******लेख बाळबोध आणि मुक्तपीठीय आहे, त्याबद्दल माफ करा ******
माझा पहिला विमानप्रवास २००७ मध्ये एकदम लॉंग हॉल मुंबई - सिंगापूर - सॅनफ्रान्सिस्को असा होता. त्यापूर्वी भारतात कधीच विमानाने कुठे गेलो न्हवतो. हे वाक्य लिहिलं आणि एकदा बंगलोरला गेलेलो का काय असं आता वाटतंय. नक्की लक्षात नाही, पण एम-टेक झाल्यावर बर्याच मित्रांना बंगलोरला नोकरी लागली. मग आम्ही दोघे पुण्यात काम करणारे सहा महिन्यांनी रियुनियनला बंगलोरला गेलेलो. ते कसं गेलेलो काही आठवत नाही, पण आता विचार करता ऑफिस करुन संध्याकाळचे बंगलोरला पोचलो होतो, आणि बंगलोरच्या जगप्रसिद्ध वाहतुक कोंडीत अडकलो होतो हेच आठवतं. ट्रेनचे काही आठवत नाही म्हणजे विमानानेच गेलेलो असणार. पण तो विमान प्रवास केलेला हेच मुळात आत्ता आठवलं इतका तो विस्मरणात गेल्याने, अर्थात अन-इव्हेंटफुलच झालेला होता. त्याबद्दल सांगण्यासारखं काहीही नाही.
मग आता या लेखाचा 'माझा पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास' असा विषय करू आपण. संयोजकांनी आडकाठी केली तर 'आंतरराष्ट्रीय' मला अध्याहृत वाटलं आहे! मी हेच सांगेन, तुम्ही ही असंच सांगा! त्यानिमित्ताने अध्याहृत जोक करायला मिळाला.
तर शिक्षण झाल्यावर पुण्याला स्टार्टअप मध्ये काम करत होतो. आमचं रजिस्टर्ड ऑफिस माऊंटन व्ह्यू - कॅलिफोर्नियाला होतं आणि रिसर्च आणि डेव्हलपमेंट सगळी पुण्याहून होत असे. तेव्हा कामानिमित्त २००७ मध्ये मला आम्रविकेतला जा सांगितलं. पासपोर्ट काढलेला होता, व्हिसा अर्थात न्हवता. मग अमेरिकन वकिलातीच्या साइटवर जाऊन काय ती कागदपत्रांचे सोपस्कार केले आणि व्हीएफएस, मुंबईला आलेलो. व्हिसा वगैरे सगळं ऑफिसमधुन केलेलं त्यामुळे त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे सगळी प्रोसेस व्हीएफएस मधुन केली होती. तेव्हा व्हीएफएसचं ऑफिस महालक्ष्मीला होतं, हाजिआलीवरुन आलं की डाव्या हातालाच. सकाळी त्या व्हिएफएस च्या ऑफिसला जायचे. तिकडून ते त्यांच्या बसने का काहीतरी वाहनाने अमेरिकन वकिलातीत घेऊन जात. तिकडे रांगेत उभं राहुन आपला नंबर आला की आत जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. त्यात व्हिसा मिळणार असेल तर पासपोर्ट त्यांच्याकडे सुपुर्द करायचा. संध्याकाळपर्यंत थांबलं तर व्हिसा चिकटवून पासपोर्ट परत मिळत असे.
तेव्हा मी आदल्या दिवशी घरी ठाण्याला आलेलो, सकाळी उठून ठाण्याहुन दादर तिकडून बस घेऊन महालक्ष्मी. व्हिसाचा इंटरव्ह्यू झाला आणि आता पासपोर्ट परत मिळेपर्यंत पाच सहा तास होते. पूर्वी एकदा बाबांबरोबर त्याच परिसरात एका ठिकाणी भन्नाट राज कचोरी खाल्लेली. ती जागा शोधू, असा विचार करुन स्मार्टफोन विरहीत जगात रँडम बस मध्ये बसून बाबुलनाथ ते चौपाटी याच परिसरात लक्षात होत्या त्या खुणा आठवून ती जागा शोधलेली. सापडली एकदाची. कुणाला पत्ता विचारण्यात कमीपणा, तंगडतोड चालते मला त्यामुळे जरा गेलाच वेळ शोधण्यात. ते उरकुन उलटी बस घेऊन महालक्ष्मीला आलो. तिकडे काय काम, तर मग महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलो. मागे पायर्या उतरुन समुद्राच्या बाजुला गेलो. मग इतका आलोच आहे तर पेडर रोडला दुसर्या महालक्ष्मींचे बाहेरुन दर्शन घेतले. काहीतरी चणे फुटाणे आईस्क्रीम खाल्लं असेल आणि पासपोर्ट घेऊन परत आलो.
अमेरिकेला दोन का अडीच महिने जाणार होतो. त्या आधी एक-दीड वर्षे एकटा राहात होतो, त्यामुळे खाण्यापिण्याचा, ते बनवण्याचा तसा काही प्रश्न नव्हता. तरी आईने भरपूर पुरणपोळ्या, चिवडा, चकली आणि इतर बराच खाऊ दिलेला. पुण्यात खाऊवाल्या पाटणकरांकडे रेडी टू कुक पोहे, उपमा, खिचडी अशी पाकिटं मिळतात ती थोडीफार घेतलेली. आमचं ऑफिस दर दिवसाला पर्डिअम म्हनून ५० का ६० डॉलर देत असे. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी खाऊ आणि पैसे उडवू थोडे साठवू असा माझ्या प्लॅन होता. तेव्हा नंतर एक महिना माझा मॅनजरपण आलेला, तो खवय्या. त्याच्या बरोबर सुशी, मेक्सिकन, थाय, मिडल इस्ट, ग्रीक असं कायकाय खाल्लेलं. आता आठवलं की मी कॅनिफोर्नियात होतो तेव्हा पहिला आयफोन लाँच झालेला. ते घ्यायला पुरेसे पैसे होते माझ्याकडे, पण एकदम इतके पैसे घालावे हा धीर काही न्हवता. तेव्हा तो धीर झाला नाही ते बरंच झालं. त्यानंतर परत आजतागायत कधीही स्वतःला आयफोन घेतलेला नाही. तेव्हा घेतला असता आणि कनवर्ट झालो असतो तर!!!
विचारही नको रे बाबा!
तर विमानप्रवास... काही नाही, मुंबई विमानतळावर पोचवायला आई बाबा भाऊ आलेले. मामा माझा सतत फिरत असतो, तर डोमेन एक्सपर्ट म्हणून तो पण आलेला बहुतेक. तेव्हा सिंगापूर एअरलाईन एकदम आवडलेली. पण तुलना करायला काहीच नसल्याने म्हटलं सगळ्याच विमानकंपन्या अशाच असतील. आता प्रवास केल्यावर समजलं एशिअन विमानकंपन्यांसारखं कोणी नाही. तर मुंबई सिंगापूर पहिलं विमान होतं. रात्रीचं होतं. खिडकीची जागा होती का काय लक्षात नाही, पण खिडकी बाहेर नेत्रसुखद मुंबई रात्रीच पहावी. सकाळी विमान येणार असेल तर फार डीटेल्स दिसतात, रात्री कसं रोषणाईत सगळं छानच दिसतं. विमानात गेल्या गेल्या तोंड पुसायला त्यांनी गरम टॉवेल दिला. इकॉनॉमीतच. हल्ली रात्रीची झोप झाल्यावर एअर इंडियाने असा गरम रुमाल दिलेला. बाकी कोणी त्यानंतर क्वचित दिला असेल.
मग ज्युस वर ज्युस पाजलेला लक्षात आहे. आता रात्रीची वेळ असल्याने डोळ्यावर पेंग होती, पण थोड्यावेळाने जेवण घेऊन येणार अशी घोषणा केल्याने ते मिस करुन चालणार न्हवतं. म्हणून डोळे मिटले तरी अंदाज घेत होतो. आज २० वर्षे झाली असतील, तरी विमानात मिळणारे जेवण मला तितकेच आवडते. त्या ट्रे मधुन गरमागरम मेन कोर्स, त्यात भारतातून विमान निघणार असेल तर मग काय विचारता! भात - पनीरची भाजी, दुसरी एक भाजी, लोणचे. बाजुला सॅलेड काहीतरी, डिनर रोल, अमूल बटरचा बारका तुकडा, दही, गोड म्हणून रसमलाई / काही पुडिंग/ केकचा तुकडा, कापलेल्या फळांचे तुकडे आणि मुखवास बडिशेप. तेव्हा रेड वाईन घेतलेली ते एक आठवतं. आयेम सोल्ड! आजतागायत मला एअरलाईनचं जेवण म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. घरात त्या वासाने मळमळणारी जन्ता आहे, मी माझं संपवून कोणाचं काय उरलंय ते सगळं संपवतो. इकॉनमीच हो. बिझनेस क्लासने मी कधी गेलेलो नाही, जाईन असं वाटतही नाही.
पहाटे विमान सिंगापूरला पोचले. पुढचं एसएफओ (सॅनफ्रान्सिस्को)चे विमान संध्याकाळी होते. पूर्ण दिवस काय करायचं? तर त्याकाळी सिंगापूर एअरलाईनने आला असाल, तर सिंगापूर टूरिझम/ सरकार/ सिंगापूर एअरलाईन फ्री ट्रांझिट व्हिसा स्टँप करुन बसने एअरपोर्टवरुन शहरात एका मॉल मध्ये घेऊन जात असत. वर २०-२५ डॉलरचे जेवणाचे कुपॉन देऊन परतीची बस ही देत असे. तुम्ही शॉपिंग करावे हा उद्देश. दुसरं काही काम नाही तर करुन बघू, दिला व्हिसा तर जाऊ, हॅंड बॅग एकच होती असा विचार करुन इमिग्रेशनला उभा राहिलो. ऑन अरायव्हल दिला व्हिसा. मग ती काय ती कुपनं घेऊन बसने त्या मॉल मध्ये आलो. मॉलमध्ये फिरण्यात आणि खरेदीत मला शून्य रस होता. तिकडे सकाळी कायच्या काय मोठे पेरू दिसले.
एअरपोर्टवरुन बाहेर जातोय तर थोडे पैसे असू दे म्हणून थोडे सिंगापूर डॉलर कनवर्ट करुन घेतलेले. किंमत विचारुन एक भला मोठा पेरू घेतला, तो बघुनच मला कोण आनंद झालेला ते एक आठवतं. तो कापणं शक्यच न्हवतं, मग खाल्ला तसाच बसुन. दुपारी जेवायला ते कुपन वापरु, आता उरलेली आणखी थोडी कॅश उडवता येईल, असा विचार करुन बाहेर आलो. काय करावं, कुठे जावं, काय बघावं हे काहीच माहित न्हवतं. परत इंग्रजी यथातथाच, त्यांंचं ही आणि माझं ही! कुणाला विचारा. बाहेर बस स्टॉप दिसला, आणि बर्याच बस येत होत्या. पाट्या इंग्रजीत होत्या का त्यांच्या भाषेत होत्या काही आठवत नाही, पण आकडा तरी नक्की वाचता आलेला इतकं आठवतं. जाऊन येऊ विचार करुन चढलो. डब्यात पैसे टाकले आणि ट्रान्सफर मिळे का काय आता काही आठवत नाही. मोठ्या मोठ्या उंच इमारतींच्या मधुन बस जात होती. स्वच्छ सुंदर आणि सुबक शहर, अशी एक प्रतिमा मात्र तयार झालेली आठवते. असा निरुद्देश काही काळ भटकून गेलो त्याच मार्गाने री-ट्रेस करत परत त्या मॉलला आलो. स्मार्टफोन उदयाला यायच्या आधीचा काळ, त्यामुळे हातात मॅप नाही, फोन होता पण इंटरनेट न्हवतं, पण काही वाटलं नाही, सापडेल सगळं असंच वाटलेलं.
मग मॉलला येऊन स्टरफ्राय आणि राईस असं त्या कुपनात बसेल इतकच खाल्लं, आणि फार उशीर न करता बस घेऊन परत सिंगापूर विमानतळ गाठला. तिकडून सिंगापूर - हॉंगकाँग - सॅनफ्रान्सिस्को असं विमान होतं. हॉंगकाँगला फक्त रिफ्युएलिंग हॉल्ट असावा. तेच विमान पण एकदा बाहेर जाऊन परत आत यायचं. इकडे बुट काढून बुट पण स्कॅन केलेले. मला फार मजा आलेली ते बूट काढून त्यांना द्यायला. त्यानंतर आजतागायत कोणी चपला बूटात स्कॅनर घालून ते स्कॅन केलेले आठवत नाही.
दोन्ही विमानात पर्सनल एंटरटेनमेंट होती आणि बरेच पिक्चर, टीव्ही शोज बघितलेले इतकं लक्षात आहे. पुण्यात असताना त्याकाळी टॉरंट वरुन शो डाउनलोड करुन बघत असू. तेव्हा हीरोज म्हणून एक शो होता, जगातील वेगवेगळ्या लोकांना एकाच वेळी वेगवेगळ्या सुपर पॉवरी मिळतात आणि ते कसा संपर्क साधतात, पुढे काय होतं इ. त्याचे एक दोन एपिसोड होते, ते एक आठवतं. आणि हाऊ आय मेट युअर मदर, फ्रेंडस वगैरे बघितलेलं, आणखी लक्षात नाही.
सॅन फ्रान्सिस्कोला इमिग्रेशन आणि बॅगा घेऊन बाहेर आल्यावर ऑफिसने एकदम ब्लॅक लिमो बुक केलेली होती, मला भारी वाटलेलं, पण कॅब आणि लिमो भाड्यात काही फरक नसतो फारसा हे नंतर शोधून सापडलं.
पण त्या लिमो ड्रायव्हरला बोलवायला त्याला कॉल करायचा होता. अमेरिकन डॉलर्स आणि ट्रॅव्हलर्स चेक्स होते... बहुतेक एक-दोन क्वॉर्टर पण होते. कारण क्वॉर्टर कसे मिळवले काही लक्षात नाही. तर ती नाणी फोन मशीन मध्ये घालून गाडी बोलावलेली. तेव्हा ती कॉलवरची बाई अगम्य काही बोलत होती. दोन तीन वेळा खात्री करुन गाडीचा नंबर आणि कुठल्या लेव्हलला कुठे उभं रहायचं हे बहुतेक मला समजलं. टॅक्सीत बसल्यावर हायवे १०१ ने जाताना सुरुवातीला फार भारी वाटलेलं, किंवा भारावून आणि तसं वाटुन घेण्याची पद्धत असल्याने ते वाटून घेतलेले. पण मग १०१ तीन लेनचा होतो आणि इंडस्ट्रिअल एरियातून जातो, तेव्हा कसली अमेरिका टपराट असंही वाटुन गेलेलं. सकाळची ११-१२ ची वेळ होती, त्यामुळे रस्त्याला गर्दी न्हवती, आणि ऑफिस मध्ये आणि तिकडून पुढचे दोन महिने रहाणार होतो त्या अपार्टमेंट मध्ये गेलेलो ते अजुनही लख्ख आठवतं. बे -एरियातली क्रिस्प गार पण स्वच्छ निरभ्र हवा आणि वर लख्ख सूर्यप्रकाश.
मग दोन चार दिवसांनी दोन बिहाईंड द व्हील लेसन घेतलेले आणि रेंटल कार घेतलेली. मग भरपूर गाडी चालवलेली, भारतात ड्रायव्हिंग स्कूल मधुन वाहनचालक परवाना घेण्यापुरती आणि नंतर कधी एखाददोनदा चारचाकी चालवली असेल. घरी गाडी न्हवती. पण इथे बिंधास दोन लेसन घेऊन चालवली. रेंटल, इन्श्युरन्स आणि गॅस सगळं ऑफिस करत होतं मग का नाही!
तिकडे कोण मित्र होते त्यांना भेटून २४ तास उघडं असलेल्या आय हॉपला रात्री १२ वाजता जाणे आणि ओजे, कॉफी, पॅनकेक्स आणि हॅश ब्राऊन आणि एग्ज्स खाणे. तेव्हा बेकन खात न्हवतो, एकदा बेकन आवडायला लागल्यापासून बेकन शिवाय नाहीच खात. बाकी ही चिकार फिरलो. तिकडे 'फ्राईज' म्हणून इलेक्टॉनिक्स चेन होती तेव्हा. हल्ली बंद झाली ती. तिकडून, टारगेट मधुन काही बाही विकत घेणे, आणि नावाने माहित असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांची ऑफिसे बघणे, स्टॅनफर्ड, बर्कली बघणे. जे मनात आलं ते त्या दोन तीन महिन्यांत करुन टाकलं. त्यातच एकदा भल्यामोठ्या मॉल मध्ये कार पार्क केली आणि मॉल मध्ये चालत चालत दुकानातूनच रस्ता क्रॉस करुन पलिकडच्या बाजुला आलो आणि तिकडून बाहेर पडलो. मग त्या पार्किंग मध्ये कार कशाला मिळते आहे! पॅनिक बटण दाबुन आवाजही येईना. आपली कार चोरीला गेली यावर लगेच विश्वासच बसला. मॉल बंद होत आलेला. मग एक शेवटचा उपाय म्हणून आलो त्याच दुकानांतून त्याच मार्गाने परत गेलो तेव्हा तो योग्य पार्किंग लॉट सापडला आणि कारही सुखरुप सापडली. ही एक आठवण एकदम पक्की आहे. नंतर परत बेकरीत गेल्यावर हा कुठला मॉल असावा अशा शोधही घेतलेला.
तेव्हा जीपीएस न्हवता. मग घरुन निघताना जिकडे जायचं तिकडचा मॅप हाताने कागदावर काढून न्यायचा. सगळ्या जवळपासच्या रस्त्यांची, इंटरसेक्शनची नावे लिहुन ठेवायची, तसाच परतीचा ही रस्ता लिहुन ठेवायचा. किती किलोमिटर जायचं, कुठला एक्झिट. त्यात मी हजार चुका करायचो,दरवेळी नवीन. हे लक्षात आल्यावर जिकडे 'जायचं नाही' ते पुढचे दोन चार एक्झिट ही लिहुन घेऊ लागलो. तरी बे-एरियातील हायवे शिस्तबद्ध आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असू तर बाहेर पडायचय रस्त्याचा पश्चिमेचा एक्झिट आधी, पूर्वेचा तो रस्ता गेला की गोल फिरुन नंतर. हेच जर पूर्व किनार्याला आलो असतो आणि जग हँडल करायला लागलं असतं तर कठिणच होतं. डावीकडे वळायचं आहे का? तर आधी उजवीकडे वळून मग त्या रस्त्याला तीन प्रदक्षिणा घालून परत भोपळे चौकात यायचं आणि मग एका सिग्नलला थांबुन डावीकडच्या रस्त्याला लागायचं यात काय गंमत वाटते बाराकरांना त्यांनाच माहीत!
तर असे मॅप काढून, बरोबर छापिल नकाशा घेऊन सॅकफ्रॅन्सिस्कोला, क्रुक्रडेस्ट स्ट्रीटवर, गोल्डन गेट, बे ब्रिजवर, हाफमून बे, १६ माईल सिनिक ड्राईव्ह सगळं फिरलो. बार्ट - कॅल ट्रेन - म्युनी - व्हीटीए याने ही फिरलो.
परतीला ही तसंच विमान होतं. तेव्हा सिंगापूरला फार लेओव्हर न्हवता त्यामुळे गप मुंबईला आलो. या पहिल्याच ट्रिप मध्ये बे-एरिया अगदी मनात भरेल असा आवडलेला, आणि तिकडे काम करावं काही वर्षे रहावं हे मनात होतं. ते ही नंतर झालं.
नंतर बरेच विमान प्रवास झाले. अजुनही मी विमान बसायचं असेल तर तितकाच उत्तेजित होतो, ते जेवण, विमानतळावरचा ट्रांझिट, उडताना विमाने बघणे, या टर्मिनल वरुन त्या टर्मिनलला स्काय ट्रेनने जाणे, दोन विमानांत मुद्दाम दीर्घ कालावधी ठेवून तो देश पटकन ट्रांझिटने जमेल तितका फिरुन येणे हे करायला फार आवडतं.
----
थोडं लंबाण आणि पसरट झालं लिखाण. पण पहिल्या विमान-प्रवास संदर्भात जे काही आठवलं ते एका धारेचं खरडलं आहे. तेवढं सांभाळून घ्या!
मजा आली, गप्पा रंगल्या आहेत
मजा आली, गप्पा रंगल्या आहेत असं वाटलं वाचताना.
चांगल्या आठवणी.
चांगल्या आठवणी.
लेख वाचताना सुरुवातीला,अरे विमान प्रवासावरचा लेख वाचतोय ना नक्की असं वाटले. नंतर मात्र लिखाणाच्या तालात रंगून गेले.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
गप्पा रंगल्या आहेत असं वाटलं वाचताना.+१
लेख बाळबोध आणि मुक्तपीठीय आहे
लेख बाळबोध आणि मुक्तपीठीय आहे .. पासून .. थोडं लंबाण आणि पसरट झालं लिखाण .. पर्यंत वाचले
पसरट असलं तरी चालतंय की.
पसरट असलं तरी चालतंय की.
माझा पहिला आंतरराष्ट्रीय विमान प्रवास>> हा विषय असेल तर आमच्या लेखात परत पॅच वर्क करणं आलं... हा..हा...
लेख आवडला.
लेख आवडला.
बेकन फार खारट असतं. त्यामुळे नाही आवडत. थोडा मेंटल ब्लॉकही आहे.
आय हॉप - लव्ह इट!!!
>>>>>>जिकडे जायचं तिकडचा मॅप हाताने कागदावर काढून न्यायचा. सगळ्या जवळपासच्या रस्त्यांची, इंटरसेक्शनची नावे लिहुन ठेवायची
अगदी हेच मी आणि नवरा करत असू.
>>>>>विमानात मिळणारे जेवण मला तितकेच आवडते.
सेम हिअर. गरम असलेले. मस्त असतं विमानात खाणं.
>>>>>>पॅनिक बटण दाबुन आवाजही येईना. आपली कार चोरीला गेली यावर लगेच विश्वासच बसला.
इथे फुटले.
मस्त लिहिलंयस.
मस्त लिहिलंयस.
राज कचोरी तिवारी ब्रदर्सची तर नव्हे?
बाकी विमानातलं जेवण आणि पादत्राणं वेगळी स्कॅन केलेली आवडणारा तू एकटाच असशील

भूतलावरआकाशात!जग हॅन्डल्सना नावं ठेवायचं काम नाही! दोन राऊंडअबाउट्स फिरून येण्याची शिक्षा देणेत येईल!
आणखी एक संयोजक डबल रोलमध्ये
आणखी एक संयोजक डबल रोलमध्ये आणि संयोजकांवरच जोक करताहेत.
अध्याहृत आल्यावर मनापासून हसून घेतलं.
सिंगापूर मधली भटकंती वाचून भलताच धाडसी वाटलास. परीक्षेचं सेंटर मिळत नाहीए, अशी स्वप्नं मला अजून पडतात.
आवडला लेख.
स्वाती एकदम जग (हॅण्डल)
स्वाती एकदम जग (हॅण्डल) घुमेया थारे जैसा ना कोई मोडमधे
मस्त लेख आहे. त्या काळातील प्रवासाच्या आठवणी आल्या. तेव्हा सिंगापूर एअरलाइनने खूपदा गेलो आहे. अजूनही मला ती मोस्ट फेवरिट वाटते. नंतर कोरियनही तितकीच चांगली झाली जवळजवळ. सिंगापूरमधे मुंबईच्या फ्लाइट च्या आधी ८-९ तासाचा लेओव्हर असे. तुझा अनुभव वेगळाच दिसतोय. मी थोडा आधी जो घेतलाय तेव्हा अशीच टूर असे पण आपल्याला मोकळे सोडत नसत - त्यांचीच बस सगळीकडे घेऊन फिरत असे. हा कदाचित दुसरा पर्याय असावा. मी एकदा नुसता स्वतःच फिरूनही आलोय पण ते पूर्ण स्वतंत्रपणे. तू लिहीलीस तशी टूर होती हे माहीत नव्हते.
सिंगापूर एअरलाइनचा अनुभव मात्र आठवला. आता बर्याच वर्षांत गेलो नाही. पण त्यात फार पूर्वीपासून इकॉनॉमी क्लास मधे सीटबॅक टीव्ही व खायची प्यायची रेलचेल असे. नंतर हळुहळू इतर एअरलाइन्समधेही आली. आणि तब्बल ३२ किलोच्या दोन बॅगा नेलेल्या चालत त्यामुळे जंगी सामान नेलेले आठवत आहे - दर वेळी असे ठरवून की पुढच्या वेळी इतके आणायचे नाही
मी माझं संपवून कोणाचं काय उरलंय ते सगळं संपवतो >>> तू विमानातला जोई आहेस म्हणजे. विमानात बरोबरच्या इतरांचेही फूड संपवू शकतो का विचारल्यावर अमित
https://www.youtube.com/watch?v=NiQ1Hdmt1kc&t=1065s
खूपच मस्त लिहिलंय. महालक्ष्मी
खूपच मस्त लिहिलंय. महालक्ष्मी व्हीएफएस वगैरे सर्व आठवणी जागृत झाल्या.
>>पण खिडकी बाहेर नेत्रसुखद मुंबई रात्रीच पहावी. सकाळी विमान येणार असेल तर फार डीटेल्स दिसतात, रात्री कसं रोषणाईत सगळं छानच दिसतं.
खरंय.
सिंगापूर एअर्लाईन्स अजूनही भारीच आहे. त्याखालोखाल कॅथे, कोरीयन. एकंदरीत साउथ इस्ट एशियन एअरलाईन आवडतातच. थाय एअरलाईनमध्ये जांभळ्या ऑर्किडचा एक ब्रूच प्रत्येकाला देतात ते भारी वाटलेले. २००३ सालचा तो माझा पहिला विमानप्रवास होता.
>>>>>थाय एअरलाईनमध्ये
>>>>>थाय एअरलाईनमध्ये जांभळ्या ऑर्किडचा एक ब्रूच प्रत्येकाला देतात ते भारी वाटलेले. २००३ सालचा तो माझा पहिला विमानप्रवास होता.
वॉव!!
गप्पिष्ट लेख झालाय.
गप्पिष्ट लेख झालाय.
बाय द वे विमानातलं जेवण मलाही आवडतं. फक्त ते भारतिय व्हेज नसलं पाहिजे. एकदाच ऑफिसने बूक केलेल्या फ्लाईट मीलमधे भाताबरोबर भोपळ्याचा गोडूस रस्सा विथ अस्पॅरॅगसएवढ्या दिसणाऱ्या दोन फ्रेंच बीन्स पाहून भारतिय जेवणाचा धसका घेतलाय तो आजवर.
राज कचोरी तिवारी ब्रदर्सची तर
सर्व प्रतिसाददात्यांना धन्यवाद .:)
>>राज कचोरी तिवारी ब्रदर्सची तर नव्हे? >> हो! गूगल मॅप्सवर फोटो बघुन हीच असावी वाटते आहे. काहीतरी मिठाईवाला, लांबुडकं बिल्डींगच्या टोकाला दुकान होतं इतकं आठवतय. हीच असेल तर पुढच्यावेळी जाईन इथे. ही अगदी गिरगावरोडच्या शेवटी कोपर्यावर दिसते आहे.
दोन प्रदक्षिणा घातल्याकीच डावीकडे वळायचे ही आता परंपराच झालेली आहे.
आणि जगहँडलची शिक्षा वेगळी कशाला हवी आहे? ती स्वतःवर ओढवून घेतोच दरवेळी.
फा, सिंगापूरला परतीला जास्त वेळ असेल तर आता लक्षात नाही. काही केलं न्हवतं त्यामुळे काही स्मृती जोडलेल्या नाहीत. बेकरीमध्ये होतो तेव्हा एकदा सिंगापूरने परत गेलेलो, तेव्हा एक दिवस सिंगापूरला राहिलेलो. तेव्हा ही आवडलंच सिंगापूर, पण पहिली प्रतिमा वेगळीच आणि ठाशिव आहे.
वर्षा, हो! नंतर एकदा ऑफिस मधुनच कॅथेने ही गेलेलो. ती पण आवडलेली. नंतर एकदा आमच्या एअर कॅनडा आणि जेटने गोंधळ घातला त्यामुळे चारधाम यात्रा करुन जावं लागलेलं तेव्हा थायने गेलेलो. डबलडेकर जंबोजेट आणि एकदम रिक्कामं होतं. आम्हा इकॉनॉमीक्लासवाल्यांना रॉयलच्या वर्ताण वागणूक दिलेली.
>>फक्त ते भारतिय व्हेज नसलं पाहिजे. >> घ्या! पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. भात आणि चिकन स्टरफ्राय, किंवा असच गोड रसातलं वातड चिकन खाऊन कंटाळल्याने कधी न्हवे ते मी देसी फुडचे गोडवे गायले तर तुम्ही उलटंच बोला!
मी फूड चॉईस कधीच लिहित नाही. 'सरप्राईज मी' मोड मध्येच असतो. एशिअन व्हेजि लिहून दरवेळी तो रोट्टी एन राईन मला ही नकोच असतो.
>>> जग (हॅण्डल) घुमेया थारे
>>> जग (हॅण्डल) घुमेया थारे जैसा ना कोई

अमित.
तिवारी ब्रदर्सवर मुंड्यांची धाड पडली आणि ते 'रिनोव्हेशनसाठी' बंद आहे सध्या.
आता पुढच्या वेळी तिथे (आणि सायबिणीत आणि बेण्णे डोशात) जीटीजी करू.
मजा आली, गप्पा रंगल्या आहेत
मजा आली, गप्पा रंगल्या आहेत असं वाटलं वाचताना. +१११
एक नंबर रे! वाचताना चेहर्
एक नंबर रे! वाचताना चेहर्यावर हसू कायम होतं. एकतर पठ्ठ्याला धड काही आठवत नाहीये. हा पहिला प्रवास होता की दुसरा इथपासून सुरुवात आहे. तेवढ्यात अध्याहृत जोक मारुन घेतलास. सिंगापूर्ला काय केलं तर भला मोठा पेरू खाल्ला
हे भन्नाट आहे. वाचकांना तू तेव्हा स्मार्ट्फोन्स नव्हते याची दोनतीनदा आठवण करून दिली आहेस
मजा आली वाचताना.
चांगलं लिहिलंय.एअर इंडिया
चांगलं लिहिलंय.एअर इंडिया च्या जेवणाबद्दल सहमत.त्यांनी अगदी छोले आणि बनपाव सारखा गोल पाव दिलेला असला तरी चवीने खाते.विमानात काही न देणारे, शेंगदाणे 300 रु ला विकणारे वात्रट लोक मला आवडत नाहीत.पाहिजे तर तिकीट 2000 ने महाग विका पण छान जेवणासारखं नीट दिसणारं जेवण मात्र द्या.(असं करतात एअर लाईन्स.मध्ये एकदा ऑफिस कामाने बंगलोर ला गेले होते तेव्हा त्यांनी तिकिटात जेवणाचे पैसे भरलेले पाहून तया ट्रॅव्हल वाल्याला गहिवरून 'दादा.....' करून मिठी मारावी असे विनोदी विचार मनात येत होते.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
पाहिजे तर तिकीट 2000 ने महाग
पाहिजे तर तिकीट 2000 ने महाग विका पण छान जेवणासारखं नीट दिसणारं जेवण मात्र द्या.
>>
इथे अमेरिकेत ५:५.३० तासाच्या रेड आय (म्हणजे मध्यरात्री निघणार्या आणि गंतव्य स्थळी सकाळी पोचणार्या) प्रवासात आमचे एअर कॅनडा आजकाल ब्लँकेट देत नाही. जेवण मिळणे कधीचेच बंद झाले आहे. १० डॉलर देऊन तपस बॉक्स नावाचा एक क्रॅकर्स चा पुडा आणि ब्रुस्चेटाचे टोमॅटो मिक्स एका प्लास्टिकच्या डबीत आणि झिप लॉकमध्ये ऑलिव्ह मिळतात
लॉयल्टी पॉइन्ट्स आणि स्टेटस मिळवणे कठीण करून ठेवले आहे. जुनी बरीच स्टेटस धेंडं असल्याने अपग्रेड मिळणे दुरापास्त आहे. मागच्या सोमवारी ३० जण युनायटेड प्रिमिअर १के होते एका फ्लाइट मध्ये. काय अपग्रेड होणार कपाळ!
भारतातला प्रवास बराच बरा होता असे वाटते.
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मलापण जेवण आवडायचं. मी समोर जे येईल ते शांतपणे खायचे. (प्रेफरन्सेस वेज असायचे आणि सुदैवाने चांगलं जेवण मिळालंय मला जे काही प्रवास केले त्यात). एकदा तर पहाटे ३ वाजता दिल्ली-मुंबई फ्लाईटमधे नाश्ता म्हणून जंबो वडा - कम- हातीयेईलतेघालकबाब असं काहीतरी अगम्य खाद्य मिळालं तर तेही खाल्लं होतं
छान सविस्तर, ओघवत्या शैलीत
छान सविस्तर, ओघवत्या शैलीत लिहिलंय, आम्हीही फिरलो वाचताना.
अमित, खूपच मस्त तपशील लिहिलेत
अमित, खूपच मस्त तपशील लिहिलेत ते आठवून अगदी अगदी वाटले. विशेषतः गरम नॅपकिन वगैरे. वाचताना ते आठवून तो 'फील' आला चेहऱ्यावर
बऱ्याच आठवणी कोरिलेट झाल्या. स्मार्टफोन नसलेल्या काळात एखाद्या ठिकाणी जाणे आणि तिथून परत येणे हे खरंच दिव्य असायचे. कार हरवलेला प्रसंग
सेम! कारण अशा प्रकारच्या गोष्टी माझ्याकडून कैकवेळा घडल्यात. समकालीन आठवणी! मस्त लेख एकूणात 
पूर्ण वाचलं नाही पण तुला
पूर्ण वाचलं नाही पण तुला एअरलाईनचं जेवण आवडतं हे वाचून माईल्ड धक्काच बसला. त्या ट्रे मध्ये दोन भाज्या, त्यात गुदमरलेला भात बघून खायची इच्छाच मरते. पुन्हा भाज्या कसल्या तर पालक पनीर, छोले. :डोक्यालाहातः
हल्ली तो एक ब्रेड रोल येतो तो बहुतेक व्हीटचा असतो की कार्डबोर्डचा असा प्रश्न पडावा इतका ड्राय..
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
काही गोष्टी रिलेटेबल. मी पहिल्यांदा एल ए मधे आले, त्या आधी कधीही मराठवाड्याबाहेर गेले नव्हते. मला वेगळा ग्रह वाटलं लॉस ॲन्जेलिस. हवा कोरडी असल्याने श्वास खूप खोलवर जातो आहे असेही वाटायचं. १०१ रस्ता जगात भारी आहे, एकीकडे समुद्र किनारा आहे. सिंगापूर एअरलाईन्स खरंच सर्वात चांगले वाटते मलाही. फक्त हॉट टॉवेल हा हा हु हु करत चिमट्याने पकडतात, आपल्याला वाटते काय गरमागरम असेल की पण कोमट असतात. कुणी आविर्भाव जास्त केला की घरी सिंगापूर हॉट टॉवेल्स सारखं म्हणतो. विमानातील अन्न फक्त घरी पोचेपर्यंत मरून जाऊ नये म्हणून खाते.
देशी गुजराती ग्रोसरी वाल्या बाईने मला "काय मग कसं वाटलं अमेरिका?" असं विचारलं होतं, मी म्हंटले "ठीक ठीक". तिला वाटलं मी भारावून गेलेली असेन, तिला फेफरे आले.
कारण तू स्वर्गातून (ग्रेट
कारण तू स्वर्गातून (ग्रेट व्हाईट नॉर्थहुन) तिकडे जात होतीस ना!
बहुतेक लोकं विमानातील जेवण नको, तो वास नको अशीच भेटली आहेत.
मला लहानपणी फ्री गोष्टींचे भयंकर आकर्षण होते. ते अजुनही तसेच आहे. आमच्याकडे विंटर मध्ये विंटरल्युड म्हणून फेस्टिवल असतो. आईक स्कल्पचर्स, स्लेडिंग, म्युझिक, टबॉगनिंग इ. प्रकार असतात आणि तिकडे टिमहॉर्टन फ्री हॉट चॉकलेट देते. आमचा बारक्या पैसे देऊन घेतलेल्या हॉट चॉकलेट पेक्षा ते फ्री हॉट चॉकलेट जास्त चविष्ट असते म्हणालेला तेव्हा माझा ऊर अगदी भरुन आलेला. हाच माझा खरा वारसदार! ... तर ते जेवण काय आहे, त्यातलं आपण काही मिस तरी नाही करणार? काहीतरी नवा पदार्थ दिला आणि आपण त्याची चवही चाखली नाही तर आपल्या सारखे करंटे आपणच.. असा माझ्या जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स फोमो येतो ते क्रु मेंबर कार्टवरुन जेवण द्यायला आले की.
सिंगापूर एअरलाईन्सची आणखी एक आठवण, असेंशिअल/ टॉयलेटरी पाऊच सिं.ए. इमानेइतबारे इकॉनॉमीला ही देते. त्यावर एक मोजे, बारका टूथ ब्रश, पेस्ट, कानात घालायला प्लग्ज्स इ. असते. त्यात माझ्या शेजारच्याने स्लीप मास्क लावला, माझ्या पाऊच मध्ये का कोणास ठाऊक तो न्हवता. आत तो लावून कसं वाटतं हे बघायची मला अनावर उर्मी झाली. मग डोळ्यावर असलेली तितकीच अनावर झोप दूर सारुन मी मागे जाऊन तो स्लीप मास्क आणला आणि मग झोपलो.
कोणी तो लावलेलं दिसलं की हटकून ते आठवते.
बेकरीत २८० जास्त सिनीक आहे, मॅप्सवर ८८० ला ट्रॅफिक कमी दिसतोय वगैरे असलं तरी मला ही १०१ने एसएफला जाणे हेच आवडलं आहे.
मला लहानपणी फ्री गोष्टींचे
मला लहानपणी फ्री गोष्टींचे भयंकर आकर्षण होते. ते अजुनही तसेच आहे.
तर ते जेवण काय आहे, त्यातलं आपण काही मिस तरी नाही करणार? काहीतरी नवा पदार्थ दिला आणि आपण त्याची चवही चाखली नाही तर आपल्या सारखे करंटे आपणच.. असा माझ्या जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स फोमो येतो ते क्रु मेंबर कार्टवरुन जेवण द्यायला आले की.
>>>> तु माझ्या मुलिला दत्तक घे ! ती अगदी शोभेल तुझ्या फॅमिलीत...अगदी हीच हीच सगळी आवड आहे..
विमान प्रवासातल खाण तिलाही खुप आवडत...एकदा एमिरेटस मधे जेवण झाल्यावर थोड्यावेळाने डेझर्ट (फिरनी ) घेवुन आले तर माझ मिस होवु नये म्हणून मला गाढ झोपेतुन उठवल होत तिने...वर म्हणते झोपते काय सारखी?? एवढा जाच आइने किवा सासुने पण केला नाही.
तुझ वर्णन वाचुन मला खुप नॉस्टॅल्जिया आला...मी सेम ह्याच रुटने आले होते एसएफओ ला!.
हाताने मॅप काढून, एक्सझिट्स्
हाताने मॅप काढून, एक्सझिट्स् वगैरे लिहून केलेल्या प्रवासाबद्दल वाचले आणि जुने दिवस आठवले.
नवीन असताना ऑफिसमधील सहकाऱ्याने शहराचा नकाशा असलेल्या दोन CDज् दिल्या होत्या. कुठेही बाहेर जाताना रूट बघून त्याची प्रिंट काढून बरोबर घेऊन जायचो. पुढे मला आठवतेय त्यानुसार मॅप-क्वेस्ट आले मग त्यावरून प्रिंट काढायचो. मात्र माझी नेव्हिगेटर म्हाळसा असल्याने बरेच घोळ व्हायचे, एक्झिट चुकायचे मग बसा फिरत ! एकदा उशिरा एके ठिकाणावरून घरी परत येताना एक्झिट बरोबर घेतला परंतु पुढचा रास्ता चुकलो आणि वीस पंचवीस मिनिटे नुसता फिरत होतो. बरं रस्त्यावर तर दिवसादेखील कुत्रं नसते रात्रीची तर बातच सोडा. शेवटी एक चौकात मी ज्या रस्त्यावर राहायचो त्या रस्त्याची एक बारीक पाटी दिसली अन काय आनंद झाला. माझ्या घरासमोर सहा मार्गिकेंचा तो रस्ता इथे फक्त दोन मार्गिकेंचा होता. तेव्हा नुकतेच GPS चे डबडे बाजारात मिळायला लागले होते. लगेच जाऊन खरेदी केले आणि मग निर्धास्त झालो, चुकलो तरी फीकर नॉट, GPS बरोबर गंतव्यस्थानी आणून सोडायचा. परंतु त्यात स्टॅटिक मॅप होता त्यामुळे कित्येकदा ट्रॅफिकमध्ये अडकायचो. नंतर GPSचे लाईव्ह मॅप्स आले आणि प्रवास सुखकर झाला.
भारीच रे अमित,
भारीच रे अमित,
विमानातले जेवण इतके आवडते हे वाचून्च हात जोडले गेले. मेनुवर वर्णन मात्र प्रचंड भारी लिहिलेले असते.
मला तर ती लुफ्ताण्झीण काय विचारतेय तेच कळले नाही. दारु वाटत होती बिचारी. तीही हुकली. एक वेळ सोडून विमानात जे जेवण आले ते गचाळेस्ट होते. एकदा आपल्या एरिंडियाने बरे दिलेले. आणि विमान पोचले की दोन दिवसात अमदाबादेची सेम इमानाची दुर्घटना कळली.
मनात आले एकवेळ गचाळ जेवण परवडले पण सुरक्षित पोचवा .
टेक ऑफ आणि लॅन्डिंग वेळी पट्टा नको म्हणून पोराने घातलेला गोंधळ आणि सुंदर्यांचा नियम पाळायला लावायचा आटापिटा ह्यामध्ये खिडकीतून बाहेर बघायची संधीच मिळाली नाही.
प्रतिसादांमधले "गुदमरलेला भात
प्रतिसादांमधले "गुदमरलेला भात" आणि "लुफ्ताण्झीण "
आता मला डोमेस्टिक प्रवासात "डेल्टीण" आली असे आठवेल नेमके 
पण "मला तर ती लुफ्ताण्झीण काय विचारतेय तेच कळले नाही. दारु वाटत होती बिचारी. तीही हुकली" याचे इंटरप्रिटेशन "वाटत" च्या अर्थावरून टोटल बदलते
देशी गुजराती ग्रोसरी वाल्या बाईने मला "काय मग कसं वाटलं अमेरिका?" असं विचारलं होतं, मी म्हंटले "ठीक ठीक". तिला वाटलं मी भारावून गेलेली असेन, तिला फेफरे आले >>>>
तर डोमेन एक्सपर्ट म्हणून तो पण आलेला बहुतेक >>>
यावर हसायचे राहिले होते. हिशेब पूर्ण करायला पाहिजे.
मला लहानपणी फ्री गोष्टींचे भयंकर आकर्षण होते. ते अजुनही तसेच आहे >>>
त्यात माझ्या शेजारच्याने स्लीप मास्क लावला, माझ्या पाऊच मध्ये का कोणास ठाऊक तो न्हवता. आत तो लावून कसं वाटतं हे बघायची मला अनावर उर्मी झाली. मग डोळ्यावर असलेली तितकीच अनावर झोप दूर सारुन मी मागे जाऊन तो स्लीप मास्क आणला आणि मग झोपलो >>>>
आज पुन्हा वाचताना लक्षात आले की (आठवणीतल्या) पहिल्या विमानप्रवासाबद्दल लिहीताना तू उड्डाणाबद्दल लिहीलेच नाहीस. जमिनीवर असताना "मुंबई" आणि दहा हजार फुटांवर गेल्यावर तिची झालेली "मुंबापुरी" असायला हवी लेखात एकदा तरी.
बहुधा कुर्सी की पेटी वगैरे घोषणांचा अंगाईगीतासारखा परिणाम झाला असावा तेव्हा. एकदम ज्यूस, खाणेपिणे याचेच वर्णन आहे सुरूवातीच्या खिडकीतल्या रात्रीच्या मुंबईनंतर. हा प्रवास पहिला होता का ते लक्षात नाही. बसला खिडकीत होता का ते नाही. फक्त खाणे आठवले. म्हणजे ते लग्नाच्या बाबतीतले "मिष्टान्नं इतरेजन:" चे सुभाषित एअरलाइनवालेही वापरतील आता
मला हिट ऑर मिस वाटले आहे विमानतले जेवण. युनायटेडच्या नुवर्क-मुंबई (युक्रेन वॉर नंतर ही फ्लाइट बंद झाली. याबद्दलचे फिलिंग "साली निदान सा नंबरची ट्राम तरी ठेवायची" लेव्हलचे आहे) फ्लाइटमधे रसमलाई व आइसक्रीम देत असत. ते फारच मस्त असे. आणि मुंबई जवळ आली की चहा. अमेरिकेच्या एअरलाइनमधे असा थेट पिण्याशिवाय काहीही संस्कार करावे न लागणारा चहा फार दुर्मिळ आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी. पण इन जनरल हे फ्लाइटमधले खाणे कधी मस्त असते, कधी नाही. मात्र त्याची उत्सुकता नेहमीच असते. सर्व्ह करणारे पुढच्या रांगेपर्यंत आले की मी आधीच ते ट्रे टेबल उघडून तयारी करतो. तू ही करत असशील याची खात्री आहे