दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
. . .
संपूर्ण जागतिक शांतता ही खरंच एक दुर्मिळ गोष्ट आहे. वैश्विक सामाजिक शांततेचा अधूनमधून भंग करणारी प्रमुख घटना म्हणजे युद्ध. मानवजातीचा इतिहास अनेक छोट्यामोठ्या युद्धांनी भरलेला असल्याने अर्थातच रक्तरंजित आहे. मानवी हाव, सत्तापिपासा, आत्यंतिक द्वेष, बदला अथवा सूड घेण्याची भावना अशा मूलप्रवृत्ती युद्धाच्या मुळाशी असतात. जगाच्या निरनिराळ्या प्रांतांत विभिन्न राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे युद्धे होतात. इतिहासात डोकावता सारांशरूपाने सांगायचे झाल्यास, युद्धाची मूलभूत कारणे तीन : जर, जेर आणि जमीन ! (सोने/धन, स्त्री आणि प्रदेश).
जगाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या राज्यव्यवस्था अनुभवल्या जसे की, राजेशाही, हुकूमशाही आणि आधुनिक जगात नांदणारी लोकशाही. राज्यव्यवस्थांमधील हे बदल व्यवस्थेच्या उत्क्रांतीचे लक्षण असले तरीही कुठल्याही व्यवस्थेत युद्धे मात्र सातत्याने होत राहिली आणि राहताना दिसतात. युद्ध म्हटले की हारजीत आलीच. दोघांपैकी बलाढ्य बाजूचा विजय, तर कमकुवत बाजूचा पराजय. ही झाली इतिहासाची कागदोपत्री नोंद. परंतु मानवतेच्या दृष्टीने युद्धाकडे पाहिल्यास हे स्पष्ट आहे की, दोघांपैकी जयपराजय जरी कोणाचाही झालेला असला तरी कुठल्याही युद्धात अखेर मानवताच पराभूत होत असते. युद्ध घडवणारी मंडळी बसलेली असतात सुरक्षित मनोऱ्यामध्ये, तर प्रत्यक्षात रणांगणावर धारातीर्थी पडतात ते निष्ठावान सैनिक. एका इतिहासकाराने म्हटल्यानुसार खरी युद्धे ही एका अर्थाने रणांगणावर खेळली जात नसून खलबतखान्यांमध्ये खेळली जातात.
अल्पकालीन युद्धे एकमेकांची लष्करी तळे उध्वस्त करण्यापर्यंत मर्यादित राहू शकतात परंतु दीर्घकालीन युद्धांमध्ये लढणाऱ्या दोन्ही बाजूंची अपरिमित सामाजिक हानी होते. शेकडो वर्षांच्या कष्टातून उभे राहिलेल्या अनेक पायाभूत व जीवनावश्यक सुविधा नष्ट केल्या जातात. अणुबॉम्बसारख्या अतिसंहारक शस्त्रामुळे तर किती हाहाकार उडू शकतो हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान सर्व जगाने पाहिलेले आहे. युद्धातून झालेली राष्ट्रीय संपत्तीची राखरांगोळी हा तर चिंतेचा विषय आहेच परंतु त्याहूनही गंभीर असलेली गोष्ट म्हणजे युद्धातली मनुष्यहानी. सैनिकांच्या दृष्टिकोनातून तर युद्ध हा अत्यंत संवेदनशील विषय असतो. एका बाजूस असीम देशनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या प्राणाची क्षणभंगुरता या दोन्हींना सामोरे जात सैनिक प्राणपणाने लढतात आणि त्यातले काही देशासाठी हुतात्मा होतात. युद्धादरम्यान सैनिकांइतकेच त्यांचे कुटुंबीय देखील प्रचंड तणावाखाली असतात. लढाईवर गेलेला आपला माणूस सहीसलामत परत येणार की नाही या चिंतेने ते कमालीचे अस्वस्थ असतात. युद्धकाळात सैनिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून कुठलाही संदेश येऊन धडकला की त्यांचे धाबे अक्षरशः दणाणते. संदेश आला म्हणजेच आता नको ती वाईट बातमी आपल्याला ऐकावी लागणार अशी धास्ती त्यांच्या मनात असते.
संदेशवहनाची सध्याची वेगवान साधने उपलब्ध होण्यापूर्वीच्या काळात जरा डोकावून पाहू. त्या काळी तातडीच्या संदेशासाठी देशभरात कुठेही पोचू शकेल असे साधन होते ते म्हणजे तार अर्थात टेलिग्राम. अनेक सैनिक देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यांमधूनही आलेले असतात. युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकाची बातमी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवण्याचे तार हे त्या काळातील महत्त्वाचे साधन होते. अशा एखाद्या कुटुंबाच्या दारात पोस्टमन तार घेऊन उभा असलेला दिसला रे दिसला की कुटुंबीयांच्या काळजात अक्षरशः चर्र व्हायचे. तार आली म्हणजे आता खरोखर ‘ती’ भयंकर बातमीच असणार अशी त्यांची धारणा असायची.
युद्धकाळात सैनिकांच्या घरी जाणाऱ्या तारसंदेशांविषयीच्या दोन अप्रतिम कलाकृती अलीकडे पाहिल्या. त्यांचा परिचय करून देण्यासाठी हा लेख. पहिली कलाकृती एक मराठी लघुपट असून त्याची पार्श्वभूमी 1971च्या भारत पाक युद्धाची आहे तर दुसरी कलाकृती एक इंग्रजी चित्रपट असून त्याची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धाची आहे. (दोन्ही चित्रपट पुरेसे जुने असल्यामुळे त्यांचा सविस्तर परिचय क्षम्य असावा). 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. तेव्हा मी शालेय विद्यार्थी असल्याने या घटनेबद्दल विशेष ममत्त्व आहे. युद्धकाळात नागरिकांनी आपापल्या घरांच्या खिडक्यांच्या काचांना काळे कागद चिकटवल्याच्या आठवणी अजूनही मनात रेंगाळतात. जेव्हा गावांमध्ये सावधानतेचा विशिष्ट भोंगा वाजायचा तेव्हा सर्व नागरिकांनी काही काळ घरातले दिवे बंद करायचे असत तेही आठवते. या युद्धावर आधारित अनेक भारतीय कलाकृती आतापर्यंत निघाल्यात. सुमारे पाच वर्षांपूर्वी युट्युबवर दाखल झालेला ‘तार’ हा लघुपट त्यापैकीच एक आणि त्याचाच परिचय आता करून देतो.
पंकज सोनवणे दिग्दर्शित ‘तार’मध्ये प्रमुख भूमिका आहे आपले जानेमाने नागराज मंजुळे यांची. तारमधील प्रसंग घडतो 1971च्या भारत पाक युद्धादरम्यान. पोस्टमनच्या भूमिकेतील नागराज ग्रामीण भागात टपाल व तार असे दोन्ही पोचवत असतो. युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या घरी आतापर्यंत काही तारा पोचवून झालेल्या असतात. ते प्रसंग अर्थातच हृदयद्रावक असतात. एखाद्या मृतसैनिकाची तार पोचवायला जावे तर त्या सैनिकाची बायको गरोदर असल्याचे हादरवून टाकणारे दृश्यही त्याने पाहिलेले आहे. या पोस्टमनच्या कुटुंबात त्याची बायको आणि वडील दाखवले आहेत परंतु अद्याप त्याला मूल झालेले नाही. आपला नवरा मृत्यूच्या तारा पोचवण्याचे अमंगळ काम करीत असल्यामुळेच आपल्याला शाप लागून आपण निपुत्रिक आहोत अशी त्याच्या बायकोची वारंवार तक्रार आहे ! तिच्या अशा त्राग्याने कधीतरी वैतागून त्याला ही नोकरी सोडावीशी वाटते, परंतु त्याचा एक सहकारी त्याला तसे करू देत नाही.![]()
गावात एक रावसाहेब जाधव असून त्यांचा मुलगा युद्धात लढायला गेलेला आहे. त्यामुळे सारे जाधव कुटुंबीय चिंतेत आहेत. अशातच एके दिवशी या पोस्टमनला नेमकी रावसाहेबांचे नावपत्ता असलेलीच तार पोचवायचे काम येते. सायकलवर पायपीट करत आणि पोरासोरांना त्यांचा पत्ता विचारत तो जाधवांच्या घरी जाऊ लागतो. दरम्यान पारावर पत्ते कुटत बसलेली मंडळी त्याला विचारतात की कुठे चालला आहेस म्हणून. त्यावर तो जाधवांची तार आहे असे सांगतो. हे ऐकताच ती सगळी मंडळी हातातले पत्ते टाकून जाधवांच्या घराकडे सैरावैरा धावू लागतात. जेव्हा पोस्टमन इच्छित घराजवळ येतो तेव्हा त्याला तिथे अत्यंत शोकाकुल वातावरण दिसते. अनेक बायका मांडी घालून व धाय मोकलून रडत असतात. पोस्टमन तिथे पोचण्यापूर्वीच गावकऱ्यांनी, “तार आली, तार आली” अशी वार्ता घरी दिल्याने सगळ्यांचा समज होतो की, रावसाहेबांचा सैनिक मुलगाच गेला असावा.
आता कुटुंबीयांची रडारड चालूच आणि हतबुद्ध पोस्टमन मात्र नुसताच हातात तार घेऊन उभा हे दृश्य. दरम्यान एक ग्रामस्थ पुढे येऊन पोस्टमनच्या हातातली तार घेतात व त्या संदेशाचे पाकीट फोडून ते वाचतात आणि . . . खुदकन हसतात. मग मोठ्याने ओरडून ते त्या सर्व समूहाला सांगतात,
“ए बायांनो, बंद करा रडायचं बघू, रावसाहेबांच्या मुलीला मुलगा झाल्याची ही तार आहे, चला पेढे वाटा बिगीबिगी !”
या जबरदस्त कलाटणी देणाऱ्या प्रसंगाने एका क्षणात संभाव्य शोकांतिकेची सुखांतिका होते आणि सर्वत्र आनंद पसरतो. मग काय, पोस्टमनच्या हातावर चिमूटभर साखर आणि शकुनाचा म्हणून एक रुपया ठेवला जातो. त्याचबरोबर जवळच्या कुटुंबीयांचा चाललेला जल्लोष काय विचारता ! मग इथले काम आटोपून पोस्टमन सायकलवर टांग टाकून शांतपणे शेतातील पायवाटेतून जाऊ लागतो. तेव्हाच एकीकडे रेडिओवर पाकिस्तानने युद्धात शरणागती पत्करल्याची बातमी ऐकवली जाते. लघुपट संपता संपता, ‘भारतीय तारखाते 163 वर्षांच्या सेवेनंतर 14 जून 2013रोजी कायमचे बंद झाल्याची’ माहिती दाखवली जाते. कालबाह्य झालेल्या संदेशवहनाच्या या प्रकारावर आजच्या काळातही लघुपट काढावासा वाटणे प्रशंसनीय आहे. अतिशय हृद्य आणि उत्कट असा हा लघुपट जरूर पहावाच असा ! नागराज मंजुळेची ग्रामीण पोस्टमनची भूमिका तर एक नंबर. तार घेऊन येणारा पोस्टमन दूरवरून पाहताच सैनिकाच्या कुटुंबीयांत कशी धडकी भरते याचे सुरेख चित्रीकरण यात आपल्याला पाहायला मिळते. आनंदाच्या एखाद्या प्रत्यक्ष बातमीपेक्षाही वेदनेची चाहूल सुद्धा माणसाला किती भयंकर अस्वस्थ करते याचे सुरेख चित्रण इथे करण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत. इंटरनेटपूर्व काळातील समाजाचे तारसंदेश या प्रकाराशी असलेले आत्यंतिक भावनिक नाते यातून दृग्गोचर होते. असे काही तणावपूर्ण दृश्य श्वास रोखून पाहताना, “नकोच ते युद्ध आणि नको ते सैनिकांचे बलिदान” असे कुठल्याही सुजाण माणसाला वाटल्याशिवाय राहत नाही.
याच विषयावरील ‘Ithaca’ हा 2016 मधील अमेरिकी इंग्लिश चित्रपट. तो 1943मध्ये प्रसिद्ध झालेल्या विल्यम सरोयान लिखित ‘द ह्युमन कॉमेडी’ या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्यपूर्ण नाव समजून घेण्यासाठी त्यामागची ग्रीक पुराणकथा जाणून घेणे आवश्यक. Ithaca हे ग्रीसमधील एक बेट असून महाकवी होमरच्या The Odyssey या महाकाव्यात त्याचा उल्लेख आढळतो. त्यातील ओडिसीयस या राजाचे तिथे राज्य असते. त्याच्या कारकिर्दीत ट्रोजन युद्धावर काढलेल्या 10 वर्षांच्या खडतर काळानंतर तो आपल्या मातृभूमीकडे परत येतो त्याची ही कथा. अनेक नैसर्गिक आपत्ती आणि मानवी मोहांना परतवून लावत त्याचा हा प्रवास झालेला आहे. चित्रपटाला दिलेले हे बेटाचे नाव प्रतिकात्मक असून ते, एखाद्या अवघड कामगिरीनंतर स्वगृही पोचणे या अर्थी आहे. आधुनिक काळात सध्याच्या न्यूयॉर्क राज्यात Ithaca हे शहर असून तेथील Cornell विद्यापीठ प्रसिद्ध आहे. तेथील शिक्षणाचे काही संदर्भ चित्रपटात येतात.
चित्रपटाची पार्श्वभूमी ऐनभरात असलेल्या दुसऱ्या महायुद्धाची असून त्यातील घटना 1942च्या दरम्यान घडतात. त्यातील पात्रांची नावे वर उल्लेखलेल्या महाकाव्यातूनच घेतलेली आहेत. होमर मेकॉले हा 14 वर्षांचा मुलगा चित्रपटाचा नायक असून त्याचे वडील नुकतेच युद्धात हुतात्मा झालेले असून त्याचा भाऊ मार्कस हा देखील लढण्यासाठी गेलेला आहे. यास्तव होमरवर लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. त्याला एक बहीण व एक भाऊ असून त्या भावाचे नाव Ulysses - मूळ Odysseusचे हे लॅटिन रूपांतर. आपली आर्थिक जबाबदारी निभावण्यासाठी होमर एका तारखात्यात संदेशदूत (telegraph messenger) म्हणून कामावर आहे. तरुण मुलांनी सायकलवरून वेगाने जात असे संदेश घरोघर पोचवणे हे तेव्हाचे महत्वाचे काम. या कामातील सर्वात वेगवान संदेशदूत होण्याची त्याची मनीषा असते.
![]()
त्या तार कार्यालयात इनमीन तीन माणसे असून त्यापैकी विली ग्रोगन हा निवृत्तीच्या जवळ आलेला तार-टंकलेखक आहे. तारेचा मजकूर टंकून तयार झाला की तो होमरने सायकल हाणत घरोघरी पोचवायचा हे अगदी रोजचे काम. अनेक प्रकारच्या प्रसंगांच्या तारा तो पोचवत असतो आणि त्याला मनोमन अशीही आशा असते की, एक दिवस आपला भाऊ युद्धावरून सुखरूप परत येत असल्याचाही संदेश आपल्याला मिळेल. परंतु त्याचबरोबर आपल्या भावाचेही युद्धात काही बरेवाईट होईल अशी एक सुप्त भीती त्याच्या मनात दडून असते. एव्हाना काही सैनिक हुतात्मा झाल्याच्या तारा त्याने घरोघरी पोचवल्या असतात आणि तिथल्या हृदयद्रावक प्रसंगांचा अनुभवही घेतलेला असतो.
अशातच एके दिवशी त्या कार्यालयात एक बातमी येऊन धडकते आणि ती वाचून तिचे टंकन करता करताच ग्रोगन टाईपरायटरवर आपली मान टाकतात. थोड्या वेळाने होमर तिथे येऊन पाहतो तेव्हा त्याला ग्रोगन मृत झाल्याचे दिसते. त्यांच्या तारेचे टंकनकाम अर्धवट राहिलेले असते. होमर जेव्हा त्या अर्धवट मजकुरावरून नजर फिरवतो तेव्हा त्याला त्याचाच भाऊ मार्कस हुतात्मा झाल्याचे समजते. तरीही आपला दुःखवेग आवरून तो तार मजकूर हातात घेतो आणि सायकलवरून आपल्या घरी परततो. तेव्हाच त्याला दिसते की मार्कसचे सहकारी असलेले अन्य दोन सैनिक एक मोठे गाठोडे घेऊन त्यांच्या घराच्या दारात उभे आहेत. कुठलेही भाष्य करायची गरज नसलेल्या या प्रसंगावर चित्रपट संपतो. इथे सुन्न झालेल्या प्रेक्षकाला ‘इथाका’चा प्रतीकात्मक अर्थ उमगतो. सैनिक मार्कस हा हुतात्मा झाल्याने आध्यात्मिक अर्थाने ‘निजधामा’स गेला आहे आणि त्याचबरोबर होमर ती मृत्यूवार्ता घेऊन आपल्याच घरी पोचलेला आहे. दोन्ही भाऊ आपापले ‘कर्तव्य’ बजावतात हे खरे. 14 वर्षाच्या कोवळ्या होमरला या अत्यंत दुःखद घटनेतून जगाच्या कठोर वास्तवाची जाणीव झाली आहे. या महायुद्धामुळे किशोरवयीन निरागसतेतून प्रगल्भतेकडे झालेला त्याचा मानसिक प्रवास असाही ‘इथाका’चा अर्थ काढता येईल. सुमारे 3000 वर्षांपूर्वीच्या ओडिसी महाकाव्यातील संकल्पना या चित्रपटाच्या रूपाने पुन्हा एकवार आपल्यासमोर आलेली आहे. चित्रपटात होमरची भूमिका Alex Neustaedter ने समरसून केली आहे तर होमरच्या आईची भूमिका आणि दिग्दर्शन Meg Ryan यांनी समर्थपणे पेलले आहे. हा चित्रपटही युट्यूबवर पाहता येईल .
मानवी कुप्रवृत्तीतूनच जगभरात वारंवार युद्धे होताना दिसतात आणि त्यांचे परिणाम भयावह असतात. काही समाजधुरीण ती होऊ नयेत आणि जागतिक शांतता नांदावी यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. परंतु एकंदरीत पाहता युद्धखोर प्रवृत्ती अशा प्रयत्नांवर मात करताना दिसते. अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी देखील थोडीफार युद्धे होत असतील. परंतु कुठल्याही युद्धात होणारी अटळ मनुष्यहानी, मानवी आत्मसन्मानाला लागणारी ठेच आणि कधीकधी तर क्रूरतेचा कळस गाठला जातो, त्याचे काय? अशा घटना माणुसकीला काळीमाच फासतात. युद्धांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होतच आहे. निरनिराळ्या युद्धांचे आव्हान समर्थपणे पेलणाऱ्या समस्त सैनिकांना अभिवादन ! त्यांच्या बलिदानाची बातमी पोचवण्याच्या प्रसंगांवर आधारित वरील दोन्हीही चित्रपट प्रभावी आहेत यात शंका नाही. अशा कलाकृतींच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना सैनिकांच्या कौटुंबिक दुःखाची जाणीव समर्थपणे करून दिली जाते हे महत्त्वाचे.
************************************************************************************************************************************
चित्रसौजन्य : विकिपीडिया
छान आहे लेख. नवीन काही
छान आहे लेख. नवीन काही वाचायला मिळाले