माझा न घडलेला पहिला विमान प्रवास

Submitted by धनि on 12 October, 2026 - 22:56

गणेशोत्सवात सगळ्यांचे पहिले विमानप्रवास वाचून झाले आणि माझ्या पहिल्या विमानप्रवासाची आठवण झाली. जो त्यावेळेस घडलाच नाही. नंतर खूप विमानप्रवास झाले आणि त्या सगळ्या कवायतींमध्ये तरबेज झाल्यासारखे झाले. पण हा विमानप्रवास नक्कीच स्पेशल आठवणींत आहे.

मी बहुतेक ६वी - ७वी मध्ये असेन. आपण ट्रीपला जाऊ असे घरात शिजायला लागले. आजी आजोबा रिटायर झाल्यानंतर ते भारतभर फिरून आले होते. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांची माहितीपत्रके घरी येत होतीच. पुण्याच्या बऱ्याच कंपन्या होत्या. श्री ट्रॅव्हल्स, गुरुनाथ, बेलसरे, दत्त दिगंबर असे काही. मग नाशिकहून एक चौधरी होते. पण ते सगळा प्रवास बसने घडवायचे आणि ब्रेकफास्ट नंतर एकदम रात्रीचे जेवण द्यायचे त्यामुळे त्यांच्यावर काट मारलेली होती. मग मुंबईचे केसरी आणि राजा राणी होते. तोपर्यंत बहुतेक केसरी पुण्यात आले नव्हते. आणि त्यांचा आपला माणूसही नव्हता आला.

त्या माहितीपत्रकांमध्ये असणारी वर्णने - ठिकाणे आणि काही गुळगुळीत फोटो पाहून कुठे जायचे याच्या चर्चा घडायला लागल्या. आता यावेळेस आम्ही पण बरोबर येणार म्हणून मग शेवटी आपण कलकत्ता, दार्जिलिंग करून मग सिक्कीमहून नेपाळला जाऊन येऊ अशी एक ट्रिप निश्चित झाली. या प्लॅनिंग मध्ये मी एका कंपनीमार्फत जाऊया म्हणून थोडा किल्ला लढवला.

गोष्टी बघणे हे मनात होतेच पण या ट्रिप मध्ये इतर प्रवास रेल्वेने होऊन शेवटी काठमांडू ते वाराणसी विमानाने नेणार होते. आणि माझ्यासाठी हाच मुख्य मुद्दा होता. बाकी तसा रेल्वेने बराच प्रवास करून झाला होता. थोडा एसी मधून पण करून झालेला होता पण अजून विमानप्रवास केलेला नव्हता त्यामुळे मी विमानात बसणार, ढगातून जाणार, विमानात देतात ती चॉकलेटं घेणार असे सगळे मनातले मांडे खाऊन झाले होते.

ट्रिप सुरू झाली. मस्त मजा येत होती. रेल्वेने सगळीकडे हिंडलो. कलकत्त्याला जाताना झालमुडी खाल्ली आणि त्यापेक्षा आपली संगमनेरची ओली भेळच चांगली असे शेरे मारून झाले. कलकत्त्यात त्यांच्या ट्राम मध्ये फिरलो. एक दिवस खास त्यावेळेस नावीन्य असलेल्या जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रोत बसलो. त्यातून उतरताना उगीचच मनात मिले सूर मेरा तुम्हारा वाजत होते. मग पुढे कलकत्त्याच्या दुसऱ्या स्टेशनवरून न्यू जलपाईगुडीला रेल्वेतून गेलो. पुढे दार्जिलिंगला मात्र रेल्वेतून गेलो नाही. तिथे गेल्यावर त्या जगप्रसिद्ध रेल्वेमध्ये बसणे झाले पण पूर्ण प्रवास काही तसा आखलेला नव्हता.

मग सिक्कीम आणि पोखरा पाहून फायनली काठमांडूला पोहोचलो. तिथे बरीच मंदिरे पाहून झाली. बरोबरची काही लोकं संध्याकाळी एका कॅसिनो मध्ये जाऊन आली अशी काही चर्चा मी ऐकली. पण तेव्हा 'त्यात काय एवढे' असे वाटल्याचे आठवते. मला आवडलेली जागा म्हणजे तिथल्या एका मोठ्या मॉल मध्ये आम्हाला खरेदीला सोडलेले. कलकत्त्यात खरेदीला सोडले होते तिथे 'थोडी वेगळी तुळशीबाग' अशी परिस्थिती होती. पण इथे वेगळीच दुकाने होती.

सगळ्यांत आवडलेले दुकान म्हणजे व्हिडिओ गेम्स च्या कॅसेट विकणारे दुकान. इतके वेगळे गेम्स आणि इतके प्रकार मी पहिल्यांदाच पाहिले होते. बऱ्याच चायना मेड कॅसेट होत्या पण आपल्याला काय त्याचे. माझा आवडता मारिओ - त्याचे वेगवेगळे ९९ गेम्स एका कॅसेट मध्ये होते ती घेतली. मग अजून एक कॉन्ट्रा म्हणून गेम ची कॅसेट घेतली. अशी माझी खरेदी झाली. माझी खरे म्हणजे खुखरी घेण्याची पण इच्छा होती पण घरच्यांनी ती हाणून पाडली. बाकी त्यांची जॅकेट्स, गरम कपडे वगैरे खरेदी झाली. अजूनही काही गोष्टी घेतल्या गेल्या. त्यावेळेस काही लोकांनी २ तासांत शिवून देतात म्हणून सूट शिवून घेतले.

फायनली तो दिवस उजाडला. सकाळी सगळी लोकं कधी नव्हे ते वेळेत तयार झाली होती. सगळे आवरून सामान घेऊन बसमध्ये बसले. आणि मग बस विमानतळाकडे निघाली. बहुतांश लोकांचा पहिलाच विमान प्रवास असल्याने सगळ्यांना एक उत्साहाचे भरते आलेले होते. कोणालाच वेगळे तिकीट वगैरे दिले नव्हते. मला खरे ते पुस्तकासारखे मिळणारे तिकीट हवे होते पण ते बहुतेक ट्रिप बरोबर असणाऱ्या कंपनीच्या माणसाकडे होते. आम्ही विमानतळावर पोहोचलो. तिकडे विमानस्थल लिहिले होते. मी कोणी तरी तो हवाई अड्डा vs विमानस्थल जोक केल्याचे ऐकले. वातावरण थोडे ढगाळच होते. पण आम्हाला काही वेगळे वाटले नव्हते. मग सगळे सामान तिकडे विमान कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. तसे काठमांडू विमानतळ फार काही मोठा नव्हता. कदाचित त्यावेळेस मुंबईचा नक्कीच मोठा असेल.

सगळे वाट बघत बसले होते की कधी घोषणा होते आणि कधी आम्ही विमानाकडे जातो. पण एक तास झाला दोन तास झाले तरीही काही घडत नव्हते. विमानतळावरची गर्दी वाढत होती आणि कुठलेच विमान उडत नव्हते. नवीन कुठले खाली उतरले असेही वाटले नाही. कंपनीच्या माणसाने चौकशी करून सांगितले की वातावरण चांगले नाही आणि इथे खूप डोंगर असल्याने विमाने येत नाही आहेत. अजून थोडा वेळ वाट पाहिली. लोकं कंटाळायला लागली. शेवटी आज काही विमान उड्डाण होणार नाही असे विमानतळवाल्यांनी घोषित केले. कंपनीवाल्यांनी परत हॉटेल वर घेऊन जायचा निर्णय घेतला.

तिथे येऊन पहिल्यांदा सगळ्यांना थोडे खाऊ घातले. लोकं वाट पाहून आणि भूक लागून कावली होती. अन्न पोटात गेल्याने सगळी थोडी शांत झाली. कंपनीवाल्याचे इकडे तिकडे फोन सुरू होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिकडून रेल्वे होती त्यामुळे काय करावे याचा निर्णय होत नव्हता.

सरते शेवटी रेल्वे पकडणे गरजेचे आहे आणि इथे थांबत बसणे बरोबर नाही असा निर्णय झाला. मग कंपनीवाल्याने जलद हालचाली करत बस बुक केली. सगळी लोकं मग त्या बस मध्ये बसून वाराणसीकडे निघाली. त्यांनी एक काम चांगले केले होते की सगळ्यांना संध्याकाळचे जेवायला चांगले घातले होते. त्यामुळे लोकं बरीच शांत होती. दिवसभराच्या दगदगीमुळे सगळी दमली होती त्यामुळे सगळ्यांच्या विकेट पडल्या आणि पटकन झोपी गेली.

पहाटे पहाटे गाडी थांबते आहे असे वाटले. मी डोळे उघडून पाहिले तर गाडी खरच थांबली होती. लोकं खाली उतरून पाहायला लागली. तर कळले की सुनौली म्हणून उत्तर प्रदेश मधल्या गावाच्या जवळ आहोत. तिकडे चेकिंग होऊन मग भारतात सोडणार आहेत. सगळ्यांना बस मधून खाली उतरवले आणि बसची चेकिंग झाली.

आम्ही सगळे आणि बस ती चेक पोस्ट पार करून भारतात पोहोचलो. तिकडे जाताना रोडवर लुंबिनी वाचले होते. नंतर कळले की ही हद्द जिथे आहे त्याच्या जवळच गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी आहे. या सगळ्या गोंधळात तिथे जाता आले नाही म्हणून मला अजूनही वाईट वाटते. पुढचा प्रवास उत्तर प्रदेशातून करत करत रेल्वेची वेळ होण्याच्या आधीच स्टेशनवर पोहोचलो. सगळ्यांना भुका लागल्या होत्या पण कंपनीची जबाबदारी आता संपली होती. मग आम्ही स्टेशनवर ती उत्तरेतली प्रसिद्ध पुरी भाजी घेतली. त्यावेळेस भूक लागलेली होती म्हणून की काय पण अशी स्वर्गीय लागली ती पुरी भाजी! त्यामुळे अजून एक प्लेट घेऊन खाण्यात आली. यथावकाश रेल्वे आली आणि आम्ही आमच्या बर्थवर स्थानापन्न झालो. पुण्यातून निघताना गुळपोळ्या आणि तिखट शेव घेऊन निघालो होतो. त्याचा उपयोग या प्रवासात झाला. शेवटी सगळा खाऊ संपला आणि असा न घडलेला विमानप्रवासही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनि
भारी लिहिलंय..
त्यांचा आपला माणूसही नव्हता आला.>>>> Lol
माझा आवडता मारिओ - त्याचे वेगवेगळे ९९ गेम्स एका कॅसेट मध्ये होते ती घेतली. मग अजून एक कॉन्ट्रा म्हणून गेम ची कॅसेट घेतली. >>>>> तू मा ख मि

आप लोग तो बचपन मे बहुत अमीर थे.. विमानप्रवास नसेना पण सगळ्या जगप्रसिद्ध गोष्टी करून झाल्या प्रवासात Happy
मस्त लिहिले आहे!

माझा आवडता मारिओ - त्याचे वेगवेगळे ९९ गेम्स एका कॅसेट मध्ये होते ती घेतली. मग अजून एक कॉन्ट्रा म्हणून गेम ची कॅसेट घेतली. >>>>> तू मा ख मि +१

हवाई अड्डा vs विमानस्थल जोक Lol

कलकत्ता मेट्रोतून उतरताना उगीचच मनात मिले सूर मेरा तुम्हारा वाजत होते >> एकच नंबर. त्या गाण्यात मेट्रोतून उतरणार्‍यांच्या गर्दीत तू इमॅजिन झालास Happy

लेख आवडला हे वे सां न ल

कलकत्ता मेट्रोतून उतरताना उगीचच मनात मिले सूर मेरा तुम्हारा वाजत होते >>हे एकदम डोळ्यासमोर आलं.
लेख मस्तच जमलाय!
हवाई अड्डा vs विमानस्थल >>> Lol

छान लिहिलं आहेस रे. Happy
कलकत्ता मेट्रो +१००, स्लो मोशन मध्ये बाहेर पडणारा धनी Happy

छान लिहिलंय.
किती भ्रमनिरास झाला असेल तुझा तेव्हा.
पण आजही त्या निराशेपेक्षा, त्या प्रवासातील सगळ्या चांगल्या गोष्टी लख्ख आठवत आहेत.
फॅमिली सोबत मजा वेगळीच.

शर्मिला >> धन्यवाद Happy

ऋतुराज >> तू पण मारिओ वगैरे व्हिडिओ गेम वाला का Lol तू मा ख मि

टण्या >> अरे तो थिम मध्ये बसेल की नाही असेच वाटले होते. त्यामुळे गणेशोत्सवात न टाकता नंतर टाकला Happy

ऋन्मेऽऽष >> Happy

हर्पा >> तू पण मा ख मि Lol त्या गाण्यात मेट्रोतून उतरणार्‍यांच्या गर्दीत तू इमॅजिन झालास >> असे सगळ्यांत मागे मी पण आहे तिथे Happy

प्रज्ञा९ , हर्पेन, लंपन, वावे, ममो, सामी, किल्ली >> लेख आवडाला वाचून बरे वाटले. लिहिताना वाटले होते की किती जणांना आवडेल पण प्रतिसाद वाचून हुरूप आला Happy

झकास >> येस. अरे हो ना विमानात बसायला मिळाले नाही त्यामुळे बराच मूड ऑफ होता. पण नंतर ती नेपाळ - भारत सीमा पाहिली, उत्तर प्रदेशातले छोटे रस्ते , लहान गावं पाहिले त्यामुळे काही वाटले नाही.

झक्कास जमलंय प्रवासवर्णन!

गुळपोळ्या आणि तिखट शेव हा खाऊ शेवट्पर्यंत होता त्यामुळे विमानप्रवास हुकल्याचं तितकसं वाईट नाही Wink

- (भटक्या) सोकाजी

खूप छान लिहिले आहे.
सगळे डोळ्यापुढे उभे राहिले.
चौधरी वाले दुपारचे जेवण देत नाही हे वाचून पोटात खड्डा पडला आणि मी पटकन जेऊन घेतले..
लेख तुझ्या पाककृतीसारखाच खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत .....

एकदम जमून आलेला लेख... हवाईअड्डा vs विमानस्थल Lol

माझा आवडता मारिओ - त्याचे वेगवेगळे ९९ गेम्स एका कॅसेट मध्ये होते ती घेतली. मग अजून एक कॉन्ट्रा म्हणून गेम ची कॅसेट घेतली.
<<<<< मारिओ, कॉन्ट्रा.... काय आठवण करून दिलीस! उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी मावसभावंडं एकत्र जमलो की टीव्हीला त्या गेम कन्सोलचे कनेक्शन अखंड जोडून ठेवलेले असे. दुपारी उन्हात बाहेर जाऊ देत नसत तेव्हा गेम्स खेळण्यात वेळ जाई.