पांढर्‍यावर काळे, पांढरे म्हणजेच काळे? भर्गोदेवस्य धीमहि

Submitted by हरचंद पालव on 10 October, 2026 - 09:29

लेखाच्या सुरुवातीलाच आगाऊ सूचना किंवा ज्याला डिस्क्लेमर म्हणतात, ते म्हणजे

  • ही चर्चा काही मूलभूत गृहितकांवर आधारित असलेल्या भाषा/व्युत्पत्ती सिद्धांतांवर अवलंबून आहे. ते सिद्धांत आज पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत, पण या विषयात मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले आहेत, त्यावर अजूनही खूप संशोधन चालू आहे, नवनवीन माहिती समोर येत आहे तसे ते त्यानुरूप सुधारलेही जात आहेत.
  • दुसरी आगाऊ सूचना म्हणजे भाषा, व्युत्पत्ती, इतिहास हे माझ्या अभ्यासाचे विषय नाहीत. तरी पण त्या विषयावर मी चर्चा करतो आहे. इथे त्या विषयात पारंगत असलेले अनेक लोक आहेत आणि ते या लेखाची खिल्ली उडवू शकतील ही शक्यता मला मान्य आहे. तो धोका पत्करून मला त्यातल्या त्यात जी माहिती मिळाली ती आपणासमोर ठेवतो आहे. जाणकारांना यापेक्षा अधिक किंवा याला छेद देणारी काही माहिती असल्यास त्या चर्चेचेही स्वागत आहे.
  • हा एक प्रतिसाद म्हणून शब्दवेध व शब्दरंग या धाग्यासाठी लिहायला घेतला. पण पाल्हाळ इतके वाढले की स्वतंत्र धागा म्हणूनच इथे डकवावासा वाटला.

------------------------------------
आता थोडे पांढर्‍यावर काळे.

अनेक वर्षांपूर्वी जी आर ई साठी तयारी करताना 'वर्ड पॉवर मेड इझी' नावाचे पुस्तक हातात पडले आणि मी ते एखादी कादंबरी वाचावी तसे वाचून काढले. सहसा त्या परीक्षेसाठी इंग्रजी शब्द पाठ करणे असा प्रघात होता, परंतु हे पुस्तक मात्र विविध शब्दांचे मूळ काय आहे, त्यातून वेगवेगळे शब्द कसे तयार झाले ह्याची चर्चा करते. मला ते वाचायला खूपच मजा आली. म्हणजे उदा. अ‍ॅटम शब्दाचे मूळ अ - टोमोस, टोमोस म्हणजे तोडणे/विभागणे, आणि जे तसे करता येत नाही तो अ-टोमोस - अ‍ॅटम. मग तुटक तुटक वाटणारे शरीर असलेले ते एन्टॉमॉस / एन्टॉमॉन (कीटक) आणि त्यांचा अभ्यास म्हणजे एन्टॉमॉलॉजी; एन + टॉमॉस = इन + सेक्ट (कारण सेक्ट म्हणजे पण तोडणे) = इन्सेक्ट. त्यात लॅटिन, ग्रीक वगैरे शब्दातून हे असे इंग्रजी शब्द कसे आले वगैरे तपशील इतक्या वर्षांनंतरही आठवत आहेत.

शब्दांचे मूळ शोधण्याची आवड अजूनही कायम आहे. नुकताच एक यूट्यूब चॅनल पाहण्यात आला. तो माणूस इंग्रजीतील शब्दांचे विविध विषय घेऊन त्यांच्या मुळाबद्दल खूप छान व्हिडिओ बनवतो. त्याचा एक व्हिडिओ रंगांबद्दल होता. त्यातल्या काळ्या रंगाबद्दलची माहिती फारच अफलातून वाटली.

ब्लॅक हा शब्द. तो जुन्या इंग्रजीतील ब्लेक (blæc - याचा उच्चार मला ठाऊक नाही; अर्थ = काळा, शाई इत्यादी) पासून आला. तो जुना शब्द प्रोटो-जर्मॅनिक भाषेतल्या ब्लॅक्काझ (blakkaz = जळालेले) पासून आणि तो शब्द प्रोटो-इंडो-युरोपियन 'भ्लेग?' किंवा भेल या मूळ धातूपासून (bhleg-/bhel-= चमकणे/जळणे/उजळणे) आला आहे. आता माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडेल की हे प्रोटो-जर्मॅनिक किंवा प्रोटो-इंडो-युरोपियन काय प्रकार आहेत? आणि ह्यात इंडो कुठून आला? सांगतो पुढे. त्याआधी आणखी काही मजेशीर गोष्टी सांगतो.

लक्षात घ्या की वरचे जुन्या भाषांतले शब्द जळण्याशी संबंधित आहेत. आता आपण समजतो की संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे, तशी लॅटिन, प्राचीन ग्रीक किंवा अशी कुठली प्रोटो-जर्मन वगैरे भाषा ही जर युरोपीय भाषांची जननी असेल तर त्या सगळ्या भाषांमध्ये साधारण ब्लॅकशी साधर्म्य असलेले शब्द असले पाहिजेत. आहेत ना! जुनी जर्मन blach (=काळा), जुनी नॉर्स blakkr (अंधार), डच भाषेत blaken (=जाळणे), स्विडीश bläck (शाई) हे शब्द आहेत. पण आणखी काही ह्याच मुळातून निघालेले असे शब्द आहेत जे चक्क पूर्णपणे विरुद्धार्थी आहेत. उदा. फ्रेंच blanc म्हणजे पांढरा. त्यापासून इंग्रजीत आलेला आपल्या परिचयाचा blank हा शब्द. त्याशिवाय ब्लीच (= पांढरे करणे), ब्लेझ (= ज्वाळा/झगमगाट) वगैरे शब्द पण एकाच मुळाशी जाऊन भिडतात.

आता हे परस्पर विरुद्धार्थी शब्द एकाच मूळ शब्दातून कसे काय निघाले असतील? तर म्हणे जळणे म्हणजे त्यातील ज्योत्/ज्वाळा यांचा रंग घ्यायचा की मागे उरलेल्या कोळसा/काजळी यांचा रंग घ्यायचा ह्यात दोन भाग पडलेले दिसतात. काही भाषांमध्ये त्यामुळे उजळ पांढरा रंग हा अर्थ दिसतो तर काही भाषांमध्ये गडद, काळा रंग हा अर्थ दिसतो.

मग माझी उत्सुकता अधिकच चाळवली गेली. प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेत जसे युरोपियन भाषांतील शब्दांचे मूळ आहे, तसे इंडो-भाषांचे पण आहे. मग वरच्या भ्लेग मधून आपला कुठला परिचयाचा शब्द आहे काय याची थोडीफार धुंडाळणी केली. संस्कृतात (अर्थातच) भ्रज् हा धातु आणि भर्ग हा शब्द त्याच्याशी नाते सांगतो अशी माहिती मिळाली. अर्थातच भर्ग म्हणजे तेजःपुंज, दीप्तिमान, चमकणारा असल्याने सवितृमंत्रातील 'भर्गोदेवस्य धीमहि' लगेचच आठवला.

आता वळूया प्रोटो-इंडो-युरिपियन या विषयाकडे, ज्यात ह्याचे मूळ असल्याचे सांगितले जाते. तर अशी कुठली भाषा असल्याचा एकही थेट पुरावा उपलब्ध नाही. मग ही भाषा काय आहे? त्यातले शब्द कुठून मिळाले?

विविध भाषाशास्त्रज्ञांनी अभ्यासांती पुनर्रचित केलेली म्हणजे रीकन्स्ट्रक्टेड अशी ही भाषा आहे. साधारण इसपू ४५०० ते इसपू २५०० काळात कॅस्पियन आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेकडच्या भागात अशी भाषा बोलली जात असल्याचे मानले जाते. त्यात 'कुर्गन हायपॉथिसिस' नावाचे गृहितक आहे, ज्यानुसार मानवी समूह जगाच्या विविध भागात कसे पसरले ह्याबाबत काही सिद्धांत मांडले आहेत. हे मानवी समूह जसे पसरले तसे त्या त्या भागातील उच्चार, व्याकरण, शब्दसंपदा याबाबत फरक पडत गेले, त्यांपासून आणखी अनेक बोली निर्माण झाल्या. आज त्यांना प्रोटो-जर्मनिक, प्रोटो-अर्मेनियन, प्रोटो-ग्रीक, प्रोटो-इटॅलिक, प्रोटो-इंडो-इराणियन इत्यादी नावे आहेत. काहींच्या मते ह्या भाषा नसून भाषासमूह मानले पाहिजेत. मग त्यातल्या प्रोटो-इंडो-इराणियन समूहात येते ती आपली जुनी (प्राचीन) आर्ष किंवा वैदिक संस्कृत. ही संस्कृत आपण जी शाळेत शिकतो त्या संस्कृतपेक्षा थोडिशी वेगळी आहे. शाळेत शिकवली जाणारी ही पाणिन्योत्तर काळातली , जिला अभिजात संस्कृत म्हटलं जातं, ती आहे. त्याउलट वेदांमधल्या संस्कृतात अनेक असे शब्द, संधीनियम, उच्चार आहेत जे आजच्या संस्कृतात बसत नाहीत. उदा. एकराट् / एकराड् + इति ही संधी 'एकाराळिति' अशी जुन्या संस्कृतात होते (मंत्रपुष्पांजलीतला हा शब्द परिचयाचा असेल), जे आजच्या संस्कृतात होत नाही. त्या जुन्या संस्कृतात बदल होत होत आणि पुढे पतंजली, पाणिनि वगैरे भाषातज्ज्ञांच्या कार्यानंतर तिला आजचे स्वरूप आले.

हवाईजादा पिक्चरच्या ट्रेलरमध्ये एक असा काहीतरी डायलॉग होता की मातृ से बना मदर, पितृ से बना फादर, भ्रातृ से ब्रदर, दुहितृ से डॉटर वगैरे. आणि हेन्स प्रूव्ह्ड की संस्कृतपासून सगळ्या भाषा निर्माण झाल्या आहेत. मला पण लहानपणी हेच खात्रीलायक वाटायचे. अर्थात हा पण एक हायपॉथिसिस आहे, हे मान्यच; पण तो मान्य व्हायला आणखी काही पुष्टी देणार्‍या बाबींची गरज असते. आधुनिक विज्ञानातील पुरातत्वजनुकशास्त्र (आर्किओजेनेटिक्स) आणि विविध भागांतील मानवी डिएनएंचा अभ्यास हा कुर्गन हायपॉथिसिसला पूरक ठरला आहे. काही बाबतीत तो हायपॉथिसिस थोडा बदलावाही लागला आहे. उदा. नवीन अभ्यासानुसार हे मानवी समूह काही ठिकाणी आक्रमक नव्हते तर स्थलांतरकर्ते होते असेही दिसते आहे. अर्थात इतिहास हा केवळ आक्रमणांचा आणि त्याला बळी पडणार्‍यांचाच असायला हवा असे नाही, पण म्हणून काही सर्वच बाबतीत आक्रमण झालेच नाही आणि सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत होते असे मानण्याचे कारण नाही. याबाबत संशोधनाला फारच वाव आहे.

तर आजपासून साधारण २-३ शतकांपूर्वीच लोकांना असा प्रश्न पडला होता की ह्या सगळ्या भाषांमधले शब्द कानाला सारखेच का वाटत आहेत. त्यातून अभ्यासाची एक तौलनिक पद्धत पुढे आली व ती वापरून जुन्या, जुन्यात जुन्या शब्दांचा शोध किंवा त्यांची पुनर्रचना करायचे काम चालू झाले (थोडक्यात विविध आशियाई आणि युरोपीय भाषांची त्यांनी आई-माई एक केली). ते काम अजूनही चालूच आहे. नवनवीन (प्राचीन) शब्दांची त्या संग्रहात भर पडते आहे. नवीन संशोधन काही नवीन वळणे दाखवत आहे. त्या सर्व संशोधकांच्या बुद्धीला तो ज्ञानरूपी भर्ग प्रचोदना देवो. धियो यो नः प्रचोदयात् !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच रोचक माहिती.
शब्दांच्या व्युत्पत्तीत अगदी गुंगून जायला होते.

वेगळ्याच विषयावरचा रोचक लेख आहे.
>>>>त्या सर्व संशोधकांच्या बुद्धीला तो ज्ञानरूपी भर्ग प्रचोदना देवो. धियो यो नः प्रचोदयात् !
वाह!

हर्पा, विचार प्रवर्तक सुरुवात.

१ संस्कृती आणि भाषेचा विकास यांचा घनीष्ट संबंध असतो.
२ वैदिक काळात संस्कृत ही विकसीत भाषा होती हे मान्य करावे लागेल. म्हणजे ती संस्कृती काही प्रमाणात तरी विकसीत होती.
३ वेदांचा काळ उशीरातल्या उशीरा १५०० इ.स.पू धरला तर त्या काळात ज्या संस्कृती होत्या त्या बहुतेक एशिआ खंडात होत्या - अपवाद इजिप्त (अफ्रिकेचे एशिआकडचे टोक) आणि ग्रीस (युरोपचे एशिआकडचे टोक). म्हणजे एशिआ हा सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला होता. एशिआ हा विकसीत/ मुख्य खंड आणि युरोप आणि अफ्रिका हे त्याचे suburb अशी स्थिती.
४ From (1) we get - एशिआतल्या भाषा जास्त विकसीत असणार.
५ भाषांची देवाण घेवाण नक्कीच झाली. From (4) we get एशिअन भाषांमधून देवाण जास्त झाली असणार.

मग जुन्या भाषेला प्रोटो-एशिअन ऐवजी प्रोटो-युरोपिअन का म्हटले जाते? त्याबद्दल वाचायला आवडेल.

प्रोटो-जर्मन हे तर हास्यास्पदच आहे. आपल्याकडे जसे पु.ना.ओक तसा जर्मनीत मॅक्समुल्लर असावा Wink

इन्डो युरोपियन भाषासमूह हा जगातला सगळ्यात मोठा भाषा समूह आहे. जवळपास पन्नास टक्के लोक कुठली ना कुठली इंडो युरोपियन भाषा बोलतात.
दुसरे भाषा समूह : सायनो-तिबेट, अफ्रो अशियाई, द्रविड, ऑस्ट्रोनेशियन, तुर्की, अमेरिकन, मायन वगैरे. तुलनेने लहान आहेत. काही भाषा नक्की कशा जन्मल्या. आणि त्या कुठल्या भाषा समूहात आहेत की नाहीत याबद्दल वाद आहेत.

प्रोटो इंडो युरोपियन अशी भाषा अस्तित्त्वात होती जी समस्त इंडो युरोपियन भाषांची पूर्वज होती. अर्थात ती इतक्या जुन्या काळात होती की तेव्हा लिखाण अस्तित्त्वात नसावे. त्यामुळे नंतरच्या भाषांनी स्वर आणि व्यंजन ज्याप्रकारे बदलत नेले ते पाहून त्यांचे मूळ रुप ओळखायचा प्रयत्न केला गेला.
हा भाषाशास्त्रज्ञांसाठी मोठा अभ्यासाचा विषय आहे. मध्य अशियात हजारो वर्षांपूर्वी ही पूर्वज भाषा बोलली जात असावी. नंतर हळूहळू त्यातील लोक वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झाले. हवामानातील बदल (हो, तेव्हाही क्लायमेट चेंज होत होते) होत होते तसे लोक अन्यत्र जात, कधी पुन्हा मूळ जागी परत येत असे करत करत ते यथावकाश सर्वदूर पसरले आणि त्याबरोबर त्यांच्या भाषा बदलत गेल्या अशी मांडणी आहे.

प्राचीन अस्थि अवशेषांपासून डी एन ए तपासायचे तंत्र गेल्या चाळीस वर्षात विकसित झाले आहे त्याची ह्या स्थलांतराबद्दल माहिती मिळवण्यासाठी खूप मदत झाली आहे.
जर प्राचीन काळातले ध्वनी हाडे, भांडीकुंडी याप्रमाणे पुन्हा ऐकता आले तर भाषांची अनेक रहस्ये उघडतील. पण ते आज तरी शक्य नाही!

अवांतरः
असे वाचले आहे की १००० ते ३००० वर्षांपूर्वी जगात २० हजार ते ७० हजार भाषा बोलल्या जात असत. अनेक विभक्त समाज होते ज्यात इतक्या भाषा बोलल्या जात. प्रत्येक भाषा त्या त्या भागातील लोकांनाच अवगत होती.
आज जगात इतकी प्रचंड लोकसंख्या असताना केवळ ७५०० च्या आसपास भाषा बोलल्या जातात. कारण मोजक्याच लोकांना कळणार्या भाषा यथावकाश लुप्त झाल्या.

पण हे एक अद्भूत जग आहे हे नक्की.

मस्त लिहिलं आहेस!
भाषेची जडणघडण, शब्दांची व्युत्पत्ती आणि भाषा आणि राहणीमान/संस्कृती यांचं समोरासमोर ठेवलेल्या आरशांसारखं एकमेकांत पडणारं प्रतिबिंब हे फार फार इन्टरेस्टिंग विषय आहेत खरंच!

पहिले वाक्य - लेखाच्या पासून आहे पर्यंत वाचले.
मग लक्षात आले की ॲनालिसिस अँड सिंथेसिस ऑफ मेकॅनिझम हा महाभयानक पेपर ( काठाकाठाने का होईना) सुटल्यावर आपण इतके कॉम्प्लेक्स लिखाण वाचले नाही.
तर ती सवय सुटून य वर्षे झाली आहेत.
तस्मात् मला रोज एक किंवा दोन वाक्ये वाचून वाचून या लेखाचे पारायण पूर्ण करावे लागेल.
पण मी परत येईन, मी परत येईन, मी परत येईन..
... आणि लेख आणि प्रतिसाद वाचेनच...

अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. छान लिहिलं आहेस. फारसी शिकताना पहिल्या तासाला प्रोटो इंडो इरानियन हाच विषय होता, हे नीटच आठवत आहे. एक छान तक्ता काढला होता मास्तरने, माझ्या वहीत असावा. तो तक्ता इथे देणार होतो, पण वही आता सापडत नाहीये. इथेच देईन नक्की. आवेस्तान आणि संस्कृत मध्ये बरीच साम्य स्थळे आहेत, त्या बहिणी बहिणी (एकाच भाषा कुळातल्या) आहेत असे शिकल्याचे आठवते. तू, भरतजी, अस्मिता, अमित, स्वाती आंबोळे, डॉक्टर, मानवजी, ऋतू आणि इतर माबोकर भाषा प्रेमींनी फारसी शिकावे असे मलाच खूप वाटते, तुम्हाला फार काही छान, उत्कट गवसेल ह्याची हमी मी देतो Happy मराठी, उर्दू, संस्कृत आणि फारसी ह्यांचे जे काही पायात पाय आहेत त्याची इतकी गंमत वाटते शिकताना. ह्या सगळ्याच भाषा कशा विकसित झाल्या असतील आणि त्यांना आजचे हे स्वरूप कसे आले असेल हे खरेच केवढे मोठे कोडे आहे.