गेले करायचे राहून आणि इतरही काही.

Submitted by केशवकूल on 26 September, 2026 - 08:04

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा अकरावीत होतो. त्याकाळी अकरावी म्हणजे हाय स्कूलचे शेवटचे वर्ष.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे सोडून मी इतर टिवल्या बावल्या करत होतो. तशात मला एका महान मित्राची संगत लाभली. वर्गात आम्ही दोघांनी मिळून एक वर्तमानपत्र हस्त लिखित सुरु करायचे ठरवले होते. लिहिणारा मीच. आमच्या हस्त लिखिताची कॅच लाईन होती "Free Frank Fearless" ही माझ्या मित्राची आयडीआ, त्याकाळी BLITZ नावाचे साप्ताहिक जोमात होते. ही त्याची कॅच लाईन होती हे मला नंतर कळले.
मी ह्या हस्त लिखितात काहीतरी विनेडी लिहित असे.
माझे मराठीचे शिक्षक होते अमुक अमुक . त्यांची टिळक रोडवर लायब्ररी होती. नाव होते "अभय गंथालय." ते स्वतः लेखक होते. काही तरी टोपण नाव घेऊन ते कथा लिहित असत. विचाराने साम्यवादी होते. ते थोडे जाडजुड होते म्हणून आम्ही मुले त्याना जाड्या म्हणत असू, शिक्षकात रड्या पण होते. हे सर्व लिहिताना मला आता अत्यंत दुःख होते आहे. पण तेव्हा अशी टोपण नावे ठेवताना खूप मजा वाटायची. आणि टोपण नावे ही परंपरेने आली होती. म्हणजे आम्ही नव्हती ठेवली, तर ती आधीच ठेवली गेली होती.
ह्या सरांची आणि माझी नेहमी झक्काझक्की चालत असे. तो नव साहित्याचा जमाना होता. नवकाव्य हा प्रकार जोमात होता. काही अद्वातिद्वा लिहिले की झाले नवसाहित्य असे मला वाटत होते. मी परीक्षेत तसेच निबंध लिहायला लागलो. आता हे वाक्य पहा , "अणुबॉम्बच्या उष्णतेने पृथ्वी गारठली होती." असले निबंध वाचून गुरुजी भानाकले आणि त्यांनी मला असा झापला.
ह्या सरांनी त्यांच्या वेळी कशी स्वस्ताई होती हे सांगताना सांगितले, "जर लोणी आळीत तुम्ही नुसते बनुबे गोळा करत गेलात तर सहज पाव शेर तेल मिळून जायचे."
झाल. मला तारे तोडायला विषय मिळाला. मी लगेच एक स्पूफ लिहिले.
"आपले सर जासे कसे झाले त्याचे राहास्त उमगले. ते रोज तुपाचे नमुने गोळा करून ते तूप खात असत."
हा अंक आमच्याशी वाईट असणाऱ्या कुणीतरी सरांकडे पोहोचवला.
मग काय उत्पात झाला ते मी इथे लिहिणार नाही. फक्त एव्हढेच लिहितो की सरांनी मला शाप दिला.
"तुझ्या कडून खूप अपेक्षा होत्या, पण आता कळले की तुला मराठीत डिस्टिंक्शन नाही मिळणार."
डिस्टिंक्शन म्हणजे सत्तरच्या वर गुण. मराठीत डिस्टिंक्शन, संस्कृत मध्ये जगन्नाथ शंकरशेठ आणि बोर्डात पहिल्या तिसात येणे ही आमच्या वेलची बिरुदावले होती.
तर हा शाप भयंकर होता.
त्यामुळे मी कसून अभ्यासाला सुरवात केली. शेवटी मराठीत डिस्टिंक्शन मिळवले. सरांना अभिमानाने सांगायला गेलो, सरांनी हुंकार भरला, "पुढे काय करतोस ते बघू." त्याचा अर्थ होता आयुष्यात कागी करू शकणार नाहीस.
सरांचा हा शाप मात्र खरा ठरला. मी तो विसरलो. पण असे शाप तडीस नेणारी जी कोण दैवी शक्ती असेल ती शक्ती हा शाप विसरली नाही.
मग कॉलेजमध्ये दिमाखात प्रवेश घेतला.
लवकरच कॉलेजचा इंगा समजला.
आम्ही पेठनिवासी मराठी मिडीअम वाली काही मोजकी मंडळी सोडली तर आजूबाजूला सगळे कँपातले इंग्लिश
मिडीअम वाले यासफ्यास करणारे. आम्ही आपले चेहऱ्याची मूटकुळी करून फिरणारे. आमचे इंग्रजी शिक्षण म्हणजे दिव्य होते. सरकारला ठामपणे काही समजत नव्हते की ह्या मुलांना इंग्रजी का आणि कसे शिकवावे. एकच सांगतो ते म्हणजे आमचे इंग्रजी इयत्ता आठवी पासून सुरु झाले. काय समजायचे ते समजून घ्या. तशात माझे इंग्रजी प्रेम उफाळून आले. मी हायर इंग्रजी घ्यायचे ठरवले. शिकवायला एक पंजाबी किंवा सिंधी मॅडम होती. ती मॅडम
स्लीवलेस घालून यायची ते माझ्या कोवळ्या मनाला सहन झाले नाही. जळीस्थळी काष्ठीपाषाणी मला स्लीवलेस दिसायला लागले. वर्गातल्या मुली, मुले, पुस्तके, झाडे, पीएमटीच्या बसेस अवघे जग स्लीवलेस झाले. मग तो नाद सोडून मी चक्क भरजरी मराठी घेतले.
मराठीला मला....
"एक मिनिट. विषय काय आणि तुम्ही लिहिताय कात.. झडकरी समेवर या पाहू,"
ओके.
सांगायचा मुद्दा हा की सर्व सोडून मी नकोत्या विषयांना जुंपून घेतले. मराठी साहित्याला अजून कित्येक दिवस वाट पहावी लागणार होती माझ्या आगमनाची.
नोकरी सुरु झाली. पायाला भिंगरी लागल्यागत आसाम पासून गुजरात पर्यंत, काश्मीर पासून कन्या कुमारीपर्यंत भटकंती सुरु झाली. मराठी गेले आणि आता ओठा ओठावरी हिंदी रुळू लागले. शेवटी वैतागून एक फालतू नोकरी पत्करली आणि मुंनैला नांगर टाकला.
पुन्हा मराठी इंग्रजीची आठवण छळू लागली. आता नेटाने वाचन सुरु केले. डिकन्स, सार्त्र. कामू काफ्का, हेमिंग्वे धाड धाड वाचून काढले.
आणि दोन कथा वर अडकलो. एक म्हणजे ग्रेट एक्सपेक्टेशन आणि फेअर वेल टू आर्म्स. इतका भारावून गेलो की आपण ही असे काही लिहायला पाहिजे असे वाटू लागले.
आणि लिहायला सुरवात केली.
लिहायला लागलो. पण सरांचा तो शाप आठवला.
त्यामुळे डिकन्स हेमिग्वे बाजूला राहिले आणि दुसरेच काहीतरी लिहित गेलो. त्याचे काय असतेना की लिहायला बसलो की आपला कंट्रोल दुसऱ्या कुणाकडे तरी जातो. लिहिणे हा खूप डेंजरस प्रकार आहे.
शेवट काय तर "गेले करायचे राहून"
तुम्हाला कळले असेल ना काय ते.
मी मित्रांशी बोलतो तेव्हा ते काय सांगतात ते सांगतो,
"केशव, तुला ती "व्हाट अ स्टिकी एंड" माहित आहे ना? नसेल माहित तर मर्ढेकरांची "गणपत वाणी..."
तरी माहित असेल? नाही माहित. तू असे कर, तोंड घुवून ये, वजन, उंची मोज आणि मग काय बोलतोस त्याचा पुन्हा विचार कर. वजन काय आणि बोलतोस किती ..."
माझे त्याला एकच उत्तर आहे,
"When you are dreaming, why not dream big?"
माझीच स्वप्ने माझीच दुनिया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहेत केकू. सरांनी शाप दिलेला नसणार तर तुम्हाला अधिक मोटिव्हेट करायला तसे उद्गार काढलेले असणार. असा कयास.
---------

बहुतेक तुम्ही गंपूचे विसर्जन झाल्यानंतर म्हणजे मुदत टळून गेल्यावरती, हा लेख लिहीलेला असावा. असे का केलेत? मला सुचले नाही म्हणू नका, तुम्ही सिद्धहस्त , मुरब्बी लेखक आहात.

मस्त.

छान, तुमचे लिखाण लहरी आहे एवढे मात्र खरे. तसेच कदाचित जगणे सुद्धा असावे..

तुम्हाला सरांनी दिलेल्या शापावरून आठवले मलाही दहावीत असताना इंग्रजीच्या बाईंनी तू ५० च्या वर जाणार नाही असा शाप दिला होता Happy

चांगले लिहिले आहे....
पण अधूनमधून शब्द चुकीचे पडले आहेत. कदाचित डेड लाइन सांभाळताना गडबड झाली असेल.

नवीन प्रतिसाद लिहा