मोजतो मी.

Submitted by vilasrao on 10 October, 2026 - 13:06

सांजवेळी ओसरीवर श्वास सारे मोजतो मी,
आणि विझलेले उरातिल ते निखारे मोजतो मी.

सुरकुत्यांची ही वही अन् आसवांची लेखणी ही,
राहुनी गेले जिवाचे ते इशारे मोजतो मी.

झोप डोळ्यांना अताशा ओळखेनाशी जहाली,
रात्रभर खिडकीत बसुनी फक्त तारे मोजतो मी.

सोबती गेले पुढे, भिंतीवरी उरल्या छब्या त्या,
एकटा उरलो, सुटे सारे सहारे मोजतो मी.

सावकारासारखा हा काळ दारी ठाण मांडे,
तारणी स्वप्नांतले जे, ते पिसारे मोजतो मी.

ताळमेळाच्या वहीवर शेवटी ही शून्य बाकी,
पण तुझ्या प्रेमातले जपले शहारे मोजतो मी.

विलासराव

Group content visibility: 
Use group defaults

आवडली...

सोबती गेले पुढे, भिंतीवरी उरल्या छब्या त्या,
एकटा उरलो, सुटे सारे सहारे मोजतो मी.

ताळमेळाच्या वहीवर शेवटी ही शून्य बाकी,
पण तुझ्या प्रेमातले जपले शहारे मोजतो मी.

आवडली गझल

सुंदर ..!

आणि विझलेले

इथे मीटर गंडले आहे. वीझलेले हवे पण ते फारच odd वाटते.

शेर मेन गजलेच्या थीमला धरूनच असायला हवेत असे काही नाही म्हणून मी ही हात साफ करून घेतो..

क्षक्ष म्हणे ऐशा नरा, फूल द्या ओंजळीतूनी,
परंतु मारलेले पैजार सारे मोजतो मी..

क्षक्ष च्या जागी गजलकराने आपापले पेट नेम घालावे. तुका नको नाहीतर संस्कृतीरक्षक अंगावर येतात.