
१९८६: जेव्हा मी ‘हवाई सुंदरी’च्या राज्यात पाऊल ठेवले!
१९८६ सालची ही गोष्ट. तेव्हा मी ‘मायको’त (आताची बॉश) असिस्टंट इंजिनियर म्हणून कामावर होतो. (प्रवासाची एन्टायटलमेंट: सेकंड स्लीपर क्लास+ रिक्शा+ एशियाड!) त्या काळात विमानप्रवासाचा हक्क फक्त कंपनीच्या महाव्यवस्थापक पदावरील (’उच्च-भ्रू- म्हणजे भ्रुकूटी देखील) अतिमानवांनाच असायचा (ते विमानातून प्रवास करून आल्यावर कधी कधी तिथून ढापलेली चॉकलेटे द्यायचे); साध्यासुध्या कर्मचाऱ्यांसाठी हे निव्वळ स्वप्नच होते. पण अचानक हैदराबादच्या एका मशीन टेस्टिंगचे ‘इमर्जन्सी’ काम उपटले आणि कंपनीने खास परवानगी काढून मला थेट मुंबई ते हैदराबाद विमानाचे तिकीट दिले. हातात ते छोट्या पुस्तिकेसारखे दिसणारे रंगीबेरंगी तिकीट आले आणि माझा छातीचा घेर अचानक चार इंचांनी फुगला!
त्यानंतर घडलेला तो अतरंगी प्रवास:
नातू थेट आकाशातून उडणार ही बातमी कळताच माझ्या बेळगावच्या आजी-आजोबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आमच्या संपूर्ण खानदानात विमानात पाऊल ठेवणारा मी पहिलाच पठ्ठ्या होतो! हा आनंद त्यांना पोटात साठवून ठेवता आला नाही, म्हणून त्यांनी मला खास एक लांबलचक पत्र पाठवले. त्याचा काहीस आशय असा होता- देवाचे आभार, “बाळा, तू आमचे आणि कुळाचे नाव थेट आभाळात नेऊन पोहोचवलेस!” असा भरभरून वाहणारा अभिमान आणि सोबत “विमानात नीट जपून राहा, खिडकीतून बाहेर हात काढू नकोस” असा अलिखित पण अशा मायेने भरलेल्या सूचनांचा आशय होता. ते पत्र वाचून मला आपण अंतराळात पहिल्यांदा पाऊल ठेवणारे ‘नील आर्मस्ट्राँग’ असल्याचाच भास होऊ लागला होता!
मी नाशिकहून मुंबईला लोकल ट्रेनने निघणार होतो. पण त्याआधीच माझ्या विमानप्रवासाची बातमी संपूर्ण कॉलनीत वाऱ्यासारखी पसरली होती. ज्या मित्रांच्या नशिबात हा ‘एक्झिक्युटिव्ह कोटा’ नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावरचा जळफळाट पाहण्यासारखा होता. तो धूर शांत करण्यासाठी मी मुद्दाम बाजारात जाऊन चकचकीत नवीन सुटकेस आणि करकर वाजणारे नवे शूज खरेदी केले.
अखेर सांताक्रूझ विमानतळावरून त्या लोखंडी पाखरात पाऊल ठेवले. चेहऱ्यावर ‘मी तर रोजच विमानातून फिरतो’ असा गंभीर आव आणला खरा, पण मनात प्रचंड भीती होती. सर्वांत मोठी आफत आली ती सीटबेल्ट लावताना! डाव्या हातात एक पट्टा, उजव्या हातात दुसरा... तो एकमेकांत अडकवून आवळायचा कसा, हे समजेना. आजूबाजूला कोणी बघत नाही ना, याची खात्री करत, चोरासारख्या नजरेने कशीबशी ती कसरत पार पाडण्याच्या प्रयत्नात असताना “ती” सुगंधी वार्यासारखी आली आणि पट्टा बांधून गेली.
विमान टॅक्सी करू लागले ( टॅक्सी या शब्दाचा विमानक्षेत्रातील अर्थ माझ्या बाजूच्या सीझन्ड सहप्रवाशाकडून कळला). आता इंजिनाचा भयानक आवाज वाढला आणि विमान धावपट्टीवर वाऱ्याच्या वेगाने धावू लागले. क्षणात विमानाचे नाक आकाशाच्या दिशेने वर झाले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला! टेकऑफच्या त्या धक्क्याने माझे पोट थेट पाठीला चिकटले आणि डोळे गच्च मिटले गेले. लहानपणी जत्रेतल्या पाळण्यात बसल्यावर जी उलथापालथ व्हायची, अगदी तशीच अवस्था झाली; फरक एवढाच की इथे खाली पडलो तर थेट स्वर्गातच गेलो असतो!
टेकऑफनंतर थोडी शांतता पसरली आणि खरी उत्सुकता सुरू झाली ती विमानातल्या जेवणाची! सुंदर एअर-होस्टेस अन्नाची ट्रॉली घेऊन एकेकाला ट्रे वाटत पुढे येत होती. त्या ट्रेमधून येणारा खमंग वास नाकात भरत मी जिभेवर नियंत्रण ठेवून बसलो होतो. त्या काळात इंडियन एअरलाइन्सचे जेवण आकर्षण असायचे.. ती अगदी माझ्या सीटजवळ आली, तिने ट्रे काढला आणि माझ्या हातात देणार... इतक्यात विमानाला एक झटका बसला! कॅप्टनने मायक्रोफोनवरून धाडकन घोषणा केली—"लेडीज अँड जेंटलमन, वी आर पासिंग थ्रू अ सिव्हिअर टर्ब्युलन्स... प्लीज फास्टन युअर सीटबेल्ट्स इमर्जन्सी बेसिसवर!" ती एअर-होस्टेस जेवणाची ट्रॉली मागे ओढत पळाली, ती जी पडद्याआड गेली ती परत कधी बाहेर आलीच नाही! विमान कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हेलकावे खात होते, तर कधी थेट खोल खड्ड्यात पडल्यासारखे खाली झेपावत होते. नाशिकच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची सवय होती, पण आकाशात इतके जीवघेणे खड्डे असतील याची कल्पनाच नव्हती. शेजारी बसलेला प्रवासी सांगत होता की याला ‘टर्ब्युलन्स’ म्हणतात. मी मनात म्हटले, "हा टर्ब्युलन्स वगैरे काही नाही, या वैमानिकाने नक्कीच विमानाचे स्टेअरिंग नीट पकडलेले नाही!" मी डोळे मिटून आजी-आजोबांनी पत्रात सांगितलेल्या देवांचा धावा सुरू केला. हे सगळे धक्के आणि हादरे शांत होईपर्यंत थेट खाली उतरण्याची वेळ झाली होती; त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या ‘हवेतल्या जेवणावर’ टर्ब्युलन्सने अक्षरशः पाणी फेरले!
हवेत तरंगताना टॉयलेट बघायला जाणे म्हणजे माझ्यासाठी एखाद्या अंतराळ मोहिमेपेक्षा कमी नव्हते. ते लहानसे दार, आतली चमक आणि एका बटणावर पाण्याचा गट्टू होणारा आवाज... सर्वच निव्वळ अजूबा!
दरम्यान, पोटात भुकेचा डोंब उसळला असताना सीटच्या पुढच्या खिशात ठेवलेले ते चकचकीत विमानाचे मासिक (In-flight Magazine) मला इतके भावले की मी न राहवून जेवणाचा बदला म्हणून ते ‘ऐतिहासिक पुरावा’ म्हणून उतरताना गुपचूप सुटकेसमध्ये सरकवून घेतले, मला वाटलं मीच हे केलं पण माझ्यासारखे बरेच हेच करत असल्याचं मला हळूच दिसलं.
हैदराबाद जवळ आले आणि विमानाने खाली उतरायला सुरुवात केली. ढगांमधून खाली येताना विमान जेव्हा जोराने थरथरले, तेव्हा मी उरलेसुरले सगळे श्लोक एका श्वासात म्हणून काढले. धावपट्टीला चाके टेकताना एक मोठा ‘धडाम’ आवाज झाला, विमान दोनदा उडाले आणि मी पुन्हा सीटला घट्ट चिकटलो. विमान थांबल्यावर सगळ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला, पण माझ्या तोंडातून नकळत ‘विठ्ठल... विठ्ठल...’ बाहेर पडले!
लँडिंगच्या भीतीतून सुटलो नाही तोच सामान गोळा करताना नवा तमाशा सुरू झाला. सामान परतीच्या त्या फिरत्या पट्ट्यावर (Luggage Belt) एक-एक करून सगळ्या प्रवाशांच्या बॅगा येत होत्या आणि लोक आपापले सामान घेऊन निघून जात होते. एकेक बॅग कमी होत गेली तशी माझी छाती धडधडू लागली. दहा बॅगा उरल्या... पाच... दोन... आणि शेवटी पट्टा रिकामा फिरू लागला! माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली—“माझी नवीकोरी सुटकेस गेली! ती मुंबईतच राहिली की आकाशातून खाली पडली?” घाम फुटून मी एअरपोर्ट कर्मचाऱ्याकडे तक्रार करायला धाव घेणार, इतक्यात त्या रिकाम्या पट्ट्यावर अगदी शेवटी माझी एकुलती एक नवी सुटकेस अगदी ऐटीत, लाजत-मुरडत प्रकट झाली! तो क्षण पाहून मला हरवलेले राज्य परत मिळाल्यासारखा आनंद झाला.
हैदराबादेत ज्या मशीन टूल सप्लायरकडे मी गेलो, त्यांच्या स्वागताचा थाटच वेगळा होता. त्या काळात फक्त सीनिअर एक्झिक्युटिव्ह आणि मोठे साहेबच विमानाने फिरायचे. मी मुंबईहून थेट उडून आलोय हे पाहून त्यांनी मला कोणीतरी अवाढव्य 'डायरेक्टर लेव्हल'चा बडा बाबू समजून डोक्यावरच घेईल असा माझा भ्रम होता आणि त्याचाही असावा असा माझा कयास होता. मीही त्या भ्रमावर अजिबात पाणी फिरवले नाही (पण गोम अशी होती की त्याने मला व्हिजिटिंग कार्ड विचारल्यावर मी कसानुसा चेहरा करत ’विसरलो” हे उत्तर दिले तेव्हाच त्या पठ्ठ्य़ाला माझी औकात कळली असावी पण करतो काय मी 25 लाखाचे मशीन पास करणार होतो ना... अडला हरी तो!
नाशिकला परतल्यावर अनेक दिवस मी मित्रमंडळींना सोडले नाही. इंग्रजीतल्या त्या गोड आवाजातील एअर-होस्टेसच्या घोषणांची मी हुबेहूब नक्कल करून दाखवायचो: “लेडीज अँड जेंटलमन, कॅप्टन हॅज टर्न ऑन द सीटबेल्ट साइन...” आणि वर मिजास अशी की, "मला इंग्रजीतल्या सगळ्या सूचना एका शब्दाच्या फरकाशिवाय समजल्या बरं का!"
त्यानंतरच्या आयुष्यात कामानिमित्त मी अवघे जग पालथे घातले, अगणित देशांमध्ये विमानाने उड्डाणे केली, आलिशान बिझनेस क्लासचे पंचपक्वान्न खाल्ले... पण खरं सांगू? खिडकीबाहेर पसरलेले पांढरे ढग बघून छातीत होणारी ती विलक्षण धडधड, नवीन शूजचा तो सुवास, ते हुकलेले आकाशातील जेवण, हरवलेली ती भोळी उत्सुकता आणि आजी-आजोबांच्या त्या पत्रातला ओलसर झालेला अभिमान... ते सगळे पुन्हा कधीच अनुभवायला मिळाले नाही. विमानप्रवास आता केवळ ‘अ’ ठिकाणाहून ‘ब’ ठिकाणी जाण्याचे एक कोरडे साधन झाले आहे; पण मनाच्या कोपऱ्यात मात्र आजही १९८६ चे ते थरथरते विमान, ती शेवटी आलेली सुटकेस आणि ते हरवलेले निष्पाप दिवस तसेच हळवे होऊन साचून राहिले आहेत...
एकच नंबर
एकच नंबर