दोस्ती... भाग ३ — शर्यत दोन मित्रांची!

Submitted by amol_koli on 1 November, 2026 - 13:31

### दोस्ती...
### भाग ३ — शर्यत दोन मित्रांची!
काही मैत्री वर्गातल्या एकाच बाकावर सुरू होतात... काही खेळाच्या मैदानावर... तर काही मैत्रीची सुरुवात अशा शर्यतीतून होते, जिथे दोघंही एकमेकांविरुद्ध धावत असतात, पण दोघांचंही स्वप्न वेगळं असतं.
गाडी महामार्गावरून वेगाने धावत होती.
मुंबई मागे पडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार शेतं दिसू लागली होती.
मी बाबांच्या शेजारी बसलो होतो.
मनात एकच उत्सुकता होती.
चंदू आणि अमोल!
हे दोघं नेमके कोण होते? आणि त्यांच्या मैत्रीत असं काय विशेष होतं की बाबा मला त्यांची गोष्ट इतक्या गंभीरपणे सांगत होते?
मी बाबांना विचारलं,
"बाबा, मग पुढे काय झालं? चंदू आणि अमोलची मैत्री कशी झाली?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
हलकेच हसले.
"अरे मंगेश, थोडा धीर धर. गोष्ट सांगतोय ना!"
"अहो, तुम्हीच इतकं सस्पेन्स तयार करता आणि वर मलाच धीर धरायला सांगता!"
बाबा हसले.
"बरं, ऐक तर मग..."
त्यांनी खिडकीबाहेर पाहिलं.
काही क्षण शांत राहिले.
आणि मग बोलायला सुरुवात केली.
"ही गोष्ट आहे साधारण पाच वर्षांपूर्वीची..."
### पाच वर्षांपूर्वी — श्री सिद्धनाथ विद्यामंदिर, अंकले
त्या वर्षी आमच्या शाळेत वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं.
शाळेत एकच उत्साह होता.
कबड्डी, खो-खो, लांब उडी, धावण्याच्या शर्यती...
प्रत्येक वर्गातून पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जात होती.
मुलं आपापल्या स्पर्धेसाठी तयारी करत होती.
पण त्या वर्षीच्या धावण्याच्या स्पर्धेला एक वेगळंच महत्त्व होतं.
कारण पहिल्या क्रमांकाचं बक्षीस होतं...
संपूर्ण वर्षभरासाठी लागणारी शालेय पुस्तकं आणि वह्या!
आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस?
एक नवीन कोरी सायकल!
मी बाबांना मध्येच थांबवलं.
"बाबा, हे काय विचित्र बक्षीस ठेवलं होतं तुम्ही? पहिल्या क्रमांकाला पुस्तकं आणि दुसऱ्याला सायकल?"
बाबा हसले.
"अरे, आमच्या गावातल्या मुलांसाठी पुस्तकंही तितकीच महत्त्वाची होती."
"पण बाबा, दुसऱ्या क्रमांकाला सायकल म्हणजे मुलं मुद्दाम दुसरी येतील!"
"म्हणूनच तर ही गोष्ट तुला सांगतोय!"
मी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिलं.
बाबा पुढे म्हणाले,
"त्या स्पर्धेत दोन मुलं सहभागी झाली होती. एक अमोल आणि दुसरा चंदू."
"म्हणजे अशोकमामांचा अमोल?"
"हो रे, तोच!"
"आणि चंदू?"
बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक मावळलं.
ते काही क्षण शांत झाले.
"चंदूची गोष्ट जरा वेगळी होती रे मंगेश..."
### चंदू — पाच किलोमीटरची पायपीट करणारा मुलगा
चंदूचं पूर्ण नाव चंद्रकांत रामू कांबळे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची.
वडील रामू कांबळे दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायचे.
रोज काम मिळेलच याची खात्री नसायची.
काम मिळालं तर घरात चूल पेटायची.
नाही मिळालं तर दिवस कसाबसा काढावा लागायचा.
चंदू चौथीत असताना त्याची आई चंद्रकला वारली.
त्या लहान वयात आईचं छत्र हरपलं.
घरात आधीच गरिबी.
त्यात आई गेल्यामुळे चंदूच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
रामूला मुलाचं शिक्षण पुढे सुरू ठेवणं कठीण झालं होतं.
एक दिवस रामू शाळेत आला.
त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती.
अशोकमामा शाळेच्या आवारात झाडलोट करत होते.
"काय रं रामू, सकाळी सकाळी कुटं निघालास?"
"काय सांगू रं अशोका... जरा मास्तरास्नी भेटायचं व्हतं."
"कशापायी?"
रामू काही क्षण गप्प राहिला.
मग म्हणाला,
"आरं, चंद्याचं शाळा बंद करायचं म्हणतोय."
अशोकमामांच्या हातातला झाडू थांबला.
"काय बोलतोयस रं तू?"
"काय करू मग? घरात खायची मारामार हाय. पोराला पुस्तकं कुठनं आणू? कपडं कुठनं आणू? त्यापरीस शेतात कामाला लागला तर चार पैसं तरी मिळतील."
अशोकमामांनी झाडू बाजूला ठेवला.
"रामू, आरं पोरगं शिकण्यात हुशार हाय. त्याचं शिक्षण बंद करून काय मिळणार तुला?"
"अशोका, तुला बोलायला सोपं हाय रं. माझ्या घरची परिस्थिती तुला ठावं हाय."
"ठावं हाय म्हणूनच सांगतोय! पैशाची काळजी तू करू नगंस. वह्या-पुस्तकांचं काय ते बघू आमी. पण पोराला शाळेतून काढू नगंस."
रामूने मान खाली घातली.
"आरं, पण..."
"पण-बिण काय न्हाय! उद्या चंद्याला घेऊन ये शाळंत. बाकीचं मास्तरांशी मी बोलतो."
रामू काही बोलला नाही.
अशोकमामा पुढे म्हणाले,
"आणि एक लक्षात ठेव रामू... आज पोराला शेतात कामाला लावलंस तर उद्याही त्याला दुसऱ्याच्याच शेतात राबावं लागंल. पण शिकवलंस ना, तर कदाचित एक दिवस त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल."
रामूच्या डोळ्यांत पाणी आलं.
"अशोका, तुझं उपकार कसं फेडू रं?"
अशोकमामा हसले.
"आरं येड्या, उपकार कसले? पोरगं आपल्याच गावातलं हाय की!"
आणि अशा प्रकारे चंदूचं पाचवीत शिक्षण सुरू झालं.
मी बाबांकडे पाहिलं.
"म्हणजे अशोकमामांनी चंदूचं शिक्षण वाचवलं?"
"हो मंगेश. आणि ही काही पहिलीच वेळ नव्हती."
बाबा पुढे म्हणाले,
"अशोकने कितीतरी गरीब मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मदत केली आहे."
मी हसलो.
"बाबा, खरंच सांगतो, अशोकमामांना शाळेत शिपाई म्हणून ठेवणं म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे!"
बाबाही हसले.
"अरे, पदाने माणूस मोठा होत नाही. कामाने होतो."
मी मान हलवली.
बाबा पुन्हा गोष्टीकडे वळले.
### आईचं नाव अजूनही चंद्रकलाच...
चंदू पाचवीत दाखल झाला.
काही काळानंतर रामूने दुसरं लग्न केलं.
त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सुशीला.
रामूला वाटलं होतं की घरात पुन्हा एक स्त्री आल्यामुळे चंदूला आधार मिळेल.
पण नवीन आईशी जुळवून घेणं चंदूसाठी सोपं नव्हतं.
चंदू फारसा बोलायचा नाही.
वर्गात शांत बसायचा.
इतर मुलं खेळत असताना कधी कधी तो एकटाच मैदानाच्या कोपऱ्यात बसलेला दिसायचा.
त्याच्या घरापासून शाळा जवळपास पाच किलोमीटर अंतरावर होती.
रोज सकाळी तो पायी शाळेत यायचा.
आणि शाळा सुटल्यावर पुन्हा पाच किलोमीटर चालत घरी जायचा.
उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी...
चंदूची शाळा क्वचितच चुकायची.
एक दिवस मी वर्गात मुलांची ओळख करून घेत होतो.
प्रत्येकाला स्वतःबद्दल सांगायला सांगितलं.
चंदूची पाळी आली.
"चंद्रकांत, उभा राहा."
तो शांतपणे उभा राहिला.
"तुझ्या वडिलांचं नाव काय?"
"रामू कांबळे, सर."
"आणि आईचं नाव?"
क्षणभर तो गप्प राहिला.
मग हळू आवाजात म्हणाला,
"चंद्रकला कांबळे."
मला आश्चर्य वाटलं.
कारण त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्याचं मला माहीत होतं.
मी त्याला विचारलं,
"चंद्रकांत, तुझ्या घरी आता सुशीला आहेत ना?"
त्याने मान हलवली.
"व्हय सर."
"मग आईचं नाव चंद्रकला का सांगितलंस?"
चंदूने माझ्याकडे पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती.
तो हळूच म्हणाला,
"सर... आईचं नाव बदलत न्हाय ना..."
मी नि:शब्द झालो.
संपूर्ण वर्ग शांत झाला.
चंदू पुढे काही बोलला नाही.
मीही त्याला आणखी प्रश्न विचारले नाहीत.
"बरं चंद्रकांत, बस."
तो खाली बसला.
पण त्याचं ते वाक्य माझ्या मनात बराच वेळ घोळत राहिलं.
"आईचं नाव बदलत न्हाय ना..."
त्या एका वाक्यात त्या मुलाच्या मनातली कितीतरी वेदना दडलेली होती.
आईच्या जाण्यानंतर त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता, हे जाणवत होतं.
आणि म्हणूनच मी आणि अशोक त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागलो.
"बाबा..."
मी त्यांना मध्येच थांबवलं.
"काय रे?"
"चंदू रोज दहा किलोमीटर चालायचा?"
"हो."
"आणि तरीही शाळेत नियमित यायचा?"
"हो मंगेश."
मी खिडकीबाहेर पाहिलं.
आमची गाडी आरामात महामार्गावरून धावत होती.
माझ्या मनात विचार आला.
आपण लहानपणी शाळेत जाण्यासाठी किती कारणं शोधायचो!
पाऊस आला की सुट्टी हवी.
थंडी पडली की सुट्टी हवी.
आणि हा मुलगा?
रोज दहा किलोमीटर चालून शिक्षण घेत होता.
मी बाबांना म्हणालो,
"बाबा, पुढे सांगा ना. त्या शर्यतीचं काय झालं?"
बाबा हसले.
"अरे, आता खरी गंमत सुरू होते!"
### शर्यतीच्या मैदानावर पहिली भेट
वार्षिक क्रीडा स्पर्धेचा दिवस उजाडला.
शाळेचं मैदान मुलांनी गजबजून गेलं होतं.
कुणी धावण्याचा सराव करत होतं.
कुणी मित्रांना प्रोत्साहन देत होतं.
तर काही मुलं फक्त बक्षिसांकडे पाहून आपापले अंदाज बांधत होती.
"आरं, दुसऱ्या नंबरला सायकल हाय म्हणं!"
"व्हय रं! मग पहिल्या नंबरला काय?"
"पुस्तकं!"
"आयला! मग पहिला नंबर कशाला पाहिजे? दुसराच बरा!"
मुलांमध्ये हशा पिकला.
पण त्या मैदानावर दोन मुलं अशी होती, ज्यांच्यासाठी ही बक्षिसं केवळ गंमत नव्हती.
एक होता अमोल.
आणि दुसरा चंदू.
अमोलला पहिलं बक्षीस हवं होतं.
कारण त्याचे वडील अशोकमामा मर्यादित पगारात घर चालवत होते.
अमोलच्या पुस्तकं आणि वह्यांसाठीही त्यांना कष्ट करावे लागत होते.
अमोलला वाटत होतं की पहिलं बक्षीस मिळालं, तर बाबांचा थोडा खर्च वाचेल.
दुसरीकडे चंदू होता.
त्याला दुसरं बक्षीस हवं होतं.
सायकल!
कारण रोज पाच किलोमीटर चालत शाळेत येणं आणि पुन्हा पाच किलोमीटर घरी जाणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं.
त्याच्यासाठी ती सायकल म्हणजे केवळ बक्षीस नव्हतं.
ती त्याच्या रोजच्या कष्टातून थोडी सुटका करणारी गोष्ट होती.
शर्यत सुरू होण्यापूर्वी अमोल मैदानाच्या एका बाजूला उभा होता.
चंदू त्याच्याजवळ आला.
"आरं, तुझं नाव काय रं?"
"अमोल."
"मी चंदू."
"बरं."
"तू बी धावणार हायस व्हय?"
अमोलने त्याच्याकडे पाहिलं.
"नाही, मी इथे पोहायला आलोय!"
चंदू काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला.
"आरं, इथं पाणी कुठं हाय?"
अमोल खळखळून हसला.
"अरे वेड्या, गंमत केली!"
चंदूही हसला.
"लई शहाणा दिसतोयस!"
"आहेच मी!"
"बरं, मग बघू कोण जिंकतंय ते!"
अमोलने विचारलं,
"तुला पहिला नंबर पाहिजे का?"
"नगं रं!"
"का?"
"आरं, पहिल्या नंबरला पुस्तकं हायती. मला काय करायची ती?"
अमोल आश्चर्याने म्हणाला,
"मग तू शर्यतीत कशाला उतरतोयस?"
चंदूने मैदानाच्या बाजूला ठेवलेल्या चमचमीत सायकलकडे बोट दाखवलं.
"ती बघ!"
"सायकल?"
"व्हय! मला ती पाहिजे."
"पण ती तर दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे!"
"म्हणून तर म्हणतोय! मला दुसराच नंबर पाहिजे."
अमोल हसला.
"अरे, लोक पहिला नंबर मिळवण्यासाठी धावतात आणि तू दुसऱ्यासाठी?"
चंदूने अगदी सहज उत्तर दिलं,
"आरं, रोज पाच किलोमीटर चालून शाळंत येतो मी. ती सायकल मिळाली ना, तर माझी पायपीट वाचंल!"
अमोलचं हसू थांबलं.
त्याने चंदूकडे पाहिलं.
"तू रोज पाच किलोमीटर चालत येतोस?"
"व्हय!"
"आणि परत जातानाही?"
"नाय रं! जाताना विमानानं जातो!"
अमोल जोरात हसला.
"अरे, माझीच गंमत करतोयस?"
"मग काय! तूच काय एकटा शहाणा हायस व्हय?"
दोघंही हसू लागले.
त्या हसण्यात एक वेगळीच सहजता होती.
जणू काही दोघांची जुनी ओळख असावी.
अमोलने विचारलं,
"बरं, तुला दुसरा नंबर पाहिजे आणि मला पहिला."
चंदूने त्याच्याकडे पाहिलं.
"तुला पुस्तकं पाहिजेत?"
"हो. बाबांचा खर्च वाचेल."
चंदू काही क्षण शांत राहिला.
मग म्हणाला,
"मग बघूया रं! तू पहिला ये आणि मी दुसरा!"
अमोल हसला.
"अरे, शर्यत आहे. सांगून थोडंच नंबर मिळतात?"
चंदूने छाती फुगवली.
"मग धावायचं की जोरात!"
आणि दोघंही हसत धावण्याच्या रेषेजवळ गेले.
### शर्यत सुरू झाली!
मैदानावर मुलांची गर्दी झाली होती.
अशोकमामा मैदानाच्या एका बाजूला उभे होते.
त्यांची नजर अमोलवर होती.
मी त्यांच्याजवळ गेलो.
"काय अशोक, आज आपला अमोल धावतोय वाटतं?"
"व्हय सर!"
"काय म्हणतोय? पहिला नंबर आणणार?"
अशोकमामा हसले.
"सर, पोरगं लई हट्ट धरून बसलंय. म्हणतंय, पहिला नंबर आणणारच!"
"का बरं?"
"आरं, पुस्तकं मिळणार हायती ना! म्हणतो, बाबा तुमचा खर्च वाचंल."
हे ऐकून माझ्या मनाला चटका लागला.
मी अशोकमामांच्या खांद्यावर हात ठेवला.
"अशोक, त्याला सांग. पहिला नंबर नाही आला तरी काळजी करू नका. अमोलच्या पुस्तकं आणि वह्यांची व्यवस्था मी करेन."
अशोकमामा माझ्याकडे पाहत राहिले.
"सर, तुम्ही लई करता आमच्यासाठी..."
"अरे, अमोल आपलाच मुलगा आहे. त्यात काय एवढं?"
अशोकमामांनी काही उत्तर दिलं नाही.
पण त्यांच्या डोळ्यांतलं समाधान मला स्पष्ट दिसत होतं.
शिट्टी वाजली!
"रेडी!"
सगळे विद्यार्थी धावण्याच्या रेषेवर उभे राहिले.
अमोलने एकदा चंदूकडे पाहिलं.
चंदूने डोळा मारला.
"आरं अमोल्या, पहिला नंबर सोडू नगंस हं!"
अमोल हसला.
"तू तुझा दुसरा नंबर सांभाळ!"
"बघूया!"
"सेट!"
आणि...
फुर्रर्र!
शिट्टी वाजली.
सगळी मुलं धावू लागली.
मैदानावर एकच गोंधळ उडाला.
"चल रे! चल!"
"जोरात धाव!"
"अमोल! अमोल!"
"चंदू! चंदू!"
सुरुवातीपासूनच चंदूने चांगला वेग घेतला.
तो इतर मुलांना मागे टाकत पुढे निघाला.
अमोलही जोरात धावत होता.
पण चंदू त्याच्यापेक्षा पुढे होता.
मी अशोकमामांना म्हणालो,
"अरे वा! हा चंदू तर भारी धावतोय!"
अशोकमामा हसले.
"सर, रोज दहा किलोमीटर चालणाऱ्या पोराला धावायला काय कमी पडणार?"
मीही हसलो.
पण पुढच्या काही क्षणांत शर्यत अधिक रंगतदार झाली.
चंदू सर्वांत पुढे होता.
अमोल त्याच्या मागे.
बाकीची मुलं हळूहळू मागे पडत होती.
शेवटचं अंतर उरलं होतं.
मैदानावरचा आवाज वाढला.
"चंदू! जोरात!"
"अमोल! चल रे!"
चंदू अजूनही पुढे होता.
पण अचानक...
शेवटच्या काही क्षणांत अमोलचा वेग वाढला.
तो चंदूच्या जवळ पोहोचला.
दोघं जवळजवळ बरोबरीने धावत होते.
आणि शेवटच्या क्षणी...
अमोलने चंदूला मागे टाकलं!
अमोल पहिला आला!
चंदू दुसरा!
मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
अशोकमामा आनंदाने ओरडले,
"शाब्बास अमोल्या!"
मीही टाळ्या वाजवत होतो.
पण माझी नजर चंदूवर गेली.
आणि मला आश्चर्य वाटलं.
कारण चंदूच्या चेहऱ्यावर पराभवाचं दुःख नव्हतं.
उलट तो इतका आनंदी दिसत होता, जणू पहिला क्रमांक त्यानेच मिळवला असावा!
"बाबा! मग पुढे काय झालं?"
मी उत्सुकतेने विचारलं.
बाबा हसले.
"अरे, थांब! सांगतोय ना!"
"पण बाबा, चंदू हरला तरी इतका आनंदी का होता?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"कारण त्याला हवं होतं ते मिळालं होतं."
"सायकल?"
"हो!"
### दोन विजेते!
बक्षीस वितरण सुरू झालं.
पहिल्या क्रमांकासाठी अमोलचं नाव पुकारलं गेलं.
अमोल आनंदाने पुढे आला.
त्याला पुस्तकं आणि वह्यांचा संच देण्यात आला.
अशोकमामांच्या चेहऱ्यावर अभिमान ओसंडून वाहत होता.
अमोलने बक्षीस घेतलं आणि बाबांकडे पाहून हसला.
जणू त्याला सांगायचं होतं...
बाबा, आता तुम्हाला माझ्या पुस्तकांची काळजी करावी लागणार नाही!
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी चंदूचं नाव पुकारलं गेलं.
चंदू धावत पुढे आला.
त्याला नवीन सायकल देण्यात आली.
त्याने सायकलच्या हँडलवरून हात फिरवला.
मग घंटी वाजवली.
"ट्रिंग ट्रिंग!"
आणि स्वतःशीच हसला.
त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःची सायकल मिळाली होती.
आता रोजची दहा किलोमीटरची पायपीट कमी होणार होती.
त्याने पुन्हा एकदा घंटी वाजवली.
"ट्रिंग ट्रिंग!"
अमोल त्याच्याजवळ आला.
"काय रे चंद्या, आता घंटीच वाजवत बसणार आहेस का?"
चंदू हसला.
"आरं, माझी सायकल हाय! मी कितीबी वाजवीन!"
"बरं बाबा!"
चंदूने अमोलच्या हातातली पुस्तकं पाहिली.
"तुला तुझं बक्षीस मिळालं?"
"हो!"
"मग झालं तर!"
अमोलने सायकलकडे पाहिलं.
"आता रोज सायकलवरून शाळेत येणार?"
"व्हय की!"
"मग मला एक फेरी देशील?"
चंदूने लगेच उत्तर दिलं,
"एक कशाला? दोन देईन!"
"खरंच?"
"पण एक अट हाय!"
"काय?"
"सायकल पंक्चर झाली तर पैसे तू द्यायचे!"
अमोल खळखळून हसला.
"अरे, माझे बाबा शाळेत शिपाई आहेत. पंक्चरचं दुकान नाही आमचं!"
चंदूने डोळे मिचकावले.
"मग शंकरकाकांकडं नेऊ! पण पैसं तुझंच!"
दोघंही हसू लागले.
त्यांच्या त्या निरागस गप्पा ऐकून आजूबाजूची मुलंही हसत होती.
### एक शर्यत... दोन स्वप्नं!
बाबा काही क्षण शांत झाले.
मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
"बाबा, मग पुढे?"
बाबांनी हलकंसं स्मित केलं.
"मंगेश, त्या दिवशी एक गंमत घडली होती."
"काय?"
"अमोलने शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला मी पहिल्यांदाच पाहिला होता."
"म्हणजे?"
"आणि त्यानंतर पुन्हा त्याला कधीही धावण्याची शर्यत जिंकताना पाहिलं नाही."
मी आश्चर्याने बाबांकडे पाहिलं.
"काय सांगता बाबा?"
"हो रे!"
"मग त्या दिवशीच कसा जिंकला?"
बाबांनी खिडकीबाहेर पाहिलं.
"ते मला आजही नेमकं सांगता येणार नाही."
मी काही क्षण विचार केला.
"आणि चंदू?"
बाबा हसले.
"चंदू दुसरा आला होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं असतंस ना, तर तुला वाटलं असतं की खरी शर्यत त्यानेच जिंकली आहे."
मीही हसलो.
"म्हणजे दोघांनाही हवं ते मिळालं!"
"अगदी!"
"मग बाबा, याला मैत्रीची सुरुवात कसं म्हणता?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"कारण त्या दिवशी दोघं एकमेकांना पहिल्यांदा नीट भेटले. एकमेकांची परिस्थिती समजून घेतली. आणि दोघांनाही दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटला."
मी मान हलवली.
बाबा पुढे म्हणाले,
"मंगेश, त्या दिवशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली."
"काय बाबा?"
"शर्यत एकच होती. मैदान एकच होतं. दोघंही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण दोघंही वेगवेगळ्या स्वप्नांसाठी धावत होते."
मी शांतपणे ऐकत होतो.
"अमोलला पुस्तकं हवी होती, कारण त्याला आपल्या वडिलांचा खर्च कमी करायचा होता."
"आणि चंदूला सायकल हवी होती, कारण त्याला रोजची पायपीट कमी करायची होती."
"हो मंगेश."
बाबा थोडे भावूक झाले.
"त्या दिवशी मला समजलं की प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली गरज वेगळी असते. एखाद्याला जे बक्षीस साधं वाटतं, ते दुसऱ्यासाठी आयुष्य बदलणारं असू शकतं."
मी खिडकीबाहेर पाहिलं.
गाडी वेगाने पुढे जात होती.
पण माझ्या डोळ्यांसमोर दोन लहान मुलं उभी राहिली होती.
एकाच्या हातात पुस्तकं होती.
दुसऱ्याच्या हातात सायकल होती.
दोघंही हसत होते.
आणि दोघांनाही आपण जिंकल्याचा आनंद होता.
मी बाबांना विचारलं,
"बाबा, म्हणजे त्या दिवसापासून दोघं मित्र झाले?"
"हो रे. त्यांची मैत्री त्या दिवसापासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही."
"मग पुढे काय झालं?"
बाबा हसले.
"अरे, आता तर गोष्टीला सुरुवात झाली आहे!"
मीही हसलो.
"म्हणजे अजून बरंच काही बाकी आहे?"
बाबांनी मान हलवली.
"खूप काही..."
त्यांच्या आवाजात पुन्हा तेच गांभीर्य जाणवलं.
मी विचारलं,
"बाबा, पण तुम्ही सुरुवातीला म्हणालात ना की अशोकमामा कठीण परिस्थितीत आहेत..."
बाबा शांत झाले.
मी पुढे विचारलं,
"त्याचा या दोघांच्या मैत्रीशी काही संबंध आहे का?"
बाबांनी लगेच उत्तर दिलं नाही.
काही क्षण ते खिडकीबाहेर पाहत राहिले.
मग म्हणाले,
"मंगेश, त्या दिवशी त्या दोन मुलांच्या हातात दोन बक्षिसं होती..."
मी त्यांच्याकडे पाहिलं.
"एकाच्या हातात पुस्तकं होती. दुसऱ्याच्या हातात सायकल."
"हो बाबा..."
"पण त्या दोघांना तेव्हा माहीत नव्हतं की त्या दिवशी त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली होती."
"काय?"
बाबांनी माझ्याकडे पाहिलं.
"एकमेकांची साथ!"
मी काही क्षण गप्प राहिलो.
बाबा पुढे म्हणाले,
"आणि मंगेश, आयुष्यात पुढे अशी वेळ येते ना, जेव्हा पुस्तकं, सायकल, पैसा, बक्षिसं... या सगळ्यांपेक्षा एखाद्या माणसाची साथ जास्त महत्त्वाची ठरते."
त्यांच्या आवाजात एक वेगळीच गंभीरता होती.
माझ्या मनात पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला.
अशोकमामा कठीण परिस्थितीत का होते?
अमोल आणि चंदूच्या आयुष्यात पुढे काय घडलं होतं?
मी बाबांकडे पाहिलं.
"बाबा, मला पुढची गोष्ट ऐकायची आहे."
बाबांनी मान हलवली.
"सांगेन रे... सगळं सांगेन."
गाडी अंकलेच्या दिशेने धावत होती.
आणि माझ्या मनात त्या दोन मुलांची पहिली भेट पुन्हा पुन्हा उभी राहत होती.
एक मुलगा रोज पाच किलोमीटर चालत शाळेत येत होता.
दुसरा आपल्या वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी धावत होता.
दोघांची स्वप्नं वेगळी होती.
पण त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात एक नवीन नातं जन्माला आलं होतं.
मैत्रीचं!
कदाचित त्या दिवशी चंदू आणि अमोलला त्याचं महत्त्व कळलंही नसेल.
पण बाबांच्या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती.
ती शर्यत संपली होती... पण त्या दोन मित्रांचा खरा प्रवास नुकताच सुरू झाला होता.
### दोस्ती...
त्या दिवशी मैदानावर दोन मुलं धावली.
एक पुस्तकांसाठी...
दुसरा सायकलसाठी...
एक पहिला आला, दुसरा दुसरा.
पण त्या दिवशी हरलं कुणीच नाही.
कारण दोघांनी आपापलं स्वप्न जिंकलं होतं.
आणि नकळत एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश केला होता.
काही शर्यती जिंकण्यासाठी धावायच्या असतात... तर काही शर्यती आयुष्यभराची मैत्री मिळवून देतात!
### भाग ३ समाप्त — शर्यत दोन मित्रांची!
क्रमशः...
पुढील भाग : दोस्ती... भाग ४
८ दिवसा नन्तर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users