लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : अतुल

Submitted by अतुल. on 25 September, 2026 - 14:03

यावेळी 'लेखन उपक्रम : माझा पहिला विमानप्रवास' हे वाचून मनात आठवणींची खूप ढवळाढवळ झाली. कारण जेंव्हा हा प्रवास झाला तेंव्हाच त्याचे वर्णन लिहून भारतात आईवडिलांना पत्ररूपाने पाठवले होते. ते बराच खटाटोप करून शोधून काढले. ते यानिमित्ताने जसेच्या तसे इथे देणार आहे. आज इतक्या वर्षांनी/दशकांनी ते पुन्हा वाचताना मलाच भरून आले. त्यामुळे संयोजक मंडळींपैकी ज्यांना कोणाला हा विषय सुचला त्यांना खरंच _/\_ कारण त्यांच्यामुळे आता हे इतक्या वर्षांनी पुन्हा वाचायला मिळाले, पुन्हा तो प्रवास मनात जसाच्या तसा ताजा झाला Happy

इतक्या वर्षांनी वाचताना हे लिखाण माझे मलाच आता थोडे बालिश वगैरे वाटते आहे. कारण आता एकूणच काळ खूप बदलला आहे. आताच्या काळात विमानप्रवास किंबहुना परदेश प्रवास इतका अपूर्वाईचा राहिला नाही. पण तेंव्हा विमान तर खूप दूरची गोष्ट, त्याआधी मी रेल्वेत सुद्धा क्वचितच बसलो होतो. लंडन तर दूर, पुण्यात फिरताना सुद्धा बावरल्यासारखे वाटत असे! एका छोट्या गावातून निघून थेट "मुंबई ते इंग्लड व्हाया फ्रान्स, बाय एअर फ़्रान्स" अशी काहीशी ती परिस्थिती होती. त्या अखंड प्रवासात एअर फ्रान्सच्या विमानात मराठी तर जाऊदे, कोणी भारतीय सुद्धा क्वचित दिसत होते Lol

त्यामुळे कोणताही बदल न करता ते पत्ररूपी वर्णन जसेच्या तसे इथे देत आहे.
------------------------------------------------------------------

आम्ही सहार एअरपोर्टवर आत गेल्यावर बॅगेज आणि चेक-इन करण्यासाठी गेलो. म्हणजे तिथे प्रत्येक देशासाठी वेगवेगळे काउंटर असतात. आम्ही फ्रान्सला जाणार असल्याने फ्रान्सच्या काउंटरवर गेलो. तिथे काउंटरवरच्या त्या मुलीने आमचे बॅगेज (मोठ्या २ बॅगा) एका सरकत्या बेल्टवर टाकायला सांगितल्या. मग ते बॅगेज सरकत्या पट्ट्यावरून आत गेले आणि स्कॅन झाले. नंतर तिने आम्हाला तिकिटे आणि पासपोर्ट विचारले. ते घेऊन तिने दोन सीटनंबर असलेली तिकिटे दिली. चेक-इन झाल्यावर बाहेर तुम्हा लोकांना भेटता येईल असे वाटत होते. पण तसे करता येत नाही असे तिथल्या एका गार्डने सांगितले. म्हणून नाईलाज झाला. त्या सगळ्या गडबडीत ही कॅमेरा घ्यायची विसरली होती. तो शेवटी राहूनच गेला.

मग आम्ही तिथून आणखी आत गेलो. तिथे आणखी एक क्यू होता. तो इमिग्रेशनसाठी होता. इमिग्रेशन काउंटरवरील माणसाने आमचे नाव-गाव बघितल्यावर आमच्याशी मराठी बोलायला सुरू केले. कोण कुठले विचारले. आम्ही सांगितले की आम्ही पुण्याहून आलो आणि सहकारनगरमध्ये राहायला आहोत. मग तो हसला. आम्हाला त्याने चैतन्यनगर माहीत आहे का ते विचारले. आम्ही हो म्हटले. तो तिथला राहणारा होता. त्याने कंपनी विषयी बरेच विचारले. कंपनी कुठे आहे? काय प्रॉडक्शन आहे? तुम्ही का चालला आहात?? इत्यादी इत्यादी. तो उत्सुकतेपोटी विचारत होता. सारे काही मराठीतून आणि इन्फॉर्मल चालले होते. मग त्याने आमच्या पासपोर्टवरचे व्हिसाचे पान उघडले आणि ते त्याच्या टेबलवर असलेल्या छोट्या स्कॅनरखाली धरले. तो स्कॅनर बहुधा व्हिसा डुप्लिकेट आहे का खरा आहे ते ओळखण्यासाठी असावा. ते झाल्यावर आम्ही त्याला बाय म्हणून आणखी आत गेलो. तिथे पाच-सहा काउंटर होते. हेसुद्धा इमिग्रेशनचाच एक भाग होता. तिथल्या एका माणसाकडे आम्ही आमचा पासपोर्ट आणि तिकिटे दिली. त्याने पण आमचे नाव वाचल्या वाचल्या आम्हाला म्हटले - “पाटील दिसताय”... आम्ही हसलो. मी त्याला विचारले की इथे सारे मराठी लोक आहेत का? तर तो हसला आणि म्हणाला सारे नाहीत, थोडे ३०-४० टक्के असतील. मग त्याने आमच्या पासपोर्टवर कसले कसले शिक्के मारले. आणि आम्ही पुढे गेलो.

एव्हाना रात्रीचे एक वाजले असतील. तिथून खाली जाण्यासाठी एक सरकता जिना होता. सरकत्या जिन्याविषयी माझी आजवर काही वेगळी कल्पना होती. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच असते. त्या जिन्यावर पायऱ्या अक्षरशः तयार होत असल्यासारख्या वाटत होत्या. ते थोडे फास्ट असल्याने आमची त्रेधा तिरपीट उडाली. ही तर पडतच होती. त्या जिन्यावरून खाली गेल्यावर तिथे एक वेटिंग लाऊंज होता. खुर्च्या बिर्च्या टाकल्या होत्या. आम्ही तिथे बसलो. आम्हाला अंदाज आला. आता इथून विमानातच जायचे असणार. जेवलो काही नसल्याने भूक खूप लागली होती. तसेच साऱ्या मंडळींना सोडून जात असल्याने मन खिन्न झाले होते. विमानात बसण्याच्या आनंदापेक्षा देश सोडत असल्याचे दुःख वाटत होते. पण मी स्वतःला मोठ्या कष्टाने सावरले. ही तर फारच अपसेट झाली होती. सारखे पर्समधून आई अण्णांचे वगैरे ग्रुप फोटो काढून बघत होती. आणि रुमाल डोळ्याला लावत होती. मोठ्या विचित्र मानसिक अवस्थेतून आम्ही जात होतो.

असो. थोड्याच वेळात अनाउन्समेंट झाली. एअर फ्रान्सचे विमान आले असून पॅसेंजरना आत बसण्याविषयीची ती अनाउन्समेंट होती. आम्ही उठलो आणि सारे लोक जात होते त्या दरवाजाकडे निघालो. तिथे एक माणूस प्रत्येक क्लासच्या लोकांना टप्प्याटप्प्याने आत घेत होता. आधी फर्स्ट क्लास.. बिझनेस क्लास... करत करत आमची विमानात जाण्याची वेळ आली. थोड्याच वेळात एका लांब अशा चॅनेलमधून आम्ही आत जाऊ लागलो. हे चॅनेल म्हणजे विमानाचा दरवाजा आणि एअरपोर्ट यांना जोडणारे होते. मग आम्ही विमानाच्या दारातून आत आलो. आयुष्यात पहिल्यांदा विमानाच्या आत जात होतो. फार ग्रेट वगैरे नाही पण फार वेगळे मात्र नक्कीच वाटत होते. एखादा फर्स्ट क्लासचा रेल्वेचा डबा असावा त्याप्रमाणे होते. पण खूपच लांब होते. दारातच उभ्या असलेल्या काही फ्रेंच एअर होस्ट आणि होस्टेस यांनी आमचे फॉर्मल स्वागत केले. आणि आम्हाला आमच्या जागेकडे जाण्यासाठी हाताने डायरेक्ट केले.

विमानाची आतली बाजू पूर्ण फायबर-प्लास्टिकची होती. आकार गोल होता. आणि सीट्स एखाद्या लक्झरी गाडीत असतात तशा पद्धतीच्याच, किंबहुना त्याहून थोड्या जादा क्वालिटीच्या होत्या. तसेच विमानाच्या खिडक्या साईजने छोट्या असून त्या फिक्स्ड असतात. बाहेर एक काच आणि आत एक काच असे असते... पण बियॉन्ड इमॅजिनेशन किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी असे काही काही नव्हते!!!! विमानाच्या आतील सीट्स अशा पद्धतीने मांडल्या होत्या...

-- ---- --
१२ ३४५६ ७८

त्यापैकी ५-६ नंबरच्या सीटवर आम्ही बसलो होतो. ५ ला मी तर ६ ला ही. आम्ही सीटवर बसण्यापूर्वी हातातले बॅगेज वर ठेवले. हे साहित्य ठेवण्याचे कंपार्टमेंटसुद्धा एसटीमध्ये असते तसेच होते पण थोडे स्पेशस आणि दरवाजा असलेले होते. पण सगळे काही उच्च दर्जाच्या फायबर-प्लास्टिक अथवा ॲक्रेलिकपासून बनवले असावे.

थोड्या वेळात विमानाचे कर्मचारी आले आणि त्यांनी काही सूचना दिल्या. त्यामध्ये बेल्ट कसा बांधायचा, आणीबाणीच्या प्रसंगी काय काय करायचे, कुठले दरवाजे कुठे आहेत इत्यादी इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होता. ते सर्व आम्ही ऐकत होतो. मग आमच्या समोरील टीव्हीवर कसले कसले कार्यक्रम आणि सूचना असलेले माहितीपट दाखवण्यात आले. मग पायलट आला. त्याने सर्वप्रथम स्वतःला इंट्रोड्यूस केले आणि मग थोड्याच वेळात त्याने अनाउन्समेंट केली की आपण आता लगेच टेक-ऑफ घेणार असून आपण ९ तास १५ मिनिटांनी फ्रान्सला पोहोचू.

मग विमान चालू झाले. बराच वेळ रेल्वेसारखे जमिनीवरूनच धावत होते. मला एखाद्या रेल्वेमध्येच बसल्यासारखे वाटत होते. जवळजवळ १५-२० मिनिटे असेच धावले. बहुधा ह्या काळात पायलट साऱ्या गोष्टींचे चेकिंग करत असावा. मग त्याने विमान धावपट्टीवरून जोरात पळवायला सुरू केले. विमानाचा वेग क्षणाक्षणाला प्रचंड गतीने वाढतच होता... आणि एका क्षणी जोराचा धक्का बसून विमान टेक-ऑफ झाले. आपण लिफ्टमधून वर जाताना जसे फील होते तसे फील होऊ लागले. पण हे फिलिंग्ज त्या प्रमाणात मोठे होते तसेच ते बराच वेळ राहिले. हळूहळू सारी मुंबई खाली जाताना दिसू लागली. आम्ही जरी खिडकीजवळ नव्हतो तरी माना उंच करून पलीकडच्या खिडकीतून बघत होतो. हळूहळू सारी मुंबई खाली खाली जाताना दिसू लागली. पहिल्यांदा एअरपोर्ट, मग मुंबई, मग महाराष्ट्र, मग इंडिया... सारे एक एक करत खालचा मोठा मोठा भूभाग छोटा होऊन दिसू लागला...

...सारे मागे पडले... दूरवरून त्या एका मराठी गाण्याच्या ओळी नकळत मनात रुंजी घालू लागल्या.

गाव मागचा मागे पडला... मागे पडला...

थोड्याच वेळात विमानाने आणखी उंची गाठली. मग फ्रेंच एअर-होस्ट आणि एअर-होस्टेस खाण्या-पिण्याचे पदार्थ घेऊन फिरू लागले. पहिल्यांदा त्यांनी सर्वांना इअरफोन्स आणि नॅपकिन दिले. मग टीव्हीचा आवाज बंद झाला. ज्यांना ऐकायचा होता त्यांनी इअरफोन कानाला लावले होते. हिच्या पलीकडील रांगेत बसलेल्या एका लेडीने तिला इअरफोन कुठे लावायचा असतो ते विचारून घेतले. मलापण तिनेच सांगितले की खुर्चीच्या हाताला इअरप्लगसाठी सॉकेट असते म्हणून. मी इअरफोन लावून टीव्ही ऐकत आणि पाहत होतो. खरे म्हणजे आम्हाला खूप भूक लागली होती तसेच झोपही आली होती. ही तर थकून झोपून गेली होती. एअर होस्टेसने खाण्याचे पदार्थ आणून तिला उठवले. मग आम्ही ते फ्रेंच खाणे खाऊ लागलो. ते सारे पदार्थ अत्यंत उग्र वासाने भरले होते तसेच काहींची चव तर फारच विचित्र लागत होती. आम्ही कसेबसे सारे पोटात ढकलले आणि मग झोपून गेलो.

विमानाची थरथर जाणवत होती. आपण राधानगरीला गेलो होतो त्यावेळी इलेक्ट्रिसिटी जनरेटर बघायला खाली उतरलो होतो ते आठवते का? तेव्हा जसा पाण्याचा घर्रर्र... आवाज येत होता तसा आवाज विमानात सतत येत होता. एखाद्या धबधब्याच्या पाशी जाऊन उभे राहावे तसे वाटत होते. अगदी सेम तसाच आवाज...समोर अक्षय कुमारचा कसलासा मुव्ही लागला होता.

मी एकदम भूतकाळात गेलो. हाच मुव्ही लक्ष्मीनारायणला बघताना मी हिला इंटरव्हलमधूनच थिएटरमधून बाहेर घेऊन आलो होतो आणि असला फडतूस मुव्ही बघायला कशाला आलो असे म्हणून चिडलो होतो... पण आता त्या परक्या वातावरणात अक्षय कुमारसुद्धा मला आपला आणि जवळचा असा वाटू लागला. थोडा वेळ तो मुव्ही बघितला आणि परत झोपी गेलो. मधूनमधून रेल्वेला ट्रॅक चेंज करत असताना जसे हादरे बसतात तसे हादरे विमानाला बसत होते. मला आश्चर्य वाटले, विमानाला असे हादरे कसे काय बसत असतील बरे? बहुधा गती कमी-जास्त करत असताना तसे होत असावे असा मी अंदाज केला.

सकाळी जाग आली तेव्हा सात वाजून गेले होते. अधूनमधून पायलटकडून अनाउन्समेंट होत होत्या. आपण किती उंचीवर आहोत आणि कुठे आहोत तो सारा टेक्निकल डेटा समोरच्या मॉनिटरवर दिसत होता. त्यावेळी आम्ही तीस हजार फूट उंचीवर होतो. नुकतेच तेहरान पार केले होते. विमानात चांगलाच गारठा जाणवत होता. परत फ्रेंच ब्रेकफास्ट झाला. ह्यावेळी आम्ही ठरवले की तिने व्हेज आणि मी नॉन-व्हेज घ्यायचे.. जेणेकरून जे चांगले असेल ते खाता येईल हा त्या मागील हेतू.

हळूहळू विमान पॅरिसजवळ येऊ लागले त्यावेळी इंडियन टाइमिंगनुसार सकाळी १० वाजले होते तर लोकल टाइमनुसार ८ वाजले होते. आम्ही पॅरिसच्या विमानतळावर उतरलो. हवा फ्रेश आणि थंडगार होती. पॅरिसचा एअरपोर्ट फार मोठा आहे. आम्ही तिथल्या एका लेडीला आमचे कनेक्शन फ्लाइटचे तिकीट दाखवले आणि तिने दाखवले त्या दिशेला एका जिन्यावरून गेलो. एका प्रचंड मोठ्या आणि विस्तीर्ण तसेच उंऽऽऽच अशा संपूर्ण काचेने मढवलेल्या अर्धगोलाकृती बिल्डिंगमध्ये आम्ही आलो. ही वेटिंग लाऊंज होती. सर्व फ्लाइटच्या विमानांसाठी. जशी मुंबईमध्ये वेटिंग लाऊंज होती तशीच पण प्रचंड मोठी. आम्हाला असे कळाले की लोकल टाइमप्रमाणे १० चे विमान लेट आहे. मग आम्ही फक्त बसून राहिलो. थोड्या वेळात फ्रान्स एअरवेजचे इंग्लंडला जाणारे एक विमान आले. साऱ्यांनी विमानात बसावे अशी अनाउन्समेंट झाली आणि आम्ही त्या क्यूमधून सरकत सरकत विमानात गेलो. हे विमान आकाराने छोटे होते आणि एखाद्या मोठ्या बससारखी दोन्हीकडे तीन तीन अशी सीटिंग अरेंजमेंट होती. आम्ही बसलो. पण थोड्याच वेळात सगळे उठून जाऊ लागले म्हणून मी शेजारच्या बाईला काय झाले म्हणून विचारले. तर ती “Even I also don't know...” असे काहीसे म्हणून हसू लागली. मग आम्हीसुद्धा सगळ्यांच्या पाठीमागून खाली उतरलो आणि एका बसमध्ये जाऊन बसलो. त्यावेळी आम्हाला असे कळाले की हे विमान कॅन्सल झाले असून त्याऐवजी दुसरे विमान आहे.

क्षणभर मन पुन्हा भूतकाळात गेले. मला कोल्हापुरात भवानी मंडपात शुगरमिलला जाणाऱ्या बसची आठवण झाली…

“ओ कसबा बावड्याला जाणारे, त्या बसमधून उतरा आणि ह्या बसमध्ये बसा...”

इथे असेच काहीसे झाले होते.

आम्हाला ज्या सीट्स मिळाल्या होत्या त्या वेगवेगळ्या, म्हणजे तिला ह्या विंडोपाशी तर मला त्या विंडोपाशी असे सलग नंबर मिळाले होते. पण आम्ही दोघे शेजारीच बसून होतो. जर कोणी आलेच तर रिक्वेस्ट करायची आणि तिकडे बसा म्हणून सांगायचे असे ठरवले. पण शेवटपर्यंत कोणी आलेच नाही. नंतर मग बऱ्याच वेळाने पायलट आला. एव्हाना ११ वाजले होते. त्याने विमान चालू केले आणि बराच वेळ.. बराच म्हणजे बराच जवळजवळ २० मिनिटे नुसतेच विमान जमिनीवर फिरवत राहिला. असे वाटले की हा पायलट आहे की चुकून बस ड्रायव्हर विमान चालवायला आला आहे?? मग थोड्या वेळात बरेच लांब अंतर कापून विमान पुन्हा थांबले. मला तर जाम बोअर झाले होते. असाच काही वेळ गेला आणि पुन्हा विमान सुरू होऊन प्रचंड गतीने जात एका क्षणी टेक-ऑफ झाले. आता आम्हाला विंडोशेजारी जागा मिळाली असल्याने तसेच बाहेर उजेड असल्याने आसपासचा प्रदेश खाली खाली जात असताना दिसत होता. हळूहळू विमानाने खूप उंची गाठली आणि मी खाली पाहिले... मगाची विमानतळावरची जी खूप उंच इमारत होती, जिच्यात आम्ही वेटिंग करत बसलो होतो ती एवढुशी दिसत होती. आणि तिला जोडलेल्या विमानाच्या दरवाजापर्यंत जाणाऱ्या वाटा... ते सगळे मिळून एखाद्या ऑक्टोपससारखे दिसत होते. फ्रान्सची शेती, घरे दिसत होती. प्रचंड मोठी कुरणे दिसत होती. आयफेल टॉवर मात्र शोधूनसुद्धा दिसला नाही. विमानतळावर असतानासुद्धा तो दिसला नव्हता.

उंच उंच विमान जात असताना ढगसुद्धा खाली खाली सरकत होते ते विहंगम दृश्य आम्ही भान हरपून बघत होतो. आपण कुठल्यातरी उंच पर्वतावर बसने जात असताना बरेचदा जे दृश्य दिसते त्याची थोडी तुलना करता येईल. विमान जसे वर-खाली होई तसे पोटात मोठाले गोळे उठत होते.

थोडा वेळ गेला असेल एक... तास-सव्वा तास... थोडे फ्रेंच ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही बाहेर बघितले. तर विमान खूपच खाली आले होते. इतके की घरे, गाड्या आणि इमारती स्पष्ट दिसत होत्या. मला कळेना की हा काय प्रकार असावा. मी हिला विचारलेदेखील. पण ही म्हणाली की पॅरिसचे दर्शन घडावे म्हणून मुद्दाम ते असे खाली आणले असेल. पण लगेचच घोषणा झाली की आता थोड्याच वेळात इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर आपण उतरणार आहोत. आणि मग आम्ही उतरलोदेखील. त्यावेळी इंग्लंडमध्ये सकाळी अकरा वाजले होते तर इंडियन टाइमप्रमाणे साडेचार वाजले होते. मी हिला म्हटले की तुझ्या घड्याळात टाइमिंग तसेच (IST) राहू दे. आणि मी माझ्या घड्याळातील टाइम इंग्लंडच्या लोकल टाइमप्रमाणे लावून घेतले.

इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर आम्ही उतरलो. तुम्ही सांगितले होते कि तिथे तुमची पुढची काही वर्षे जाणार आहेत. त्यामुळे त्या भूमीला नमस्कार करा. त्याप्रमाणे त्या भूमीला नमस्कार केला आणि इमिग्रेशन चेककडे गेलो. तिथे आम्हाला एका क्यूमधून जावे लागले आणि एका ब्रिटिश इमिग्रेशन ऑफिसरसमोर आम्ही इमिग्रेशनकरिता जाऊन उभे राहिलो. त्यांनी आम्हाला लंडनमधील राहण्याचा पत्ता विचारला. मी त्यांना, लंडनमध्ये राहण्यासाठी घर शोधणार आहोत असे सांगितले असता त्यांनी आमचे पासपोर्ट तसेच एक्स-रे पाहिले आणि आमचा दोघांचाही मेडिकलचा XY फॉर्म काढून घेतला आणि माझ्या हाती एक कार्ड देऊन ती म्हणाली की जेव्हा तुम्हाला पर्मनंट ॲड्रेस मिळेल तेव्हा हे कार्ड आमच्याकडे पाठवा मग आम्ही त्या पत्त्यावर तुमचे XY फॉर्म पाठवतो. आणि मग आम्हाला पासपोर्ट वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी परत देऊन आम्हाला बॅगेज कलेक्ट करण्यासाठी जाण्यास सांगितले.

तिथून बॅगेज कलेक्शनसाठी एका मोठ्या हॉलमध्ये गेलो. तिथे बऱ्याच फ्लाइटचे बॅगेज वेगवेगळ्या सर्क्युलर चेनवर गोल गोल फिरत होते. आम्हाला आमच्या फ्लाइटचे बॅगेज कुठे आहे ते दिसेचना. मग थोडी चौकशी केली आणि त्या चेनपाशी जाऊन बघितले तर आमच्या २ बॅगा चेनवर फिरत होत्या त्या उचलून घेतल्या आणि एका ट्रॉलीवर सगळे लगेज ठेवून टर्मिनल १ अरायव्हलवर आम्ही जाऊन उभे राहिलो.

लांब कोट घातलेले कितीक सारे ब्रिटिश लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे रुबाबात फिरत होते. इंडियन थोडे कमीच दिसत होते. तसेच तिथे बरेच वेगवेगळे काउंटर्स होते. मग आम्ही एका काउंटरवर जाऊन £१५० ट्रॅव्हलर चेकची करन्सी घेतली आणि मला कंपनीने जो फोन दिला होता त्यावर टॅक्सीसाठी फोन केला. त्याला Atul Patil असे नाव सांगितले. मग थोड्या वेळात एक ड्रायव्हर हातात माझ्या नावाची पाटी धरून आला. त्यावर लिहिले होते “Atul Batil”. आम्हाला हसू आले. मग त्याने आमची बॅगेज असलेली ट्रॉली हातात घेऊन कारपाशी आम्हाला घेऊन आला. इथल्या कार्स थोड्या वेगळ्या आहेत. पाठीमागे साहित्य ठेवण्यासाठी मोठी जागा सोडलेली असते. आमचे साहित्य त्या जागेत टाकून त्याने कार Wembley Hotel च्या दिशेने भरधाव सोडली.

मी आजूबाजूला पाहत होतो. कधी हिरवीगार झाडी तर कधी छोट्या छोट्या टेकड्या दिसत होत्या. थंड हवा सुटली होती. ऊन पडले होते पण ते जाणवतदेखील नव्हते. टेम्परेचर काहीतरी १८-१९ डिग्री सेंटीग्रेड असावे. ह्या दिवसात इंग्लंडमध्ये फार थंडी नसते. तसेच सूर्योदय सकाळी फार म्हणजे फार लवकर होतो. (साधारण पहाटे साडेचार वाजता) आणि रात्री खूप उशिरा मावळतो (रात्री दहा-साडेदहा वाजेपर्यंत सूर्याचा उजेड असतो) याउलट हिवाळ्यात असते असे म्हणतात. दिवस अगदी लहान तर रात्र फार मोठी. असे मजेशीर वातावरण इकडे आहे.

थोड्याच वेळात Wembley Hotel पाशी त्याने आम्हाला सोडले आणि £२० चे बिल केले. त्याची पावती हातात दिली आणि तो निघून गेला. हॉटेलच्या रूमवर पोहोचल्यावर गेल्या कित्येक तासात पुरेशी झोप झाली नव्हती. म्हणून फ्रेश होऊन अंग टाकल्या टाकल्या गाढ झोप लागली.

हे सारे झाले प्रवासवर्णन. इंग्लंडमधील लोक, त्यांचे राहणीमान, माझा पहिला ट्यूब (इंग्लंडमध्ये भुयारी रेल्वेज आहेत) प्रवासाचा अनुभव इत्यादी इत्यादी गोष्टी, तसेच इथल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमती याविषयी लवकरच लिहितो. सध्या घर शोधायच्या गडबडीत आहे. एकदा का घर घेतले की निवांत. कारण Wembley Hotel is very very expensive... i.e. £42.50 per day.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलदा, भारीच लिहिले आहे.
पहिल्यांदा विमान पाहतानाचे निरीक्षण मस्त. फारच रिलेट झाल्या गोष्टी.
ते इमिग्रेशन ऑफिसर मराठी निघावा आणि त्याने मराठीत गप्पा माराव्यात. हे माझ्यासोबत घडले आहे.

भारीच.सर्व टेक्निकल डिटेल्स मस्त लिहिले आहेत.
फोटो असले 1 2 तरी आवडतील प्रतिसादात.

(असं एक मी पाठवलेलं मराठी इमेल आठवतं, आईबाबांना. पण आता ते एका miss123 काहीतरी काहीतरी अश्या चमत्कारिक रिडिफ आयडी मध्ये गेलं, त्याचा रिकव्हरी आयडी म्हणून एका नेट कॅफे वाल्याचा इमेल आयडी होता Happy फोन नंबर त्याला कधी जोडलाच नव्हता.)

छान लिहिलंय अतुल. हे किती सालचं आहे?
विमानाचे आवाज आणि त्याचं कोरिलेशन भाग फारच आवडला. काय परफेक्ट वर्णन केलं आहे वाटुन गेलं. आणि भवानी मंडप बशीच्या बदली हाकाट्या ही कानाला ऐकू आल्या.

खूपच छान आहे वर्णन.

चेक-इन झाल्यावर बाहेर तुम्हा लोकांना भेटता येईल असे वाटत होते. >> माझा मुलगा अमेरिकेला जायला निघाला तेव्हा त्यालाही तसेच वाटले होते.

बॅगेज काउंटर वर जाण्याआधी तर त्याने मला फोन केला होता. ' आई बाबा तुम्ही बाहेरच थांबा. सामानाच वजन जास्त झालं तर मी पटकन बाहेर येऊन तुम्हाला आणून देतो...'

तेव्हा आम्ही ऑलरेडी गेस्ट हाऊस वर येऊन झोपण्याच्या तयारीत होतो. पण मी त्याला ते सांगितलं नाही.

छान लिहिलंय!

हा विषय तुमच्या मुळेच सुचला होता.

विसरलात का? कायप्पा वर तुम्ही म्हणाला होतात की पहिल्या विमान प्रवासावर लेख लिहिणार आहे. माझ्यातला संयोजक लगेच जागा झाला. मी म्हणालो होतो की त्यापेक्षा गणेशोत्सवात उपक्रम म्हणून घेऊ या. सगळ्यांना लिहिता येईल. Happy

अनुभव भारीच.. पण हे त्याहून भारी.. तेंव्हाच त्याचे वर्णन लिहून भारतात आईवडिलांना पत्ररूपाने पाठवले होते. Happy

किती सुंदर लिहिलंय! वाक्यावाक्यात त्या प्रवासाची अपूर्वाई जाणवते आहे!
पत्र म्हणून इतकं छान सविस्तर लिहिलंय. मी कल्पना करत होते की इतकं छान, थोडंसं हळवं वर्णन वाचून आईवडिलांना किती आनंद आणि अभिमान वाटला असेल!

फारच छान लिहिलं आहे. अगदी मनातून आलेले आहे. अशाच काही आठवणी, गोष्टी फार वर्षांपूर्वी मी सुद्धा पाठवलेल्या होत्या. कधी कधी जुने Gmail उघडून ते ईमेल वाचले की मजा वाटते आणि त्या दिवसांची आठवण पण येते.

तुमच्यामुळे संयोजकांना विषय सुचून इतके सुंदर लेख वाचायला मिळाले त्यामुळे extra thank you Happy

फारच छान लिहिले आहे. काही ठिकाणी खूप हसू आले. भूमीला नमस्कार किती सुरेख! ह्यात एक निरागसता, अपूर्वाई व नवलाई सगळेच छान उतरले आहे. खूप आवडला लेख.