बिंब

Submitted by अनन्त्_यात्री on 7 November, 2026 - 08:49

सगुण साकार
पाश मी तोडिले
तेव्हा आकळले
अमूर्तत्व

तोकडी त्रिमिती
आलो ओलांडून
सोबत सोडून
संचिताची

ज्ञाताचे कुंपण
भिडे अज्ञाताशी
तिथे अज्ञेयाशी
गळाभेट

व्याधविद्ध मृग
मावळतीपाशी
मिथक कथांशी
नाळ तोडे

चिद्‌घनवृष्टीत
चराचर चिंब
रोमरोमी बिंब
उगवले

Group content visibility: 
Use group defaults

वाह... Happy

जबरदस्त.
गहन आहे प्रत्येक कडवं. कितीतरी दिवसांनी साडेतीन चरणाच्या अभंग फॉरमॅट मधे एव्हढी बांधीव कविता पाहिली.

नवीन प्रतिसाद लिहा