पहिल्या विमानप्रवासाची प्रत्येकाची काहीतरी खास आठवण असते ना? आता विमानप्रवास खूप सोपा झालाय आणि आवाक्यातही आलाय पण माझा पहिला विमानप्रवास घडला मी १४ वर्षांची होते तेव्हा. आत्ता हि प्रवेशिका जशी शेवटच्या क्षणी देते आहे तशीच काहीशी धांदल त्यावेळी उडाली होती.
मी अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या आई बाबांसोबत खूप फिरलेय . माझे वडील ज्यांना मी पपा म्हणते, त्यांना फिरायची, वेगवेगळी ठिकाणं पाहायची खूप आवड. त्यामुळे आमची वर्षातून एक तरी कौटुंबिक सहल ठरलेली असे. मध्ये कुठल्यातरी ग्रुपवर चर्चा सुरु होती कि शाळेच्या सहली कुठे कुठे जातात हल्ली, आई बाबांसोबत आपण कुठे फिरलोय आणि फिरण्याविषयी बरंच काही. तिथे लिहितांना माझ्या लक्षात आलं कि भारतातील जवळपास सगळी ठिकाणं, अगदी चार धाम सहित पपांच्या राज्यात झाली आहेत. या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आई पपांनी नेहमीच खूप काही केलंय, मजा आणलीये आणि अर्थात तितकीच शिस्त सुद्धा होतीच म्हणा.
तर पहिला विमानप्रवास. एके वर्षी सहलीचे नियोजन करतांना पपांनी विचारलं, यावर्षी काय करायचं? माझ्या तोंडून नकळत निघून गेलं, "विमानाने जाऊया?" मग ते कुठेही असो. मला विमानात बसायचं होतं. आम्ही एका लहान गावात राहत होतो, माझ्या पपांची बदली त्यावेळी तिथे होती. मी कधीही प्रत्यक्षात विमान पाहिलं नव्हतं, विमानतळावर सुद्धा कधी गेले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी विमानप्रवास म्हणजे एक अप्रूपच होतं. पपा त्यावर काही बोलले नाहीत पण त्यांनी कलकत्ता ते बागडोगरा अशी विमानाची तिकिटं बुक केली.
आमचा प्रवास हैद्राबाद ते जगन्नाथपुरी, तिथून कलकत्ता, कलकत्त्याहून बागडोगरा आणि मग सिक्कीमचा काही भाग, दार्जिलिंग, जलपाईगुडी, सिलिगुडी, गंगटोक, आणि परत असा ठरला. आम्ही हैद्राबादला ट्रेनने अगदी वेळेवर पोचलो. तिथून संध्याकाळची जगन्नाथपुरीला जाणारी ट्रेन होती. हैद्राबादला गेल्यावर कळलं कि जगन्नाथपुरीला प्रचंड पूर आल्यामुळे तिथे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन्स कॅन्सल झाल्या आहेत. मग आणखी चौकशी केल्यावर कळलं कि आम्ही आता थेट कलकत्त्याला जाणार. कलकत्त्यात अचानक ३ दिवस जास्तीचे मिळाले आम्हाला. खूप फिरलो. आयुष्यातला पहिला मॉल मी तिथेच पाहीला. विमानात बसायचं म्हणून मी एक छानसा ड्रेस घेतला होता. कॉलरचा होता बहुतेक आणि सुंदरसे शूज. मला गंमत वाटत होती आणि जसजसा तो दिवस जवळ येत होता मी फार आनंदात होते.
आदल्या दिवशी आम्ही सगळी तयारी करून झोपलो. सकाळी १० चं विमान होतं. आम्ही ज्या ठिकाणी उतरलो होतो ते ठिकाण बऱ्यापैकी दूर होतं कलकत्ता विमानतळापासून. आम्ही सगळेच म्हणजे आई, पपा, मी, माझी धाकटी बहीण, आणि इतर ६ लोकं पहिल्यांदाच विमानाने जात होतो आणि तेव्हा खूप अशा सुविधा, जसं कि लाईव्ह अपडेट किंवा सूचनांचं ऑनलाईन पत्रक नव्हतं. पपांनी ज्या ट्रॅव्हल एजन्ट कडून तिकिटं बुक केली होती त्याच्याकडून मिळालेल्या सगळ्या सूचनांनुसार आम्ही बरोब्बर ०९.१५ वाजता विमानतळावर पोचलो. हो, ०९.१५. सकाळी आम्ही निघालो आणि ट्रॅफिक मधून कसेबसे उशिराने विमानतळावर पोचलो. आता काही आपल्याला विमानात बसता येत नाही, या जाणिवेने मी निराश झाले. पण आम्ही सगळी लहान मुलं गप्प होतो. म्हणलं बघूया काय होते ते!
आणि टाडा! तिथे गेल्यावर कळलं कि आमचं विमान जवळपास ६ तास लेट आहे. काय आनंद वर्णावा! तिथल्या स्टाफने सांगितले कि त्यांनी आमच्या टेलेफोनवर कळवण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही फोन घेतला नाही. मग त्याला समजावले कि आम्ही अनेक दिवसांपासून बाहेर आहोत आणि त्यामुळे तो निरोप आमच्यापर्यंत येणे शक्यच नव्हते. जेट airways चे विमान होते आणि तिकीटही बऱ्यापैकी महाग. आता परत जाण्यापेक्षा इथेच थांबूया असे ठरले आणि त्यावेळी ओबेरॉय कंपनीची फूड सर्विस होती, तिथे आमच्या जेवण्याची व्यवस्था झाली. सुंदर होती ती जागा. हॉटेलच, पण थोडे वेगळे आणि मोठ्ठा बफे होता. या निमित्ताने आमचे पहिले फाईव्ह स्टार हॉटेल बघून, अनुभवून झाले.
मग तो क्षण आला, विमानात चढण्याचा. बस होती कि नव्हती ते आठवत नाही पण विमानात शिरल्यावर मी खिडकीत बसले होते हे लख्ख आठवतंय. बहीण माझ्या शेजारी आणि आम्ही दोघी खूप हरखून ते आकाश, नजरेसमोर ठिपका होत जाणारं कलकत्ता, सगळं सगळं बघत होतो. थोडा वेळाने चॉकलेट्स मिळाली. मग कोल्ड ड्रिंक्स आणि पाणी घेऊन आल्या त्या हवाई सुंदऱ्या. त्यांचं ते आत्मविश्वासाने चालणं, गोड़ बोलणं आणि प्रेमाने हवं नको ते बघणं, सगळं पाहून आपणही मोठेपणी हवाईसुंदरी व्हायचं असं क्षणभर वाटून गेलं. पण आपण कुठे इतक्या देखण्या? जाऊदे, सद्धया चॉकलेट वर फोकस करू म्हणत मी आजूबाजूचं निरीक्षण करत राहिले. आम्ही व्हेज जेवणाचा ऑप्शन निवडला होता. व्हेज बिर्याणी आणि आणखी काहीतरी आणून दिले. खरेतर फक्त ७० मिनिटांचा प्रवास, त्यातही इतकं सगळं खायला. मला नकोच वाटले, त्यापेक्षा एखादी फेरी एक्सट्रा मारून आणा, असे म्हणावेसे वाटले. तेवढ्यात आमच्या सोबत असलेल्या मुलाला, त्याचं नाव सांगत नाही, तो म्हणाला, "शू आली." एक तर तो काही लहान नव्हता आणि अगदी लँडिंग च्या वेळी काय? त्या काकू वैतागल्या आणि तो रडवेला झाला. माझे पपा म्हणाले मी घेऊन जातो त्याला. ते दोघे परत येईपर्यंत लँडिंगची सूचना झाली आणि आम्ही परत सरसावून बसलो. त्याला मी अजूनही चिडवते यावरून. असो. आम्ही साधारण ५.१५ वाजता बागडोगरा येथे उतरलो. बागडोगरा विमानतळ अगदी लहान आहे. खूप काही आकर्षक वाटले नाही. तिथून पुढचा प्रवास आम्ही जीपने करणार होतो. ती एक वेगळी आणि मोट्ठी स्टोरी आहे, ती पुन्हा कधीतरी.
प्रत्येक प्रवास खूप काही शिकवतो, जवळ असो कि दूरचा. मला स्वतःला प्रवास खूप आवडतो आणि त्यातल्या अनेक कारणांपैकी हे एक. शिकणे, अनुभवणे, माणसं ओळखणे, मार्ग काढणे. असो हा काही पाल्हाळ लावा स्पर्धेचा लेख नाही. हा आयुष्यभर लक्षात राहिलेला थरारक पहिला विमानप्रवास, माबो लेखन उपक्रमामुळे कागदावर उतरवता आला.
त्यानंतर अनेक वेळा विमानाने प्रवास केला. किमान तीन तास आधी मी विमानतळावर जाऊन बसते. मला अजूनही टेक ऑफ आणि लँडिंगच्यावेळी पोटात फुलपाखरं येतात. फक्त आता हवाईसुंदऱ्यांबरोबरच सगळ्या पायलट्सचं सुद्धा तितकंच कौतुक वाटतं. लिलया चेकिन, लाउंज ऍक्सेस, छोटी मोठी खरेदी, एक वेगळीच सहजता असते सगळ्या वावरण्यात. जगण्याला व जीवनशैलीला आपण हळूहळू सरावतो ते हेच असावं का?
- अनामिका.
छान लिहीलेय
छान लिहीलेय
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
छान लिहिले आहे. पहिल्या
छान लिहिले आहे. पहिल्या प्रवासाची नवलाई अगदी पोहोचली.
छान लिहीलंय
छान लिहीलंय
छान.
छान.
>>>>छान. +१
>>>>छान.
+१
छान!
छान!
मस्त लिहिले आहे. आवडले
मस्त लिहिले आहे. आवडले
मनापासून सांगतेय असं वाटलं.
मनापासून सांगतेय असं वाटलं. म्हणजे गप्पा मारल्यासारखं.
दार्जिलिंगची ट्रीप डोळ्यासमोर आली. आवडलं खूप खूप.
छानच लिहिलं आहे, आवडलं लेखन!
छानच लिहिलं आहे, आवडलं लेखन!
हे प्रवासवर्णन मी थोडं घाईत
हे प्रवासवर्णन मी थोडं घाईत आणि सुचेल तसं लिहिलं आहे. तुम्हा सगळयांना आवडलं, हे वाचून छान वाटलं. खूप आभार.
रानभूली
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्त
मस्त
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान आणि खूप सुंदर अनुभव कथन
छान आणि खूप सुंदर अनुभव कथन
शेवटची वाक्ये आवडली.
यात थरारक काय होते ते कळले
यात थरारक काय होते ते कळले नाही !
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मस्तच लिहिलंय एकदम. विमान
मस्तच लिहिलंय एकदम. विमान सहा तास लेट बघून मलाच हायसे वाटलं वाचताना.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
त्या वयात विमान प्रवास करायला मिळाला म्हणजे किती छान अनुभव