शिलांगणाचं सोनं

Submitted by रानभुली on 19 October, 2026 - 14:25

येताना इलेक्ट्रीक स्कूटीने आचके दिले.

हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. गाडी बाजूला घेऊन सीट उघडलं. मागच्या बाजूला हात घातला. चाचपडत टेल लाईट फिरवून बाहेर काढला. त्याची अर्थिंगची वायर निसटली होती. हे आता नेहमीचं झालेलं असल्याने माहिती झालं होतं. ती होल्डरच्या मेटल पार्टला टच होईल अशी ठेवली आणि बल्ब आत मधे खुपसून आटे फिरवले. एक किमी गेली आणि पुन्हा बंद पडली. असं एकूण तीन वेळा झालं.

इतक्यात हातावर थेंब पडले.
वर पाहिलं तर काळेकुट्ट ढग दाटून आलेले. आभाळ भरून आलं होतं.
"आता काही खरं नाही" असं मनाशी म्हटलं. रेनकोट घेतलेला नव्हता आणि अगदी खिंडीत गाठल्याप्रमाणे पावसाने गाठलं.

उद्या दसरा असल्याने रस्त्यवर ही गर्दी झालेली. पावसाच्या आत जितक्या लवकर घरी पोहोचता येईल तितकं पोहोचावं हा बेत गर्दीमुळे तडीस जात नव्हता.

दांडेकर पूल,ल देशपांडे गार्डन आलं कि मग उजवीकडे वळायचं, जुनं घर बंद असलं तरी चावी शेजारी असतेच. माझ्याकडेही असते. समजा विसरले असेन तरी एक तरी चावी मिळेलच. मग पाऊस जाईपर्यंत अंग पुसून ब्लँकेट घेऊन बसायचं असं ठरवलं. पण कसचं काय. लेडीज हॉस्टेलच्या जवळ एक जोरदार सर आली. आता पहिल्यांदाच असं वाटलं कि बरं झालं आज सायकल नाही.

पावसाचा जोर कमी झाला म्हणून पुन्हा रस्त्याला लागले.
तर पंपिंग स्टेशनच्या जवळ आता जोरदार पाऊस सुरू झाला. घाईत झाडाजवळ गाडी लावली. हेल्मेट आरशाला अडकवलं. बॅग उचलली आणि झाडाखाली थांबले. पण पाऊस इथे बरोबर झोडपत होता, हे झाड काही मायेचं नाही म्हणत मी पुढच्या झाडाखाली गेले.
इथे छान संरक्षण मिळालं. या झाडाला चांगली माया होती.

आपली मायेची माणसं झाड बनून डोक्यावर छत्र धरत असतात. हे आपलं असेल.
ते आणखी कुणाचं. मनात असे विचार येत होते.

मग सुपर एल निनोने लांबलेला पाऊस आणि ऑगस्टपासून पुन्हा परतलेल्या निनोने आटोपलेला पाऊस, युद्ध, इंधन टंचाई आणि अन्नधान्याचा संभाव्य तुटवडा या सर्व बातम्या मनात वाजू लागल्या. गेले आठवडाभर मार्केट यार्डात जाऊन धान्यं आणि कडधान्यं भरून टाकूयात असा आईमागे लकडा लावला होता. पण तिचं एकच म्हणणं "किडे होतील. ऊन कोण दाखवणार? पुन्हा कोण ब्ब्भरणार?"

मी करीन असं उत्तर तयार होतं, पण शेवटी ते सगळं आईलाच करावं लागतं हा इतिहास असल्याने मग राहून गेलं.
वाण्याच्या दुकानात पुन्हा काल हा विषय झाला तेव्हा पुन्हा उचल खाल्ली. आईला म्हटलं "किडे लागले तर बोरीक पावडर लावूयात" तर ती हसायला लागली. म्हटलं एक तरी पोतं आणूयात ना. जास्तीत जास्त वाया जाईल. पण टंचाई झाली तर कामाला येईल.

तिचं म्हणणं "जे सर्वांचं होईल, तेच आपलं होईल. सर्वांनी घाबरून साठा केला तर जास्त किंमती वाढतील"
तिला आता पहिल्यासारखी कामं होत नाहीत. पण वयानुसार येणारा अनुभव, शहाणपणा उपयोगी पडत असतो.

पाऊस जोराचा होता. अंधारून आलेलं.
आता लक्ष समोर गेलं.

रस्त्यावर पथारी अंथरलेली होती. त्याच्यावर झेंडूची फुलं होती आणि आपट्याची पानं.
शिलांगणाचं सोनं आदल्या दिवशी विकलं जातं चांगल्या दराने. दसर्‍याच्या दिवशी टंचाई असेल तर चांगल्या भावात विकलं जातं, नाहीतर मग पडेल त्या भावात विकतात. आजचाच दिवस महत्वाचा.

फूटपाथवर छत्री उभी होती. बहुतेक ती त्याच विक्रेत्याची असावी. त्या छत्रीत दोन माणसं उभी होती.

दरम्यान एका माणसाने पथारीवर अंथरलेली प्लास्टिकची पोती आणि ताडपत्री सारखी केली. तो पुन्हा छत्रीत आला.

आता तो परतल्यावर दिसलं.
एक आजीबाई ते रस्त्यावरचं दुकान सावरत होती.
त्यावर हाताचं तुटपुंजं छत्र धरत होती.

तिने एक पॉलिथिनची चादर सऱळ करून अंथरली.

झेंडूची फुलं तर सुरक्षित होती.
पण आपट्याच्या पानात तिचा जीव गुंतला होता.

ती पानं कशा न कशाने ती झाकायचा प्रयत्न तिने चालवला होता.

पावसाचा जोर कमी होत नव्हता.
वाहनं वेगात जात होती. लोक भिजत भिजत घरच्या ओढीने निघालेले होते. एक टेंपोवाला भरधाव वेगात पाणी उडवत गेला.

आजीच्या अंगावर पाणी उडालं.
छत्रीतला माणूस धावला.

" मावशी, तुम्हाला म्हनलं नाव हितं या. पानी उडंल अंगावर"
म्हातारी काय बोलली ते गाड्यांच्या आणि पावसाच्या आवाजात ऐकू आलं नाही.

कंबरेत वाकलेलं शरीर. त्यामुळे मागचा भाग मागे ओढला गेलेला.
काठीने तोल सावरावा लागत होता.

काठीवर भार देऊन फूटपाथ चढायला तिला खूप श्रम होत होते. त्या काठीवर पाय देऊन रस्ता ते फूटपाथ ही उंची जणू काही स्वर्गाच्या दाराईतकी वाटावी एव्हढी धडपड चालली होती.

पुन्हा तो माणूस धावला.
त्याने हाताने आधार दिला. फूटपाथवर चढवलं.

आजी फूटपाथवर पोतं टाकून बसली.
आता बसून ते रस्त्यावरचं दुकान सावरू लागली. आपट्याची पानं भिजू नयेत, उडून जाऊ नयेत ही धडपड चालली होती.

पोत्याखाली हात घालून तिने काहीतरी बाहेर ओढलं. ते पोत्याच्या मध्यभागी दोन थरांच्या खाली ठेवलं.
फोटोफ्रेम सारखं काही तरी होतं.

"मावशी, टेंपोत जाऊन का बसत न्हाई तुम्ही? किती वडुर उभ्यानं थांबायचं? अन इथं बसन्यापेक्षा टेंपोत बसा. पाऊस बी नाय लागनार"

आजी काहीच बोलली नाही.
अंधारात नेसूचं लुगडं दिसत नसलं तरी एकूण परिस्थितीचा अंदाज यायला पुरेसं होतं.

इतका वेळ गप्प असलेला दुसरा माणूस म्हणाला
"पाऊस थांबायचं पण नाव घेईना." त्याने पावसाला शिवी हासडली.

तसा टेंपोवाला म्हणाला "पडाय पायजे असाच अजून."
त्या माणसाने चमकून बघितलं.
"वाट लागलीय गावाला. पावसानं दडी मारली, पीक जळून जाताना बघून हातानं काढायला लागतंय. पोटचं पोर असं जीव सोडताना बघवत नाही दादा. तुम्हाला पाऊस सहन होईना, तिकडं टिपूस दिसंना"

आता तो माणूस वरमला.

"या मावशी का तुमच्या?"
"शेजारच्या गावातल्या. आपण म्हातार्‍या कोतार्‍यांना काकी, मावशीच म्हनत असतो. यांचं मालक गेलं मागच्या महीन्यात"
"अरारारा. कशानं? वय झालं का?"

टेंपोवाला हसला.
"लै वंगाळ झालं. वय झालंच व्हतं. पण पोरगा चार वर्षामागं कोविड नं गेला. तवापास्नं नातीच्या लग्नासाठी उमेदीनं कामाला लागलं होतं म्हातारं. मावशीला म्हणायचं तिचं लगीन लावून देत न्हाई तवर मरत नाही मी"

"मग?"

"गेल्या वर्साला चांगलं पैकं आलं. माझ्या टेंपोतून धान्य विकलं. अन गेल्या दशमीला झेंडूची फुलं आणून मार्केट यार्डात घातली. त्याचं बी चांगलं पैकं मिळालं. त्या जोरावर नातीचं लगीन काढलं"

"झालं?"

"तेच सांगतुय. या वर्षी पावसानं उशीर केला. आल्यावर पेरणी झाली. त्याला बी उशीर झाला. अन नंतर दडीच मारली"
"अरारारा"
" पीक जळालं. लग्नाचा सबूद दिलेला. पैका न्हाई. "

"मग ओ?"

" डोंगराकडं जंगल हाय. तिथं लटकलं म्हातारं झाडाला"
"बाब्बौ. अन मग या मावशी?"

"मावशीला चालता बी येत न्हाई. बघितलं ना? पन मालकाचा सबुद खाली पडू द्यायचा न्हाई म्हनून जिद्दीन आली. झेंडू जास्त नाही झाला. मार्केट यार्डात भाव बी मिळाला नसता, मंग हितं इकायला बसली"

" अन ती ताडपत्री झाली काय लपवती"
"आपट्याची पानं हायती. "

"कुठं मिळाली? शेतात?"
" शेतात असतं व्हय रं मर्दा आपटा?" जंगलात हाईत आपट्याची झाडं"
"कुठं?"
"तिथंच मालकानं न्हाई का आडावी फांदी जवळ केली व्हती? त्याच्या मागंच आपट्याची बी झाडं हाईत"

झाडात आपली माणसं असतात. ती माया धरतात. आणि थकल्यावर कडेवर पण घेतात.
पाऊस कमी झाला तसे आडोशाला थांबलेले बिगी बिगी निघाले.
भराभरा गाड्या सुरू झाल्या.

आता कुणी थांबेना.
अंधारून आलेलं.

आजीला सुचेना काय करावं.
इतक्यात रस्त्याचे दिवे लागले. पण लोकांना आता घर गाठायची घाई झालेली.

आणि खरेदी तर मंडईतच झालेली असणार लोकांची. जास्तीत जास्त शास्त्री रस्त्याला थांबून घेतात.

म्हातारी आपट्याची पानं उघडी करत होती.'
उद्या शहरी लोकांना शिलांगणाचं सोनं लुटाययचंय ना....

आता रस्त्याच्या दिव्यात दिसलं. फोटोतली व्यक्ती आजोबा असणार.
कधी काढला असेल फोटो. त्या वेळी हसले असतील, कदाचित शेवटचं.

मी पण गाडी काढली.
मागे काय झालं याचा विचार करायला वेळ नव्हता.
थोडी पुढे आले आणि आपट्याची पानं घ्यावीत असं सारखं वाटू लागलं.
गाडी मागे वळवून राँग साईडने जाण्यासारखी परिस्थिती नव्हती.

मग गाडी लावून चालत चालत एक मैलभर अंतर मागे आले. मनाची घालमेल चालू होती.
आईने पण आणली असतील आपट्याची पानं.

असू दे, मुलांना देऊयात.
सगळीच तर घेणार नव्हते. पण आजीची भवानी झाली तर कदाचित झेंडूही विकला जाईल.
आपण आणखी काय करू शकतो?

चालत चालत त्या जागेवर आले तर कुणीच नव्हतं.
ती छत्री तर होती. पण पथारीही नाही, आजीबाई पण नाही आणि टेंपोवालाही नव्हता,

काय झालं असेल या विचाराने बेचैनी वाढली.
मघाशीच घेतली असती तर?

आणि मघाचा एक प्रसंग आठवला.

आजी तोल सावरत वाकली होती.

इतक्यात भरधाव वेगाने एक तीन चाकी टेंपो आजीच्या इतक्या जवळून गेला कि त्याच्या हवेनेच आजी पडली असती. जर धडक झाली असती तर? या वयात काही हाड मोडलं असतं तर?

आजीचा टेंपोवाला पुन्हा धावला. "मावशी, आता धडक झाली असती तर? जा जाऊन असा टेंपोत"
आजीचं तेव्हढंच वाक्य ऐकू आलं ,
"सुटले असते"

काळजातच चर्र झालं.
तिच्या न पाहिलेल्या नातीचा चेहरा डोळ्यासमोर तरळून गेला.

आणि पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. मघाशी आधोशाला उभे राहिलेले लोक आता चांगलेच भिजले.

जेबीपी माझाच्या मोबाईल अ‍ॅप मधे बातमी होती
"अवकाळी पावसाने पुणेकरांची तारांबळ"

खरंच तारांबळ उडाली होती, पण बातम्यांचं जग त्यापासून कोसो दूर होतंं.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users