भाग १ - https://www.maayboli.com/node/88872
भाग २ - https://www.maayboli.com/node/88882
------------------------------------------------------------------
घटना विश्लेषण
विश्लेषणात्मक म्हणून ज्या मानसिक गुणांचा उल्लेख केला जातो त्यांचे स्वतःचे विश्लेषण करणे फारसे शक्य नसते. आपण त्यांना त्यांच्या परिणामांवरूनच ओळखतो. विश्लेषण करण्यायोग्य बुद्धिमत्ता असलेले हे गुण एखाद्या व्यक्तीत अतिशय प्रबळ प्रमाणात असतील तर त्यांचा निघणारा परिणाम त्या व्यक्तीस अत्यंत तीव्र आनंद देतो. जसा एखादा बलवान मनुष्य आपल्या शारीरिक सामर्थ्यावर आनंद व्यक्त करतो. कुस्ती किंवा धरपकड असणाऱ्या खेळात वाकबगार असल्याने तो आपल्या बलवानपणावर खूष असतो किंवा त्या गोष्टी त्याला आनंद देतात म्हणूनच आपल्या स्नायूंना कार्यरत करणाऱ्या व्यायामांचा तो नेहमीच आनंद घेत असतो. त्याचप्रमाणे विश्लेषकाला गोष्टींची गुंतागुंत उकलण्यात जी मानसिक क्रिया लागते तिच्यात आनंद मिळतो तसेच त्याआधिक त्या उकल झालेल्या घटनांनंतर झालेल्या परमानंदाचा तो भोक्ता असतो. त्याच्या विश्लेषणात्मक कौशल्याला वाव देणारी अगदी क्षुल्लक कामेदेखील त्याला आनंद देतात. त्याला कोडी, गुंतागुंतीचे प्रश्न आणि चित्रलिपी यांची विशेष आवड असते. त्यांची उत्तरे शोधताना तो अशी तीक्ष्ण बुद्धिमत्ता दाखवतो की, सामान्य माणसाला ती जवळजवळ अलौकिक वाटते. त्याचे निष्कर्ष प्रत्यक्षात पद्धतशीर विचारांच्या अगदी मूलभूत तत्त्वांवर आधारित असतात तरी त्यांच्यात अंतःप्रेरणेचा भास निर्माण होतो.
सत्यवीरच्या बाबतीत याचं गोष्टी होत्या. कोणताही गुन्हा किंवा गुन्हेगारी कृत्य जे कि सामान्यतः साधारण वाटतं असतं पण सत्यवीरमधला विश्लेषक त्या घटनांकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहत असतो म्हणूनच तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. घटना ह्या त्याचं असतात पण बऱ्याच लोकांना त्यातली कारणमिमांसा समजत नाही अशा प्रकाराकडे सत्यवीर आपल्या विश्लेषक चष्म्यातून पाहतो.
दिनशॉ खून प्रकरण कळल्यापासून सत्यवीर काहीसा याच विश्लेषकाच्या भूमिकेत गेलेला होता.
रात्र बरीच पुढे सरकली होती.
निंबाळकरांच्या घरातील पाहुण्यांची गर्दी केव्हाच ओसरली होती. काही वेळापूर्वी जिथे हशा, गप्पा आणि संगीताचा आवाज घुमत होता त्याच घरावर आता एक विचित्र शांतता उतरली होती.
समोर समुद्र काळोखात हरवून गेला होता. बंदरावरची काही मोजकी दिवे अजूनही पाण्यावर लुकलुकत होती. अधूनमधून एखाद्या मालवाहू जहाजाचा लांबवरून येणारा भोंगा त्या शांततेला छेद देत होता.
पोर्चमध्ये एका खुर्चीवर सत्यवीर ग्लासातून मद्याचे घोट घेत बसलेला होता. दिनशॉ खून प्रकरण हाताळायला तो तयार झाला असल्याने निंबाळकरांनी त्याला आपला पाहुणा म्हणूनच घरात राहायला सांगितलं होतं.
"कसल्या विचारात गढला आहेस" मागून निंबाळकर त्याच्याजवळ येत म्हणाले.
त्याचं लक्ष नव्हतं.
"अं..काही नाही... केसचे दुवे जुळवत बसलोय" सत्यवीर जरा ताठ बसत म्हणाला.
निंबाळकरांनी खुर्चीत मागे रेलत सत्यवीरकडे पाहिलं.
"मला पण सांग कि काय हाती लागलंय तुझ्या विचारमंथनातून.." निंबाळकरांनी आता समोरच्या टीपॉयवरील रिकामा ग्लास घेऊन बाटलीतून थोडं मद्य त्यात ओतलं आणि ग्लास ओठाला लावला.
"सध्या तरी काही विशेष नाही" मद्याचा एक घोट घेत सत्यवीर म्हणाला.
"चल... आता पुन्हा एकदा सुरुवातीपासून विचार करूया." निंबाळकर त्याच्याकडे पाहत म्हणाले.
सत्यवीरने ग्लास टेबलावर ठेवला.
"पहाटे चार वाजता किंकाळ्या ऐकू आल्या."
"बरोबर"
"दिनशॉ कुटुंबाच्या घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता."
"बरोबर."
"दरवाजा तोडून आत गेल्यावर घरात झटापटीचे स्पष्ट पुरावे होते. फर्निचर अस्ताव्यस्त. गादी पलंगावरून काढून फेकलेली. रक्ताने माखलेला वस्तरा. केसांच्या बटा."
निंबाळकर शांतपणे ऐकत होते.
"आणि आतमधे दोन मृतदेह" ते म्हणाले.
"हो. मेहेर घरातल्या एका खोलीत मृत अवस्थेत. तिच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आणि शेहरीन... घराच्या मागच्या बाजूच्या टेरेसवर गळा कापला गेलेल्या अवस्थेत."
सत्यवीर काही क्षण शांत राहिला.
"पण मला सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यायची आहे."
"कोणती?"
"त्या किंकाळ्या नेमक्या कोणाच्या होत्या?"
निंबाळकरांनी भुवया उंचावल्या.
"मेहेरच्या असाव्यात."
"असाव्यात?"
"एका शेजाऱ्याचं म्हणणं होतं कि एकच व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकल्या. मेहेरचा मृत्यू गळा आवळल्याने झाला. त्यामुळे..."
"म्हणजे आपण गृहीत धरलं की त्या मेहेरच्याच किंकाळ्या होत्या." सत्यवीर चेहरा काहीसा तिरकस करत म्हणाला.
निंबाळकर काही क्षण विचारात पडले.
"खून करताना झटापटीत त्या किंचाळल्या असतील.."
निंबाळकर काही क्षण विचारात पडले.
सत्यवीर उठला आणि पोर्चच्या कठड्याजवळ जाऊन उभा राहिला.
"समजा त्या मेहेरच्या किंकाळ्या होत्या."
त्याने हाताने हवेत एक काल्पनिक घराचा आराखडा आखल्यासारखं केलं.
"खुनी घरात शिरतो. मेहेरला गाठतो. तिची झटापट होते. ती किंचाळते. खुनी तिचा गळा आवळतो."
"हो आणि पुढे?"
"मग प्रश्न आहे कि शेहरीन कुठे होती?"
निंबाळकर सरळ बसले.
"घरातच असणार."
"पण कुठे?"
निंबाळकरांनी उत्तर दिलं नाही.
सत्यवीर हळूहळू बोलू लागला.
"शेहरीन वृद्ध होती. घरात फक्त दोनच स्त्रिया राहत होत्या. रात्री चार वाजता मुलीच्या किंकाळ्या ऐकल्या तर आई धावत आली असती."
"कदाचित ती झोपलेली असेल." निंबाळकरांनी आपला तर्क दिला.
पण शेजाऱ्यांनी ऐकलेल्या किंकाळ्या इतक्या मोठ्या होत्या की संपूर्ण इमारत जागी झाली."
निंबाळकरांनी हळूच मान डोलावली.
"बरोबर."
"आता दुसरी शक्यता पडताळून पाहू."
"खुनी आधी शेहरीनकडे गेला. तिचा काटा काढला"
निंबाळकरांनी लगेच विचारलं "मग मेहेरच्या किंकाळ्या?"
"त्या नंतरच्या.."
सत्यवीर काही क्षण गप्प राहिला. पोर्चमध्ये अचानक शांतता पसरली. समुद्रावरून आलेल्या वाऱ्याने टेबलावर ठेवलेली कागदपत्रं हलली.
निंबाळकरांनी सत्यवीरकडे निरखून पाहिलं.
"म्हणजे तुझ्या मते आधी शेहरीनचा खून झाला?"
"शक्यता आहे."
पण तिचा मृतदेह टेरेसवर सापडला. आणि मेहेरचा मृतदेह घरात."
"यातून मग एक प्रश्न निर्माण होतो."
सत्यवीरने टेबलावर बोटाने दोन बिंदू केले.
"इथे मेहेर."
दुसरा बिंदू.
"इथे शेहरीन."
मग दोन्ही बिंदूंना जोडणारी काल्पनिक रेषा आखली.
"हल्लेखोराला दोघींना वेगवेगळ्या ठिकाणी गाठावं लागलं.. दोघींना एकत्रच गाठून त्याने हल्ला चढवला. शेहरीन घाबरून घरच्या मागे असलेल्या टेरेसकडे धावली. मेहेरचा गळा आवळेपर्यंत शेहरिनाने किंकाळी मारली नंतर खुन्याने तिचा गळा कापला..किंवा आधी शेहरीनचा गळा कापला ते पाहून मेहेर किंचाळली मग खुन्याने ती जास्त किंचाळू नये म्हणून तिचा गळा आवळला"
या तर्कावर होकार दर्शवत डोलवत निंबाळकर फक्त शांत बसले.
ग्लासमधून काही घोट घेतल्यानंतर निंबाळकर म्हणाले- "तुझा मते हा पूर्वनियोजित गुन्हा आहे?"
"मला वाटतं त्यापेक्षा जास्त काहीतरी आहे."
"म्हणजे नक्की काय?"
"घटनास्थळावर खूप काही जास्त आहे."
निंबाळकर गोंधळले.
"जास्त?"
"हो."
"फर्निचरची तोडफोड, बेडवरची गादी जमिनीवर पडलेली. रक्ताळलेला वस्तरा, केसांच्या बटा, उघडी तिजोरी आणि त्यातुन काहीही चोरीला गेलेलं नाही."
सत्यवीर कठड्यावर हात ठेवत म्हणाला.
"हम्म.. हे खरं आहे गोंधळात टाकणारं देखील" निंबाळकर म्हणाले.
"हे सगळं एखाद्या झटापटीत नैसर्गिकपणे घडू शकतं. पण जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मला त्या गोष्टीवरच संशय येतो."
निंबाळकर हलकेच हसले.
"तुझं निरीक्षण कौशल्य खरोखरच कौतुकाला पात्र आहे. देशमुखही याचं गोष्टीची स्तुती करायचा"
सत्यवीर हसला.
"तुम्ही पोलिसात बत्तीस वर्षं काम केलंय. तुम्हालाही माहिती आहेच कि गुन्हेगार कधी कधी पुरावा लपवण्यापेक्षा पुरावा तयार करण्याच्या जास्त चुका करतो."
"घटनस्थळी वस्तरा पण मिळालाय?"
"वस्तरा खरोखर वापरला गेला आहे."
"फॉरेन्सिकने सांगितलंय."
"हो. पण तो शेहरीनला मारण्यासाठी वापरला गेला असला, तरी तो तिथे कसा पोहोचला हे महत्त्वाचं आहे."
दोघेही पुन्हा शांत झाले. दूर समुद्रावरून एखाद्या होडीच्या इंजिनाचा आवाज आला. काळोखात समुद्रावरच्या जहाजांची दिव्याची लुकलुक खुपचं मनोरम्य दिसत होती.
निंबाळकरांनी हळू आवाजात विचारलं.
"केसांच्या बटा?"
सत्यवीरने एक उसासा टाकला "तो दुसरा विचित्र भाग."
"त्या वृद्ध स्त्रीचे केस असतील?" निंबाळकरांनी सांगितलं.
"कदाचित."
"मग कोणाचे?"
"पण शौनकने सांगितलं की त्या केसांना मुळांसकट ओढून काढल्यासारखं दिसत होतं."
"म्हणजे झटापट झाली."
"कदाचित."
"तुला प्रत्येक गोष्टीत 'कदाचित” का दिसतंय?"
"कारण अजून मी घटनास्थळ पाहिलेलं नाही." सत्यवीर मंद हसत म्हणाला.
निंबाळकर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.
"तू उद्या तिथे जाणार आहेस बाय द वे... "
"हो.. पण आपण जी कल्पना करतोय... घटना खरंच त्या क्रमाने घडणं शक्य आहे का?"
निंबाळकर शांत झाले. सत्यवीरने पुन्हा घटनाक्रम मांडायला सुरुवात केली.
"समजा रात्री तीन वाजून काही मिनिटांनी खुनी घरात प्रवेश करतो."
"मुख्य दरवाजा?"
"तोच प्रश्न. दरवाजा आतून बंद होता."
"खिडकी?"
"तिसरा मजला."
"मग?"
"खुनी आधीपासून घरात असण्याची शक्यता."
"कसं शक्य आहे...पण घरात दोन स्त्रिया राहत होत्या."
"आणि त्या दोघींना कदाचित तिसरी व्यक्ती घरात असल्याचं माहीतच नव्हतं. कदाचित ती व्यक्ती आधीच तिथे येऊन लपली असेल"
निंबाळकर अचानक पुढे झुकले.
"सत्यवीर... हे कसं असेल"
"हो?"
जर खुनी आधीपासून घरात लपून बसला असेल. तर त्याला तिजोरीची किल्ली कुठे आहे हे माहिती असायला हवं आणि तिजोरी उघडण्यासाठी किल्ली वापरली गेली... म्हणजेच खुन्याला तिजोरी माहीत होती."
सत्यवीरच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं.
"पण त्यातून काही घेतलं नाही." निंबाळकर विचार करत बोलले.
"किंवा... आपल्याला वाटतंय की तिजोरीतून काही घेतलं गेलं नाही."
"म्हणजे?"
आपण फक्त तिजोरीत काय शिल्लक राहिलंय हे पाहिलंय. कदाचित तिथे आधी काहीतरी होतं"
निंबाळकरांच्या डोळ्यांत चमक आली.
दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. समुद्रावर पुन्हा एकदा जहाजाचा भोंगा घुमला.
आणि त्या आवाजात सत्यवीरच्या मनात एक नवा प्रश्न जन्माला आला.
दिनशॉंच्या घरात त्या रात्री खरंच दोनच व्यक्ती होत्या का?
===========================================================
चांगली सुरू आहे कथा.
चांगली सुरू आहे कथा.
पण सध्या इथे बाप्पांचा माहोल आहे त्यामुळे इकडे कमी लक्ष असेल.
थोडे थांबून नंतर भाग पोस्ट करा म्हणजे जास्त वाचक इकडे लक्ष देतील.
चांगली सुरू आहे कथा>
चांगली सुरू आहे कथा>>प्रतिसादाबद्दल आभार.
पण सध्या इथे बाप्पांचा माहोल आहे त्यामुळे इकडे कमी लक्ष असेल>>>हो खरे आहे ते. तुम्ही म्हणताय तसं थोडे दिवस थांबून मग पुढचे भाग टाकेन.