सफर ग्रँड कॅनियनची: Part 4: The Spectacular South Rim – The Beginning! (Concluding)

Submitted by AD75 on 14 October, 2026 - 15:01
Matther Point: Grand Canyon South Rim

सफर:ग्रँड कॅनियनची: Part 3 – West Rim – The Western Wonder!
लिंक: https://www.maayboli.com/node/89065

Pictures: https://photos.app.goo.gl/RvGN2occYWY5sNQu5

(टिप: हे लिखाण वाचताना वर दिलेल्या फोटो लिंक वर टिचकी मारा, फोटो बरोबर तुम्हाला हा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल. हे प्रवासवर्णन फोटोंना अनुसरूनच लिहिले आहे, ज्यामुळे प्रत्येक ओळीतील प्रसंग तुम्हाला थेट फोटोशी जोडता येईल.)

अवाढव्य, अफाट आणि आचाट साऊथ रीम

पुन्हा एक नवी सकाळ, नवं ठिकाण, नवी बस, नवे सोबती. या सगळ्या नव्या समवेत मी निघालो ग्रँड कॅनियनच्या साऊथ रीमला. साऊथरीमलाही हेलिकॉप्टर व बोटीत बसता येतं व इतरही अनेक ॲक्टिव्हिटी करता येतात. फक्त इतकं की South Rim ला ग्रँड कॅनियन प्रचंड आहे, its massive. ग्रँड कॅनियनच्या आधी आम्ही National Geographic व्हिजिटर सेंटरमध्ये Hidden Secrets of Grand Canyon हा Imax चित्रपट बघितला आणि तृप्त झालो.
मानवाने पहिले पाऊल जेव्हा या भागात ठेवले तेव्हा पासून तर बाहेरच्या जगातून अमेरिका Explore करायला आलेल्या मंडळींपर्यंत या माहितीपटात Grand Canyon चे अनेक भाग IMAX माहितीपटात लिलया चित्रित केले आहे. IMAX मुळे याची भव्यता आणखीन वाढते. इथे सापडणारे पशू पक्षी, सरपटणारे प्राणी, इथे नांदलेल्या मानवी प्रजाती, त्यांनी सोडलेल्या खाणाखूणा आणि त्यांची खेळणी सुद्धा अभ्यासू दिग्दर्शकाने सूक्ष्मपणे या माहिती पाटात टिपली आहे. John Wesley Powell नावाचा एक जिगरबाज अमेरिकन साहसवीर होऊन गेला. त्यानं 1869 च्या में महिन्यात कोलोरॅडो नदीत साध्या लाकडाच्या बोटीनं प्रवासाला सुरवात केली आणि त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याने अनंत अडचणींचा सामना करत जिद्दीनं तो प्रवास पूर्ण केला. कोलोरॅडो नदीतुन प्रवास करत ग्रँड कॅनियन यशस्वी रित्या ओलांडणारा तो पहिला वीर ठरला. त्याच्याबरोबर इतर 9 साथीदार होते, पैकी 4 जणांनी त्याची शेवट्पर्यंत साथ केली. अमेरिकन सिव्हिल वॉर मध्ये लढलेल्या John Powell न युद्धात एक हात गमावला होता. त्याचा साहसी प्रवास चित्रपटात समाविष्ट केला आहे.
इथून पुढे बस Grand Canyon National Park, Canyon Village मधे शिरली. Driver बडबड्या होता तो Vegas पासूनच माहिती Jokes चालू होते. त्यानं आम्हाला Mather Point ला सोडलं आणि साधारण दीड तासानी Bright Angel Lodge च्या वाहन तळावर घ्यायला येईन असं म्हणाला. Mather Point च्या वाहनतळावरून थोडं चालत जावं लागलं. मुख्य Rim Trail ला येऊन पोचलो सहज लक्ष गेलं तेव्हा Grand Canyon चं भव्य रूप दिसलं आणि रौद्र रूप देखील! भरा भरा चालत सुटलो अनेक कडे दिसत होते. सुरवातीचे काही सुळके पिवळया-तांबड्या दगडाचे, मला Mather Point गाठायचा होता, ही वाट मला तिकडेच घेऊन चालली होती. Grand Canyon च्या त्या रूपाला मी डोळे विस्फारून-विस्फारून पाहत होतो, ती उंची, ती खोली, ते बेलाग-बेताल कडे, मी उभा असलेला Mather Point चा सुळका सुद्धा साडे -तीन चार हजार फूट उंच असणार. समोरच्या भव्यते समोर मनात नतमस्तक होतो, खरच ‘Grand’ जगातलं नैसर्गिक आश्चर्य! पण मला सह्याद्रीची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. या सहलीतला एकटेपणा या क्षणी सगळ्यात जास्त जाणवला. इतकं सुंदर, अवर्णनीय सौंदर्य समोर होतं, पण दाद द्यायलाच कोणी नव्हतं.
शेकडो लोकं आजूबाजूला असुनही मी त्यात मी अक्षरश: एकटा आहे. लोक स्वत: चे आणि Grand Canyon ची छाया चित्र घेण्यात व्यस्त आहे, मी भान हरपून, कॅमेरा विसरून फक्त Grand Canyon बघतो आहे. गर्दी मोकळी होऊन कड्याच्या कठड्याजवळ मला जागा मिळाली. मी एक-एक शिखर निरखून पाहतो आहे, डोळ्यात भरवून घेतो आहे. माझ्या समोर अनेक सुळके आहेत. त्यातील सगळ्यात उंच सुळक्याचं नाव विष्णू टेंपल!
शेंड्याला त्रिकोणी निमुळतं होतं जाणार हे शिखर ओळखणं कठीण नाही. आता इथ पाश्चात्यांच्या या देशात विष्णू नाव कुणाला ठेववसं वाटल? Clarence Dutton नावाचा एक भूगर्भशास्त्रज्ञ होऊन गेला त्यांनी 1870 च्या सुमारास इथल्या काही शिखरांची नावं विष्णू टेंपल, शिवा टेंपल, बुद्ध टेम्पल ठेवली. त्याला ही शिखरं खुपशी मंदिरांसारखी भासली म्हणून त्यानी ही नावं ठेवली!
Mather Point हून माघारी वळत, पुन्हा Rim Trail गाठली. यानी असच पुढे Bright Angel lodge पर्यंत जायचं होतं. एकटा जीव सदाशीव! मनाशीच बोलत पुढे निघालो किती भव्य, किती दिव्य हे सौंदर्य आहे! पण हे अजब आहे, कल्पनाशक्तीच्या पलीकडलं. एक-एक Point पहात, रिम चा आस्वाद घेत-घेत एखाद्या कड्यावर रेंगाळत, कुठे स्वत:तल बालपण शाबूत आहे याचा अनुभव घेत एखाद्या कड्यावरून खाली वाकून बघत, Grand Canyon चा Grandness अनुभवत पुढे पुढे जात होतो. या इथल्या झाडांनाही निरखून बघत होतो, जाड रेषा-रेषा असलेलं खोड पण झाडाची उंची बेताची, झाडाची पानं हिरवी पण लहान. इतक्यात एका झाडा कडे माझं लक्ष गेलं. या Rim ट्रेल वर एक झाड आहे ते आडव वाढलंय, की त्यावर सहज बसता येईल. खारींची लगबग सुरू आहे, एकडून तिकडे एक क्षण एका जगी टिकतील तर शप्पथ, झुपकेदार ठेपती असणऱ्या या अमेरिकन खारी आकारानं भल्या मोठ्या आहेत इतक्या की त्यांची थोडी भीती वाटते.
शेवट Bright Angel Lodge च्या पाठीमागे येऊन पोचलो. मुद्दाम या वास्तूत डोकाऊन पाहिलं. मजबूत लकडाची बांधणी आहे. 1935 ला याची निर्मिती झाली या आधीही इथे काही केबिन्स होत्या. पण याचं लाकडी स्थापत्य मनात भरतं. Bright Angel Lodge चं कौतुक पाहून पुन्हा Rim Trail ला आलो. इथून पुढे Rim Trail उजवीकडे वळते, Kolb Studio पर्यंत जाते. 1901 ला Kolb बंधूंनी मिळून सुरू केलेला Photography Studio, पण आज हे Visitor Information Center आहे. इथून मी परत फिरलो, Bright Angel Lodge जवळ आलो. पुन्हा Grand Canyon कडे पाहू लागलो, शेवटचा सलाम, तू अफाट आहे, तू अचाट आहे. तुझ सौंदर्य खूप वेगळ आहे, भव्य-दिव्य आहे, रांगडं आहे, मनाला उभारी देणारं आहे तसंच ते दडपून टाकणारं पण आहे! तुला बघता आलं यातच मी धन्य झालो. मला परत कधी यायला मिळेल की नाही कुणास ठाऊक? पण यायला मिळाल तर तुझ्या दर्शनाला मी पुन्हा येईन. कोलोरॅडो माई तुला नमन!
Bright Angel Lodge च्या पुढे असणाऱ्या वाहनतळावर आलो, बस आलेलीच होती, बसमध्ये विसावलो. वारकरी ज्या भावनेने पंढरीची वारी करतो त्याच भावना मी मी कॅनियनच काय तर निसर्ग सौंदर्य असणाऱ्या सगळ्या स्थानांची वारी करतो. कॅनियनच्या स्मृती, हृदयावर कोरल्या गेल्या आहेत ते ही आयुष्यभरासाठी.
सहसा लोक ग्रँड कॅनियन बघतात म्हणजे साऊथ रीम बघतात. पण व्हेगास ते साऊथ रीम ५ तास लागतात, १० तास तर केवळ येण्याजाण्यात जातात. कॅनियन बघण्यास फक्त दीड ते दोन तास मिळतात त्यामुळे हा टुर मला फारसा आवडला नाही. पण ग्रँड कॅनियनचंच प्रचंड आणि रौद्र रूप इथे बघण्यासारखं आहे! साऊथ रीम जर व्यवस्थित बघायची असेल तर व्हेगास या शहराच्या आणि तिथल्या कॅसिनोच्या प्रेमात न पडता, साऊथ रीमलाच राहायची सोय होते किंवा फ्लॅग स्टाफ व विल्यम्स नावाची दोन गावे अनुक्रमे दीड तास व अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. इथे राहून साऊथ रीम मनसोक्त बघता येते. सूर्योदय व सूर्यास्त हा सुद्धा इथला एक अविस्मरणिय अनुभव आहे ज्याला मी मुकलो हे नशिबानं सेकंड इनिंगसाठी राखून ठेवलं आहे कदाचित? त्या क्षणी हे कोणाला ठाऊक होतं की मी इथे आणखीन दोनदा येणार आहे!
भटकंतीची हा गुण माझ्यात आनुवंशिकतेने आला आहे, दोन्ही आजोबा, वडील, काका असा प्रवास करत मी पण भटकंती क्लासचा ऑब्जेक्ट आहे!
गो. नी. दांडेकरांचा होता तोच माझा वंश आहे|
माझिया रक्तात थोडा भटकंतीचा अंश आहे||
ग्रँड कॅनियन ट्रीपमध्ये मी भरपूर डॉलर खर्ची घातले म्हणजे आकडा वाचून डोळे पांढरे होतील पण डॉलर खर्च झाले यापेक्षा आपण काय पाहिलं याचा आनंद जास्त आहे!
विमानात बसलो होतो बॉस्टनच्या लोगॉन विमानतळावर विमान उतरत होते. खिडकीतून सूर्योदय होताना दिसत होता बाप्पा आता पुढची सहल कधी आणि कुठली घडवता?

मला Grand Canyon खरच खूप भावली जितकं प्रेम मी गड किल्ल्यांवर केलं, तितकच प्रेम मी Grand Canyon वर पण केलं. कदाचित म्हणूनच बाप्पानी माझं ऐकलं नशिबाने मला पुन्हा अमेरिकेत नेलं. त्यामुळे ही South Rim ची Summit नव्हती, तर It was just the Beginning!

May 2012
अश्विनीचे डोळे झाकून मी तीला पुन्हा त्याच कड्यावर उभं केलं, तीन डोळे उघडले तेव्हा ती ४,५००-५,००० फूट उंचीच्याकड्यावर उभी होती. तीन सुद्धा डोळे विस्फारून -विस्फारून त्या कडे-कपाऱ्या, महाकाय दगड-धोंडे आणि लाल रंगाचं साम्राज्य पाहिलं. तीनही मान्य केलं की मी का इतका का ग्रँड कॅनियन, ग्रँड कॅनियन करतो.

August 29, 2018
मी पुन्हा त्याच कडयावर उभा होतो, मॅथर पॉईंट! या वेळी माझ्या हातात बाबांचा हात होता, मी बाबांना म्हंटल "काय आहे की नाही सह्याद्रीचा मोठा भाऊ?" बाबा म्हणाले "हे अद्भुत आहे, अतुल्य आहे आणि म्हणूनच जगातील आश्चर्य आहे". मराठी मातीतल्या मनांना कुठं रायगड सदृश्य कडा दिसला, तर कुठल्या डोंगर पठारावरील सपाटी राजगडाच्या सुवेळा माचीसामानभासू लागली. इंग्रजी C चा आकार दिसताच हरिश्चंद्र गडावरचा कोकण कडा दिसू लागला. मग दुसऱ्या दिवशी अक्ख्या दांडेकर कुटुंबांनी ग्रँड कॅनियनची साऊथ रिम कोपरा अन कोपरा पा हिली. महाकाय कडे, विशाल दगड धोंडे, नेढं सगळं चपापून पाहिलं डोळ्यात भरवून घेतलं. एका नेढ्यानं बाबांना प्रेमात पाडलं, मग सगळेच लगबगीनं ५०० फूट खाली उतरलो. मनसोक्त फोटो काढले, चतुर्थीच्याउपासन अन ग्रँड कॅनियनच्या हवेन हत्तीचं बळ आलं होत! संध्याकाळी थकून भागून हॉटेल कडे निघालो तेव्हा वाटलं आज माझं एक स्वप्न पूर्ण झालं आज मी बाबांबरोबर ग्रँड कॅनियन पाहिली!
(समाप्त)

अमोल दांडेकर

Group content visibility: 
Use group defaults

फार छान झाली ही सिरीज @ अमोल.

भव्य दिव्य ग्रँड कॅनियन तर आवडलाच, तुमचे family शी, बाबांशी असलेले bonding काकणभर जास्तच आवडले ❤

मला जमले नाही पण बाबांच्या तोंडून त्यांचा ग्रँड कॅनियन लॉन्ग रोड ट्रिपचा प्रत्यक्ष अनुभव ऐकला होता, तीच मजा ही सिरीज वाचून, फोटो बघून पुन्हा अनुभवली.

Many thanks for sharing here.

भारी लिहिलंय

शेवटी 2 प्रसंग घाईत उरकलेत का असे वाटले Happy