डोंगर संवाद

Submitted by डी मृणालिनी on 20 February, 2019 - 05:36

धामापूर गावाची उभारणी आणि परंपरा अशा अनेक गोष्टी माणसाने जरी पाहिले नसले तरीसुद्धा तलावाच्या कडेने दिवस - रात्र उभे असलेले हे तीन विशाल डोंगर मात्र या गावांची उभारणी व परंपरा यांचे साक्षीदार आहेत . ह्यावरच आधारित ह्या डोंगरांचा एक संवाद .

अहो ! पिढ्यानपिढ्या बघत आलोय या दोन्ही गावांना. काय एकजूट होती या दोन्ही गावांची ! आपापसात जरी कडाक्याचे भांडण असले नं तरी या बांधाकडे आल्यावर मात्र एकसाथ मातीत हात घालायचे . पण आता काय झाले कुणास ठाऊक ?? गेल्या अनेक वर्षांपासून ती एकजूट , ते तलावाप्रती असलेलं प्रेम दिसेनासच झालं . वर्षानुवर्षे पाहत आलेली गोष्ट जेव्हा अचानक नाहीशी होते तेव्हाच दुःख हे त्या धामापूर डोंगराच्या बोलण्यातून अगदी स्पष्ट जाणवत होतं. ते दृश्य मन हेलावून टाकणारं होतं . अथांग पसरलेला तलाव , वरती निरभ्र आकाश आणि तिन्ही बाजूंनी पसरलेले गर्द हिरव्यागार झाडांनी भरलेले ते तीन डोंगर हातात हात धरून उभे आहेत असच वाटतं . हे तीन डोंगर म्हणजे एक काळस्याचा , एक धामापूरचा आणि एक मोगरण्याचा . असे हे तीन डोंगर तलावाच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात .
हे गाव वसल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही या गावांना पहात आलोय . काळस्याचा डोंगराने अगदी अभिमानाने सांगितले . पण धामापूर डोंगराच्या बोलण्यात दुःखाची छटा होती . हो नं रे ! खरंच ! पण आता काय सांगू ! या गावांची पूर्ण कायापालटच झालीये . काय ते दिवस होते . सणासुदीला अख्खा गाव जमायचा . कुठेही भेदभाव नाही . सगळ्यांना मान दिला जायचा . आणि बांधाचं तर विचारूच नका ! बांध बांधणे म्हणजे एक उत्सवचं असायचा . सगळे गावातले लोक एकत्र येऊन कोवळ्याचा बांध घालायचे . माझ्या अज्ञानी डोक्याला प्रश्न पडला . कोवळ्याचा बांध म्हणजे काय ?? त्यावर काळसे डोंगर म्हणाला . अहो , कोवळा म्हणजे झाडांच्या फांद्यांचा गठ्ठा . बांध घालतांना एक थर माती, त्यावर दुसरा थर झाडांचा फांद्यांचा गठ्ठा , परत माती असे थरावर थर जमवून हा बांध घालायचे . म्हणून याला कोवळ्याचा बांध म्हणायचे . अरे ! चमत्कारिक गोष्ट अशी कि हा बांध घालतांना एका मातीच्या मडक्यात दही - भात ठेवायचे आणि दुसऱ्या वर्षी बांध फोडताना तोच दही - भात प्रसाद म्हणून वाटायचे . आणि तोपर्यंत तो टिकायचा ! आम्ही या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहोत . बांध बांधताना आणि फोडताना त्यांची ती एकजूट बघून आमच्या अंगात पण उत्साह यायचा . हे काम काही सोम्या - गोम्याचं नव्हतं . बांध फोडताना येणारा पाण्याचा प्रवाह भयानक असायचा . काही अपघात होऊ नये म्हणून गावकरी देवी समोर गाऱ्हाणे घालायचे . तरीसुद्धा तीन वर्षातून एकदा तरी अपघात व्हायचेच . धामापूर डोंगर म्हणाला . हो नं ! आणि ते अगदी आमच्या डोळ्यासमोरच ! पण काही का असेना अपघात होतात म्हणून कोणी काम टाळायचे नाही . सगळे आपल्या कामाप्रती प्रामाणिक होते . सगळ्यांची कामे ठरलेली होती . उठसुठ कोणीही कुंभार किंवा सुतार बनायचे नाही . आपला पिढ्यानपिढ्या असलेला धंदा पुढे चालू ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होतं . कोणतेही काम उच्च नाही आणि कोणतेही काम तुच्छ नाही . काळसे डोंगर म्हणाला . हो ना ! आणि आमच्या गावांमध्ये जाती वाद पण मुळीच नव्हते . जातीभेद होते पण जातीवाद नव्हते . इतिहासात पाहिलं तर महारांना तुच्छ लेखलं जातं , त्यांना काहीच मान नसतो असं म्हणतात . अरे ! पण आमच्या गावांमध्ये देव निघाल्यावर महार आणि त्यांची दांडेकर देवता सगळ्यात पुढे असल्याशिवाय देव निघायचेच नाहीत . तुला आठवतेय का रे ? दसऱ्याचा आदल्या दिवशी महारांना मान असायचा . त्या दिवशी म्हणे त्यांनी सगळ्यांचा शेतातले हवे तेवढे धान्य घेऊन जायचे अशी प्रथा होती . हो तर ! आठवतेय नं .. धामापूर डोंगर म्हणाला . या सगळ्या प्रथा माझ्यासाठी तरी अविस्मरणीय आहेत . ती तलावाची आख्यायिका माहितीये ? लग्नकार्यासाठी परडीभर फुलांच्या बदल्यात तलाव सोन्याचे दागिने द्यायचा . पण काम झाल्यावर मुदतीत ते परत द्यावे लागायचे . पण धोबीने ते दिलेच नाहीत . बिच्चारा धोबी ! शेवटी त्याला गाव सोडून जावं लागलं . हो नं ? खरंच !! काय परंपरा होत्या या गावांच्या ! या गावांच्या उभारणी पासून ते आत्ता होत असलेल्या दुर्दशेपर्यंत आम्ही पाहत आलोय ह्यांना ! हो कि नै रे !! काळसे डोंगराने संमतीदर्शक मान हलविली . आज आपण या परंपरांच्या अस्तित्वाबद्दल कितीही वाद घातला तरी हे तीन डोंगर मात्र प्रत्यक्षात पाहिलेले असे साक्षीदार आहेत .
IMG_20180925_080140 (2).jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users