समन्वय (भाग २)

Submitted by पर्णीका on 11 October, 2026 - 22:11

||१||

चित्त-स्पंदन
("स्पंदन लहरींच्या लयीतून घेतलेला 'जाणीवे'च्या तळाचा वेध”)

​"जेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सच्या स्पंदनांची लय विश्वाच्या मूळ स्पंदनांशी जुळते, तेव्हा विज्ञानाच्या सीमा ओलांडून 'जाणीवे'चा प्रवास सुरू होतो. हा ब्लॉग म्हणजे केवळ वैद्यकीय संशोधनाची नोंद नसून, स्पंदनशास्त्राच्या माध्यमातून मानवी चित्ताचा घेतलेला एक सखोल शोध आहे.”

​समन्वय लेखमालिका: भाग १

​माझे वडील धनंजय तेलंग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर गावचे. त्यांचे शालेय शिक्षण भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी सैन्यात जाण्याचे ठरवले होते. शालेय शिक्षणानंतर NDA आणि IMA हे टप्पे पार करून बाबा १९८५ साली Second Lieutenant म्हणून भारतीय सैन्यातील Artillery विभागात रुजू झाले.

कारगिल युद्धाच्या साधारण वर्षभरापूर्वी बाबांचे प्रमोशन होऊन ते मेजर झाले होते. युद्ध सुरू झाले त्यावेळी ते ‘बॅटरी कमांडर’ या पदावर द्रास सेक्टरमध्ये कार्यरत होते. बॅटरी म्हणजे लढाऊ तोफांची तुकडी. बाबांच्या बॅटरीमध्ये सहा बोफोर्स तोफा होत्या आणि त्या पूर्ण वेळ १००% कार्यक्षम असतील हे निश्चित करण्याची जबाबदारी बाबांवर होती. कारगिलच्या युद्धात या सहाही तोफा शत्रूवर सतत मारा करत होत्या. पण एका निर्णायक क्षणी, एका तोफेच्या 'लोडिंग ट्रे'मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि तिचा 'फायरिंग रेट' मंदावला. युद्धाच्या त्या भीषण परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता; सहापैकी एक तोफ शांत राहणे परवडणारे नव्हते.

जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी बाबा सुरक्षित बंकर सोडून प्रत्यक्ष 'गन पोझिशन'वर गेले. ते जवानांना सूचना देत असतानाच, शत्रूच्या बाजूने डागलेला एक 'काउंटर-बॅटरी फायर' (प्रतिहल्ला) त्यांच्या अगदी जवळ येऊन आदळला. त्या भीषण स्फोटामुळे निर्माण झालेल्या 'Blast Overpressure Wave' ने त्यांना कित्येक फूट दूर फेकले. पाठोपाठ आलेल्या तोफगोळ्याच्या स्प्लिंटर्सनी त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण केली. पुढील एक महिना बाबा कोमात होते आणि डॉक्टर त्यांच्या मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्राव आणि सूज आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. सुदैवाने, त्या प्रयत्नांना यश आले. प्राथमिक उपचारानंतर बाबांना पुण्यातील लष्करी इस्पितळात हलवण्यात आले, जिथे प्रदीर्घ उपचार आणि फिजिओथेरपीनंतर एका वर्षात ते पुन्हा हिंडू-फिरू लागले.

शारीरिक जखमा भरल्या तरी पुन्हा सक्रिय सेवेत रुजू होण्यात नियमांचा अडथळा होता. त्यासाठी आवश्यक असलेली 'SHAPE-1' (S-Psychological, H-Hearing, A-Appendages, P-Physical capacity, E-Eyesight) ही सर्वोच्च वैद्यकीय श्रेणी मिळवणे आता अशक्य असल्याचे बाबांना ठाऊक होते. आर्टिलरी विभागावर आणि आपल्या तोफांवर प्रेम करणाऱ्या बाबांसाठी हा खरोखर परीक्षा पाहणारा काळ होता. मी त्यांच्या जागी असतो तर नक्कीच खचून गेलो असतो. पण बाबा मात्र जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला लष्करी गुप्तचर विभागात (Military Intelligence) जाण्याचा. धाडसी अशासाठी, की तिथे जाण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार होती.

वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी पुणे विद्यापीठात 'M.Sc. in Defence & Strategic Studies' पदवीसाठी प्रवेश घेतला. पदवी पूर्ण केल्यावर, त्यांची नियुक्ती दिल्लीतील 'DGMI - Strategic Analysis' विभागात 'GSO-2' (General Staff Officer, Grade 2) या महत्त्वाच्या पदावर झाली. तिथेही त्यांच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. २०१४ साली ते 'Deputy Director General of Military Intelligence' (DDGMI) या प्रतिष्ठित पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यातील 'Military Intelligence Training School and Depot' (MINTSD) मध्ये 'व्हिजिटिंग फॅकल्टी' म्हणून शिकवायला सुरुवात केली. त्यांचे हे शिकवणे पुढे कोविड आणि लॉकडाऊनच्या काळात थांबले.

​बाबांना पुण्यात उपचारांसाठी आणण्यात आले, तेव्हा अर्थातच त्यांच्याबरोबर मी आणि आईही पुण्यात आलो. माझे ५ व्या वर्गापासूनचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. १२ वी नंतर नागपूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये मी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना माझी रोहित सालफळेशी मैत्री झाली. आम्हाला दोघांनाही मानवी मेंदूमध्ये रस होता; पण आमच्या आवडीचे स्वरूप आणि एकूणच स्वभावप्रकृती एकदम भिन्न होती. रोहित त्याच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील डॉक्टर होता. त्याचे आजोबा आयुर्वेदाचार्य होते आणि वडील चंद्रपूरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आहेत. लहानपणापासून रुग्ण आणि त्यांचे आजार अगदी जवळून पाहिलेला रोहित अतिशय बुद्धिमान आणि समर्पित वृत्तीचा क्लिनिशियन आहे. त्याला मेंदूतील विकार आणि त्यांवरील प्रत्यक्ष उपचार यांत रस होता. मला मात्र मेंदूविकार जडण्याआधीच त्यांचा वेध घेऊन ते नष्ट करण्यात (P4 model of medicine: prediction, prevention, personalization and participation) रस होता. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर रोहित चंदीगडला गेला आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन न्यूरोलॉजिस्ट झाला. मी मात्र बेसिक सायन्सकडे वळलो आणि पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत आलो. पीएचडी, पोस्ट-डॉक असे टप्पे गाठत यथावकाश हॉपकिन्स विद्यापीठात येऊन स्थिरावलो.

डॉ. दीपंकर तेलंग, PhD
सहाय्यक प्राध्यापक, न्यूरोलॉजी विभाग
संचालक, The Center for Resonant Neuromodulation
हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन
बाल्टिमोर, MD २१२३५, USA
dtelang@hopkins.edu.md

Group content visibility: 
Public - accessible to all site users