न लिहिलेली डायरी

Submitted by क्षास on 17 November, 2018 - 14:49

न लिहिलेली डायरी
१५ जून
आज पूजा भेटली होती. त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती. त्यांच्याबद्दल म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल...ते कसे एक्केचाळीस दिवस न भेटता न बोलता राहिले.. वगैरे ...शेवटी तिने आमच्या बद्दल विचारलं. कमिटमेंटचं काय झालं विचारलं...नेहमीप्रमाणे मी काहीतरी छापील उत्तर दिलं. मला आता तेच तेच समजावून कंटाळा आला होता. कितीदा सांगणार आम्ही कमिटमेंटऐवजी इन्व्हॉल्वमेंटला महत्त्व देतो. कमिटमेंट देणं म्हणजे नक्की काय असतं. मी तुझ्याशी कमिटेड आहे असं बोलणं हाच प्रेमाचा सर्वोच्च बिंदू का वाटतो या सगळ्यांना. कृतीचा नाही पत्ता आणि शब्दांचे काय इमले रचायचे...शी....मला कंटाळा आलाय या मानसिकतेच्या लोकांशी बोलण्याचा.....या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे नक्की. तो कमिटेड नाही हा की या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही हा? ....मी खरंखुरं प्रामाणिकपणे सांगू का....मला हवीच आहे कमिटमेंट...माझ्या इगोचा चोळामोळा झालेला खरंतर पण मी स्वतःला सावरलं...जुन्या सिनेमांसारखं भरभरून प्रेम करण्याचा काळ गेला ..आजच्या काळात असंच असतं वगैरे असं स्वतःला पटवून दिलं...
पूजा काही केल्या आमचा विषय सोडेना...ज्याला जमवून घेता येतं तो थांबतो आणि ज्याला नाही झेपत तो निघून जातो ...सिम्पल ! असं म्हणत शेवटी मी विषय संपवला....मग ती निमूटपणे बबल टी पित बसली.

१६ जून
आज तो ठरल्याप्रमाणे भेटायला आलाच नाही. साधा एक फोनही नाही ! काय दगड माणूस आहे ....नेमकी त्याची गाडी आजच बंद पडायची होती. रिक्षा करून यायला काय झालं होतं. किती दिवसांनी भेट होणार होती आज!...फोन करून सांगताही नाही आलं..फोनही स्विच ऑफ कसा झाला त्याचा!...काय खरं काय खोटं कोणास ठाऊक...तो खोटं बोलणार नाही ...त्याच्या फोनला कधीच चार्जिंग नसतं खरंतर ... किती आवरलं स्वतःला ,शेवटी दाबून ठेवलेला हुंदका किती वेळ थांबणार.. रेकॉर्ड केलेले कॉल्स ऐकता ऐकता ओक्साबोक्सी रडले.

१७ जून
जगातल्या सगळ्या दुःखांवर एकच औषध आहे गरम तळलेला बांगडा ! आज दोन बांगडे खाल्ले.चविष्ट होते अगदी.
२० जून
आराम
२१ जून
आज पण आराम
२७ जून
आजकाल लिहिण्यासारखं काही घडत नाही...त्याची खूप आठवण येते..कधी ही सुट्टी संपणार ...शी!
२८ जून

आज प्यासा पहिला....वहिदा रेहमान आणि गुरु दत्त...काय अफाट सुंदर चित्रपट आहे तो!... त्यातली गाणी अजूनही ओठांवर आहेत

हर एक जिस्म घायल हर एक रुह प्यासी
निगाहो में उलझन दिलो मे उदासी
ये दुनिया हे या आलम ए बदहवासी

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे

२ जुलै
कधीकधी वाटतं मला कसा आणि कधी त्याचा इतका लळा लागला सगळे म्हणतात की तू उजवी आहे त्याच्यापेक्षा तुला कोणीही मिळेल.प्रश्न कोणीही मिळण्याचा नाहीये. प्रश्न मला कोणीतरी आवडण्याचा आहे. त्याची कोणती गोष्ट मला एवढी आवडली याचा मलाच अजून थांगपत्ता लागलेला नाहीये. मागच्या मे-जूनमध्ये आम्ही बोलायला लागलो.... तेव्हा नकळत मला त्याचा खरेपणा साधेपणा आवडायला लागला... असं वाटलेलं आजच्या दिखाऊ जागात असा माणूस भेटणं दुर्मिळच आहेत .सगळं आहे तसं सांगणारा ..काहीही न लपवणारा ...मनात एक बाहेर एक असं नाही मनात येईल ते स्पष्ट बोलणारा आणि खरं बोलणारा.... त्याच्याकडे एक कमालीची सहजता आहे वेगळाच दृष्टिकोन आहे. त्याच्याही आधी मी त्याच्या वेगळेपणाच्या प्रेमात पडले प्रेमात पडले.मला तो अजूनच आवडायला लागला... उंच भरदार ..धष्टपुष्ट बांधा ..सरळ नाक ..नाजूक डोळे व एका बाजूला वळवून ठेवलेले केस ..किती सुंदर व्यक्तिमत्व ! नुसता हात हातात घेतला तरी उब जाणवते. एखाद्या व्यक्ती संपूर्ण आतून-बाहेरून आवडतो तेव्हा सगळं घडणारं पुन्हा घडणारच नाही म्हणूनच हातात घट्ट पकडून ठेवावंसं वाटतं...निसटून जाऊ नये म्हणून.

३ जुलै
आज स्वयंपाकाशिवाय काहीच काम केलं नाही.आई म्हणते तू आजीसारखी सुगरण होशील. मला सुगरण वगैरे नाही व्हायचं. जिभेचे चोचले पुरवता येतील एवढेच कुकिंग शिकायचं आहे... मला स्वयंपाकासारखं भावनिकरित्या कणखर कसं व्हायचं हे पण सहज शिकता आलं असतं तर किती बरं झालं असतं.
आज कॅरॅमल पुडिंग बनवलं होतं मी..छान जमलं होतं...एखादा पदार्थ चांगला झाला की आजी म्हणते हिच्या लग्नाची काळजी मिटली...जेवण चांगलं जमतंय हिला.....लग्नावरून लगेच माऊच्या टिपण्या सुरु होतात...माझ्या कानात म्हणाली बघ त्याला किंमत नाहीये तुझ्यासारख्या सर्वगुणसंपन्न मुलीची.

मीही काही सर्वगुणसंपन्न नाहीये. माझ्यात बरेच दोष आहेत.सर्वात मोठा दोष आहे की मला रियालिटी स्वीकारता येत नाही. कितीही प्रयत्न केला तरी वाईट वाटतं..खूप दुखावल्यासारखं वाटतं राहतं. माझेच प्रश्न मला छळतात! या मुलाला मी हवीहवीशी का नाही वाटत ..अजून थोडे महिने जाऊ देऊ का? एखाद्या माणसाला आपलंसं करायला एवढा वेळ का लागतो? ठीक आहे लग्न नाही केलं तर चालेल लग्न करायची इच्छा होत नाही त्याला? नक्की कशी मुलगी हवी आहे ? त्या दोन किलो मेकअपवाल्या भावनासारखी? नक्की अपेक्षा तरी काय आहे त्याची? ....आणि मला तोच का हवाय?....त्याने स्वीकारणं हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न का होऊन बसलाय....मला नक्की काय हवंय...तो की त्याची कमिटमेंट?
मला स्वतःच्या नजरेत अगदी छोटं झाल्यासारखं वाटतं.खूप इंसिग्निफिकँट.......

८ जुलै
आज गाईड पाहिला.
जब मतलब से प्यार हो जाता है तो प्यार से मतलब नही रहता.

९ जुलै
अनाडी....राज कपूर आणि नूतन... हृदय हेलावून टाकणारा सिनेमा!. त्याकाळी लोक किती सहज निर्व्याजपणे प्रेम करायचे ....अनकंडिशनल... मी त्याच्यावर निर्व्याज निस्वार्थी अनकंडिशनल प्रेम करते का? मला त्याचा भावनिक आधार, सुखद स्पर्श आयुष्यभर हवाय हाही माझा स्वार्थ आहे. जर मी त्याच्याकडून नेहमी सोबत राहण्याची ही मागणी केली नाही तर ते अनकंडिशनल लव्ह होईल का?

१० जुलै
झोप जेवण चॅट जेवण आणि पुन्हा झोप

१२ जुलै
आज दुसऱ्यांदा आमची भेट कॅन्सल झाली.....त्याच्या भाषेत 'डेट' कॅन्सल झाली...अशी भयंकर तडफड होतीये ना!,,,स्वतःचाच राग येतोय...मी का एवढी संवेदनशील आहे!!!!! इतरांचा कॅज्युअल अप्रोच दिसला की मी भांबावून जायला लागलीये....कुठल्या काळात जगतीये मी....किती विचित्र आहे हे सगळं ... चांगलं-वाईट यश-अपयश जिंकणं हरणं सगळ्याच्या व्याख्याच बदलल्या आहे. दोस्ती, प्रेम, माया, नाती,आयुष्य या सगळ्याकडे किती वरवर बघतो आपण. वरवर बघतो कारण कशात अडकायचंच नाही आणि अडकण्याची रिस्कच नको. नुसतं भासवत राहायचं इतरांना आणि स्वतःलाही. अमुक तमुक आहे असं भासवत राहायचं. मृगजळ जोपर्यंत "एन्जॉय" करता येईल तोपर्यंत ते अनुभवायचं....मग तो भासही नको आणि वास्तवही नको. हे असंच भासवत फसवत जगत राहायचं. काही द्यायचं नाही आणि काही घ्यायचं नाही.....मी ही काहीच देणार नाही ....घेणार पण नाही....मला काही नकोय...मला काहीही नकोय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users