युगे अठ्ठावीस

Submitted by mudgal-yashawant on 16 November, 2026 - 15:03

'युगे अठ्ठावीस'...
लहानपणापासून ऐकत आलोय.
म्हटलं जरा बघू तरी काय विशेष असतं या खडासनात?
पाय जुळविले.
पावले सरळ.
पावलात अंतर अजिबात नाही.
ताठ उभा राहिलो.
हात कमरेवर विठुस्टाईल.
नजर समोर...
ती स्थिर राहायला तयार नाही.
मग डोळे मिटले.
आठवलं...
तो विठू आत्मस्थ नजर लावलेला आहे...
मीही मिटल्या डोळ्यातील नजर आत खेचली...
ती ओढाळ वासरासारखी स्वैर ...
मिटल्या डोळ्यामागे!
तुम्हाला सांगतो...
एक मिनीटही तोल स्थिर राहात नव्हता...
भिरभिरती अंतरनजर.
विचार मुक्त, पिसाट!
आणि हा बाबा विठू...
मिनिटभर नव्हे,
युगे अठ्ठावीस असा अवघडल्या स्थितीत!
आणि पहा...
पुन्हा याच्या मुखावर 'मोनालीशी' स्मित!
गवसेल आम्हाला तो आत्मानंद?
विठ्ठल विठ्ठल

Group content visibility: 
Use group defaults

छान