परवा आमच्या इमारतीच्या बाहेर रस्त्यावर एक छोटासा अपघात झाला. मोठा आवाज झाल्यामुळे, काय झालं हे बघायला म्हणून बाहेर रस्त्यावर आलो तर पद पथाच्या जवळ एक मोटरसायकल आणि एक स्कूटर पडलेली होती आणि एक तरुण मुलगा आणि एक वृद्धपणाकडे झुकलेले ग्रृहस्थ रस्त्यावर बसलेले होते . दोघेही अपघातग्रस्त होते.
मानवी मनाच्या आणि वागणुकीच्या गमतीदार तऱ्हा इथे बघायला मिळायला सुरुवात झाली. तिथे माझ्यासारखेच बरेच लोक बघता बघता जमा झाले आणि गंमत म्हणजे सर्वजण त्या वृद्ध माणसाची आस्थेने आपुलकीने चौकशी करु लागले.
"काका पाणी हवं का?"
" तुम्हाला शुगर आहे का?"
" तुमचं घर कुठे आहे?"
"फोन नंबर आहे का कुणाचा?"
काका शॉक मध्ये होते आणि त्यामुळे कुठल्याच प्रश्नाला पटकन उत्तर देऊ शकत नव्हते.
थोड्यावेळाने दोन-तीन जणांच्या मदतीने त्यांना मी उभा राहायाला सांगितले. ते उभे राहू शकत होते, सामान्य माणसाप्रमाणे सर्व हालचाली करू शकत होते; तेव्हा माझ्या लक्षात आले की ते फक्त धक्क्याच्या मनस्थितीत आहेत.. तशी फारशी काही इजा त्याना झालेली नाही.
मग आम्ही थोडेसे निर्धास्त झालो. त्यांना बिल्डिंग मधल्या बाकावर आणून बसवलं. त्यांच्या घरी फोन वगैरे लावण्याचा काम सगळ्यांनी सुरू केलं.
आणि मला एकदम आठवण झाली कि ज्याची धडक झालेली होती तो एक मुलगा पण जायबंदी झालेला होता.
मला माझीच कमाल वाटली की तो मुलगा तरुण आहे हे बघितल्यावर त्याला काही लागलंय का वगैरे याकडे कोणाचेही लक्ष सुद्धा गेलं नाही आणि तो "तरुण मुलगा" आहे म्हटल्यावर चूक त्याचीच असणार हे आपोआप मनाने ठरवून टाकलं होतं , मी एकट्यानेच नाही , तर तिथे जमलेल्या जवळजवळ सर्वांच्या मनात हाच भाव होता.
मी पटकन् त्याच्याशी बोलायला लागलो.
" अरे मित्रा, तुला ककुठे लागलय का.. "
तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला खरोखरच जास्ती मार बसला होता. खांदा जायबंदी झाला होता.. हात सुजला होता ! पण काय गंमत आहे तो केवळ तरुण असल्यामुळे त्याच्याकडे फारसे कोणी सिरीयसली बघत नव्हतं. आम्ही त्याला म्हटलं ,"अरे तू कोणाला बोलवलेस का? घरी आई वडील कोणी आहेत का?
"त्यानी पटकन उत्तर दिलं कि "हो मी माझ्या मित्राला बोलावलं आहे !"
तेव्हा माझ्या लक्षात आले की हा बहुतेक पुण्या बाहेरून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पुण्यात राहिलेला तरुण आहे. गंमत बघा की त्याला तुझ्या भावाला आई-वडिलांवर बोलवायचं का म्हणल्यावर तो पटकन "नको नको.. मी मित्राला बोलवलय!" असं उत्तर देत होता.
तेव्हा माझ्या मनात सगळी विचारशृंखला स्पष्ट दिसू लागली.
हे मुलांनी हट्टाने मोटरसायकल घेतलेली दिसते नवीन .. जी त्याला झेपतही नाहीये. कदाचित घरी ही मोटरसायकल घेण्याबाबत मतभेदही झाले असावेत; त्यामुळे घरी "हे अपघात" वगैरे कळू नये अशी त्याची मनोमन इच्छा दिसत होती!
जमलेल्या लोकांमधील काहीजण आपापसात बोलत होते..
" आजकालची ही तरूण मुलं .. किती रॅश गाडी चालवतात ! रस्त्यावरच्या इतर लोकांची त्यांना अजिबात परवा नाही. कसेही ओव्हरटेक करतात.. कशाचं भान नाही त्यांना! आणि आई-वडिलांच्या पैशांवर ही अशी मस्ती करत असतात !"
हे सारे ऐकून तो मुलगा पटकन म्हणाला "नाही हो! हे काका इंडिकेटर न दाखवता अचानक समोर येऊन वळायला लागले आणि माझ्या मोटरसायकलला समोर आले.. त्यांना बघून ब्रेक लावेपर्यंतही मला वेळ मिळाला नाही हो! माझी काही चूक नाहीये यात ."
मनुष्य किती जजमेंटल असतो.
सत्य काय आहे हे जाणून न घेताच पूर्वग्रह दूषित मनातून ठरवून टाकतो कोण दोषी असणार ते !
मग मी आणि जमलेले सारेच थोडेसे निर्धास्त झाले. त्याला चालता बोलता येत होतं.. त्याने मित्राला बोलवले होते आणि तो दोन मिनिटात तिथे पोहोचत आहे हे पाहून मी तिथून काढता पाय घेतला.
एकच प्रसंग.
पण सर्वांच्या पहिल्या घाईघाईतल्या प्रतिक्रिया किती जजमेंटल होत्या! एकाच प्रसंगाकडे , जे दिसतं त्याने प्रभावित होऊन माणूस कसा पवित्रा घेत असतो . प्रत्यक्ष सत्यस्थितीचा उलगडा होईपर्यंत लोकांचे दृष्टिकोन कसे उघड होतात .. याची मला गंमत वाटली.
डोळ्याला काय दिसत आहे त्याच्यावर थेट विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे चहू बाजूने पाहायला शिकणे कधी आवश्यक आहे आणि कुणा एकाची बाजू सत्य न मानता दुसरी बाजू ही स्वच्छ मनानेपाहणे जीवनात किती महत्त्वाचे असते याची खूण गाठ मनाशी बांधून मी माझ्या कामाला लागलो.