठवल्या.. 'दुनिया में इतना ग़म है...... मेरा ग़म कितना कम है।'

मी खरंच खूप नशिबवान असल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

९ नोव्हेंबर ला संध्याकाळी आम्ही पुण्याला पोचलो. स्टेशन वर अपेक्षेप्रमाणे माझ्या बहिणी, जिजाजी सगळे आले होते. माझ्या मोठ्या बहिणीबरोबर मी स्टेशन वरून सरळ ऑन्कॉलॉजिस्ट ला भेटायला गेले. मुलींना माझी चुलत बहिण तिच्या घरी घेऊन गेली.

डॉक्टर ना मी माझी सगळी केस हिस्ट्री सांगितली. माझे केस पेपर्स, CT Scan चे रिपोर्ट्स सगळं त्यांच्या समोर ठेवलं. त्यांनी ते सगळे रिपोर्ट्स नीट अभ्यासले आणि म्हणाल्या,"तुमच्या डॉक्टर नी केलेलं रोगाचं निदान अगदी योग्य आहे. You have bilateral ovarian carcinoma of stage 3-C. पण मला एक सांगा की तुम्हाला कधी आणि कसं कळलं याबद्दल? कारण तुमच्या केसमधे कुठलेच दर्शनीय असे signs ,symptoms दिसत नाहिएत.'

मग मी त्यांना सगळं सविस्तर सांगितलं," देवदयेनी मला वेळेतच लक्षात आलं .. actually ऑक्टोबर महिन्यात माझी मंथली साइकल ऑलमोस्ट पंधरा दिवस आधी आली. त्यामुळे मला थोडी काळजी वाटत होती कारण माझ्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच झालं होतं. म्हणून मी डॉक्टर ना कन्सल्ट केलं. पण ते म्हणाले,"तुम्ही काळजी नका करू. Hormonal imbalance मुळे कधीकधी होतं असं. मला तरी यात काही सिरियस असेल असं वाटत नाहीए. आपण अजून दोन तीन महिने वाट बघू. त्यानंतरही जर ठीक नाही झालं तर मग सगळ्या टेस्ट्स करून घेऊ."

पण मला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. म्हणून मग मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना सांगितलं. त्या सगळ्यांनी सुद्धा तेच सांगितलं... 'काळजी नको करू. हे सगळं नॉर्मल आहे'

पण somehow माझं मन हे मानायला तयार नव्हतं. मी खूप प्रयत्न केला सकारात्मक विचार करायचा... पण मनात आत कुठेतरी शंकेची पाल सारखी चुकचुकत होती. आणि ती शंका मला स्वस्थ बसू देत नव्हती..अचानक माझ्या मनात विचार आला की 'माझं शरीर मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. My body is giving me a signal that something is wrong with it.' आणि हळूहळू माझ्या नकळत मी माझ्या पोटावरून हात फिरवायला लागले, हलकेच दाबून बघत होते। कुठे काही वेगळे जाणवतंय का? अचानक पोटाच्या उजव्या बाजूला काहीतरी hard जाणवलं, एखादा lump असल्यासारखं. तसंच काहीतरी डाव्या बाजूला ही लागले .. मला वाटलं ‘कदाचित कुठेतरी internal swelling आली असेल’... पण मग शंका आली, दोन वेगवेगळ्या ठिकाणी swelling ?’ माझ्या मनातली शंकेची पाल आता जोरजोरात ओरडायला लागली होती. लगेच डॉक्टर कडे गेले. त्यांनीही चेक केलं. त्यांनाही इंटर्नल swelling ची शक्यता वाटत होती. त्यांनी लगेच मला सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली… and the rest is history.

हे सगळं ऐकून त्या म्हणाल्या,” मॅम, तुम्ही योग्य च केलंत. नाहीतर बऱ्याच वेळा patients आणि खास करुन स्त्रिया, आपलं दुखणं अंगावर काढतात आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा जातात डॉक्टर कडे!

मी आमच्या संभाषणाची गाडी परत माझ्या ट्रीटमेंट च्या दिशेनी वळवत त्यांना विचारलं,"तुमच्या मते कोर्स ऑफ ट्रीटमेंट काय आहे?" त्यांनीही तेच सांगितलं- आधी तीन केमो मग सर्जरी आणि मग उरलेल्या तीन केमो. ट्रीटमेंट च्या बाबतीत आता कुठलीही शंका नव्हती. पण मला एक वेगळीच काळजी लागून राहिली होती. मी अजूनपर्यंत कुणाशीच नव्हते बोलले त्या बद्दल. मी त्यांना विचारलं," मी असं ऐकलंय की जर एखाद्या स्त्री ला कँसर असेल तर तिच्या बहिणी आणि मुलींना पण हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे?" त्या हसल्या आणि म्हणाल्या,"तुमचा आजार सोडून तुम्हाला त्यांची काळजी वाटते आहे? तुमच्या बहिणींनी स्क्रीनिंग टेस्ट्स केल्या पाहिजेत आणि तुमच्या मुली तर अजून खूप लहान आहेत. आणि तसंही तुम्हाला कँसर झाला म्हणून त्यांना सगळ्यांनाही होईल हे काही जरूरी नाही. तेव्हा आता तो विचार मनातून काढून टाका." त्यांचं हे बोलणं ऐकून माझी एक मोट्ठी काळजी मिटली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कमांड हॉस्पिटलमध्ये ऑन्कॉलॉजिस्ट ला भेटायला गेले. ओ.पी.डी च्या वेटिंग हॉल मधे बसले होते तेव्हा समोरच्या भिंतीवर लावलेल्या एका पोस्टर वर माझी नजर गेली-त्यात cancer survivors करता आवाहन केलं होतं की 'जर तुम्हाला कँसरग्रस्त लोकांना मदत करायची असेल तर तुमचं नाव रजिस्टर करा.' ते वाचून मी तिथल्या अटेंडंट ला म्हणाले," माझं नाव लिहून घ्या." त्यावर तो हसला आणि म्हणाला," मँडम, हे cancer survivors साठी आहे. कँसर पेशंट्स करता नाहीए." मी त्याला ठामपणे सांगितलं," तुम्ही आज जरी माझं नाव लिहिलं नाहीत तरी थोड्याच दिवसांत मी स्वतः येऊन माझं नाव या रजिस्टर मधे लिहिन.कारण मला खात्री आहे की मी या रोगावर नक्कीच मात करीन." तेवढ्यात माझ्या अपॉईंटमेंट ची वेळ झाली आणि मी डॉक्टर च्या केबीन मधे गेले. त्यांच्या समोर सगळे रिपोर्ट्स, रेफरन्स डॉक्युमेंट्स ठेवले. त्यांनी CT Scan चा रिपोर्ट वाचला आणि म्हणाले,"पेशंट कुठे आहे?" मी त्यांना म्हणाले,"पेशंट तुमच्या समोर बसलीए." त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.त्यांनी विचारलं," तुम्ही अशा अवस्थेत जोधपूरहून इथे एकट्या आलात?" मग मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले," कमाल आहे तुमची! पण इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला सांगा. तुमची राहण्याची सोय, तुमच्या मुलींची इथल्या शाळेत अँडमिशन- काहीही मदत लागली तर सांगा. " त्यांना माझ्या बद्दल वाटणारी काळजी बघून मनात एक विचार आला -' या जगात पदोपदी चांगली माणसं भेटतात आपल्याला. आणि या अशा माणसांमुळेच हे जग सुरळीत रित्या चाललं आहे.'

त्यांनी मला वेगवेगळ्या टेस्ट्स करून घ्यायला सांगितल्या. त्यात दोन टेस्ट्स महत्त्वाच्या होत्या - CA-125 (ओव्हेरियन कँसर डिटेक्शन टेस्ट), आणि FNAC (Fine Needle Aspiration Cytology).

CA-125 ही एक ब्लड टेस्ट आहे. या टेस्ट मधे नॉर्मल रिपोर्ट्स ची रेंज 0-35 अशी असते. पण माझ्या रक्तात तो काउंट होता '४२९.८'.. म्हणजे नॉर्मल रेंज पेक्षा कितीतरी पटींनी जास्त... पण ते तर अपेक्षितच होतं.

FNAC टेस्ट मधे एका अगदी बारीक नीडलच्या मदतीनी ट्यूमर मधल्या काही पेशी काढून घेतात. ही प्रक्रिया लोकल अँनेस्थेसिया देऊन केली जाते. त्या पेशींचा अभ्यास/निरीक्षण करून मग त्याप्रमाणे कोर्स ऑफ ट्रीटमेंट, औषधे वगैरे ठरवलं जातं.

सगळ्या टेस्ट्स झाल्यानंतर मी १३ नोव्हेंबर ला माझ्या पहिल्या केमोथेरपी साठी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले.

हॉस्पिटलमधे जायच्या आदल्या दिवशी मी माझ्या दोन्ही मुलींना कुशीत घेऊन समजावून सांगितलं," माझ्या पोटात जो ट्यूमर आहे ना- म्हणजे ज्या bad सेल्स आहेत- त्यांना मारुन टाकायला एक औषध असतं. पण ते औषध सलाइन मधून घ्यावं लागतं. त्या साठी मला हॉस्पिटलमधे राहावं लागेल.पण मी लवकर परत येईन." त्या दोघींनीही खूपच समजुतदारपणे सगळं ऐकून घेतलं आणि दोघीही मला सोडून राहायला तयार झाल्या. त्यांची मावशी होतीच त्यांच्या बरोबर, त्यामुळे मला काळजी नव्हती.

रात्री झोपताना स्रुष्टी माझ्या कुशीत शिरताना नकळत माझ्या पोटाला हलकेच तिच्या पायाचा धक्का लागला. ते बघून माझी बहिण तिला म्हणाली,"सावकाश हं बाळा. आईला दुखेल!" हे ऐकल्याक्षणी तिचा चेहरा कसनुसा झाला आणि ती म्हणाली,"सॉरी गं! पण अगं मावशी, आमच्या आईला असं कधीच होत नाही ना, त्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं." त्या एका वाक्यावरून मला तिच्या भाबड्या मनात चालू असलेली विचारांची घालमेल स्पष्ट दिसून आली. तिला जवळ घेऊन मी म्हणाले, "हो गं बेटू, you are right. मला खरंच कधी असं काही होत नाही आणि यापुढेही काही नाही होणार . त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस." माझं बोलणं ऐकून तिच्या मनातलं वादळ शांत झालं असावं. कारण लगेच तिच्या चेहरा उजळला आणि ती हसून म्हणाली," मला माहितीए ऑलरेडी कारण तू तर brave girl आहेस ना!"

तिचा माझ्या वरचा हा विश्वास मला अजूनच ताकद देऊन गेला.

माझ्या आजूबाजूला जशी मला सपोर्ट करणारी माणसं होती तशीच माझ्या आजाराची जाणीव करून देणारी माणसंही होती. एकजण म्हणाले,"इतक्या लहान वयात तुला हे सगळं भोगावं लागतंय. तू कुणाचं असं काय वाईट केलंस? मग तुझ्याच नशीबात हे असं का?" मी त्यांना म्हणाले," अहो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही भोग असतातच ना! आता हेच बघा ना.. कँसर जरी मला झाला असला तरी तुम्हाला ही त्यामुळे मानसिक त्रास होतोच आहे ना? तुम्ही तरी कुणाचं काय वाईट केलंय? तरीसुद्धा तुमच्या नशीबात हा मनस्तापाचा भोग आहेच की!"

नंतर विचार करताना लक्षात आलं-'माझ्याच बाबतीत असं का?' या प्रश्नाचं उत्तर.... बघा तुम्हाला पटतंय का.... मी जेव्हा शाळेत नोकरी करत होते तेव्हा एखादं अवघड किंवा महत्त्वाचं काम मी वर्गातल्या काही ठराविक मुला-Aमुलींनाच सांगायचे, कारण मला त्यांच्या बद्दल खात्री होती..काम कितीही अवघड असलं तरी ती मुलं ते नक्की पूर्ण करतील असा विश्वास होता मला.

कदाचित देवही असाच विचार करत असेल. जेव्हा त्याला एखाद्याची परीक्षा घ्यायची असेल तेव्हा ज्या माणसाबद्दल त्याला खात्री आहे, त्या माणसासाठी सगळ्यात अवघड परीक्षा ! याचा अर्थ असा की देवाला माझ्या बद्दल खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणूनच तो माझी 'अशी ' परीक्षा घेतोय. देवानी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी खोटा ठरू देणार नाही. मी या परीक्षेत नक्की पास होईन. या नुसत्या विचारानीच मला एक वेगळंच बळ मिळालं... एक प्रकारचं मानसिक बळ -'मी या रोगावर मात करणारच' हा विश्वास निर्माण करणारं बळ!

माझी पहिली केमोथेरपी १६ नोव्हेंबर ला सुरू झाली. नितिन बरोबर होताच. मोगाला त्याच्या युनिटचा कमाडिंग ऑफीसर म्हणून सगळी सूत्रं हातात घेतल्यानंतर तो एका आठवड्याची सुट्टी घेऊन आला होता. मला त्याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना होती. एकीकडे प्रमोशन मिळाल्याचा आनंद आणि तेही एका युनिटचा 'कमांडिंग ऑफीसर' (CO) म्हणून! आम्ही दोघांनीही या दिवसासाठी मनोमन देवाची प्रार्थना केली होती. कदाचित नितिन नी त्याच्या CO होण्याची जेवढी स्वप्नं बघितली नसतील तेवढी मी बघितली होती. देवानी आमचं हे स्वप्न पूर्ण केलं पण अशी परिस्थिती निर्माण केली की आम्ही त्या यशाचा निर्भेळ आनंद नाही भोगू शकलो. पण म्हणतात ना-'याला जीवन ऐसे नाव!'

मी या घटनाक्रमाकडे पॉझिटीव्हली बघायचं ठरवलं. मी असा विचार केला की या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या कारण- मला या आजारावर मात करण्यासाठी 'नितिन चं प्रमोशन' हे एक मोटिव्हेशन आहे. मी लवकरात लवकर बरी होईन आणि 'CO' ची बायको म्हणून मिरवेन. त्या नुसत्या विचारानीच त्या अवस्थेतही माझ्या ओठांवर हसू आलं.

जेव्हा नर्स मला इंट्रा व्हेनस सलाइन लावायला आली तेव्हा मी खूप अधीर झाले होते. वाटत होतं, लवकर ट्रीटमेंट सुरू करा. मला लवकर बरं व्हायचंय. IV लावताना ती नर्स मला म्हणाली," मँडम, आत्ता तर तुमच्या व्हेन्स अगदी सहज सापडतायत, पहिलीच केमो आहे ना म्हणून. पण पुढे हळूहळू सगळ्या व्हेन्स रबर सारख्या हार्ड होतील. त्यावेळी त्यांत नीडल घुसवणं कठीण होईल आणि तुम्हाला पण खूप दुखेल."

एक नर्स असून पेशंट समोर असं बोलणं? तीनी तर पेशंटला धीर द्यायला हवा. पण मी आधीच ठरवलं होतं की कुठल्याही प्रकारची निगेटिव्हीटी आपल्या जवळपास ही फिरकू द्यायची नाही. मी पण त्या नर्सला ऐकवलं. म्हणाले," व्हेन्स कितीही हार्ड झाल्या तरी असतील माझ्या शरीरातच ना? त्यांत नीडल घुसवण्याचं तुमचं काम तुम्ही नीट, व्यवस्थित करा. राहिली गोष्ट माझ्या दुखण्याची....त्याची काळजी तुम्ही नका करू. मला खात्री आहे, सगळं ठीकच होईल."

थोड्याच वेळात तिनी IV ड्रिप चालू केला आणि त्या सलाइन च्या बॉटल मधे केमोथेरपी चं औषध इंजेक्ट केलं. मी डोळे बंद करून देवाचं नाव घेतलं आणि डोळ्यासमोर एक द्रुश्य आणलं- सलाइन मधे मिक्स होऊन हे औषध माझ्या शरीरात शिरतंय, रक्तात मिसळतंय आणि संपूर्ण शरीरात फिरून जिथे जिथे त्याला कँसर सेल्स दिसतायत तिथेच त्यांना मारून टाकतंय." या कल्पनेनीच किती बरं वाटत होतं. मीही मग त्या औषधाला सांगितलं (अर्थात मनातल्या मनात)," नीट शोधून काढ रे सगळ्यांना. एक एक को चुन चुन के मार डालो। देखना, कोई भी बचने ना पाए।"

पहिली केमो सुरळीतपणे पार पडली. पण मला नंतर दोन दिवस हॉस्पिटल मधेच under observation ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्यूटी वर जी नर्स होती, तिनी अगदी आपुलकीनी माझी चौकशी केली. माझ्या फँमिली बद्दल विचारलं. मी खाण्या पिण्याच्या बाबतीत काय काय काळजी घ्यायला पाहिजे ते सगळं नीट समजावून सांगितलं. मला तर काय लोकांशी गप्पा मारायला आवडतंच. त्यामुळे थोड्याच वेळात आमची दोघींची गट्टी जमली. तिसऱ्या दिवशी मला हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळाला आणि मी घरी जायला निघाले. माझ्या कालच्या मैत्रीणीचा निरोप घ्यायला म्हणून मी ड्यूटी रूम मधे गेले. तिथे तिचा तीन-चार वर्षांचा गोंडस मुलगा बसला होता. डोक्यावरचे सगळे केस मुंडन करून काढून टाकले होते. ती नर्स दक्षिण भारतीय असल्यामुळे मला वाटलं की 'तिरूपतीला जाऊन मुलाचं केशवपन केलं असावं' कारण त्यांच्या साठी तिरूपतीला जाऊन केस दान करणं याला धार्मिक द्रुष्ट्या खूप महत्व आहे. म्हणून मी तिला सहज विचारलं," तिरूपती में कराया इसका मुंडन?" त्यावर केविलवाणं हसून ती म्हणाली,"नो मँम. केमोथेरपी की वजह से उसके बाल झ़ड गए हैं।" तिच्या या वाक्याचा अर्थ लक्षात यायला मला काही क्षण लागले. पण जेव्हा समजलं तेव्हा मी सुन्न झाले. मला काय बोलावं तेच कळत नव्हतं. मनात विचारांची मँरेथॉन चालली होती. एकदम तिच्या मुलाकडे लक्ष गेलं.. तो कलरिंग बुकमधली चित्रं रंगवण्यात मग्न होता. साहजिकच त्याला परिस्थिती चं गांभिर्य कळत नव्हतं. पण त्याच्या आई वडिलांचं काय? नकळत माझी नजर माझ्या मैत्रिणीकडे वळली. माझ्या डोळ्यांतलं प्रश्णचिन्ह पाहून ती म्हणाली,"त्याला डोळ्याचा कँसर आहे.. to be precise .. retina चा. आत्तापर्यंत तीन केमोज् झाल्या आहेत. डॉक्टर्स चं म्हणणं आहे की 'सर्जरी ची गरज नाहीए, केमोथेरपी पुरेशी आहे.' तिचं बोलणं ऐकून मी माझ्याही नकळत तिला घट्ट मिठी मारली. थोड्या वेळापूर्वी जी माझी फक्त मैत्रीण होती, ती आता अचानक माझी गुरु झाली.. तिनी मला खूप काही शिकवलं होतं .. rather तिच्या वागण्या बोलण्यातून मीच बरंच काही शिकले. आपलं वैयक्तिक दुःख तिनी स्वतःकडेच ठेवलं होतं..... She had managed to keep her personal and professional life separate. And that is not easy .. not at all ! स्वतःचा मुलगा कँसरग्रस्त असताना, इतर कँसर पेशंट्सची सेवा करायची आणि तीदेखील हसतमुखानी, आपलं दुःख चेहऱ्यावर दिसू न देता !!! हा निष्काम कर्मयोग नाही तर दुसरं काय?

'स्वतःच्या दुःखाचा गाजावाजा न करता दुसऱ्याचं दुःख कमी करणं' हा आयुष्यातला एक खूप इंपॉर्टंट धडा शिकले मी त्या दिवशी तिच्या कडून.

त्या दिवशी हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतरही माझ्या मनात सारखे तेच विचार घोळत होते.मी तिच्या बाळासाठी आणि तिच्यासाठीही देवाकडे प्रार्थना केली. त्या वेळी तेवढंच शक्य होतं मला. आता हळूहळू मला केमोथेरपी च्या औषधांचे साईड इफेक्ट्स जाणवत होते. Nausea आणि त्यामुळे लॉस ऑफ अँपेटाइट. साहजिकच थोडा अशक्तपणा आला होता.

एके दिवशी जोधपूरच्या माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. तिच्या आवाजावरून ती खूप काळजीत असावी असं वाटत होतं. तिनी तीन चार वेळा माझ्या तब्बेतीची चौकशी केली. अगदी तिची खात्री होईपर्यंत. त्याच दिवशी संध्याकाळी अजून एका मैत्रिणीचा फोन आला. तिच्या मनात पण माझ्या तब्बेती विषयी तीच काळजी... दुसऱ्या दिवशी अजून एकीचा फोन - माझी हालहवाल विचारायला !! मला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. तसं पाहिलं तर त्यांनी फोन करून माझी चौकशी करणं यात काही गैर नव्हतं. पण लागोपाठ तीन फोन? ... हा देखील निव्वळ योगायोग असू शकतो. पण का कोण जाणे, माझं मन हे मानायला तयार नव्हतं. शेवटी मी न राहवुन माझ्या तिकडच्या अगदी खास, जिवाभावाच्या मैत्रीणीला फोन करून हा सगळा प्रकार सांगितला आणि तिला म्हणाले की 'या प्रकरणाचा काय तो छडा लावून मला सांग.' दोन दिवस होऊन गेले पण तिचा फोनच नाही आला. मला हा सस्पेंस स्वस्थ बसू देत नव्हता. शेवटी मीच तिला फोन केला. सुरुवातीला तिनी विषय बदलून उत्तर द्यायचं टाळलं. पण मी खूप insist केल्यावर तिनी मला सत्य सांगितलं. ती म्हणाली,"हे बघ, तू हट्ट च धरलायस म्हणून मी सांगतिए, पण तू मला प्रॉमिस कर की तू याचा त्रास नाही करून घेणार.." आता हा सस्पेंस मला असह्य झाला.. मी तिला म्हणाले," नमनाला घडाभर तेल नको गं! सरळ मुद्दयावर ये." तेव्हा ती म्हणाली,"अगं, आपल्या शाळेत कुणीतरी अशी अफवा पसरवली आहे की "प्रियाचा कँसर आता लास्ट स्टेज मधे गेलाय आणि आता ती यातून वाचणार नाही. Doctors have also given up now. आता तिच्याकडे जास्त दिवस नाहीएत." आणि म्हणून इथे सगळयांना खूप टेन्शन आलंय"

हे सगळं ऐकल्यावर मला हसावं का रडावं हेच कळेना!

मी तिला म्हणाले,"तू तिकडे सगळ्यांना सांग की माझी ट्रीटमेंट इकडे अगदी व्यवस्थित चालू आहे आणि मी लवकरच 'पूर्ण' बरी होऊन तिकडे येणार आहे सगळ्यांना भेटायला. तेव्हा आता कुणीही टेन्शन घेऊ नका म्हणावं."

आणि शेवटी मी तिला अजून एक काम सांगितलं... ही अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्याचं काम. कारण मी या आजारातून पूर्ण बरी झाल्यावर त्या व्यक्तीला भेटायचं होतं मला... शक्यतो personally, पण ते शक्य नसल्यास निदान फोनवर तरी ! 'कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही" , "जा को राखे साईया, मार सके ना कोई" या आणि अशा म्हणींचे अर्थ शिकवायचे होते तिला/त्याला.

पण somehow मला त्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीचा राग नव्हता आला उलट कीव येत होती. अशा मानसिकतेची माणसं ही असतात अस नुसतं ऐकलं होतं इतके दिवस.. पण आज अनुभव घेतला.Such people get a 'sadistic pleasure' out of such behaviour. पण या अनुभवामुळे माझा 'कँसर ला नेस्तनाबूत करायचा' निश्चय अजूनच पक्का झाला. आणि दुष्टबुद्धीनी का होईना पण त्या व्यक्तीनी मला माझ्या या लढाई साठी प्रेरणा दिली म्हणून मी मनोमन त्याचे आभार मानले.

२२ नोव्हेंबर ला नितिन मोगाला जायला निघाला. त्याची सुट्टी संपली होती. इतर वेळी कामानिमित्त बाहेरगावी जाताना-अगदी पाकिस्तान बॉर्डरवर जाताना सुद्धा त्यानी कधी मागे वळून बघितलं नाही. त्या वेळी मी च अगदी तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्या गाडीकडे बघत राहायची की कदाचित हा मागे वळून बघेल....पण कथीच नाही! तो एक खराखुरा सैनिक असल्यामुळे त्याच्या परिवारापेक्षा त्याचा देश त्याच्यासाठी महत्वाचा होता. आणि त्याबद्दल मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो. पण त्या दिवशी मात्र आम्हाला सोडून जाताना त्याचा पाय निघत नव्हता. मी त्याला इतकं vulnerable कधीच पाहिलं नव्हतं.क्षणभर वाटलं- घड्याळाला 'स्टँच्यु' म्हणावं. म्हणजे नितिन ला जायला नाही लागणार. पण मग माझी ट्रीटमेंट, माझं बरं होणं आणि आम्ही चौघांनी मिळून आमचं आयुष्य एन्जॉय करणं- हे सगळंच स्टँच्यु होऊन जाईल. म्हणून मग मी घड्याळाला 'ओव्हर' म्हटलं आणि नितिन मोगाला गेला.बाराव्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर ला मी माझं ब्लड सँम्पल देऊन परत येत होते. वाऱ्यामुळे केसांची एक बट सारखी डोळ्यांवर येत होती. तिला मागे सारायला म्हणून हातात धरली तर ती बट एकदम माझ्या हातात निघून आली. 'केस गळणं' सुरू झालं होतं. मनात पहिला विचार आला माझ्या मुलींचा - त्यांना काय वाटेल? नक्कीच दोघी घाबरतील. त्यामुळे त्यांना सांगतानाच असं सांगायला पाहिजे की त्या दोघी हे सगळं पॉझिटीव्हली घेतील. घरी गेल्यावर त्यांना दोघींना जवळ घेऊन समजावलं," डॉक्टर अंकल म्हणाले की जेव्हा या औषधाचा परिणाम सुरू होईल तेव्हा तुमचे केस गळायला लागतील. पण सगळं औषध शरीरातून बाहेर गेल्यावर पुन्हा सगळे केस येतील. त्यामुळे जेव्हा माझे केस गळायला लागतील ना तेव्हा आपण सेलिब्रेट करायचं. कारण त्याचा अर्थ असा की मी लवकरच पूर्णपणे बरी होणार आहे." दोघींनाही ते पटलं. त्यामुळे माझ्या केसगळतीला त्या निष्पाप जीवांनी अगदी आनंदानी स्वीकारलं. माझी एक मोठी काळजी दूर झाली.

पण मला माझ्या या नवीन रूपाची , rather, केस नसल्यामुळे माझ्या झालेल्या 'अवरूपाची' जाणीव करून देणारे लोक ही भेटले मला. एका ओळखीच्या बाईंना माझ्या या 'अशा' दिसण्यामुळे माझी खूपच काळजी (?) वाटत होती ! त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ," किती छान होते ग तुझे केस! पण आता हे काय होऊन बसलं!! तुला स्वप्नातही नसेल ना वाटलं की स्वतःचं असं रूप ही बघायला लागेल म्हणून?"

त्यांचं हे मानभावी बोलणं ऐकून मनात आलं -'असे हितचिंतक (का अहितचिंतक ? ) friends असतील तर शत्रुची गरजच नाहिए'

मी त्यांच्याच टोन मधे त्यांना सुनावलं -" अहो, आजकाल या 'अशा' लुकसाठी बायका पार्लर मधे जाऊन पैसे खर्च करतात. पण बघा ना, मला मात्र एकही पैसा खर्च नाही करावा लागला. उलट, या केसगळती मुळे हेअरकट आणि आयब्रो थ्रेडिंगचे पैसे पण वाचतायत.." माझं हे असं उत्तर त्यांना अपेक्षित नसावं.. एवढंसं तोंड करून निघून गेल्या.

अजून एका सिनिअर सिटीझन काकांना वेगळीच शंका होती.. मला म्हणाले," जर तुझे गेलेले केस कधीच परत नाही आले तर? मग कसं मँनेज करशील गं? " माझ्या मनात आलं त्यांना सांगावं," तुमच्या डोक्यावरचे ही तर कायमचेच गेलेत ना! आता जे काही होईल ते आपल्या दोघांचंही सारखंच होईल." माझ्या ओठावर फुटणारं मिस्कील हसू कसंबसं दाबत मी त्यांना म्हणाले," केसांच्या बदल्यात जर मला आयुष्य मिळत असेल तर मी जन्मभर अशी राहायला तयार आहे." माझं हे लॉजिक त्यांना पटलं असावं.. कारण नंतर कधीच त्यांनी तो विषय नाही काढला.

आता मला माझ्या दुसऱ्या केमो साइकल चे वेध लागले होते. पहिल्या केमोनंतर बरोब्बर एकवीस दिवसांनी म्हणजे ७ डिसेंबर ला माझी दुसरी केमो झाली. पण पहिल्या वेळी मला फारसा त्रास झाला नव्हता त्यामुळे यावेळी मला अँडमिट होण्याची गरज नव्हती. मी सकाळी हॉस्पिटलमधे गेले दिवसभर माझी केमो साइकल झाली आणि संध्याकाळी मी घरी परत आले.

देवदयेनी मला आत्तापर्यंत तरी केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स इतरांच्या तुलनेत कमी जाणवत होते. Nausea आणि लॉस ऑफ अँपेटाइट हे दोन मुख्य त्रास वगळता माझी अवस्था ठीकठाकच होती. पण अशक्तपणा खूप होता. एकेकाळी ट्रेकिंग आणि एन. सी.सी ची ड्रिल करणारी मी... आता दहा पावलं चालल्यानंतर मला दम लागत होता.पण मनात एक विश्वास होता की हे सगळं तात्पुरतं आहे. एकदा का माझी ट्रीटमेंट संपली की मी परत पूर्वीसारखी होईन.पण मुलींची मानसिक आणि भावनिक ओढाताण होताना बघून कधीकधी डोळे भरून यायचे.

त्या दोघींच्या मनःस्थितीची मला पूर्ण कल्पना होती. माझ्या बरोबरच त्यांच्याही आयुष्यात सगळी उलथापालथ झाली होती. आई आजारी, बाबा पण दुसऱ्या गावाला. माझ्या बहिणीचं घर त्यांच्या साठी नवीन नव्हतं. आम्ही जेव्हाही पुण्याला जायचो तेव्हा तिच्याच घरी राहायचो. तिच्या मुलीचं आणि या दोघींचंही चांगलं मेतकुट जमायचं.

पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. सुरुवातीचे काही दिवस दोघीही खूप खुश होत्या. रोजची शाळेची कटकट, अभ्यास हे काही नव्हतं ना! पण मग हळूहळू they both started missing their normal routine. कधीतरी अचानक मला विचारायच्या,"आई, आपण परत आपल्या घरी कधी जाणार?"

अशा situations मधे 'मी मी' म्हणणाऱे so called matured लोक देखील हतबल झाल्याचं बघितलं होतं मी. पण माझ्या दोघी मुली या बाबतीत खूपच शूरवीर ठरल्या. माझी शारीरिक अवस्था आणि त्यामुळे मला होणारा त्रास त्यांना दिसत होता. आणि म्हणूनच 'आपल्यामुळे आईला अजून त्रास होणार नाही' याची खबरदारी त्या दोघीही घेत होत्या. येणाऱ्या प्रत्येक situation ला त्या त्यांच्या परीनी handle करत होत्या. त्या दोघीच एकमेकींची support system बनल्या होत्या. परिस्थितीनी त्यांना अचानक त्यांच्या वयापेक्षा खूप खूप mature बनवलं. माझी मोठी मुलगी ऐश्वर्या तिच्याही नकळत स्रुष्टी ची आई झाली. आणि स्रुष्टी नी देखील त्यांचं हे 'आई-बहिणीचं' दुहेरी नातं अगदी सहजपणे स्वीकारलं. कितीतरी वेळा त्यांच्या समोरच्या अवघड situations ना त्यांनी दोघींनीच handle केलं...परस्पर ! आईला त्रास नको व्हायला म्हणून. ऐश्वर्या कुठेही असली तरी तिचं स्रुष्टी वर आणि माझ्यावरही कायम लक्ष असायचं. In fact, ती कधीच आम्हाला दोघींना नजरेआड नाही होऊ द्यायची. मला जर कधी चालताना आधाराची गरज भासली तर पुढच्या क्षणी ती माझ्या शेजारी असायची... माझा हात धरून हळूहळू घेऊन जायची मला. कसं कोण जाणे, पण तिला न सांगताच सगळं कळायचं.. जर कधी त्यांना दोघींना एखाद्याचं वागणं पटलं नाही किंवा जर कधी त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना एखादी गोष्ट करायला लागली तरी त्यांनी कधीच माझ्याकडे तक्रार नाही केली. कारण अशावेळी ऐश्वर्या स्रुष्टी ला समजवायची.. "आपण जर असं सारखं आईकडे तक्रार करत बसलो तर मग इतरांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आणि आपली आई सध्या आजारी आहे ना, मग आपल्यामुळे आपल्या आईला त्रास होईल असं आपण काही नाही करायचं, ओके!" इतक्या लहान वयात इतका समजूतदारपणा!!! अशा वेळी माझा उर अभिमानानी भरून यायचा.

मला हे सगळं दिसत होतं, कळत होतं. आणि म्हणूनच मी त्यांच्याशी बोलताना, वागताना शक्य तेवढं नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी केमो साइकल पूर्ण झाल्यावर माझ्या हातांवर सूज आलेली असायची. आणि त्यामुळे अगदी साधी, सोपी वाटणारी कामं पण माझ्या साठी खूप अवघड झाली होती. उदाहरणच द्यायचं झालं तर रोज दोघी मुलींच्या केसांच्या वेण्या घालणं हे देखील एक दिव्य कर्म होतं माझ्या द्रुष्टीनी! पण तरीही मी मुद्दाम रोज हळूहळू का होईना पण स्वतः च त्यांची सगळी कामं करत होते... exactly the same way as I used to do it earlier. .. at least तसा प्रयत्न तरी करत होते. यामागे एकच विचार होता की 'मुलींना असं वाटावं की आपली आई आजारी नाहीए '

मार्च महिन्यात ऐश्वर्याचा वाढदिवस होता. आणि माझी मनापासून इच्छा होती की दर वर्षाप्रमाणे या वर्षीही तो दिवस साजरा करावा. म्हणून मग आम्ही त्याप्रमाणे सगळी तयारी सुरू केली. Guest list, return gifts, birthday cake,party menu.... सगळं ठरलं. मी तिला विचारलं ," तुला काय गिफ्ट हवंय बेटु?" त्यावर ती म्हणाली," आई, मला दुसरं काही गिफ्ट नकोय पण त्या दिवशी सगळा स्वैपाक तू स्वतः करू शकशील का गं? खूप दिवस झाले तुझ्या हातचं खाऊन..." तिचं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. वाटलं,' किती साध्या सरळ अपेक्षा आहेत हिच्या ! अगदी निरागस...तिच्या मनासारख्या "

मग काय, तिच्या वाढदिवसाचा सगळा स्वैपाक मी स्वतः बनवला. आत्ता विचार केला तर वाटतं ' त्यात काय विशेष?' पण माझ्या तेव्हाच्या परिस्थिती मधे माझ्या साठी ते एका mission सारखंच होतं. पण जेव्हा दोघी मुलींना अगदी आवडीनी खाताना, पोटभर जेवताना पाहिलं ना, तेव्हा मला आलेला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.आणि बऱ्याच दिवसांनी मीही पोटभर जेवले.

ऐश्वर्या प्रमाणेच स्रुष्टी सुद्धा तिच्या परीनी पूर्ण प्रयत्न करत होती. तिच्या वयाच्या हिशोबानी पाहिलं तर तिनी खूपच bravely सगळं handle केलं होतं. पण वरवर शांत वाटणाऱ्या तिच्या मनात किती मोठं वादळ चालू होतं याची कुणालाच कल्पना नव्हती... अगदी मला सुद्धा! पण जेव्हा मला ते समजलं त्या क्षणी मी मुळापासून हादरले.

एका दुपारची गोष्ट- बराच वेळ झाला, स्रुष्टी कुठे दिसली नाही म्हणून मी तिला शोधत होते. खूप हाका मारल्या पण तिचा कुठेच पत्ता नाही. घरभर शोधलं. शेवटी ती सापडली... एका पडद्यामागे, भिंतीकडे तोंड करून उभी होती. मला वाटलं, 'लपून बसलीए' ... पण जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ती पडद्यामागे लपून रडत होती. मला पाहिल्यावर तिनी एकदम मला मिठी मारली आणि रडत रडत विचारलं ,"आई, तू माझ्या आधी नाही ना गं जाणार देवाकडे?" तिचा हा प्रश्न ऐकून मी सुन्न झाले. काय बोलावं काही सुचेना.. काय उत्तर देणार होते मी तिच्या या प्रश्नाचं !!! "हो" म्हटलं तर तिच्या बालमनावर त्याचा काय आणि कसा परिणाम होईल? तसंही त्या मनःस्थितीत तिला हे उत्तर नकोच होतं.

पण "नाही" म्हणायला माझी जीभ धजत नव्हती. कारण त्या "नाही" या उत्तरातून जो अर्थ निघत होता, तो माझ्यातल्या 'आई'ला मान्य नव्हता. मी काहीच न बोलता तिला घट्ट जवळ घेतलं आणि तिला मोकळेपणी रडू दिलं. पण तिच्या समोर मला मात्र माझ्या अश्रूंना बांध घालणं आवश्यक होतं. कारण तिनी जर मला रडताना पाहिलं असतं तर कदाचित तिची भीती अजूनच वाढली असती. थोड्यावेळानी ती शांत झाली आणि खेळायला पळाली. आणि मी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण या सगळ्या प्रसंगामुळे माझ्या मनात मात्र जी खळबळ माजली होती, ती काही केल्या शांत होईना.

तिच्या त्या एका प्रश्नानी मी एकदम भूतकाळात गेले...आमच्या घरात माझ्या दिवंगत आईचा फोटो दोघी मुलींनी नेहमीच बघितला आहे आणि त्याविषयी बऱ्याच वेळा आमचं बोलणंही होतं. In fact स्रुष्टीच्या बालमनात कुठेतरी असा विचार रुजला होता की 'आई आधी देवाकडे जाते'. And since she did not understand the implications of it, she was okay with the thought. In fact, ती ३-४ वर्षांची असताना एकदा मला म्हणाली होती," आई, मला तुझी पर्स खूप आवडते, तू जेव्हा देवाकडे जाशील ना तेव्हा ती पर्स मला देऊन जा हं!" इतकं नाँर्मल होतं तिच्यासाठी हे 'आईचं देवाकडे जाणं.' .. .असं असताना तिच्या मनात हा प्रश्न यावा? याचा अर्थ, आता तिच्या मनात या विचारामुळे भीती निर्माण झाली होती. कदाचित तिला त्याचा खरा अर्थ लक्षात आला होता का? पण या सगळ्याचा तिच्या अजाण मनावर काय परिणाम होईल? विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली.

माझी मुलींबद्दलची काळजी जेव्हा मी नितिन ला सांगितली तेव्हा तो म्हणाला,"तू च नेहमी म्हणतेस ना की प्रत्येक वाईटातून काहीतरी चांगलं घडत असतं! कदाचित या अनुभवानंतर त्या दोघी पण मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनतील.' मलाही त्याचं म्हणणं पटलं आणि मी माझ्या मनाची समजूत काढली.

माझी तिसरी केमो होती २८ डिसेंबर ला.त्यानंतर एक CT Scan आणि CA125 ही ब्लड टेस्ट करणे आवश्यक होते. कारण ह्या टेस्ट्स च्या रिपोर्ट्स वरून पुढे ऑपरेशन ची तारीख ठरणार होती. पण माझी एकंदर प्रगती बघून डॉक्टर्सना खात्री होती की रिपोर्ट्स फेव्हरेबल असतील, म्हणून त्यांनी २० जानेवारी २००६ ही सर्जरीची तारीख ठरवली. पण फायनल निर्णय टेस्ट रिपोर्ट्स बघूनच होणार होता. तेव्हा मग मी विचार केला की एकदा माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझी शारीरिक अवस्था कशी असेल, मला रिकव्हर व्हायला किती दिवस लागतील हे आत्ता सांगणं कठीण आहे ;त्यामुळे काही महत्वाची कामं मला ऑपरेशन च्या आधीच करणं आवश्यक होतं. आणि ती कामं म्हणजे जोधपूरला जाऊन आमचं घर रिकामं करून पुन्हा ऑथॉरिटीज् ना सुपुर्त करणं आणि मुलींच्या शाळेत जाऊन त्यांच्या प्रिन्सिपॉल ला भेटून मुलींच्या ट्रान्स्फर सर्टीफिकेट बद्दल बोलणं.

आणि अजून एक महत्त्वाचं काम होतं. दोघी मुलींना( आणि खरं सांगायचं तर मलाही ) मोगाला नितिन कडे जायचं होतं. नितिन ला सारखी सुट्टी घेणं शक्य नव्हतं आणि मुलींना न्यू ईयर त्यांच्या बाबांबरोबर साजरं करायचं होतं. पण माझं कारण थोडं वेगळं होतं. मला मनातून नितिन ची खूप काळजी वाटत होती. कारण पुण्यामधे मी आणि दोघी मुली कायम एकमेकीं बरोबर होतो.... एकत्र ! पण नितिन मात्र मोगा मधे एकटाच होता. युनिट मधले बाकी ऑफिसर्स आणि त्यांच्या फँमिलीज् होत्या म्हणा तिथे. पण नितिन तिथला सिनियर मोस्ट ऑफीसर असल्यामुळे इतर ज्युनियर ऑफिसर्स बरोबर त्याचं नातं थोडं फॉर्मल च होतं. म्हणतात ना.. It's always lonely at the top.नितिनचं ही तसंच काहीसं झालं होतं. त्यामुळे त्याच्या मनातले विचार, आमच्या बद्दल वाटणारी काळजी, टेन्शन या सगळ्याचा त्याला किती त्रास होत असेल याची मला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणूनच मी शक्यतो त्याच्याशी फोनवर प्रत्यक्ष न बोलता मेसेज पाठवायचे. कारण मला वाटायचं की फोनवर माझा आवाज जर त्यानी ऐकला तर त्याला लगेच माझ्या तब्बेती बद्दल कळेल. माझा खोल गेलेला आवाज, बोलताना मला लागणारा दम .. हे सगळं त्याला कळलं तर तो अजून काळजी करत बसेल आणि या सगळ्या घुसमटीचा त्याच्या तब्बेतीवर परिणाम होईल.

मी मुलींना पण सांगितलं होतं की ' बाबांशी बोलताना त्यांना सगळ्या छान छान गोष्टी सांगायच्या. तुम्ही काय काय करता, कशी मजा करता ते सांगायचं. म्हणजे त्यांना पण बरं वाटेल.' पण एकदा दुपारी अचानकघ त्याचा फोन आला. तो मला म्हणाला," All of a sudden तुमची तिघींची आठवण आली, तुमचा आवाज ऐकावासा वाटला, म्हणून फोन केला. Just wanted to tell you that I love you all!!" He has always been 'a man of few words'. जेव्हा मनातल्या भावना व्यक्त करायची वेळ येते तेव्हा तो सगळं बोलून जाहीर करण्याऐवजी तेच सगळं त्याच्या actions मधून समोरच्या व्यक्ती पर्यंत पोचवतो. So I could well imagine the emotional turmoil that he must be going through to say such a thing. त्या दिवशी आम्ही तिघींनी त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. मुलींची किलबिल ऐकून त्यालाही बरं वाटलं.

पण माझी काळजी मात्र वाढली आणि म्हणून मी प्रत्यक्ष मोगाला जाऊन त्याला भेटायचं ठरवलं.

सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही एक प्लॅन ठरवला-मी माझी तिसरी केमो मोगाला जाउन तिकडच्या हॉस्पिटलमधे घ्यायचं ठरवलं. पण मोगा हे एक छोटं मिलिटरी स्टेशन असल्यामुळे तिथे मिलिटरी हॉस्पिटल नव्हतं. पण मोगाहून साधारण एक तासाच्या अंतरावर असणार्या फिरोजपूरला मिलिटरी हॉस्पिटल होतं. मग आम्ही पुण्याच्या डॉक्टर्सशी आणि फिरोजपूर हॉस्पिटल मधल्या डॉक्टर्सशी सविस्तर बोलून असं ठरवलं की माझी तिसरी केमो फिरोजपूरला घ्यायची.

ठरल्याप्रमाणे आम्ही तिघी १९ डिसेंबर ला पुण्याहून निघालो आणि २१ डिसेंबर ला मोगाला पोचलो. २८ डिसेंबर ला फिरोजपूरच्या हॉस्पिटलमधे माझी तिसरी केमो निर्विघ्नपणे पार पडली.

नितिन जी युनिट कमांड करत होता ती एक 'pure Sikh regiment ' होती. म्हणजे त्या युनिट मधले सगळे जवान 'सिख' धर्माचे होते, त्यामुळे युनिट मधे एक गुरुद्वारा होता. मी मोगाहून निघायच्या आधी त्या गुरुद्वारा मधे 'पाठ' (पूजा) आयोजित केले होते. मी तिथे गेले असताना तिथले बाबाजी (गुरू द्वारा मधले पुजारी) माझी विचारपूस करत होते. बोलता बोलता त्यांच्याही नकळत म्हणून गेले.. " मेमसाब, आपके उपर तो वाहेगुरू की क्रुपा है। वरना इस बीमारी से बचना नामुमकी़न है। मेरी भाभी इसी के कारण खतम हो गयी और अब उसके बच्चे दूसरोंके भरोसे बडे हो रहे हैं। " त्यांचं बोलणं मी अजिबात मनावर घेतलं नाही. खरं सांगायचं तर आत्तापर्यंत मला लोकांच्या अशा विचित्र बोलण्याची सवय झाली होती. मी त्यांना म्हणाले," आप रोज़ मेरे लिए वाहेगुरू से प्रार्थना किजिए। फिर मुझे कुछ नहीं होगा।"

आम्ही चौघांनी मिळून ठरल्याप्रमाणे नवीन वर्षाचं एकत्र स्वागत केलं. आणि मग ४ जानेवारीला मी आणि मुली मोगाहून जोधपूरला गेलो.
जोधपूरला आम्ही दहा दिवस होतो. त्या दहा दिवसांत मी घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर केली. सगळं सामान बॉक्सेस मधे नीट पँक केलं. मुलीच्या शाळेत जाऊन त्यांच्या प्रिन्सिपॉल ला भेटले आणि पुढचा 'कोर्स ऑफ अँक्शन ठरवून आले. योगायोगानी त्याच कालावधीत दोघींच्या यूनिट टेस्ट्स होत्या. त्यामुळे दोघींनीही परीक्षा दिल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मी माझा PET CT Scan करून घेतला. देवाच्या क्रुपेनी माझे स्कँनचे रिपोर्ट्स चांगले आले होते. दोन्ही ओव्हरीज् मधले ट्यूमर्स पूर्णपणे श्रिंक झाले होते. हे ऐकून मला आभाळ ठेंगणं झालं. पण गंमत अशी की मला जेव्हा माझ्या आजाराबद्दल डॉक्टरनी सांगितलं होतं तेव्हाही ती बातमी शेअर करायला माझ्या बरोबर कुणी नव्हतं आणि आजदेखील ही आनंदाची बातमी ऐकताना मी एकटीच होते. पण लगेचच मी नितिन ला फोन करून सांगितलं. त्यानीही ऐकून सुटकेचा श्वास सोडला. कँसर विरुद्ध च्या माझ्या या लढाईत मी माझा पहिला मोठा विजय मिळवला होता.

आता जोधपूरला रामराम ठोकायची वेळ आली होती. पण दोन महत्त्वाची कामं अजूनही राहिली होती... माझ्या शाळेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांचा निरोप घेणं आणि माझ्या आजाराबद्दल अफवा पसरवणाऱ्या माझ्या so called हितचिंतकाला भेटून त्याचा गैरसमज दूर करणं. मला माझ्या मैत्रिणी कडून त्या व्यक्ती चं नाव कळलं होतं. ती माझ्याच शाळेतली एक शिक्षिका होती. आणि आम्ही दोघींनी किती तरी वेळा स्कूल कॉरीडॉर्स मधे उभं राहून शिळोप्याच्या गप्पाही मारल्या होत्या. मग माझ्या बद्दल असा विचार का बरं आला असावा तिच्या मनात? तिला भेटून स्पष्टच विचारायचं ठरवलं मी. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या शाळेत गेले. मला बघून माझ्या सहकर्मचार्यांना खूप आनंद झाला. मलाही सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. मग मी माझ्या वर्गात गेले. मला बघताच सगळ्या मुला-मुलीच्या चेहऱ्यांवर ओळखीचं हसू दिसलं. सगळ्यांनी माझ्या भोवती गराडा घातला. प्रत्येकाला माझ्याशी बोलायचं होतं.कुणी आपल्या मित्राची तक्रार करत होता तर कुणाला होमवर्कसाठी मिळालेला गोल्डन स्टार मला दाखवायचा होता.मागचे दोन-अडीच महिने जणू काही हवेत विरून गेले होते. त्या सगळ्यांच्या निरागस आणि निरपेक्ष प्रेमात मी माझा आजार काही वेळापुरता का होईना पण विसरून गेले. मी सगळ्यांना सांगितलं,"मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी तुम्हाला भेटायला येईन,म्हणून मी आज आले आहे. पण आता आम्ही इथून दुसऱ्या गावाला जाणार आहोत त्यामुळे ही आपली शेवटची भेट."

मी माझ्या विद्यार्थ्यांना 'पुन्हा भेटण्याचं' जे वचन दिलं होतं ते मी पूर्ण करू शकले म्हणून मनोमन देवाचे आभार मानले.

माझ्या त्या 'मैत्रीणीला' (?) खूप शोधलं पण ती काही माझ्या द्रुष्टीस नाही पडली. कदाचित मला confront करायला घाबरत असावी. पण मला एक समाधान होत, तिला खोटं ठरवल्याचं !

१४ जानेवारी ला आम्ही तिघी जोधपूरहून निघालो आणि १५ जानेवारी ला संध्याकाळी पुण्यात पोचलो. त्याच दिवशी मी CA 125 साठी माझं ब्लड सँपल दिलं. दुसऱ्या दिवशी ब्लड टेस्ट चा रिपोर्ट मिळाला-आधीच्या रिपोर्ट मधे CA 125 चा काऊंट ४२९.८ होता तो आता १२.०६ वर आला होता.... म्हणजे नॉर्मल रेंज मधे.... मी अजून एक विजयपताका रोवली होती.

माझा CT Scan आणि ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स घेऊन मी दुसर्याच दिवशी सर्जनला भेटायला गेले. माझे रिपोर्ट्स बघून तेही खुश झाले। त्यांनी विचारलं,"तुमची सर्जरी आपण किती तारखेला ठरवली होती?" मी म्हणाले,"२० जानेवारी". त्यावर दोन मिनिटं विचार करून ते म्हणाले,"आपण २० च्या ऐवजी २४ जानेवारीला करू तुमची सर्जरी. तसं काही खास कारण नाहिए पण मला वाटतंय की २४ तारखेला करावी." मी म्हणाले,"ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही." मनात विचार आला- कदाचित यामागेही देवाचा काहीतरी चांगला हेतू असेल. आपण सकारात्मक विचार करायचा.

२२ जानेवारीला संध्याकाळी मी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. घरातून निघताना मुलींना सांगितलं,"मी जेव्हा हॉस्पिटल मधून परत येईन ना तेव्हा माझ्या शरीरातला ट्यूमर डॉक्टर अंकलनी काढून टाकला असेल. मग परत कध्धीच मला कुठलाही त्रास होणार नाही. पण त्यासाठी मला थोडे दिवस हॉस्पिटलमधे राहावं लागेल." आई आता पूर्ण बरी होणार हे कळल्यावर त्या दोघीही खूप खुश झाल्या आणि मला' 'ऑल द बेस्ट ' म्हणत गळामिठी घातली.

२३ तारखेला सकाळी ब्रेकफास्ट नंतर मला काहीही खाण्याची परवानगी नव्हती. इतकंच काय पण चहा,कॉफी, सरबत वगैरे सुद्धा नाही. दुपारी अचानक एक नर्स आली आणि म्हणाली," ऑन्को-सर्जन नी तुम्हांला भेटायला बोलावलं आहे." मी आणि नितिन दोघंही त्यांच्या केबीन मधे गेलो. डॉक्टर म्हणाले," आज सकाळीच मी एका इंटरनँशनल कॉन्फरन्स मधे इतर डॉक्टर्स बरोबर ऑनलाइन बोलत होतो. कॉन्फरन्स होती केमोथेरपी बद्दल आणि त्यातील लेटेस्ट रीसर्च बद्दल. साधारण दहा वर्षांपूर्वीपर्यंत डॉक्टर्स 'intra peritoneal chemotherapy' पण देत होते पेशंट्सना ; पण त्याचे साईड इफेक्ट्स जास्त होते म्हणून ती प्रोसिजर बंद केली होती. पण लेटेस्ट रीसर्च मधून असं आढळून आलं आहे की नवीन अद्ययावत औषधं आणि उपकरणांमुळे आता या IP ('Intra Peritoneal) केमोथेरपी मुळे पेशंट्सना खूप फायदा होतो आणि मुख्य म्हणजे या केमो मुळे कँसर च्या रिकरन्स चे चान्सेस् ७५% नी कमी होतात. तुमचा कँसर खूप अँडव्हान्स्ड स्टेज चा असल्यामुळे तुम्ही जर नॉर्मल IV केमो बरोबर ही IP केमो पण घेतलीत तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल.

पण त्याच्यासाठी एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करावी लागेल. तुमच्या abdominal cavity मधे (रिब्ज वर) एक छोटासा केमोपोर्ट बसवावा लागेल. या केमोपोर्ट मधून तुमच्या शरीरात औषध सोडलं जाईल आणि ते औषध तुमच्या शरीरातील ऑर्गन्सवर त्यांच्या बाहेरच्या बाजूनी काम करेल.

हा केमोपोर्ट पाच वर्षांपर्यंत तुमच्या शरीरात ठेवला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करून तो आपण काढून टाकू."

मी लगेच त्यांना यासाठी माझी संमती दिली. ते म्हणाले," गुड, आम्ही उद्या सर्जरीच्या वेळीच हा केमोपोर्ट पण फिक्स करू म्हणजे तुमच्या दोन्ही प्रकारच्या केमोज् आपल्याला सुरु करता येतील."

सर्जरीची तारीख २० जानेवारी ऐवजी २४ जानेवारी का झाली याचं उत्तर मला मिळालं होतं. देवानी पुन्हा एकदा त्याच्या 'माझ्या बरोबर असण्याची' जाणीव करवून दिली होती.

थोड्याच वेळात पुन्हा याचा प्रत्यय आला. कसा तेही सांगते... मला मनात कुठेतरी जनरल अँनेस्थेसिया बद्दल थोडी शंका होती. सर्जरी बद्दल पूर्ण खात्री होती मला पण GA चा काही साईड इफेक्ट तर नाही होणार; मी GA मधून सुखरुप बाहेर येईन ना ? अशी मनात कुठेतरी शंका होती... उगीचच!मी मनाशी ठरवतच होते की याबाबतीत आपण डॉक्टर शी बोलून शंकानिरसन करून घ्यावे, तेवढ्यात एक व्रुद्ध स्त्री केबीन मधे आली.सत्तरीच्या जवळपास असेल, कंबरेत वाकलेली, अंगकाठीही अगदीच किरकोळ-हडकुळी म्हणता येईल इतकी बारीक. थोडा वेळ डॉक्टरांशी बोलून ती निघून गेली. ती गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले," मागच्या महिन्यात यांचं ऑपरेशन झालं होतं, आता उरलेल्या केमोज् चालू आहेत." त्याक्षणी मला वाटलं,'जर या आजी GA मधून सुखरूपपणे बाहेर येऊ शकतात तर मग मी का उगीचच शंका घेतीए. माझी अवस्था तर यांच्यापेक्षा खूप चांगली आहे.' आणि अचानक मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या-जणू काही त्यासाठीच देवानी त्या आजींना पाठवलं होतं.

याचा परिणाम असा झाला की आता मी दुसऱ्या दिवसाच्या माझ्या सर्जरीची वाट बघायला लागले. आधी मनात जी एक हुरहुर होती तिची जागा आता आतुरतेनी घेतली होती. डॉक्टरांशी बोलून मी परत माझ्या रुममधे आले. नितिन घरी गेला कारण दोन्ही मुली त्याची वाट बघत होत्या. आता तो एकदम दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होता- माझ्या सर्जरीच्या वेळी.

रूममधे परत आल्यावर एक खूप महत्त्वाचं काम करायला घेतलं. नितिन ला 'पत्र' लिहिलं. माझी दुसऱ्या दिवशीची सर्जरी निर्विघ्नपणे पार पडणार याची मला पूर्ण खात्री होती. पण 'Hope for the best but be prepared for the worst' या विचाराला अनुसरुन मी माझ्या मनातले विचार कागदावर उतरवायला सुरुवात केली.

जर सर्जरी मधून मी सुखरूपपणे बाहेर नाही पडले तर नितिन नी काय आणि कसं करावं याबद्दलचे माझे विचार त्याच्यापर्यंत पोचणं आवश्यक होतं. मी ठरवलं होतं की त्याला कुठल्याही प्रकारे इमोशनली ब्लँकमेल करायचं नाही. माझ्या नंतर त्यानी दुसरं लग्न करावं की नाही, आणि जर केलंच तर कुणाशी करावं - हे सगळं मी त्याच्यावर सोडलं होतं. फक्त तो जे काही ठरवेल त्यात त्यानी स्वतः इतकाच आमच्या मुलींचा पण विचार करावा. त्यानी अशी परिस्थिती निर्माण करावी की ज्यामुळे मुलींना जेव्हाही माझी आठवण येईल ती नेहमी सुखात असताना यावी.कधीही दुःखामुळे त्यांना माझी आठवण किंवा उणीव भासू नये.

खरं म्हणजे हे सगळं नितिन ला सांगायची गरजच नव्हती. मला खात्री होती की तो मुलींची खूप काळजी घेईल, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. पण तरीही मनातलं सगळं कागदावर उतरवलं. गेल्या तेरा वर्षांच्या आमच्या सहप्रवासात अशा कितीतरी गोष्टी त्याला सांगायच्या राहून गेल्या होत्या. आमचं दोघांचं नातं, मला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम, आदर आणि विश्वास... हे आणि असं बरंच काही. मनातले विचार झरझर कागदावर उतरत होते. एकीकडे कागद भरत होते आणि दुसरीकडे मन मोकळं होत होतं. लिहिताना मधेच कागद ओला झाल्याचं जाणवलं. तेव्हा लक्षात आलं की मनात जे विचारांचं वादळ चालू होतं ते डोळ्यां वाटेही बरसतंय. हॉस्पिटल च्या त्या एकाकी खोलीत मी एकटीच बसले होते- विचारांच्या गर्दीत कुठेतरी हरवून गेल्यासारखी...हातात कागद आणि पेन होते पण लिहायला आता शब्दच सुचत नव्हते. त्या क्षणी जाणवलं की अशा कितीतरी भाव-भावना असतात ज्या आपण फक्त अनुभवू शकतो. तिथे शब्द नसतात, वाचा नसते- असते फक्त अनुभूती. विचारांच्या या गदारोळातच मी माझं ते स्वलिखित पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली; आणि अचानक माझ्या डोळ्यांतलं पाणी थांबलं. मनातले विचार बाजूला झाले आणि मी एखाद्या त्रयस्थाप्रमाणे अगदी निर्विकारपणे सगळं पत्र पुन्हा नीट वाचलं. माझं मनोगत अगदी योग्य शब्दांत पूर्णपणे नितिन पर्यंत पोचेल याची खात्री झाली.मग मी बाहेर जाऊन नर्सकडून एक लिफाफा घेऊन आले. त्यामधे पत्र घालून तो लिफाफा बंद केला. त्यावर नितिन चं नाव घातलं आणि माझ्या सामानात ठेवला.

या सगळ्या विचारमंथनातून एक जाणीव झाली- ती म्हणजे नितिन मुळे माझा हा जीवनप्रवास अविस्मरणीय झाला आहे. We compliment each other. आणि आमच्या दोन्ही मुलींनी तर मला सुखाच्या, पूर्णत्वाच्या शिखरावर नेऊन बसवलं आहे. हे तिघंही माझी strength आहेत. मी खरंच खूप नशिबवान आहे. माझ्या या सुखी, समाधानी आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले. अचानक मन एकदम शांत आणि त्रुप्त झालं.

माझ्या पुढच्या सुखी समाधानी आयुष्याची स्वप्नं रंगवताना कधी झोप लागली कळलंच नाही.

पहाटे अगदी हळूवारपणे कुणीतरी उठवावं तशी जाग आली.लहानपणी परीक्षेच्या दिवशी सकाळी आई जशी हळूच येऊन प्रेमानी उठवायची ना... तशीच. आई म्हणायची,"प्रिया, ऊठ बाळा. आज परीक्षा आहे ना!" तिचा प्रेमळ हात डोक्यावरुन फिरला की आपोआप कॉन्फिडन्स यायचा की आजचा पेपर सोप्पा जाणार. आणि जर कधी टेन्शन आलं तर आई म्हणायची,"काळजी करू नको. तू जो अभ्यास केला आहेस ना त्यातलंच विचारतील परीक्षेत." आणि खरंच तसंच व्हायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा- आईला कसं कळतं की परीक्षेत काय विचारणार? शेवटी न राहावून मी तिला एकदा विचारलंच. तेव्हा हसून ती म्हणाली होती,"वेडाबाई, मला प्रश्नपत्रिका माहीत नसते पण तू केलेला अभ्यास, तुझी तयारी माहीत असते. आणि म्हणूनच मला खात्री असते की परीक्षेत कुठलाही प्रश्न आला तरी तुझ्याकडे त्याचं उत्तर तयार असेल."

आईचं तेव्हाचं बोलणं आठवलं. तिला सांगावंसं वाटलं-" आई, आज पण माझी परीक्षा आहे; पण आज मला अजिबात टेन्शन आलं नाहीये. कारण या वेळी मला खात्री आहे की मी या परीक्षेत नक्की पास होणार आणि ते ही first class with distinction मिळवून."

सकाळी सहा वाजता नितिन, माझे मोठे काका,माझे सासू-सासरे( हैदराबाद हून मुद्दाम माझ्या सर्जरी साठी आले होते दोघं)-सगळे जण आले. त्यांच्या मागोमाग नर्सही आली मला ऑपरेशन थिएटर मधे घेऊन जायला. आम्ही सगळे O.T. च्या दाराशी पोचलो. तिथून पुढे मला एकटीलाच जायचं होतं.मी मागे वळून पाहिलं, सगळ्यांच्या चेहऱ्यांवर काळजी स्पष्ट दिसत होती. मी काकांना, माझ्या सासू-सासर्यांना नमस्कार केला. डोळे मिटून माझ्या आई-बाबांना पण मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाले,"काळजी करू नका. सगळं ठीक होईल. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी." नितिन कडे बघून त्यालाही एक छानशी reassuring स्माईल दिली आणि मी ऑपरेशन थिएटर मधे प्रवेश केला.

आतमधे मुख्य O.T. च्या बाहेर एका खोलीत एक स्त्री तिच्या ६ महिन्यांच्या बाळाला घेऊन बसली होती. बाळ सारखं कण्हत होतं आणि ती माऊली त्याला जोजवून शांत करायचा प्रयत्न करत होती. मी तिच्याशी काही बोलणार इतक्यात माझे सर्जन त्या खोलीत आले आणि मला म्हणाले," मँम, जर तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या आधी या बाळाची एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर करून घेऊ का? फक्त अर्ध्या तासाचं काम आहे?" माझी काय हरकत असणार? मी लगेच होकार दिला. कुठल्याही प्रकारे त्या छोट्या जीवाला लवकरात लवकर आराम मिळणं महत्त्वाचं होतं त्या क्षणी.

जेव्हा डॉक्टर्स त्या बाळाची सर्जरी करत होते तेव्हा बाहेर मी त्याच्या आईला धीर द्यायचा प्रयत्न करत होते. ती म्हणाली," बघा ना मँडम, डॉक्टर म्हणाले की कँसर आहे आणि त्याची नीट ट्रीटमेंट केली तर माझं बळ पूर्णपणे ठीक होईल. पण गेल्या दोन महिन्यात तीन ऑपरेशन्स झाली. कधी ठीक होईल हो माझं बाळ?" तिला धीर देत मी तिचा हात हातात घेतला आणि आम्ही दोघी मिळून देवाची प्रार्थना करत बसलो.

थोड्याच वेळात त्या बाळाची सर्जरी संपली आणि डॉक्टरनी मला OT मधे बोलावलं. मी देवाचं नाव घेऊन आत गेले.आतमधे सगळे डॉक्टर्स तयारच होते. माझ्या onco-surgeon नी माझी त्यांच्या टीम मधल्या इतर डॉक्टर्स बरोबर ओळख करून दिली.मी त्यांना सगळ्यांना म्हणाले,"माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलण्याच्या अवस्थेत नसेन. म्हणून मी आत्ताच तुमचे सगळ्यांचे आभार मानते.Thank you so much."

मला ऑपरेशन ची सगळी प्रोसिजर नीट समजावून सांगितली गेली आणि मग मला भूल देण्यात आली.त्यानंतर सलग अडीच-तीन तास माझी शस्त्रक्रिया चालू होती. अर्थात मी बेशुद्ध असल्यामुळे मला नाही कळलं पण नंतर डॉक्टर नी सांगितलं.

ऑपरेशन नंतर जेव्हा मी हळूहळू शुद्धीवर यायला लागले तेव्हा मला माझ्या खोलीत हलवण्यात आलं. "ऑपरेशन यशस्वी झालं" हे शब्द कानावर पडले आणि मी देवाचे आभार मानले. पुढे तो पूर्ण दिवस मी गुंगीतच होते. अधूनमधून जाग येत होती. मधे एकदा बघितलं तर समोर नितिन ची मावशी आणि काका उभे दिसले. दोघं मुंबई हून आले होते मला भेटायला. त्यांच्याशी धड दोन शब्द बोलायची देखील शक्ती नव्हती. त्यांना नमस्कार करावा म्हणून हात उचलायला गेले तेव्हा लक्षात आलं... एका हाताला तर सलाइन लागलं होतं. त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करता करता पुन्हा डोळे बंद झाले. कधी डोळे उघडून आजूबाजूला बघत होते. समोर नितिन बसलेला दिसायचा आणि मग मी निर्धास्तपणे पुन्हा झोपेच्या आधीन व्हायची. अशा अवस्थेतच २५ तारखेची सकाळ उजाडली.सकाळी मला जाग आली तेव्हा औषधांचा प्रभाव संपल्यामुळे मी पूर्णपणे शुद्धीत होते. पण पोटावर जिथे टाके घातले होते तिथे throbbing pain जाणवत होतं. सलाइन ड्रिप ही चालूच होतं. साधारण आठ वाजता सगळे डॉक्टर्स त्यांच्या सकाळच्या रुटीन राऊंड करता आले. माझे सर्जन, मेडिकल स्पेशालिस्ट, ऑन्कॉलॉजी डिपार्टमेटचे मुख्य(H.O.D.), ट्रेनी डॉक्टर्स असा एक भला मोठा ताफा माझ्या खोलीत आला. मुख्य डॉक्टर्स नी माझी चौकशी केली. अचानक माझ्या लक्षात आलं की 'काल सर्जरी च्या वेळी केमोपोर्ट पण बसवला आहे.' आणि त्याच्या बद्दल अधिक उत्सुकता आहे सगळ्यांना. माझ्या सर्जननी इतर डॉक्टर्स ना माझ्या रिब्ज वर जो पोर्ट फिक्स केला होता त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली. त्यांच्या ज्युनिअर डॉक्टर्स ना पूर्ण प्रोसिजर नीट समजावून सांगितली आणि मग त्यांनी माझ्या दिशेनी मोर्चा वळवला. मला म्हणाले,"मँडम, चला आपण दोघं जरा बाहेर फिरून येऊ." त्या अवस्थेत ही मला एकदम हसू आलं. पण पुढच्याच क्षणी वेदनेमुळे जीव कळवळला. कारण माझ्या त्या हसण्यामुळे पोटातले असंख्य स्नायु ओढले गेले होते. दुःख थोडं कमी झाल्यावर मी त्यांना विचारलं,"तुम्हाला वाटतंय का की मी चालू शकेन?" यावर ते म्हणाले,"प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी आहे ना तुमच्याबरोबर." मी विचार केला की ज्या अर्थी हे इतकं इन्सिस्ट करतायत, त्या अर्थी ते आवश्यक आहे. म्हणून मग मी हळूहळू कॉटवरून खाली उतरले. नुस्ता श्वास घेताना सुद्धा पोटावरचे टाके दुखत होते. तेवढ्या वेळासाठी नर्सनी सलाइन बंद करून माझा हात मोकळा करून दिला. पण अजूनही कँथेटर, अँबडॉमिनल ड्रेन ची ट्युब असे काही दागिने होतेच अंगावर. तो सगळा लवाजमा सांभाळत डॉक्टर चा आधार घेत मी हळूहळू एक एक पाऊल टाकत खोलीचं दार गाठलं. त्यावेळी त्यांच्या चेहर्यावरचं समाधान आणि आनंद बघून खूप बरं वाटलं. त्यांच्या पुढच्या प्रश्णानी तर मला एकदम 'सुपरवुमन' असल्याची फीलिंग आली. त्यांनी मिस्किलपणे मला विचारलं," Mam, were you operated upon just yesterday? तुमची ही प्रगती बघून तसं वाटत नाहीए म्हणून विचारलं. पण मँम, आता रोज असं थोडं थोडं चालायचं म्हणजे रिकव्हरी लवकर होईल." त्यांना तसं प्रॉमिस करून पुन्हा हळूहळू चालत मी कॉटवर येऊन बसले.

सगळे डॉक्टर्स गेल्यानंतर मी आधी कपाळावरचा घाम टिपला आणि अचानक माझ्या लक्षात आलं की माझं ऑपरेशन होऊन अजून चोवीस तासही नव्हते झाले आणि मी माझा मॉर्निंग वॉक पण करून आले. स्वतः च स्वतः ची पाठ थोपटून शाबासकी दिली. त्यानंतर एक महत्त्वाचं काम केलं.. नितिन साठी लिहून ठेवलेलं पत्र फाडून टाकलं. आता त्याची गरज नव्हती.

त्यानंतरचे पाच-सहा दिवस मला हॉस्पिटलमधेच निरीक्षणाखाली ठेवलं होतं. मिलिटरी हॉस्पिटलमधे पेशंट बरोबर अटेंडंट म्हणून राहायची कुणालाच परवानगी नसते (अर्थातच, लहान बाळं आणि मुलं या नियमाला अपवाद आहेत). पेशंट ला भेटायचं असल्यास visiting hours मधेच भेटता येतं. त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ मी एकटीच असायची. पण मी मुळातच 'day dreamer' असल्यामुळे मला कधीच एकटेपणा जाणवत नाही. माझे विचार नेहमी मला कंपनी देतात, त्यामुळे मी फारशी कधी बोअर होत नाही. हॉस्पिटलमधे असताना सुद्धा माझे असेच वेगवेगळ्या विषयांवर विचार चालू असायचे. कधी माझ्या आजूबाजूला चाललेल्या घडामोडीं विषयी, तर कधी माझ्या पुढील आयुष्याविषयी! कधी मी माझ्या छोट्याशा ट्रान्झिस्टरवर विविधभारती चे कार्यक्रम ऐकत बसायचे, तर कधी पुस्तक वाचन! एका शांत दुपारी मी बेडवर पडल्या पडल्या माझ्या रूम चं निरीक्षण करत होते तेव्हा एकदम मनात विचार आला की 'मला जर या खोलीला re-design करायचा चान्स मिळाला तर मी काय आणि कसं कसं करीन?' Actually, हा माझा छंदच आहे म्हणा ना! मला एकाच जागेसाठी वेगवेगळ्या प्रकारे कसं इंटिरियर डिजाईन करता येईल हे प्लॅन करायला खूप आवडतं. I think by doing so,my creative instinct is satisfied. मग काय, मी लगेच माझी डायरी आणि पेन काढलं आणि पटापट वेगवेगळे प्लॅन्स आणि एलिेव्हेशन्स काढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात माझ्याकडे त्या रूम साठी वेगवेगळे डिजाईन प्लॅन्स तयार होते.. मास्टर बेड/ चिल्ड्रन बेड/ गेस्ट रूम/ स्टडी रूम...... इतकं मस्त वाटत होतं मला तेव्हा.. तेवढ्या वेळापुरता मी माझा आजार, हॉस्पिटल सगळं काही विसरून गेले होते. एकदा अशीच संध्याकाळी रेडिओ वर जयमाला कार्यक्रम ऐकत होते तेव्हा अचानक वॉर्ड मधल्या स्टाफची धावपळ सुरू झाली. इमर्जन्सी केस होती बहुतेक. रूम च्या बाहेर जाऊन माहित करायचा प्रयत्न केला पण सगळेच लगबगीत दिसले, त्यामुळे मग मी परत रूममधे गेले. रात्री अचानक एका स्त्री च्या ओरडण्याचा आवाज आला. ओरडणं म्हणण्यापेक्षा 'विव्हळण्याचा' म्हणणं जास्त योग्य ठरेल. ती संध्याकाळी अँडमिट झालेली मुलगी वेदनांमुळे तळमळत होती बिचारी! सकाळी नर्स ला विचारलं तेव्हा तिनी सांगितलं... "रोड अँक्सिडेंट ची केस आहे. नुकतंच सहा महिन्यांपूर्वी लग्न झालंय तिचं. Brain hemorrhage झालंय. केेस सिरियस आहे." त्या मुलीची -सीमा ची-त्यानंतर चार पाच ऑपरेशन्स झाली. तिची ट्रीटमेंट बरीच lengthy होती. मी जेव्हा जेव्हा माझ्या केमोज् साठी हॉस्पिटलमधे जायची तेव्हा प्रत्येक वेळी मी सीमाला भेटत होते, तिच्या तब्बेतीमधे होणारी सुधारणा बघून मला खूप बरं वाटायचं.

तिचा नवरा रोज संध्याकाळी visiting hours मधे यायचा. तिला आधार देत बाहेर बागेत घेऊन जायचा आणि तिथे बसून दोघं खूप गप्पा मारायचे. त्यांना तसं एकत्र बघून मला खूप समाधान वाटायचं. तिची एक मैत्रीण ही यायची रोज. ती मैत्रीण रोज हिला छान तयार करायची.. ब्रेन सर्जरी मुळे सीमांचे सगळे केस shave off करायला लागले होते, पण तरी तिची ती मैत्रीण सीमाची 'माँग' सिंदूर नी भरायची. तिच्या कपड्यांना मँचिंग बांगड्या, नेलपेंट, टिकली, लिपस्टीक... असा सगळा श्रुंगार करून द्यायची. आणि हे सगळं तिचा नवरा यायच्या आधी व्हायचं. मला सीमाच्या मैत्रिणीचं खूप कौतुक वाटायचं. तिच्या या दिसायला अगदी साध्या आणि सहज क्रुतीमागे मला मात्र खूप मोठा अर्थ दिसत होता. या रुटीन मुळे आता सीमा रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळ ची वाट बघायची. कारण संध्याकाळी ती तिच्या नवऱ्यासाठी तयार व्हायची आणि रोज तो तिची तारीफ करायचा. माझ्या मते त्यामुळे तिचा आत्मविश्वास खूप वाढला आणि त्यमुळे तिची रिकव्हरी पण फास्ट होत होती. Now every day, she had something to look forward to. And this gave her the motivation to get alright again. हा अनुभव मला हे सगळं शिकवून गेला.

ऑपरेशन नंतर हळूहळू माझी शारीरिक शक्ती परत येत होती. मीही ठरवलं होतं की लवकरात लवकर पुन्हा पहिल्यासारखी तब्येत व्हायला हवी आणि त्यासाठी डॉक्टर्स जे जे सांगत होते ते सगळं मी करत होते. रोज कमीत कमी दहा मिनिटे स्ट्रेचिंग एक्सरसाईज, दहा ते पंधरा मिनिटांचा वॉक, प्राणायाम. या सगळ्याबरोबर खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या रिस्ट्रीक्शन्स पण अगदी काटेकोरपणे पाळत होते. मला कुठलाही पदार्थ कच्चा खाण्याची परवानगी नव्हती. फक्त शिजलेलं अन्न आणि उकळलेलं पाणी. अगदी फळं सुद्धा कच्ची नाही- त्यांनाही शिजवून मगच खायचं.एवढंच काय पण भाजी, आमटी मधे कोथिंबीर ही चालणार नव्हती कारण ती पूर्ण शिजलेली नसते. कोणत्याही मार्गे शरीरात जीवाणू/विषाणु शिरू नयेत आणि कुठलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी घेणं अत्यावश्यक होतं. कारण केमोथेरपी मुळे माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमी झाली होती आणि अशा परिस्थितीत जर एखादं इन्फेक्शन झालं तर मग त्याला कंट्रोल करणं अवघड होतं.

पण त्यामुळे माझी अवस्था अगदी 'आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास' अशी झाली होती. औषधांच्या साईड इफेक्ट्स मुळे माझी अन्नावरची वासनाच उडाली होती. केवळ 'उदरभरण' या एकाच हेतूनी मी अन्न पोटात ढकलत होते. खाण्याबरोबरच चहा,कॉफी किंवा सरबत वगैरे पण नको वाटायचं. पाणी सुद्धा अगदी घोट घोट करून प्यावं लागायचं. कारण एका वेळी एकदम जास्त पाणी प्यायले तर पोटातलं सगळं उलटून पडायची भीती!

पण अशा परिस्थितीतही मला एक खात्री होती आणि ती म्हणजे- 'This is just a passing phase.' लवकरच मी या सगळ्यातून बाहेर पडेन आणि माझी तब्येत पुन्हा पहिल्यासारखी होईल.

माझ्या सर्जरी नंतरची माझी चौथी केमो १३ फेब्रुवारी ला होणार होती. पण यावेळी आणि नंतर ही प्रत्येक IV केमो बरोबरच IP(Inttra Peritoneal) केमो सुद्धा होणार होती. याचाच अर्थ, ऑपरेशन मुळे आलेला वीकनेस भरून काढण्यासाठी माझ्याकडे १३ फेब्रुवारी पर्यंतच वेळ होता. मी स्वतः साठी एक लक्ष्य समोर ठेवलं आणि ते म्हणजे '१३ फेब्रुवारी ला जेव्हा मी केमोसाठी हॉस्पिटलमधे जाईन तेव्हा कुणाचाही आधार न घेता आणि मधे कुठेही न थांबता घरातून गाडीपर्यंत एकटी चालत जाईन.' आत्ता वाचताना(आणि लिहिताना सुद्धा) हे लक्ष्य अगदीच हास्यास्पद वाटतंय पण त्यावेळची माझी शारीरिक स्थिती लक्षात घेता ते माझ्यासाठी एक 'दिव्य'च होतं. माझ्या पोटावर '६०' टाके घातले होते. आणि अगदी साध्या साध्या हालचालीतही त्यातल्या प्रत्येक टाक्याची जाणीव होत होती. पोटभर खाणं जसं मी विसरले होते ना तसंच पोटभर श्वास घेणं, हसणं हेही अवघड झालं होतं. पण मनात एक विश्वास होता-' हेही दिवस जातील.'

शेवटी १३ फेब्रुवारी चा दिवस उजाडला. मी ठरवल्याप्रमाणे हळूहळू का होईना पण एकटी, न थांबता घरातून चालत जाऊन गाडीत बसले. त्या वेळी माझ्यासाठी ती एक खूप मोठी अचीव्हमेंट होती. माझ्या मनाच्या शक्तीची मला पुन्हा एकदा प्रचिती आली होती.
ही 'Intra Peritoneal केमो मी पहिल्यांदाच अनुभवणार होते. त्यामुळे त्याबद्दल बरीच उत्सुकता होती आणि मुख्य म्हणजे माझ्या कँसर विरुद्ध च्या लढ्यात हीच केमो माझं महत्त्वाचं हत्यार ठरणार होती. त्यामुळे एक प्रकारची अधीरता ही होती. माझ्या मेडिकल स्पेशालिस्ट नी मला सगळी प्रोसिजर आधीच समजावून सांगितली होती. देवदयेनी माझे सगळे डॉक्टर्स(मेडिकल स्पेशालिस्ट, ऑन्को सर्जन), नर्सिंग स्टाफ हे सगळेच खूपच कोऑपरेटीव्ह होते. माझ्या संपूर्ण ट्रीटमेंट च्या काळात मी त्यांना सतत वेगवेगळे प्रश्न, शंका विचारून भंडावून सोडलं होतं. In fact, मी त्यांना सुरुवातीलाच म्हणाले होते की," मला जेव्हा जेव्हा काही शंका किंवा प्रश्न असतील तेव्हा मी लगेचच तुम्हाला विचारून त्यांचं निरसन करून घेईन. You may find my queries stupid at times but for me.. they are very very important." आणि त्यांनीही नेहमी अगदी पेशंटली माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. या सगळ्यामुळे एक मोट्ठा फायदा झाला- तो म्हणजे माझ्या मनात कधीही कुठल्याही प्रकारची uncertainty नव्हती. आणि म्हणूनच मी सगळी ट्रीटमेंट खूप सकारात्मकरीत्या अँक्सेप्ट करू शकले.

डॉक्टर जेव्हा नर्सला माझ्या ट्रीटमेंट बद्दल, औषधं आणि इंजेक्शन्स वगैरे बद्दल सूचना द्यायचे तेव्हा मीही सगळं लक्ष देऊन ऐकत असे. आणि नर्स जेव्हा मला औषधं द्यायची किंवा IV ड्रिप चालू करायची तेव्हा मी त्यांची नावं एक्सपायरी डेट वगैरे नीट क्रॉसचेक करून घेत असे. यामुळे मला खात्री असायची की माझी ट्रीटमेंट बरोबर चालू आहे. आणि थँकफुली, हॉस्पिटल च्या नर्सिंग स्टाफनी पण माझा हा' भोचकपणा' नेहमी पॉझिटिव्हली घेतला. In fact, बऱ्याच वेळा ड्यूटी संपवून जाणारी नर्स नवीन आलेल्या नर्सला माझी केस हिस्ट्री समजावून सांगून गमतीनी म्हणायची,"अजून काही शंका असल्या तर मँम ना विचार.. त्यांना सगळं माहिती आहे."

शेवटी एकदाची माझी IP केमो सुरू झाली. ही केमो साइकल दोन पार्ट्स मधे होणार होती. पहिल्या पार्टमधे IV सलाइन वाटे एक औषध माझ्या रक्तवाहिन्यांमधे सोडलं जात होतं. पण यावेळी ही IV ड्रिप सलग २४ तास चालणार होती. म्हणजे २४ तासांकरता मला पूर्ण वेळ झोपून राहावं लागणार होतं आणि एकीकडे अगदी हळूहळू औषध माझ्या रक्तात मिसळलं जाणार होतं.ह्या २४ तासांच्या ड्रिप नंतर लगेच Intra peritoneal ड्रिप सुरू होणार होती. त्यासाठी माझ्या abdominal cavity मधे उजव्या बाजूला रिब्ज वर जो केमोपोर्ट बसवला होता, त्याच्यामार्फत औषध माझ्या abdominal cavity मधे सोडण्यात येणार होतं- केमोपोर्टला खालच्या बाजूला एक रबरची नळी होती आणि तिच्या मार्फत हे औषध माझ्या पोटातल्या सगळ्या ऑर्गन्स वर त्यांच्या बाहेरच्या सरफेस वर मारा करणार होतं.थोडक्यात म्हणजे 'दुहेरी प्रघात'... IV केमोमुळे रक्तावाटे औषध प्रत्येक ऑर्गन च्या आतल्या पेशींपर्यंत पोचेल आणि IP केमोमुळे त्या ऑर्गन्सच्या बाहेरून औषधांचा परिणाम होईल. ही IP केमो साधारण ३-४ तास चालणार होती. त्यानंतर परत साधारण दोन तासांकरता IV ड्रिप नी या संपूर्ण IP केमो नावाच्या सोहळ्याची सांगता होणार होती. १३ आणि १४ फेब्रुवारी ला माझी ही पहिली IP केमो साधारण ३० तासांत संपली. केमो तर यशस्वीरीत्या पार पडली पण शरीराच्या पोकळीत जे औषध होतं त्याच्या मुळे कायम पोटात 'तडस' लागल्यासारखा डिस्कम्फर्ट जाणवत होता. त्या औषधांचं diaphragm वर प्रेशर आल्यामुळे अधूनमधून धाप लागत होती, breathlessness जाणवत होता.

आणि मुख्य म्हणजे आधीच्या तिन्ही IV केमोज् च्या वेळी मला कधीही 'उलट्या होण्याचा' त्रास असा नव्हता, पण आता तोही त्रास सुरू झाला होता. कधी एखाद्या 'वासामुळे' तर कधी एखाद्या 'चवीमुळे' किंवा कधी काहीही कारण नसताना- पण आता हा 'उलट्या' होण्याचा सिलसिला सुरू झाला होता. आणि त्यामुळे मला अजूनच अशक्तपणा जाणवत होता.

IP केमो नंतर आठ दिवसांनी मी पुन्हा माझ्या रेग्युलर IV केमोकरता हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. त्या वेळी माझी दुसरी मोठी बहिण माझ्या बरोबर आली होती. ती कराड मधे स्थायिक आहे. तिच्या सासरी त्यांची joint family असल्यामुळे घरातल्या इतरही अनेक जबाबदाऱ्या, सांभाळत अनेक आघाड्यांवर तिची रोजची लढाई चालू असते. पण तरीही माझ्या आजारपणाच्या त्या काळात ती जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा पुण्याला यायची.

त्या दिवशी जेव्हा आम्ही वॉर्ड मधे गेलो तेव्हा माझ्या नेहमीच्या खोलीत कुणीतरी आधीच अँडमिट झाले होते म्हणून नर्सनी मला दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं. त्या खोलीत शेजारच्या कॉटवर एक स्त्री झोपली होती.सुरुवातीच्या काही मिनिटात 'हाय, हँलो' वगैरे होऊन ओळख झाली. तिच्या बोलण्यातून असं कळलं की साधारण दीड वर्षापूर्वी तिलाही ओव्हेरियन कँसर झाला होता आणि तिची ट्रीटमेंट ही माझ्यासारखीच होती( except for Intra peritoneal chemos). त्यावेळी ती पूर्णपणे बरी होऊन घरी गेली होती. पण आता दीड वर्षानंतर तिचा कँसर recur झाला होता आणि यावेळी त्याचं स्वरूप अजूनच रौद्र आणि भयानक होतं.

हे सगळं ऐकल्यावर माझी बहिण भावनिकरित्या खूप डिस्टर्ब झाली. मला म्हणाली,"त्या नर्सला इतकंही कसं नाही लक्षात आलं! तुला ह्या बाईंबरोबर ठेवलंय. तिचा कँसर परत आलाय हे बघून बाकीच्या कँसर पेशंट्स वर त्याचा काय परिणाम होईल हे त्या नर्सला कळायला पाहिजे." माझ्यावरचं तिचं प्रेम आणि त्यामुळे तिच्या मनाची होणारी ती घालमेल अगदी स्वाभाविक होती. मी तिला म्हणाले," हे बघ, तू अजिबात टेंशन घेऊ नकोस. मला त्यांच्या या बोलण्यामुळे अजिबात त्रास नाही झाला."आणि ते खरंच होतं. कारण आता माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेकडे बघण्याचा माझा द्रुष्टिकोणच बदलला होता. माझा असा पूर्ण विश्वास होता की - या प्रत्येक घटनेतून देव मला काहीतरी सांगतोय, शिकवतोय. त्यामुळे प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी काही ना काही सकारात्मक घेऊन येत होता... rather मी त्यात पॉझिटीव्हीटी शोधत होते.

या प्रसंगाकडेही मी माझा 'सकारात्मक' चश्मा लावून पाहिलं तेव्हा असं दिसलं की देव मला आत्ताच पुढच्या संभावित संकटाची जाणीव करून देतो आहे. कारण जेव्हा मी त्या शेजारच्या बाईंशी बोलत होते तेव्हा त्या म्हणाल्या होत्या-"माझी आधीची ट्रीटमेंट इथेच झालीए. हे डॉक्टर्स आणि इथला स्टाफ खूपच प्रोफेशनल आहेत. पण चूक माझ्याकडूनच झाली. मी ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर निर्धास्त झाले, गाफिल राहिले आणि माझे नंतरचे फॉलो-अप्स आणि स्क्रीनिंग टेस्ट्स नाही केल्या. त्यामुळे कँसरनी माझ्या शरीरात परत कधी प्रवेश केला ते मला कळलंच नाही. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता."

हाच महत्वाचा मुद्दा माझ्या पर्यंत पोचावा या हेतूनी कदाचित देवानी त्या बाईंना थोड्या वेळापुरतं का होईना पण माझ्या आयुष्यात आणलं होतं. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या या शिकवणीची मी लगेच उजळणी करून तिला मनात पक्कं करून टाकलं; आणि ते म्हणजे -'सगळी ट्रीटमेंट संपल्यानंतरही गाफिल राहायचं नाही. या रोगाबरोबरचा माझा हा लढा आता आयुष्यभरासाठी आहे आणि म्हणूनच डॉक्टर्स च्या सगळ्या सूचना आणि सल्ला ऐकायचा आणि त्याप्रमाणेच वागायचं.'

आणि माझ्या या निश्चयाला अनुसरुन मी शक्यतो सगळ्या इंस्ट्रक्शन्स पाळल्या. मला गर्दीच्या ठिकाणी जायला डॉक्टर नी मनाई केली होती; कारण अशा ठिकाणी आजूबाजूच्या लोकांमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. रोजचा व्यायाम आणि प्राणायामही करतच होते. एक दिवस माझी चुलत बहिण म्हणाली,"प्रिया, मला वाटतंय की तू Reiki पण शिकून घे. मला खात्री आहे तुला त्याचा खूप फायदा होईल." मग ती मला तिच्या ओळखीच्या Reiki master कडे घेऊन गेली. त्यांच्याकडून मी Reiki कशी घ्यायची ते शिकले. आणि खरंच मला त्याचा फायदा झाला तो असा.... माझ्या IP केमो मधे जेव्हा २४ तासांसाठी सलाइन ड्रिप चालायचं तेव्हा साधारण दर ८ तासांनी सलाइन ची रक्तवाहिनी चेंज करायला लागायची कारण इतका वेळ नीडल आत राहिल्यामुळे त्या भागावर सूज येऊन तिथे खूप दुखायचं. म्हणजे एका केमोमधे ३ वेळा नीडल व्हेनमधे घुसवली जायची आणि सुरूवातीला नर्सनी म्हटल्याप्रमाणे माझ्या शरीरातल्या व्हेन्स आता खरंच खूप हार्ड झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांत सुई घुसवताना जीवघेण्या वेदना व्हायच्या. पण मी रेकी घ्यायला सुरुवात केल्यानंतर च्या केमोज् मधे माझ्या हातावर सूजही नाही आली आणि त्यामुळे व्हेन चेंज करायचीही गरज नाही भासली.

रोजचा व्यायाम, आहाराविषयीची काळजी, प्राणायाम, रेकी -या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय पण वेळोवेळी होणार्या माझ्या lab टेस्ट्स चे रिपोर्ट्स नॉर्मल येत होते. त्यामुळे मधे कुठलाही अडथळा न येता माझ्या केमो सायकल्स ठरल्याप्रमाणे त्या त्या दिवशी पार पडत होत्या.आणि कँसर सेल्स ना शरीरातून मुळापासून नष्ट करण्यासाठी दोन केमो सायकल्स मधलं अंतर खूप महत्त्वाचं असतं. एकही दिवस जरी पुढे मागे झाला तरी सगळं गणित चुकतं.

अशाच एका केमो सायकल करता जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा एका स्त्रीची भेट झाली. ती स्वतः डॉक्टर होती आणि आर्मीमधे 'मेजर' च्या हुद्दयावर काम करत होती. तिच्याशी बोलताना असं कळलं की तिला नुकताच ब्रेस्ट कँसर डिटेक्ट झाला होता आणि तिच्या पहिल्या केमोकरता ती अँडमिट झाली होती. थँकफुली कँसर अजून इनिशियल स्टेज मधे होता आणि त्यामुळे ट्रीटमेंट यशस्वी होण्याचे चान्सेस् खूप जास्त होते. पण तिच्याशी बोलताना मला असं जाणवलं की ती खूप निराशावादी आहे. कारण तिचं पहिलंच वाक्य होतं," मी तर अजून फक्त ४४ वर्षांची च आहे. माझ्या मुली पण अजून सेटल नाही झाल्या त्यांच्या आयुष्यात... तरीही माझ्या च बाबतीत देवानी असं का केलं?" मी तिला म्हणाले,"तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात. मी तुम्हाला सांगायची गरज नाहीए. तुम्हाला माहिती च आहे - कँसर हा असा रोग आहे की जो कूणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. अहो, तान्ही बाळं पण नाही सुटत याच्या तावडीतून."

माझ्या डोळयांसमोर ऑपरेशन थिएटर मधलं ते तान्हुलं आलं!

पण माझं हे बोलणं ऐकून तिनी मला उलट प्रश्न केला," तुम्ही तर माझ्यापेक्षा लहान आहात आणि तुमचा आजारही जास्त सीरियस आहे. तरीही तुम्ही एवढ्या शांत कशा राहू शकता? तुम्हाला राग नाही येत?" तिचं हे बोलणं ऐकून तर मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. म्हणजे मी तिला परिस्थिती कडे पॉझिटिव्हली बघायला सुचवत होते तर ही बया स्वतः बरोबर मलाही निराशेच्या गर्तेत घेऊन चालली होती. पण तरीही मी माझा प्रयत्न चालू ठेवला. इतरांच्या तुलनेत ती किती नशीबवान आहे आणि जर तिनी मनात ठरवलं तर ती या रोगावर नक्की मात करेल,.वगैरे वगैरे....पण आमच्या या 'हरिदासाची ' कथा काही मूळ पद सोडेना ! मला म्हणाली," माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यानी मला अजून निदान दहा वर्षं तरी आयुष्य द्यावं.माझ्या मुलींना त्यांच्या आयुष्यात सेटल झालेलं बघायचं आहे मला. त्यामुळे अजून दहा वर्षं जरी मिळाली तरी मी देवाची आभारी राहीन." यावर मी तिला फक्त एवढंच म्हणाले की "तुम्ही स्वतःच आत्तापासून तुमचं पुढचं आयुष्य आणि त्याचा कालावधी ठरवताय. देवाच्या मनात जरी तुम्हाला दीर्घायुष्य द्यायचं असेल तरी तुम्ही स्वतःसाठी त्यातली फक्त दहा वर्षं निवडली आहेत. अशा परिस्थितीत देवही काही नाही करू शकणार." माझा 'सकारात्मक चश्मा' तिला घालायचा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला.

एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात मी माझी केमो सायकल घेऊन घरी आले होते पण यावेळी मला vomiting चा जरा जास्तच त्रास होत होता. ५ एप्रिल ला दुपार नंतर तर सारख्या उलट्या होत होत्या. अगदी एक घोट पाणी देखील टिकत नव्हतं पोटात. संध्याकाळ नंतर उलट्या होण्याची frequency पण वाढली आणि fluids ची quantity पण... शेवटी माझी बहिण म्हणाली, "आत्ताच्या आत्ता हिला हॉस्पिटलमधे घेऊन जायला पाहिजे. मला तरी वाटतंय की हिला dehydration झालंय." Luckily तेव्हा नितिन दहा दिवसांची सुट्टी घेऊन पुण्याला आला होता. आम्ही लगेचच माझ्या जिजाजी बरोबर त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमधे जायला निघालो. तेव्हा रात्रीचे ९-९.३० वाजले होते. दोघी मुली ऑलरेडी झोपल्या होत्या. खरं तर त्यांना असं न सांगता जाणं मला पटत नव्हतं. कारण सकाळी उठल्यावर त्यांना जर कळलं असतं की 'आईला रात्री अचानक हॉस्पिटलमधे घेऊन गेले' तर त्यांना कदाचित टेन्शन आलं असतं. पण त्या वेळच्या माझ्या physical condition मधे प्रत्येक क्षण महत्वाचा होता. म्हणून मग मी माझ्या बहिणीच्या भरवशावर मुलींना सोडून निघाले। हॉस्पिटलमधे पोचल्यावर नितिन च्या सांगण्यावरुन जिजाजींनी गाडी सरळ 'इमर्जन्सी वॉर्ड' च्या समोर नेऊन उभी केली.

रात्रीची वेळ होती त्यामुळे MI Room(Medical Inspection Room) मधे फक्त ड्यूटी वर असलेले मेडिकल ऑफीसर आणि नर्सिंग स्टाफ यांच्या शिवाय अजून कुणीही नव्हते. मी कार मधून उतरून आत गेले. नितिन नी डॉक्टर ना माझ्या कंडिशन बद्दल थोडक्यात सांगितलं. त्यांनी एका नर्सिंग असिस्टंट ला अँडमिशन बद्दल चं सगळं पेपरवर्क पूर्ण करायला सांगितलं आणि माझ्या दिशेनी आपला मोर्चा वळवला. एकीकडे माझ्या रिपोर्ट्स वरून नजर फिरवत ते माझ्याशी बोलत होते. त्यांना हवी असलेली सगळी माहिती मिळाल्यावर त्यांनी नर्स ला सांगितलं," इमीजिएटली सलाइन ड्रिप सुरू करा", या सगळ्या घडामोडी अगदी पाच एक मिनिटात घडल्या.

एकीकडे डॉक्टर माझी पल्स बघायचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे ती नर्स सलाइन लावण्यासाठी माझ्या हातातली व्हेन शोधत होती.. पण dehydration मुळे माझ्या सगळ्या रक्तवाहिन्या shrink होऊन इतक्या खोलवर गेल्या होत्या की त्यामुळे त्या दोघांनाही फील च नव्हत्या होत. तीन चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी सुई घुसवून ट्राय केल्यानंतर शेवटी एकदाची त्या नर्स ला एक व्हेन मिळाली पण त्यासाठी तिला ती नीडल पूर्णपणे माझ्या हातात घुसवावी लागली.

ते डॉक्टर मला म्हणाले, " मँम, तुम्ही अजून शुद्धीवर कशा काय याचंच आश्चर्य वाटतंय मला! अशा कंडिशन मधे मोस्टली पेशंट ला कसलीच शुद्ध नसते आणि तुम्ही तर स्वतः चालत आलात इथे" आणि त्यावर आम्ही दोघंही एकदमच बोलून गेलो,"देवाचीच क्रुपा !!"

आणि देवाच्या या क्रुपेचा प्रत्यय मला थोड्याच वेळात आला. सलाइन ची एक बाटली माझ्या शरीरात गेल्यानंतरही माझ्या कंडिशन मधे काही सुधारणा नव्हती. ते बघून मग डॉक्टर नितिन ला म्हणाले,"यांना वॉर्ड मधे शिफ्ट करावं लागेल.. आत्ता लगेच. तुम्ही यांना घेऊन जा. मी वॉर्ड मधल्या ड्यूटी नर्स ला फोन करून सगळी तयारी करायला सांगतो आणि यांच्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ला पण फोन करून बोलावून घेतो. तुम्ही ताबडतोब यांना वॉर्ड मधे घेऊन जा." त्यांच्या बोलण्यातली अर्जन्सी बघून आम्हांला अंदाज आलाच होता की आता परिस्थिती हळूहळू गंभीर होते आहे. नितिन च्या आणि जिजाजींच्या चेहऱ्यांवर काळजी जाणवत होती. मलाही परिस्थिती चं गांभिर्य लक्षात आलं होतं, पण का कोण जाणे... मला अजिबात टेन्शन नव्हतं आलं. मी एखाद्या त्रयस्थासारखी सगळं बघत होते... जणू काही कुणीतरी मला hypnotize केलं होतं... आम्ही वॉर्ड मधे पोचलो तेव्हा तिथली नर्स सगळ्या तयारीनिशी आमची वाटच बघत होती. तिनी मला अजून एक सलाइन ची ड्रिप सुरु केली. माझं ब्लड सँपल घेऊन नितिन कडे दिलं आणि त्याला ते लँबमधे नेऊन द्यायला सांगितलं.. तेवढ्यात माझे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट ही येऊन पोचले. आता हळूहळू dehydration चे symptoms दिसायला लागले होते. माझ्या चेहऱ्याचे स्नायु वेडेवाकडे खेचले जात होते आणि ते मला जाणवत होतं. माझा चेहरा distort होत होता. नितिन नी मला विचारलंही ,"तू चेहरा असा वाकडा का करतिएस?" मी तेव्हा त्याला म्हणाले की "मी मुद्दाम नाही करत, ते आपलं आपणच होतंय अरे" एकीकडे नर्स माझ्या सलाइन ड्रिपवाटे वेगवेगळी इंजेक्शन्स देत होती. आणि डॉक्टर माझ्या तोंडात औषधाच्या गोळ्या टाकत होते. Severe dehydration मुळे माझ्या शरीरामधे सोडिअम,मँग्नेशिअम वगैरे चं प्रमाण असंतुलित झालं होतं. डॉक्टर एकीकडे हे सगळं नितिन ला आणि बरोबरीनी मलाही समजावून सांगत होते, पण त्याचबरोबर मी जागं राहावं म्हणून अधूनमधून मला अक्षरशः गदागदा हलवत होते, गालांवर हलकेच थपडा मारत होते. पण या सगळ्या गदारोळात मी मात्र तिथे असूनही नसल्यासारखी होते. मला शारीरिक पातळीवर वेदना जाणवत होत्या , डॉक्टरांच्या बोलण्यावरून माझी कंडिशन किती सिरियस आहे तेही कळत होतं.. in fact, I had even heard the doctor telling Nitin that ," ट्रीटमेंट ला थोडा जरी उशीर झाला असता तर या कोमा मधे जायची भीती होती." हे सगळं माझ्या कानांवाटे माझ्या मेंदूपर्यंत पोचत होतं पण का कोण जाणे माझ्या मनावर या सगळ्याचा काहीच परिणाम होत नव्हता. आत कुठेतरी खूप शांत वाटत होतं. एक कुठली तरी अद्रुश्य शक्ती माझ्या आसपास असल्याचं सतत जाणवत होतं. आणि बहुतेक ही जाणीवच मला विश्वास देत होती की ' सगळं ठीक होईल.'

पहाटे पर्यंत हळूहळू माझ्या तब्बेतीमधे सुधार दिसायला लागला. माझी कंडिशन आता स्टेबल झाली होती. मी ठीक असल्याची खात्री झाल्यावर मग डॉक्टर घरी गेले. नितिन आणि जिजाजी पण रात्र भर हॉस्पिटलमधे बसून होते, त्यामुळे मी त्यांना पण घरी जायला सांगितलं. नितिन दिवसा मुलींना घेऊन येणार होता. पण जायच्या आधी तो मला म्हणाला,"काळजी घे गं स्वतःची... तुझ्यासाठी नाही तर निदान आमच्या तिघांसाठी तरी !!" मी त्याला तसं प्रॉमिस केलं अगदी मनापासून.

पण तो गेल्यानंतर देखील त्याचं ते वाक्य माझ्या कानांत घुमत होतं. त्याचा तो चिंतातुर चेहरा आणि ती हळवी नजर वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होती. त्याचं हे असं रुप मी आजपर्यंत कधी नव्हतं बघितलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की 'आपलं आयुष्य हे फक्त आपलं नसतं. त्याच्यावर आपल्या माणसांचाही तेवढाच हक्क असतो. आणि म्हणूनच मी ठरवलं 'नितिन ला दिलेलं प्रॉमिस पाळायचं. आपल्या प्रक्रुतीची काळजी घ्यायची... आपल्यासाठी आणि त्याहीपेक्षा जास्त आपल्या माणसांसाठी..

खरं म्हणजे आधीच्या शेड्यूल प्रमाणे माझ्या सर्जरी नंतर माझ्या प्रत्येकी तीन केमो होणार होत्या- तीन IP आणि तीन IV. पण माझे मेडिकल स्पेशालिस्ट मला म्हणाले की "आत्तापर्यंत तुमच्या शरीरानी ट्रीटमेंट ला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. You are tolerating the treatment very well. तर मला वाटतंय की तुम्ही अजून एक (चौथी) केमो पण घ्यावी. To be on the safer side."

हे ऐकून क्षणभर मी हादरले. कारण जरी म्हणायला एक केमो होती तरी अँक्च्युअली होत्या दोन केमो.. .आधी IP आणि त्यानंतर एक आठवड्यानंतर IV केमो. म्हणजे अजून एक्स्ट्रा एकवीस दिवसांचा शारीरिक त्रास. अचानक दोन्ही मुलीचा विचार मनात आला. त्या दोघीही गेल्या काही दिवसांपासून खूप खुश होत्या. 'आता लवकरच आईची ट्रीटमेंट संपणार आणि आपण परत बाबांकडे जाणार ' या नुसत्या कल्पनेनीच त्या जाम खुशीत होत्या. आणि आता जर त्यांना कळलं की त्यांचा हा प्लॅन तीन आठवड्यांनी पुढे ढकलला आहे तर त्या परत डिस्टर्ब होतील. पण मी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे अजून एक केमो घ्यायला तयार झाले. कारण त्यामुळे भविष्यात माझं आणि पर्यायानी माझ्या मुलींचं आयुष्य सुरक्षित राहणार होतं. त्याच्या तुलनेत हा एकवीस दिवसांचा त्रास काहीच नव्हता.

अशा प्रकारे मे २००६ मधे मी माझ्या अकराव्या (आणि शेवटच्या) केमोथेरपी साठी हॉस्पिटलमधे अँडमिट झाले. एकीकडे माझी केमो चालू होती आणि माझ्या मनात मात्र विचारांचा खो-खो चालला होता. गेल्या सहा-सात महिन्यांतला माझा प्रवास पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोरून सरकत होता- एखाद्या टीव्ही सिरियल चं रिपीट टेलिकास्ट बघितल्यासारखा. आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक टेलिकास्ट च्या वेळी मला काहीतरी नवीन अनुभूती होत होती.

हा सगळा प्रवास तसं म्हटलं तर माझ्या एकटीचाच; पण माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकानी आपापल्या परीने तो प्रवास पूर्ण केला होता.

गेल्या सहा महिन्यांत मी खूप शारीरिक त्रास सहन केला. पण मला माझ्या स्वतःच्या शरीराबद्दल आणि त्याचा क्षमतेबद्दल खात्री होती. मला नेहमी वाटायचं(आणि अजूनही वाटतं) की माझ्या शरीरात लाखो-करोडो पेशी आहेत आणि त्या एका सिस्टिम नी काम करतात. पण त्यातल्या काही पेशींनी ठरवलं की आपण आता आपल्याला हवं तसं, बेधुंदपणे वागायचं. अशा बंडखोर व्रुत्तीच्या पेशी एकत्र झाल्या आणि हळूहळू त्यांनी माझ्या शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात केली. पण माझ्या शरीरातल्या इतर निरोगी पेशींच्या तुलनेत या बंडखोर पेशी तर खूप कमी होत्या; मग त्या माझ्या शरीराचा ताबा कशा घेऊ शकतील? मी त्यांना असं करूच देणार नाही. आमच्या या लढाईत विजय फक्त माझा आणि माझाच होणार अशी खात्री होती मला. म्हणून मी रोज सकाळी उठल्यावर 'कराग्रे वसते' आणि 'समुद्र वसने देवी' म्हणून झाल्यानंतर माझ्या शरीरातल्या निरोगी पेशींना आदेश द्यायची-" जा आणि सगळ्या बंडखोर पेशींना नेस्तनाबूत करा"

आणि माझ्या शरीरानी पण या लढाईत माझी पूर्ण साथ दिली. त्या काळात झालेल्या वेदना आणि त्रास सहन करत असताना कधीही माझ्या शरीरानी माझी साथ नाही सोडली. विविध स्ट्रॉंग औषधांचा मारा सहन करून देखील माझ्या शत्रूला पळता भुई थोडी केली. मला माझ्याच शारीरिक आणि मानसिक शक्तीची नव्याने ओळख झाली; आणि मी ठरवलं - 'जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा माझ्या या शरीरानी मला साथ दिली. It never let me down. आता यापुढे मी माझ्या या शरीराची काळजी घेईन. मागच्या काही महिन्यांत झालेली शारीरिक हानी मी लवकरच भरून काढीन.'

ट्रीटमेंट संपल्यानंतरही मला काही महिने काळजी घेणं आवश्यक होतं. पहिले तीन महिने मला आधी प्रमाणेच आहारात पथ्य पाळणं गरजेचं होतं- फक्त शिजलेलं अन्न आणि उकळलेलं पाणी, बाहेरचं खाणंं पूर्णपणे व्यर्ज, गर्दीच्या ठिकाणी जायची मनाई. त्यानंतर हळूहळू नॉर्मल रूटीन सुरु करायचं. त्याचबरोबर पहिल्या वर्षी दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी आणि CA- 125 ही ब्लड टेस्ट करणं आवश्यक होतं दुसऱ्या वर्षी या टेस्ट्स दर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर मग वर्षातून एकदा करायचा सल्ला दिला डॉक्टरांनी. आणि हे सगळं मी अगदी तंतोतंत पाळलं. शिवाय रोजचा प्राणायाम आणि योगाभ्यास....त्यामुळे काही महिन्यांतच माझ्या शरीराची झीज भरून निघाली आणि मी परत पहिल्यासारखं माझं आयुष्य भरभरून जगायला लागले.

माझ्या शेवटच्या केमो दरम्यान मी माझ्या मेडिकल स्पेशालिस्ट ना विचारलं," माझ्या कँसरचे recurrence चे चान्सेस् किती आहेत तुमच्या द्रुष्टीनी?" यावर ते म्हणाले," तुमचा कँसर खूप अँडव्हान्स्ड स्टेजचा होता त्यामुळे माझ्या मते recurrence चे chances ४०% आहेत."

हाच प्रश्न जेव्हा मी माझ्या सर्जनला विचारला तेव्हा ते म्हणाले,"२५%". मग मी स्वतःच्या मनाला विचारलं, आणि उत्तर आलं ,"०.००००%" आणि मी माझ्या मनाचं ऐकायचं ठरवलं.त्या क्षणी मी स्वतःलाच एक वचन दिलं... 'Whenever I die.. I will not die because of cancer.." आणि हाच माझा या आजारावर मिळवलेला खरा विजय असेल.

माझ्या या आजारामुळे मला आयुष्याची नव्यानी ओळख झाली. खूप काही शिकले- माणसांबद्दल, नात्यांबद्दल! बरीचशी माणसं आणि काही नाती यांची नव्यानी व्याख्या समजली. मनात असलेले बरेचसे भ्रमाचे भोपळे फुटले...काही अनुभव दुःख देऊन गेले तर काहींमुळे खूप आनंदही मिळाला.

या सगळ्या अनुभवांतून एक मोठी शिकवण मिळाली आणि ती म्हणजे- आपल्याला हे जे आयुष्य मिळालंय ते 'जगायचं'. प्रत्येक क्षण अनुभवायचा. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आनंद शोधायचा.

माझ्या ट्रीटमेंट च्या काळात nausea मुळे मला काहीही खायला किंवा साधं पाणी प्यायला ही जीवावर यायचं. पाणी पितानाही अगदी घोट-घोट प्यावं लागायचं. त्यामुळे ट्रीटमेंट संपल्यानंतर काही दिवसांनी एकदा जेव्हा मी पाण्याचा पूर्ण भरलेला ग्लास एका झटक्यात अगदी घटाघट पिऊन रिकामा केला तेव्हा मला अक्षरशः जग जिंकल्याचा आनंद झाला. आणि त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की

आपण आपल्या आयुष्यातल्या बर्याच गोष्टी ग्रुहीत धरतो- आपली माणसं, आपली प्रक्रुती, आपल्याला मिळणार्या सुख सुविधा- थोडक्यात काय तर आपण आपलं सगळं आयुष्यच ग्रुहीत धरतो. आणि म्हणूनच आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा हे सगळं आपल्या हातातून निसटायला लागतं तेव्हा त्याची खरी किंमत कळते. आणि म्हणूनच आपल्या ओंजळीतून हे सगळं निसटू न देता त्याचा आस्वाद घेणं जमलं पाहिजे. ज्याला हा आस्वाद घेणं जमलं, त्याला खरं आयुष्य जगता आलं.

हे असंच आयुष्य 'जगायचा' माझा प्रयत्न चालू आहे-सतत!

मी माझ्या ट्रीटमेंट च्या काळात खूप कँसर पेशंट्स बघितले... वेगवेगळ्या स्टेजेस् मधले..काही जण माझ्यासारखे होते.. त्यांची काहीही चूक नसतानाही या आजारानी पछाडलेले. पण बऱ्याच पेशंट्सनी स्वतःच या रोगाला आमंत्रण दिलं होतं. सिगरेट, तंबाखू, मशेरी, दारू अशा विविध मार्गांनी कँसर त्यांच्या शरीरात शिरला होता. थोडक्यात काय तर त्या सगळ्यांनी पैसे देऊन हा रोग विकत घेतला होता. पण आता कितीही प्रयत्न केला तरी तो कँसर त्यांच्या शरीरातून बाहेर जायला तयार नव्हता. हे सगळं बघितलं आहे मी जवळून आणि म्हणून माझी सगळ्यांना एकच विनंती आहे.. "देवानी तुम्हाला हे निरोगी शरीर दिलं आहे त्याची काळजी घ्या. त्याची हेळसांड नका करू. Health is wealth या वाक्यामागचा खरा अर्थ लक्षात घ्या. कारण जर आपलं हेल्थ च ठीक नसेल तर कितीही वेल्थ असलं तरी त्याचा काही उपयोग नाही.

काही जण मला म्हणतात," नको लक्षात ठेऊस ते दिवस. एक वाईट स्वप्न समजून विसरून जा सगळं." पण मला नाही विसरायचं काहीच. त्या कालावधीतला प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव मला अजूनही लक्षात आहे आणि आयुष्यभर मला ते सगळं लक्षात ठेवायचं आहे. कारण त्या अनुभवांमुळेच तर मला माझ्या सभोवतालचा चांगुलपणा दिसला. I have started valuing my body and my health even more.

माझ्या आजारपणाचा तो काळ माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य आणि तितकाच महत्त्वाचा घटक आहे. इतरांच्या म्हणण्याप्रमाणे जरी तो त्रासदायक असला तरी शेवटी आहे माझ्याच आयुष्यातला ना! It makes my life complete.

खैर... प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्वत वेगवेगळी असते. त्यामुळे मला जे योग्य वाटतंय ते काही लोकांना कदाचित नाही पटणार; आणि तसा माझा आग्रह ही नाही.

पण एक गोष्ट मात्र नक्की आहे - माझ्या शरीरात आणि पर्यायाने माझ्या आयुष्यात शिरलेला हा कँसर म्हणजे माझ्यासाठी 'blessing in disguise ' ठरला आहे...मला माझी आणि माझ्या आयुष्याची नव्यानी ओळख करून देणारा!

पण बस्स्... आता माझ्या यापुढच्या आयुष्यात या आगंतुकाला स्थान नाही ! कारण आता मी त्याच्यावर विजय मिळवला आहे - कायमचा!

मी एक 'cancer survivor' नाहीए; तर 'cancer conqueror ' आहे.

आणि या माझ्या लढाईत ज्या दोन शस्त्रांनी माझा विजय निश्चित केला, ती शस्त्रं म्हणजे माझी willpower आणि positive thinking.

आज इतक्या वर्षानंतर हे सगळं कागदावर उतरवताना आणि सगळ्यांबरोबर शेअर करताना मनात एकच आशा आहे.... माझं हे मनोगत वाचणार्यांना त्यांच्या मनाच्या शक्तीची जाणीव होईल आणि आयुष्य कडे बघताना ते त्यांचा सकारात्मक चश्मा नक्की घालतील.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@Preeti Sakhi, तुमच्या म्हणण्यानुसार माझे अनुभव एक कथेच्या रुपात share करते आहे. Happy

Kharach, khoop preranadayi ahe tumcha anubhav. Abhinandan hya divyavar maat kelyabaddal. Aabhari ahe ki tumhi he sarva amachyabarobar vatala.

Ma'am,
मायबोलीची मी बऱ्यापैकी नियमित वाचक आहे. आजवर बऱ्याच थोर लेखकांचे वाचले. परंतु मनापासून लिहावेसे वाटते की तुमचा अनुभव काळजाला थेट भिडला.
not because it was a great piece of writing, and not because you have great potential as a writer. But the reason is far more different.
Tumhi ya सगळ्यातून स्वतः गेलात. It is straight from heart.
प्रत्येक वाक्यातून तुमच्या खंबीर मनाची ताकद जाणवत होती. Strong woman म्हणजे काय असते ते तुम्ही आहात.
Positive attitude jo अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही पदोपदी अधोरेखित केला आहे त्याच importance mi personally जाणते.
Honestly speaking, not even a bodily discomfort can break a human being but negative environment does.
I certainly admire you for your fight against your medical condition. But more than that I admire, respect and proud of you for your fight against negativity. That is more tough fight. And trust me I could feel that emotion in you while reading.
You are an absolutely sorted, strong and amazing human being.
And you are right, you are chosen not because you did something wrong but only you had potential to fight it back successfully.
Positivity can crush mountains, toh cancer kya cheez hai !!!
I m so overwhelmed by ur writing that I feel like meeting u in person.
तुम्हाला तुमच्या भावी निरोगी दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. you r gona rock it girl!!

धन्यवाद dr मनाली. माझ्या लिखाणामागची भावना जेव्हा वाचकांपर्यंत पोचते तेव्हा असं वाटतं की माझा उद्देश सफल झाला. तुमचा इतका सखोल आणि सुंदररित्या शब्दबद्ध केलेला अभिप्राय वाचून खूप छान वाटलं. Thank you so much. _/\_

मॅम,
अनुभव लेखन आवडले,
कॅन्सर ट्रीटमेंट फिल्ड मध्ये काही काळ काम केल्याने कॅन्सर चे रुग्ण जवळून पाहिले आहेत,
त्या पार्श्वभूमीवर तुमचा पोसिटीव्ही अटीत्युड काबिले तारीफ आहे.
तुमच्या नेव्हर से डाय attitude साठी हॅट्स ऑफ आणि
पुढच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा.

Tai, tumcha anubhav wachun khupach positive energy milali, aayushya Kade pahantacha nawa dristikon kalala. Cancer aamchya gharat agdi thampane rahatoy mama,maishi,aajoba agdi nawin pidhi sudha tyachya taawdit aahe pan aaj manatli bhiti palali ..jar to houn tumhi jinklat tar kalji gheun aamhi nakkich tyala roku Ani aalach tar harau ha wishwas milala. Thank you so much for sharing your thoughts. You are really a strong woman. Offcourse army wife is itself a strong army is once again prooved.salute to your bravery.