(पूर्वप्रसिद्धी - 'तुषार' दिवाळी अंक २०२५)

बालपणी अनेक मुलांची पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर, क्रिकेटपटू, पायलट वगैरे बनण्याची स्वप्ने असतात. त्यात काहीच जण असतात ज्यांना खाकी वर्दीची ओढ असते. सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणारे आणि ते स्वप्न सत्यात उतरणारे फारच थोडे असतात. ज्याचे हे स्वप्न तर पूर्ण झाले पण अवघ्या तीनच महिन्यात त्याला देशासाठी वीरगती प्राप्त झाली असा एक मराठमोळा शूरवीर म्हणजे “लेफ्टनंट भूषण अशोक परब’.
मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या भूषणचा जन्म ३१ डिसेंबर १९७५ चा. आपल्या आई-वडिलांचा तो एकुलता एक अपत्य होता. त्याचे वडील अशोक परब फिरतीच्या नोकरीमुळे जास्त घराबाहेरच असायचे. त्यामुळे घरी त्याचा जास्त वेळ आपल्या आईबरोबर जायचा. शाळेत भूषण एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. त्याला खेळांची देखील खूप आवड होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन तो अनेक पदके मिळवायचा. त्याला लहानपणापासूनच सैन्यात जायची आवड होती, पण घरात अशी कोणती पार्श्वभूमी नसल्यामुळे त्याने आपले स्वप्न घरच्यांपासून लपून ठेवले होते. शाळा उत्तम मार्काने पास झाल्यावर कॉलेजमध्येदेखील त्याने अभ्यास व खेळात चांगली चमक दाखवली. भूषण रोज दोन-तीन तास व्यायाम करायचा. जिममध्ये जाऊन त्याची शरीरयष्टी उत्तम झाली आणि ऊंची देखील ६ फूट झाली. याशिवाय तो नवीन मुलांनादेखील बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण देत असे. याच काळात उत्तम प्रकारे अभ्यास करुन तो ‘इन्स्ट्रुमेंटेशन’ शाखेत इंजिनियर झाला.
आता त्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल या आशेवर आई-वडील होते. परंतु त्याच्या मनात कायम धगधगत असलेली भारतीय सैन्यात जाण्याची इच्छा त्याला आता सांगावीच लागणार होती. कारण त्याने सैन्यात भरती होण्याच्या प्रशिक्षणासाठी अर्ज केला होता आणि आता त्याला अलाहाबादमधून सैन्याच्या ऑफिसमधून इंटरव्ह्यूसाठी फोन आला होता. त्याचे वडील गोव्यामध्ये कामासाठी असताना आपल्या आईला भूषणने आपली इच्छा बोलून दाखवली. आईला हे ऐकून मोठा धक्काच बसला. त्याचे मतपरिवर्तन करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. पण तो ऐकत नाहीये पाहून आईने त्याच्या वडिलांना फोनवर सारी कल्पना दिली. वडिलांनी देखील आधी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नंतर आपल्या लाडक्या मुलाची जबरदस्त इच्छा लक्षात घेऊन त्यांनी माघार घेत त्याला सैन्यात जायची परवानगी दिली व त्याच्या आईलाही त्यासाठी मनवले.
स्वप्नपूर्तीच्या अपेक्षेने भूषण अतिशय खुश झाला आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी जीवतोड मेहनत घेऊ लागला. पण अचानक त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि सप्टेंबर १९९९ मध्ये त्याच्या आईचे आकस्मिक निधन झाले. पण हे दु:ख दूर सारून त्याने अलाहाबादला जाऊन पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. परिणामी ऑक्टोबर ९९ मध्ये तो चेन्नईच्या ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’मध्ये “SS-70” अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रुजू झाला. तेथे त्याने जीवापाड कष्ट घेतले आणि प्रशिक्षण पूर्ण केले. एक अॅथ्लीट म्हणूनही तेथे त्याने नाव कमावले. कोर्स पूर्ण झाल्यावर आई नसल्याने भूषणच्या पासिंग परेडला त्याच्या दोन मावश्या हजर राहिल्या. यानंतर सप्टेंबर २००० मध्ये त्याला पंजाबच्या अमृतसरमध्ये पोस्टिंग मिळाली आणि लेफ्टनंट म्हणून तो सैन्यात रुजू झाला. अश्याप्रकारे सैन्यधिकारी होण्याची लहानपणापासूनची त्याची मनीषा अखेर हुशारी, जिद्द, मेहनत यांच्या जोरावर पूर्ण झाली.
अमृतसरमध्ये पंजाबच्या प्रसिद्ध ‘कोअर ऑफ सिग्नल्स’ या आर्मीच्या महत्त्वाच्या युनिटमध्ये त्याची नियुक्ती करण्यात आली. “स्विफ्ट अँड सिक्युअर” (पंजाबीमध्ये "तीवर चौकस") हे या युनिटचे प्रसिद्ध ब्रीदवाक्य आहे. इकडे लष्करी दळणवळणाबाबत महत्वाचे संयोजन पार पाडले जाते. रणभूमीवर आणि विविध दुर्गम भागात आर्मी काम करत असताना त्यांच्या अनेकविध विभागांमध्ये विश्वासार्ह, जलद आणि जबाबदारीयुक्त संपर्कयंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम या युनिटकडे असते. लेफ्टनंट भूषण ह्या युनिटचे कामकाज उत्तम प्रकारे आत्मसात करत होता. नोव्हेंबर २००० मध्ये “१५ इन्फंट्री” विभागाचा पश्चिम सेक्टरचा आधिभार भूषणकडे होता, ज्याअंतर्गत अनेक सब-युनिट्स कार्यरत होत्या. या विविध युनिटसाठी ‘ऑपरेशनल कम्युनिकेशन’ची जबाबदारी भूषणकडे होती.
अमृतसर आणि लगतचा पंजाबमधील विभाग हा पाकिस्तानच्या सीमारेषेनजीक असल्याने अत्यंत संवेदनशील आणि जोखमीचा मानला जातो. अश्या ठिकाणी तैनात असलेल्या सैन्याच्या जवानांना डोळ्यात तेल घालून आणि जीवावर उदार होऊन वावरावे लागते. अशाच एका जीवावरच्या मोहिमेमध्ये कार्यरत असताना भूषणला ३० नोव्हेंबर २००० रोजी वीरमरण आले. त्याच्यासोबत ‘नवांग कपाडिया’ हा आणखी एक सैन्याधिकारीदेखील हुतात्मा झाला. म्हणजे नियुक्ती झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यात वयाची २५ वर्षे पूर्ण करण्याआधीच भूषण शहीद झाला. “भूषण एक कटिबद्ध सैनिक आणि शूर, तरुण धाडसी अधिकारी होता, ज्याने देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली”, या शब्दात लष्कराने त्याला मानवंदना दिली.
आपली पत्नी आणि एकुलता एक मुलगा यांच्या वियोगानंतर वीरपिता अशोक परब एकट्याने आयुष्य जगत आहेत. भूषण गेल्यानंतर जो काही निधी त्यांना मिळाला तो त्यांनी ‘लेफ्टनंट भूषण अशोक परब फाउंडेशन’ या नावाची संस्था सुरू करून त्या ट्रस्टमध्ये गुंतवला. या ट्रस्टमधून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले जातात. पालघर येथील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ते काम करतात. शिवाय त्यांच्या गावातील शाळेमध्येही भूषणच्या नावाने ते शिक्षणोपयोगी आणि क्रीडाकौशल्याची साधने देत असतात. भूषणचे बॉडीबिल्डिंगवर खूप प्रेम असल्याने, अशोकजी सैन्याच्या ‘जबलपूर प्रशिक्षण केंद्रा’ला शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या सैनिकासाठी भूषणच्या नावाने ट्रॉफी देतात.
अशोकजींचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली वीरमरणाचा ते शोक करत बसत नाहीत. उलट भूषणच्या आठवणी विविधप्रकारे ताज्या ठेवण्यासाठी ते हरप्रकारे प्रयत्न करत असतात. ते रोज सकाळी उठून व्यायाम, योगा करतात आणि दैनंदिन दिनचर्या, वाचन, समाजसेवा वगैरे कामांमध्ये स्वतःला व्यग्र ठेवतात. स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतात, जेणेकरून ते कोणावर ओझे बनणार नाहीत. भूषणला देवाने लवकर नेले असले तरी आपल्याद्वारे देव चांगले काम करून घेत आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. देवाचे आशीर्वाद आणि मित्र, शेजारी, नातेवाईक व हितचिंतक यांच्या सहाय्याने आपण गरजूंच्या कामी येत आहोत यासाठी ते देवाचे आभार मानतात. विलेपार्ले (पूर्व) येथे राहणारे भूषणचे वडील खरोखर आपले जीवन सत्कारणी लावत आहेत. खरोखर धाडसी, निश्चयी, कणखर अश्या परब कुटुंबियांचा आदर्श प्रत्येक भारतीय नागरिकाने ठेवला पाहिजे.
भूषण जर आज जिवंत असते तर या वर्षअखेरीस पन्नास वर्षाचे झाले असते. शिवाय यावर्षी त्यांच्या हौतात्म्याला २५ वर्षेही पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतमातेच्या या वीर मराठमोळ्या सुपुत्राला आणि त्यांच्या धैर्यशील वीरपित्याला मनःपूर्वक कृतज्ञतापूर्ण वंदन.
जय हिंद!!
(छायाचित्र : इंटरनेटवरून साभार)
- गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)
अज्ञात अशा प्रेरणास्त्रोतांना
अज्ञात अशा प्रेरणास्त्रोतांना सर्वांपर्यंत पोचवणे हा हेतू साध्य केलात, आभार या लेखासाठी.
धन्यवाद = " हर्पेन"
धन्यवाद = " हर्पेन"
दंडवत भूषण आणि त्याच्या
दंडवत भूषण आणि त्याच्या बाबांनाही
धन्यवाद " झकासराव"
धन्यवाद " झकासराव"
दंडवत भूषण आणि त्याच्या
दंडवत भूषण आणि त्याच्या बाबांनाही.