खूप लांब झाल्याने स्वतंत्र धागा काढला. संयुक्त धागा आहे, कुणालाही काहीही लिहावं वाटलं तर आवर्जून लिहा. फक्त चित्रपटच नाही तर रामायणाच्या अनुषंगाने असलेली सगळी माहिती, चर्चा, गंमत व चित्रपटावरील अभिप्राय इथे चालतीलच. अवांतराचे सुद्धा स्वागत आहे. गडबडीत पटकन लिहून टाकलेय. सांभाळून घ्या ! स्पॉयलर्स आहेत थोडेफार.
---------
रामायण - रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), रवी दुबे ( लक्ष्मण), अरूण गोविल ( दशरथ), आदिनाथ कोठारे (भरत), लारा दत्ता ( कैकयी), रकुल प्रीत (शूर्पनखा) , विवेक ओबेरॉय (विद्युतजीव- माझ्या माहितीप्रमाणे विद्युतजिव्हा होते शूर्पनखेच्या नवऱ्याचं नाव) , अजिंक्य देव (विश्वामित्र) , शीबा चड्ढा (मंथरा), सौरभ सचदेव ( मारीच) , काजल अगरवाल (मंदोदरी), फैजल मलिक (कुंभकर्ण). हा पंचायत मधला प्रल्हाद. शोभना पिल्लै (केकसी)
मला "रामायण" आवडला. कुठेही कंटाळवाणा होत नाही. मुलांना सुद्धा आवडला. खूप मजा आली आणि व्हिएफएक्स उत्तम आहेत म्हंटले. रिअल डी थ्री डी मधे पाहिला. सगळ्यात कमाल म्हणजे तगडे मार्केटिंग - आमच्या घराजवळच असणाऱ्या एएमसी मधे आला. तेथे कधीही कुठलाही भारतीय चित्रपट येत नाही कारण आमच्याकडे अजिबात डायव्हर्सिटी नाही. त्यामुळे फारच बरं वाटलं. त्यामुळे तर आवर्जून लगेच गेलो. तीन तास दहा मिनिटांचा रनटाईम आहे. चार तासांचाच कार्यक्रम झाला.
कथा तर सर्वांनाच माहीत असणारीच आहे पण तरीही काही गोष्टी उकरून नवीन जोडल्या आहेत. सुरवात एरवी श्रावण बाळाच्या गोष्टी पासून होते. तो शाप मग दशरथाला आशा आणि पुत्रकामेष्टी यज्ञ आणि चार मुलं. पण यांनी मुद्दाम ते सगळं टाळलं आहे व रावणाचे पूर्वायुष्य दाखवलं आहे. जे मला माहिती होते पण त्याला एक साऊथ इंडियन छाप दिला आहे. त्यात बऱ्याच चुका आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तुलना केली तर काही गोष्टी उगाच वाढवल्या आहेत किंवा फक्त फिल्मी करण्यासाठी वेगळ्या दिशेने नेल्या आहेत. सुरवातीला रावणाला खूप, खूप फुटेज आहे. खरंतर रावणावर एक तास झाल्यावर मग राम येतो म्हंटले तरी चालेल. मलाही रावणायन वाटलं बऱ्यापैकी. थोडा कंटाळा आला तेव्हा आणि रामाची "पल पल है भारी वो विपदा है" आयी करत वाट पाहू लागले. थ्रीडी मुळे आणि राक्षस पाताळात राहात असल्याने थोडा अंधार वाटत होता पडद्यावर. किंवा पहाटेच्या अंधुक प्रकाशात केलेलं चित्रिकरण कसं दिसेल तसं दिसत होते. पण हे थ्री डी लव्हर्सना आवडतही असेल. मी ओल्ड स्कुल आहे एकदम, आहे त्याच खुर्चीवर आपलं सरळ सरळ दाखवा काही उडायबिडायचा- अंगात येऊन घुसायचा अनुभव नको. जास्त स्टिम्युलेशन सोसवत नाही गटात. तुम्ही जर चांगली कलाकृती केली असेल तर आम्हाला उडवायची, घुसवायची गरज नाही, जशी आहे तशी अनुभूतीही पोचू शकते. शिवाय देहबोली - आता हे थ्री डी मुळे की काय मला बऱ्यापैकी फ्रोजन वाटली काही जणांची. शेखर सुमनचे जुने मुव्हर्स ॲंड शेकर्समधे चेहरा लालूचा लावून ओठ तोच हलवून बोलायचा त्याची आठवण झाली. पण सगळ्यांची नाही अर्थात. दशरथ, दोन राण्या आणि ऋषी मुनी. बेसिकली ज्येना.
ज्येना हलत नव्हते पण बोलत होते. घरी ते दारी!
आधीचे रावणायन व त्यावर सौदिंडियन छाप - यासाठी रावणमाता केकसी हिने असुरांच्या वतीने युद्धात भाग घेतला होता व इंद्राला विष्णूचे वरदान असल्याने तो विजेता झाला व असुरांचा पराभव झाला. यातली एक नॅक - रावण राक्षस होता का असुर होता? दोन्ही वेगवेगळे आहेत. असुर हे सुरांचेच चुलत भाऊ व राक्षस पृथ्वीवर राहणारे होते. ह्याची मलाही खात्री नाही. पण दितीचे दैत्य, दनुचे दानव, अदितीचा आदित्य, विनितेचे वैनतेय गरूड. यात नेहमी फक्त सुरा पिणारे सुर ( देवता) व न पिणारे ते असुर असेही वाचले आहे. ज्यात राक्षस कुठेच नाहीत. कारण ते पृथ्वीवासी होते नेहमीच. त्यामुळे मला ह्या युद्धाचा प्रपंच नीट कळाला नाही. त्यात केकसी राक्षस वंशाची व रावणाचे वडील पुलस्त्य वंशी ऋषी. त्यामुळे रावण अर्धा राक्षस - अर्धा ब्राह्मण. इथे त्याच्या वडिलांचा लवलेशही दाखवला नाही पण सतत जाणवं घातलेलं मात्र दाखवलं आहे. पण एवढं आवर्जून म्हंटले आहे की बिभिषण पित्यावर गेला आहे, कुंभकर्ण आणि शुर्पनखा आजोळवर आणि रावण मात्र "बेस्ट ऑफ बोद वर्ल्ड्स" असल्याने बळ आणि बुद्धी दोन्ही त्याच्या ठायी जन्मजात आहे.
अगदी सुरुवातीला केकसी आणि असुर गट यांचा दणदणीत पराभव होऊन इंद्र जिंकून घेतो आणि लंका कुबेराची असते तेथे पाताळात या पिडीत राक्षसांना राहावे लागते व तेथे त्यांची अन्नान दशा होते. मग केकसी रावणाला उचकावते, तू यांना याच्या बाहेर काढ. तू जर हे तुणतुणं वाजवत बसलास तर आमचं काय होणार. (वीणा)
येथे पूर्ण साऊथ इंडियन छापाची दुर्दशा व तारणहाराची वाट पाहणारी प्रजा. वर लंका कुबेराची म्हणून देव असुरांवर वाटेल तसा अन्याय करत आहेत असे दाखवण्यासाठी खूप वेळ घालवला आहे. मग रावण तपश्चर्या करायला निघून जातो व सगळे लूपहोल ताडून जवळपास अमरत्वाचे वरदान मागतो. परत आल्यावर त्याचा रजनीकांत झालेला असतो तो दे दणादण- दे दणादण देवांना एकटाच मारायला सुरुवात करतो. देवांचे ढीगच्या ढीग! एवढे तर एखाद्याच्या देवघरातही नसतील. चक्क साऊथ इंडियन स्टाईलने मां का कर्ज+ बदला= देवांचे ढीग. पण कुबेर पळून जातो कारण देव तर मरत नाहीत. इथे लूपहोल - लंका पार्वतीसाठी महादेवाने घडवली, नंतर कुबेराने मागितली तर भोळ्या सांबाने त्याला दिली आणि कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता. ह्याचा उल्लेखच नाही. रावणाने लंका त्याला मागितली व त्याने देऊन टाकली होती. त्यामुळे तर दागिने न ल्यालेल्या स्त्रियांसाठी "लंकेची पार्वती" ही म्हण आहे. कारण मुळात सोन्याची लंका पार्वतीची होती पण तिला मिळालीच नाही. हे "रजनीकांतीकरण" विनाकारण होते. कुठल्यातरी व्हर्जन मधे हे होते असे म्हणून काहीही खोडून काढता येते, कसेही वाढवता येते हाच पौराणिक कथांचा फायदा आहे.
पण हिरो लार्जर दॅन लाईफ दाखवायला आधी व्हिलनला त्याहीपेक्षा खौफनाक दाखवायची नेहमीची क्लृप्ती रामायणासाठी अनावश्यक होती. राम लोकांच्या जनमानसात आद्यनायक आहे, मर्यादापुरुषोत्तम आहे. त्यामुळे रावणही आपोआपच आद्यखलनायक होताच. असो. क्रिएटिव्ह लिबर्टी. ती बोअरिंग नाही मात्र. त्यांनी ती रंजक- वेधकच केली आहे.
जटायू लहानपणापासून रामाच्या आयुष्याचा भाग होता हे एक नवीन. तो नेहमीच अयोध्येला हॅंग आऊट करताना दिसला. त्याचं रामावर जातीने लक्ष होतं. एवढंच काय तो चोचीतून घंटा सोडायचा, त्या राम डोळ्यांवर पट्टी बांधून लक्षवेधी बाणाने मारून टणत्कार घुमवायचा. ऐकावे ते नवलच! रावणाला फुटेज दिल्याने राम वसिष्ठांच्या आश्रमात जे शिकला ते फारच कमी दाखवून पुन्हा जटायूला "घंटा ट्यूटर" केले आहे.
हे सगळे बघायला चांगलेच वाटावं असे व्हिज्युअल्स ठायी ठायी आहेत फक्त मलाच आवर्जून लिहावं वाटलं. कैकयीच्या रोलमधे लारा दत्ता आवडली, मस्त काम केले आहे.अरुण गोविलही बरा वाटला, त्याला विशेष कामच नाही. हेही पथ्यावर पडले.
अजिंक्य देव विश्वामित्र म्हणून खूप मस्त सरप्राइज होतं आणि त्याचं कामही छान आहे आणि तो दिसलाही छान. सिक्स पॅक, उंचे पुरे मादक ऋषी पाहायची सवयच नव्हती. शीबा चड्ढा अगदी पर्फेक्ट मंथरा आहे. मला तिचं काम नेहमीच आवडतं. रादर मला सगळी कास्टिंग पर्फेक्ट वाटली. साई पल्लवी खटकली नाही , चालून गेली. इथे सीतेला तलवार चालवताना व अभ्यास करताना शिवाय शेतीचे प्रशिक्षण देताना दाखवलं आहे. आणि काही वेळा ती लढतानाही दाखवली आहे. पण एवढी शांत, विचारी असूनही सुवर्ममृगाचा एक मोहाचा क्षण आणि कैकयीचा एक दुस्वासाचा क्षण, त्यांना त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वागायला भाग पडतो. सौरभ सचदेव एकदम मारिचासारखाच छद्मी वाटतो, फार संवाद नाहीत तरीही लक्षात राहातो.
रावणाचे कमळासारखे फिरणारे पुष्पक, ग्रहताऱ्यांसाठी केलेली यंत्रणा फार वेगाने दाखवली आहे. शिवाय इंद्राचा एआय ऐरावत व गेंड्यांवरून असुरांनी केलेलं युद्ध जरा कैच्याकै वाटले. गेंड्यांना झूल पांघरली तरी त्याचा युद्धात वापर केला जात असेल?! एआय सिजिआय वापरता येते म्हणून उद्या डायनासोर घेतील पण झेपायला हवं.
खरदुषण सोबतच्या युद्धात कुत्री जी हाईना सारखी वाटतात ते पाहायला बरं वाटलं. सीता बुद्धिमान दाखवली आहे, ती लक्ष्मणाचा वास ह्या कुईनांना ( कुत्री+ हाईना) लक्षात राहू नये म्हणून जखम पाण्याने धुवून काढते. नंतर उपचार करते. तिचं बुद्धिमान असणं फार वरवरचंच दाखवलं आहे पण "नहीं मामुसे नकटा मामु अच्छा!"
रणबीर कपूर मला नेहमीच आवडतो, यातही आवडला आहे. यापेक्षा जास्त चांगले कोणी दिसलेही असते आणि वयही जास्त आहे पण त्याचा वावर आणि काम दोन्ही आवडले. त्याचा आवाज आणि देहबोली अजिबात चंचल न वाटता कुठेतरी सतत स्थितप्रज्ञ आणि विचारी वाटते. एखादं माणूस एकाच वेळी व्हल्नरेबल आणि कणखर दोन्ही असणं - सुपरपावर नसूनही ईश्वर होत जाणं हे रामाचं मर्यादापुरुषोत्तम असणं होय. तो जास्तीत जास्त माणूसच वाटायला हवा. तसा हा वाटला आहे. त्याचे संवादही चांगले आहेत. त्याचे व सीतेचे मोजकेच संवाद आहेत , तरीही कंफर्टेबल वाटतात. लक्ष्मणाचे काम चांगले आहे, विनोदी केले आहे. पण फक्त ताण हलका करण्याइतपत विनोदी वाटेल इतकेच. गोड चेहरा आहे त्याचाही.
विवाहाच्या वेळी खूप सुंदर वाटतं पाहायला पण दागदागिने मला आवडले नाहीत. काही वेगळेपणा नाही. अयोध्येचे, मिथिलेचे आणि लंकेचे लोक सारखेच दागिने घालतात असं वाटलं. जे शक्य नाही. कपडेपट वेगळा आहे पण दागदागिन्यांत वैविध्य दिसलं नाही. मला रणबीरची धनुर्विद्या/ ती देहबोली आवडली. बाण मारणारे काही शॉट्स जमून आलेत. आर्चरीचे ट्रेनिंग घेतलं असावं त्याने.
चित्रिकरण छान आहे. काही ठिकाणी अतिशय सुंदर दृश्य आहेत. काही ठिकाणी मात्र खोटं वाटतं, जसं की ताडका, खर, दुषण, कुंभकर्ण हे सिजिआय असल्याने उगाच अवाढव्य आणि लिबलिबीत शरीराचे मांसाचे गोळे वाटतात. हॅग्रीडचे मावस भाऊ केल्यासारखे वाटले पण चेहरा तरी जिवंत द्यायचा असता. ट्रोल टाईप चेहरे आहेत.
संगीत - पार्श्वभूमीवर जे येते ते सुरेख आहे. कुठे घंटेची किणकिण, नदीचा प्रवाह, मंत्रांचे ध्वनी, शांतेतेचे नाद, पक्ष्यांचा किलबिलाट, रथांची चाकं , टणत्कार वगैरे उत्तम. मला "मंगल रंग" गाणं खूप आवडलं. त्यात काही तरी"अवधी" आहे. अजिबात कव्वाली सारखे वाटले नाही. जसं असायला हवं तसंच आहे. गुणगुणत राहावं असं आहे.
रावणाचे काम चांगले आहेच आणि अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. खूप छटा आहेत. स्वतःच्या बहिणीवरच्या प्रेमापासून तिच्या नवऱ्याला मारण्यापर्यंत. बऱ्याचदा विधिनिषेध राहात नाही, दोन मनांमधे संवाद होऊन अहंकारी मन तेवढं जिंकते. दशबुद्धी दशानन रावण कसा दहापट बुद्धी असलेला होता वगैरे विषादाच्या रूपाने येऊन जातं. पण अजून "डेफ्थ" येऊ शकली असती याला. VFX खूप कमी ठिकाणी खटकले असं वाटलं. त्यापैकी इथे अगदी योग्य वापर झाला आहे. दहा तोंडे, दहा शरीरं आणि दहा विचार. मग त्यात सगळ्याच भावना येऊन अहंकाराचाच विजय होतो. कल्पक वाटलं.
मी बऱ्याच त्रुटी लिहिल्या आहेत पण चित्रपट मला आवडला आहे. रंजक आणि एंगेजिंग आहे. कामं चांगली आहेत. काही गोष्टी अतिशय जलद वाटतात. उगाच फापटपसारा नाही पण काही गोष्टींवर खूप वेळ घालवून काही तरी नवं द्यायचा प्रयत्न केला आहे. मी एन्जॉय केला सिनेमा. राम-रावण हा विषय कोळून प्यायलेला आहे त्यामुळे खरेतर एंगेजिंग करणं चॅलेंजिंग असेलही आणि आदिपुरूषचा धसका घेतलेले प्रेक्षकही आहेत. पण तरीही मजा आणतो सिनेमा. रामायण - महाभारत म्हणजे आपली पाळेमुळे - ज्यावर आपली नीतीमुल्ये सुद्धा कुठेतरी पोसलेली आहेत त्यामुळे यावेळी तेच महाकाव्य कशा नव्या स्वरूपात आलं असेल हे पाहण्याची उत्सुकता होती आणि मजाही आली. मी एक "प्लेटो" आलेला प्रेक्षक आहे, मी सगळ्याला समान दृष्टीने पाहायचा निदान प्रयत्न करते. मला होमरचे ओडिसी आणि वाल्मिकीचे रामायण सगळेच कुठंतरी मेटॉफॉरिकल काव्य होते हे माहीत आहे आणि प्रत्येक जण अनादी काळापासून आपापल्या परीने त्या काव्याचे वेगवेगळे अनोखे अर्थ लावत आहे. कथा तशी सरळसोटच असली तरी अर्थ अनेक निघू शकणे हीच कुठल्याही काव्यामागची गंमत असते. खूप अपेक्षा न ठेवता ती गंमत जाणून घ्यायला पाहायचा असेल तर नक्की पाहा.
-अस्मिता.
मला तर तो रावणाचा सुरुवातीचा
मला तर तो रावणाचा सुरुवातीचा भाग खूप आवडला. मजा आली बघायला. आणि यश ने भन्नाट काम केलेलं आहे.
बाकी चिकवावर दोन प्रतिसाद लिहिले आहेत. ते परत इथे लिहित नाही.
मस्त! मला इंटरेस्ट आहेच
मस्त! मला इंटरेस्ट आहेच बघायला! या वर्णनावरून आणि इतरांकडून जे ऐकले आहे त्यावरून हा भाग सीताहरणापर्यंतच आहे असे दिसते. हनुमान आलेला दिसत नाही अजून.
मला ते रजनीकांतीकरण होण्याचीच भीती वाटत होती ट्रेलरवरून, किंवा केजीएफीकरण. आता मुख्य युद्धाचे होऊ नये!
जटायू मरेपर्यंत आहे हे रामायण
हो, जटायू मरेपर्यंत आहे हे रामायण पार्ट १. दुसरा युद्धाचा भाग कधी येणार कल्पना नाही.
तुझ्या लेखनातून तुला रामायण
तुझ्या लेखनातून तुला रामायण पिक्चर vs रामायण ऐकलेल्या आणि वाचलेल्या वेगवेगळ्या कथा यांची गल्लत / confusion होते आहे असे वाटते.
रामायण पिक्चर हा मी एक ऍक्शन पिक्चर आहे असे समजून बघायला गेलो. त्यातून फार काही तात्विक किंवा आध्यात्मिक असणे मला अजिबात अपेक्षित नव्हते. कदाचित हे महत्वाचे कारण असेल की मी तो खूप एंजॉय केला.
नाही, नाही. आपण हॅरी पॉटर
नाही, नाही.
आपण हॅरी पॉटर पुस्तक जरी वाचलं तरी त्याची चित्रपटाशी तुलना करतोच ना? कशावर फोकस होता, काय जास्त आवडले, काय वेगळे वाटले तसं आहे हे. त्यात हे रामायण आहे, त्यामुळे आपण ऐकलेल्या -वाचलेल्या वाल्मिकी रामायणाशी तुलना होणं अपरिहार्य आहे. रिगार्डलेस एन्जॉयही करू शकतो हेही, पण लिहिताना नोंदवावं वाटतं एवढंच. तात्विक किंवा आध्यात्मिक तर विचारही केला नाही, स्ट्रेट फॉरवर्डपणे वाटलं ते नोंदवलं. कुणाला तरी माझ्यापेक्षा जास्त/ कमी आवडणार किंवा अजिबातच आवडणार नाही हे तर कुठल्याही चित्रपटाबाबत होऊ शकते. 
शेखर सुमनचे जुने मुव्हर्स ॲंड
शेखर सुमनचे जुने मुव्हर्स ॲंड शेकर्समधे चेहरा लालूचा लावून ओठ तोच हलवून बोलायचा त्याची आठवण झाली. >
मादक ऋषी , कुईना >>
छान लिहिला आहेस. दृश्ये आणि रणबीर ह्या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी तुला खटकल्या आहेत. तरी तू एकंदरीत पिक्चर आवडला म्हणते आहेस. म्हणजे ह्या दोन फारच चांगल्या असाव्यात.
Rajinikanth
Rajinikanth
रजनिकांत नाही, राजीनिकांथ आहे.
इतिहास, पुराणं आणि श्रद्धा हा
.
तुम्ही जशी रामाची वाट पाहत
तुम्ही जशी रामाची वाट पाहत होतात तसा मी या लेखात जटायूची वाट पाहत होतो पण तुम्ही २-४ ओळीत त्याला आटपलात. मला इंस्टा उघडल्यावर जटायुच दिसतोय. जटायू किती शक्तिशाली होता बघा, जटायू त्याच्या प्राइम मध्ये कसा असेल याचा विचार करा, जटायूने रावणाचं डोकं उडवलं होतं त्या सीनवर रावण अमर होता म्हणून वाचला नाहीतर इथेच रावणाचा कार्यक्रम फिक्स होता असे हे असे रील्स दिसताहेत. रामायण रावणायनपेक्षा मला हा जटायूयण पिक्चरच वाटतोय.
मस्त परीक्षण! मला आज बघायचा
मस्त परीक्षण! मला आज बघायचा असला तरी पूर्ण वाचले. कारण रामायणात ते काय स्पॉयलर असणार
उत्सुकता वाढली आता चित्रपट बघायची...
बोकलत
बोकलत
माझ्यावर "मंगल रंग" गाण्याने गारूड केले आहे, तेच ऐकतेय सतत. काही तरी शांतवणारे आहे या गाण्यात. रामासारखेच. नंतर मला "डी" विरहित आपापल्या टिव्हीवर आरामात बघायचा आहे. डी- टू डी, रिअल डी, थ्री डी. शांतपणे जास्त एंजॉय करेन असे वाटतेय.
ऋ , तुला आवडेल.
“ हनुमान आलेला दिसत नाही अजून
“ हनुमान आलेला दिसत नाही अजून” - एंड क्रेडिट्स चुकवू नकोस. जी लोकं एंड क्रेडिट्स (हनुमान चालिसा) सुरू झाल्यावर निघाले, त्यांना “ हनुमान आलेला दिसत नाही अजून” असंच वाटतंय

>>>"मस्त परीक्षण! मला आज
>>>"मस्त परीक्षण! मला आज बघायचा असला तरी पूर्ण वाचले. कारण रामायणात ते काय स्पॉयलर असणार">>>
हा हा हा,,, हेच म्हणतो... मी पण आज बघणार आहे, तरी परीक्षण पूर्ण वाचले
तिनही मुख्य पात्रे साकरणारे कलाकार (रणबिर कपुर, साई पल्लवी, यश) बिल्कुल आवडत नसले तरी रकुल प्रित, काजल अगरवाल, लारा दत्ता ह्या तिघी लै आवडत्या असल्याने त्यांच्यासाठी पहाणार आहे.
चित्रपट कसा वाटला ते रात्री इथेच लिहितो....
रामायणात ते काय स्पॉयलर असणार
रामायणात ते काय स्पॉयलर असणार >> प्रक्षिप्त भाग
मस्त होता!
मस्त होता!
आलो बघून..
फार त्रुटी शोधत बसू नका. त्या जगातल्या प्रत्येक चित्रपटात निघतील. मनोरंजन पुरेपूर आहे. तीन सव्वातीन तासांनी सुद्धा असेच वाटले की दुसरा भाग असता तर आताच लगे हात ब्रिन्जवॉच करत बघून घेतला असता.
नंतर मूड आला वेळ मिळाला तर सविस्तर लिहीन
आणि हो, मुलाना जरूर दाखवा.
आवडेल त्यांना
रामायणात ते काय स्पॉयलर असणार
रामायणात ते काय स्पॉयलर असणार >> प्रक्षिप्त भाग
हपा :

प्रक्षिप्त भाग
प्रक्षिप्त भाग
मुलांना दाखवण्यासारखा आहे का?
मुलांना दाखवण्यासारखा आहे का?
ज्याचं त्याचं रामायण आणि
ज्याचं त्याचं रामायण आणि ज्याचा त्याचा प्रक्षिप्त भाग.
मी ट्रेलर धाग्यावर यश इ.च्या मुलाखतीची लिंक दिली होती. त्यात यश म्हणाला की रामायणाच्या राज्यागणिक आणि भाषेगणिक आवृत्त्या आहेत. आणि हे सगळे दृष्टिकोण सामावून घेणं हे आपल्या संस्कृतीचं सौंदर्य आहे. सीतेच्या नजरेतून रामायण, रावणाच्या नजरेतून इ.
तिथेच मी Three hundred Ramayanas या निबंधाचा उल्लेख केला होता.
यांनी रामायणाचा शिनुमा कसा केला , कोणाचा अभिनय कसा आहे, कपडेपट . स्पेशल इफेक्ट्स इ. पाहण्यासाठी मी थेटरात जाऊन हा चित्रपट पाहणार नाही. टीव्ही ओटीटीवर आला तर तुकड्या तुकड्यांत पाहीन कदाचित.
पण अर्थातच चर्चेत रस आहे.
हपा
हपा
तिनही मुख्य पात्रे साकरणारे
तिनही मुख्य पात्रे साकरणारे कलाकार (रणबिर कपुर, साई पल्लवी, यश) बिल्कुल आवडत नसले तरी रकुल प्रित, काजल अगरवाल, लारा दत्ता >>> मला मुख्य आणी उपमुख्य कलाकार दोन्हि आवडत नाहीत (यशच काम बघितलेले नाही )त्यामुळे थियेटरला जावुन बघणार नाही पण नेटफ्लिक्स वर आल्यावर बघु.. अस्मिता, धनीचा रिव्ह्यु वाचुन निदान बघणेबल असावा अस वाटतय.
"लंकेची पार्वती "तुम्ही
"लंकेची पार्वती "तुम्ही लिहिलेले फारच वेगळे आहे,
लज्जागौरी पुस्तकात त्या वाक्प्रचाराचा उगम दिला आहे.
3 साडेतीन तासाच्या चित्रपटात,
3 साडेतीन तासाच्या चित्रपटात, रावणाच्या लहानपणापासून सगळे कसे काय फिट केले असेल अशी उत्सुकता आहे.
लहानपणापासून नाही, टीनेजर
लहानपणापासून नाही, टीनेजर असल्यापासून आहे. नंतर तपःश्चर्या करायला जातो व रजनीकांत होऊन येतो. लंकेच्या दारावर लाथ घालून ते उघडतो, देवांना मारून त्यांची दहीहंडी रचतो. ते पाहून कुबेर पळून जातो. मी लंकेची पार्वती हे असेच वाचलेलं आहे, पण आठवत नाही कुठे. तसा सिनेमात त्याचा काहीच उल्लेख नाही.
रावणाला फुटेज दिल्याने भरताला मिनिमम आणि शत्रुघ्नाला एकही शब्दाचा संवाद नाही. सीतेच्या बहिणी तर दिसतही नाहीत. ऊर्मिलेचा निरोपही घेत नाही लक्ष्मण. सुमित्रा, कौसल्या फारच कमी. निषाद राजाची गोष्ट संपूर्ण गायब केली आहे. ज्याने नावेत बसवून दुसऱ्या तिरावर सोडले तो भिल्ल राजा.
मंदोदरी - काजल अगरवाल आणि रकुल प्रीत शूर्पनखा अफाट सुंदर दिसल्या आहेत.
@भरत - यशच्या मुलाखती बाबत - हे फक्त साऊथच्या प्रेक्षकांच्या नजरेतून, मार्केटिंगच्या नजरेतून वगैरे आहे. त्या कोलांट्या आहेत.
rogerebert.com वर Simon
rogerebert.com वर Simon Abrams ह्या चे परीक्षण वाचले. त्याबे सिनेमाच्या पार चिंधड्या उडवल्या आहेत. शेवटी रडत खडत चार पैकी एक स्टार दिला आडे.
...filmmaking is either poorly showcased or negligibly choreographed, leaving one to wonder how something so expensive can look so drab.
अजूनही बरेच काही आहे.
प्रॉब्लेम असा आहे की आपण श्री प्रभू रामचंद्र ह्या व्यक्तीरेखे बरोबर लिबर्टी घेऊ शकत नाही म्हणून सिनेमा रावण सेन्ट्रिक झाला असावा.
गुड पॉईंट केकू!
गुड पॉईंट केकू! आमचे एक ओळखीचे साऊथचे आहेत, ते म्हंटले की आमच्याकडे हे असेच बघायला आवडते. रावणाचे रजनीकांतीकरण. रामाचे करता आले नसते.
शूर्पनखेचे नाक पूर्ण कापले नाही, एक व्रण आहे फक्त. माझी मुलगी - पेपर कट तर झाला आहे, बरं होईल. लगेच युद्ध कशाला म्हणत होती. नाक कापलं असतं तरीही ऱ्हायनोप्लास्टी सर्रास होतेच की. जेन झी. अपमान वगैरे कळतं पण सार्काझम. शूर्पनखा सुद्धा मायावी आहे, तिला पक्ष्याचे रूप धारण करता येते. फक्त मारीचच मायावी नाही.
परशुराम रणबीरच आहे. म्हणजे रणबीर आणि सैफला मुलगा झाला आणि नाक सैफचे व बाकी दुसऱ्या बाबांचे घेतले तर कसा दिसेल असा वर्णसंकर. आवाज घोगरा, अजून उंच आणि शेलाटी. तसे काही तरी केले आहे. अवतार आणि डबल रोल! काहीही लिहून ठेवले आहे हे.
बरेच रिव्ह्यू मध्ये
बरेच रिव्ह्यू मध्ये बॅकग्राऊंड म्युजिकला मायनस पॉइंट दिले आहेत. मला वाटलेले छावा चित्रपटासारखे काही करून ठेवले आहे की काय.. पण चित्रपट संपल्यावर जाणवले की मस्त तर होती म्युजिक. कुठेच काहीच ऑड वाटले नाही.
स्पेशल इफेक्ट सुद्धा मस्त होते सारे. नावे ठेवणारे लोकांचे बेंचमार्क कुठले हॉलिवूड मूवी असतात कल्पना नाही. मला तर आवडले सगळे ऍक्शन दृश्ये.
गेंडा, ऐरावत, जटायू, मोठमोठे राक्षस, उंचच उंच झाडे, रावणाचे हेलिकॉप्टर, धुळीचे वादळ सगळे भारी जमले होते..
बेंचमार्क हॉलिवूड म्हणायला
बेंचमार्क हॉलिवूड म्हणायला वाव नाही आता. यांनी बरेच लोक तिकडूनच आणले आहेत. यांनाही भारताबाहेर विकायचा होताच सिनेमा. हजारो कोटींचे बजेट आहे. त्यासाठीच यांनी स्वतः हॉलिवूडची टीम आणि रिसोर्सेस वापरले आहेत. मेकिंग आणि प्रमोशन्स पाहिले तर कनेक्शन लक्षात येईल. त्यांनाच सेट करायचा होता हॉलिवूडचा बेंचमार्क!
आवडलं ते तर छानच .
परीक्षण छान लिहिलंय अस्मिता..
परीक्षण छान लिहिलंय अस्मिता..!
मी पाहिला आज रामायण... चित्रपट उत्तम बनवला आहे. आवडला चित्रपट... रणबीर आणि साई पल्लवीला उगाचच ट्रोल केलं. दोघेही आवडले. साई पल्लवी सीता म्हणून शोभली आहे. नैसर्गिक वाटते एकदम..! राक्षसांसोबत युद्ध करणारी, वनवासात जाताना शोकाकुल जनतेला समजवणारी सीता मला खूप आवडली. सगळेच कलाकार चांगले आहेत. रावणाची भूमिका करणारा यश , शूर्पणखा करणारी रकुल भारी निवड आहे. अजिंक्य देव बाबत पूर्ण सहमत..!
अस्मिता, गेले काही वर्षात
अस्मिता, गेले काही वर्षात म्हणजे आफ्टर बाहुबली जे काही भव्यदिव्य भारतीय सिनेमे आलेले त्यातले बरेचसे मी थिएटर मध्ये पाहिले आहेत. बाहुबली बेंचमार्क लावता त्यातील बहुतेकांनी निराश केलेले. एकतर स्पेशल इफेक्ट गंडले असायचे किंवा ती भव्यता जमायची नाही. पण अखेर हा चित्रपट सुकून देणारा वाटला. आता पुढचा भाग लवकरात लवकर यावा.
Pages