पुष्य तारकागुच्छात आलेला मंगळ!

Submitted by मार्गी on 12 October, 2026 - 12:15

नमस्कार. रात्रीचं आकाश कधीच निराश करत नाही. सतत तिथे विलोभनीय दृश्यं दिसत असतात. आकाशातले तारे, तारकासमूह, ग्रह, तारकागुच्छ, तेजोमेघ, आकाशगंगा आणि चंद्र- सूर्य असतातच. पण त्याव्यतिरिक्तसुद्धा वेगवेगळी सुंदर दृश्यं बघता येतात. काही दिवसांपूर्वी चंद्राने शुक्राचं पिधान केलं तेव्हा दोन कोरी एकमेकांजवळ दिसल्या. नंतर चंद्राला लागून मघा तारा दिसला. ३ नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास दक्षिण भारतातून चंद्राने केलेलं गुरूचं पिधान बघता येईल. उर्वरित भारतातून चंद्र आणि गुरू अगदी जवळ दिसतील.

अशीच एक घटना गेले दोन दिवस दिसते आहे. लालसर ग्रह मंगळ- पुष्य नक्षत्र तारकागुच्छ म्हणजे बीहाईव्ह क्लस्टरमध्ये आहे. डोळ्यांनी शहरामधून पुष्य नक्षत्राचा तारकागुच्छ सहजपणे दिसत नाही. पण बायनॅक्युलर किंवा दुर्बिणीतून हे सुंदर दृश्य पहाटेच्या आकाशात बघता आलं. पुढेही दोन- तीन दिवस मंगळ तारकागुच्छाच्या जवळ दिसेल. स्मार्टफोनच्या स्मदतीने शहरातूनसुद्धा ह्या दृश्याला फोटोमध्ये टिपता येऊ शकतं.

११ ऑक्टोबरच्या पहाटे मंगळ तारकागुच्छाच्या किंचित वर होता. त्या दिवशी ढगसुद्धा होते, त्यामुळे हे दृश्य तितकं स्पष्ट दिसलं नाही. आज म्हणजे १२ ऑक्टोबरच्या पहाटे चार नंतर आकाश निरभ्र होतं. बायनॅक्युलरमधून तांबूस मंगळ पुष्य नक्षत्र- बीहाईव्ह क्लस्टर म्हणजे मधाच्या पोळ्याच्या अगदी मध्यभागी आलेला दिसला. २४ तासांमध्ये त्याची हललेली स्थितीसुद्धा स्पष्ट दिसली. लालसर मंगळ आणि तारकागुच्छातले काही लाल तारे! बायनॅक्युलरला मोबाईल जोडून त्याद्वारे ह्या दृश्याचा फोटो घेता आला. आकाशातल्या अंधुक तार्‍यांचा फोटो घेताना एकत्र अनेक फोटो घेऊन ते सॉफ्टवेअरद्वारे एकत्र करावे लागतात (stacking). ह्या दृश्याचे असे ४२०+ फोटो घेऊन ते एकत्र केल्यावर हा फोटो मिळाला आहे. प्रत्येकी दोन सेकंदाचा एक फोटो आणि असे ४२० फोटो म्हणजे साधारण १४ मिनिटांचा प्रकाश ह्या फोटोमध्ये एकत्रित झाला आहे. अशा प्रकारे अनेक अंधुक तारे- तारकागुच्छ व तेजोमेघसुद्धा बघता येतात. माझे अशा प्रकारे घेतलेले फोटोसुद्धा माझ्या हँडलवर उपलब्ध आहेत.


मी घेतलेले फोटोज.

(ह्या माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध)

आकाश दर्शनाचे दिवस नव्हे रात्री सुरू झाल्या आहेत. शहरामधूनसुद्धा आपल्याला चंद्र, ग्रह, कृत्तिकासारखे तारकागुच्छ, मृगातला तेजोमेघ असे ठळक ऑब्जेक्टस बघता येतात.

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 12 ऑक्टोबर 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users