मी तरीही गात आहे

Submitted by मनोजकुमार देशमुख on 12 October, 2026 - 05:15

मी तरीही गात आहे

काजळीने दाटलेली एक वैरी रात आहे
उंबऱ्याशी एक छोटी तेवणारी वात आहे

संकटांची काय चिंता, वादळांची काय भीती?
माउलीचा आजही तो मस्तकी या हात आहे

ठेवले होते मनाला बांधुनी मी कैक वेळा
एकदा ती हासली की, निग्रहाला मात आहे

पाहती ना काम माझे, आडनावा शोधती ते
माणसाचा प्रश्न नाही, प्रश्न त्याची जात आहे

मोठमोठ्या घोषणांनी भूक भागे का कुणाची?
झोपली लाखो उपाशी, कागदी हा भात आहे

मैफिलीचे लोक गेले, ओस सारे भोवताली
फाटलेल्या काळजाने मी तरीही गात आहे

Group content visibility: 
Use group defaults