लेखन उपक्रम- माझा पहिला विमान प्रवास ! - मी स्वच्छंदी

Submitted by मीस्वच्छंदी on 24 September, 2026 - 20:36

पाहिलं सगळच लक्षात राहतं आणि त्याच कौतुकही असतं.

माझा पहिला विमान प्रवास खरं तर खूपच उशीर झाला. मुलगा सव्वा वर्षाचा होता आणि त्याला घेऊन केलेला तो त्याचा आणि माझा पहिला विमान प्रवास ..अगदी छोटा मुंबई ते गोवा.

त्यातल्या काही गमतीदार आठवणी..

१ . एवढ्याशा छोट्या मुलाचही पूर्ण तिकीट काढायला लागलं होतं हे चांगलं लक्षात राहील आणि थोडसं टोचलंही होतं.

२. त्यावेळी विमानातील जेवणाचं, चॉकलेट वगैरे देतात याचं, एकंदर सगळ्याचच भयंकर अप्रूप होतं.
सगळ स्थिर स्थावर झाल्यावर विमान उडाल्यावर त्यांनी हळूहळू जेवण आणून द्यायला सुरुवात केली.
मी नवशिकी आई होते, आधी मुलाला भरवत बसले...
आणि मग मी माझा खाणार, विशेष करून डेझर्ट, तेवढ्यात त्यांनी जाहीर केलं की आता आपण उतरायला सुरुवात करतोय आणि आवरावर सुरू केली. .. माझा खाऊ तसाच राहून गेला बहुतेक..

३. मुख्य लक्षात राहिल ते
खिडकीतून खाली बघितलं तेव्हा गोवा इतकं सुरेख दिसत होतं. ते मात्र माझ्या कायम लक्षात राहील.. इतकं टुमदार.

या सगळ्या गोष्टी आठवून आता हसायला येतं.
विमानातील जेवण कधीकधी नकोसही वाटतं.
पण एखाद्या नव्या ठिकाणी विमान उतरताना वरून ते गाव दिसलं की कितीतरी वेळ गोव्याच्या त्या पहिल्या टुमदार दर्शनाची नकळत आठवण येते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे लेख..!

अगदी छोटा मुंबई ते गोवा.>>> ह्या मार्चमध्ये झाला मुंबई - गोवा विमान प्रवास..! लहानखुरा आहे प्रवास पण मला आवडला.

रूपाली, शर्मिला धन्यवाद!

मुंबई गोवा प्रवासैतकच छान छोटा लेख >>> Happy

एवढी वर्ष झाली, एवढंच लक्षात राहिलेलं.

माझाही छोटासाच पहिला प्रवास होता नागपूर ते मुंबई. नवीन ताज्या विहीणबाई सोबत झाला. आपला बावळट झाकण्यात/तणावात प्रवास कधी संपला कळलाच नाही. एवढंसंच काय लिहायचं . कुठल्यातरी प्रतिसादात लिहू म्हटलं. …

छान लिहिलंय.

माझाही पहिला आणि एकमेव विमानप्रवास मुंबई ते गोवा होता, त्यामुळे रिलेट केलं. मुलगा तीन वर्षांचा झाल्यावर केलेला, त्याचं पहिले तिकीट विमानाचं काढलं गेलं, कारण त्या आधी तीन वर्षाच्या आत रेल्वे किंवा बस तिकीट काढावे लागलं नव्हतं.

मला आठवतंय त्याप्रमाणे आमच्या दोघांच्या आणि त्याच्या तिकिटात फरक होता, त्याचं 900 होतं, आमचं तेराशे. इंडियन एअरलाईन्सने गेलेलो, तो काहीच जेवला नाही, आम्ही दोघे जेवलो, त्याचं लंच घेतलं नव्हतं. नंतर वाटलं घ्यायला हवं होतं, पॅकबंद होतं. हॉटेलमध्ये आल्यावर खातोय का बघितलं असतं पण काहीच सुचलं नाही, भांबावून, हरखून गेलेलो आम्ही.

मला मुंबईतले टॉवर ते गोव्याची टुमदार घरं दोन्ही आवडलं. आम्ही तिघांनी हा प्रवास एन्जॉय केला.

गंमत म्हणजे त्यानंतर पणजी देवगड बस प्रवास, हात दाखवा बस थांबवा असा होता Lol कारण येताना कोकणात घरी गणपतीला गेलो.

अंजु छान आठवण आहे. आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतायत. Happy

काय गं Happy खाउन मग भरवायचस >>> Lol

त्याला त्या एक तासात भूक लागलीही नसेल, पण मी उगाच..त्यावेळी तेवढंच सुचे बहुतेक.

आम्ही सगळे घरून खाऊन निघालेलो, त्यामुळे फार भूक नव्हती, मुलगा आमच्यातलेच खाईल, तीन पॅक जास्त होतील म्हणून आम्ही दोन घेतले तिघांत. लेकाने खाल्लंच नाही. फ्रुटी दिलेलं ते प्यायला, मग आमच्याही त्यालाच ठेवल्या.

तिकिटे ठेवलेली बरेच दिवस, अजूनही असतील, शोधायला हवीत.

मी स्वच्छंदी, छान लिहिलं आहे. ते मुलाला भरवण्याचं रिलेट केलं.
मंजू Happy
अंजू मस्त लिहिलं आहेस. नंतर हात दाखवा गाडी थाबवा एष्टी हे भारी आहे. देवगडला जायला दुसरा ऑप्शन तेव्हा तरी नव्हता. ट्रॅव्हल च्या गाड्या हल्ली झाल्यात.

हो हो पण आपली लाल डबा गाडी आवडते मला. खूप साथ दिलीय तिने आयुष्यात. लहानपणापासून कोकणात जाता येता आणि विशेषतः पावणेचार वर्षे लेकराला एकटीने घेऊन श्रीरामपूर कल्याण आणि उलट. हल्ली खूप वर्ष नाहीच झाला त्याने प्रवास.

थोडक्यात छान लिहिलंय.

>> माझा खाऊ तसाच राहून गेला
ओहह Happy

>> गोवा इतकं सुरेख दिसत होतं. ते मात्र माझ्या कायम लक्षात राहील..
वाह! गोव्याला जाणे तर होतेच पण आता पुढच्या वेळी यासाठी एकदा गोव्याला फ्लाइटने जावे वाटत आहे.