--------------------------------------------------------------------------------------------------------------------
कॉलेज बदलायचं होतं… पण त्या दिवशी माझाच विचार बदलला भाग ८.२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऑफिसमध्ये जाऊन clerk ला विचारलं,
“Sir, college change करायचं असेल तर procedure काय आहे?”
त्याने माझी file काढली.
कागदपत्रं पाहिली.
आणि मोठ्याने नाव घेतलं
“ज्ञानदेव कोळी?”
क्षणभर मी आजूबाजूला पाहिलं.
मग हळूच म्हणालो
“हो… मीच.”
त्याने file पुन्हा पाहिली आणि म्हणाला,
“तुझ्या वडिलांनी तुझ्या admission साठी management कडून विशेष परवानगी घेऊन 50% fee concession मंजूर करून घेतली आहे.”
मी स्तब्ध झालो.
तो पुढे म्हणाला,
“तुला college change करायचं असेल तर ही concession मिळणार नाही. पूर्ण fee भरावी लागेल.”
माझ्या डोक्यातलं सगळं अचानक शांत झालं.
मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती.
मला वाटत होतं अण्णांनी माझी पूर्ण फी भरली आहे.
पण त्या file मधून मला पहिल्यांदा समजलं
माझ्या शिक्षणासाठी अण्णा कुणाकुणाला भेटले असतील… किती विनंत्या केल्या असतील… किती वेळा management समोर उभे राहिले असतील…
ज्या माणसाला मी लहानपणापासून दुसऱ्यांची छोटी-मोठी कामं करताना पाहिलं होतं…
तोच माणूस आपल्या मुलाने मोठं व्हावं म्हणून पुन्हा कुणासमोर तरी विनंती करत उभा राहिला होता.
आणि मला याची कल्पनाही नव्हती.
डोळे अचानक जड झाले.
त्या क्षणी मनीषा, गोड, तिखट, राहुलची plate theory…
सगळं खूप छोटं वाटायला लागलं.
मी clerk कडे पाहिलं आणि शांतपणे म्हणालो
“Thank you, Sir. मला college change करायचं नाही.”
त्या एका वाक्यात माझा निर्णय बदलला होता.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला
“अमोल…! अमोल…!”
मी मागे वळलो.
निलेश धावत येत होता.
तो दमलेल्या आवाजात म्हणाला,
“तुझ्या… तुझ्या वडिलांचा फोन आहे!”
मी फोन हातात घेतला.
पलीकडून अण्णांचा आवाज
“बोल रे बाळा. सकाळी फोन केला होतास म्हणे? काही problem आहे का? काही मदत हवी आहे का? पैसे पाहिजेत का?”
मी काही क्षण शांत राहिलो.
श्वास घेतला.
मला त्यांना सांगायचं होतं
“अण्णा, मला कॉलेज बदलायचं होतं…”
पण तेवढ्यात माझी नजर समोर गेली.
कॉलेजच्या दिशेने मनीषा एका वर्गमित्रासोबत येत होती.
दोघेही बोलत होते.
हसत होते.
एकमेकांच्या company मध्ये आनंदी दिसत होते.
क्षणभर मला श्वास घ्यायलाच विसरल्यासारखं झालं.
फोनवरून आवाज येत होता
“अमोल…?”
मी काही बोललो नाही.
“अमोल? ऐकू येतंय ना?”
आणि अचानक मला आठवलं
मी अण्णांशी फोनवर बोलतोय.
मी स्वतःला सावरलं.
“अण्णा…”
मी त्यांना अण्णाच म्हणायचो.
“काही नाही. काळजी करू नका. सकाळी एवढंच सांगायला फोन केला होता की मी दोन-तीन दिवसांसाठी घरी येतोय.”
एवढंच बोललो.
आणि फोन ठेवला.
मनीषा आणि तो वर्गमित्र माझ्या जवळून पुढे गेले.
माझ्या चेहऱ्यावर काय चाललंय हे कुणाला दिसू नये म्हणून मी मान खाली घातली.
आणि तेवढ्यात…
डोळ्यात साचलेला एक अश्रू खाली पडला.
कॉलेजच्या फरशीवर.
काही क्षणांनी मी निघण्याआधी एकदा मागे वळून पाहिलं.
आणि पुन्हा थबकलो.
मनीषा माझ्याकडेच पाहत होती.
तीच शांत नजर…
चेहरा मात्र निर्विकार.
त्या नजरेचा अर्थ मला तेव्हाही समजला नाही.
आजही त्या क्षणाचा विचार केला की वाटतं
तिच्या डोळ्यांत खरंच काही होतं का…
की माझं प्रेमात पडलेलं मन प्रत्येक नजरेत स्वतःसाठी एखादा अर्थ शोधत होतं?
उत्तर नव्हतं.
आणि त्या क्षणी ते शोधण्याची ताकदही नव्हती.
मला फक्त तिथून निघायचं होतं.
कुणी माझे डोळे पाहण्याआधी रूमवर पोहोचायचं होतं.
मी कॉलेजच्या बाहेर पाऊल टाकलं…
आकाशात अचानक ढगांचा मोठा आवाज झाला.
आणि काही क्षणांत
मुसळधार पाऊस सुरू झाला.
सगळे विद्यार्थी पावसापासून वाचण्यासाठी धावत होते.
कुणी कॉलेजच्या छताखाली…
कुणी दुकानाच्या आडोशाला…
कुणी छत्री उघडत होतं.
आणि मी?
मी मात्र त्या पावसात शांतपणे चालत राहिलो.
क्षणभर आकाशाकडे पाहिलं.
चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं.
आणि मनात म्हटलं
“धन्यवाद विठ्ठला…”
आज मला पावसापासून वाचायचं नव्हतं.
आज त्या पावसाची मला गरज होती.
कारण आता माझ्या चेहऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्यात कोणालाच कळणार नव्हतं
यात पाऊस किती आहे… आणि माझे अश्रू किती.
सगळे त्या दिवशी पावसापासून लपत होते…
आणि मी पहिल्यांदाच पावसात स्वतःला लपवत होतो.
मनात एका बाजूला अण्णांचा चेहरा होता
माझ्यासाठी management समोर जाऊन fee concession मिळवणारा.
दुसऱ्या बाजूला मनीषा होती
जिच्यावर माझं प्रेम होतं, पण जिला माझ्या त्या प्रेमाची कल्पनाही आहे की नाही, हे मला माहीत नव्हतं.
आणि मध्ये मी…
एका साध्या घरातून आलेला मुलगा, ज्याच्या आईने त्याला आधीच Software Engineer घोषित केलं होतं…
आणि ज्याचे वडील त्याला खरोखर तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या परीने सगळं करत होते.
त्या पावसात चालताना मला एक गोष्ट मात्र समजली—
मनीषापासून पळण्यासाठी कॉलेज सोडणं मला शक्य होतं…
पण अण्णांनी माझ्यासाठी पाहिलेलं स्वप्न सोडणं शक्य नव्हतं.
म्हणून कॉलेज बदलण्याचा निर्णय तिथेच संपला.
फार फार सुंदर आणि वेगवान
फार फार सुंदर आणि वेगवान लिहीताय. कथा खूप आवडली.