मुझे पता है वो कहां होगी....

Submitted by स्वप्नगंधा on 16 November, 2018 - 07:54

मुझे पता है वो कहां होगी...

हिंदी सिनेमातला एक typical सीन... हिरो किंवा हिरॉइन घरी नाहीये.. बरीच शोधाशोध होते आणि कुणीतरी एकदम खास जवळची व्यक्ती म्हणते... मुझे पता है वो कहां होगी.. सगळे त्या जागी पोचतात आणि खरंच ती व्यक्ती तिथेच असते...

मी अमितला ,माझ्या मित्रवराला (मित्र cum नवरा) नेहमी सांगते असं काही माझ्या बाबतीत झालं ना तर मला शोधायला सरळ टेकडीवर ये.. खाणीजवळच्या एका खडकावर बसलेली सापडेन मी तुला...टेकडी... वेताळ टेकडी... माझी सगळ्यात आवडीची जागा..पुण्यात सेनापती बापट रस्त्याजवळ अशी सुंदर टेकडी आहे, यावर कुणा नवख्याचा विश्वासही बसणार नाही...

लहानपणी आम्ही सुट्टीत सकाळी लवकर उठून टेकडीवर जात असू..पण पॅगोडा, हनुमान टेकडी किंवा चतु:शृंगीवरवर .तेंव्हा शाळेच्या वयात नुसतं
' वेताळ टेकडी' या नावानेच भिती वाटायची आणि 35 एक वर्षांपूर्वी आता इतकी तिथे ये-जा पण नसायची.. वेताळावर जायचा सुरुवात तशी उशीराच झाली..पण मग नंतर वेताळ टेकडीवर जाणं सुरू केलं आणि हनुमान टेकडीवर जाणं पार विसरूनच गेलो....

वेताळ टेकडीची मजा म्हणजे इथे पोचायला अनंत रस्ते आहेत.. म्हणजे लॉ कॉलेज आणि पौड रोड सोडूनही अनेक..
विखेपाटील शाळेपासून डावीकडे पोलीस लाईनच्या बाजूने किंवा उजवीकडे मेंढीपालन केंद्रापासून ..इथून पुढे गेलं की वरती चढणीच्या असंख्य वाटा खाणीपर्यंत घेऊन जातात...

टेकडीच्या पायथ्यापर्यंत मी स्कूटर ने जाते. तिथेच स्कूटर सोबत सगळ्या चिंता , विवंचना पार्क करून टाकते! मग वरती चढताना एकदम हलकं फुलकं वाटतं.. सुरुवातीच्या चढणीच्या रस्ताला दुतर्फा पतंगी आहेत.. उन्हाळ्यात अगदीच वाळून गेलेली ही पतंगी फक्त एका पावसाने शिडकाव्याने हिरवीगार होते.. त्याला छोटी पांढरी सुवासिक फुलं येतात.. त्याचा सुवासंच ,फुलं आल्याची वर्दी देतो.थंडी सरताना पिवळ्याधमक फुलांची गणेर फुलते.. खाणीतील एक झाड तर अख्ख पिवळं होतं. बहर ओसरल्यावर मग त्याला फळं धरतात, मोठ्या भरताच्या वांग्याइतकी..तो बहर ओसरला की झाड आपल्या पूर्व रुपात येतं. त्रिकोणी आकाराच्या हिरव्यागार पानांनी पुन्हा लपेटून जातं.

टेकडी चढतानाचा शिरीष पण असाच..त्याच्या फुलांचा मधुर सुवास नाकात शिरला की समजायचं, सुरुवातीची चढण संपत आली आहे हे.. त्याची मातकट पिवळट हिरवी फुलं पटकन दिसत नाहीत. झाडावर नीट निरखून बघितली, एखादं दिसलं की काय मग सगळीच दिसू लागतात.. ही फुलं दिसली की हमखास श्री.द. महाजन सरांचं बोलणं आठवतं.. "शाकुंतलात शकुंतला तिच्या सख्यांसोबत जलक्रीडा करत असते आणि त्यांच्या कानातली शिरीषाची फुलं जणू शैवाल वाटून जलजीव त्यावर उड्या मारत असता"'... हे सांगून सर म्हणायचे, "तात्पर्य, शिरीषाची फुलं मातकट हिरवी.. लोकांना गुलाबी वाटतात ती रेन ट्री ची फुलं, तो परदेशी वृक्ष.त्याच्या फुलांना वास नाही"...सरांची ही शिकवण प्रत्येक वेळी आठवते.. फुलांच्या आधी शिरीषाला सोनसळी चपट्या शेंगा लटकत असतात, मागच्या हंगामात आलेल्या. वाऱ्यासोबत त्यांची सळसळ इतकी प्रसन्न वाटते! फुलं आणि शेंगा मिरवून झाल्या, की मग शिरीष चुपचाप उभा राहतो नुसताच कडेला..त्याचं अस्तित्व जाणवू न देता...त्याच्या आणखी पुढे उजवीकडे रानजाईची भरगच्च फुलं.. गोड पण उग्र वास लेवून उभी असतात. चढ संपत आला आणि मारुतीचं देऊळ दिसायला लागलं की तिथेच डाव्या हाताला बारतोंडीची झाडं दिसतात.. त्याची पानं अगदी मऊ मुलायम असतात. एकदा मी माझ्या भाच्याला घेऊन गेले होते टेकडीवर तो 7-8 वर्षांचा असताना. त्याला बारतोंडीच्या मऊ पानांना हात लावायला सांगितला.. हात लावून पटकन म्हणाला, "आत्या आपली मऊ पांघरुण यापासून बनवतात हे आत्ता कळलं मला!".. बारतोंडीची फुलं फुलली की सुरेख वास येतो..वास काहीसा मोगऱ्यासारखा, ती दिसतात थोडीशी निशिगंधाच्या फुलासारखी आणि फळं सीताफळासारखी...

असे हे वृक्ष सोहळे बघत मी कधी वर पोहचते कळत सुद्धा नाही. चढताना मधूनच मोरांची केकावली ऐकू येत असते.. मधेच small minivet आणि बुलबुल पक्ष्यांचा किलबिलाट.. आपण पुण्यात भरवस्तीपासून अगदी 15-20 मिनिटांच्या अंतरावर आहोत, याचा मागमूस सुद्धा नसतो..
वरती चढून गेल्यावर दोन वाटा फुटतात. पहिली अगदी उजव्याबाजूची.. तुम्ही सकाळी अगदी लवकर गेलात, तर याच वाटेने जायचे. म्हणजे सूर्योदय बघता येतो.संध्याकाळी जायचं तर दुसऱ्या वाटेने, तिथून सूर्यास्त दिसतो. याच रस्त्याने पुढे खाणीकडे जाता येतं.. तसं खाणीकडे जायला वेताळबाबाच्या देवळपासूनही जाता येतं.. पण त्यासाठी पुन्हा एक छोटी चढण चढावी लागते. मी फारशी त्या वाटेला जात नाही.
मी आपली वेताळाच्या डोंगरालगत वळून जाणारी सरळसोट वाट पकडते.. इथे वारा अगदी निश्चल असतो. कारण वाटेतल्या वेताळाच्या डोंगराने त्याला अडवून ठेवलेलं असतं. या वाटेनी जाताना ,एक पूर्वेकडची आणि एक वरची वेताळाची अशी दोन्ही वाटा नजरेस पडतात..उन्हाळ्याच्या दिवसात मध्येच एखादा मोर, तीन चार लांडोरींसोबत भटकताना दिसतो.

थोडंस आणखी पुढे चालत गेलं की घोंघावणारा वाराच आपलं स्वागत करतो.वेताळाचा डोंगर पार केल्यामुळे या वाऱ्याला कुठलाही धरबंध नसतो. तो उनाड जनावरासारखा उधळलेला असतो. तो तसाच अंगावर घेत जायचं तर खाणीच्या लगतचा रस्ता पकडायचा. नाहीतर मग वरचा रस्ता धरायचा. या रस्त्यात पावसाळ्यात पाण्याची छोटी छोटी डबकी साठतात. लहान मुलांसारखं दोन्ही पाय उंच करून धपकन त्या डबक्यात उडी माराविशी वाटते. पण मन आवरावं लागतंच.. या रस्त्याला उजवीकडे थोडासा आतल्याबाजूला असलेला, दुर्लक्षित पाचुंदा दिसतो..याची पानं सुद्धा अगदी मऊ मुलायम.. लालभडक फळं येतात तेंव्हा जरासा उठून दिसतो.. पाचुंदा दिसला की लगेच डावीकडेच आहे, माझं लाडकं ठिकाण!माझी रॉयल सीट..जिथे मी हमखास सापडेन तुम्हांला..

मावळतीच्या सूर्याकडे नि:शब्द पणे बघत बसायचं..कधी डोळे मिटून घ्यायचे.दोन चार मिनिटात डोळे उघडले की एखादं वेगळंच दृश्य दिसू लागतं..खरंतर इथलं आकाश प्रत्येक सेकंदाला बदलतं.. त्याचा तो आवाका नजरेत साठवायचा प्रयत्न करते मी.आजूबाजूला कधी कधी खूप लोकं असतात. तरुण मुलंमुली त्यांची सेल्फी ची हौस भागवत असतात तर छोटी मुलं खाऊची.

मी मात्र त्या कोलाहलात आतून शांत होत जाते.. तिथे मला 'मी' भेटते. एरवी आमची भेट क्वचितच होते. आम्ही काहीच बोलत नाही .फक्त न्याहाळतो एकमेकींना.. तिथे कुठलीही औपचारिकता नसते. असतो फक्त मूक संवाद..इथे मन कधी अगदी रिकामं होतं तर कधी अगदी भरून येतं. सूर्य मावळतो तशी परतायची वेळ होते. मी परत येईन असं आश्वासन मी त्या सगळ्या आसमंताला देते. त्यांनी मला दिलेलं देणं अमूल्य असतं. दरवेळी तो त्याची थैली माझ्यासमोर रिक्त करतो.. ते वेचायला माझीच ओंजळ अपुरी पडते.. जाणं जीवावर आलेलं असतं. पण निघावं लागतंच.. येताना पावलं झपझप टाकावी लागतात.वाटेतल्या मारुतीच्या देवळापाशी मी थांबते.. नकळत हात जोडले जातात. डोळे मिटतात.. त्या शक्तीच्या आराध्याला एकच मागणे मागते, इथे येऊ शकेन नेहमी असं आरोग्य लाभू देत मला..

उतरणीच्या वाटेवर हळूहळू अंधार पडायला लागलेला असतो.. माझी रानजाई , बारतोंडी,शिरीष,पतंगी ही वृक्ष मंडळी अंधारात मिटत जात असतात.
मी स्कूटर पाशी येते.. पार्क केलेली स्कूटर काढते आणि क्षणार्धात 'या' जगात येते... रात्री स्वयंपाक काय करायचा, सकाळचे काय शिल्लक आहे, वाटेत काय भाजी घ्यायची, मुलींना डब्यात काय द्यावं, ऑफिसचं राहिलेलं अर्धवट काम , हे सगळे विचार काय ठाऊक कुठून एकदम भडिमार करतात.. इतका वेळ माझ्या टेकडीने त्यांना अडवून ठेवलेलं असतं ना...

Group content visibility: 
Use group defaults

सुन्दर लिहीलय Happy
मित्रवराला (मित्र cum नवरा) ने >> हे आवडलंय Happy , (उगाच आपलं : 'प्रिये पाहा' सीन आठवला ह्यावरून)
बाकी वर्णन झकास

किती छान लिहिलंय!
मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना जसा सहज मोकळेपणा असतो, तसं वाटतंय. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

टेकडीच्या पायथ्यापर्यंत मी स्कूटर ने जाते. तिथेच स्कूटर सोबत सगळ्या चिंता , विवंचना पार्क करून टाकते! मग वरती चढताना एकदम हलकं फुलकं वाटतं.. +१
आयुष्य सुखाने जगण्यासाठीचा मूलमंत्र सहज सुंदरपणे मांडलाय

छान लिहीले आहे! त्यात या टेकडीचे वर्णन असल्याने अगदी जवळचे वाटले. त्या भागातील झाडे, प्राणी, पक्षी, आणि अगदी विविध प्रकारचे किडे सुद्धा - याचे वैविध्य प्रचंड आहे. अर्थात वरती लिहीले आहे तशी त्या झाडांची माहिती आम्हाला नव्हती. मोर व इतर प्राणी अनेकदा पाहिले आहेत.

या चारही ठिकाणी लहानपणी अनेकदा गेलो आहे. वेताळ टेकडी अनेक वर्षांपूर्वी अगदी निर्मनुष्य असे. गेल्या काही वर्षात कोथरूड च्या बाजूने लोक वरती येउ लागल्यापासून गेलो नाही कधी. आम्ही कायम गोखलेनगर च्या बाजूने गेलो आहे. नंतर तो भाग वनविहार म्हणून घोषित केल्याने बहुधा बिल्डिंग्ज ची बांधकामे व झोपड्या दोन्हीच्या कचाट्यातून वाचला आहे.

आहा !!! काय सुंदर लेख आहे. सगळ्या आठवणी आणि जुने दिवस उसळून वर आले. सुरेख वर्णन आणि त्यातही मला अनुभवाची जोड असल्याने मला तर सगळं डोळ्यासमोर दिसलं, कल्पना करावी लागली नाही. आज इथे बसून वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉक झाला Happy

मित्रवर भारी होत ( thumbs up )